Friday, October 25, 2013

पहिली प्रतिक्रिया पुणेकरांची…

पहिली प्रतिक्रिया पुणेकरांची…
श्री. सतीश नाईक,                                  8 ऑक्टोबर, 2013
संपादक "चिह्न', ठाणे.
,सप्रेम नमस्कार
"चिह्न'चा यत्न-प्रयत्न विशेषांक बऱ्याच प्रतीक्षेनंतर हातात पडला. अंक पाहिल्यावर तुम्ही किती कष्ट घेतले असतील याची कल्पना आली. या अंकाविषयी माझी स्वत:ची काही मते काही जाणिवा आपल्याला कळवाव्यात यासाठी हे पत्र लिहित आहे. मी काही साहित्य-समीक्षक, कला-समीक्षक किंवा चित्रकारही नाही. तथापि चित्रकलेविषयी आपुलकी असणारा एक सर्वसामान्य माणूस आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माझे हे पत्र वाचावे ही विनंती.

संपादकीयापासून हा अंक एका ठाय लयीत सुरु झाला आहे. "यत्न-प्रयत्न' शीर्षकाचे भान ठेवून लेखांची योजना आपण केली आहे. संपादकीयामधे तुमची मते तुम्ही ठामपणे पण ऋजू भाषेत मांडली आहेत त्या बद्दल अभिनंदन! कोणताही अभिनिवेश आणताही तुम्ही तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणून गेला आहात.

सुबोध केरकरांच्या मुलाखतीवरून "गोंयचो सिंदबाद' हा शर्मिला फडके यांनी लिहिलेल्या लेखापासून सुरुवात झाली आहे. मी वर ठाय लयीचा उल्लेख केला तो हा लेख मनात धरूनच. दीर्घ आणि संथ असा हा लेख आहे. एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण आलेखच लेखिकेने मांडला आहे आणि श्री. सुबोध केरकरांची संपूर्ण कारकीर्द आणण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत असे मला वाटते. तथापि हा लेख बऱ्यापैकी दीर्घ आहे, आणि काहीवेळा द्विरुक्ती ही झाली आहे. काही गोष्टींचा संक्षेप करून हा लेख अजून ठीकठाक झाला असता. तरीही यात लेखनाची लय खूपच चांगली पकडली आहे. सुंदर लेख! वाचताना चित्रकला या कलेमध्ये किती नवीन प्रवाह आहेत याची कल्पना आली. आणि खरे सांगायचे तर सर्वसामान्यांना "इन्स्टॉलेशन' हा प्रकारच माहित नाही किंवा त्यामागे सौंदर्याची कोणती जाणीव असते, कष्ट असतात, नियोजन असते हे माहीत नाही. मला स्वत:ला तर हा प्रकार माहीतच नव्हता. खरे तर या प्रकारावर एक संपूर्ण स्वतंत्र लेख होऊ शकेल. तुम्ही विचार करण्यास हरकत नाही.

श्री. प्रभाकर कोलते यांनी वासुदेव गायतोंडेंवर लिहिलेला लेखही अप्रतिम आहे. स्मरणरंजनात्मक पैलू या लेखाला आहे. गायतोंडे हे काय प्रकरण आहे याची थोडीशी झलक दिसते. अर्थात श्री. प्रभाकर कोलते यांच्यासारख्या ज्येष्ठ चित्रकाराने संयत शब्दात-जी त्यांची खासियतच आहे- हा लेख लिहिला आहे. हा लेख संक्षिप्त आहे. तो संपूर्णपणे वाचायला आवडेल.


