Sunday, January 23, 2011

खिडक्या- चित्रातल्या आणि सिनेमातल्या..

सुधीर पटवर्धनांचं फॅमिली फिक्शन हे चित्रप्रदर्शन आणि किरण रावचा धोबी घाट एकाच दिवशी पाहिलं.दोन्हीमधे शहर आहेत,शहरी अवकाशाला कधी आतून,कधी बाहेरुन न्याहाळणार्‍या खिडक्यांमधली माणसं आहेत.
ती माणसं एकेकटी आहेत आणि त्यांना घरांच्या खिडक्यांमधून दिसणार्‍या शहरी अवकाशाचा संदर्भ चिकटून आहे.या दोन्हीमधल्या खिडक्यांमधून आत डोकावताना किंवा बाहेर पहाताना प्रत्येक वेळी दिसतं ते फक्त शहरच.आणि ते शहर आपल्या ओळखीचं.



सुधीर पटवर्धनांच्या फॅमिली फिक्शनमधल्या प्रातिनिधीक चित्रात घरातलं बंदिस्त कौटुंबिक अवकाश खिडकीद्वारे मुक्त झालेलं आहे.बाहेरचं शहर,त्या शहरातलं पल्प फिक्शन शहरी कुटुंबामधे आता एका अपरिहार्य बेमालूमपणे मिसळून गेलं आहे. चित्रकला,सिनेमाच्या भिन्न जगांमधल्या अनेक प्रतिमा घरांच्या खिडक्यांमधून आत शिरलेल्या आहेत.काळाची चौकट गळून पडलेली आहे.
चित्रामधली ती मंद,निर्बुद्ध वाटू शकणारा रिकामपणा चेहर्‍यावर वागवत खुर्चीत बसलेली गृहिणी आणि काहीसा त्रासिक कंटाळा चेहर्‍यावर वागवत सोफ्यावर बसलेला मुलगा,दोघांच्या रिकाम्या नजरेला कदाचित टीव्हीवरच्या खिडकीतून दिसणार्‍या रुटीन प्रतिमांचा बुद्धीवरुन ओघळून जाणार्‍या प्रतिमांचा संदर्भ आहे.घरातल्या चिंतित,काय नक्की करायचं न सुचून उभ्या असलेल्या आधीच्या पिढीतल्या आजोबांचं शोकेसच्या काचेत पडलेलं प्रतिबिंब आणि शोकेसमधून दिसणारा बुद्धच कदाचित या सगळ्यात वेगळा.
शहराला सरावलेल्या नजरांची ती सारी कुटुंब, त्यांच्या एकत्रित रहाण्याला छेद देणारं एकेकटेपण.  शहरं पटवर्धनांच्या चित्रकुटुंबातील व्यक्तिमत्वाचा अभिन्न भाग बनलेली..


सुधीर पटवर्धनांच्या या चित्रमालिकेत अशा अनेक खिडक्या आहेत.एक गॅलरीही आहे ज्यात आपल्या नजरेसमोर बदलत गेलेल्या बाहेरच्या शहराला अणि खिडकीच्या आतल्या बदलत गेलेल्या आपल्या कुटुंबाला,त्यातल्या नातेसंबंधांना काहीशा भावविभोर,हुरहुरत्या नजरेने न्याहाळणार्‍या दोन वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरच्या स्त्रिया आहेत.त्यांचा तो कदाचित नॉस्टेल्जिया आपल्या खूप जवळून ओळखीचा.

'व्हिजिटेशन'मधल्या खिडकीत धक्कादायक अनुभवांच्या कोड्यात टाकणार्‍या स्मृती आणि खिडकीतून दिसणार्‍या विशिष्ट देखाव्याच्या आकर्षणातून निर्माण झालेलं स्वप्न आहे.



