Monday, December 8, 2014

'चिन्ह' : प्रकाशनाला वेळ का लागतो ?दोन-तीन वर्षापूर्वी दुसऱ्या पर्वातल्या ‘निवडक चिन्ह’च्या तीन खंडांची घोषणा जेव्हा केली तेव्हा असं वाटलं होतं की, ‘सर्वच मजकूर तयार आहे फक्त फोटो तर गोळा करायचे आहेत. हे काय होईल पटकन. एका वर्षातच तिन्ही खंड आपण प्रसिद्ध करू.’ पण ते वाटतं तेवढं सोप नाही हे काम सुरु केल्यावरचं मला उमगलं. सर्व मजकूर पटापट निवडला. प्लानिंगही मोठं सुरेख झालं. गायतोंडे यांच्याविषयी प्रसिद्ध झालेला सर्वच मजकूर ‘गायतोंडे’ ग्रंथात घ्यायचा. जे जे स्कूल ऑफ आर्टविषयीचे नकारात्मक लेख वगळता सारेच लेख ‘जे जे जगी जगले’च्या दुसऱ्या खंडात घ्यायचे. तर ‘चिन्ह’मधून गाजलेली चित्रकारांची सारी शब्दचित्रे ‘व्यक्तिचित्र, पण शब्दातली !’ या तिसऱ्या खंडात घ्यायची. चौथा खंड ‘चिन्ह’मधून गाजलेल्या आत्मकथनांचा, तर पाचवा आणि शेवटचा भास्कर कुलकर्णी यांच्यावर असणार अशी ‘चिन्ह’मधले महत्वाचे सर्वच लेख ग्रंथबद्ध करण्याची सर्वसाधारण रूपरेषा मी आखली होती. यातले पहिले तीन खंड पहिल्या वर्षात तर नंतरचे दोन खंड दुसऱ्या वर्षात प्रसिध्द करायचे असं मी ठरवलं होतं. पण वाटलं होतं त्याच्यापेक्षाही हे काम अवघड निघालं.

याचं कारण माझ्या काम करण्याच्या पद्धतीत झालेला महत्वाचा बदल हे असावं असं वाटतं. २००७ सालचा अंक मेपलिथो कागदावर प्रसिध्द केला होता. ‘चिन्ह’चा रंगावतार त्याच अंकापासून सुरु झाला. इथून ‘चिन्ह’चं संपादन करण्याच्या माझ्या दृष्टीकोनात मोठा बदल होत गेला. आता इथून पुढे आपल्यावरची जबाबदारी अधिकच वाढली याचे भान मला आले. आणि त्यातून प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक करण्याकडे माझा कल झुकू लागला. त्यानंतरचा ‘कालाबाजार’चा अंक तर वृत्तपत्रीय भाषेत ज्याला हार्ड स्टोरीज म्हणतात तसा होता. त्याचं संपादन करतांना माझ्याकडून जरा जरी चूक झाली असती तर माझ्यावर गडांतर येऊ शकले असते याचं भान मला होतं. साहजिकच तो अंक काढतांना प्रचंड काळजी आणि वेळ खर्ची घालावा लागला. तो अंक लिहून संपादित करतांना नावानिशीवर टीका करून, अत्यंत प्रक्षोभक विधानं आणि जहाल भाषा वापरून देखील माझ्या विरोधात संबंधितांपैकी कोणीही ब्र देखील काढू शकले नाही. इथं मला माझ्या पत्रकारितेतल्या अनुभवांचा खूपच फायदा झाला. पण अत्यंत काळजी घेऊन आणि अतिशय सावधानतेने ते सारे काम केल्यामुळे ‘चिन्ह’चं काम करण्याच्या माझ्या एकूणच दृष्टीकोनात खूप मोठा बदल झाला. (इथूनच आणि ‘चिन्ह’च्या प्रकाशनाचे सारेच गणित उलटे पालटे होऊ लागले.)

