Monday, November 14, 2011


हसता हसता मुरकुंडी वळली...
नग्नता अंकावर एक वेगळीच प्रतिक्रिया

‘चिन्ह’चा अंक प्रसिद्ध झाल्यावर धडाधड खूप फोन आले आणि एसएमएसही. त्यांत अर्थातच अंक प्रथमदर्शनी आवडल्याच्या प्रतिक्रिया होत्या. आता हळू हळू अंकाविषयीच्या लिखित प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आणि त्या खरोखरच भन्नाट आहेत. त्यामुळे त्या जशाच्या तशा द्यायचा निर्णय घेतला. त्यातली ही एक अफलातून प्रतिक्रिया जुन्नरच्या सावित्री जगदाळे यांची. सावित्री जगदाळे या स्वत: एक लेखिका आहेत. जुन्नरसारख्या आडगावी त्यांचं वास्तव्य आहे. पण महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा ट्रॅक त्या ठेऊन आहेत. म्हणूनच त्यांचं हे पत्र ‘चिन्ह’ला विशेष महत्त्वाचं  वाटलं. सोबत त्यांच्या ब्लॉगची लिंक म्हणूनच जोडली आहे. - संपादक 


स. न. वि. वि.
‘चिन्ह’चा अंक मिळाला. विषय माहित असल्यामुळे माझा नवरा घरात नसताना अंक मिळावा अशी मनोमन प्रार्थना करत होते. पण ते घरात असतानाच पोस्टमन आला. एरवी त्यांनी फार उत्सुकता दाखवली नसती पण ह्या अंकाचे पैसे बँकेत भरले असल्यामुळे अंक उघडून बघितला. मी म्हटलं तरी, ‘नका बघू चांगला नाही’. मग तर घाईनंच उघडला. माझा नवरा सनातनी विचारांचा. त्यात पोलिस उपअधिक्षक. वर्तमानपत्र आणि क्राईम रिपोर्ट याशिवाय वाचन नाही. मग काय... असला फालतू अंक दिलाय? वगैरे, वगैरे...

एवढं सोवळं वातावरण घरातलं, विषय माहित असून, किंमत जास्त (इतर अंकापेक्षा) असून, मी हा अंक का मागविला असेल हा प्रश्न कुणालाही पडेल. मला या विषयावरचे विचार जाणून घ्यायचे होते. मला स्वतःला या विषयाचा तिटकारा आहे. सभ्यता म्हणजे जास्तीत जास्त अंग झाकणे, वगैरे विचारांचे संस्कार. वागणंही तसंच. तेच चांगलं वाटतं. पण मग मला नग्नतेची स्वप्न का पडतात. म्हणजे मी नागडीच आहे आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांशी सहज वागणं, बोलणं, काम करणं. असं स्वप्नात दिसायचं, दिसतं. दुसरे लोक नेहमीच्या सहजतेने कपड्यात मीच तेवढी नागडी. या माझ्या नागडेपणाचं कुणाला काय वाटत नसे. स्वप्नातून जागी झाल्यावर मात्र शरमल्यासारखं वाटतं. का पडत असतील अशी स्वप्न? मला फार आकर्षण आहे अशातला भाग नाही. लहान मुलं सोडली तर नागडेपणाची किळसच येते. मला स्वत:लाही कधी पूर्ण बघावसं वाटत नाही. मग अशी स्वप्न का पडत असतील. कुठेतरी वाचलं नग्नतेची स्वप्न पडणं म्हणजे मुक्ततेची ओढ असणं असतं. तेव्हा बरं वाटलं. पण आणखी एके ठिकाणी वाचलं एका पुरुषाला अशी स्वप्न पडत होती. नंतर कळलं की त्याचं बाहेर अफेअर आहे. माझं तर तसं काही नाही. सांसारिक सुख चांगलं आहे. मग का अशी स्वप्न पडत असतील?

