Tuesday, February 1, 2011

“इंडिया आर्ट समिट २०११”



 यशस्वी समिट





   
यंदाचं  इंडिया आर्ट समिट नुकतंच दिल्लीत मोठ्या दिमाखात पार पडलं.तरूण चित्रकार संतोष मोरे हेही त्यापैकी एक.  त्यांनीच घेतलेला हा तिसर्‍या पर्वाचा आढावा.        
                        
 
“इंडिया आर्ट समिट २०११” चं तिसरं पर्व नुकतचं दिल्लीत पार पडलं. अत्यंत कमी कालावधीत जगभराल्या कोणत्याही आर्ट फेअरनं एवढी लोकप्रियता क्वचितच मिळवली असेल, असं यावर्षीच्या भव्यतेवरून तरी वाटतंय. ‘आर्ट समिट’ म्हटलं की तो निव्वळ बाजार’ असं समजणार्‍या लोकांनी एकदा तरी आर्ट समिटला नक्की भेट द्यावी आणि जर तो खरंच ‘बाजार’ असेल तर काही ‘गुरूतुल्य’ चित्रकारांचीसुद्धा ‘दुकानं’ तिथं का? असो. ते वेगळं सांगावयास नको.
  
आर्ट समिट हा केवळ ‘कलामेळा’ नव्हे ती एक कलापरिषद म्हणावी लागेल, ज्यामध्ये व्यावसायिक कलादालनांच्या विभागांव्यतिरिक्तही त्यात काहीतरी आहे. महत्त्वाचे कार्यक्रम, चर्चासत्र, प्रकल्प, कलासफरी यांची तिथं रेलचेल असते. उदा. संपूर्ण तीन दिवस नावाजलेल्या गॅलर्‍यांचे चालक, कलाविचार नियोजक (क्युरेटर्स), कलासमीक्षक कलाकार व कलाअभ्यासक यांची चर्चासत्रं, परिषदाही इथं असतात. ज्या प्रेक्षकांच्या प्रश्नोत्तराचाही समावेश असतो. दीड तासासाठी ५०० रूपये भरून लोकं तिथं जातात. त्यासाठी आगाऊ आरक्षण करावं लागतं. ज्यांना ते मिळत नाही त्यांच्यासाठी बाहेर पडद्यावर आतलं संभाषण ऐकण्याची सोय केली जाते. यंदा पहिल्या सत्रात ‘शहरी दृश्य – पॉप संस्कृती व भारतीय आधुनिक आणि वर्तमानकालीन (कन्टेपररी) कलानिर्मिती’ या विषयावर चर्चासत्र झालं. त्यात रणजित होस्कोटे, अतुल डोडिया, अन्नपूर्णा गरिमेला व ज्योतिंद्र जैन यांचा सहभाग होता. संपूर्ण तीन दिवसांच्या चर्चासत्रांमध्ये होमी भाभा, गीता कपूर, शरयू दोशी, गायत्री सिन्हा, रणजित होस्कोटे, नॅन्सी अडजानीया, गिरीश शहाणे, अभय सरदेसाई यांचा समावेश होता. तसंच अनिश कपूर, सुबोध गुप्ता, वीर मुन्शी, रणबीर कालेका, अतुल डोडिया, जितीश कलट इत्यादी कलाकारांचा सहभाग होता. व्यावसायिक कलादालनांनीही आपापल्या भूमिका मांडल्या. त्या अगदी, ‘आंतरराष्ट्रीय पटलावर भारतीय कला’, ‘भारत : एक जागतिक कलाकेंद्र व त्यासाठी लागणारी पोषक वातवरणनिर्मिती व धोरण’, ‘वर्तमानकालीन विचार नियोजन व विचार नियोजकांच्या बदलत्या भूमिका’, ‘कलाखरेदीची कला’, ‘भारतीय कलाबाजार २००६ – २०११ : वाढ, दिशा आणि आव्हानं’, कलेतील प्रसारमाध्यमं लिखाण आणि कलासमीक्षकांच्या भूमिका’ इत्यादी विषय हाताळले गेले. एवढे सर्व विषय, त्यात सहभागी होणारे तज्ज्ञ एरव्ही आपणास कुठं ऐकावयास मिळणार? नाही का?

यंदापासून आर्ट समिटनं चित्रकारांची एकल प्रदर्शनं(सोलो प्रोजेक्ट्स) परंतु व्यावसायिक गॅलर्‍यांनी प्रायोजित केलेल्या विभागांचा समावेश केला होता. तसंच विचार नियोजित कलासफरी (क्युरेटेड वर्क)  काही खास हेतूनं आयोजित केल्या होत्या. सर्वसामान्यांना कलाकृतीमधील ‘मिनिंग’पेक्षा त्याचं आकलन कसं करावं ते ‘पॉप आर्ट’ व त्याची व्याप्ती या सर्वाची माहिती ‘आर्ट वॉक’ मधून घेता आली. अर्थातच हे सर्व वॉक विनामूल्य होते.‘व्हिडिओ आर्ट’ माध्यमात काम करणार्‍या तिसेक तरूण व्हिडिओ आर्टिस्टचे व्हिडिओ त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे तयार केलेल्या ‘व्हिडिओ लॉंज’मध्ये दाखविण्यात आले, ते आर्ट समिटच्या प्रांगणातच. ‘Sculpture Park’मध्ये जीजी स्कारिया, मन्सुरअली, सुदर्शन शेट्टी, सुहासिनी केजरीवाल, नेहा चोक्सी, प्राजक्ता पोतनीस यांची शिल्पं- मांडणीशिल्पं प्रदर्शित झाली.


















पुस्तक प्रकाशनं आणि त्यानिमित्तानं होणार्‍या चर्चासत्रांचीही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेनं जास्त होती. यंदा पाकिस्तानचा राशीद राणा, सोमनाथ बॅनर्जी, शुप्रसन्ना, दयानिता सिं, सुदर्शन शेट्टी यांची पुस्तकं प्रकाशित झाली. एकंदर कलाजगतातल्या जागतिक मंदीमुळे आलेली मरगळ यावेळीही जाणवली. तरूण कलावंत नवीन कलादालनांच्या शोधात व कलादालनं खरेदीदार शोधण्यात व्यस्त असणार हे अपेक्षितच होतं तरीही बहुतेक कलादालनांनी नाविन्याचं वारं अंगात घुमवल्याचं स्पष्ट जाणवत होतं. विनाईलसारख्या ‘तकलादू’ समजल्या जाणार्‍या माध्यमात केलेली, LED लाईट्सचा वापर केलेली, किंवा टिकाऊपणाच्या कक्षेत न येणार्‍या माध्यमात केलेली कामं दाखविण्याची हिम्मत अनेक कलादालनांनी केली. ठुकराल आणि टाग्रा यांच्या ‘Put it on’ या एड्स जनजागृती प्रकल्पासाठी तयार केलेल्या ‘मर्यादित आवृती’ असलेल्या चपलाही येथे विक्रीसाठी होत्या, तर त्या आधी केलेले मोठे शिल्प-स्लिपर्सची सहा फुटी प्रतिकृतीही प्रदर्शनात होती.


















अर्थात हे सर्व नाविन्याबद्दल जागरूकता – आत्मीयता की परदेशी कलादालनांचा वाढता सहभाग व त्यामुळे तयार झालेली स्पर्धा हे कळत नाही. या नाविन्याच्या वातावरणात देखील धुमीमल, दिल्ली आर्ट गॅलरी, आर्ट मोटिफसारख्या कलादालनांनी मात्र प्रतिथयश मास्टर्सचीच कामं दाखविण्याची आपली ओळख कायम ठेवली. लंडनच्या लिझॉन गॅलरीनं यंदादेखील अनिश कपूर व टोनी क्रेग यांची कामं आणली होती. दिल्लीच्या आर्ट मोटिफ गॅलरीनं प्रभाकर कोलतेंची चित्रं प्रदर्शित केली होती, कोलते यांनी केलेलं एक मोठं मिश्र माध्यमातलं काम लक्षवेधी होतं.

  













पाकिस्त्तानी कलाकारांमध्ये बानी आबीदी, मेहरीन मुर्तझा यांची कामं दखल घेण्यासारखी होती. व्हेनिस बिएनाले, आर्ट बासेल, हॉंकॉंग आर्ट फेअर प्रमाणे येत्या काही वर्षांतच इंडिया आर्ट समिटसुद्धा त्याच ताकदीनं सादर होईल अशी आशा करू. येणार्‍या वर्षांत आर्ट समिटकडे ‘बाजार’ म्हणून न पाहता तो जागतिक कलेचा आरसा होतोय का किंवा त्यानिमित्तानं दिल्लीत होणार्‍या इतर कला घटनांचा आस्वाद तर आपण नक्कीच घेवू शकतो नाही का?
                                                                   -संतोष मोरे

3 comments:

  1. " मुंबईतले चित्रकार मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते" म्हणजे नक्की काय? फोटो मध्ये जे चित्रकार दिसताहेत ते, किंवा नितीन दादरावाला, संतोष मोरे आदी चित्रकार समिट पाहण्या- अनुभवण्यासाठी (प्रेक्षक या नात्याने) दिल्लीत आले होते. मराठी भाषक प्रेक्षकांची संख्या यंदा खरोखरच वाढली होती. संतोष मोरे यांचा लेख यथातथ्य असताना "सहभागा"बद्दल चुकीच्या कल्पना संपादकीय संस्कारामुळे रुजवल्या जाउ नयेत, म्हणून ही प्रतिक्रिया.

    ReplyDelete
  2. जे चित्रकार समिटला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला ‘स्वत:च्याच’ खर्चानं गेले होते ते समिटमध्ये सहभागी झाले होते असाच त्याचा स्पष्ट अर्थ आहे. तिथं निमंत्रित किंवा आमंत्रित असा शब्द वापरला गेला नव्हता. मराठी पत्रकारांनी या समिटविषयी एकही शब्द प्रसिद्ध करण्याचे कष्ट घेतले नाहीत म्हणूनच ‘चिन्ह’वर संतोष मोरे यांचा तथाकथित ‘यथातथ्य’ लेख छापण्याची वेळ आली. संतोष मोरे हे काही शब्दांचा खेळ करणारे बनचुके लेखक नव्हेत, ते चित्रकार आहेत. ते समिटला गेले असल्याचं कळल्यामुळे ‘चिन्ह’नं त्यांना लेख लिहिण्याविषयी विनंती केली आणि त्यांनीही ती कुठलेही आढेवेढे न घेता, बयादी न लावता, वेळ न दवडता, वेळेआधीच आणि तेही शब्दाला जागून लेख दिला. त्यामुळेच ‘चिन्ह’च्या वाचकांना समिटचं वरवरचं का होईना दर्शन घडवता आलं.

    संपादक
    ‘चिन्ह’ब्लॉग

    ReplyDelete
  3. For more on Art summit read http://epaper.prahaar.in/ Date 05/02/2011. Relax supplement - page 4.

    ReplyDelete