Monday, November 7, 2011


त्याने फूलझाड लावू नये...
अर्थात आठवले, माड्गुळकर आणि संत तुकाराम...


 एकदा आर्टिस्ट सेंटरमध्ये चित्रकार रझा यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सर्व चित्रकार मंडळी रझांशी गप्पा मारत बसलो होतो. गप्पा मारता मारता अचानक काहीतरी विषय निघाला आणि चित्रकार रझा थेट गाऊ लागले. आऽऽधी बीज ऐकले... आणि मग तुकारामांविषयी बोलू लागले. तुकाराम म्हणजे संत तुकाराम. उपस्थित चित्रकार मंडळी हैराण. आणि तरुण चित्रकार मंडळी तर आवाक्. रझा आणि तुकारामावर बोलताहेत वगैरे वगैरे. मला मात्र राहवेना. मी मध्ये तोंड घातलंच आणि म्हणालो, ’माफ करा रझा साहेब, हा अभंग तुकारामांचा नाही’. हे ’संत तुकाराम’ या चित्रपटातलं शांताराम आठवले यांनी रचलेले गीत आहे. हा तुकारामांचा अभंग नव्हे. हे मी म्हटलं आणि तेथे सन्नाटाच पसरला. कारण कुणालाच काही ठाऊक नव्हतं. त्यानंतर ते सारं समजावून देणं, शांताराम आठवले म्हणजे कोण? कसा गैरसमज पसरला आणि कसा तो दूर झाला. हे सारं समजावून सांगणं अर्थातच मलाच करावं लागलं.

 तसंच काहीसं आताही घडलंय. तिथंही योगायोगानं पुन्हा तुकारामच आहेत. ’चिन्ह’चा ’नग्नता : चित्रातली आणि मनातली’ विशेषांक प्रसिद्ध झाला आणि एके दिवशी दुपारी कोल्हापूरहून राम देशपांडे यांचा फोन आला. ’अंक अप्रतिम आहे, सुंदर आहे पण अंकात एक मोठी चूक आहे.’ हे त्यांचं वाक्य ऐकलं आणि माझ्या छातीत धस्स झालं. आता काय पुढं ऐकावं लागणार याचा काही अंदाज येईना पण त्यांनी फारसं ताणून धरलं नाही आणि म्हणाले ’मेघना पेठेंचा लेख अप्रतिम आहे पण लेखात एक मोठी चूक झाली आहे, ती म्हणजे लेखाच्या शेवटी त्यांनी ’’अंगी नाही बळं, दारी नाही आड, त्याने फुलझाड लावू नये.’’ ही ओवी तुकारामांच्या नावे घातली आहे ती चूक आहे. ती ओवी तुकारामांची नव्हे. ती आपल्या गदिमांची करामत आहे. गदिमा म्हणजे (ग. दि. माडगूळकर). गदिमांच्या ’आकाशाची फळे’ या कादंबरीचा शेवट त्यांनी याच ओळींनी केला आहे. याच कादंबरीवरून पुढं ’प्रपंच’ हा बहुचर्चित चित्रपट तयार झाला’. देशपांडे बोलतंच होते. शेवटी मीच त्यांना थांबवलं म्हटले ’हे सारं लिहूनच पाठवा’. पुढल्या अंकात (म्हणजे पुढल्या वर्षी) छापूच पण त्याआधी ब्लॉगवर प्रसिद्धी देऊ म्हणजे त्यातून आणखीन गैरसमज उद्भवणार नाहीत. देशपांडेही कबूल झाले.

 त्यांनी लगेचच एक पत्र पाठवलं. ते पत्र मग मेघनाला मेल केलं. देशपांड्यांच्या पत्राआधी मेघनाशी विस्तृत बोलणं झालंच होतं. तीही अतिशय अस्वस्थ झाली होती. कधी नव्हे तो तिचा फोन ठेवल्यावर पुन्हा फोन आला होता वगैरे. ’माझा काही संत साहित्याचा अभ्यास नाही’. लहानपणापासून वडिलधार्‍यांकडून जे कानी पडत गेलं त्यामुळं कदाचित ती चूक माझ्याकडून झाली असावी वगैरे.

