नग्नतेची ‘न्यूड’ल्स होताना
‘‘अखेर आज लेखासंदर्भातील सर्व काम संपवून फायनल लेख पाठवत आहे. आपण दोघांनीही ठेवलेल्या पेशन्सबद्दल आपण खरोखरच एकमेकांचं अभिनंदन करू या. आणि अशा अनेकांना सांभाळण्याबद्दल तुझं व शर्मिलाचं अभिनंदन! हा लेख लिहिताना मी आयुष्यात कधी नव्हे एवढा थकलो. एका क्षणी तर ब्लॅंक झालो आणि तो काळ फार मोठा होता.’’ १० मे रोजी चित्रकार सुहास बहुळकर यांनी ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांना लेखाचा शेवटचा भाग पाठवताना लिहिलेल्या पत्रातला हा काही भाग. ‘चिन्ह’च्या ‘‘नग्नताःचित्रातली आणि मनातली’’ विशेषांकातल्या बहुळकरांच्या लेखाविषयी कळत नकळत हा मजकूर खूप काही सांगून जातो. बहुळकरांनाच ‘चिन्ह ब्लॉग’नं ‘न्यूड’ल्स लेखाच्या एकूण लेखनप्रक्रियेसंबंधी लिहिण्याची विनंती केली होती. त्यांनी ही ती मान्य केली आणि पटकन जो लेख लिहून दिला तोच हा लेख.
‘चिन्ह’ या चित्रकला विषयक अंक प्रकाशित करणार्या सतीश नाईक यांचा व माझा संबंध फार जुना आहे. जेजेत असताना मी त्याला फेलो म्हणून शिकवीत होतो. त्यानंतर त्यानं कलाविषयक अनेक उपक्रम केले. पण त्यात त्याच्यातील पत्रकार कायमच जागरूक होता. तो नेहमीच जाणवत राहिला. गेल्या अनेक वर्षातील ‘चिन्ह’ची वाटचाल मी स्वत: अनुभवली असून, त्यात बर्याचदा सहभागीही झालो आहे. सुमारे एक वर्षापूर्वी सतीशचा फोन आला व त्यानं ’नग्नता : चित्रातली आणि मनातली’ अंकात मला लिहिण्याचा आग्रह केला. सतीशचे शब्द होते, ’’बहुळकर, तुम्ही जेजेत अनेक वर्षे न्यूड क्लासला शिकवत होता, फिगर ड्रॉईंग व पोर्ट्रेट ही तुमची खासियत. शिवाय मॉडेलनाही वर्षानुवर्षे तुम्ही काम देत होतात. हा विषय तुमचाच आहे या विषयावर तुम्ही लिहिलेच पाहिजे.’ त्यानंतर लगेचच ‘चिन्ह’ची कार्यकारी संपादिका व मुक्त पत्रकार शर्मिला फडकेही मला येऊन भेटली. विषय ऐकून मी चक्रावलोच होतो. पण अखेरीस या आगळ्या-वेगळ्या विषयावर लिहूयाच असा निर्णय घेतला आणि मी ’नग्नता’ या आपण एरवी टाळणार्या विषयात अक्षरश: अडकलो. आणि नंतर त्या विषयानं माझी अक्षरश: झोपच उडवली.
पु.ल.देशपांडे यांचे मामा एम.व्ही.दुभाषी यांनी जेजेमध्ये शिकत असताना १९२४ साली तैलरंगात अत्यंत प्रभावीपणे साकारलेले न्यूड |
अशी माझी अवस्था झाली. त्यातूनच तब्बल वर्षाभरापेक्षा जास्त काळानंतर निर्माण झाला तो माझा ५३ पानांचा प्रदीर्घ लेख ’न्यूड’ल्स.
या लेखात लिंगपुराणापासून ते ख्रिस्ती धर्मातील नग्न बाप्तीस्म्यापर्यंत व मुंबईत १९१९ मधे सुरू झालेल्या जेजेतील पहिल्या न्यूड क्लासपासून ते गावोगावी नग्न चित्रांच्या अभ्यासासाठी केलेल्या धडपडीची चक्षुर्वे:सत्यम् हकीकतही आहे. या शिवाय नग्न चित्रांवरून परदेशातच नव्हे तर, भारतातही झालेले वाद-विवाद आणि नैतिकता व अश्लीलतेवरून झालेले खटलेही आहेत. नग्न चित्रं काढण्याच्या निमित्तानं चित्र-शिल्पकारच नव्हे तर समोर नग्न उभी राहणारी मॉडेल्सही आपला प्रवास मांडत आहेत. साहजिकच यात अत्यंत हृद्य व हृदयात कालवाकालव करणार्या प्रसंगापासून ते अत्यंत विनोदी असे किस्सेही आहेत. यात मानवी गुंतागुतीसोबतच मानवी जीवनाच्या मर्यादांचे आणि त्यातील व्यामिश्रतेचं दर्शनही आहे.
हे लेखन करीत असताना मी वाचलेले व जगलेले आठवत होतोच, पण याच काळात अनेक मित्र-मैत्रिणी, विद्यार्थी-विद्यार्थिनी अशा अनेकांकडून समृद्ध होत गेलो. म्हणूनच ते दिवस आणि रात्री हा काळ अक्षरश: मंतरलेला होता. आदिमानवापासून ते आधुनिक काळापर्यंत गेली लाखो वर्षे मानवी जीवनाला व्यापून उरणारी नग्नता, नैतिकतेच्या कल्पना, धर्मसत्ता, राजसत्ता, न्याय, कला, संस्कृती अशा अनेक बंधनाचा भाग होती. त्याचाच भाग किंवा त्याला विरोध म्हणून व्यक्त होणारी नग्नता आणि तिचं वेगवेगळ्या रूपात अभिव्यक्त झालेलं स्वरूप अवाक् करणारं आहे.
हा लेख लिहिताना मी पूर्वीपासून बघीतलेली, वाचलेली पुस्तके व त्यातील अनेक संदर्भ मला अचानक आठवत. पण ते संदर्भ कोणत्या पुस्तकातील आहेत किंवा त्या पुस्तकाचं नावही आठवत नसे. परिणामी माझ्याच नव्हे तर मी जात असलेल्या इतर ग्रंथालयातील पुस्तकेही मी शोधू लागे. पण हवं ते पुस्तक तासनतास घालवूनही मिळत नसे. मग स्वत:वरच चिडणं, बायको किंवा मुलींवर खेकसणं, समोरची भिंत रिकामी असली तरी तिच्याकडे रागानं बघणं, असेही प्रकार होऊ लागले. फारच ताप होऊ लागला तर मेंदूला गुंगी आणण्यासाठी फसफसणार्या सोनेरी दुनियेत विहार करावा लागे. किंवा अमिताभच्या जाहिरातीपूर्वीपासून मी वापरत असलेलं लाल रंगाचं हिमताज तेल टाकून, डोकं थंड करून शांत झोपी जाण्याचा प्रयत्नही करू लागे. कधी यश तर कधी पूर्णत: पराजय! पण पहाटे तीन वाजता अचानक डोळे टक्क उघडत व त्या पुस्तकाचं नाव आठवत नसलं तरी मुखपृष्ठावरील चित्र अचानक डोळ्यासमोर उभं राही. मग पुन्हा कपाटांची शोधाशोध... पुस्तक सापडे आणि संदर्भाचे कच्चे दुवे पळून जात. शब्द कागदावर सरसर उमटू लागत. काही वेळा संदर्भ सापडण्यासाठी दिवसचे दिवस घालवावे लागत, तर काही वेळा अनपेक्षीतपणे लगेचच सापडत. पण यामुळे नियमाला अपवाद व त्यासाठी नियम हे तत्व मला चांगलंच कळले. अर्थात याचं साधर्म्य श्लील-अश्लील, नैतिक-अनैतिक अशा नग्नतेसारख्या कल्पनांशी आहे हे देखील जाणवलं. सहज म्हणून हात घातला तर खजिनाच हाताशी लागे तर काही वेळा खूप काळ खोदूनही, कोळसे भरलेल्या धनाचा हंडाच हाती येई. काही वेळा दोन ओळींमधे असणारा मजकूर कल्पून वाटचाल करावी लागे. न्यूड क्लासवर मी शिकवत असताना काही अनुभव डोक्यातल्या डायरीत तर काही प्रत्यक्ष डायरीत नोंदवून ठेवले होते. या दोनही डायर्या (डोक्यातली व प्रत्यक्ष) अचानक आपली पाने फडफडवू लागत आणि त्यातून किस्से, कथा, अनुभव यांचा खजिनाच डोळ्यासमोर उभा राही. काय घ्यावं आणि काय घेऊ नये या धडपडीत असतानाच कोणाचा तरी फोन येई आणि डोक्यात घोळत असलेला विषय सांगताच तो किंवा ती देखील आपला अनुभव सांगून जाई. अशाच प्रवासात कोल्हापूरातील एक चित्रकार ज्यांनी तरुणपणापासून वृद्धावस्थेपर्यंत नग्न स्त्री शरीरावरून चित्र काढण्याचे वेड घेतले ते कै. चांगदेव शिगावकर त्यांच्या मॉडेलसह असलेल्या फोटोसकट त्यांच्या चिरंजीवांनीच माझ्यापर्यंत पोचवले. त्यांचेच शिष्य असलेल्या श्याम पुरेकरांची कहाणी तर त्याहून विलक्षण. त्यांनी आपल्या घरातच नग्न मॉडेल उभी करून चित्रं काढली व त्यांची पत्नी विमल पुरेकरांनी त्यांना कशी साथ दिली ही सत्यकथा फोटोंसकट मिळाली. माझ्या जेजेतल्या काळातील एका जुन्या डायरीत जेजेतील न्यूड बसणार्या मॉडेलबद्दलच्या काही नोंदी २०/२२ वर्षांनंतर योग्यवेळी हाती आल्या. पण सगळंच सांगत बसलो तर माझ्या या ‘न्यूड’ल्स मधे काय मसाला भरलाय तो उघड होईल.
पण एक गोष्ट मात्र सांगितलीच पाहिजे. १ जानेवारी २०११ या दिवशी माझ्या मुलीचं लग्न होतं. डिसेंबर उजाडला तरी मी आपला माझ्या कामात व या लेखात गुंतलेलो! हे बघून माझी पत्नी व मुलीदेखील चांगल्याच हैराण झाल्या होत्या. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे बघून मी ’न्यूड’ल्स बनविण्याच्या प्रक्रियेतून बाहेर आलो आणि प्रयत्नपूर्वक वरपित्याच्या सर्व जबाबदार्या पार पाडू लागलो. पण मनातल्या मनात ’न्यूड’ल्स शिजतच होती. त्यातले मसाले तयार होत होते... त्यात नवनवीन भर पडत होती. वस्तुत: लेखनाचा पहिला खर्डा दिवाळीपूर्वीच- ऑक्टोबर २०१० अखेरीस दिला होता. १ जानेवारी २०११ला लग्न पार पडलं आणि मी पुन्हा ‘न्यूड’ल्स मधून विहार करू लागलो. नवनवीन भर पडत होती. पूर्वी लिहिलेलं काही रहित करत होतो. लिहिलेलं पाठवून देत होतो. डी.टी.पी.चं काम जोरात सुरू होतं. सतीश नाईक व शर्मिला फडके यांनी खरोखरीच खूपच पेशन्स ठेवला. असं करता करता तब्बल ६ महिने उलटले. मला प्रचंड थकवा वाटू लागला- नको तो विषय नको ते ’न्यूड’ल्स असं वाटून ’नग्नता’ हा शब्दही नकोसा वाटू लागला. एकदाचा लेख संपवला आणि ’चिन्ह’कडे पाठवून श्रमपरिहारासाठी अरुणाचलला गेलो. पण प्रवासात असतानाच सतीशचा फोन आला, बहुळकर लेख अफलातून. पण काहीतरी कमी वाटतंय, जोडून घ्यायला हवा.’’ वैतागलो व तूच हवं ते कर, असे सांगून फोन ठेवला. मे अखेरीस परतलो तर संपादकांना वाटलेले बदल करून लेख परत हजर. परिश्रमपूर्वक सतीशनं ते ३/४ वेळा लेख वाचून त्याला वाटलेले बदल सुचविले होते. आता मी हिमालय बघून ताजातवाना होऊन आलो होतो. पुन्हा बैठक मारली. काही गाळलं, काही बदललं आणि काही नव्यानं घालून लेख पूर्ण केला. एव्हाना जून २०११चा पहिला आठवडा संपला होता. आता मात्र ठरवलं हा विषयच न संपणारा आहे. कुठं तरी थांबलंच पाहिजे. नव्यानी मांडणी केलेला लेख संपादकांनाही आवडला होता.
आज ’चिन्ह’मधला माझा ’न्यूड’ल्स हा लेख पाहण्यास माझा मीच उत्सुक आहे. माझ्या लेखात काय आहे हे मी जाणतो पण ’चिन्ह’च्या अंकात इतर कोणते लेख आहेत त्यांचीदेखील मी उत्सुकतेनी वाट पाहतो आहे. कारण ’चिन्ह’च्या नग्नता विषयावरील या अंकामुळे व त्यातील हुसेन यांच्यावरील लेखनामुळे सतीशला धमक्यांचे प्रचंड फोन आणि पत्रेही आला होती हे मला ठाऊक आहे.
‘चिन्ह’च्या या अंकात काय आहे हे मला ठाऊक नाही, पण एक मात्र निश्चित की, भारतीय समाजमनाचा विचार करता कलेतील नग्नता ही अश्लीलता व बीभत्सतेच्या पातळीवर पोहचू नये व त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावू नयेत असंच माझं मत आहे. माझं हे मत ‘चिन्ह’चे संपादक, लेखक व कलावंतांनाही निश्चितच मान्य असेल असं वाटतं. समाजमनातही नग्नता या विषयाबद्दल निश्चितच कुतूहल असतं आणि भविष्यातही ते असणारच. त्यामुळेच कला व संस्कृती याबद्दल प्रेम असणार्या प्रत्येक व्यक्तीने ’नग्नता’ हा आगळाच विषय घेऊन चित्र-शिल्पकलेबाबत ’चिन्ह’ मधे काय लिहिले आहे ते समजावून घेणं मात्र आवश्यक आहे.
- सुहास बहुळकर
अंकाची प्रत मागवण्यासाठी
‘चिन्ह’च्या 90040 34903 या मोबाईलवर '1 m copy' एवढाच मेसेज स्वतःच्या नाव पत्त्यासह पाठवा. अंक पाच दिवसात घरपोच होईल.
No comments:
Post a Comment