Thursday, November 24, 2011




‘ललित‘चा दिवाळी अंक चाळता चाळता अचानक नजर अभावितपणे एका पानावर थबकली. पाहतो तर काय, तेथे ‘चिन्ह’चा उल्लेख. सुहास भास्कर जोशी यांच्या अमृता शेरगिल वरील लेखात त्यांनी म्हटलं होतं, ‘अमृता शेरगिलची चित्रं मी पहिल्यांदा पाहिली, ती १९८८ च्या ‘चिन्ह’च्या दिवाळी अंकात. या अंकात ललिता ताम्हाणे यांनी शब्दांकन केलेला दीप्ती नवल या अभिनेत्रीचा अमृता शेरगिल आणि तिच्या आयुष्यावरील संभाव्य चित्रपट या विषयावरचा लेख होता. या लेखात अमृताची चित्रं कृष्ण-धवल स्वरूपात छापलेली होती. अर्थातच, रंगाचा अंदाज येत नव्हता. पण तरीही ‘हिल मेन’, ‘हिल विमेन’, ‘ब्रम्हचारी’, ‘प्रोफेशनल मॉडेल’ (न्यूड), ताहितीयन शैलीतलं अमृताचं अर्धअनावृत्त सेल्फ-पोर्ट्रेट, ही चित्रं पाहून मी थरारून गेलो होतो. या लेखात कार्ल खंडालवालांच्या अमृतावरच्या पुस्तकाचा उल्लेख होता. हे पुस्तक मिळवायचंच, असा मी मनाशी निश्चय केला’. वगैरे वगैरे.
हे सारं वाचलं आणि २३ वर्षापूर्वीचे ते भयंकर दिवस क्षणार्धात नजरेसमोरून तरळून गेले. केवढ्या उमेदीनं आणि मेहनतीनं तो अंक आम्ही तयार केला होता. त्याच्याआधीचं सांगायचं झालं तर आदल्याच वर्षी म्हणजे १९८७ साली ‘चिन्ह’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला होता. त्या अंकाला त्या वर्षीची झाडून सारी बक्षिसं मिळाली होती. पु. ल., जयवंत दळवींपासून सर्वांचीच वाहवा त्या अंकानं मिळवली होती. पण अंक उशिरा प्रसिद्ध झाल्यानं सगळंच गणित फिस्कटलं होतं आणि सपाटून मार पडला होता. (ज्यांना याविषयी अधिक जाणून घ्यावयाचे असेल त्यांनी ‘निवडक चिन्ह‘चं प्रास्ताविक वाचावं. त्यासाठी ते पुस्तक खरेदी करण्याचीही गरज नाही. http://www.chinha.in/ या संकेतस्थळावरही ते वाचता येईल. असो.) त्यामुळे दुसरा अंक काढण्याची कल्पनाच रद्द करून टाकली होती. पण ठाण्याच्या अरविंद आणि अरुण दातार या बंधूंनी ती हाणून पाडली आणि त्याला भरीस पडून दुसरा अंक मी पुन्हा काढला. पुन्हा तेच आदल्या वर्षीचे कष्ट, तीच मेहनत, तेवढाच किंबहूना त्याच्यापेक्षा जास्त आटापिटा करून अंक तयार केला. पण छपाईसाठी वापरल्या गेलेल्या भयंकर कागदानं या सार्‍यांवर बोळा फिरवला. इतका की छापून आलेली प्रत उघडून पहावयाचीसुद्धा इच्छा झाली नाही. वर्षा-दोन वर्षापूर्वी म्हणजे तब्बल वीसएक वर्षांनी ‘निवडक चिन्ह’च्या निमित्तानं मी त्या अंकाची प्रत पहिल्यांदा उघडून पाहिली.

पहिल्या अंकाप्रमाणे हाही अंक उशीराच प्रसिद्ध झाला होता. आणि हाही अंक सपाटून आपटला होता. विकल्या गेलेल्या किंवा रद्दीत गेलेल्या प्रतींपैकी एक प्रत डॉ. सुहास भास्कर जोशी यांच्या हाती आली असावी आणि त्या अंकातल्या अमृता शेरगिलवरच्या लेखानं ते प्रभावित झाले असावेत. आणि जवळ जवळ २२-२३ वर्षानंतर त्यांनी आठवणीनं त्यांनी ‘चिन्ह’चा उल्लेख करून अमृता शेरगिलवरच्या विवान सुंदरम यांच्या द्विखंडात्मक पुस्तकांवर अतिशय सुरेख असा लेख लिहावा, हे सारंच विस्मयचकीत करणारं तर आहेच पण सुखावणारंही. मनापासून आणि अतिशय प्रामाणिकपणानं केलेली कुठलीच गोष्ट वाया जात नाही, त्याची बीजं कुठं कुठं रुजली जात असतात. या उक्तीचा प्रत्यय देणारी.

‘निवडक चिन्ह’चा पहिला खंड प्रसिद्ध झाल्यापासून हे असेच क्षण वारंवार अनुभवावयास मिळताहेत. पण १९८७-८८ साली हे अंक प्रसिद्ध करताना ज्या दिव्यातून मला आणि माझ्याशी संबंधित सार्‍यांनाच जावं लागलं. त्या कटू आठवणी आजही नकोशा वाटतात. ‘चिन्ह’च्या बाबतीत आज जे काही घडले आहे किंवा घडते आहे ते सारंच स्वप्नवत आहे. हे असं काही घडेल याची पुसटशीही कल्पना तेव्हा आली नव्हती, अगदी स्वप्नातसुद्धा, हे मात्र इथं कबूल करावसं वाटतं. आता सतत मागणी होते ती ‘निवडक चिन्ह‘च्या दुसर्‍या पर्वातल्या खंडांची. त्याचीच तर जुळवा जुळव आता होऊ घातली आहे.

सतीश नाईक

जाता जाता... डॉ. सुहास भास्कर जोशी यांचा अमृता शेरगिलवरचा लेख चित्रकलेविषयी आस्था असणारे वाचतीलंच पण चित्रकलेशी संबंधितांनीही तो आवर्जून वाचायलाच हवा.

No comments:

Post a Comment