Monday, December 16, 2013

याज साठी केला होता अट्टाहास …….

 ' चिन्ह ' चे संपादक सतीश नाईक  यांना ' महाराष्ट्र टाईम्स ' या दैनिकानं '   नात्यापलीकडले नाते  ' या सदरासाठी लिहावयास आमंत्रित केलं होतं . टा च्या १५ डिसे च्या अंकात  तो लेख प्रसिद्ध झाला . तो लेख खास चिन्हच्या  वाचकांसाठी जसाच्या  तसा येथे देत आहोत.
 
 
From Sunil Kaldate's Film V S GAITONDE 'Art On Art'
  
१९८२ साली जहांगीर मध्ये माझ्या चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं .कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी  तेव्हा टाईम्समध्ये लिहित असतत्यांनी लिहिलं ' पॉल क्लीचा प्रभाव असण्याची एक मोठी परंपरा जेजेत आहेपहिले गायतोंडे , नंतर बरवे ,मग कोलते आणि आता हा सांप्रति उगवलेला नवा तारा म्हणजे  सतीश नाईक "वगॆरे आता एव्हड्या मोठ्या चित्रकारांच्या नावासोबत माझं नाव जोडलं म्हणून मी खरं तर खूष  व्हायला हवं होत पण ते वाचल्यावर मी भयंकर संतापलो , तो संताप अर्थातच  तारुण्य सुलभ होतानंतर नाडकर्णी यांच्याशी माझी छान  मॆत्री झाली .याचं श्रेय अर्थात नाडकर्णी यांच्या मनमोकळ्या स्वभावाला द्यायला हवंमला नाही .  किती तरी वर्षे आम्ही सामोअर मध्ये  सकाळ संध्याकाळ गप्पा मारत बसत असूनाडकर्णी  यांचा कला क्षेत्रात मुक्त संचार असल्यानं चिक्कार बातम्या हाती लागतनाडकर्णी फॉर्मात असले म्हणजे एकेक धमाल किस्से सांगत . ते एकून  हसून हसून मुरकुंडी वळत असे .गॉसिप्स तर काही विचारू नका .  पण या  साऱ्या  गप्पा नंतर मात्र वळून वळून त्यांच्या मित्राकडेच यायच्या  .हा तो त्यांचा मित्र म्हणजे चित्रकार वासुदेव गायतोंडे . विलक्षण आदरानं नाडकर्णी  गायतोंडे यांच्या विषयीचा प्रत्येक शब्द उच्चारीत .मी तर जेजेत प्रवेश केल्याच्या पहिल्या दिवसापासून  जेजेच्या भिंतीवरचं त्त्याचं पेटिंग  पाहून त्यांच्या प्रेमात पडलो होतो . "गायतोंडे "हि त्यांची लफ्फेदार सही मला भयंकर आवडून गेली होती आणि मग कळत नकळत मी त्यांना फॉलो करू लागलो होतोवाचन तेव्हा खूपच होतं , त्याला आता दिशा मिळाली होती  . गायतोंडे यांच्या विषयी जे काही प्रसिद्ध होईल ते ते मिळवून वाचायचं आणि आपल्या संग्रहात ठेवायचं हा सिलसिला तेव्हाच सुरु झाला होता . नाडकर्णी यांच्या सोबत झालेल्या मैत्रीमुळे तर आता गायतोंडे यांच्या विषयी फर्स्ट हेण्ड माहितीही मला  मिळू लागली होती .
 

