Monday, February 9, 2015

गायतोंडे ग्रंथ : 
बदलेल्या मुखपृष्ठाची अर्धी गोष्ट


हे मुखपृष्ठ दोन तीन वर्षापूर्वी आम्ही 'गायतोंडे' ग्रंथासाठी तयार केलं होतं. पण दोन आठवड्यापूर्वी ग्रंथ छपाईला गेला आणि अचानक ते बदलण्याचा निर्णय आम्ही एका रात्रीत  घेतला. आता २१६ पानांच्या मूळ ग्रंथाला संपूर्णतः वेगळेच मुखपृष्ठ वापरले जाणार आहे, आणि जे मुखपृष्ठ गेली दोन तीन वर्ष तुम्ही पाहत होता ते मुखपृष्ठ मात्र 'गायतोंडे' ग्रंथाच्या संपूर्ण निर्मितीची कथा सांगणाऱ्या आणि 'गायतोंडे' ग्रंथासोबत भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या पुस्तिकेवर वापरले जाणार आहे. त्याचीच संपूर्ण कहाणी सांगणारा हा ब्लॉग.  

एखादा ग्रंथ प्रसिद्ध होण्यासाठी जवळ जवळ दोन - तीन वर्षं इतका मोठा कालावधी लागला असेल, त्या मधल्या काळात ग्रंथाचं मुखपृष्ठ फेसबुकवर पोस्टसोबत शेकडो वेळा वापरलं गेलं असेल, ब्लॉगवर अनेक वेळा वापरलं गेलं असेल, प्रचंड खपाच्या मराठी, इंग्रजी दैनिकात तसेच साप्ताहिक - मासिकातदेखील ते प्रसिद्ध झालं असेल, इतकंच नाहीतर ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी राबवलेल्या सर्वच प्रसार मोहिमांमध्ये ते मोठ्या प्रमाणावर वापरलं गेलं असेल, तर असं मुखपृष्ठ तो ग्रंथ छपाईसाठी गेला असताना शेवटच्या क्षणी कोणी बदलील का ? असा प्रश्न तुम्हाला जर कोणी विचारला तरकाय आचरट प्रश्न विचारता रावम्हणून तुम्ही तो विचारणाऱ्याला नक्कीच वेड्यात काढाल. पण खरं सांगू का ? हा असला वेडेपणा आम्ही केलाय. होय ! 'गायतोंडे' ग्रंथाचं मुखपृष्ठ आम्ही छपाईसाठी ग्रंथ प्रेसमध्ये गेला असतानाच शेवटच्या क्षणी चक्क बदललंय.

खरं सांगायचं तर आता जे नवं प्रकाशचित्र ग्रंथाच्या मुखपृष्ठावर घेतलं आहे त्याच्या शोधात मी गेल्या तीन वर्षापासून होतो. ज्यानं ते प्रकाशचित्र घेतलं आहे तो खरंतर एक परदेशी चित्रकार - प्रकाशचित्रकार आहे. १९९६-९७ साली तो माझ्या जहांगीर आर्ट गेलरीत झालेल्या प्रदर्शनाला आला होता. माझ्या चित्रांविषयी त्यानं त्यावेळी बरीच चर्चादेखील केली होती, पण म्हणून काही तो माझ्या लक्षात राहिला नसता. तो लक्षात राहिला तो त्याच्या व्हिजिटिंग कार्डमुळे. त्याचं व्हिजिटिंग कार्ड हे चक्क हिंदीमध्ये होतं, त्यावर ओम वगैरे रेखाटलेला, म्हणूनच तर तो लक्षात राहिला.

२००१ साली गायतोंडे गेल्यावर एका नियतकालिकात गायतोंडे यांचं एक अप्रतिम प्रकाशचित्र प्रसिद्ध झालं होतं. कोणी काढलंय ते म्हणून उत्सुकतेनं नाव पाहिलं तर ते नाव ओळखीचं वाटलं, आणि मग लक्षात आलं की अरे तो हाच असणार ! खूप शोधाशोध केली तेव्हा त्याचं ते कार्डदेखील मला सापडलं. तर तो तोच होता.