या अंकातील सर्व लेखांमधे मला अशोक राणे यांनी लिहिलेला श्री. मूर्ती यांच्यावरचा "अमर चित्र-कथा' लेख सर्वात जास्त आवडला, अंत:करणाला भिडला. कॅमेऱ्यासारख्या निर्जीव यंत्रातून मूर्तींनी जी जिवंत कलाकृती प्रेक्षकांसमोर आणली त्याला खरोखरच तोड नाही. मी स्वत: गुरुदत्त-आणि-मूर्ती या द्वयीचे सर्व चित्रपट पाहिलेले आहेत. ते पाहूनही आता बरीच वर्षे लोटली. तथापि ते मनावर कोरले गेलेले चित्रपट आहेत. काव्यमय आहेत. हा लेख वाचून ज्या गोष्टींची जाणीव अद्याप झाली नव्हती ती जाणीव विजेसारखी मनाला स्पर्शून गेली.


एका अनोख्या दृष्टिकोनाचा साक्षात्कार लेख वाचल्यावर झाला आणि अक्षरश: मन भरून आले आणि संपूर्ण दिवस त्याच अवस्थेत गेला. त्यानंतर मी त्यादिवशी पुढील कोणतेही लेख वाचू शकलो नाही. यावरूनच या लेखाने मी किती भारलो गेलोय त्याची कल्पना येईल.या लेखाबद्दल लिहायला माझ्याकडे शब्द नाहीत.


त्यानंतर अधुरे स्वप्न, लक्ष्मण श्रेष्ठ, स्मरणगाथा, यशवंत चित्र हे लेख येतात. हे ही स्मरणरंजनात्मक लेख आहेत. सुदैव म्हणजे चित्रकारांसंबंधी आहेत. त्यातील सर्व चित्रकारांची ओझरती ओळख झाली. त्यापैकी लक्ष्मण श्रेष्ठ यांच्याबद्दल काहीच माहित नव्हते. कारण चित्रकला किंवा चित्रकार यांच्याविषयी लिहिण्याची परंपराच नाही. (आता "चिह्न' ने ती कमतरता भरून काढली आहे हे खरेच!) त्यामुळे या चित्रकारांबाबत चित्रवर्तुळाबाहेर इतरांना काही माहिती असण्याचे कारण नाही.

श्री. श्याम भुतकर यांनी लिहिलेला लेख ठीक आहे. तथापि चित्रकले बाबत काहीच अन्वय नाही. जक्कलची मानसिक घडण त्याच्या चित्रातून दिसत होती का? त्याबाबत भुतकर जक्कलच्या एवढ्या जवळ असूनही त्यांना काही जाणवले होते का याबाबत लिहिलेले नाही ते लिहिले असते तर लेख अजून उठावदार झाला असता. पुण्यातील त्या भयंकर दिवसांची आठवण जागी करून पुनर्प्रत्ययाची जाणीव या लेखाने झाली हे निश्र्चित.


एक डाव पावसाचा या लेखाबाबत लिहायचे तर एका माणसाने निसर्गाशी केलेल्या दोन हाताचे वर्णन असेच करावे लागेल. आणि विशेष हे की हे सर्व करूनही श्री. कदम यांनी कुठेही "चमको' गिरी त्या प्रसंगानंतर केली नाही. नाहि चिरा नाही पणती या व्याख्येतील जे लोक असतात त्यापैकी श्री. निक हे एक आहेत. ना मान, ना सन्मान, ना पुरस्कार ना दखल. दुसऱ्यांच्या व्यथा कॅश करून चॅनेलवर दाखवणारे तथाकथित पुरोगामी, सामाजिक जाणीव असलेले चॅनेलश्रेष्ठ यांनीही दखल घेतली नाही हे खूपच वेदनादायक आहे. चिह्न ला धन्यवाद!


आता विशेष विभाग. अतिशय जबरदस्त! एका अस्पृश्य आणि वाळीत टाकलेल्या विषयाबाबत अनुपम धैर्य दाखवून ज्या चित्रकत्रींनी प्रयोग केले त्याबद्दल हॅट्स्ऑफ! या सर्व गोष्टींना खरोखरीच धैर्य लागते


शुभा गोखले काय, विक्रम बावा काय, कोणी अनामिका काय या सर्वांचेच अभिनंदन करायला हवे. संतोष मोरे आणि नितिन दादरावाला यांचेही लेख असेच अपूर्व. या विभागाबाबत काय बोलावे?



हे सर्व लेखन मला या अंकातील लेखाबाबत काय आवडते याबाबत आहे. अंकाची मांडणी सर्व व्यावसायिकांनी केलेली असल्याने त्यात न्यून काहीच जाणवले नाही. हां, एका बाबतीत मात्र लक्ष देणे जरूर आहे. सादरीकरण जसे सौंदर्यपूर्ण हवे तसेच भाषेबाबतही आहे. भाषा शुद्ध असणे हे आवश्यकच आहे. काही ठिकाणी भाषेच्याबाबतीत काही दोष आहेत तसेच ते मांडणी करताना झालेल्या शब्दांच्या मोडतोडीचे आहेत. ओळ जेव्हा कॉलमच्या शेवटी येते तेव्हा काही ठिकाणचे अक्षर त्या अक्षराचे काने, मात्रे हे स्वतंत्रपणे खालील ओळीत आहेत. कदाचित हा सॉफ्टवेअरचाही दोष असू शकेल. पण खटकले हे खरेच.

अमूर्त चित्र कसे पहायचे, कसे समजून घ्यायचे शेवटी त्याचा आनंद कसा घ्यायचा या बाबत काही प्रयत्न झाले आहेत का? आणि असतील तर पुढील काही अंकात त्यावर लेख असतील का? कारण माझ्यासारख्याला जर माझ्या चित्रकलेविषयी जाणिवा अजून समृद्ध करायच्या असतील तर अशा लेखांचा उपयोग निश्र्चित होऊ शकेल त्यानंतर अमूर्त चित्रे पाहताना अधिक रसास्वाद घेणे शक्य होईल असे वाटते.

असो! माझे हे पत्र फारच लांबले आहे. पुढील अंकांची आतुरतेने वाट पहात आहे.

आपला स्नेहाभिलाषि,
माधव अच्युत शाळिग्राम

माधव शाळिग्राम,
69/8, स्नेह सोसायटी,

रामबाग कॉलनी, पौड रोड, पुणे-411038. madhav.shaligram@yahoo.in

Monday, January 21, 2013


चिन्ह’चा यंदाचा अंक म्हणजे ‘यत्न-प्रयत्न विशेषांक’तो लवकरच प्रसिद्ध होऊ घातलाय. 
त्यानिमित्तानं ‘लोकमत’च्या दर रविवारी प्रसिद्ध होणार्‍या ‘मंथन’पुरवणीच्या संपादकांनी ‘चिन्ह’च्या आजवरच्या वाटचालीचा धांडोळा घेणारा एक लेख ‘चिन्ह’कडून मागवला होता. 
सदर लेख 20 जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. वाचकांसाठी तोच लेख संपूर्णपणे जसाच्यातसा प्रसिद्ध करीत आहोत.



















सव्वीसाव्या वर्षी रौप्यमहोत्त्सव!

जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेत असतानाच पूर्णवेळ पत्रकारितेत शिरण्याची संधी मला मिळाली.
तिथं मग असं लक्षात आलं की ज्या चित्रकलेच्या क्षेत्रातून आपण आलो त्या विषयी मात्र वृत्तपत्रातून फारच कमी छापून येतंय. त्यातूनच मग कलाक्षेत्राविषयीच्या छोट्या-मोठ्या बातम्या देणं सुरू झालं.
त्या मिळवताना असं लक्षात आलं की या बातम्यांमध्येसुद्धा मोठमोठाल्या लेखांची किंवा
लेखनाची बीजं दडलेली आहेत.

