या अंकानं मनातलं नागडेपण दूर केलं...
‘जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट’चे माजी अधिष्ठता ‘मंगेश गो. राजाध्यक्ष’ यांना ’चिन्ह’चा अंक पोहोचताच अक्षरश: आठवड्याभरात अंकाविषयीचा आपला अभिप्राय लिहूनच पाठवला. तोच येथे देत आहोत.
’चिन्ह’ ब्लॉगच्या वाचकांना जर अंकाविषयी आपलाही अभिप्राय लिहून पाठवावा असं वाटत असेल तर त्यांनी तो जरुर पाठवा. कुठलीही काटछाट न करता आम्ही तो येथे प्रकाशित करू.
: संपादक ’चिन्ह’ ब्लॉग
मंगेश गो. राजाध्यक्ष |
हा अंक व विषय सतीश नाईकांनी जेव्हां जाहीर केला, तेव्हा काही धर्ममुखंडांचं ‘अब्रम्हण्यंम’ सुरू झालं. वृत्तपत्रातून बातम्या येऊ लागल्या. नाईकांना धमक्यांचे, शिव्यांचे फोन व पत्रं (पोस्टकार्ड) यायला सुरूवात झाली. ती पत्रं त्यांनी ‘चिन्ह’च्या ब्लॉगवर टाकली. कोणत्याही सुसंस्कृत माणसानं वापरले नसतील असे भयानक शब्द या हिंदू संस्कृती रक्षकांनी वापरले होते. बाकी या लोकांना नग्नता, नागवेपण याचं सोयरसुतक नव्हतं. पण या अंकातला एक लेख चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांच्यावर होता व आधीच हुसेन हे हिंदू देवदेवतांची नग्न चित्रं रेखाटून वादाच्या भोवर्यात अडकले होते आणि लोकांचा रोष ओढवून घेवून ते भारतातून परागंदा झाले होते. आणि या अंकामध्ये याच हुसेन यांचं उदात्तीकरण त्यांच्या नग्न चित्रांसहीत करणार असल्याची भावना विरोधकांची होती. हा अंक प्रसिद्ध व्हायला देणार नाही, हा जणू चंगच त्यांनी बांधला होता. अन मनांत जरा चर्र झालं. वाटलं कसं काय एकाकी लढत देणार सतीश या सर्वांना! याला कारणही तसंच होतं. अवधूत गुप्तेचा ‘झेंडा’ न फडकण्याच्या मार्गावर होता. शेवटी त्यानी आवश्यक ते बदल करून आपला ‘झेंडा’ फडकवला. महेश मांजरेकरांच्या ‘शिक्षणाच्या आयचा घो’ या त्यांच्या नावाला मराठा महासंघानं आक्षेप घेतला पण मांजरेकर ठाम राहिले. वेळ आली तर महाराष्ट्र सोडूनही जाईन ही घोषणाही त्यांनी केली. पण शेवटी विरोधकांना चित्रपट आधी दाखवून चित्रपटाच्या आरंभी टायटल टाकून त्यांनी आपला मार्ग मोकळा केला. आता प्रकाश झा हे देखील आपल्या ‘आरक्षण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी या प्रकारच्या दिव्यातून जात आहेत. या अशा घटना घडलेल्या असताना सतीश नाईक या झुंडशाहीला कसं काय तोंड देणार हा विचार क्षणभरच माझ्या मनात आला. पण दुसर्याच क्षणी मला आठवलं ते सतीश नाईक ज्यांना मी कित्येक वर्षांच्या सहवासानं आरपार ओळखतो, असे कैक प्रसंग त्यांनी एकट्यानं निभावले होते. आणि या वेळीही तसंच घडलं. एक नितांत सुंदर अशी कलाकृती त्यांनी ‘चिन्ह’च्या रूपानं सादर केली. आणि लोकांच्या मनातील नागडेपण दूर केलं.
न्यूड ड्रॉइंग्ज अथवा पेंटिंग्ज हा चित्रकाराच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. शरीर सौष्ठव रचना हा मूलभूत पाया मानला जावा. मग तो चित्रकार असो वा शिल्पकार. आणि या नग्नतेमध्ये चित्रकार पहातो ते केवळ निखळ सौंदर्य, मनाला निर्भेळ आनंद देणारे. यामुळेच मायकेल अँजेलोचा डेव्हीड पहाताना आपण त्यात केवळ सौंदर्यच पहातो. हीच गोष्ट जाणवते ती पॅरिसचा जगप्रसिद्ध ’कॅबरे’ पाहताना. स्टेजवर आलेल्या तरुणी नृत्य करत असतानाच आपले वरचे वस्त्र काढून टाकून स्वत:चे स्तन उघडे करतात. नृत्य चालूच असतं. पण त्यात कामुकता नसते. असते ते केवळ अवखळ, निष्पाप सौंदर्य. जणू काही गोड बाहुल्याच अनावृत्त होवून नाचताहेत. व या सौंदर्याचा आस्वाद सर्व स्त्री-पुरूष घेत असतात. आता ज्या लोकांनी हा कॅबरे पाहिलेला नसतो, ते केवळ ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून या नृत्यप्रकाराला नाकं मुरडतात. आणि नेमकं हेच ‘चिन्ह’च्या या खास अंकानं दाखवून दिलं आहे.
अंकातील सर्वच लेख वाचनीय अन बोधप्रद आहेत. विशेषत: चित्रकारांबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून या विषयावरची त्यांची मतं घेवून संपादकांनी कल्पकता दाखवून दिली आहे, याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच! अर्थात या अंकातील चित्रकार हुसेन यांच्या ‘उदात्तीकरणा’चं (?) निमित्त करून जो गदारोळ माजवला होता त्यांची तोंडं अचानक बंद झाली.
हुसेन यांचं रंगचित्र Self Portrait With Horse |
संभाजी कदम यांचं पेन्सिल ड्रॉइंग |
बहुळकरांच्या लेखातील आणखी एक ‘न्यूड‘ |
देवदत्त पाडेकर याचं ‘न्यूड’ |
मं. गो. राजाध्यक्ष
rajapost@gmail.com
अंकासंबंधी काही चर्चा करायची असेल, बोलावयाचे असेल तर ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांच्याशी 9833111518 या मोबाईलवर थेट संपर्क साधता येईल. (हा नंबर रविवारीसुद्धा स्वीच ऑफ नसतो.)
अंकाची मागणी नोंदवावयाची असल्यास कृपया 90040 34903 या मोबाईल क्रमांकावर ‘1 m copy’ एवढाच मेसेज स्वत:चा नाव, पत्ता आणि असल्यास इ-मेल आयडीसह पाठवावा. आठवड्याभरात अंक कुरियरनं घरपोच होईल.
वि. सू. अंक कोणत्याही स्टॉलवर अथवा पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध नाही याची कृपया नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment