Monday, May 4, 2015

'गायतोंडे' नामक अद्भूत विचार मांडणारा ग्रंथ
चित्रकार 'गायतोंडे' चित्रकार प्रभाकर कोलते यांचे आयडॉल. मुख्य म्हणजे गायतोंडे यांनादेखील कोलते सरांची पेंटिंग आवडत. एका मुलाखतीत त्यांनी तसे स्पष्ट म्हटले होते. कोलते सरही गायतोंडे यांची जमेल तशी भेट घेत असत. त्यांच्या खूप अशा भेटी झाल्या अशातला काही भाग नाही. पण ज्या काही मोजक्याच भेटी झाल्या त्या भारतीय चित्रकला क्षेत्राच्या दृष्टीने विलक्षण अर्थपूर्ण ठरल्या. अशाच एका भेटीत कोलते सरांनी गायतोंडे यांच्यावरच्या फिल्मची कल्पना मांडली. सुनील काळदातेसारखा दिग्दर्शकही सुचवला. आणि नंतर मग जे काही घडले तो सारा इतिहासच आहे. म्हणूनच गायतोंडे ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्यासाठी कोलते यांच्याखेरीज अन्य नाव सुचलेच नाही. त्यांनीही दोन तीन वर्ष घेतली खरी, त्यात एकदा लिहिलेली प्रदीर्घ प्रस्तावना तर चक्क रद्द करायला लावली आणि पुन्हा नव्याने जी प्रस्तावना लिहिली तिचा समावेश या ग्रंथात झालाच आहे. नंतर तर मग ग्रंथ निर्मितीच्या प्रक्रीयेत ते कसे सहभागी झाले ते त्यांना किंवा मला कळलंदेखील नाही. या काळात प्रचंड चर्चा झाल्या. किंचित वादही झाले. पण मागल्या आठवडयात छपाईपूर्व ग्रंथाची डमी त्यांनी पाहिली आणि त्यांना ती हातून सोडवेचना. हीच संधी साधून त्यांना ग्रंथ निर्मितीच्या या साऱ्या अनुभवांविषयी लिहावयाची विनंती केली, तो हा लेख.
चित्रकार गायतोंडे, त्यांची काळजाला भिडणारी चित्रं, त्यांचं मनस्वी मौन, वाचन आणि संगीत-प्रेम, त्यांचं रमण महर्षींच्या अध्यात्मात स्वत:चं भान जागं ठेवण्याचं कसब आणि निसर्गदत्त महाराजांच्या अलौकिक तत्वज्ञानात गुंतत जीवनाच्या मोहातून मुक्त होत विश्राम पावण्यातलं बळ, सगळंच आकर्षून घेणारं आणि विचार करायला लावणारं. देहात सुरु होऊन त्यांना स्वत:च्याच अतर्क्य मर्मबंधात घेऊन जाणारी त्यांची सन्यस्त वृत्ती आणि इतर बऱ्याच अज्ञात गोष्टीसकट सर्व कांही समकालिनाना विस्मयजनक धक्का देणारंच. आणि त्या धक्क्याचं रिश्टर परिमाण वाढले ते त्यांच्या एका चित्राला लिलावात मिळालेल्या २३ कोटी ७० लाख या विक्रमी किंमतीमुळे आणि नंतर तर ग्युगेनहाईमनं जगातल्या चार महत्वाच्या शहरात त्यांच्या एकल प्रदर्शनाची घोषणा केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना उत्सव साजरा करण्याचं कारण मिळालं आणि सर्वसामान्यांचं लक्ष चित्रकलाक्षेत्राकडे वळलं. चित्र-मूल्य आणि चित्र-किंमत यांचं एकाचवेळी, अनुक्रमे अभिरुचीसंपन्न अभिजनांकडून व सर्वसामान्यांकडून, कौतुक होण्याचा चित्रकला विश्वातला हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल.