२००७ साली 'गायतोंडे' ग्रंथाची जुळवा जुळव सुरु झाली. मात्र त्याला खरा वेग आला तो २०१० नंतर, पण तो पर्यत मी मुंबईतलं घर सोडलं होतं. साहजिकच त्या गदारोळात ते कार्ड माझ्याकडून बहुदा हरवलं. ते हरवल्याचं माझ्या लक्षात आलं ते 'गायतोंडे' ग्रंथाच्या मुखपृष्ठासाठी गायतोंडे यांचं चांगलं प्रकाशचित्र शोधू लागलो तेव्हाच. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. खूप प्रयत्न केला पण ते कार्ड काही मिळालं नाहीच. शेवटी माझ्या संग्रहातलच सुनील काळदाते याचं प्रकाशचित्र मुखपृष्ठावर वापरायचं असा मी निर्णय घेतला. हा निर्णय घेण्याआधी मी अनेक शक्यता अजमावून पहिल्या होत्या, पण पदरी मोठी निराशा येण्यापलीकडे काही हाती लागले नाही. हे सारं सविस्तर लिहायचं म्हटल तर तर ते नक्कीच खूप मोठं होईल, म्हणून तूर्त तरी लिहिण्याचं टाळतो आहे. पण कधीतरी त्यावर सविस्तर लिहिणार नक्की आहे.

खरं तर या ग्रंथासोबत जी २८ पानांची पुस्तिका देत आहोत त्यात ते सारं लिहिणं योग्य ठरलं असतं, पण हा ग्रंथ प्रसिद्ध होईपर्यंत तरी आणखी कोणतेही नवे वाद उदभवू द्यायचे नाही असं ठरवलं असल्यानं मला संयम पाळावा लागला आहे, पण त्यावर नक्की कधीतरी लिहेन, आणि ती संधी लवकरच ( या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने ) चालून येईल याची मला खात्री आहे.

सुनीलचं मी निवडलेले प्रकाशचित्र तांत्रिक दृष्ट्या अप्रतिमच होते. पण त्या प्रकाशचित्रातले गायतोंडे त्यांना झालेल्या अपघातानंतरचे गायतोंडे होते, सहाजिकच त्या भयंकर अपघाताचे त्यांच्या शरीरावर झालेले दुष्परिणाम त्यातून दिसतच होते. सहाजिकच ते प्रकाशचित्र गायतोंडे यांच्या कट्टर चाहत्यांना आवडलं नसतं. पण माझ्यासमोरदेखील दुसरा पर्याय नव्हताच. ज्यांच्याकडे गायतोंडे यांची चांगली प्रकाशचित्रं होती ती मंडळी ती द्यायला तयार नव्हती. त्यामुळेच नाईलाजास्तव ते प्रकाशचित्रं वापरण्याचा निर्णय मी घेतला होता.

ग्रंथ तयार झाला संपूर्ण डमीदेखील तयार झाली आणि चित्रकार प्रभाकर कोलते यांनी मुखपृष्ठाविषयी पहिला आक्षेप नोंदवला. ते म्हणाले ग्रंथ अप्रतिम झाला आहे, पण मुखपृष्ठावर हे प्रकाशचित्र मात्र नको, त्यामुळे गायतोंडे यांच्याविषयी चुकीचं मत होण्याचा संभव आहे. उंची कमी होती तरी गायतोंडे देखणे होते, आणि खूप टापटीप रहात. स्वतःच्या पोशाखाविषयीदेखील ते अतिशय चोखंदळ होते. या प्रकाशचित्रानं वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. हा ग्रंथ आहे अंक नव्हे. पुढल्या अनेक पिढ्या तो वाचला जाणार आहे. त्यामुळे हे मुखपृष्ठ तू वापरू नयेस, बदलावेस असे मला वाटते. त्यांचे चांगले प्रकाशचित्रं जर मिळत नसेल तर त्यांचे कुठलेही एक पेंटिंग वापर.त्यांची ही सूचना मात्र मला मान्य नव्हती कारण हा ग्रंथ चित्रकार 'गायतोंडे' या व्यक्तीवर होता - त्यांच्या चित्रांवर नाही. हा टिपिकल चित्रांचे ग्रंथ असतात तसा ग्रंथ नव्हता.

