Monday, January 21, 2013


चिन्ह’चा यंदाचा अंक म्हणजे ‘यत्न-प्रयत्न विशेषांक’तो लवकरच प्रसिद्ध होऊ घातलाय. 
त्यानिमित्तानं ‘लोकमत’च्या दर रविवारी प्रसिद्ध होणार्‍या ‘मंथन’पुरवणीच्या संपादकांनी ‘चिन्ह’च्या आजवरच्या वाटचालीचा धांडोळा घेणारा एक लेख ‘चिन्ह’कडून मागवला होता. 
सदर लेख 20 जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. वाचकांसाठी तोच लेख संपूर्णपणे जसाच्यातसा प्रसिद्ध करीत आहोत.सव्वीसाव्या वर्षी रौप्यमहोत्त्सव!

जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेत असतानाच पूर्णवेळ पत्रकारितेत शिरण्याची संधी मला मिळाली.
तिथं मग असं लक्षात आलं की ज्या चित्रकलेच्या क्षेत्रातून आपण आलो त्या विषयी मात्र वृत्तपत्रातून फारच कमी छापून येतंय. त्यातूनच मग कलाक्षेत्राविषयीच्या छोट्या-मोठ्या बातम्या देणं सुरू झालं.
त्या मिळवताना असं लक्षात आलं की या बातम्यांमध्येसुद्धा मोठमोठाल्या लेखांची किंवा
लेखनाची बीजं दडलेली आहेत.

पण हे लेखन मात्र काही साप्ताहिकात-वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार नाहीये. मग काय करायचं?
तर, चित्रकलाविषयक एखादं नियतकालिक किंवा निदान एखादं वार्षिक तरी आपण सुरू करायचं.
त्यातूनच ‘चिन्ह’चा 1987 साली जन्म झाला. माधव गडकरी तेव्हा दै.लोकसत्तेचे संपादक होते.
त्यांनी प्रोत्साहन तर दिलंच पण महाराष्ट्राच्या (संकल्पित)कला अकादमीवरचा लेखही दिला.
त्या अंकानं नंतरचा सारा इतिहास घडवला. (आणि प्रचंड आर्थिक मनस्तापही दिला)
पण त्या विषयी ‘निवडक चिन्ह’च्या पहिल्या खंडात विस्तारानं लिहिलं असल्यानं त्याची द्विरूक्ती करीत नाही.
जिज्ञासूनी तो लेख ‘चिन्ह’च्या www.chinha.in या संकेतस्थळावर वाचावा.

पत्रकारितेत तब्बल दोन दशकं घालवल्यावर ती मी अगदी ठरवून सोडली.
उर्वरीत काळ फक्त पेंटिंगच करायचं असं मी आधीच ठरवून टाकलं होतं, पण ठरवलं तसं मात्र घडलं नाही.
पत्रकारिता सोडल्यावर एक विचित्र रिकामपण, एक वेगळीच पोकळी मला सतावू लागली, आणि मग असं लक्षात आलं की संपादनाचं काम हे असं आपल्याला काही सोडता येणार नाही. किंबहुना ते आपल्या जगण्याचाच एक भाग झालंय.

हा ‘साक्षात्कार’ होण्याला करणीभूत ठरलं ते ‘चित्रकार गायतोंडे’यांचं निधन. ते साल होतं 2001. आपल्या आवडत्या चित्रकाराचं निधन व्हावं आणि त्याच्यावर फक्त चार-आठ ओळीच्याच बातम्या प्रसिद्ध व्हाव्यात हे मला तेव्हा चांगलचं झोंबलं. ‘गायतोंडे’यांचं सारं कर्तृत्व, त्यांचं मोठेपण, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं अफाट जगणं हे सारं सारं कुणीतरी जगासमोर आणायला हवं असं मला मनापासून वाटलं आणि ‘कुणीही’ ते आणणार नाहीये, ‘हे काम तूच करायला हवं’ याची पक्की जाणीव जेव्हा मला झाली, तेव्हाच मी ‘चिन्ह’चं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. तो दिवस होता 15  ऑगस्ट 2001 हा. त्याच्या पाचच दिवस आधी म्हणजे 10 ऑगस्टला गायतोंडे यांचं दिल्लीत निधन झालं होतं. (त्यांच्या निधनाला आता एक तप पूर्ण झालंय पण अद्यापही त्याच्यावर कुठल्याच भाषेत एखादा ग्रंथ वा पुस्तक निघालेलं नाहीय.)

