Saturday, August 18, 2012


‘निवडक चिन्ह’ का आणि कशासाठी ?

‘चिन्ह’च्या गायतोंडे अंकाची एखादी प्रत आहे का हो ? एक तरी पहा ना ? तुटलेली, फाटलेलीही चालेल ! असे फोन ‘चिन्ह’ला वारंवार येत असतात. गायतोंडे अंकाबाबतच केवळ नव्हे तर अन्य अंकाबाबतही. मग त्यांची समजूत काढताना नाकीनऊ येतात. सदर अंक ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, तिथं वाचा. वगैरे सांगितलं तरी त्यांची समजूत पटत नाही. त्यांना त्या अंकाची एखादी तरी प्रत हवी असते.

२००१ साली ‘चिन्ह’चं प्रकाशन पुन्हा सुरु झाल्यानंतर वारंवार येणारा हा अनुभव. समोरच्या व्यक्तीला त्या अंकाची प्रत काही करून हवीच असते आणि आमच्यापाशी त्याची एकही प्रत नसते. आता काय करायचं ? यावर उपाय म्हणून ‘निवडक चिन्ह’ची निर्मिती केली गेली. पहिल्या पर्वातल्या १९८७, ८८, ८९ मधील तिन्ही अंकातील निवडक साहित्याचा पहिला खंड २००९ साली प्रसिद्ध झाला. तो हळूहळू विकला गेला, पण आता संपत आलाय. त्याची आवृत्ती पुढे काढायची किंवा नाही की वेबसाईट्वर टाकायची या विषयीचा निर्णय त्या सर्वच प्रती संपल्यावर घेतला जाईल.

मधल्या काळात २००१ सालापासून प्रसिद्ध झालेल्या अंकातील काही अंकही संपून गेले. त्याही अंकाला सातत्यानं मागणी होऊ लागली. म्हणून मग दुसर्‍या पर्वातील ‘निवडक चिन्ह’चे तीन खंड प्रसिद्ध करावयाचा निर्णय घेतला. यंदाचं वर्ष हे ‘चिन्ह’चं रौप्यमहोत्सवी वर्ष. ‘निवडक चिन्ह’चं प्रकाशन करण्यासाठी हे निमित्त पुरेसं वाटलं. म्हणून ‘निवडक चिन्ह’च्या तीन खंडाची घोषणा आम्ही केली.

२००१ सालापासून २००७ सालापर्यंतच्या अंकातील निवडक साहित्य या खंडासाठी निवडलं आहे. खरंतर या अंकातील निवडक साहित्याचे ६ खंड प्रकाशित होऊ शकतात. पण तूर्त तरी तीनच खंड प्रसिद्ध करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही योजना यशाची ठरली तर पुढील वर्षी तीन खंड जरूर प्रसिद्ध करू. या योजनेला पहिल्या दिवसापासून जो प्रतिसाद लाभतो आहे तो पहाता ही तीन खंडाची योजना यशस्वी होईलच याविषयी आमच्या मनात तरी शंका उरलेली नाही. त्यामुळे भास्कर कुलकर्णींवरचा खंड आणि आत्मकथनं तसेच विविध लेखविषयक खंड असे तीन खंड बहुदा पुढील वर्षी प्रसिद्ध होतील.

वर म्हटल्याप्रमाणे २००१ ते २००७ सालातील अंकामधलं निवडक साहित्य या खंडासाठी निवडण्यात आलं आहे. २००८ सालचा अंक क(।)लाबाजारचा अंक असल्याने त्यातील फक्त ‘जेजे जगी...’ या लेखमालेतील लेखांचीच निवड निवडकसाठी करण्यात आली आहे. बाकी संपूर्ण अंक ‘अंगावर येतो’, ‘वाचवत नाही’, ‘हे सारं भयंकर आहे’, ‘नकारात्मक आहे’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्यामुळे ‘निवडक’मध्ये समाविष्ट करणं टाळलं आहे. त्या नंतरचे अंक हे जवळ जवळ ‘कलेक्टर्स एडीशन’चेच अंक असल्याने त्यांचाही समावेश ‘निवडक’मध्ये करण्यात येणार नाहीये.

जेव्हा हे अंक प्रसिद्ध झाले तेव्हा ते रंगीत स्वरुपात प्रसिद्ध करणे ‘चिन्ह’ला शक्य झाले नव्हते. ती कसर मात्र आता भरून काढणार आहोत. हे सर्वच्या सर्व खंड आर्टपेपरवर प्रसिद्ध केले जाणार आहेत आणि संपूर्णत: रंगीत स्वरुपात ते असणार आहेत. या लेखांसाठी चित्रं आणि प्रकाशचित्रांची निवड पुन्हा नव्याने करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची मांडणी, सजावट सारं सारंच अत्याधुनिक स्वरुपात असणार आहे. आणि मुख्य म्हणजे हे तिन्ही खंड हार्डबाऊंडमध्ये असणार आहेत. जेणेकरून ते पुढची निदान ५०-७५ वर्षे तरी वाचले जावेत. ‘चिन्ह’च्या अभिनव चळवळीचं चित्रकलावर्तुळाच्या दृष्टीनं, वाड़्मयीन किंवा सांस्कृतिक दृष्टीकोनातून महत्त्व विषद करणार्‍या नामवंताच्या प्रदीर्घ प्रस्तावना हे या खंडाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे.

आता या तिन्ही खंडाची प्राथमिक जुळवाजुळव पूर्ण झाली आहे. यातला सर्वात अवघड खंड होता तो ‘गायतोंडे’ यांच्यावरचा, त्यांची चित्रं, प्रकाशचित्रं मिळवताना खूप अडचणी आल्या त्यामुळे प्रकाशनाला थोडासा वेळ झाला. पण आता त्या अडचणी सुटत आल्या आहेत. लवकरच त्याचं प्रकाशन व्हावं अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर वर्ष अखेरपर्यंत अन्य दोन्ही खंड प्रसिद्ध होतील.

‘चिन्ह’च्या प्रकाशनाना नेहमीच थोडासा किंवा अनेकदा जास्तही उशिर होत असतो याचं कारण ते प्रकाशन जास्तीतजास्त परिपूर्ण कसं होईल हे आम्ही काटेकोरपणे पहात असतो. तिथं कुठलीही तडजोड आम्ही करत नाही. असं करताना अनेकदा पृष्ठ संख्या वाढते. मूळ बजेट वाढतं पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो त्यामागचा हेतू हाच असतो की ‘चिन्ह’चं प्रकाश्न जबरदस्त व्हावं. आणि ते होत जातंही. ‘चिन्ह’नं देशाच्या कानाकोपर्‍यातच नव्हे तर परदेशातही जोडलेले हजारो वाचक ही त्याचीच तर खूण आहे.

Monday, August 13, 2012
पुन्हा ‘कलाकीर्द’......१९८१ साली मी चित्रकलेच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्याआधीच मी पत्रकारितेच्या क्षेत्रात जाऊन पोहोचलो होतो. चित्रं काढून तेव्हा पोट भरलं नसतं त्यामुळे नोकरी करणं भाग होतं. त्यामुळे आवडत्या क्षेत्रातली नोकरी चालून आल्यावर मी ती स्वीकारलीच. दिवसभर पत्रकारिता आणि उरलेल्या वेळात चित्रकारीता अशी मुशाफिरी सुरू झाली. जे जे करीत होतो त्यात यश मिळू लागलं होतं. साहजिकच महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या. मोठमोठाली स्वप्न पडत गेली. त्यातलं एक मोठं स्वप्न होतं आर्ट अ‍ॅन्ड आर्टिस्ट डिरेक्टरीचं. माहितीचं युग वगैरे अवतरायचं होतं. संगणकाने नुकताच भारतात प्रवेश केला होता. परिस्थिती खूप वेगळी होती, आता सांगितलं तर ऐकणार्‍याला भयंकर आश्चर्य वगैरे वाटेल पण कुणाला फोन करायचा म्हटलं तरी किमान एकदीड किलोमिटर अंतर चालून जावं लागायचं आणि मग एखाद्या वाण्याकडून किंवा दुकानातून फोन करायचा. एसटीडी वगैरे असेल तर भलतीच बोंब व्हायची. पण जेजे मधे शिकत असतानाच माहिती जमवण्याचा नाद मला लागला होता. त्यामुळे चित्र अणि चित्रकलेविषयीची सारीच माहिती मी त्या काळात जमवून ठेवली होती. जी मी या डिरेक्टरीमध्ये वापरली. एखादं पुस्तक तयार करणं वगैरे म्हणजे भयंकर दिव्य केल्यासारखं वाटायचं त्या काळात. कारण सारं काही आतासारखं संगणकावर करता येत नव्हतं. हातानेच करावं लागायचं. अगदी स्पेलिंग मिस्टेक वगैरेसुद्धा ब्लेडने कापाकापी करून कराव्या लागायच्या. हॉरिबल होता तो अनुभव.

यशवंत चौधरींसारख्या ज्येष्ठांनी सबूरीचा सल्ला दिला होता. घाई नको करू म्हणाले होते पण आम्ही आपले घोड्यावर होतो. त्यात तरुण, त्यात भयंकर महत्त्वाकांक्षी वगैरे. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून दीड-दोन वर्ष अथक प्रयत्न करून अखेर ती डिरेक्टरी एकदाची प्रसिद्ध केलीही. आधीचा प्रकाशनाचा, मार्केटिंग वगैरेचा अनुभव नव्हता साहजिकच प्रॉडक्ट चांगलं असूनही १९८५ साली भयंकर मार खावा लागला. त्या काळात जवळ जवळ अडीज-तीन लाखांचा चुराडा झाला. काम खूप चांगलं आहे. पायोनियरींग एफर्ट वगैरे पण लोकांना हे असं काही घेऊन वाचायची संवयच मुळी नव्हती. (विशेषत: चित्रकला क्षेत्राला) साहजिकच भयंकर आर्थिक फटका बसला.

