Sunday, January 23, 2011

खिडक्या- चित्रातल्या आणि सिनेमातल्या..

सुधीर पटवर्धनांचं फॅमिली फिक्शन हे चित्रप्रदर्शन आणि किरण रावचा धोबी घाट एकाच दिवशी पाहिलं.दोन्हीमधे शहर आहेत,शहरी अवकाशाला कधी आतून,कधी बाहेरुन न्याहाळणार्‍या खिडक्यांमधली माणसं आहेत.
ती माणसं एकेकटी आहेत आणि त्यांना घरांच्या खिडक्यांमधून दिसणार्‍या शहरी अवकाशाचा संदर्भ चिकटून आहे.या दोन्हीमधल्या खिडक्यांमधून आत डोकावताना किंवा बाहेर पहाताना प्रत्येक वेळी दिसतं ते फक्त शहरच.आणि ते शहर आपल्या ओळखीचं.सुधीर पटवर्धनांच्या फॅमिली फिक्शनमधल्या प्रातिनिधीक चित्रात घरातलं बंदिस्त कौटुंबिक अवकाश खिडकीद्वारे मुक्त झालेलं आहे.बाहेरचं शहर,त्या शहरातलं पल्प फिक्शन शहरी कुटुंबामधे आता एका अपरिहार्य बेमालूमपणे मिसळून गेलं आहे. चित्रकला,सिनेमाच्या भिन्न जगांमधल्या अनेक प्रतिमा घरांच्या खिडक्यांमधून आत शिरलेल्या आहेत.काळाची चौकट गळून पडलेली आहे.
चित्रामधली ती मंद,निर्बुद्ध वाटू शकणारा रिकामपणा चेहर्‍यावर वागवत खुर्चीत बसलेली गृहिणी आणि काहीसा त्रासिक कंटाळा चेहर्‍यावर वागवत सोफ्यावर बसलेला मुलगा,दोघांच्या रिकाम्या नजरेला कदाचित टीव्हीवरच्या खिडकीतून दिसणार्‍या रुटीन प्रतिमांचा बुद्धीवरुन ओघळून जाणार्‍या प्रतिमांचा संदर्भ आहे.घरातल्या चिंतित,काय नक्की करायचं न सुचून उभ्या असलेल्या आधीच्या पिढीतल्या आजोबांचं शोकेसच्या काचेत पडलेलं प्रतिबिंब आणि शोकेसमधून दिसणारा बुद्धच कदाचित या सगळ्यात वेगळा.
शहराला सरावलेल्या नजरांची ती सारी कुटुंब, त्यांच्या एकत्रित रहाण्याला छेद देणारं एकेकटेपण.  शहरं पटवर्धनांच्या चित्रकुटुंबातील व्यक्तिमत्वाचा अभिन्न भाग बनलेली..


सुधीर पटवर्धनांच्या या चित्रमालिकेत अशा अनेक खिडक्या आहेत.एक गॅलरीही आहे ज्यात आपल्या नजरेसमोर बदलत गेलेल्या बाहेरच्या शहराला अणि खिडकीच्या आतल्या बदलत गेलेल्या आपल्या कुटुंबाला,त्यातल्या नातेसंबंधांना काहीशा भावविभोर,हुरहुरत्या नजरेने न्याहाळणार्‍या दोन वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरच्या स्त्रिया आहेत.त्यांचा तो कदाचित नॉस्टेल्जिया आपल्या खूप जवळून ओळखीचा.

'व्हिजिटेशन'मधल्या खिडकीत धक्कादायक अनुभवांच्या कोड्यात टाकणार्‍या स्मृती आणि खिडकीतून दिसणार्‍या विशिष्ट देखाव्याच्या आकर्षणातून निर्माण झालेलं स्वप्न आहे.'विंडो'मधे तर एका अवकाशातून दुसर्‍या अवकाशात पहाणार्‍या असंख्य लहान मोठ्या खिडक्या आहेत.अवकाश पाहणारी नजर त्यात दृश्य नाही तरी काही फरक पडत नाही.दृष्टी आपलीच आहे. आकलनाच्या जाणीवाही आपल्याच आहेत.
खिडकीच्या संदर्भचौकटींमधून शहराचा दिसणारा तुकडा आपल्यालाही कधी आकर्षक वाटणारा.
तो मर्यादित अवकाशाचा तुकडा आहे तोवरच आणि म्हणूनच त्याचं आकर्षण टिकून रहाणार आहे याचं भान असलेली आपली नजर त्या खिडक्यांच्या चौकटींवर खिळून रहाते.
बाहेरचं शहरी अवकाश सुरक्षित नव्हतच कधी पण आता घरातलंही अवकाश सुरक्षित नाहीये ही चित्रातलं सूचन अस्वस्थ करुन सोडतं.

धोबी घाटमधेही एक चित्रकार आहे,त्याचं शहर आहे आणि त्या शहरातल्या खिडक्या आहेत.मुंबईतल्या गजबजलेल्या विभागातल्या जुनाट,उंच इमारतींच्या घरांच्या खिडकीत उभं राहून आतलं आणि बाहेरचं अवकाश त्रयस्थपणे न्याहाळताना नकळत त्यात गुंतून जाणारी यातली चित्रकाराची नजर.
आपल्याला अगदी अनोळखी असं समांतर आयुष्य नजरेसमोर अनुभवत,अस्वस्थ होत ते जगणं कॅनव्हासवर रंगवणारा तो पेंटर.तटस्थ तरीही संवेदनशील.त्याच्या समोरच्या खिडकीत त्याला न्याहाळणारी एक आसक्त नजरही आहे ज्यापासून तो अनभिज्ञ अहे.


धोबी घाटमधे अजूनही एक खिडकी आहे.खिडकीतल्या तिच्या हातात हॅन्डीकॅम आहे.त्या खिडकीतून बाहेरचं शहर बघणारी तिची नजर या शहराला सरावलेली नाही.नवखी आहे.लहान गावामधून या शहरात आलेल्या एका रसरसत्या उत्साहाच्या,नव्या जाणीवांना आपलंस करु पाहणार्‍या तरुणीची ती नजर आहे.खिडकीतून तिला समोरच्या शहरांना सरावलेल्या घरांच्या खिडक्या दिसतात,त्यात झटपट स्वयंपाक आटपून पोळीभाजीचे डबे भरुन घराबाहेर पडणार्‍या गृहिणी,घरकाम काही सेकंदात आटपून घरातून निघून जाणार्‍या 'बाई आणि त्यांची वनिता',संध्याकाळच्या दिव्यांनी लखलखून गेलेला धावता रस्ता,शहरावर कोसळून पडणारा पाऊस असं सगळं आहे आणि या सर्वातून तिला गिळून टाकणारा,संपवून टाकणारा अपरिहार्य एकटेपणाही आहे.

सुधीर पटवर्धनांच्या फॅमिली फिक्शनमधल्या त्या शहरी कुटुंबांतलं रिकामपण,विसंवाद अधोरेखित करणार्‍या खिडक्या आणि धोबी घाटमधल्या एकेकट्या माणसांचं खिडक्यांच्या माध्यमातून बाहेरच्या शहराशी अणि एकमेकांशी जुळत गेलेल्या नात्यांमधला रिकामा अवकाश अधोरेखित करणार्‍या खिडक्या..
शेवटी काय तर सुधीर पटवर्धन म्हणतात तसंच.अंतर्गत आणि बाह्य अवकाशांमधला खिडकी हा एक दुवा.दोन्हींमधील अंतर कायम राखणारा. 