मी साधी, सामान्य गृहिणी आहे. आठवीपर्यंत शिक्षण झाल्यामुळे लिहिता वाचता येतं. मला ‘चिन्ह’ या अंकातल्या चित्र आणि लेखाविषयी फार काय कळलं असं नाही. सर्वसामान्य डोळ्यांना जे दिसलं, वाचल्यावर थोडाफार विचार केला एवढंच. मी पुण्यात फार कमी काळ होते. पण तरीही चित्र प्रदर्शन बघायला जाणं जमत नसे. तशी फार आवडही नाही. माझ्या मुलीच्या कॉलेजच्या प्रदर्शनाला दोनदा गेलेले. ती पुण्याच्या अभिनव कॉलेजमधून (पाषाण) कमर्शियल आर्ट झाली आहे. ‘न्यूडस’बद्दल ती कधी काय बोलली नाही. माझं लहानपण खेड्यात गेलं. तिथे नग्नता फार दुर्मिळ नसते. उघड्यावर आंघोळ करणं, संडासला बसणं, दहा-अकरा वर्षाची मुलं उघडी नागडी फिरणं, काम करताना बायकांनी मांड्या दिसतील एवढा कासोटा घालणं. मुलांना कुठेही अंगावर पाजणं. वगैरे गोष्टी सहज असतात. उघडेपणाचा फार बाऊ नसतो. शिव्या तर जाता येता सहज कानावर पडतात. त्यामुळे ‘ओलेती’सारखं चित्र अश्लिल वगैरे अजिबात वाटलं नाही. उलट खूप आवडलं. असं चित्र काढायला किती अवघड असेल. लग्न झाल्यावर शहरात राहू लागले. थोडं वाचू लागले. तेव्हा कपड्याच्या बाबतीत जागृत झाले. जास्तीतजास्त अंग झाकतील असे कपडे घालणं म्हणजे घरंदाज, सभ्यपणाचं असतं असं माझं मत झालं. (आणि त्यामुळे त्वचारोग होऊ शकतात हेही कळालं.) खेड्यात गुरं वगैरे पाळीव प्राण्यांबद्दल सगळीच बाया, बापे सहज बोलतात. खेड्यात कलेशी संबंध तसा फारसा येत नाही. जात्यावरच्या ओव्या तर संपल्याच आहेत. पण वीणकाम, भरतकाम, गोधडी शिवणं, हेही फारच कमी झालंय. ‘भर पोटा जा दिसा’ असंच चाललेलं असतं.
नग्नता ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्यात अश्लिलता, पाप वगैरे काही नाही. पण मला अशी स्वप्न का पडत असतील या प्रश्नाचं फार समाधान झालंय असं नाही. अजून याबद्दल खूप वाचावसं, बोलावसं वाटतं. बोलणं तर शक्य नाही. पण मिळेल तसं वाचायची इच्छा आहे.

न्यूड्स कधीतरी एखाद्या दिवाळी अंकात बघितलेलं. पहिल्यांदाच ‘चिन्ह’मध्ये एकत्रित एवढी न्यूड्स बघितली. न्यूड्स बाईचीच जास्त का? मलाही पुरुषांपेक्षा बाईची काही न्यूड्स आवडली. पाठमोरी वेगवेगळ्या पोजमधली. चेहर्‍यावर निरागसता, आत्मनग्नता, कोवळीकता असे भाव असलेली न्यूड्स चांगली वाटली. जुन्या भारतीयांनी काढलेली न्यूड्स निबर, बटबटीत वाटली.

सुहास बहुळकर यांचा प्रदीर्घ, प्रगल्भ लेख खुपच आवडला. अवघड विषयावर फारच सोपेपणाने, मोकळेपणानं त्यांनी अभ्यासपूर्ण गप्पा मारल्यात. पुण्यावर लिहिलेलं वाचताना हसता हसता मुरकुंडी वळली. माझी लेक न्यूड्स बद्दल कधीच का बोलली नाही, ते कळाल. सांगली, कोल्हापूर या ग्रामीण शहरात मात्र न्यूड्सवर काम होतं, याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. ज्योत्स्ना, संभाजी कदम यांच्याबद्दल वाचल्यावर मन हेलावून गेलं. कलावंत माणसं एवढी प्रामाणिक आणि पवित्र (माझ्या कल्पनेप्रमाणे) राहू शकतात? मी ज्योत्स्ना कदम यांचं ‘सर आणि मी’ हे पुस्तक वाचल्यावर अशीच भारावून गेले होते. त्या पुस्तकातील न्यूड स्केचेस खूपच छान वाटली होती. त्यामुळेही नग्नतेबद्दलचा तिटकारा कमी झाला होत. म्हणूनच ‘चिन्ह’चा अंक मागवताना खंबीरपणा दाखवता आला.