पण हे लेखन मात्र काही साप्ताहिकात-वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार नाहीये. मग काय करायचं?
तर, चित्रकलाविषयक एखादं नियतकालिक किंवा निदान एखादं वार्षिक तरी आपण सुरू करायचं.
त्यातूनच ‘चिन्ह’चा 1987 साली जन्म झाला. माधव गडकरी तेव्हा दै.लोकसत्तेचे संपादक होते.
त्यांनी प्रोत्साहन तर दिलंच पण महाराष्ट्राच्या (संकल्पित)कला अकादमीवरचा लेखही दिला.
त्या अंकानं नंतरचा सारा इतिहास घडवला. (आणि प्रचंड आर्थिक मनस्तापही दिला)
पण त्या विषयी ‘निवडक चिन्ह’च्या पहिल्या खंडात विस्तारानं लिहिलं असल्यानं त्याची द्विरूक्ती करीत नाही.
जिज्ञासूनी तो लेख ‘चिन्ह’च्या www.chinha.in या संकेतस्थळावर वाचावा.

पत्रकारितेत तब्बल दोन दशकं घालवल्यावर ती मी अगदी ठरवून सोडली.
उर्वरीत काळ फक्त पेंटिंगच करायचं असं मी आधीच ठरवून टाकलं होतं, पण ठरवलं तसं मात्र घडलं नाही.
पत्रकारिता सोडल्यावर एक विचित्र रिकामपण, एक वेगळीच पोकळी मला सतावू लागली, आणि मग असं लक्षात आलं की संपादनाचं काम हे असं आपल्याला काही सोडता येणार नाही. किंबहुना ते आपल्या जगण्याचाच एक भाग झालंय.

हा ‘साक्षात्कार’ होण्याला करणीभूत ठरलं ते ‘चित्रकार गायतोंडे’यांचं निधन. ते साल होतं 2001. आपल्या आवडत्या चित्रकाराचं निधन व्हावं आणि त्याच्यावर फक्त चार-आठ ओळीच्याच बातम्या प्रसिद्ध व्हाव्यात हे मला तेव्हा चांगलचं झोंबलं. ‘गायतोंडे’यांचं सारं कर्तृत्व, त्यांचं मोठेपण, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं अफाट जगणं हे सारं सारं कुणीतरी जगासमोर आणायला हवं असं मला मनापासून वाटलं आणि ‘कुणीही’ ते आणणार नाहीये, ‘हे काम तूच करायला हवं’ याची पक्की जाणीव जेव्हा मला झाली, तेव्हाच मी ‘चिन्ह’चं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. तो दिवस होता 15  ऑगस्ट 2001 हा. त्याच्या पाचच दिवस आधी म्हणजे 10 ऑगस्टला गायतोंडे यांचं दिल्लीत निधन झालं होतं. (त्यांच्या निधनाला आता एक तप पूर्ण झालंय पण अद्यापही त्याच्यावर कुठल्याच भाषेत एखादा ग्रंथ वा पुस्तक निघालेलं नाहीय.)

आणि मग ‘गायतोंडे’ यांच्याविषयीची 25 पानी पुरवणी असलेला दुसर्‍या पर्वातला तो पहिला अंक प्रसिद्ध झाला. मग चित्रकला शिक्षणावरचा ‘सांगोपांग चित्रकला’, त्यानंतर वारली आणि मधुबनी कलेचा ज्यांनी शोध लावला त्या ‘भास्कर कुलकर्णी’यांच्यावरचा विशेषांक, नंतर कवी-चित्रकार अरूण कोलटकरांवरील प्रदीर्घ लेख असलेला विशेषांक, त्यांनंतर मग पुन्हा जवळ जवळ अख्खा ‘गायतोंडे’विशेषांक, मग क(I)लाबाजार विशेषांक, चित्रकार राजा रवि वर्मा यांच्यावरचा विशेष संशोधनपर लेख असलेला विशेषांक आणि सरतेशेवटी गेल्यावर्षीचा ‘नग्नता;चित्रातली आणि मनातली’ विशेषांक असे चढत्या भाजणीनं ‘चिन्ह’चे एकेक विशेषांक येत गेले आणि ‘चिन्ह’ला एखाद्या ब्रॅंडचच रूप देत गेले. या सर्वांवर कडी केली ती ‘चिन्ह’च्या www.chinha.in या संकेतस्थळानं आणि फेसबुकवरच्या ‘चिन्ह’च्या `chinhamag' या अकाउंटनं दर वर्षी जेमेतेम 2000 प्रती निघणार्‍या ‘चिन्ह’ला या दोघांनी अक्षरश: ‘ग्लोबल’करून टाकलं.