शर्मिला फडके

Wednesday, January 12, 2011

अरूपाचा स्थापत्यकार: अनिश कपूर

अनिश कपूर हे भारतीय वंशाचे ब्रिटिश शिल्पकार. त्यांच्या भव्य आणि नेत्रदीपक शिल्पांचं प्रदर्शन मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमधे गेले महिनाभर सुरु आहे. अनेकांनी ते पाहिलंही असेल. ज्यांनी नसेल पाहिलं त्यांना येत्या १८ तारखेपर्यंतच फक्त ते पाहण्याची संधी घेता येईल. अनिश कपूर यांचं प्रदर्शन प्रत्यक्षात पाहणं हा एक अत्यंत भारावून टाकणारा अनुभव असतो. मांडलेल्या शिल्पकृती, इन्स्टॉलेशन्सचा नक्की अर्थ काय आहे, ती अशा तर्‍हेने मांडण्यामागची शिल्पकाराची भूमिका काय असू शकते यावर एक अत्यंत सुंदर लेख चित्रकार संतोष मोरे यांनी खास 'चिन्ह' करता लिहून पाठवला आहे. हा लेख वाचून ज्यांनी अद्याप हे प्रदर्शन पाहिलेले नाही ते नक्कीच मेहबूब स्टुडिओमधे धाव घेतीलही. त्यांनी ती घ्यावी हे मात्र नक्की.अरूपाचा स्थापत्यकार
भारतीय वंशाचा ब्रिटिश शिल्पकार अनिश कपूर यांचं काम पहिल्यांदाच भारतात आलं आहे. मुंबईत आणि दिल्लीत त्यांच्या भव्य आणि नेत्रदीपक शिल्पांचं प्रदर्शन नुकतंच भरलं आहे. १९५४ साली मुंबईत जन्मलेला अनिश १९७३ साली लंडनला उच्च कलाशिक्षणासाठी गेला आणि १९७९ साली कलाशिक्षण पूर्ण करून तिथंच स्थायिक झाला. १९७९ सालीच तीन आठवड्यांच्या भारत दौर्‍यानंतर त्यानं लंडनला जाऊन जी चित्रं काढली त्याच्याच पुढचा भाग म्हणजे त्याची समूहशिल्पं. या समूहशिल्पांमुळेच त्याला जागतिक ओळख मिळाली. हीच समूहशिल्प दिल्लीच्या प्रदर्शनात आहेत तर मुंबईतली त्याची शिल्पं ही त्याच्या गेल्या दहा वर्षातल्या कामाचा आढावा घेणारी आहेत. या दोन प्रदर्शनांच्या निमित्तानं मला उमगलेला अनिश कपूर.....
अनिशच्या कामाची खरी सुरूवात १९७९च्या त्याच्या भारत भेटीनंतर झाली. त्या आधी महाविद्यालयात असताना तो चित्रं, रेखाटनं, परफॉर्मन्स इत्यादी मध्ये प्रयोग करीत होता, तसेच सुलेख, उत्थित शिल्पं, टॅपेस्ट्री यामध्ये त्याला विशेष रस होता. त्याच्या भारतभेटीनंतर त्यानं जी कामाची शृंखला केली; त्यात प्रामुख्यानं कागदावर भडक लाल रंगाचे आकार असत. ही चित्रंच त्याच्या पुढच्या शिल्पशृंखलेची नांदी ठरली. ही शृंखला म्हणजेच – ‘१००० नेम्स’. लहान लहान शिल्पांचा समूह असे. ही शिल्पं शुद्ध रंगद्रव्य वापरून केलेली आहेत. ज्याप्रमाणे आपण भारतात रंगपंचमीचे रंग, रांगोळी अथवा देवळांबाहेर असलेले अबीर, बुक्का, कुंकू,हळद यांचे ‘ढिगारे’ पाहतो, त्या ढिगार्‍यांची आठवण ही शिल्पं पाहताना होतो. या शिल्पकृतींचे केवळ आकार पाहिले तर ते बीज, घुमट, उरोज व पायर्‍यांप्रमाणे भासणारे भौमितीक आकार दिसतात, परंतु त्या शिल्पांची शीर्षकं पाहिली तर त्या साधेपणामागील गर्भितार्थ आपल्या लक्षात येईल. उदा: ‘To Reflect an intimate Part of the Red’ या शिल्पात तो लाल रंगाच्या लालसरपणाबद्दल, त्याच्या भडकपणाबद्दल; त्याच्या मनात खोलवर दडलेल्या भावविश्वाचं प्रतिबिंब बघतो.या शृंखलेतली त्याची शिल्पं आकाराबद्दल असलेली ढोबळ ओळख व त्यातली अमूर्तता. यांमधील सीमारेषा आहे. आकार आहेतच परंतु तो बोलतो त्या आकारावर पांघरलेल्या रंगाच्या भावाबद्दल. आकार आहेत घुमट, बीज, पायर्‍यांसारखे दिसणारे व भौमितिक आकार इत्यादी परंतु त्यांवर शुद्ध रंगद्रव्यामुळे(Pigment) झालेला परिणाम. त्या मूळ आकारापासून खूप खोलवर घेवून जातो. या कामांमध्ये आकारांचा वापर करून तो कथन (Narration) करतो, प्ण अमूर्ताचं. लाल रंगाचा ‘भडकपणा’, पिवळ्या रंगाची पिवळी ‘धम्मकता’, निळ्या रंगाची ‘नितळता’, काळ्याची ‘गहनता’, आकारांशी संवाद संवाद साधतेच. परंतु त्या आकारांत अडकून न राहता खूप खोलवर जाते. आकार आहेत परंतु त्यांची मूळ ओळख बाहेर सोडून. कारण अनिश आकारांचा केवळ आधार घेवून ‘मोठ्या’ संकल्पनेकडे निर्देश करतो. जसा पर्शियन गालीचा हा जमिनीवरील दगडी वेलबुट्टीवरून प्रेरित झाला आहे. गालीचा हा सुद्धा जमिनीवरच बसण्याचं साधन आहे, परंतु जमिनीच्य अप्रतिकृतीपासून अगदी भिन्न. जणो काही हातात मावणारी, गुंडाळता येणारी, कुठेही ने आण करता येणारी प्रतिजमिनच; अगदी अलिबाबाच्या गालिच्यासारखी. असाच काही दृष्टीकोन अनिशनं जोपासलाय. प्रेरणा जिथनं मिळते तो मूळ स्त्रोत आणि अभिव्यक्त होणारी भावना या दोन्ही एकमेकांशी संवाद साधतील परंतु त्यांच्यातलं नातं मात्र वेगळं असेल. म्हणजे शिल्पांच आकार आधी घुमट उरोजांसारखा वाटेल परंतु त्याचा परिणाम मात्र आकारांच्या पलिकडचा असेल, मूळ आकाराची ओळख हरवून. या शृंखलेचं ‘1000 Names’ हे शीर्षकसुद्धा विष्णूच्या सहस्रनामावरून प्रेरित झालंय. आता विष्णूची सहस्रनामं व अनिशचे शिल्पसमूह यांचा संबंध काय हा मुद्दा गौण ठरतो. याच शृंखलेला त्याला लंडनमधलं मानाचं समजलं जाणारं ‘टर्नर’ पारितोषिक मिळालं, तसंच १९९१ मध्ये त्यानं व्हेनिस बिएनालमधे ब्रिटनचं प्रतिनिधीत्त्व केलं.
या शृंखलेनंतर अनिशनं आपलं लक्ष समूह शिल्पांवरून मोठ्या आकाराच्या एकल शिल्पांकडे केंद्रित केलं. वालुकाश्मात तयार केलेल्या आयताकृती उभट शिल्पात त्यानं दरवाजा व उंबरठ्याप्रमाणे भासणारे करकरीत आकार खोदले. त्या आयताकृती आकारात पुन्हा एक लहान आकार थोड्या खोलवर खोदून त्यात गडद निळा रंग (Pigment) लावला.आता हे शिल्प ओबडधोबद परंतु आयताकृती उभ्या दगडात केलेलं, त्यात करकरीत भौमितिक आकार व त्यात पुन्हा रंग. या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हा वालुकाश्म साधारणत: इजिप्तमधला आहे, जो इजिप्तमधल्या लोकांच्या धारणेची आठवण करून देतो. मृत्युनंतर त्यांचा राजा ‘फॅरो’ त्याच्या थडग्यात त्या आभासी दरवाज्यात जिवंत राहील ही धारणा. या निळ्या गदड दरवाजासदृश्य आकारामुळे या धारणेस आधार मिळतो. शिल्पांच्या उभट आकारामुळे कधी तो प्राचीन कीर्तिस्तंभ, तर कधी इजिप्शियन थडग्याची आठवण करून देतो. इथेही गूढ, मायावी- आभासी भाव प्रकर्षानं जाणवतो. आणखी एक गोष्ट इथं लक्षात येते ती ही की शिल्पकार जर का त्रिमित आकृतीबंध घडवतो व चित्रकार द्विमितीतून आभास निर्माण करतो तर अनिश या दोन्ही शक्यतांमध्ये हुकुमत गाजवतो. ‘आभास – माया’ हा अनिशच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. त्याची अति चकचकीत पोलादासारखी शिल्पं त्याच्या आरशाप्रमाणे गुळगुळीत पृष्ठभागामुळे आजूबाजूचे वातावरण कवेत घेते. शिल्पांच्या भौमितिक आकारामुळे व त्यांच्या गणितीय रचनेमुळे आजूबाजूच्या वातावरणातील रचना, व्यक्ती, त्याच्या हालचाली, वस्तू इत्यादी क्षणोक्षणी विरूपित होत जातात. त्याचं आयरिस (डोळ्यांचं बुबूळ) हे शिल्प पहा.

