Monday, November 28, 2011


‘अ‍ॅडल्ट नसून कलात्मक फिल्म’

‘चिन्ह’च्या नग्नता विशेषांकावर वाचकांकडून सातत्यानं प्रतिक्रिया येत असतात. कलावंताकडूनच नाही तर सर्वसामान्य वाचकांकडून या अंकाला जसा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. त्या सर्वांच्याच प्रतिक्रिया आम्ही या ब्लॉगवरून सादर करीत आहोत. अशीच एक प्रतिक्रिया जळगाव मधील चित्रकार शिल्पकार अतुल मालखेडे यांची.


मा. श्री. सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह’
सप्रेम नमस्कार.



खूप दिवसांपासून आवडत्या ‘चिन्ह’ अंकाची वाट बघत होतो. खरे तर ‘चिन्ह’च्या बाबतीत नेहमीच उत्सुकता लागलेली असते. नेहमी एक नविन विषय घेऊन त्याचं संशोधन आपल्या ‘चिन्ह’च्या माध्यमातून घडत असतं. ‘नग्नताः चित्रातली आणि मनातली’ हा अनोखा पण सर्वच कलारसिकांच्या मनाची घंटी वाजवणारा विषय या माध्यमातून कलारसिकांच्या समोर आला. नग्नतेतील सौंदर्य सामान्य रसिकांना पटवून देताना प्रत्येक कलावंताची खूप दमछाक होत असते. पण आता ती ‘चिन्ह’च्या माध्यमातून पूर्ण झाली असेल यात शंका नसावी. त्यास्तव आपलं खूप खूप अभिनंदन.

श्री. रणजित देसाई यांच्या ‘राजा रविवर्मा’ या कादंबरीत एक नग्नतेविषयी वाक्य आहे. ‘न’ म्हणजे नाही आणि ‘ग्न’ म्हणजे चिकटलेला (अर्थात वासनेला) मग ती वासना कोणत्याही प्रकारची असो. ‘चिन्ह’ या अंकात नग्नतेसंदर्भात केलं गेलेलं समीक्षणात्मक विचार मंथन खूप प्रभावी ठरलं. सदर अंक वाचनीय आहे पण त्याचबरोबर विचारांनाही विचार करायला लावणारा आहे.

नग्नतेसंदर्भात आपण संपादक या नात्यानं प्रत्येक अंगास स्पर्श केलात. आपली भूमिका अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहे. संपादक म्हणून आपला विश्लेषणात्मक शोध खूप भावला. अंकात सर्वच मान्यवरांचे लेख आकलनीय व बोधप्रदान आहेत. चित्रकार हुसेन यांचे वरील कोलते सरांचे लिखाण नेहमीप्रमाणे अप्रतिम आहे. त्याचप्रमाणे हुसेनसारखा कलावंताला देश गमावतो तेव्हा देशाचं, समाजाचं आणि चित्रकारांचंही कसं नुकसान होतं याचं स्पष्टीकरण अगदी परखडपणे मांडून कलावंताला गमावताना सर्वांनाच विचार करायला भाग पाडलं आहे. आणि कलावंत हा नेहमीच जात, धर्म आणि राजकारण यांच्या पल्याड असतो हे दाखवून दिलं आहे.

सुहास बहुळकर सरांचं अध्यापन करित असतानाचे अनुभव, प्रसंग, त्यांनी मांडलेले विचार या अंकात समाविष्ट नसते तर मला वाटते हा अंक अपूर्ण राहिला असता.

अंकात चित्ररुपानं सजवणारी देवदत्त पाडेकर यांची न्यूड अंकाला पूर्णत्वास नेतात. त्याचबरोबर ज्येष्ठ चित्रकारांची दुर्मिळ न्यूड पेंन्टिग एकत्र करून केलेला एकसुत्रीतली सांगड ही तर आपल्या कल्पकतेची दादच म्हणावी.

अंकाच्या दोन मुखपृष्ठाचा इतिहास खूप भावला. मुखपृष्ठाला संपादक म्हणून योग्य बिंदूत साधलं आहे.



नग्नतेच्या संदर्भात माझा अनुभव सांगावासा वाटतो. मी स्टुडिओत एक न्यूड शिल्प साकारलं होतं. अशाच एका कलानिरक्षर गृहस्थानं मला प्रश्न केला तुम्ही सर्व कलावंत अशी नग्न कलाकृती का करता? मी आपलं, ‘हा तर आमच्या फिगर स्टडीचा अविभाज्य घटक’ असं प्राथमिक उत्तर दिले. त्यांना ते पटलं नाही. ते म्हणाले, ‘पण त्यानं बघणारांच्या भावना जागृत होतात’. मी आतून चिडलोच आणि त्यांना माझ्या शैलीत सांगितलं, ‘तुम्हाला त्यात वासना दिसते आम्हा कलावंताना नाही. खरं तर वासना ही बघणा‍र्‍यांच्या मनात आणि दृष्टीत असते. आम्हाला त्यात निखळ सौंदर्य दिसतं. माझं उत्तर ऐकून त्यांनी मला प्रणाम केला आणि लाजिरवाणे होवून निघून गेले.

एकंदरीत समाजातील बुरसटलेली वासना आपण अचुकपणे समोर आणून कलारसिकांच्या मनातील वासना दूर केली आहे यात शंकाच नाही.

आपला अंक ‘अ‍ॅडल्ट फिल्म नसून कलात्मक फिल्म’ आहे.
आपल्याला खुप खुप शुभेच्छा.....
       
शिल्पकार, चित्रकार
प्रा. अतुल मंगेश मालखेडे                                            
सप्तपुट ललितकला भवन, खिरोदा,              
ता. रावेर, जि. जळगाव.        
                     

2 comments:

  1. असा वैचारिक घोळ सर्वत्रच दिसून येतो. मागे एक अहमदाबादेत गेलो असताना एक (प्रसिद्ध) स्थायी शिल्प प्रदर्शन पाहिले. त्यातील मानवी पुतळ्यांना त्या शिल्पकाराने लैंगिक अवयवच बनवले नव्हते. संकोचला असेल बहुदा सभोवतालच्या समाजाला.

    जन्म घेणे, देणे हे पवित्र समजले जाते. पण ज्यामुळे मानवाचा जन्म होतो ती लैंगिकता अजूनही तुच्छच समजली जाते.
    मोठे आश्चर्य आहे !!

    ReplyDelete