Thursday, August 18, 2011

‘न्यूड’ आणि ‘नग्नता’  


श्री. सतीश नाईक
 सप्रेम नमस्ते

 आपण ’न्यूड’ कथा उत्खनन करून काढलीत. १९७५ सालची ही कथा... लेखकवर्गातून चित्रकलेची फारशी माहिती नसावी म्हणून अभिप्राय मिळाला नाही. चित्रकारांचं वाचन (तुम्ही अपवाद सोडून) किती ती कल्पना नाही, त्यामुळे या कथेचा ३६ वर्षानंतर उल्लेख हा माझ्या लेखी चमत्कारच आहे. ह्यापेक्षा गायन अधिक बरे कारण तत्काल अभिप्राय मिळू शकतो. हे आपलं गमतीत!
 पण आपले आभार खरं तर इतका उत्कृष्ट अंक काढल्याबद्दल, आर्टपेपर, उत्कृष्ट छपाई...पेक्षा उत्कृष्ट चित्रं...पुढच्या वर्षीचा अंक निघेस्तोवर हा अंक पहायला वर्ष पुरणार नाही. मी पूर्वीचे अंक (मीरा दातारकडून) पाह्यले होते... पण हा फारच अप्रतिम आहे.
 माझी आई चित्रकार. मामा पण निसर्ग चित्रं उत्तम काढत. मामाचे मामा पण म्हणे चित्रकार... आईकडून उल्लेख ऐकला होता की त्यावेळेस शरीर चित्रण करायला...त्यांना स्मशानात जावे लागे! कारण इतर कुठे मॉडेल मिळण्याची शक्यता नव्हती.
 पुढच्या अंकाबद्दल व यशस्वी वाटचालीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद...

 उर्मिला सिरुर

 ज्यांच्या ‘न्यूड’ या लघुकथेचा उल्लेख अंकाच्या संपादकीयात विशेषत्वानं झाला आहे. त्या कथालेखिका ‘उर्मिला सिरुर’ याचं हे पत्र. ते माझ्यापाशी आलं ते जे जे स्कूल ऑफ आर्ट मधली माझी वर्गमैत्रिण मीरा दातार हिच्या मार्फत. मीराचं ’मीरा दातार’ हे नाव आत्ताचं म्हणजे खरं तर नंतरचं किंवा लग्नानंतरचं. आधीची ती उर्मिला, उर्मिला सहस्त्रबुद्धे. मराठी प्रकाशन व्यवसायात ज्याचं नावं अत्यंत आदरानं घेतलं जातं त्या चित्रकार पद्मजा सहस्त्रबुद्धे यांची ती कन्या. अलिकडच्या पिढीला त्यांचं कर्तृत्व ठाऊक असण्याची शक्यता तशी कमीच, (ज्यांना ते ठाऊक करून घ्यायची इच्छा असेल त्यांनी मौजेची (ही एक प्रकाशनसंस्था आहे आणि ती मराठीतील महत्त्वाची मानली जाणारी पुस्तकं प्रसिद्ध करते. असो.) ग्रंथ-पुस्तकं चाळावीत. प्रकाशनाच्या क्षेत्रातला चित्रकारही अभिजातपणाचा ठसा आपल्या कामावर कसा उमटवू शकतो ते त्यांना तेथे नक्कीच पहावयास मिळेल.) पुन्हा एकदा असो!

 दरम्यान घडलं ते असं.

 मीराच्या हातात ‘चिन्ह’चा ताजा अंक पडला आणि त्यातला उर्मिला सिरुरांच्या कथेचा संपादकीयातला उल्लेख वाचून तिनं थेट उर्मिला सिरुरांनाचा फोन लावला. मीराची आई आणि उर्मिला सिरुर या आर्ट स्कूल मधल्या दिवसापासून ते आजतागायतच्या जिवाभावाच्या मैतरणी. साहजिकच मीरानं त्यांना ‘चिन्ह’मधला त्यांच्या विषयीचा सारा मजकूर हक्कानं वाचून दाखवला. आपल्या एका कथेविषयी इतक्या वर्षांनी, इतक्या म्हणजे कितक्या तर तब्बल ३६ वर्षानं असं काही लिहून आलं आहे म्हटल्यावर त्या बिचार्‍या (बहुदा) भारावूनच गेल्या असाव्यात. (इती मीरा उर्फ उर्मिला) मग मीरानं त्यांना माझ्याविषयी, ‘चिन्ह’विषयी सांगितलं वगैरे मग हेच सारं तिनं मला उलट्या क्रमानं फोनवरून त्यांच्याविषयी सांगितलं. ज्यांच्याविषयी लिहिलं आहे त्यांची प्रत्यक्ष प्रतिक्रिया सांगितल्यावर कुठल्या लेखक, संपादकाला आनंद होणार नाही? मलाही तो झाला. ‘चिन्ह’चा हा अंक विक्रीसाठी कुठेच उपलब्ध नसल्यानं त्यांना तो मिळवण्यास अडचण येणार हे लक्षात घेऊन मी त्यांना मीराकरवी अंकाची एक भेट प्रत पाठवली.

 दरम्यानच्या काळात अंक प्रसिद्ध झाल्याबरोबर कुठून कुठून प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यातले अट्टल वाचक त्या कथेविषयी आवर्जून विचारू लागले. सत्यकथेचा तो अंक मिळवणं कठीण आहे पण ती कथा आता कुठे वाचायला मिळेल? कथासंग्रहात घेतली आहे का? तो कुणी काढलाय वगैरे. काही उत्साही वाचकांनी तर तो कथासंग्रह मिळवून ती कथा वाचूनही कळवलं. तर अनेक वाचकांचं म्हणणं असं होतं की ती कथा या अंकात पुन्हा प्रसिद्ध करायला हवी वगैरे. कविता महाजनानी पाठवलेल्या पत्रातही त्याचा उल्लेख केला होता. साहजिकच मलाही ती कथा इतक्या दिवसांनी पुन्हा वाचाविशी वाटू लागली. पण आता ती मिळवायची कशी असा यक्षप्रश्न मलाही पडला. कारण अगदी दोनेएक वर्षापर्यंत सत्यकथेचा तो अंक माझ्या संग्रहात होता. पण घर बदलताना तो सारा संग्रह मी मुं. म. ग्रं. स. संदर्भ विभागाला देऊन टाकला. चारसहा महिन्यापूर्वी मुं. म. ग्रं. स.च्या संदर्भ विभागाकडून संदर्भाबाबत आलेला अनुभव भयंकर असल्यानं तिथं पुन्हा जायचंच काय, पण विचारायचंसुद्धा धाडस झालं नाही. म्हणून मग मी मीरालाच विचारलं. तर मीरा म्हणाली ‘कवडसा’ या कथासंग्रहात ती कथा आहे. पण माझी प्रत मला मिळत नाहीय. म्हणून तिनं थेट उर्मिला सिरुरांनाच विचारलं. तर त्या म्हणाल्या की ‘मी पण माझी प्रत शोधतेय. मलाही इतक्या वर्षानं ती कथा वाचाविशी वाटतेय.’ हो नाही हो नाही करता करता त्यांना त्यांच्याकडे ‘कवडसा’च्या दोन प्रती मिळाल्या. त्यातली एक त्यांनी मीराकरवी मला पाठवली. आणि सोबत लेखाच्या प्रारंभी प्रसिद्ध केलेलं पत्र....

 कुणाही लेखक-संपादकाला आपल्या प्रकाशनासंदर्भात वारंवार घडावेसे वाटणारे पण क्वचितच घडणारे हे दुर्मिळ क्षण, पुढल्या वळणावरच्या, नव्या प्रवासाला निश्चितपणानं दिशा देतात.

 ‘कवडसा’ची ती दुर्मिळ प्रत पाहताना पुन्हा एकदा स्मरणरंजनाचा अनुभव घेता आला. जेजेतले ते सारे रम्य दिवस पुन्हा एकदा आठवले. वर्गातल्या मित्र-मैत्रिणीचा-शिक्षकांचा सारा पट पुन्हा एकदा नजरेसमोरून भर्रकन फिरून गेला. चाळीस एक जण होते वर्गात पण त्यातले पाचसुद्धा नंतर भेटले नाहीत. कलेशी-कलाक्षेत्राशी संपर्क ठेवून असलेले तेवढे भेटतात. बाकीचे सारे कुठे गेले कुणास ठाऊक? मीरा ही त्यातली एक. शिक्षणक्षेत्रात असल्यानं ती मात्र सारा ट्रॅक ठेवून असते. जेजेमध्ये असल्यापासूनच तिचं माझं छान जमत असे. साहित्य क्षेत्रातल्या सार्‍या आतल्या खबरी तिच्याच मुळे मला मिळत असत. ‘कुणाला सांगू नकोस हं’ असं म्हणून ती जे सांगायची ते खरंच मी कुणाला कधी सांगितलं नाही. अगदी परवा वरील प्रसंग घडला तेव्हासुद्धा ‘हे तू कुणाला सांगू नकोस.’ असं म्हणून ती जे मला म्हणाली ते तरी मी कुठं तुम्हाला सांगीतलंय?

सतीश नाईक

या अंकाविषयीच्या माहितीपत्रकांसाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://chinha.in/promo/Chinha%202011.pdf

आणि अंकाची प्रत मागवण्यासाठी
‘चिन्ह’च्या 9967784422 / 90040 34903  या मोबाईलवर '1 m copy'  एवढाच मेसेज स्वतःच्या नाव पत्त्यासह पाठवा. अंक पाच दिवसात घरपोच होईल.

2 comments:

  1. Great. कृपया उर्मिला सिरूर यांचा इ-मेल आय डी कळवाल का?
    माझा इ-मेल : kavita.mahajan2008@gmail.com
    पद्मा सहस्रबुद्धेंच्या कामाची मी चाहती आहे. त्यांनी माझ्या 'धुळीचा आवाज' या मौजेने प्रकाशित केलेल्या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ केले होते. ते निमित्त साधून मी त्यांच्याशी ओळख करून घेतली. 'कुहू'चे मुखपृष्ठ किंबहुना बालआवृत्तीची चित्रं त्यांनी करावीत अशी इच्छा होती, म्हणून खूप पाठपुरावा केला. पण त्या आता थकल्या आहेत. त्यांनी काम केलेलं विंदांचं 'परी ग परी' मला अजून चित्रांसह पाठ आहे. त्यांच्या घरी उर्मिला सिरूर यांचे एक सुरेख काष्ठशिल्प आहे. ही माणसे आज दंतकथेतील वाटतात.

    ReplyDelete
  2. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद....उर्मिला सिरुर यांचा इ-मेल आमच्याकडे नाही आहे पण त्यांचा फ़ोन नंबर एसएमएस करीत आहोत.

    ReplyDelete