Monday, April 11, 2011

एकाच अंकाला दोन मुखपृष्ठं?

नग्नता: चित्रातली आणि मनातली अंकावर ’न्यूड पेंटिंग’ छापायचं नाही असा निर्णय अगदी आधीच झाला होता. ते खूपच क्लिशे ठरलं असतं हे एक आणि अंकाची मुख्य स्टोरी   परफॉर्मन्स-आर्टीस्ट 'मोनाली मेहेर’ची होती त्यामुळे तिला मुखपृष्ठावर घेणंच योग्य होतं. मोनालीच्या तब्बल ६० तास चाललेल्या प्रचंड इंटरेस्टींग मुलाखतीनं त्यावर मग शिक्कामोर्तबच झालं.
मुखपृष्ठासह फ़ेसबुकवर घोषणाही झाली.


त्याच संध्याकाळी चित्रकार दत्तात्रय पाडेकरांचा फोन आला आणि पाठोपाठ ’चिन्ह’च्या अंकासाठीचं अप्रतिम असं प्रकाशचित्रंही.


पाडेकरांचं मत होतं की हे प्रकाशचित्र अंकाच्या विषयाला अतिशय अनुरुप आहे.
ते प्रकाशचित्र पाहिलं. पाडेकरांचं म्हणणं खरंच होतं.
’चिन्ह’च्या या अंकावर हेच मुखपृष्ठ असायला हवं होतं.
पण ’फ़ेसबुक’वर तर मोनालीचं मुखपृष्ठ झळकत होतं.
आता काय करायचं? प्रश्न पडला.
ते प्रकाशचित्र खरोखरच केवळ अप्रतिम होतं, + न्यूड चित्राची ती भिंतीवर टांगलेली डेकोरेटीव्ह नक्षी असलेली सोनेरी फ़्रेम. त्या फ़्रेमच्या काचेत समोरच्या भिंतीचं पडलेलं प्रतिबिंब आणि त्या फ़्रेम्सच्या वरच्या भागात बसलेले ते तीन रंगीबेरंगी गोड आणि अतिशय सुंदर असे पक्षी. त्यातला एक तर अत्यंत वात्रट, काचेतल्या न्यूडकडे अगदी डोळे फ़ाडफ़ाडून पाहतोय की काय असं वाटायला लावणारा... अंकाचा आशय, अंकाची संकल्पना, अंकाचं मध्यवर्ती सूत्र पुढं आणणारा...
अंकाला हेच मुखपृष्ठ योग्य आहे याची खात्री पटली. पण मग मोनालीच्या मुखपृष्ठाचं काय? तिची स्टोरीही तेव्हढीच महत्वाची होती. ’चिन्ह’ची मूळ विचारधारा स्पष्ट करणारी.
पण आता तर मोनालीचं मुखपृष्ठ आपण जाहीर करुनही बसलोय.
आणि मग निर्णय आला..
या अंकाला दोन दोन मुखपृष्ठ असतील
एक दत्तात्रय पाडेकरांच्या संकल्पनेतून किंवा कॅमे-यातून साकार झालेलं तर दुसरं ’मोनाली’च्या टेट म्युझियम'मधल्या परफ़ॉर्मन्सचं.

आणि मुखपृष्ठाची संकल्पना साकार करताना मग दुसरीही एक व्यवस्था करता आली. ती म्हणजे-
ज्याला पाडेकरांचं मुखपृष्ठ आवडेल त्याला ते अंकावर ठेवता येईल ज्याला त्यातली नग्नता खटकेल त्यांना मोनालीचं मुखपृष्ठ वर आणता येईल.
कशीय कल्पना?No comments:

Post a Comment