आणि मग ‘गायतोंडे’ यांच्याविषयीची 25 पानी पुरवणी असलेला दुसर्‍या पर्वातला तो पहिला अंक प्रसिद्ध झाला. मग चित्रकला शिक्षणावरचा ‘सांगोपांग चित्रकला’, त्यानंतर वारली आणि मधुबनी कलेचा ज्यांनी शोध लावला त्या ‘भास्कर कुलकर्णी’यांच्यावरचा विशेषांक, नंतर कवी-चित्रकार अरूण कोलटकरांवरील प्रदीर्घ लेख असलेला विशेषांक, त्यांनंतर मग पुन्हा जवळ जवळ अख्खा ‘गायतोंडे’विशेषांक, मग क(I)लाबाजार विशेषांक, चित्रकार राजा रवि वर्मा यांच्यावरचा विशेष संशोधनपर लेख असलेला विशेषांक आणि सरतेशेवटी गेल्यावर्षीचा ‘नग्नता;चित्रातली आणि मनातली’ विशेषांक असे चढत्या भाजणीनं ‘चिन्ह’चे एकेक विशेषांक येत गेले आणि ‘चिन्ह’ला एखाद्या ब्रॅंडचच रूप देत गेले. या सर्वांवर कडी केली ती ‘चिन्ह’च्या www.chinha.in या संकेतस्थळानं आणि फेसबुकवरच्या ‘चिन्ह’च्या `chinhamag' या अकाउंटनं दर वर्षी जेमेतेम 2000 प्रती निघणार्‍या ‘चिन्ह’ला या दोघांनी अक्षरश: ‘ग्लोबल’करून टाकलं.

आज ‘चिन्ह’च्या या संकेतस्थळावरच्या पीडीफ फाईल्स संपूर्ण जगभरातून वाचल्या जातात. जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही की जिथून ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाला हिट मिळाली नाहीये. ‘फेसबुक अ‍ॅडमिन’ आणि ‘गुगल स्टॅटिस्टिक’मुळे आता या सार्‍या हिट्स रोजच्या रोज पहाता येतात. हे सगळंच अक्षरश: अवाक्‌ करून टाकणारं, थक्क करून टाकणारं आहे. गेल्या अडीच-तीन वर्षात या संकेतस्थळाला 25 लाखापेक्षा जास्त हिट्स मिळाल्या आहेत. त्यातल्या निम्म्याहून अधिक या परदेशातून मिळालेल्या आहेत, तर उरलेल्या भारतातून.

आधी उत्साहानं आम्ही त्याचा हिशेब ठेवत होतो पण नंतर ते अवाक्याबाहेर जाऊ लागल्यावर थांबवलं.
पण हे सारं पाहताना ‘चिन्ह’कसं रूजत चाललंय याची जाणीव मात्र निश्चितपणे होत होती.
‘चिन्ह’च्या वेबसाईटवर नुकत्याच सुरू झालेल्या www.kalakird.in या ऑनलाईन आर्टिस्ट डिरेक्टरीनं
तर ‘चिन्ह’ला मिळणार्‍या हिट्समध्ये अक्षरश: आठ-दहा पटीनं वाढ केली आहे. या ‘कलाकीर्द’वर आता महाराष्ट्रातले चित्रकार दिसू लागलेत.  लवकरच संपूर्ण भारतातल्या चित्रकारांची माहितीही त्यावर उपलब्ध होणार आहे. जगभरातल्या कुणाही कलारसिकाला थेट त्या चित्रकाराकडूनच (कुणालाही कमीशनची कपर्दीकही न देता) चित्रं खरीदता येणार आहे. घरबसल्या भारतातल्या कुठल्याही गॅलरीतली प्रदर्शनं
पाहता येतील अशी सोयही त्यात आम्ही केली आहे. चित्रकला विषयक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारं पोर्टल
असंच त्याचं स्वरूप आम्ही योजलं आहे.