तोपर्यंत चित्रकार मनोहर म्हात्रे मुंबईत येउन दाखल झाले होतेत्यांना  गायतोंडे  जेजेत वर्षभर  शिकवायला होते हे कळल्यावर  त्याचं माझं तर जमुनच गेलंतेव्हापासून आम्ही जे जहांगीरवर नेमानं भेटतोय त्याला आता तब्बल ३० वर्षे उलटलीयेतनाडकर्णी आणि म्हात्रे यांच्या कडून गायतोंडे यांचे नंतर आख्यायिकात रुपांतरीत झालेले  एकेक किस्से ऐकताना वेळ कसा निघून जायचा ते कळायचच नाहीसाहजिकच आता मला प्रश्न पडू लागले  कि मग  'हे सारं प्रसिद्ध का होत नाही ?' हे भयंकर ग्रेट आहे ,हे कुणीतरी ओरडून सांगायला हवे  आहे . लिहायला हवं आहे .  पूर्ण वेळ पत्रकारीतेतच असल्यानं तो पर्यंत चित्रकलेच्या बाबतीतल्या मराठी पत्रकारितेच्या मर्यादा मला पुरत्या कळून चुकल्या होत्यामग मी विचार केला कि मीच हे सारे ओरडून सांगितले तर , आणि त्यातूनच "चिन्ह "चा जन्म झाला .१९८३ साल होतं ते . तीन वर्षातल्या त्या ओरडण्यातून हाती  काय गवसले  तर प्रचंड कर्जबाजारीपण आणि प्रचंड प्रसिद्धीही  ,पण जी २००१ साली '"चिन्ह "चं दुसरं पर्व सुरु झाल्यावरच   माझ्या लक्षात आली .
   

 तो पर्यंत गायतोंडे यांच्या विषयी प्रसिद्ध झालेली ओळनओळ  मी वाचली होतीइतकंच नाही तर ती माझ्या संग्रहातही  ठेवली होती ,त्यांच्या चित्रांच्या प्रतिकृती मी जमवल्या होत्या , वेळ मिळेल तशा मी त्या काढून पाहत बसत असे ,जिथं जिथं त्यांची चित्र लावली जात तिथ तिथं मी आवर्जून जात असे .त्याचं प्रत्येक चित्र पाहणं हा एक आनंद सोहळा असे . एक विलक्षण दृश्य अनुभव असावयाचा तो एकत्रिएनाले प्रदर्शनाच्या निमितानं नंतर अनेकदा दिल्लीला जाणं झालं ,पण इच्छा असूनही कधी त्यांना भेटावयाचा साधा  प्रयत्नही मी कधी केला नाही , याचं कारण त्यांच्या विषयी पसरलेल्या अनेक आख्यायिका  किवा भय एव्हडंच नव्हतं तर ,'कलावंताला  शक्यतो त्याच्या कलाकृतीमधूनच पहावंत्याच्या जवळ जाण्याचा फारसा प्रयत्न करू नये ', हे तोवर मला  स्वानुभवातूनही  शिकता  आलं होतं .त्या मुळेही हे असेल कदाचित .
 

 चित्रकलेच्या चळवळींतील माझ्या प्रचंड सहभागामुळे  असेल किवा पत्रकारितेमुळे असेल कदाचित सर्वच कलावंताना भेटायची त्यांच्याशी संवाद साधावयाची  संधी मला लाभली .भेटले नाहीत ते एकटे गायतोंडे , १९७४-७५ साली मी या क्षेत्रात आलो . त्याच्या दोन एक वर्षे आधीच त्यांनी मुंबई सोडली होती .  मुंबईत ते नंतर आलेही असतील पण मी काही त्यांना भेटायचा प्रयत्नही केला नाही. का ?ते आता काही मला सांगता येणार नाही .सुनील काळदाते  यानं   त्यांच्यावर जी भन्नाट फिल्म केली होती तिचं भारतातलं एकमेव स्क्रीनिंग   शुभदा पटवर्धनांनी जेव्हा मोहिले पारेख सेंटर फोर  व्हिज्युअल आर्ट तर्फे आयोजित केलं , तेव्हा त्यांनी मुंबईला यावं म्हणून आम्ही आटोकाट प्रयत्न केले, त्यानाही मनापासून यायचं होतं , पण नाही जमलं ते

नंतर एकदा त्यांची मॆत्रिण ममता मला भेटायला जहांगीर मध्ये आली होती .तिला कुणीतरी सांगितलं कि गायतोंडे यांच्यावर पुस्तक लिहिते आहेस तर ,सतीश नाईक याला भेट , तो तुला मदत करील.  तिनं मला फोन केला आणि  भेटायला आली .   त्या भेटीत माझ्या संग्रहात असलेली  गायतोंडे यांच्या वरची सारीच्या सारी कात्रणे मी तिच्या हवाली केली . तर ती म्हणाली "गाय "ला तुला भेटायला आवडेल , कधी येतोस दिल्लीला ?पण मी काही तिच्या निमंत्रणाचा स्वीकार करू शकलो नाहीदिल्लीलाही जाणं झालं नाही आणि मग तीन चार वर्षात गायतोंडे गेलेचसाहजिकच ती एक रुखरुख मनाला लागून राहिलीच .
 
*
 गायतोंडे  २००१ साली  गेले . ' टाईम्स 'मध्ये फक्त चार ओळींची बातमी आली  , अन्य वृत्तपत्रात  तर तेही नाहीअपवाद फक्त टा चा . चिंधीचोर गुंड चकमकीत मारले गेले की हेड लाईन्स देणाऱ्या वृत्तपत्रांकडून ती अपेक्षाच नव्हती पण तरीही राग अनावर झाला .इतका मोठा  भारतीय चित्रकार गेला आणि त्याच्या मृत्यूविषयी ही  एव्हडी अनास्था  ? पासबुक उघडून पाहिलं तर नोकरी सोडल्यावर मिळालेल्या पैशातले ५० हजार शिलकीत दिसत होते .मागचा पुढचा विचार   करता त्याच दिवशी "चिन्ह'' च्या पुनर्निर्मितीची आणि त्यातल्या  गायतोंडे पुरवणीची  घोषणा मी केली .२००१ सालच्या दिवाळीत तो अंक प्रसिद्ध झाला  ,आणि हा हा म्हणता म्हणता संपला देखीलजाहिरातींची बोंब असल्यानं तो ही अंक आतबट्ट्याचाच  ठरला .  गायतोंडे ऑगस्ट महिन्यात गेले होते साहजिकच तयारीला वेळ कमीच पडला होता .  ती कसर मग २००६ साली त्यांच्या चित्रांनी लिलावात कोट्यावधींची  उड्डाणे केल्यावर विशेषांक काढून भरून काढली ,हे कमी पडले म्हणून कि काय मग २००७ साली आणखी एक २५ -३० पानांची पुरवणी असलेला अंक काढलाया अंकांनी मराठी वाचकात  अक्षरशः  धमाल उडवली
  
गिरगाव मेजेस्टिकवाले  एकदा सांगत होते ,"  'गायतोंडेंच्या शोधात 'अंक आला तेव्हा एक गृहस्थ  रोज यायचे  आणि रोज  पाच अंक घेवून जायचे , कुठे राहता विचारलं तर म्हणाले कुडाळदेशकर वाडीत ,  का घेता एव्हडे अंक तर वाचायला देतो लोकांनागायतोंडे आमच्याच वाडीतले , एकदा उर्मिला मातोंडकरांच्या वडिलांचा फोन आला ,म्हणाले "मीही कुडाळदेशकर वाडीत राहत होतो , एव्हडा मोठा माणूस आमच्या वाडीत राहत होता हे आम्हाला कधी कळलंच नाही 'चित्रकार माधव सातवळेकरांचा फोन आला , म्हणाले "बाळ विषयी हे आम्हाला काहीच ठाऊक  नव्हतं'चिन्ह ' चे  हे अंक वाचताना अवाक झालेले , हबकलेले , आनंदलेले , दिग्मूढ झालेले ,प्रत्यक्ष  भेटीतच नाही तर वाचल्यावर फोनवर सुद्धा  ओक्साबोक्शी रडणारे असे साऱ्याच प्रकारचे वाचक पहावयास मिळाले ,ज्यात मान्यवर चित्रकारांचा जसा समावेश होता तसाच सामान्य वाचकांचाही .' एक तरी प्रत असेल तर द्याना  गायतोंडे अंकाची , फाटकी तुटकी पण चालेल ,डब्बल पैशे देतो ' असं  सांगणारेही चिक्कार भेटले गेल्या  आठ  वर्षात .  अगदी आजही भेटतात .  पण मजजवळ फक्त एकच प्रत उरलीये . कार्यालयीन उपयोगासाठी ठेवलेल्या पाच प्रती सुद्धा  "आता झेरॉक्स मारून आणून देतो  ' म्हणून सांगून लांबवल्या  गेल्या . म्हणूनच त्याचं पुस्तक करायचा घाट घातलातर तिथंही आपली "वैभवशाली " मराठी खेकडा मनोवृत्ती आड आली , आणि काम खोळंबलं .शेवटी आठ  वर्षाने का होईना 'निवडक चिन्ह 'च्या रुपानं आता ते येवू घातलंय .इतकंच नाही तर आता ते इंग्रजीमधून सुद्धा यावं या दृष्टीनं प्रयत्न करतो आहे .  

* 
गायतोंडे यांना मी कधी भेटलो नाही , त्यांच्याशी कधी प्रत्यक्ष जाऊ द्या फोनवरसुद्धा बोललो नाही .इतकंच नाही तर त्यांना दुरून सुद्धा पाहू शकलो नाही , पण मग  आजूबाजूच्या माणसाना होताहोइस्तो  टाळू पाहणाऱ्या माझ्यात आणि त्यांच्यात  हे असं नातं , तेही नात्यापलीकडलं नातं कसं काय निर्माण झालं असावं ?हा प्रश्न कधी कधी मला उगीचच सतावत असतोत्या प्रश्नांच्या उत्तरालाही अनेक पदर असावेत ,त्या पदराचा एक धागा ते जेजे स्कूल ऑफ आर्ट कडे जातो ( जिथे ते शिकले  आणि नंतर मीही ) ,एक धागा गोव्याकडे जातो  ( जे त्याचं मूळ गाव होतं आणि त्याच्या पासून काही अंतरावर माझं गाव होतं ) , एक धागा गिरगावात जातो (जिथं त्यांनी आयुष्यातील तब्बल ४० वर्ष काढली , तिथूनच काही  अंतरावर माझं आजोळ होतं ,जिथ माझी सांस्कृतिक जडण घडण झाली ) ,एक धागा चित्रकार पॉल क्ली कडे जातो जो त्यांचा आवडता चित्रकार होता , जो माझाही आवडता चित्रकार होता .) एक धागा प्रार्थना समाज समोरच्या कुलकर्ण्याच्या मिसळीकडे जातो ( जी त्यानाही भयंकर आवडायची आणि नंतर मलाही .)एक धागा लेखक - कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्याकडे जातो , (जे गायतोंडे यांचे आणि  आणि नंतर माझेही मित्र होते .)  एक धागा  आर्टिस्ट  सेन्टर  या  चित्रकारांच्या ( शापित ) संस्थेकडे जातो ,जिथे ते प्रारंभीच्या काळात कार्यरत होते .(  आणि चित्रकार आरांच्या निधनानंतर   बराच काळ मी त्या संस्थेचा सचिव होतो .)  एक धागा चित्रकार मनोहर म्हात्रे यांच्या कडे जातो , (जे गायतोंडे यांचे आधी विध्यार्थी आणि मग मित्र झाले , जे नंतर माझेही घनिष्ट मित्र झाले .) एक धागा त्यांच्या विषयीच्या आख्यायीकांकडे जातो , (ज्या मला प्रचंड भावल्यातर उरलेले अन्य सारेच्या  सारे धागे त्यांच्या चित्रांकडे जातात  , जे मला  'गायतोंडे'  या नावाशी  कायमचंच जखडून ठेवायला भाग पाडतातआणि नात्या पलीकडल्या या असल्या उफराट्या  नात्यात अडकवून टाकतात .  नको नको ती धाडसं करावयास भाग पाडतात .   

 *

गायतोंडे यांच्यावर तीन  विशेष पुरवण्या काढल्या म्हणून माझ्या संपादनाच्या ज्ञानाबद्दल शंका घेणारेही महाभाग निघालेच'काय  'गायतोंडे , गायतोंडे लावलंय सारखं सारखं  ' म्हणून जाब विचारणारे द्विपादही भेटलेच . गायतोंडे यांच्याकडे माध्यमांनी केलेल्या साफ  दुर्लक्षामुळे तर,   आपण  हे असं गायतोंडे गायतोंडे  करतोय ते बरोबर करतोय कि चूक असं वाटायला लावणारी वेळ सुद्धा मजवर आणली गेली , पण ठाम राहिलो . सुनील काळदाते याने केलेल्या आणि  जगभरच्या  जवळ जवळ सर्वच  शोर्ट फिल्म फेस्टीव्हल्समध्ये  ती संपल्यावर उपस्थित प्रेक्षकांनी   उभं राहून मानवंदना   दिलेल्या  त्यांच्यावरच्या अप्रतिम फिल्मने   मी अंगीकारलेलं  काम हलकं होऊ शकलं असतं  ,पण ज्यांनी ती केली त्यांनीच ती उदासीनपणे  बासनात बांधून ठेवल्यानं गायतोंडे यांच्या अनेक आख्यायिका प्रमाणे ती फिल्मही  आणखी एक आख्यायिका बनून गेली .( एकदा मी सुनीलला विचारलं " अरे , गायतोंडे यांनी तरी तुझी फिल्म बघितली होती का ? तर तो प्रांजळपणे म्हणाला , ,' मी कॅसेट दिली होती त्यांना , पण त्यांनी ती पाहिली  असेल असं वाटत नाही '.आता काय बोलणार यावर?  कप्पाळ, ) असो.
 

पण दरम्यान आलेल्या लिलावांच्या बातम्यांनी मात्र सारंच वातावरण बदलून गेलं .  विशेषतः सदबीज -ख्रिस्तीजच्या एकाच दिवशी झालेल्या  २२-१३ कोटींच्या विक्रमी बोलींनी तर फक्त भारतातच नाही तर साऱ्या  जगभरच  प्रचंड अशी  खळबळ उडवून दिली असावी . या साऱ्यावर कळस चढवला तो अमेरिकेतल्या गुगेनहेम म्युझियमने . २०१४ साली  गायतोंडे यांच्या चित्राचं सिंहावलोकनी प्रदर्शनच भरवणार आहेत.  आधी अमेरिकेत , मग बहुदा स्पेन , नंतर अबुधाबी आणि सरते शेवटी दिल्लीत  संपूर्ण वर्षभर चालणारेय  तेकुणाही भारतीय  चित्रकाराला हा मान अध्यापि मिळालेला नाहीय . गायतोंडे  हे पहिलेच .

 *

आता गायतोंडे यांचा वारू  चोफ़ेर उधळलाय .  त्याला आता  कुणीही  अडवू शकणार नाहीये .भारतीय कलाक्षेत्रालाही  आता जाग येवू घातली आहे  . ( सामाजिक , राजकीय  क्षेत्रातील गुन्हेगारीकरणाने आता कलाक्षेत्रातही प्रवेश केला आहे ,त्यामुळे साहजिकच  गायतोंडे यांच्या चित्रांना 'डिमांड 'आहे म्हटल्यावर   त्यांच्या  फेक चित्रांचे  धडाधड  कारखानेच्या कारखाने सुरु झालेत . ज्या कलावंताने आयुष्यात कुठल्याही तडजोडी स्वीकारता ,प्रसंगी पोटाला चिमटा घेवून  फक्त पेंटिग , पेंटिंग आणि पेंटिग इतकंच केलं त्यांच्या कलेची चाललेली  ही अशी विटंबना पाहून  रक्त खवळून उठतं पण या उपर आपण काहीच करू शकत हे असहायपणही आपलं आपल्यालाच जाणवून जातं . ) एकदम चार पाच जणं त्यांच्या वरच्या पुस्तकाच्या तयारीला लागलेत .  प्रदर्शनांचाही घाट  घातला जातोय , " पिकासो " सारखीच  "गायतोंडे "  ही  सही सुद्धा आता  जगात सर्वत्र दिसू लागायला आता फार काळ वाट पहावी लागणार नाहीयेहे सारं आपल्याला खूप खूप आधीच उमगलं होतं  आणि तेच "चिन्ह" मधून वेळोवेळी शेअर करीत गेलो  याचा सार्थ अभिमान मला  निश्चितच आहे .भले यात मी माझ्या मिळकतीचे सारे पैसे घालवले असतील ,  काही काळ माझी चित्रकलाही विसरलो असेल ,कर्जबाजारीही कदाचित झालो असेल , पण त्यात बिघडलं कुठं काय? इथं कुणा लेकाच्याला त्यातून पैसे मिळवायचे होतेचित्रकार वासुदेव संतू गायतोंडे यांना तरी चित्रातून कुठे पैसे कमावयाचे होते ?
  

सतीश नाईक