Sunday, January 18, 2015

आता 'चिन्ह' बंद !नव्या वर्षात सोडलेला अगदी महत्वाचा संकल्प म्हणजे 'चिन्ह'चं वार्षिक प्रकाशन थांबवणं हाच. होय ! इथून पुढं 'चिन्ह'चे अंक प्रसिध्द होणार नाहीत हे निश्चित. अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला गेला आहे. याला कारणं बरीच आहेत. पण महत्वाची आधी सांगतो. उदाहरणार्थ २०१० साली 'चिन्ह'चे संपूर्ण कलामासिकात रुपांतर करण्याचा जो निर्णय घेतला तो भविष्यात इतका वेळखाऊ ठरेल याची कल्पनाच आधी आली नाही. २००८ सालापर्यंत 'चिन्ह'चे अंक कृष्ण-धवल स्वरुपात नेमानं निघत होते. त्यांचा निर्मितीचा कालखंड तेव्हा सुमारे ६ ते ८ महिन्याचाच असे. पण 'चिन्ह'ला कलामासिकाचं संपूर्ण स्वरूप दिल्यानंतर तो कालावधी प्रचंडच वाढला. एकेका अंकाचे काम पूर्ण करण्याला दीड-दीड, दोन- दोन वर्ष लागू लागली. २००१ ते २००८ या कालावधीत थोड्याफार उशिराच्या फरकानं का होईना पण 'चिन्ह'चे अंक नियमितपणे निघत होते. तब्बल आठ अंक या कालावधीत निघाले. पण २००९ ते २००५ या कालावधीत फक्त तीनच अंक निघू शकले. आणि आता जसे अंक निघत आहेत. तसेच ते निघावयाचे असतील. तर त्यांच्या निर्मितींना तेवढा वेळ हा द्यावाच लागणार, जे आता खरंच शक्य राहिलेले नाही.

योजिले होते आणि करावयाचे होते त्यातले बरेचसे करून देखील झाले. पण ज्यांच्यावर काम करायलाच हवे त्यांची कमतरतादेखील आता खूप जाणवते आहे. आणि नव्या मंडळींना हात लावायचे म्हटले तर काही कारण नसतांना त्यांच्या आपापसातल्या हेव्यादाव्यांमुळे, गटांमुळे उगीचच प्रचंड टिकेला बळी पडावे लागते. त्यातून भलभलते आरोप केले जातात. मूळ हेतूंविषयीच शंका व्यक्त केल्या जातात, तेव्हा मनाला एक प्रकारची खिन्नतादेखील येते. शिवाय कागद आणि छपाईचा खर्च यात झालेल्या प्रचंड वाढीमुळे सतत आर्थिक ताणतणावांना सामोरं जावं लागतं. खरंतर फक्त महाराष्ट्रातल्याच चित्रकारांनी जरी नुसती ही अभिनव चळवळ उचलून धरली असती तरी 'चिन्ह'चे आणखीन वेगवेगळे आविष्कार मराठी वाचकांना पहावयास मिळाले असते. पण दुर्देवानं तसं झालं नाही. तिथं आम्ही कुठं तरी कमी पडलो. शिवाय 'उम्र का तकाजा' वगैरे भानगड असतेच की.

अगदी मनापासून सांगायचं तर प्रत्येक चांगल्या गोष्टीला एक शेवट हा असतोच. आणि तो कधी करायचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. हे अनेकांना वेळीच कळत नाही. आणि मग अनेक दुखःद प्रसंगांना सामोरं जावं लागतं. ज्यांना हे कळतं ते मात्र मोठ्या रुबाबात पायउतार होऊन निघून जातात. म्हणूनच 'चिन्ह' बंद करायचा निर्णय ठामपणानं घेतला आहे. खरंतर चित्रकार प्रभाकर बरवे यांच्यावरचा १५ वा अंक प्रसिध्द करून 'चिन्ह'चं प्रकाशन थांबवायचं असं गतवर्षीच निश्चित केलं होतं. पण निर्मितीत गुंतून राहण्याचा वाढत जाणारा कालावधी पाहता, तसेच कागद आणि छपाईच्या क्षेत्रातील वाढत जाणाऱ्या किंमती पाहता तो निर्णय आधीच घेणं योग्य वाटलं. या संदर्भात गेल्या वर्षा दोन वर्षात अनेक चित्रकार आणि चित्रकारेतर स्नेह्यांशी या संदर्भात सविस्तर बोलणं झालं होतं. सर्वांचाच या निर्णयाला विरोध होता. पण मी मात्र ठाम होतो. चित्रकार प्रभाकर कोलते यांनी एक चांगला पर्याय सुचवला. ते म्हणाले पाहिजे तर 'चिन्ह' बंद कर पण 'गायतोंडे' ग्रंथासारखे ग्रंथ प्रसिध्द करणं थांबवू नकोस. हे असलं काम आपल्याकडे कुणीच केलेलं नाही, कुणी करणारही नाही. त्यामुळे तूच ते करावयास हवं. पेंटिंग करत नाही याचं मुळीच वाईट वाटून घेऊ नकोस. हे जे तू काही केलं आहेस ते पेंटिंग नाही तर दुसरं काय आहे. वर्षा दोन वर्षांनी एखादं तरी पुस्तक जरूर प्रसिध्द कर, जे पुढल्या अनेक पिढ्यांना उपयोगी ठरेल.

शेवटी मी निर्णय घेतलाच. तर इतःपर पुढं 'चिन्ह'चा अंक बंद. पुढील महिन्यात 'गायतोंडे' ग्रंथाचं प्रकाशन होईल. मे-जूनपर्यंत 'निवडक चिन्ह' मालिकेतील 'जे जे जगी जगले' आणि 'व्यक्तीचित्रं पण शब्दातली' हे आणखीन दोन महत्वाकांक्षी ग्रंथ प्रसिध्द होतील. दरम्यानच्या काळात गायतोंडे ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचं काम सुरु झालं आहे. मात्र त्याचं प्रकाशन कधी होईल हे आता तरी सांगता येत नाही. 'निवडक'चे आधी जाहीर केलेले तिन्ही खंड प्रसिध्द झाल्यावर मात्र शक्य झालंच तर 'चिन्ह'मधील निवडक 'आत्मकथनां'चा एक खंड आणि सर्वात शेवटी 'भास्कर कुलकर्णी' यांच्यावरील एक खंड प्रसिध्द करावयाचा विचार आहे. आणि आणखीन शक्य झालंच तर सर्वात शेवटी चित्रकार प्रभाकर बरवे यांच्यावरील ग्रंथ प्रसिध्द करून या अभिनव चळवळीचा शेवट करावा असा विचार आहे. हे सारं उशिरात उशिरा येत्या दिवाळीपर्यंत आटोपावयाचे आहे.

'चिन्ह'चे अंक छपाई न करता ते 'चिन्ह'च्या वेबसाईटवर प्रसिध्द करावे अशा सूचना अनेकांकडून आल्या आहेत येत आहेत. त्या विषयी अद्याप काही नक्की झालेलं नाही पण त्याची जबाबदारी उचलावयास तरुण मंडळी पुढे आली तरचं त्याचा निश्चितपणे विचार केला जाणार आहे. 'गायतोंडे' ग्रंथाच्या प्रकाशन समारंभप्रसंगीच 'चिन्ह फौंडेशन'ची स्थापना होणार आहे. या फौंडेशनचे कार्य चित्रकलाविषयक लेखन आणि संशोधन करू इच्छिणाऱ्या तरुणांना शिष्यवृत्त्या आणि पुरस्कार देऊन प्रोत्साहन देणं हेच आहे. त्यातून जर काही कार्यकर्ते हाती लागले तर 'चिन्ह'चा ऑनलाईन अंक नक्कीच निघेल असे वाटते. या संदर्भात बरेच काही सांगण्यासारखे आहे आणि जसजसे सांगावेसे वाटेल तसतसे ते मी वेळोवेळी सांगणारदेखील आहे. पण तूर्त तरी 'चिन्ह'च्या अंकांचा विषय माझ्या लेखी संपलेला आहे. अर्थात तो संपवण्यासाठी काही गोष्टी करणं मला अत्यावश्यक वाटतं. त्यातली अत्यंत महत्वाची म्हणजे 'चिन्ह'ला एका कपर्दीकेचीही अपेक्षा न करता लेखन सहकार्य तसेच चित्रं किंवा प्रकाशचित्रं देणाऱ्या मंडळींच्या मानधनाचे चेक्स त्यांच्याकडे रवाना करणं. अंक प्रसिध्द करण्याच्या या उरस्फोड खटाटोपात त्यातल्या अनेकांचे मानधन देण्याचं राहिलं, राहून गेलं, किंवा शक्य झालच नाही अशांना ते आता रवाना करीत आहोत. त्याचबरोबर आता हेही जाहीर करू इच्छितो की, चिन्ह'चे सारेच्या सारे जुने अंक (नग्नता वगळता) आमच्याकडून संपले आहेत. त्यासाठी कृपया कुणीही संपर्क साधून आपला (आणि आमचाही) वेळ फुकट दवडू नये. ज्यांना ते वाचायचे असतील त्यांनी ते 'चिन्ह'च्या www.chinha.co.in या संकेतस्थळावर वाचावे. त्यावर सारेच अंक उपलब्ध नाहीत याची आम्हाला कल्पना आहे. ते तिथे लवकरात लवकर कसे उपलब्ध करून देता येतील याबाबतीत आम्ही प्रयत्नशील आहोत.

सतीश नाईक
संपादक, चिन्ह