आणि या साऱ्या घडामोडींमुळेच तर ‘चिन्ह’चं रुपांतर पूर्णपणे एका परिपूर्ण ‘आर्ट मेगझीन’मध्ये करण्याची संकल्पना माझ्या मनात खोलवर रुजली. हे सारे सोप्पे नव्हते. ‘चिन्ह’चे सारेच आर्थिक गणित उलटे पालटे करून टाकणारे होते. पण माझ्या डोळ्यासमोर असलेलं ‘चिन्ह’चं स्वरूप इतकं भव्य दिव्य होतं की, मी त्या साऱ्याची पर्वा न करताच काम करण्याचा निर्णय घेतला. परिणामी दरवर्षी नेमाने प्रसिद्ध होणारा अंक दर दोन वर्षानं प्रसिद्ध होऊ लागला. नव्या स्वरूपातला चिन्ह सदर करतांना प्रचंड कष्ट उपसावे लागत होते. भयंकर काळजी घ्यावी लागत होती. आधी मजकुरावर प्रचंड काम करावे लागत होते पण इथे मात्र मजकुराबरोबर त्याच्या दृश्य अंगाचाही प्रचंड विचार करावा लागत होता. छपाईच्या दृष्टीने हे सारे कसे दिसेल हे ही पाहावे लागत होते. आणि मुख्य म्हणजे हे सारे एका विशिष्ट आर्थिक मर्यादेत करावे लागत होते. त्यामुळे अंक उशिरा प्रसिद्ध होऊ लागला. या साऱ्यामध्ये ‘चिन्ह’च्या कट्टर वाचकांची प्रचंड साथ लाभली, केवळ म्हणूनच मी हे ‘निवडक चिन्ह’चे धाडस करू शकलो हे आवर्जून सांगायला हवे. केवळ अंक उशिरा प्रसिद्ध होण्यामुळे काही वाचक कायमचे दुरावले पण गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीच तडजोड न केल्यामुळे नवे वाचक ‘चिन्ह’ने खूप मोठ्या प्रमाणावर जोडले. या नव्या वाचकांच्या प्रचंड मोठ्या पाठबळामुळेच ‘निवडक चिन्ह’ प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली.

सतीश नाईक
संपादक, 'चिन्ह'

Friday, November 14, 2014

‘चिन्ह’ दुकानात का मिळत नाही…


‘चिन्ह’चे अंक किंवा ‘निवडक’चे खंड पुस्तकांच्या दुकानात का नाही मिळत हो ? अशी विचारणा करणारे फोन आठवड्यातून तीन चार वेळा तरी येतातच येतात. त्या मागची आमची भूमिका फोनवर मी लगेचच स्पष्ट करून टाकतो. सगळ्यांनाच ती पटते असे नाही. विशेषतः अंक किंवा ग्रंथ विक्रेत्यांकडे पाहून किंवा चाळून खरेदी करण्याची संवय असलेले या उत्तरांवर त्रागाच करतात. पण त्याला नाईलाज असतो. या संदर्भात ‘चिन्ह’च्या अंकांमधून किंवा ‘निवडक’च्या प्रस्तावनेतून किंवा ‘फेसबुक’च्या पोस्टमधून मी वेळोवेळी लिहीतच असतो. या संदर्भात आतापर्यंत घडलेले विक्रेत्यांचे एकाहून एक अफलातून किस्से सांगायचे म्हटले तर २०-२५ पानांचा एक प्रदीर्घ लेखही लिहिता येईल. पण असं करणे योग्य नव्हे याची जाणीव असल्याने, कारण एकप्रकारे हे विक्रेते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रंथ प्रसाराचेच कार्य करीत असल्याने तो मोह मी सतत टाळत आलोय. पण परवा असाच एक फोन आला, मी माझी टेप सुरु केली. तर त्यावर तो हुज्जतच घालू लागला. त्याच्या म्हणण्याचा सारांश असा होता. ‘चिन्ह’ने ही पुस्तक किंवा अंक विक्रेत्यांकडे ठेवायलाच पाहिजेत. नाना तऱ्हेने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. जवळजवळ अर्धा तास फोन चालू होता. पण गडी काही ऐकायलाच तयार नव्हता. शेवटचा उपाय म्हणून त्याला नुकताच घडलेला एक किस्सा कथन केला. तुम्हालाही तो वाचायला नक्कीच आवडेल म्हणून पुढे देत आहे.