'विंडो'मधे तर एका अवकाशातून दुसर्‍या अवकाशात पहाणार्‍या असंख्य लहान मोठ्या खिडक्या आहेत.अवकाश पाहणारी नजर त्यात दृश्य नाही तरी काही फरक पडत नाही.दृष्टी आपलीच आहे. आकलनाच्या जाणीवाही आपल्याच आहेत.
खिडकीच्या संदर्भचौकटींमधून शहराचा दिसणारा तुकडा आपल्यालाही कधी आकर्षक वाटणारा.
तो मर्यादित अवकाशाचा तुकडा आहे तोवरच आणि म्हणूनच त्याचं आकर्षण टिकून रहाणार आहे याचं भान असलेली आपली नजर त्या खिडक्यांच्या चौकटींवर खिळून रहाते.
बाहेरचं शहरी अवकाश सुरक्षित नव्हतच कधी पण आता घरातलंही अवकाश सुरक्षित नाहीये ही चित्रातलं सूचन अस्वस्थ करुन सोडतं.

धोबी घाटमधेही एक चित्रकार आहे,त्याचं शहर आहे आणि त्या शहरातल्या खिडक्या आहेत.मुंबईतल्या गजबजलेल्या विभागातल्या जुनाट,उंच इमारतींच्या घरांच्या खिडकीत उभं राहून आतलं आणि बाहेरचं अवकाश त्रयस्थपणे न्याहाळताना नकळत त्यात गुंतून जाणारी यातली चित्रकाराची नजर.
आपल्याला अगदी अनोळखी असं समांतर आयुष्य नजरेसमोर अनुभवत,अस्वस्थ होत ते जगणं कॅनव्हासवर रंगवणारा तो पेंटर.तटस्थ तरीही संवेदनशील.त्याच्या समोरच्या खिडकीत त्याला न्याहाळणारी एक आसक्त नजरही आहे ज्यापासून तो अनभिज्ञ अहे.


धोबी घाटमधे अजूनही एक खिडकी आहे.खिडकीतल्या तिच्या हातात हॅन्डीकॅम आहे.त्या खिडकीतून बाहेरचं शहर बघणारी तिची नजर या शहराला सरावलेली नाही.नवखी आहे.लहान गावामधून या शहरात आलेल्या एका रसरसत्या उत्साहाच्या,नव्या जाणीवांना आपलंस करु पाहणार्‍या तरुणीची ती नजर आहे.खिडकीतून तिला समोरच्या शहरांना सरावलेल्या घरांच्या खिडक्या दिसतात,त्यात झटपट स्वयंपाक आटपून पोळीभाजीचे डबे भरुन घराबाहेर पडणार्‍या गृहिणी,घरकाम काही सेकंदात आटपून घरातून निघून जाणार्‍या 'बाई आणि त्यांची वनिता',संध्याकाळच्या दिव्यांनी लखलखून गेलेला धावता रस्ता,शहरावर कोसळून पडणारा पाऊस असं सगळं आहे आणि या सर्वातून तिला गिळून टाकणारा,संपवून टाकणारा अपरिहार्य एकटेपणाही आहे.

सुधीर पटवर्धनांच्या फॅमिली फिक्शनमधल्या त्या शहरी कुटुंबांतलं रिकामपण,विसंवाद अधोरेखित करणार्‍या खिडक्या आणि धोबी घाटमधल्या एकेकट्या माणसांचं खिडक्यांच्या माध्यमातून बाहेरच्या शहराशी अणि एकमेकांशी जुळत गेलेल्या नात्यांमधला रिकामा अवकाश अधोरेखित करणार्‍या खिडक्या..
शेवटी काय तर सुधीर पटवर्धन म्हणतात तसंच.अंतर्गत आणि बाह्य अवकाशांमधला खिडकी हा एक दुवा.दोन्हींमधील अंतर कायम राखणारा. 


शर्मिला फडके

1 comment:

  1. सुधीर पटवर्धन यांची चित्रे,या प्रदर्शनाचे नाव आणि
    या दोन्हीवरची तुमची comment हे सर्व आवडले.
    माझ्या दृष्टीने सुधीर पटवर्धन यांचे हे प्रदर्शन
    म्हणजे एक मोठी घटना होती.
    मनःपूर्वक आभार.
    - जयंत जोशी.

    ReplyDelete