गायतोंडे यांच्या अनोख्या व्यक्तिमत्वाची जडण-घडण कशी झाली, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत करीत त्यांचा चित्रकलेचा एकूण प्रवास कसा झाला याचं चित्रण करणारा ग्रंथ होता. म्हणून त्याच्या मुखपृष्ठावर पेंटिंग घ्यायला मी नाखूष होतो. मराठी वाचक ग्रंथावर पेंटिंग स्वीकारायला अजून पुरेसा तयार झालेला नाही हेही माझं मत होतं. साहजिकच इच्छा असूनदेखील मी काही करू शकत नव्हतो. कोलते सरांनी दोन-तीन वेळा तरी टोकलंच. मी प्रयत्न करीत होतो पण त्याला यश मात्र येत नव्हतं. ज्यांच्याकडे 'गायतोंडे' यांची दुर्मिळ प्रकाशचित्रं होती ते ती मला - कारणं काही असोत, पण देऊ इच्छित नव्हते. हरवली आहेत, कुठे ठेवली सापडत नाही आहेत, निगेटीव्ह मिळत नाहीत, आमचंच पुस्तक येतंयवगैरे अनेक कारणं सांगून देणं टाळत होती. शेवटी मी तो नाद सोडलाच. आणि पुन्हा पहिल्यापासून मी गायतोंडेंचा फोटो नव्यानं शोधायला सुरुवात केली.

या शोधामध्ये आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा हे मी मनाशी पक्क केलं. इंटरनेटवर शोध घेता घेता मी फेसबुकपर्यंत येऊन पोहोचलो आणि होय ! त्याचा शोध मला लागलाच. अगदी त्याच्या संपूर्ण परिचयासकट तो मला भेटला. तो केवळ प्रकाशचित्रकारच नव्हे तर चित्रकारदेखील होता. युरोपातल्या एका देशात त्याच वास्तव्य होतं खरं पण तिथे तो कमीच राहत असणार कारण त्याच्या वेगवेगळ्या पोस्टवरून तो जगभर फिरत असावा असं दिसत होतं. भारतात तर तो वरचेवर येतच असावा असं त्याच्या प्रोफाईलमध्ये पाहून वाटत होतं. आणि कव्हर फोटोमध्ये त्याला पाहून तर मी उडालोच, कारण त्या फोटोत तो आपल्याकडे कुंभमेळ्यात असतात तशा तमाम साधू मंडळींबरोबर बसलेला दिसत होता. अरे ! म्हटल हे भलतंच काहीतरी. पण लागलीच मी त्याला मेल पाठवली आणि पाठोपाठ फ्रेंड रिक्वेस्टही त्यानंही त्वरित उत्तर दिलं आणि प्रकाशचित्रांची निवड करण्यासाठी थंबनेल्स पाठवली. पण त्यानं प्रकाशचित्रांच्या रॉयल्टीची जी किंमत ती ऐकून मी गरगरून गेलो. ती देणं मला शक्यच नव्हतं. पण तरीही मी मेलवर त्याच्याशी संपर्क ठेऊन होतो. मी त्याला म्हटलं ही रॉयल्टी जर जास्त वाटते तर तो म्हणाला युरोपात सारे अशीच रॉयल्टी घेतात पण तू गायतोंडे यांचा चाहता दिसतोयस आणि एफ बी वर तू केलेलं सारंच काम दिसतंय, त्यामुळे मी कमीच रॉयल्टी लावतोय. पण त्यानं सांगितलेली रॉयल्टी देणंदेखील शक्यच नव्हतं, त्यामुळे पुन्हा मेलची देवाणघेवाण थंडावलीच.

हे सारं चालू असतांना मी अन्य ठिकाणीदेखील फोटोंचा शोध घेतच होतो पण निराशाच पदरी पडत होती. कोलते सर जे म्हणत होते त्यात थोडसं तथ्य होतंच पण कलाक्षेत्रातील आणखीन काहींच मत घ्यायचं मी ठरवलं. तेव्हा काहींच्या अशाच कोलते सरांच्या प्रतिक्रियेसारख्याच काहीशा प्रतिकूल प्रतिक्रिया आल्या. म्हणून मग एके दिवशी मी सरळ लक्ष्मण श्रेष्ठांनाच फोन केला. लक्ष्मण श्रेष्ठ त्यांच्या स्वतःच्या करिअरच्या प्रारंभापासूनच गायतोंडेंच्या अंतापर्यंत त्यांच्या संपर्कात होते. गायतोंडे मुंबईत येत तेव्हा त्यांच्याचकडे उतरत असत. गुरु-शिष्यांचं छान नातं होतं त्यांच्यात. त्यांना मी फोन केला आणि सारा प्रॉब्लेम सांगितला. त्यांनी मला लगेचच वेळ दिली आणि म्हणाले मी खूप ऐकलंय तुझ्या ग्रंथाबद्दल मी तो पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. त्यांनी ती ग्रंथाची डमी पाहिली आणि ते भयंकर खूश झाले. म्हणाले गायतोंडे यांच्यावर हे असं काही पुस्तक येईल याची मी मुळीच कल्पना केली नव्हती. खूप मोठं काम केलयस तू. त्यांची पत्नीही ते पाहून खूश झाली.

