ज्ञानेश्वर आणि रामदास
‘‘लैलानं गोड मात्र घरून पाठवलं होतं. जेवणानंतर डबा उघडला. प्रकृतीच्या कारणांसाठी ज्ञानेश्वरवर गोडाची बंदी होती. शालिनीचं लक्ष आहे पाहून त्याला मोह आवरावा लागला. जेवणानंतर ती सर्व जायला निघाली तेव्हा ज्ञानेश्वर अमूल्य - शालिनीला म्हणाला, ‘तुम्ही पुढे व्हा, मी कामाचं काही बोलतो आणि एका मिनिटात येतो’. त्यांची पाठ वळते न वळते तो ज्ञानेश्वर म्हणाला, ’अरे काम कसलं, तो डबा उघड’. मला खात्री आहे की आमच्या ऑफिसच्या पायर्या उतरेपर्यंत त्यानं हा आपला पराक्रम शालिनीला सांगितला असणार.”
नाडकर्णींचे असले अक्षरश: शेकडो किस्से ठाऊक असल्यानं, त्यातले काही तर माझ्यासमोर प्रत्यक्ष घडले असले तरी हा किस्सा वाचल्यावरही मी मनमुराद हसलो...
खरं तर ’चिन्ह’च्या यंदाच्या अंकात नाडकर्णींवर मीच लिहायचं ठरवलं होतं. तसं प्लॅनिंगही झालं होतं. मी लिखाणाला सुरुवातही केली होती. किंबहुना नाडकर्णी हयात असतानाच तीनचार वर्षापूर्वी त्या लेखाचा पूर्वार्ध वगैरे मी लिहून ठेवला होता. पण तेव्हा तो लेख प्रसिद्ध करायचं धाडस काही माझ्याच्यानं झालं नाही हे नक्की. नाडकर्णीही सांगायचे ’मी मेल्यावर जे काही लिहायचं असेल ते लिहा’. पण यंदा ’नग्नता’ या विषयाचा पसारा एवढा वाढत गेला की नाडकर्णींवरचा लेख प्लॅनिंगमध्ये असतानाच गळून पडला. तर अन्य तीन-चार प्रदीर्घ लेख तयार झाल्यावरही बाजूला ठेवून द्यावे लागले. त्यामुळे ’चिन्ह’च्या येत्या १४व्या अंकात तो प्रसिद्ध होईल हे निश्चित. आणि नाडकर्णींच्याच स्टाईलने सांगायचं तर, ’’आणि तो लेख विलक्षण गाजेल हेही निश्चित समजा.’’
वैषम्य याचं वाटलं की ज्यांनी ज्यांनी नाडकर्णींकडून आपापल्या अंकासाठी कारणपरत्वे वरचेवर हक्कानं लिहून घेतलं, ते सारेच्या सारे नाडकर्णींना कसे विसरले? अपवाद हा दीपावलीतला लेख, म्हणूनच आवर्जून तो वाचायला हवा. आम्ही आर्टिस्ट्स मंडळी तर त्यांना त्यांनी चित्रकलेवरचं लेखन करायचं सोडलं तेव्हाच त्यांना विसरलो होतो, पण मराठीतल्या अन्य लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचकांचं काय? हा एवढा एक लेखच? असो. जन पळभर म्हणती हायहाय... हेच खरं.
नाडकर्णी ’समोवार’ मधल्या सॅन्डवीचचा मोठा घास घेऊन, ’नाईक, तुम्हाला सांगतो माझं स्थान नरकातच आहे. मी मेल्यावर नरकातच जाणार आहे असं म्हणायचे. त्यावर मी विचारे, का का असं का म्हणता? तर ते म्हणायचे, ’अहो या सार्या भिक्कारxx आर्टिस्ट्स लोकांकडून मी पैसे घेऊन लिहिलंय. त्यामुळे माझं स्थान अन्य कुठे नाही नरकातच आहे’. असं म्हणून कॉफीचा एक मोठा घोट घेऊन ते एकेका आर्टिस्ट्सचा एकेक धमाल किस्सा, साभिनय करून दाखवत.
या विषयी मी आता इथं अधिक लिहिणार नाही. त्यांच्यावरच्या लेखात हे सारं मी लिहिणारंच आहे. पण पुढील मजकूर मात्र लिहायचा मोह मला आता आवरत नाहीये. ’याच आर्टिस्ट्स लोकांनी आणि त्यांनी वेळोवेळी दिलेल्या पैशांनी नाडकर्णींचा घात केला. आर्टिस्ट्सकडून पैसे घेण्याची आर्टिस्ट्स लोकांनी आणि स्वत: नाडकर्णी यांनीच पुरेशी बोंबाबोंब केल्यावर एका बड्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारा त्यांचा कॉलम अचानक बंद झाला. नाडकर्णींना त्याचा खूप मोठा धक्का बसला. त्यांचं सारं आर्थिक गणितच विस्कटलं. पण गंमत म्हणजे पुढे ज्यांनी नाडकर्णींना काढण्याचा निर्णय घेतला ते सारेच पत्रकार, संपादक, लेखक, समीक्षक इतकंच काय तर ते वृत्तपत्रसुद्धा पैसे घेऊन प्रदर्शनाच्या आमंत्रण पत्रिकेवर किंवा कॅटलॉगसाठी लिहू लागले. इतकंच नाही तर पैसे घेऊन बातम्यासुद्धा छापू लागलं. नाडकर्णी मात्र त्या काळात उगाचच बदनाम झाले. कॉलम जाण्याच्या त्या धक्क्यानं नाडकर्णी तेव्हा कोलमडले होते. ते आता चांगलंच आठवतंय.
ते गेले त्याच्या दुसर्या दिवशी सकाळी न रहावून मी जहांगीर आर्ट गॅलरीत गेलो. ‘समोवार’मधल्या ज्या ठिकाणी ते आणि मी रोज सकाळी तासन् तास बसून गप्पा मारत असू त्याच जागेवर बसलो दोन चहा मागवले. एक माझ्यासाठी आणि एक नाडकर्णींसाठी. त्या दिवशी मात्र माझं बिल मलाच द्यावं लागलं. अनेकांकडून चहा, कॉफी, पार्ट्या उकळणार्या नाडकर्णींनी ‘समोवार’मधल्या आमच्या बैठकांचं बिल मात्र मला कधीच भरू दिलं नव्हतं.
हे असं आणखीन मला खूप खूप काही लिहायचंय. पाहूया!
सतीश नाईक
ता. क.- आत्तासुद्धा नाडकर्णी वरून म्हणजे नरकातल्या एखाद्या कॉफीहाऊसमध्ये बसून सकाळचा इडली-वडा ढोसून कॉफी घेऊन हे सारं पहात असतील तर म्हणत असणार. ’रामदासनं हे आधी का नाही लिहिलं?’
Wah Satish ! Dnyaneshwar Nadakarninwar tu changale lihile aahes!Te anekana sahya karanaare thor lekhak va kalasameekshak hote.Pan Sahruday manooshi hote. Tyanchi Marathi Sahitya wishwane nehamich upeksha keli.Tyanche mahattwa lokanna kalale nahi hech khare! Tyanche kisse anekankade aahet...Pan tyanchya changulapanaachya goshtihi khup aahet...tya saanga !
ReplyDelete- Subhash Naik.Pune.