या शिल्पाला केवळ ‘अंतर्वक्र आरसा’ न म्हणता ‘आयरिस' हे शीर्षक देताना अनिशनं काय विचार केला असेल हे समजतं. डोळ्याच्या बुबूळाचा बहिर्वक्रपणा व पाणीदारपणा या दोन्ही गोष्टींना आरंभबिंदू मानून अनिश अवकाशाला आव्हान देतो. तीच त्याची खासीयत आहे, आणि म्हणूनच ते शिल्प ‘अंतर्वक्र आरसा’ इथपर्यंतच मर्यादित राहत नाही. एका मोठ्ठ्या भिंतीच्या पृष्ठभागावर ते कधी आत बुडाल्यासारखं वाटतं तर कधी आजूबाजूच्या वातवरणाला पाण्यातील भोवर्‍या प्रमाणे आंत आंत घेवून जातं. हा परिणाम अतिशय चमत्कारिक, संभ्रमित करणारा व आपणास अवकाशात ढकलणारा असतो. म्हणूनच अनिशची शिल्पं फोटोत किंवा इंटरनेटवर पाहण्यासारखी नाहीत तर प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखी आहेत.
आयरिस प्रमाणेच त्याची ‘सी- कर्व्ह’, ‘एस – कर्व्ह’ ही शिल्प देखील अवर्णनीय आहेत.

सूर्यप्रकाश शिल्पाच्या पृष्ठभागावर सरळ रेषेत पडतो परंतु त्यावर पडणारी प्रतिबिंबं क्षणोक्षणी विरूपित होत जातात. तसंच ते शिल्प व आपण यांच्यामधलं प्रत्यक्ष अंतर देखील कमी जास्त झाल्यासारखं भासतं. स्टिलसारखा कणखर धातू देखील त्यावर पडणार्‍या, हलणार्‍या प्रतिबिंबांमुळे पाण्यासारखा प्रवाही, मृदु, नितळ होवून जातो. पाण्यावर पडणारे प्रतिबिंब ज्याप्रमाणे त्यावर खडा मारल्यानंतर विरूपित होतं तोच अनुभव इथंही येतो. हा अनुभव मात्र फोटोमध्ये येणं शक्य नाही.
अनिश त्याच्या पोलादी शिल्पांमध्ये आपण बाहेरील वातावरणास कसा प्रतिसाद देतो हे पाहतो तर त्याची मेण, रेझीन, रंग, पेट्रोलियम जेली व थिनर या माध्यमांमध्ये केलेल्या शिल्पांमध्ये अंतर्गत अवकाशाला आपण कसा प्रतिसाद देतो हे पाहतो. पोलादी शिल्पांमध्ये कणखर धातू पाण्यासारखा प्रवाही होतो, तर या मेणामधील शिल्पांमध्ये, नव्हे मांडणीशिल्पांमध्ये आपल्या डोळ्यांच्या प्रतिसादाआधीच ते शिल्प आकार घेत जातं. अतिशय तंत्रशुद्ध यंत्रणेचा वापर करून केलेली ही कामं पूर्ण झाल्यानंतर नव्हे तर ‘होताना’ आपण पाहतो. शिल्प स्वत:च्याच हालचालीतून आकाराला येतं. १८० अंश कोनात फिरणार्‍या अर्धवर्तुळाकार आकारातून अर्धगोल तयार होतो. अर्थातच ही प्रक्रिया संथ गतीची असल्यानं या कृतीत भूत, वर्तमान, भविष्य हे तीनही काळ अंतर्भूत आहेत, तर ‘भासमानता-माया’ हा अनिशचा हुकमी एक्का इथंही काम करतोच. पहा.
‘Shooting into corner’ या त्याच्या कामात – मांडणीशिल्पात चक्क तोफ समोरच्या दोन भिंतींच्या कोनड्यात मेणाचा गोळा डागते.