 राम देशपांड्यांचं ते पत्र मग मेघनाला पाठवलं. मेघनानंही खुलासा केला. ते दोन्हीही सोबत प्रसिद्ध करत आहोत. पण हे करताना दिवाळीच्या गडबडीमुळे म्हणा किंवा ‘नग्नता’ अंकाच्या विशेष आवृत्तीच्या तयारीत असल्यामुळे म्हणा हे सारं ब्लॉगवर टाकण्यास बराच उशीर झाला. आणि त्यामुळे होऊ नये ते घडलेच. ‘दै. लोकसत्ताच्या दि. २ नोव्हेंबरच्या अंकातील चंद्रशेखर ठाकूर यांच्या लेखाचं शीर्षक हेच आहे.... त्याने फुलझाड लावू नये. लेखाच्या शेवटी ती ओवीही दिली आहे, मात्र तिचा तेथे ‘अभंग’ झाला आहे. हे वाचलं मात्र आणि वरिल खुलासा आम्ही लगेच छापण्याचा निर्णय घेतला. तोच हा ब्लॉग.



प्रिय सतीश,

राम देशपांड्यांचं यांच पत्र वाचलं.

‘चिन्ह’मधल्या लेखात मी शेवटी वापरलेली ओवी तुकारामाची आहे किंवा काय याबद्दल मी कुठलीही शहानिशा केलेली नव्हती. तशी ती न करता त्या ओवीला अनवधानानं तुकारामाची म्हणून वापरणं धांदात चूक आहे. त्याबद्दलची सर्व जबाबदारी घेऊन मी बिनशर्त माफी मागते.

‘आकाशाची फळं’ ही गदिमांची कादंबरी मी वाचलेली नाही. तरीही राम देशपांड्यांनी पत्र लिहून ही ओवी त्यातली (आणि म्हणून गदिमांची) आहे आणि तुकारामाची नाही हे कळवलं आहे, तर त्यांनी अर्थातंच ती शहानिशा केलेली असणार असंही मी मानते.

माझी चूक दुहेरी आहे. ती ओवी तुकारामाची नसताना तुकारामाच्या नावाचा वापर होण्याची चूक आणि ज्या कवीची ती ओवी आहे त्या गदिमांच्या नावाचा उल्लेख न झाल्यामुळे त्यांचं श्रेय त्यांना न मिळण्याबद्दल झालेली चूक. या दोन्हींबद्दल मी दिलगीर आहे. अनवधान आणि आळस या दोन गोष्टींमुळे माझ्याकडून झालेल्या या मूर्ख चुकीचं कुठल्याही तर्‍हेने समर्थन होऊ शकत नाही आणि ते करावं असं मला वाटलेलंही नाही. मात्र कवी बदलला म्हणून त्या ओवीचा जो अर्थ मला अभिप्रेत होता तो बदललेला नाही हे ही मी स्पष्ट करते आहे.

ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल श्री. राम देशपांडे यांची मी ‌‌‌‌ॠणी आहे. त्यांना माझे धन्यवाद कळवावेस.
या अंकाची पुढील आवृत्ती जेव्हा/जर काढशील, तर त्यात या चुकीची दुरूस्ती अपेक्षित आहे.
सर्व शुभेच्छा.

- मेघना


ता. क. या निमित्तानं आणखीन ज्या दोन चुका आम्ही केल्या आहेत त्यांचीही कबूली देऊन टाकतो.
 १. चित्रकार गोगॅ हा सोळाव्या शतकातला नव्हे, एकोणीसाव्या.
 २. मोनालिसा ही व्हिन्सीची. मायकेल ऍन्जेलोची नव्हे.
 या दोन्ही चुका अक्षम्य आहेत त्यामुळे माफी वगैरे मागण्याच्या भानगडीत आम्ही पडत नाहीयोत.

सतीश नाईक

No comments:

Post a Comment