आणि मग मी मुखपृष्ठाचा प्रॉब्लेम सांगितला तर ते दोघेही अगदी उत्स्फूर्तपणे म्हणाले, काही बदल करु नकोस यात, केलं आहेस ते काम ग्रेट आहे, मुखपृष्ठाच्या फोटोत बदल करण्याची देखील काही गरज नाही. गायतोंडे जसे होते तसे या ग्रंथात उतरले आहेत. उलट अपघातामुळे आलेल्या या अवस्थेमुळे कुठंही खचून न जाता गायतोंडे ८-९ वर्षांच्या मोठ्या गेपनंतरदेखील पेंटिंग करू लागले. हे या मुखपृष्ठामधून खूप छान व्यक्त होतंय असं मला त्यांनी चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितलं. निघतांना मला म्हणाले प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवायला विसरू नकोस. आम्ही नक्की येऊ.

लक्ष्मण यांच्या घरातून बाहेर पडलो तेव्हा मी खूप आनंदात होतो. वाटलं चला एक टेंशन गेलं, सुटलो एकदाचा अशा काहीशा माझ्या भावना होत्या. घरी येऊन ग्रंथाच्या साऱ्या फाईल्स बेंगलोरला प्रेसमध्ये मेल केल्या. पण त्या नंतर अत्यंत वेगाने अशा काही घटना घडल्या. आणि शेवटच्या क्षणी मुखपृष्ठ बदलण्याचा धाडसी निर्णय मला घ्यावाच लागला. तो का घेतला ? कसा घेतला ? कशामुळे घेतला ? कुणाचं प्रकाशचित्र वापरलं ? का पेंटिंग वापरलं ? हे सारं कसं काय जमून आलं याविषयी मी तुम्हाला आता काहीच सांगू शकणार नाहीये. किंवा बदलेलं मुखपृष्ठही मी तुम्हाला इतक्यात दाखवणार नाहीये. ग्रंथ प्रकाशनाच्या दिवशीच किंवा कदाचित प्रकाशनाचा जो भव्य कार्यक्रम आम्ही योजिला आहे त्याच्या घोषणेच्या वेळीच मी ते तुम्हाला दाखवू शकेन. आतापर्यंत निवडक चिन्हच्या बाबतीत घडलेली प्रत्येक घटना मी 'चिन्ह'च्या वाचकांशी शेअर केली आहे. पण आता मात्र मी थोडसं स्वातंत्र्य घेतोय, द्याल ना ?

सतीश नाईक
संपादक, चिन्ह

३००० रुपये किंमतीचा हा ग्रंथ प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये २००० रुपयातच उपलब्ध आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ९००४० ३४९०३ या नंबरवर तुमचं नाव, पत्ता आणि ई-मेल आय डी एसेमेस करा आणि प्रकाशनाच्या दिवशीच ग्रंथ घरपोच मिळवा.

Sunday, January 18, 2015

आता 'चिन्ह' बंद !नव्या वर्षात सोडलेला अगदी महत्वाचा संकल्प म्हणजे 'चिन्ह'चं वार्षिक प्रकाशन थांबवणं हाच. होय ! इथून पुढं 'चिन्ह'चे अंक प्रसिध्द होणार नाहीत हे निश्चित. अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला गेला आहे. याला कारणं बरीच आहेत. पण महत्वाची आधी सांगतो. उदाहरणार्थ २०१० साली 'चिन्ह'चे संपूर्ण कलामासिकात रुपांतर करण्याचा जो निर्णय घेतला तो भविष्यात इतका वेळखाऊ ठरेल याची कल्पनाच आधी आली नाही. २००८ सालापर्यंत 'चिन्ह'चे अंक कृष्ण-धवल स्वरुपात नेमानं निघत होते. त्यांचा निर्मितीचा कालखंड तेव्हा सुमारे ६ ते ८ महिन्याचाच असे. पण 'चिन्ह'ला कलामासिकाचं संपूर्ण स्वरूप दिल्यानंतर तो कालावधी प्रचंडच वाढला. एकेका अंकाचे काम पूर्ण करण्याला दीड-दीड, दोन- दोन वर्ष लागू लागली. २००१ ते २००८ या कालावधीत थोड्याफार उशिराच्या फरकानं का होईना पण 'चिन्ह'चे अंक नियमितपणे निघत होते. तब्बल आठ अंक या कालावधीत निघाले. पण २००९ ते २००५ या कालावधीत फक्त तीनच अंक निघू शकले. आणि आता जसे अंक निघत आहेत. तसेच ते निघावयाचे असतील. तर त्यांच्या निर्मितींना तेवढा वेळ हा द्यावाच लागणार, जे आता खरंच शक्य राहिलेले नाही.

योजिले होते आणि करावयाचे होते त्यातले बरेचसे करून देखील झाले. पण ज्यांच्यावर काम करायलाच हवे त्यांची कमतरतादेखील आता खूप जाणवते आहे. आणि नव्या मंडळींना हात लावायचे म्हटले तर काही कारण नसतांना त्यांच्या आपापसातल्या हेव्यादाव्यांमुळे, गटांमुळे उगीचच प्रचंड टिकेला बळी पडावे लागते. त्यातून भलभलते आरोप केले जातात. मूळ हेतूंविषयीच शंका व्यक्त केल्या जातात, तेव्हा मनाला एक प्रकारची खिन्नतादेखील येते. शिवाय कागद आणि छपाईचा खर्च यात झालेल्या प्रचंड वाढीमुळे सतत आर्थिक ताणतणावांना सामोरं जावं लागतं. खरंतर फक्त महाराष्ट्रातल्याच चित्रकारांनी जरी नुसती ही अभिनव चळवळ उचलून धरली असती तरी 'चिन्ह'चे आणखीन वेगवेगळे आविष्कार मराठी वाचकांना पहावयास मिळाले असते. पण दुर्देवानं तसं झालं नाही. तिथं आम्ही कुठं तरी कमी पडलो. शिवाय 'उम्र का तकाजा' वगैरे भानगड असतेच की.

अगदी मनापासून सांगायचं तर प्रत्येक चांगल्या गोष्टीला एक शेवट हा असतोच. आणि तो कधी करायचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. हे अनेकांना वेळीच कळत नाही. आणि मग अनेक दुखःद प्रसंगांना सामोरं जावं लागतं. ज्यांना हे कळतं ते मात्र मोठ्या रुबाबात पायउतार होऊन निघून जातात. म्हणूनच 'चिन्ह' बंद करायचा निर्णय ठामपणानं घेतला आहे. खरंतर चित्रकार प्रभाकर बरवे यांच्यावरचा १५ वा अंक प्रसिध्द करून 'चिन्ह'चं प्रकाशन थांबवायचं असं गतवर्षीच निश्चित केलं होतं. पण निर्मितीत गुंतून राहण्याचा वाढत जाणारा कालावधी पाहता, तसेच कागद आणि छपाईच्या क्षेत्रातील वाढत जाणाऱ्या किंमती पाहता तो निर्णय आधीच घेणं योग्य वाटलं. या संदर्भात गेल्या वर्षा दोन वर्षात अनेक चित्रकार आणि चित्रकारेतर स्नेह्यांशी या संदर्भात सविस्तर बोलणं झालं होतं. सर्वांचाच या निर्णयाला विरोध होता. पण मी मात्र ठाम होतो. चित्रकार प्रभाकर कोलते यांनी एक चांगला पर्याय सुचवला. ते म्हणाले पाहिजे तर 'चिन्ह' बंद कर पण 'गायतोंडे' ग्रंथासारखे ग्रंथ प्रसिध्द करणं थांबवू नकोस. हे असलं काम आपल्याकडे कुणीच केलेलं नाही, कुणी करणारही नाही. त्यामुळे तूच ते करावयास हवं. पेंटिंग करत नाही याचं मुळीच वाईट वाटून घेऊ नकोस. हे जे तू काही केलं आहेस ते पेंटिंग नाही तर दुसरं काय आहे. वर्षा दोन वर्षांनी एखादं तरी पुस्तक जरूर प्रसिध्द कर, जे पुढल्या अनेक पिढ्यांना उपयोगी ठरेल.