गेलं वर्ष हे ‘चिन्ह’चं रौप्यमहोत्सवी वर्ष होतं. त्यानिमित्तानं ‘चिन्ह’च्या नेहमीच्या अंकाशिवाय
एलिमेंटरी-इंटरमिजिएट परीक्षासाठीच्या ‘चित्रसूत्र’ची सुधारित आवृत्ती, शिवाय इंग्रजी आवृत्ती आणि
‘निवडक चिन्ह’(कलेक्टर्स एडिशनचे)‘गायतोंडेंच्या शोधात’ ‘जे जे जगी...’ आणि व्यक्तीचित्रं;शब्दातली’
हे तीन खंड  तसेच ‘चिन्ह’ची ऑन लाईन इंग्रजी आवृत्ती आणि ‘कलाकीर्द’ऑनलाईन आर्टिस्ट डिरेक्टरी
आणि वर्षाला 12 जाहीर कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम आम्ही आखला होता पण वर्षाच्या प्रारंभीच वडिलांचं अकस्मात निधन झालं आणि सारंच विस्कळीत झालं. त्यातला ‘कलाकीर्द’ऑन लाईन
डिरेक्टरीचा महत्त्वाकांक्षी संकल्प काय तो आम्ही पूर्ण करू शकलो पण इतर सर्वच संकल्प रेंगाळत गेले.
ते सारं या वर्षाच्या पूर्वार्धातच पूर्ण करीत आहोत.

आता येत्या आठ-दहा दिवसात ‘चिन्ह’चा ‘यत्न-प्रयत्न’ विशेषांक हा चौदावा अंक प्रसिद्ध होईल.
नंतर लगेच ‘चित्रसूत्र’च्या दोन्ही आवृत्त्या आणि लगोलग ‘निवडक’चे तीन खंड क्रमश: प्रसिद्ध होणार आहेत. ‘चिन्ह’ची इंग्रजी ऑन लाईन आवृत्तीही त्यानंतर लगेच प्रसिद्ध होऊ लागेल. त्याआधी येत्या फेब्रुवारीपासून दर महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी ठाण्याच्या ‘ठाणे कला भवन’मध्ये जाहीर मुलाखती, व्याख्यानं, स्लाईड शो, गप्पागोष्टी इत्यादीचा समावेश असलेला एक कार्यक्रम सुरू होतो आहे. 9 फेब्रुवारी रोजी पहिला कार्यक्रम आहे तो ‘चिन्ह’च्या यंदाच्या अंकात ज्यांची कव्हर स्टोरी आहे त्या चित्रकार ‘डॉक्टर सुबोध केरकर’यांच्या सचित्र व्याख्यानाचा.

आपण ठरवतो ते सारे संकल्प आयुष्यात पूर्ण होतील असं नसतं पण सतत आणि प्रामाणिक प्रयत्न करीत रहाणं मात्र आपल्या हातात असतं. ‘चिन्ह’च्या आगामी ‘यत्न-प्रयत्न’विशेषांकाचं हेच तर सूत्र आहे. जे आचरणात आणायचा मीही आजवर प्रयत्न करीत आलोय. ‘चिन्ह’मधून प्रचंड आर्थिक फायदा होईल असं काही मी स्वप्नातसुद्धा पाहिलं नाही आणि पाहिलं असतं तरी ते कधी पूर्ण होणार नाही हेही मला पक्क ठाऊक आहे. पण मराठीत केवळ इंग्रजीच्याच तोडीचं नाही तर त्याहीपेक्षा जबरदस्त असं ‘आर्ट मॅगझीन’प्रसिद्ध करण्याचं स्वप्न मात्र मी जरूर पाहिलं होतं आणि ते प्रत्यक्षात आणण्याचं भाग्य मला पंचवीस वर्षात का होईना, मिळालं, हे काय थोडं झालं?
सतीश नाईक
editor@chinha.in


Monday, January 14, 2013
कुठे होता इतके दिवस?
परवा कुणीतरी ब्लॉगविषयी विचारलं आणि लक्षात आलं की
गेल्या चार-पाच महिन्यात आपण ब्लॉगजवळ फिरकलोही नाही.
अगदी उघडूनसुद्धा पाहिला नाही तो.
बापरे...

‘चिन्ह’च्या प्रत्येक नव्या अंकाचं काम हे सारं काही विसरून टाकायला लावणारं असतं
असं आम्ही जे नेहमी म्हणतो त्याचं हे एक उत्तम उदाहरण.
गेल्या चार-सहा महिन्यात नव्या अंकाच्या कामात ‘चिन्ह’ची सारी टीम इतकी गुंतली होती की
ब्लॉग उघडून पहायलादेखील वेळ मिळाला नाही. एरवी रोज सकाळी ब्लॉग ओपन करून पहाणं
आणि त्याला मिळणार्‍या हिट्स मोजणं आणि एखादी कमेंट आली का पहाणं हे मोठं उत्सुकता वाढवणारं
काम असतं. पण नव्या अंकाच्या निर्मितीत सारंच विसरायला झालं.
इतकं की या ब्लॉगद्वारे नव्या अंकाची माहिती वाचकांपर्यंत छानपणे पोहोचवता येते
हेसुद्धा आम्ही विसरलो. त्यामुळेच एकही नवा ब्लॉग अपलोड होऊ शकला नाही.

नेहमी प्रमाणे नव्या वर्षी करतात तो संकल्प याही वर्षी केलाय की
‘चिन्ह’चा हा ब्लॉग आता नेमानं चालवायचा-नियमितपणानं चालवायचा.
आठवड्यातून निदान एकदा तरी स्टोरी अपलोड होईल ना याकडे अधिक लक्ष द्यायचं वगैरे...
यंदा हे सारं खूप खूप मनावर घेतलंय. गेल्या वर्षीही घेतलं होतं पण वर्षाच्या सुरूवातीलाच
वडिलांचं अकस्मात निधन झालं आणि नंतर सारच प्लॅनिंग विस्कळीत झालं.
सारं वर्षच विलक्षण अस्ताव्यस्त आणि विखुरल्यासारखं गेलं.
त्यामुळे गेल्या वर्षीचा साराच कार्यक्रम यावर्षाच्या वाट्याला आला.

आता येत्या 10 - 15 दिवसात ‘चिन्ह’चा चौदावा अंक येईल.
मग महिन्याभरातच ‘चित्रसूत्र’च्या इंग्रजी-मराठी आवृत्त्या येतील.
मग लागोलाग ‘गायतोंडे’त्यानंतर ‘जे जे जगी...’आणि पाठोपाठ
व्यक्तीचित्रं;शब्दातली हे ‘निवडक’चे तीन खंड येतील.
एप्रिल किंवा मे महिन्याच्या आत ही सारी प्रकाशनं बाहेर येतील
आणि मग सुरू होईल तयारी ती आगामी 15 व्या अंकाची.
यंदा मात्र तो अगदी दिवाळीपूर्वीच प्रसिद्ध करायचा असं ठरवलंय.
त्यादृष्टीनं प्राथमिक कामही सुरू केलंय.
हे सारं टाईमटेबल पाळता यावं म्हणून आपल्या शुभेच्छा मात्र हव्यात.
तरच ते सारं शक्य आहे.

आणि हो, आणखी एक सांगायचं राहिलंय
ठाण्याच्या ‘ठाणे कला भवन’मध्ये फेब्रुवारीपासून दर महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी ‘चिन्ह’
आणि कलाकीर्द’तर्फे एक कार्यक्रम होणार आहे.
यात उपक्रमांमार्फत नामवंत चित्रकारांच्या मुलाखती, व्याख्यानं, चर्चा-गप्पागोष्टी,
स्लाईड-शोज्‌, फिल्म शोज्‌ असे विविध प्रकारचे कार्यक्रम सादर होणार आहेत.
चित्रकार माधव इमारते या सार्‍या कार्यक्रमाचं संयोजन करणार आहेत.
9 फेब्रुवारीच्या पहिल्या कार्यक्रमात ‘चिन्ह’च्या यंदाच्या अंकात ज्यांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध केली आहे
ते गोव्याचे चित्रकार, शिल्पकार, इन्स्टॉलेशन आर्टिस्ट सुबोध केरकर आपल्या कलाकृतींसंदर्भात बोलणार आहेत.
दिनांक : शनिवार 9 फेब्रुवारी 2013 
वेळ   : सायंकाळी 4 वाजता (4  ते 7), 
स्थळ  : ठाणे कला भवन, कापूरबावडी जंक्शन, स्टार सिटी मॉलशेजारी, जुना मुंबई-आग्रा महामार्ग, ठाणे(पश्चिम) 
आणि त्यानंतर उपस्थितांना त्यांना प्रश्न विचारायची संधी दिली जाणार आहे.
तूर्त इतकंच...(उद्या-परवा आणखी भेटूच)

सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह’