Friday, August 12, 2011



आणि  कविता







नामवंत कादंबरीकार कविता महाजन या ‘चिन्ह’च्या प्रारंभापासूनच्याच चाहत्या. यंदाच्या अंकातील परिसंवादात तर त्या सहभागीही झालेल्या. त्यांना आम्ही अंक कसा वाटला ते कळवा अशी विनंती केली होती तर लगेचच त्यांनी पत्रानं अभिप्रायही कळवला. तोच येथे देत आहोत.

प्रिय श्री. सतीश नाईक,
स.न.वि.वि.

उत्सुकतेने वाट पहावी अशा खूपच कमी गोष्टी आज घडताहेत. पुस्तक, चित्रपट, नाटक इत्यादी सर्वच बाबतीत. मासिकं आणि दिवाळी अंक तर वाचले नाही तरी चालतील असं वाटावं इतका त्यांचा दर्जा सुमार होत चाललेला आहे. त्यामुळे आपोआपच त्यांबाबत एक तर्‍हेचं औदासिन्य मनात निर्माण होतं. या सार्‍या उदास वातावरणात ‘चिन्ह’नं मात्र आपलं स्थान गेली अनेक वर्षं अबाधित ठेवलं आहे. ‘चिन्ह’चा अंक कोणत्याही विषयावर असो, त्याची उत्सुकता मनात कायम असते. अंक हाती येताच मनाला तरतरी येते. गेल्या खेपेस ‘निवडक चिन्ह’ हातात आला, तेव्हा तर एका वेगळ्या जगात प्रवेश करत असल्याचा अनुभव पुन: प्रत्ययास आला. ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ या विषयावरील नव्या अंकानं तर वेबसाईट, ब्लॉग, फेसबुक इत्यादी जनसंपर्काच्या तंत्रज्ञानावर आधारित नव्या वाटा चोखाळून वेगळी उत्सुकता तयार केली होती.

आर्टपेपरवरील पूर्ण रंगीत छपाई असल्याने चित्रांना पूर्ण न्याय दिला जातो. आर्टपेपरवरील छपाई ‘चिन्ह’नं गेल्या अंकापासून सुरू केली आहे. त्यामुळे खर्चाचा ( आणि अर्थातच कर्जाचाही! ) बोजा काढणे अपरिहार्य ठरते. वाचकांची जबाबदारी, मला वाटतं, इथूनच सुरू होते. संपादक, प्रकाशक, लेखक, चित्रकार यांनी आपल्या जबाबदार्‍या उत्तम तर्‍हेनं पार पडल्यावर वाचकांनी अंकाचा प्रसार-प्रचार-विक्री करण्यास स्वत:हून पुढे आलं पाहिजे, याची जाणीव हा अंक पाहता-वाचताना होते. कारण त्याआधारेच ‘चिन्ह’चा पुढील अंक आपल्या हाती येऊ शकेल.

या अंकाचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं ते असं की संपादकीय व इतर लेख / परिसंवाद यांच्या आधी ज्या ‘भूमिका’ लिहिल्या आहेत, ते सारे लेखन अत्यंत स्पष्ट, स्वच्छ, मुद्देसूद आणि नेमकं आहे. विशेषत: परिसंवादात जी मतं-मतांतरं वैविध्य, प्रसंगी विसंवाद घेऊन येतात, त्यांना एकत्र गुंफण्याचं कौशल्य या निवेदनांमधून दिसतं. हेतू प्रामाणिक आणि पारदर्शक आहेत, हे कळून चुकलं की वाचक मोकळ्या मनानं पुढचं लेखन वाचण्यास सुरूवात करतो. परिसंवादात वेगवेगळ्या क्षेत्रांमधील लोकांचा समावेश केल्याने विविध अंगांनी केले गेलेले विचार समोर येतात व वैचारिक नाविन्याचा आनंद लाभतो. परिसंवादातील मेघना पेठेंचा लेख तर भाषाशैलीचं अत्यंत मोहक उदाहरण आहे. डॉ. सुधीर पटवर्धनांचा लेखही मला आवडला. त्यांची चित्रशैली आणि भाषा यांची कुणीतरी तुलना करून पाहिली तर अनेक साम्यस्थळं आढळतील असा गमतीशीर विचारही त्यातून मनात आला. पार्वत्ती दत्ता यांचा लेखही अत्यंत रोचक आहे. त्यासोबतची छायाचित्रं दृश्यमाध्यमाचा वेगळा प्रभाव नोंदवणारी आहेत. तुलनेत मी मात्र विषयाला पुरेसा न्याय देऊ शकले नाही. निव्वळ त्रोटक मुद्दे मांडले. प्रकृतिअस्वास्थ्य हे कारण होतं, पण नंतर कधीतरी या विषयावर अनुभवांसह सविस्तर लिहीन, हे नक्की.

