Monday, January 3, 2011

नामवंत शिल्पकार किशोर ठाकूर म्हणतात,

राज्यकर्त्यांनी हे चाळे थांबवावेत!

झाल्या प्रकाराबद्दल वाईट वाटतंच पण खूप चीडही येते. गेल्या ३५० – ४०० वर्षांचा इतिहास जो आजपर्यंत आपण प्रत्येक जण आपल्या मनात जपत आलो, तो इतिहास खोटा ठरवणारे हे कोण मोठे इतिहास तज्ज्ञ लागून गेले. दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते असं सांगणारी ही मूठभर माणसं स्वत:ला समजतात कोण? हा प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या राज कारणात गेल्या काही वर्षांपासून वाढत चाललेल्या झुंबडशाहीचं मूर्त रूप आहे.

एखादी कलाकृती, तिची जडण – घडण, त्या कलाकृतीशी ती घडवणार्‍या कलाकाराचं असलेलं नातं या सगळ्या गोष्टींना तुच्छ लेखून रातोरात त्या शिल्पाचा जो दुर्दैवी अंत करण्यात आला, त्याचा मी निषेध करतो. कलाकाराच्या भावना, त्याच्या जाणीवा; याच्याशी हे सारं घडवून आणणार्‍यांना काहीच देणं – घेणं नाही.(एवढंच कशाला जनसामान्यांच्या भावनांची यांना पर्वा नसते,तर कलाकारचं संवेदनशील मन यांना काय कळणार?) जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. मी तर म्हणीन की गेल्या काही दिवसांत महगाई, कांद्याची भाववाढ, पेट्रोलची दरवाढ, 2G स्पेक्ट्रम असे घोटाळे करून आपल्या राज्यकर्त्यांनी जो एक नवा ‘आदर्श’ घडवलाय, त्यापासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार घडवून आणलेला आहे; जेणे करून सामान्य जनता हे सगळं विसरून जाईल.

पण आपणा सर्वांनाच माहिती आहे की आपला समाज हा आता अडाणी राहिलेला नाही.(जरी राज्यकर्ते तसं समजत असले आणि ते स्वत: तसे असले तरी) त्यामुळे अशा निरर्थक चवली – पावलीच्या खेळ्या खेळून काही जनता आपले मूलभूत प्रश्न विसरणार नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी त्यांचे हे चाळे थांबवावेत.
एक कलाकार म्हणून, शिल्पकार म्हणून खूप वाईट वाटतं, पण मी कलाकार असलो तरी आहे सामान्य माणूसच! त्यामुळेच जरा सविस्तर बोल्लो. धन्यवाद! 

1 comment:

  1. saheb, maaf kara, pan janata ajunahi adanich ahe. konitari barobar mhanalech aahe' jaat jaat nahi' ani rajkarani kitihi ghotale karu det, jaativishai kahi mudda ala tar matra 'janata' achanak jagrut hote!

    ReplyDelete