एके दिवशी दुपारी अचानक फोन वाजला, पुण्याच्या एका प्रख्यात ग्रंथविक्रेत्यांकडून तो फोन आला होता. या क्षेत्रात ते गेली अनेक दशके आहेत. स्वतःची मोठी वास्तू, प्रचंड मोठे दुकान, वर्षभर सतत चालणारी ग्रंथप्रदर्शनं आणि पश्चिम महाराष्ट्रात असलेला त्यांचा प्रचंड दबदबा. यामुळे त्यांच्याकडून फोन यावा याचे मला जरा आश्चर्यच वाटले. ‘काय हवे आहे आपल्याला ?’ असे विचारल्यावर त्यांनी धडाधड ‘चिन्ह’च्या अंकांची यादी वाचून दाखवली. वर म्हणाले लगेचच पाठवा लागलीच पेमेंट करतो. त्याक्षणीच मला आधी घडलेली घटना आठवली. म्हटलं, ‘तुम्हाला काहीही मिळणार नाही.’ तर समोरची व्यक्ती चक्रावली आणि म्हणाली, ‘का ?’ तर म्हटलं, ‘२००९ साली ‘निवडक चिन्ह’च्या पहिल्या खंडाचं बुकिंग घेतलं होतं, त्याचे पैसे अजून तुम्ही चुकते केलेले नाहीत. असं असतांना देखील तुमच्या पुन्हा आलेल्या मागणीवर ‘निवडक’च्या आणखीन काही प्रती तुम्हाला विक्रीसाठी दिल्या होत्या. त्याचेही पैसे तुम्ही चुकते केले नाहीत. नंतर एकदम देतो असे सांगून तुम्ही आणखीन काही प्रती मागवल्या त्याही आम्ही दिल्या त्याचेही पैसे अजून दिले नाहीत. अनेक वेळा स्मरण पत्रं पाठवली फोन केले आणि शेवटी तुमचा नाद सोडून दिला. हा काही आमचा व्यवसाय नाहीं आणि तुमच्या पाठीशी लागायला आमच्याकडे वेळही नाही.’ थाडथाड सडेतोडपणे हे सांगितल्यावर तो माणूस भिरभिरलाच.

बहुधा अशा उत्तराची त्याला संवय नसावी. ‘असे आमच्याकडून होणे शक्यच नाही,’ वगैरे वगैरे सांगू लागला. ‘तारखा आणि चलन क्रमांक सांगू का ?’ असे विचारल्यावर मात्र म्हणाला, ५ मिनिटात तुम्हाला फोन करतो. तो माणूस पुन्हा फोन करील यावर माझा काही विश्वास नव्हता. पण ५ मिनिटांनी चक्क फोन आला. म्हणाला ‘तुमचं बरोबर आहे. तुमचे पैसे अनावधानानं द्यायचे राहिले आहेत.’ म्हटले ‘हे तुम्ही कुठे पाहिलंत’, तर म्हणाले ‘कॉम्प्युटरवर.’ म्हटलं, ‘एवढ्या साऱ्या नोंदी असतांनाही आमचे पैसे का दिले नाहीत ? २००९ सालची ही घटना आज ६ वर्ष झाली. हा काही आमचा व्यवसाय नव्हे. चळवळ म्हणून आम्ही हे प्रचंड खर्चिक आणि उफराटी प्रकाशनं प्रसिध्द करतो. पण तुमच्यासारख्या प्रस्थापित मंडळीनीच जर तोंडाला अशी पानं पुसली तर आम्ही काय करायचं ? मराठी पुस्तकं विकली जात नाहीत असं म्हणता आणि १५-२० दिवसातच विकल्या गेलेल्या प्रतींचे पैसेच तुम्ही ५-६ वर्ष देत नाही. उलट सारा व्यवहार थांबवून टाकता. याने आमचे नुकसान तर होतेच पण गावोगावच्या वाचकांचे याहूनही अधिक नुकसान होते याचे काय ?’