त्यातून बाहेर पडायला तारुण्य आणि जबर आर्थिक किंमत मोजावी लागली. नंतरची १०-१५ वर्ष अक्षरश: कर्ज फेडण्यातच गेली. नंतर तर अक्षरश: त्यांची कव्हर काढून ती पुस्तकं रद्दीवाल्याला विकावी लागली. भयंकर प्रसंग होते ते. पण मस्ती अद्याप जिरली नव्हती. मग ‘चिन्ह’चे अंक सुरू झाले. पहिल्याच प्रयत्नात ‘चिन्ह’ला पुलंपासून ते थेट एखाद्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यानं नावाजलं. पण पुन्हा वेळेचं गणित आडवं आलं. मार्केटींग जमलं नाही. सबब ‘चिन्ह’चं प्रकाशनही बंद करावं लागलं. तब्बल १२ वर्ष सारं काही बंद होतं.

पत्रकारितेतली नोकरी सोडली आणि पुन्हा संपादनासाठी हात हुळहुळायला लागले. विषय डोक्यात गरगरा फिरायला लागले. पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि २००१ साली ‘चिन्ह’ची मुद्रा झळाळून उठली. त्यानंतरचा इतिहास तर सार्‍यांनाच ठाऊक आहे. प्रत्येक अंकानंतर ‘चिन्ह’चा प्रभाव ठसठशीत होत गेला.

आता २५ वर्षापेक्षा जास्त काळ झाला या सार्‍याला. पण ‘कलाकीर्द’चं अपयश मात्र ठुसठुसतच होतं. इथून आता पायउतार व्हायचं असेल तर जिथे आपण आयुष्यातलं पहिलं अपयश भोगलं तेच पुन्हा यशस्वी करून दाखवायचं आणि मगच पुन्हा आपल्या मूळगावी, पेंटिंगकडे वळायचं असं काहीसं मनाशी निश्चित झालं. आता परिस्थितीही बदलली होती. फोनची जागा मोबाईलनं घेतली होती. हातात एक नाही दोन नाही तब्बल तीन मोबाईल होते. डेस्कटॉप, लॅपटॉप सारं काही दिमतीला होतं. इंटरनेटवरून लाखो वेबसाईट्स हात जोडून दिमतीला उभ्या होत्या. मग पुन्हा हे कलाकीर्दचं लोढणं गळ्यात का लावून घेताय राव ? माझं मीच एकदा मला विचारलं. उत्तर मिळालं. १९८५ साली ‘कलाकीर्द’ प्रसिद्ध केल्यानंतर आजतागायत त्याची कॉपी कुणाला करता आली नाही. संस्था, संघटना, प्रकाशन संस्था, सरकारी विभाग कुणालाच ते धाडस करता आलं नाही. याचाच दुसरा अर्थ असा की हे कार्य आता आपल्याच हातून पूर्ण व्हावे अशी बहुदा नियतीची इच्छा असावी. ‘कलाकीर्दचा’ प्रोमो दाखवायला सुरुवात केली आणि जवळजवळ १५ दिवसातच जगभरातल्या दीड लाख कलारसिकांनी तो पाहिला असं जेव्हा लक्षात आलं तेव्हाच या अभिनव डिरेक्टरीची उपयुक्तता (एवढ्या वेबसाईट्स असतानासुद्धा) सिद्ध झाली.

आता वाचकांना / प्रेक्षकांना नुसती कलावंताची माहिती मिळणार नाहीये तर त्यांची चित्रंही पहाता येणार आहेत, त्यांचा स्टुडियो पहाता येणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला कलावंताशी थेट संवाद साधता येणार आहे. हवं असलं तर त्यांना त्या कलावंताकडून थेट चित्र-शिल्प विकत घेता येणार आहे. (मध्ये कुणीही मध्यस्थ असणार नाहीये) याशिवाय चित्रकलेविषयीची जी जी माहिती त्याला हवी असेल तीती त्याला केवळ बटण दाबताच उपलब्ध होणार आहे. भारतातली सारीच्या सारी प्रदर्शनं त्याला काही काळातच इथं पहायला मिळणार आहेत. कलादालनं, कलावस्तूसंग्रहालयं, कलामहाविद्यालयं एक ना दोन कलाविषयक सारीच्या सारी माहितीच त्याला इथं उपलब्ध होणार आहे.

‘चिन्ह’ची इंग्रजी आवृत्ती लवकरच इ-मॅगेझिनच्या स्वरुपात प्रसिद्ध होणार आहे. तिही त्याला इथंच वाचता येणार आहे. आणि सर्वात सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक कलाविषयक वृत्तपत्र लवकरच इथंच प्रसिद्ध होणार आहे. ‘चिन्ह’च्या या इ-पेपरमध्ये भारतातली प्रत्येक कलाविषयक माहिती दिली जाणार आहे. आता चित्रकलेच्या माहितीसाठी, बातम्यांसाठी इतर वृत्तपत्रं, मासिक वाचायला नकोच. रोज www.chinha.in ला भेट द्या. कलाविषयक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं मिळेल याची खात्री बाळगा.


‘कलाकीर्द’च्या अधिक माहितीसाठी आमच्या ‘कलाकीर्द’ या पानाला भेट द्या.
http://www.facebook.com/pages/KalaKird-art-artists-Directory-of-India/238741786200542