लिहिताना मीही या अशा गोष्टीशी अडखळते, थबकते, तसे शब्द शक्यतो टाळते. काही कविता तर मी समाधानकारक झालेल्या असूनही फाडून टाकल्या आहेत. वाटायचं चुकून कोणाच्या हाताशी आलं तर? माझ्याबद्दल माझे लोक काय विचार करतील? पण ‘सर आणि मी’ वाचल्यावर बरंच धारिष्ट्य आलं. नवर्‍यालाही गोड बोलून थोडा थोडा भाग वाचून दाखवला. कदमांनी या विषयावर पुस्तक का नाही लिहिलं? असो. सु्हास बहुळ्करांच्या लेखाने पोट भरलं. प्रकाश कोठारी यांनी मात्र मोठं काम करून लेख फारच छोटा लिहिला. त्याचं मराठीत पुस्तक आहे का? त्यांनी आणखी लिहावं. लैंगिक शिक्षण मुलांना द्यावं का देऊ नये, दिलं तर कसं द्यावं या गोष्टीबद्दल अजून गोंधळलेली स्थिती आहे. या विषयावर ‘चिन्ह’नं विशेषांक काढावा. नग्नतेबद्दलचे गैरसमज, लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे सध्या तरी किती नुकसान होतंय समाजाचं, कळतंय का कुणाला? आपला समाज फालतू बंधनात किती जखडलाय. मन फार उद्विग्न होतं. अशी एवढी बंधन का आली असतील? ‘पहिली जाग’ ही सुनील गंगोपाध्याय यांची कादंबरी वाचली. त्यात इंग्रजांच्या काळात ब्लाऊज घालायची पद्धत सुरु झाली, असा उल्लेख आहे. तिकडे मोगलाईच्या झळा नसल्यामुळे असेल का? माझ्या नात्यातल्या एका बाईला झोपताना चोळी काढून झोपायची सवय होती. लैंगिकता, नग्नता या गोष्टी पुस्तकात किंवा चित्रात मात्र जास्त प्रभावी वाटतात. म्हणूनच पुस्तकांशी संबंधित लोक याचा जास्त बाऊ करत असतील?

मोनोलॉग वाचला. खूप भारावून गेले... स्वतःला मुक्त करण्याची निकड असल्यावर आपल्यात तेवढी ऊर्जा निर्माण होत असावी. अनुभवांकडे कसं बघतो यावर जगणं अवलंबून असतं. मी बाईची जात, असं कसं करू वगैरे रडगाणं गात बसलं की काहीच होत नाही. किंवा आपल्या माणसांना आवडत नाही तर कशाला करावं वगैरे... विचारवंत कुटुंबासाठीचा त्याग समजून स्वत:लाच दाबून, दडपून टाकणे, कोंडून ठेवणे चाललेलं असतं. या सगळ्याची मानसिक, शारीरिक, धार्मिक छळ करत असते. बाई जरा मोकळेपणाने वागली, बोलली की ती छिनालच आहे असा शेरा मारून मोकळे होतात सनातनी विचारांचे पुरुष. बरं छिनाल म्हणजे काय? पुरुष तसे वागले तर त्यासाठी कुठला शब्द आहे? कोर्‍या पाटीवरचे संस्कार खूप खोलवर गेलेले असतात. माझ्याकडे लोकांनी चांगल्याच दृष्टीकोणातून बघावं ही अपेक्षा स्वत:कडूनच केली जाते. त्यासाठी सभ्यता, सोज्वळता या गुणांची पांघरुण घेणं चाललेलं असतं. मोनाली मेहेर या मानसिकतेतून मुक्त झालेल्या आहेत. असा मुक्त कलाकार विश्वव्यापी असतो. हेच त्यांनी सिद्ध केलंय. आमच्यासारख्यांसाठी त्यांच्या काही परफॉर्मन्सेसचे फोटो दिलेत त्यांचे अर्थ सांगायला हवं होतं. ज्या परफॉर्मन्सचे अर्थ सांगितले आहेत तेवढेच कळाले, आणि खूप चांगलं वाटलं. बाकी लेख चांगलेच आहेत. स्वत:ला काय वाटते यापेक्षा समाजाला काय वाटेल याचाच जास्त विचार काहींनी केलेला दिसतो. चित्रकार हुसेन यांच्या ज्या चित्रांवरून त्यांना देश सोडावा लागला, त्यापैकी एखादं चित्र अंकात आलं असतं तर बरं झालं असतं. बाकी अंक चांगला होता असं म्हणावं वाटतं... पण अजून तरी पचनी पडला नाही. विशेषत: त्यातील चित्रं. यापेक्षा जास्त काय लिहिणार?
कळावे
धन्यवाद.
सावित्री जगदाळे
http://savitrijagdale.blogspot.com/


ज्यांना ‘चिन्ह’ला प्रतिक्रिया कळवाव्याशा वाटतात त्यांनी त्या जरूर कळवाव्या. ‘चिन्ह’च्या ब्लॉगवर त्या प्रसिद्ध करूच पण बहुदा याच अंकाच्या पुढल्या आवृत्तीतही त्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया बिनधास्त कळवा. अंक आवडला नसेल, खटकला असेल, तर तेही तसंच कळवा.

या अंकाच्या प्रतीसाठी ‘चिन्ह’च्या 90040 34903 या मोबाईल नंबरवर ‘1 m copy’ एवढाच एस.एम.एस. टाईप करून हा अंक स्पीडपोस्टनं मागवता येतो. तिसरी आवृत्ती देणगीमूल्य रु. ६००/-.



अंकाचा प्रोमो पाहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा:
http://chinha.in/marathi/index.html


2 comments:

  1. अतिशय सुंदर प्रतिक्रिया आहे सावित्री जगदाळे यांची. ती प्रकाशित केल्याबद्दल आभार!

    ReplyDelete