या शिल्पात अनिशनं सर्वसाधारणपणे गॅलरीची शांत असणारी जागा मोठा आवाज, नाट्य व घटाना यांनी भरून टाकली आहे. दर २० मिनिटांनी तोफ चालविणारा त्या तोफेत लाल भडक मेणाचा गोळा भरतो आणि तो गोळा समोरच्या कोनाड्यावर डागला जातो. ही क्रिया या शिल्पापुरती मर्यादित न राहता तोफ, रक्तलाल गोळा व त्यामुळे समोरच्या कोपर्‍यावर होणारा छिन्नविछिन्न ढीग बाह्यजगातल्या युद्ध, हिंसा यांकडे नकळत घेवून जाते. एक कलाकृती म्हणून ही क्रिया एक चित्र, शिल्प, परफॉरर्मन्स, घटना नाट्य या सर्वांच्या मर्यादेपलिकडे घेवून जाते.अनिश कपूरच्या कामातली एक गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. वरकरणी त्याची कामं ‘रूपवादी’ वाटत असली, तरी तो स्वत: मात्र रूपवाद अगदी ठामपणे नाकारतो. ‘रूपवाद’ हा कला इतिहासातला अगदी महत्त्वाचा तरीही नंतरच्या पिढीनं झिडकारलेला कलाप्रवाह आहे. रूपवादाच्या काही मर्यादा होत्या. जसा रूपवाद हा एकांगी – एकतर्फी होता, कलाकाराच्या व्यक्तिगत अनुभूतींशी – भावविश्वाशी निगडीत होता. त्याचा बाह्यजगाशी काहीही संबंध नव्हता. नेमका हाच आत्मकेंद्रित मुद्दा नंतरच्या पिढीतल्या कलाकारांना मान्य नव्हता. उदाहरण द्यायचं झाल्यास आपणा रिचर्ड सेराचंच घेवू. रिचर्ड अनिशपेक्षा फक्त नऊ वर्षानं मोठा, म्हणजे अगदी त्याच्या बरोबरीचा. परंतु त्याच्या कामात बाह्यजग अथवा स्वत:च्या अभिव्यक्ती व्यतिरिक्त गोष्टींना महत्त्व नव्हतं. या दोघांच्याही शिल्पांमधले आकार पाहिले तर त्यांत खूप साम्य दिसतं. तरीही सेरा मात्र ‘आधुनिक कला’ प्रवाहाची भाषा बोलतो तर अनिश आत्ताची. सेराची कामं पाहताना आपण केवळ सेराचीच कामं पाहत असतो तर अनिशची कामं पाहताना अनिश तिथं नसतोच. तो आपण व त्याची कामं यांना एकत्र आणतो आणि स्वत: मात्र अलिप्त राहतो. अनिशची अलिप्तता आणि सेराची त्याच्या कामाबद्दलची आसक्तीच या दोघांना वेगवेगळ्या कालखंडात वर्गीकृत करते. एक सेरा ‘केवळ आकारांचा खेळ’ करतो तर अनिश आकारांना आरंभबिंदू मानून अवकाशाशी संवाद साधतो, कधी आपल्या जगात घुसून आपल्या संवेदना व इंद्रियांना आव्हान देतो.
 
आजही अनेक चित्रकार – शिल्पकार रूपवादाचं हे मोठ्ठं जाळं तोडू शकले नाहीत. आजही अनेकजण १९५० -६० च्या दशकातील ‘मॉडर्नीस्ट’ चळवळ जी त्यांनी विचारपूर्वक अव्हेरली तीच आजही अंधपणे जोपासताना दिसतात. अशा कलाकारांसाठी अनिश कपूर आदर्श ठरावा.

संतोष मोरे

Tuesday, January 11, 2011

इन ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट

चित्रकला विषयक पुस्तकांना सध्या बहराचे दिवस आले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. चित्रकलाविषयक जड, क्लिष्ट भाषेतली समिक्षा जरी अनेकदा डोक्यावरुनच जाणारी असली तरी चित्रकारांची चरित्रं, आत्मचरित्र, मनोगतं,चित्रकलेसंदर्भातले किस्से, कहाण्या वाचण्यात सर्वांनाच रस वाटत असतो हे 'चिन्ह'ला चित्रकलेशी थेट काहीही संबंध नसलेल्यांकडूनही जो प्रतिसाद मिळतो त्यावरुन अनेकदा सिद्ध झाले आहेच. आपल्याकडे चित्रकारांची आत्मचरित्रं हा प्रकार थोड्या अभावानेच आढळणारा. खरं तर चित्रकारांनी स्वतः लिहिलेल्या आत्मकथनात्मक पुस्तकांना त्यांच्या स्वतःच्या कलाविषयक जाणीवा उलगडून दाखवणारेच फक्त नव्हे तर त्या काळातल्या सर्वच समकालिन चित्रकलेविषयक काळाचा एक मोठा पट उलगडून दाखवू शकणारे संदर्भमूल्य असते. औंधच्या महाराजांनी म्हणजेच बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी लिहिलेलं आत्मचरित्र हे याचं एक सर्वोत्कृष्ट उदाहरण.
आधुनिक भारतीय चित्रकारितेची परंपरा पुढे नेताना अस्सल भारतीय मुळांमधे रुजलेली, स्वतःची एक अनोखी चित्रशैली जोपासलेले चित्रकार श्री. मनजित बावा यांचं 'इन ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट' हे मुळ इंग्रजीतलं आत्मचरित्र मेनका प्रकाशनानं नुकतंच मराठीमधे अनुवाद करुन आणलं आहे. या पुस्तकाचा सुंदर परिचय चिन्मय दामले यांनी 'मायबोली' या संकेतस्थळावर करुन दिलेला नुकताच वाचनात आला. या आत्मचरित्रामधला काही भागही तिथं दिला आहे.'चिन्ह'च्या वाचकांकरता त्याची ही लिंक इन ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट - मनजीत बावा / इना पुरी


शर्मिला फडके

Wednesday, January 5, 2011

संतापलेले वाचक म्हणतात....

पुण्याच्या लालमहालातला दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवल्याच्या धक्कादायक घटनेवर ‘चिन्ह’नं तो पुतळा साकारणार्‍या शिल्पकार संजय तडसरकर यांच्यासह, शिल्पकार प्रमोद कांबळे, उत्तम पाचारणे, भगवान रामपुरे, किशोर ठाकूर आणि ज्येष्ठ शिल्पकार सदाशिव साठे यांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या. या प्रतिक्रियांना वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. असंख्य वाचकांनी या प्रतिक्रियांवर उत्स्फुर्तपणे भाष्यही केलं. त्याचंच हे संकलन. यातल्या काही भाष्यांमधे वापलेले शब्द जहाल होते, तिखट होते. कदाचित ते सभ्यतेच्या संकेतात बसणारे नसतीलही. पण त्यामागची त्यांची भावना, प्रामाणिकता आणि सद्य स्थितीमुळे आलेली अगतिकता याकडे दुर्लक्ष करता येत नाही. म्हणूनच ते जास्तीत जास्त जसेच्या तसेच देण्याचा प्रयत्न केला आहे.

रोहित भोगले
ह्या लोकांनी नक्की काय मिळवले हा मला प्रश्न पडला आहे ! दादोजी गुरु होते वा नव्हते हे ठरवणारे हे मूठभर लोक कोण ?
हे असले तालिबानी एका बाजूला तर दुसरीकडे कालचा हैदोस घालणारे !!! आता ह्यांच्यापैकी नक्की कुणाला मत द्यायचे मी पुढच्या निवडणुकीमध्ये ? कारण लोकशाहीमध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे फक्त तोच एक अधिकार आहे !
शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतरचे सर्व महापुरुष ह्यांचा आदर्श ठेवणे एक बाब,पण आपण किती दिवस भूतकाळामध्ये रमणार आहोत ? का वर्तमानामध्ये कुणाचेच काही कर्तृत्व नाही म्हणून आपण सदैव भूतकाळामध्ये वावरणार आहोत ? 
एकाच गोष्टीचे वाईट वाटते की अशाने असल्या प्रवृत्ती फोफावतात. ह्या लोकांनी बोरी मध्ये हैदोस घातला ,आता ह्या पुतळ्याचे निमित्त ,पुढे काय आहे कोण जाणे !!!

अंबादास बिडकर 
ऐन थंडीच्या मोसमात हे ज्याप्रकारे वातावरण तापवल जातय भयावह आहे सारं

सायलेंट हार्ट
आज मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू बनत चालला आहे. जर दादोजी शिवरायांचे गुरू नव्हते तर मग आम्हाला दाखवून द्या त्यांचे गुरू कोण  होते! संभाजी ब्रिगेड हा कॉंग्रेस आणि एन सी पीचा कारनामा आहे.
राजे आज आपलीच माणसं आपापसातलं वैर वाढवत आहेत, ते पण केवळ मुस्लिम मतांसाठी. ज्या मुस्लिमांपासून आपण आमचं संरक्षण केलं होतं.

अमित भिडे 
तुका म्हणे उगी रहावे.... जे जे होईल ते ते पहावे.

मुकुंद गोखले 
हा दैवदुर्विलास कलाकारांच्याच वाट्याला येणं मनाला फारच यातना देतात. अशा आताताई विचारांनी अनर्थ ओढवतो आणि समाजमन कष्टी होतं.

प्रकाश पवार
बहुतेक आमच्या शिवबांनाच आता पुन्हा जन्म घेवून सांगावं लागेल की अरे बाबांनो, दादोजी माझे खरंच गुरू होते. त्यांचा पुतळा मला विचारल्याशिवाय कुठेही हलवू नका. तुमच्या पाया पडतो. आता आम्हाला शांत जगूद्या खूप लढाया केल्या आम्ही हिंदवी स्वराज्यासाठी त्याकाळी.

श्रीदत्त कुळकर्णी
‘गोब्राह्मण प्रतिपालक’ मधला ‘ब्राह्मण’ हा शब्द पण काढून टाका!

भरत पार्टे
कुलकर्णीसाहेब काहीही बोलता आपण. अहो हे सगळे कॉंग्रेस मधून करत आहेत. हे साले भडवे आपल्यामध्ये भांडण लावत आहेत.

प्रकाश वाघमारे
काही दिवसांनी शिवाजी महाराज होते का? असा प्रश्न विचारला जाईल. महाराज असते तर ह्या सर्वांना टकमक टोकावरून कडेलोट केला असता. सर्वच नालायक आहेत.
  
विष्णूपंत अश्रित
हो नक्कीच नाहीतर जास्तच राजकारणी किडे वळवळले तर हार घालून घ्यायला त्यांची मुंडकीसुद्धा शिल्लक राहणार नाहीत.

भरत पार्टे
बास झालं देशाची अजून किती वाट लावणार आहात? साले हे राजकारणी पुढारी यांना पहिलं संपवून टाका, हे देशाची वाट लावायला बसले आहेत.

भरत वद्देवार
यावर कोणीतरी नियंत्रण ठेवायला पाहिजे. नाही तर उद्या हे राजकारणी पुढारी संपूर्ण ‘महाराष्ट्राचा’ इतिहास बदलतील.

भरत पार्टे
या देशात जोपर्यंत कॉंग्रेस आहे तोपर्यंत हे असंच चालणार, त्यांना हिंदू नको आहेत. आपण सगळे षंढ आहोत. या श्रीमंत राजकारणी भिकार्‍यांना ठार मारून टाका. गोरे गेले आणि हे काळे आपल्यावर राज्य करत आहेत.

अक्षय नाईक
जे घडतंय ते फार वाईट आहे.

सायलेंट हार्ट 
त्यांना तुम्ही इतके महत्त्वाचे वाटत नाही जितके गांधी महत्त्वाचे वाटतात.
राजे तुम्ही पुन्हा जन्माला या!
  
मुकुंद गोखले 
हे तालिबानी नव्हे, हे अविचारी अविवेकी झुंडशाहीचं कृत्य आहे. यापुढील काळात काय काय बघावयास मिळेल कोण जाणे. शिवबा यांना बुद्धी देवो!

राहुल बुलबुले
ही जागा कोण भरून काढणार?

अरूंधती धुमाळे
ही रिकामी जागा भरून काढता येईल... अनेक चांगल्या मार्गांनी!...इतिहासातली इतकी स्पष्ट "चिन्ह" पुसून टाकणं सोपं नसतं हे सांगायला हवं!...

सुषमा दातार
कलाकाराच्या दृष्टीनं या प्रसंगाबद्दल फारच कमी लोक बोलले. - साहित्य संमेलनाच्या उद्‍घाटनात मतकरींनी हा मुद्दा मांडला होता. महत्वाचा आहे.

सुनील तांबे.
It is indeed painful for the artiste. Thanks to Chinha and Mr. Tadaskar for highlighting the insensitivity of the media forget the intolerance that has penetrated our political, social and intellectual circles. It seems that we are competing with fundamentalists while hailing Mahatma Phule and Dr. Babasaheb Ambedkar.

केतन महाजनी
Ya one day, this people will even doubt on Shivaji's existence. Shivaji save your GurU

शिरीष मिठबावकर
the persons who decided to do 
this is a very unpleseant move, r they only authority for this? who allowed them to do so?
this is actually a public emotional rape, this is more dangerous than
hiroshima, u can see the effects of hiroshima but 
this act destroy the total history of our proud....... RAJA SHIWAJI 

आनंद प्रभूदेसाई
Yes it is shame on leaders.

संपत नायकवडी
Sanjay Tadasarkar a sculpture of this statue is my friend and I enjoyed this creation of it till complete .I have seen all stages if this sculpture .This is pride of Kolhapur to create a such art ! I fill the biggest art of that time .It placed such place there cultured people pf Pune , see and enjoy every day I am proud of it !!
Just I have seen and read this .. it's.bad terrible event ,I am very much shocked .I hate this event !! they have no wright to destroy universal public property !! these are are appreciated by cultured city of India !! :(((

योगेश कर्डिले
destroying art is really mean thing. But destroying human life due to it is the meanest game. why can't all discuss and solve the problem? art is for human and human is different from animals because of his creativity. Unfortunately politicians making human a beast and destroying the art. History repeat itself.

आनंद प्रभूदेसाई
Indian politisions are following the british. they want to make fight between every comunitys. is ti true??????

प्रकाश सावंत 
Horrible !!!

संकलन : अमेय बाळ

Monday, January 3, 2011

नामवंत शिल्पकार किशोर ठाकूर म्हणतात,

राज्यकर्त्यांनी हे चाळे थांबवावेत!

झाल्या प्रकाराबद्दल वाईट वाटतंच पण खूप चीडही येते. गेल्या ३५० – ४०० वर्षांचा इतिहास जो आजपर्यंत आपण प्रत्येक जण आपल्या मनात जपत आलो, तो इतिहास खोटा ठरवणारे हे कोण मोठे इतिहास तज्ज्ञ लागून गेले. दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नव्हते असं सांगणारी ही मूठभर माणसं स्वत:ला समजतात कोण? हा प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या राज कारणात गेल्या काही वर्षांपासून वाढत चाललेल्या झुंबडशाहीचं मूर्त रूप आहे.

एखादी कलाकृती, तिची जडण – घडण, त्या कलाकृतीशी ती घडवणार्‍या कलाकाराचं असलेलं नातं या सगळ्या गोष्टींना तुच्छ लेखून रातोरात त्या शिल्पाचा जो दुर्दैवी अंत करण्यात आला, त्याचा मी निषेध करतो. कलाकाराच्या भावना, त्याच्या जाणीवा; याच्याशी हे सारं घडवून आणणार्‍यांना काहीच देणं – घेणं नाही.(एवढंच कशाला जनसामान्यांच्या भावनांची यांना पर्वा नसते,तर कलाकारचं संवेदनशील मन यांना काय कळणार?) जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. मी तर म्हणीन की गेल्या काही दिवसांत महगाई, कांद्याची भाववाढ, पेट्रोलची दरवाढ, 2G स्पेक्ट्रम असे घोटाळे करून आपल्या राज्यकर्त्यांनी जो एक नवा ‘आदर्श’ घडवलाय, त्यापासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार घडवून आणलेला आहे; जेणे करून सामान्य जनता हे सगळं विसरून जाईल.

पण आपणा सर्वांनाच माहिती आहे की आपला समाज हा आता अडाणी राहिलेला नाही.(जरी राज्यकर्ते तसं समजत असले आणि ते स्वत: तसे असले तरी) त्यामुळे अशा निरर्थक चवली – पावलीच्या खेळ्या खेळून काही जनता आपले मूलभूत प्रश्न विसरणार नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी त्यांचे हे चाळे थांबवावेत.
एक कलाकार म्हणून, शिल्पकार म्हणून खूप वाईट वाटतं, पण मी कलाकार असलो तरी आहे सामान्य माणूसच! त्यामुळेच जरा सविस्तर बोल्लो. धन्यवाद! 

Sunday, January 2, 2011विख्यात शिल्पकार सदाशिव साठे म्हणतात,

ही राजकीय खेळीच!

दादोजी कोंडावांचा पुतळा हा जरी कुण्या जगप्रसिद्ध शिल्पकारानं बनवून तिथं लावला असता वा खुद्द शिवाजी महाराजांनी जरी लालमहालात उभा केला असता तरी देखील या मंडळींनी तो हटावला असता. त्यांना त्याचं काहीही सोयर सुतक नाही. कलाकाराची कला, त्याची मेहनत ही या सगळ्यात एकरूप झालेली असते याची त्यांना काही जाणीवच नसते. शिल्प वगैरे ह्या सगळ्या त्यांच्यासाठी फालतू गोष्टी आहेत. त्यामुळे ते असलं काय किंवा नसलं काय यांना काही फरक पडत नाही. कला, कलाकार, त्याची कलाकृती, त्या कलाकृतीबद्दल असलेल्या कलाकाराच्या जाणीवा यापेक्षाही आपण आपली राजकीय खेळी खेळून स्वत:चं अस्तित्व कसं काय टिकवून ठेवतो, याकडे या राजकारण्यांचा कल असतो. आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी ही मंडळी कोणत्याही थराला जाऊ शकतात याचा पुन:प्रत्यय देणारं हे कृत्य आहे.

हे शिवरायांचा पुतळा देखील हटवतील. त्यांना कुठलाही पुतळा उभा करण्यापासून ते तो हटवण्यापर्यंत फक्त स्वत:चं भलं कसं होईल? हेच दिसत असतं. म्हणून प्रत्येक चौकात राष्ट्रपुरूषांचे पुतळे उभारून खाली अमुक अमुक यांच्या आमदार/खासदार निधीतून असं लिहिण्यास ही मंडळी कधीच विसरत नाहीत. त्यामुळे हा सर्व प्रकार राजकीय खेळीचाच एक भाग आहे आणि त्यात जनसामान्यांना उगाचच वेठीस धरलं जातय.
शेवटी एवढंच म्हणीन की, झाल्या प्रकाराची कीव करावीशी वाटते. एक शिल्पकार या नात्यानं माझ्यासारख्या सर्वच शिल्पकारांच्या वतीनं मी त्या शिल्पाविषयी, ते घडवणार्‍या शिल्पकाराविषयी फक्त सहानुभूती व्यक्त करू शकतो. बस!

शब्दांकन : अमेय बाळ.

उद्या वाचा नामवंत शिल्पकार किशोर ठाकूर यांची परखड प्रतिक्रिया