Sunday, January 2, 2011



विख्यात शिल्पकार सदाशिव साठे म्हणतात,

ही राजकीय खेळीच!

दादोजी कोंडावांचा पुतळा हा जरी कुण्या जगप्रसिद्ध शिल्पकारानं बनवून तिथं लावला असता वा खुद्द शिवाजी महाराजांनी जरी लालमहालात उभा केला असता तरी देखील या मंडळींनी तो हटावला असता. त्यांना त्याचं काहीही सोयर सुतक नाही. कलाकाराची कला, त्याची मेहनत ही या सगळ्यात एकरूप झालेली असते याची त्यांना काही जाणीवच नसते. शिल्प वगैरे ह्या सगळ्या त्यांच्यासाठी फालतू गोष्टी आहेत. त्यामुळे ते असलं काय किंवा नसलं काय यांना काही फरक पडत नाही. कला, कलाकार, त्याची कलाकृती, त्या कलाकृतीबद्दल असलेल्या कलाकाराच्या जाणीवा यापेक्षाही आपण आपली राजकीय खेळी खेळून स्वत:चं अस्तित्व कसं काय टिकवून ठेवतो, याकडे या राजकारण्यांचा कल असतो. आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी ही मंडळी कोणत्याही थराला जाऊ शकतात याचा पुन:प्रत्यय देणारं हे कृत्य आहे.

हे शिवरायांचा पुतळा देखील हटवतील. त्यांना कुठलाही पुतळा उभा करण्यापासून ते तो हटवण्यापर्यंत फक्त स्वत:चं भलं कसं होईल? हेच दिसत असतं. म्हणून प्रत्येक चौकात राष्ट्रपुरूषांचे पुतळे उभारून खाली अमुक अमुक यांच्या आमदार/खासदार निधीतून असं लिहिण्यास ही मंडळी कधीच विसरत नाहीत. त्यामुळे हा सर्व प्रकार राजकीय खेळीचाच एक भाग आहे आणि त्यात जनसामान्यांना उगाचच वेठीस धरलं जातय.
शेवटी एवढंच म्हणीन की, झाल्या प्रकाराची कीव करावीशी वाटते. एक शिल्पकार या नात्यानं माझ्यासारख्या सर्वच शिल्पकारांच्या वतीनं मी त्या शिल्पाविषयी, ते घडवणार्‍या शिल्पकाराविषयी फक्त सहानुभूती व्यक्त करू शकतो. बस!

शब्दांकन : अमेय बाळ.

उद्या वाचा नामवंत शिल्पकार किशोर ठाकूर यांची परखड प्रतिक्रिया

No comments:

Post a Comment