शेवटी मी निर्णय घेतलाच. तर इतःपर पुढं 'चिन्ह'चा अंक बंद. पुढील महिन्यात 'गायतोंडे' ग्रंथाचं प्रकाशन होईल. मे-जूनपर्यंत 'निवडक चिन्ह' मालिकेतील 'जे जे जगी जगले' आणि 'व्यक्तीचित्रं पण शब्दातली' हे आणखीन दोन महत्वाकांक्षी ग्रंथ प्रसिध्द होतील. दरम्यानच्या काळात गायतोंडे ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचं काम सुरु झालं आहे. मात्र त्याचं प्रकाशन कधी होईल हे आता तरी सांगता येत नाही. 'निवडक'चे आधी जाहीर केलेले तिन्ही खंड प्रसिध्द झाल्यावर मात्र शक्य झालंच तर 'चिन्ह'मधील निवडक 'आत्मकथनां'चा एक खंड आणि सर्वात शेवटी 'भास्कर कुलकर्णी' यांच्यावरील एक खंड प्रसिध्द करावयाचा विचार आहे. आणि आणखीन शक्य झालंच तर सर्वात शेवटी चित्रकार प्रभाकर बरवे यांच्यावरील ग्रंथ प्रसिध्द करून या अभिनव चळवळीचा शेवट करावा असा विचार आहे. हे सारं उशिरात उशिरा येत्या दिवाळीपर्यंत आटोपावयाचे आहे.

'चिन्ह'चे अंक छपाई न करता ते 'चिन्ह'च्या वेबसाईटवर प्रसिध्द करावे अशा सूचना अनेकांकडून आल्या आहेत येत आहेत. त्या विषयी अद्याप काही नक्की झालेलं नाही पण त्याची जबाबदारी उचलावयास तरुण मंडळी पुढे आली तरचं त्याचा निश्चितपणे विचार केला जाणार आहे. 'गायतोंडे' ग्रंथाच्या प्रकाशन समारंभप्रसंगीच 'चिन्ह फौंडेशन'ची स्थापना होणार आहे. या फौंडेशनचे कार्य चित्रकलाविषयक लेखन आणि संशोधन करू इच्छिणाऱ्या तरुणांना शिष्यवृत्त्या आणि पुरस्कार देऊन प्रोत्साहन देणं हेच आहे. त्यातून जर काही कार्यकर्ते हाती लागले तर 'चिन्ह'चा ऑनलाईन अंक नक्कीच निघेल असे वाटते. या संदर्भात बरेच काही सांगण्यासारखे आहे आणि जसजसे सांगावेसे वाटेल तसतसे ते मी वेळोवेळी सांगणारदेखील आहे. पण तूर्त तरी 'चिन्ह'च्या अंकांचा विषय माझ्या लेखी संपलेला आहे. अर्थात तो संपवण्यासाठी काही गोष्टी करणं मला अत्यावश्यक वाटतं. त्यातली अत्यंत महत्वाची म्हणजे 'चिन्ह'ला एका कपर्दीकेचीही अपेक्षा न करता लेखन सहकार्य तसेच चित्रं किंवा प्रकाशचित्रं देणाऱ्या मंडळींच्या मानधनाचे चेक्स त्यांच्याकडे रवाना करणं. अंक प्रसिध्द करण्याच्या या उरस्फोड खटाटोपात त्यातल्या अनेकांचे मानधन देण्याचं राहिलं, राहून गेलं, किंवा शक्य झालच नाही अशांना ते आता रवाना करीत आहोत. त्याचबरोबर आता हेही जाहीर करू इच्छितो की, चिन्ह'चे सारेच्या सारे जुने अंक (नग्नता वगळता) आमच्याकडून संपले आहेत. त्यासाठी कृपया कुणीही संपर्क साधून आपला (आणि आमचाही) वेळ फुकट दवडू नये. ज्यांना ते वाचायचे असतील त्यांनी ते 'चिन्ह'च्या www.chinha.co.in या संकेतस्थळावर वाचावे. त्यावर सारेच अंक उपलब्ध नाहीत याची आम्हाला कल्पना आहे. ते तिथे लवकरात लवकर कसे उपलब्ध करून देता येतील याबाबतीत आम्ही प्रयत्नशील आहोत.

सतीश नाईक
संपादक, चिन्ह