माझा पारा चांगलाच चढला होता आणि समोरून हुं की चुं देखील होत नव्हते. आता सारे बोलूनच टाकायचे मी ठरवले होते. तुमच्यासारख्या ग्रंथ विक्रेत्यांच्या अशा भिकारड्या व्यवहार कंटाळूनच आम्ही विक्रेत्यांना पुस्तकं व ग्रंथ विक्रीसाठी देणे बंद करून टाकले. ‘चिन्ह’चा वाचक कमिटेड आहे. त्याला अंक हवा असतो म्हणजे हवा असतोच. त्यासाठी त्याची कितीही वेळ वाट पहायची तयारी असते किंवा तो मिळवण्यासाठी कितीही वेळा दुकानदाराकडे खेटे घालण्याची त्यांची तयारी असते म्हणूनच तुमच्याशी व्यवहार बंद करणे आम्हाला शक्य झाले. आज आम्ही एक मोबाईल आणि एक वेबसाईटच्या सहाय्याने पुस्तक विक्रेत्यांना पर्यायी अशी समांतर वितरण व्यवस्था उभी करू शकलो. आणि मोठ्या अभिमानानं जाहिरातही करू शकलो की ‘‘चिन्ह’चे अंक किंवा ग्रंथ कुठल्याही विक्रेत्यांकडे उपलब्ध नसतात. पण अन्य मराठी ग्रंथ प्रकाशकांचे काय ? ते बिचारे वर्षानुवर्ष मुग गिळून हे असले व्यवहार करत राहतात.’ संधी मिळाली होती ऐकवण्याची आणि मी ती सोडली नाही. आणि तो समोरचा माणूस मुकाटपणे सारे ऐकून घेत होता.

श्वास घेण्यासाठी मी जरासा थांबलो तर तीच संधी पकडून म्हणाला, प्लीज, तुम्ही तुमचा बँक अकाऊंट नंबर एसेमेस करा. मी उद्याच्या उद्या पैसे भरतो. ५ मिनिटात बँक डीटेल्सचा एसेमेस केला. दुसऱ्या दिवशी फोन केला तर म्हणाले, आज जमलं नाही उद्या नक्की करतो. उद्या म्हणाले आज बँक लवकर बंद झाली सोमवारी नक्की करतो. आता १६ सोमवारचं व्रत पूर्ण झालंय. अजूनही त्या पैशांचा पत्ता नाहीच सुरुवातीला दोन तीन वेळा वेळेवर फोन घेतले, पण आतातर फोन देखील घेत नाहीत. येत्या जानेवारीमध्ये ७ वर्ष पूर्ण होतील पुस्तके विकली जाऊन पैसे न मिळण्याला. आणि आता तर ते पैसे मिळतील असेही काही वाटत नाही. तुम्हीच सांगा ‘का या विक्रेत्यांना विक्रीसाठी पुस्तकं द्यायची ?’ वर्ष-वर्ष दोन-दोन राबून मोठ्या परिश्रमपूर्व पैसे गोळा करून हे असले ग्रंथ किंवा अंक प्रसिध्द करायचे आणि ते विकले गेले तरी विक्रीचे पैसे वर्षानुवर्ष दाबून ठेवायचे. ही कुठली या ग्रंथ विक्रेत्यांची रीत ?

एखाद दुसरा अपवाद सोडला तर सारेच अनुभव हे असे भयाण आहेत. यावर उपाय म्हणूनच मग आम्ही आमच्या वेबसाईटवरून फेसबुककरवी जाहिरात करून एसेमेस आणि ई-मेल्सद्वारे ग्रंथाविक्रीचा नवा फंडा तयार केला. आणि तो ‘नग्नता’ अंकाच्या वेळी यशस्वीपणे वापरला. त्यानंतर मात्र ग्रंथ विक्रेत्यांना पुस्तकं किंवा अंक न देण्याच्या निर्णयाचा कधीच फेरविचार करावा लागला नाही. कदाचित सर्वांनाच या माध्यमातून ग्रंथ वा अंक बुक करणं शक्य होत नसेल पण त्याला आता काय इलाज आहे ? भाविष्यात कधी न कधी त्यांना याच मार्गाने जावे लागणार आहे हे निश्चित. त्याची सुरवात आम्ही केली याचा आनंद नक्कीच आहे. गायतोंडे ग्रंथाच्या निमित्ताने आणखीन एक मोठ प्रयोग आम्ही करून पाहणार आहोत. या ग्रंथाच्या प्रती वेब साईटवरून किंवा मोबाईलवरुन बुक करता येतीलच पण क्रेडीट कार्डद्वारे देखील किंमत चुकती करून पुढल्या २४ तासात ग्रंथ किंवा अंक घरपोच मिळवता येईल. बहुधा १ जानेवारीपासून ही व्यवस्था सुरु होईल. या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळणार आहे ते पाहायला आम्ही नक्कीच उत्सुक आहोत.

सतीश नाईक

Saturday, August 9, 2014

‘गायतोंडे’ ग्रंथ सवलतीत मिळवण्याची शेवटचीच संधी…


१३ वर्षापूर्वी १० ऑगस्ट २००१ रोजी गायतोंडे यांचं निधन झालं. आज ते हयात असते तर ९० वर्षांचे झाले असते. चित्रकार रझा जेजेतले त्यांचे वर्गबंधू. त्याचं वय आता ९३ वर्षांचं आहे. पेरीसहून भारतात परत येऊन ते आता दिल्लीत स्थायिक झाले आहेत. गायतोंडे ग्रंथाच्या प्रकाशनासाठी त्यांचं नावं सुयोग्य होतं. पण दुर्देवानं प्रकृती स्वास्थ्यामुळे, मुंबई दिल्ली प्रवास झेपण्यासारखा नसल्यानं त्यांनी असमर्थता दर्शवली आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी गायतोंडे यांच्या भावविश्वात ज्यांना मोठं स्थान होतं असं एक नावं आता आम्ही निश्चित केलं आहे. पण त्याविषयीची घोषणा सारं निश्चित होताच केली जाईल. 

दरम्यानगायतोंडेग्रंथाविषयी मेल अथवा फोनवरून सातत्याने विचारणा होत असते. त्याविषयी थोडसं सांगावसं वाटतं आहे. ‘गायतोंडेग्रंथाची पहिली आवृत्ती तर या पूर्वीच बुक झाल्याचं आम्ही या पूर्वीच जाहीर केलं होतं. या सततच्या चौकश्यांमुळे अखेरीस आम्ही पहिल्या आवृत्तीच्या प्रतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही कालपर्यंत मागणी नोंदवून घेतली. प्रकाशनाचा कालावधी आता निश्चित झाला आहे. ज्यांच्या हस्ते आता प्रकाशन होणार आहे ते नाव हे निश्चित झाले म्हणजे १२ ते १६ सप्टेंबर या कालावधीतील कोणत्याही एका तारखेची घोषणा आम्ही करू. 

दिनांक २० ऑगस्ट रोजी या ग्रंथाची छपाई सुरु होईल. ‘चिन्हच्याच नव्हे तर एकूण मराठी ग्रंथांच्या इतिहासातला हा सर्वात खर्चिक ग्रंथ ठरणार आहे. त्यामुळे नोंदवल्या जाणाऱ्या मागणी एवढ्याच प्रती आम्ही प्रकाशित करणार आहोत. ज्यांना हा ग्रंथ आपल्या संग्रहात हवा आहे, त्यांना रु. ३००० चा हा ग्रंथ रु. २००० इतक्या सवलतीतच बुक करण्याची अखेरचीच संधी आम्ही देत आहोत. उशिरात उशिरा १८ ऑगस्टपर्यंतचचिन्हच्या ९००४० ३४९०३ या नंबरवर नाव, पत्ता आणि -मेल आय डी, एसेमेस करून तुम्ही मागणी नोंदवू शकता आणि दिनांक २० ऑगस्ट पूर्वी स्टेट बँकेच्या कुठल्याही शाखेत रु. २००० हे सवलत शुल्क भरू शकता. 

ग्रंथ जास्तीत जास्त संग्राहय व्हावा आणि संपूर्णतः निर्दोष व्हावा या प्रक्रियेत प्रकाशनाला उशीर होत गेला. पण आता ती प्रक्रिया संपली आहे आणि मराठी ग्रंथांच्या इतिहासात निश्चितपणाने अजोड ठरावी अशी ग्रंथ निर्मिती करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. हा ग्रंथ जेव्हा आपण पहाल तेव्हा आपणास आमचं वरील विधान अतिशयोक्तीचं वाटणारं नाही याची आम्हाला खात्री आहे. 


वितरणाचा नवा फंडा 

चिन्हचं एका परिपूर्ण आर्ट मेगझीन मध्ये रुपांतर झाल्यापासून म्हणजे २००९ सालापासून अंक वितरणाचा आम्ही एक अनोखा फंडा अमलात आणला. ‘चिन्हच्या कट्टर वाचकांचा आणि महाराष्ट्रातील चित्रकारांचा संपूर्ण डेटाचिन्हपाशी असल्यानं चिन्हनं मेल एसेमेस आणि फेसबुक च्या माध्यमातून संबंधितांशी संपर्क साधला. हा प्रयोग भलताच यशस्वी ठरला आणिचिन्हचे अंक शिल्लक राहणं दुरापास्त ठरू लागले. यातचिन्हचाही अंकाचा निर्मिती खर्च उभा करण्याच्या दृष्टीनं मोठा फायदा झाला. जाहीरातदारांवर अवलंबून राहावे लागेना. ‘चिन्हच्या वाचकांचाही ग्रंथ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते यांच्यावर अवलंबून राहील्याने आणि घरबसल्या तब्बल ३० ते ४० टक्के सवलतीत अंक घरपोच होऊ लागल्याने मोठाच फायदा झाला. हाच फंडाचिन्हनं नंतर कायम केला. आणिनिवडक चिन्हच्या महत्वाकांक्षी योजनेत याचा यशस्वीपणे वापर केला. 

ग्रंथ विक्रेते ही संकल्पनाचं बाजूला टाकल्यामुळे महाराष्ट्रातले बहुसंख्य ग्रंथ विक्रेते दुखावले. पण त्याला आमचा आता नाईलाज आहे. आपल्याचं पैशांसाठी का म्हणून त्यांच्याकडे वर्षानुवर्ष तोंड वेंगाडत राहायचं ? ‘चिन्हला आता अशा व्यवस्थेची गरजच उरलेली नाही. म्हणूनचं आता गायतोंडे ग्रंथाला किंवा नंतरच्या दोन्ही खंडांना कितीही मागणी आली तरी ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही ग्रंथ विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार नाही हे निश्चित. याला काहीजणंमाजअसा शब्दप्रयोग करणार असतील तर त्याला आमची काहीच हरकत नाही. कारणंचिन्हनं हे जे काही मिळवलं आहे त्यामागेचिन्हची काहीतरी सांगण्याची तळमळ आणि घेतलेल्या कष्टांचा खूप मोठा वाटा आहे. तेव्हा ज्याला कोणाला सवलतीतगायतोंडेग्रंथ हवा असेल किंवा अन्य दोन्ही खंड हवे असतील त्यांनीचिन्हला फक्त एक एसेमेस पाठवून माहिती मागवावी हे बरे. २० ऑगस्ट नंतरगायतोंडेग्रंथ ३००० रुपयांनाच घ्यावा लागेल. 

अशा योजना राबवतांना अनेकदा तोटा होण्याची शक्यताही असते. पण एकदा शब्द दिल्यानंतर मात्रचिन्हनं तो कधीच फिरवला नाही. यागायतोंडेग्रंथाचंच उदाहरणं घ्या. या ग्रंथाचे सवलत शुल्क आधी रु. १२०० निश्चित केले होते, नंतर ते १४५० केलं गेलं. पुन्हा एकदा वाढून १६५० करावं लागलं आणि आता शेवटच्या टप्प्यात ते २००० केलं गेलं आहे. पृष्ठ संख्येत वाढ झाली. संपूर्ण रंगीत छपाई असल्यानं छपाई खर्चात वाढ झाली. आधी ठरवला होता त्यापेक्षा उच्च दर्जाचा कागद वापरला गेला. बाईंडिंग, आसपासचा कागद, जेकेट आणि कोरोगेटेड बॉक्स या साऱ्यातचं नव्या नव्या व्हेल्यू एडिशन्स केल्यानं ग्रंथाच्या गुणवत्तेत आणि निर्मिती खर्चात प्रचंड वाढ झाली पण ज्यांनी रुपये १२०० किंवा १४५० भरले त्यांना आम्ही तो त्याच किंमतीत उपलब्ध करून दिला आहे. 

निवडकयोजनेतील सहभागींची झलक तर पहा 

चिन्हच्या या अनोख्या प्रयत्नांमुळेच या साऱ्यालाच वाचक चळवळीचं एक अनोखं स्वरूप आलं आहे. ज्यात विजय दर्डा यांच्यासारखे राजकारणी देखील सहभागी झाले. यात चित्रकारांचा सहभाग जरा कमीचं असला तरी नाटकं, चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य, वैद्यक, विज्ञानं या सारख्या अनेक क्षेत्रातील कितीतरी रथी-महारथी या योजनेत सहभागी झाले आहेत. वसंत आबाजी डहाके, डॉ. रवी बापट, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, जया दडकर, डॉ. सुधीर पटवर्धन,भारत सासणे, शमा भाटे, रजनी दांडेकर, प्रा. सुनीती देव, वृंदावन दंडवते, प्रवीण बर्दापूरकर, सुजीत पटवर्धन, गिरीश कुलकर्णी, अभिलाष खांडेकर, विनय धुमाळे, प्रा. अनिल सोनार, अशोक राणे, अतुल देऊळगावकर, माधवी मेहेंदळे, मुकुंद भागवत, रत्नाकर सोहोनी, दीपक देशपांडे, प्रकाश बाळ जोशी, डॉ. शशिकांत लोखंडे, रमेश वेळूसकर, सुहास शिळकर,माधव बोरकर, डॉ. प्रिया जामकर, यशवंत शिरवाडकर, सुनील गावडे, भास्कर हांडे, सतीश भावसार, शुभा गोखले, गिरीश प्रभुणे, प्रतिमा वैद्य, वैजनाथ दुलंगे, डॉ. घनश्याम बोरकर, गणेश मतकरी, राजू सुतार,नीरजा पटवर्धन, प्रा. नितीन आरेकर, प्रमोद कांबळे, फिलिप डिमेलो, शामसुंदर जोशी, स्वागत थोरात, वीणा जामकर, विद्यागौरी टिळक, भूषण कोरगावकर, किशोर कदम, गीतांजली कुलकर्णी, डॉ. प्रकाश जोशी, राम कोल्हटकर, एस. बी. रेगे, यशवंत देशमुख, दिनकर मनवर, चंद्रकांत जोशी, प्रकाश राजेशिर्के, सुनील तांबे अशी आणखी नावं घ्यायची झाली तर एक वेगळी पोस्ट लिहावी लागेल. तेव्हा ज्यांना हागायतोंडेग्रंथ किंवा निवडकचे तिन्ही खंड त्यांनी ते त्वरित बुक करावे हे बरे. पुन्हा एकदा निक्षून सांगतो हागायतोंडेग्रंथ किंवा निवडकचे दोन्ही ग्रंथ महाराष्ट्रातील कुठल्या ग्रंथ विक्रेत्यांकडे विक्रीस उपलब्ध असणारं नाही ही काळ्या दगडावरची रेघच समजा. तेव्हा आता वेळ दवडू नका. उचला मोबाईल फिरवा नंबर ९००४० ३४९०३.