अशा या महान चित्रकाराचा जगावेगळा दृश्य-प्रवास शब्द रुपात रुपांतरीत करण्याचं ठरवलं ‘चिन्ह’ कला वार्षिकाचे सर्वेसर्वा सतीश नाईक यांनी, आणि तो 'चिन्ह'च्या वाचकांच्या मनातलं ओळखण्याचा त्याचा मनकवडेपणा ठरला. गायतोंडे यांच्यावर, त्यांच्या असीमचित्र-तपश्चर्येवर, चित्र-रसिकाच्या सर्वस्वाला स्पर्श करणाऱ्या त्यांच्या चित्रावर आप्त-स्वकीयांपेक्षा अधिक प्रेम करणाऱ्या अनेक चाहत्यापैकी एक म्हणजे सतीश नाईक. कांही वर्षापूर्वी गायतोंडे यांच्यावर विशेष अंक प्रकाशित केलेल्या दिवसापासून तर आणखीनच भारावून जाऊन सतीशनं त्यांच्या भूतकाळाचा अथपासून इतिपर्यंतचा तपशील गोळा करण्याचं काम सुरु केलं. ज्याच्यासाठी कष्ट उपसत होता त्यानंच ते यशाच्या किनाऱ्यावर नेण्याचं बळ त्याला दिलं असावं. तो झपाटल्यासारखा कामाला लागला आणि तिथंच पुस्तकाचा श्रीगणेशा सुरु झाला. आणि म्हणता म्हणता त्याच्या मनात रुंजी घालणारे अस्पष्ट अरूप आशयाच्या स्पष्टतेकडे झुकत रुपाला येऊ लागलं. गायतोंडे यांचे समकालीन, त्यांचे विद्यार्थी, मित्र, चाहते सर्वांनी आपआपले मदतीचे हात पुढं केले. आणि मग येऊ घातलेल्या ‘गायतोंडे’ या पुस्तकाचं घनगंभीर परंतु तरीही आल्हाददायक बीज-रूप तयार झालं. आणि त्या पाठोपाठ शुभकार्याला भरघोस साथ देणारे अगणित शुभेच्छक पुढं आले.

गायतोंडे यांच्यावरचा ग्रंथ कसा असावा, त्याचा आशय किती गंभीर असावा इथपासून तो रसिकांच्या हाती पडेल तेंव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल किंवा कशी असावी इत्यादी भावी परिणामांची कल्पना करत अनेक चर्चा झडल्या. चित्रकार गायतोंडे यांचा वकुबच इतका दांडगा की त्याचा एक अदृश्य दबाव सतीशवर असणं साहजिक होतं, ते सावरत ग्रंथाच्या अंतिम टप्प्याकडे तो आला तेंव्हा त्याच्यातला संपादक आणि चित्रकार या दोघात, त्यानं पूर्वी कधीही अनुभवला नसेल असा तणाव निर्माण झाला. मला नेहमी वाटायचं त्याच्यातल्या चित्रकाराची सरशी व्हावी, आणि कर्म-धर्म-संयोगानं तेच झालं. त्याच्यातलाच नव्हे तर त्याला सहकार्य करणाऱ्या आम्हा सगळयाच्यातला चित्रकार यशस्वी झाला कारण तो जागा होता, आणि त्याला कारण होतं भारताचा सर्वश्रेष्ठ चित्रकार वासुदेव सन्तू गायतोंडे नावाचा ‘एक अदभूत विचार’ जो ‘चिन्ह’ला भारतीय जनतेपर्यंत न्यायचा होता.

सतीशनं मला पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली आणि मी ती तत्काळ स्वीकारली. मग मी त्या जबाबदारीमुळे ग्रंथाच्या सजावटीबद्दलही माझे विचार मनमोकळेपणानं सतीशजवळ व्यक्त करू लागलो. तो ज्या ज्या वेळी ग्रंथाबद्दल माझ्याशी विचार-विनिमय करीत असे त्या त्या वेळी मी स्पष्टपणे माझे दृष्टीकोन, विचार आणि सूचना त्याच्यासमोर मांडत असे. त्यावर त्याची प्रतिकिया सावधपणाची असे. मग मला वाटत असे की मी त्याच्या कामात जरुरीपेक्षा अधिकच नाक खुपसतो आहे का ? तर नाही असं माझ्या आतून उत्तर येई, मग मी असं का वागतोय तर त्यावर माझं साधं आणि सोपं स्पष्टीकरण असे की ‘चिन्ह’चा हा प्रकल्प व्यावसायिक किंवा सतीशचा एकट्याचा राहिला नव्हता तर तो इतर अनेकांप्रमाणे माझाही झाला होता.

ग्रंथाच्या बाह्य तद्वत आंतर स्वरूपाबाबत आमच्यात अनेक चर्चा झाल्या. त्या कधी समाधान देणाऱ्या तर कधी असमाधानी करणाऱ्या होत्या. परंतु आशयाच्या सत्यतेबाबत तसेच सौंदर्याबाबत विचार करता, गायतोंडे यांच्या अभ्रष्ट व्यक्तिमत्वाला चुकूनही धक्का लावणाऱ्या ठरणार नाहीत याची काळजी घेणाऱ्या होत्या. सगळ्यात कळीचा मुद्दा होता तो मुखपृष्ठाचा. पण तोही खूपच सहजगत्या सुटला आणि मुखपृष्टासाठी एका ऑस्ट्रियन चित्रकाराकडून, गायतोंडे यांचं त्यांच्या पेंटिंगचीच पार्श्वभूमी लाभलेलं एक उबदार प्रकाशचित्र सतीशला मिळालं. आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. थोड्या दिवसांनी सतीश ग्रंथाची नक्कल-प्रत मला दाखवायला आला. त्या प्रतीच्या आवरणावर शांत चित्त गायतोंडे होते, आपल्याच चित्राचा एक भाग होऊन बसलेले. त्यानंतर तो ग्रंथ मी माझ्या मांडीवर घेऊन बसलो, सतीश बैठक संपवून जाईपर्यंत.

हा ग्रंथ आवर्जून पाहावा, वाचावा आणि इतरांना सांगावा असाच आहे. विशेषत: विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, समीक्षकांनी आणि रसिकांनी संग्रही ठेवावा असा आहे. कारण गायतोंडे यांची अनेक चित्रं एकत्रित पाहता यावीत असा योग या ग्रंथानं आपणा सर्वाना आणून दिलाय. शिवाय गायतोंडे यांच्या विद्यार्थ्यांनी,मित्रांनी,समकालीनांनी, अनुयायानी गायतोंडे यांच्याविषयी या ग्रंथातून बरंच कांही आत्मियतेनं उलगडून दाखविलं आहे, ते वाचणं हाच एक आगळावेगळा अनुभव ठरेल असंच आहे. चित्रकलेसाठी आशादायक होत चाललेल्या भारतीय वातावरणात असं पुस्तक प्रकाशित करण्याचं मानस ‘चिन्ह’नं तडीस नेऊन दाखवण्याचं एक अत्यंत महत्वपूर्ण कार्य केलं त्याबद्दल त्या संस्थेचं तसेच तिचे सर्वेसर्वा सतीश नाईक यांचं मन:पूर्वक अभिनंदन.

प्रभाकर कोलते
२ मे २०१५, मुंबई

प्रत्येक विचक्षण वाचकाच्या संग्रही असायला हवा असा हा ३००० रु. किंमतीचा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीत रु. २००० मध्ये घरपोच उपलब्ध करून दिला आहे. प्रकाशनाआधीच पहिली आवृत्ती संपूर्ण नोंदली गेल्याने आणि सतत विचारणा होत असल्याने प्रिंट ऑर्डरमध्ये वाढ करीत आहोत. वाढीव प्रिंट ऑर्डर नोंदवली जाताच ही योजना बंद करण्यात येईल. आपण अजूनही हा ग्रंथ नोंदवला नसल्यास आताच 90040 34903 या नंबरवर NKG एवढाच SMS पाठवावा. आणि घरपोच ग्रंथ मिळवा. What's App साठी आमचा नंबर आहे 98331 11518. या ग्रंथाच्या निर्मितीची भन्नाट कथा या पुस्तकाच्या आराखड्यात किंवा रचनेत बसेना म्हणून मग तिची वेगळी पुस्तिकाच प्रसिद्ध करण्याचा निर्णय झाला. ती २८ पानी पुस्तिका या ग्रंथासोबत दिली जाणार आहे. सदर पुस्तिका 'चिन्ह'च्या संकेतस्थळावरदेखील आम्ही प्रकाशित केली आहे. ती जरूर वाचा. तसेच या ग्रंथाच्या काही पानांचा प्रोमोदेखील आम्ही संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे तोही अवश्य पहा. तो पाहण्यासाठी किंवा वाचण्यासाठी इथं क्लिक करा. http://www.chinha.co.in/marathi/index.html