शर्मिला फडकेची मुखपृष्ठकथा ‘मोनो’लॉग - अप्रतिम आहे. खरंतर हा सारा एका अख्ख्या कादंबरीचा ऐवज आहे. गेल्या अंकातील चिमुलकरांवरील लेख वाचूनही असं वाटलं होतं. आपल्याकडे चित्रं / शिल्पकारांवरील चरित्रात्मक कादंबर्‍यांचा अभाव आहे. शर्मिलानं याचा विचार नक्की करावा. तिच्याकडे विलक्षण समज आहे, वैचारिकता आणि सहृदयता यांचा मिलाफ आहे आणि भाषेची देणगीही आहे.
सुहास बहुळकरांचा प्रदीर्घ लेख म्हणजे जणू एक लहान पुस्तिकाच आहे. त्यात महाराष्ट्रातले अनुभव त्यांनी सांगितलेत, तसेच देशभरातील अनुभव नोंदवले तर खरंच एक स्वतंत्र पुस्तक तयार होईल. देवदत्त पाडेकरांच्या लेखासारखं, त्या सोबत अजून दोन-तीन लेख असते, तर त्या विभागाला अधिक मिती मिळाल्या असत्या. उर्मिला सिरूर यांची कथा या अंकात पुन्हा छापायला हवी होती. ती खरंच एक वेगळा अनुभव मांडणारी कथा आहे.

हुसेन आणि कोलते सर
राहता राहिला मुद्दा हुसेनविषयक लेखांचा. कोलते सरांचे दोन्ही लेख जवळपास सर्व मुद्दे नोंदवणारे असले, तरी इतर लेखांमधील हुसेनविषयक नोंदींवर, हुसेनचा मृत्यू दरम्यानच्या काळात झाला, या कारणास्तव संपादकीय कात्री चालवणं खरोखर गरजेचं होतं का? तुम्ही निवडलेल्या लेखकांपैकी एकहीजण ‘अविचारी’ वा ‘कुविचारी’ आहे असे म्हणता येणार नाही. सगळी स्वत:ची जबाबदारी ओळखून असलेली विचारी माणसे आहेत. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं छापलं जाणंच योग्य होतं. तुम्हांला आलेल्या धमक्यांची कथा माहीत असूनही मी हे म्हणते आहे... आणि प्रत्येक भल्याबुर्‍या प्रसंगी तुमच्या सोबत असण्याचं आश्वासनही या निमित्तानं देते आहे.
सर्वांगसुंदर अंकाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!

आपली
कविता महाजन

प्रिय कविता
काहीतरी गैरसमज होतोय. हुसेन यांच्या लेखातील एकही शब्द बदलेला नाहीये. कात्री चालवणं वगैरे दूरचच. फक्त विष्णू खरे यांचा लेख अंकातून काढून ‘चिन्ह’च्या संकेतस्थळावर टाकलाय इतकच याचं कारण आहे. मूळ लेख हिंदी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. त्यातले सारे मुद्दे हुसेन हयात असेपर्यंत लागू होते. हुसेन यांचं निधन झाल्याबरोबर त्या विषयाचं परिमाणच बदललं आणि तो काहीसा कालबाह्य झाला म्हणून तो अंकातून काढावा लागला.
संकेतस्थळावर मात्र तो अर्थातच उपलब्ध आहे. त्याची लिंक पुढीलप्रमाणे.
http://chinha.in/promo/Vishnu%20Khare.pdf

अभिप्रायाबद्दल अगदी मनापासून आभार !
सतीश नाईक


आणि अंकाची प्रत मागवण्यासाठी
‘चिन्ह’च्या 90040 34903 या मोबाईलवर '1 m copy'  एवढाच मेसेज स्वतःच्या नाव पत्त्यासह पाठवा. अंक पाच दिवसात घरपोच होईल.





No comments:

Post a Comment