आज ‘चिन्ह’च्या या संकेतस्थळावरच्या पीडीफ फाईल्स संपूर्ण जगभरातून वाचल्या जातात. जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही की जिथून ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाला हिट मिळाली नाहीये. ‘फेसबुक अ‍ॅडमिन’ आणि ‘गुगल स्टॅटिस्टिक’मुळे आता या सार्‍या हिट्स रोजच्या रोज पहाता येतात. हे सगळंच अक्षरश: अवाक्‌ करून टाकणारं, थक्क करून टाकणारं आहे. गेल्या अडीच-तीन वर्षात या संकेतस्थळाला 25 लाखापेक्षा जास्त हिट्स मिळाल्या आहेत. त्यातल्या निम्म्याहून अधिक या परदेशातून मिळालेल्या आहेत, तर उरलेल्या भारतातून.

आधी उत्साहानं आम्ही त्याचा हिशेब ठेवत होतो पण नंतर ते अवाक्याबाहेर जाऊ लागल्यावर थांबवलं.
पण हे सारं पाहताना ‘चिन्ह’कसं रूजत चाललंय याची जाणीव मात्र निश्चितपणे होत होती.
‘चिन्ह’च्या वेबसाईटवर नुकत्याच सुरू झालेल्या www.kalakird.in या ऑनलाईन आर्टिस्ट डिरेक्टरीनं
तर ‘चिन्ह’ला मिळणार्‍या हिट्समध्ये अक्षरश: आठ-दहा पटीनं वाढ केली आहे. या ‘कलाकीर्द’वर आता महाराष्ट्रातले चित्रकार दिसू लागलेत.  लवकरच संपूर्ण भारतातल्या चित्रकारांची माहितीही त्यावर उपलब्ध होणार आहे. जगभरातल्या कुणाही कलारसिकाला थेट त्या चित्रकाराकडूनच (कुणालाही कमीशनची कपर्दीकही न देता) चित्रं खरीदता येणार आहे. घरबसल्या भारतातल्या कुठल्याही गॅलरीतली प्रदर्शनं
पाहता येतील अशी सोयही त्यात आम्ही केली आहे. चित्रकला विषयक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारं पोर्टल
असंच त्याचं स्वरूप आम्ही योजलं आहे.

गेलं वर्ष हे ‘चिन्ह’चं रौप्यमहोत्सवी वर्ष होतं. त्यानिमित्तानं ‘चिन्ह’च्या नेहमीच्या अंकाशिवाय
एलिमेंटरी-इंटरमिजिएट परीक्षासाठीच्या ‘चित्रसूत्र’ची सुधारित आवृत्ती, शिवाय इंग्रजी आवृत्ती आणि
‘निवडक चिन्ह’(कलेक्टर्स एडिशनचे)‘गायतोंडेंच्या शोधात’ ‘जे जे जगी...’ आणि व्यक्तीचित्रं;शब्दातली’
हे तीन खंड  तसेच ‘चिन्ह’ची ऑन लाईन इंग्रजी आवृत्ती आणि ‘कलाकीर्द’ऑनलाईन आर्टिस्ट डिरेक्टरी
आणि वर्षाला 12 जाहीर कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम आम्ही आखला होता पण वर्षाच्या प्रारंभीच वडिलांचं अकस्मात निधन झालं आणि सारंच विस्कळीत झालं. त्यातला ‘कलाकीर्द’ऑन लाईन
डिरेक्टरीचा महत्त्वाकांक्षी संकल्प काय तो आम्ही पूर्ण करू शकलो पण इतर सर्वच संकल्प रेंगाळत गेले.
ते सारं या वर्षाच्या पूर्वार्धातच पूर्ण करीत आहोत.

आता येत्या आठ-दहा दिवसात ‘चिन्ह’चा ‘यत्न-प्रयत्न’ विशेषांक हा चौदावा अंक प्रसिद्ध होईल.
नंतर लगेच ‘चित्रसूत्र’च्या दोन्ही आवृत्त्या आणि लगोलग ‘निवडक’चे तीन खंड क्रमश: प्रसिद्ध होणार आहेत. ‘चिन्ह’ची इंग्रजी ऑन लाईन आवृत्तीही त्यानंतर लगेच प्रसिद्ध होऊ लागेल. त्याआधी येत्या फेब्रुवारीपासून दर महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी ठाण्याच्या ‘ठाणे कला भवन’मध्ये जाहीर मुलाखती, व्याख्यानं, स्लाईड शो, गप्पागोष्टी इत्यादीचा समावेश असलेला एक कार्यक्रम सुरू होतो आहे. 9 फेब्रुवारी रोजी पहिला कार्यक्रम आहे तो ‘चिन्ह’च्या यंदाच्या अंकात ज्यांची कव्हर स्टोरी आहे त्या चित्रकार ‘डॉक्टर सुबोध केरकर’यांच्या सचित्र व्याख्यानाचा.

आपण ठरवतो ते सारे संकल्प आयुष्यात पूर्ण होतील असं नसतं पण सतत आणि प्रामाणिक प्रयत्न करीत रहाणं मात्र आपल्या हातात असतं. ‘चिन्ह’च्या आगामी ‘यत्न-प्रयत्न’विशेषांकाचं हेच तर सूत्र आहे. जे आचरणात आणायचा मीही आजवर प्रयत्न करीत आलोय. ‘चिन्ह’मधून प्रचंड आर्थिक फायदा होईल असं काही मी स्वप्नातसुद्धा पाहिलं नाही आणि पाहिलं असतं तरी ते कधी पूर्ण होणार नाही हेही मला पक्क ठाऊक आहे. पण मराठीत केवळ इंग्रजीच्याच तोडीचं नाही तर त्याहीपेक्षा जबरदस्त असं ‘आर्ट मॅगझीन’प्रसिद्ध करण्याचं स्वप्न मात्र मी जरूर पाहिलं होतं आणि ते प्रत्यक्षात आणण्याचं भाग्य मला पंचवीस वर्षात का होईना, मिळालं, हे काय थोडं झालं?
सतीश नाईक
editor@chinha.in


Monday, January 14, 2013




कुठे होता इतके दिवस?
















परवा कुणीतरी ब्लॉगविषयी विचारलं आणि लक्षात आलं की
गेल्या चार-पाच महिन्यात आपण ब्लॉगजवळ फिरकलोही नाही.
अगदी उघडूनसुद्धा पाहिला नाही तो.
बापरे...

‘चिन्ह’च्या प्रत्येक नव्या अंकाचं काम हे सारं काही विसरून टाकायला लावणारं असतं
असं आम्ही जे नेहमी म्हणतो त्याचं हे एक उत्तम उदाहरण.
गेल्या चार-सहा महिन्यात नव्या अंकाच्या कामात ‘चिन्ह’ची सारी टीम इतकी गुंतली होती की
ब्लॉग उघडून पहायलादेखील वेळ मिळाला नाही. एरवी रोज सकाळी ब्लॉग ओपन करून पहाणं
आणि त्याला मिळणार्‍या हिट्स मोजणं आणि एखादी कमेंट आली का पहाणं हे मोठं उत्सुकता वाढवणारं
काम असतं. पण नव्या अंकाच्या निर्मितीत सारंच विसरायला झालं.
इतकं की या ब्लॉगद्वारे नव्या अंकाची माहिती वाचकांपर्यंत छानपणे पोहोचवता येते
हेसुद्धा आम्ही विसरलो. त्यामुळेच एकही नवा ब्लॉग अपलोड होऊ शकला नाही.

नेहमी प्रमाणे नव्या वर्षी करतात तो संकल्प याही वर्षी केलाय की
‘चिन्ह’चा हा ब्लॉग आता नेमानं चालवायचा-नियमितपणानं चालवायचा.
आठवड्यातून निदान एकदा तरी स्टोरी अपलोड होईल ना याकडे अधिक लक्ष द्यायचं वगैरे...
यंदा हे सारं खूप खूप मनावर घेतलंय. गेल्या वर्षीही घेतलं होतं पण वर्षाच्या सुरूवातीलाच
वडिलांचं अकस्मात निधन झालं आणि नंतर सारच प्लॅनिंग विस्कळीत झालं.
सारं वर्षच विलक्षण अस्ताव्यस्त आणि विखुरल्यासारखं गेलं.
त्यामुळे गेल्या वर्षीचा साराच कार्यक्रम यावर्षाच्या वाट्याला आला.

आता येत्या 10 - 15 दिवसात ‘चिन्ह’चा चौदावा अंक येईल.
मग महिन्याभरातच ‘चित्रसूत्र’च्या इंग्रजी-मराठी आवृत्त्या येतील.
मग लागोलाग ‘गायतोंडे’त्यानंतर ‘जे जे जगी...’आणि पाठोपाठ
व्यक्तीचित्रं;शब्दातली हे ‘निवडक’चे तीन खंड येतील.
एप्रिल किंवा मे महिन्याच्या आत ही सारी प्रकाशनं बाहेर येतील
आणि मग सुरू होईल तयारी ती आगामी 15 व्या अंकाची.
यंदा मात्र तो अगदी दिवाळीपूर्वीच प्रसिद्ध करायचा असं ठरवलंय.
त्यादृष्टीनं प्राथमिक कामही सुरू केलंय.
हे सारं टाईमटेबल पाळता यावं म्हणून आपल्या शुभेच्छा मात्र हव्यात.
तरच ते सारं शक्य आहे.

आणि हो, आणखी एक सांगायचं राहिलंय
ठाण्याच्या ‘ठाणे कला भवन’मध्ये फेब्रुवारीपासून दर महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी ‘चिन्ह’
आणि कलाकीर्द’तर्फे एक कार्यक्रम होणार आहे.
यात उपक्रमांमार्फत नामवंत चित्रकारांच्या मुलाखती, व्याख्यानं, चर्चा-गप्पागोष्टी,
स्लाईड-शोज्‌, फिल्म शोज्‌ असे विविध प्रकारचे कार्यक्रम सादर होणार आहेत.
चित्रकार माधव इमारते या सार्‍या कार्यक्रमाचं संयोजन करणार आहेत.
9 फेब्रुवारीच्या पहिल्या कार्यक्रमात ‘चिन्ह’च्या यंदाच्या अंकात ज्यांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध केली आहे
ते गोव्याचे चित्रकार, शिल्पकार, इन्स्टॉलेशन आर्टिस्ट सुबोध केरकर आपल्या कलाकृतींसंदर्भात बोलणार आहेत.
दिनांक : शनिवार 9 फेब्रुवारी 2013 
वेळ   : सायंकाळी 4 वाजता (4  ते 7), 
स्थळ  : ठाणे कला भवन, कापूरबावडी जंक्शन, स्टार सिटी मॉलशेजारी, जुना मुंबई-आग्रा महामार्ग, ठाणे(पश्चिम) 
आणि त्यानंतर उपस्थितांना त्यांना प्रश्न विचारायची संधी दिली जाणार आहे.
तूर्त इतकंच...(उद्या-परवा आणखी भेटूच)

सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह’

Thursday, October 11, 2012


चित्रकार-शिक्षक ‘चिन्ह’वाचतात?


चित्रकारांनी विशेषत: चित्रकार शिक्षकांनी ‘चिन्ह’वाचावा यासाठी ‘चिन्ह’नं सुरूवातीपासूनच खूप प्रयत्न केले. ‘आम्हाला यातून काय मिळणार?’ या आणि अशा प्रश्नांची उत्तरं द्यायची पाळीही आम्ही ओढवून घेतली. कला-साहित्य उद्योजकांकडून भेटवस्तू स्वीकारण्याची सवय असलेल्या काही शिक्षकांनी तर ‘आम्हाला अंकाची एक कॉपी भेट द्या म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना ते घ्यायला लावतो’ अशा ऑफर्सही ‘चिन्ह’ला दिल्या. ज्या ‘चिन्ह’नं साफ धुडकावून लावल्या. अर्थात यालाही अपवाद होतेच.कदाचित अशा अपवादांमुळेच ‘चिन्ह’ला आजची मजल मारता आली असावी.

चिपळूण, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर या सारख्या ठिकाणी तर अनेक कलाशिक्षक स्वत:च अंक मागवत आणि शेजार-पाजारच्या गावातल्या शिक्षकांना ते घ्यायला लावत किंवा विद्यार्थ्यांना वाचायला लावत. आज तिथल्या ‘चित्रसाक्षर’विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. मुंबैतल्या नामवंत कलामहाविद्यालयात वरच्या वर्गावर शिकणारे विद्यार्थी जेव्हा ‘चिन्ह’हे काय आहे असं जेव्हा विचारतात तेव्हा खरंच गलितगात्र झाल्यासारखं वाटतं. पण अशाच वेळी जेव्हा महाराष्ट्राच्या खेडेगावातून एखादा विद्यार्थी फोनवरून ‘चिन्ह’संबंधी चर्चा करतो तेव्हा आजवर केलेल्या कष्टाचं चीज केल्यासारखं वाटतं!

पण आजही परिस्थिती बदलते आहे. मोठ्या संख्येने चित्रकला शिक्षक वाचू लागलेत, चर्चा करू लागलेत, विद्यार्थ्यांना वाचायला प्रवृत्त करू लागलेत. त्याचे परिणाम आज ‘चिन्ह’चं काम करताना जाणवू लागलेत. पण अधेमधे उदासवाणे अनुभव येतात आणि असे अनुभव शेअर केल्याशिवाय रहावतही नाही. ‘चिन्ह’च्या अंक 14 चा प्रचार-प्रसार आणि बुकींग आम्ही सुरू केलंय. अशाच एका कलाशिक्षकाला ‘चिन्ह’नं फोन केला. ‘यंदाचा ‘चिन्ह’चा अंक बुक करायचाय का?’ तर ते शिक्षक म्हणाले नाही, पहातो, कळवतो.’ ‘अहो गेल्या वर्षी अंक घेतला होता ना म्हणून यंदा फोन केलाय. आताच नाव नोंदवल्यास सवलतीत मिळेल’ इती ‘चिन्ह’. तर ते शिक्षक म्हणाले नाही! त्याचं काय आहे गेल्या वर्षी वडिलांनी आणायला सांगितला होता म्हणून घेतला होता, यंदा नकोय!’ आणि वर ‘कुणाला हवा असेल तर कळवतो’ असंही सांगायला ते शिक्षक विसरले नाही. अक्षरश: थिजवून टाकणारा हा अनुभव. महाराष्ट्राच्या कलाशिक्षणची काय वाताहत झाली आहे हे या किश्शावरून स्पष्ट व्हायला काहीच हरकत नाही.

चित्रकार आणि चित्रकलाशिक्षकांचं ‘चिन्ह’वाचण्याचं प्रमाण आता आता वाढतंय असं जरी असलं तरी चित्रकलाक्षेत्राच्या बाहेरील क्षेत्रात ‘चिन्ह’वाचण्याचं प्रमाण सुरूवातीपासूनच खूप होतं आणि गेल्यावेळच्या ‘नग्नता’अंकानंतर तर ते खूपच मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. नाटक,चित्रपट,संगीत,साहित्य, पत्रकारिता या क्षेत्रातील नामवंतांचा तसेच उदयोन्मुखांचाही ‘चिन्ह’ला फार मोठा पाठींबा आहे. फेसबुकवरून किंवा ब्लॉगवरून ते ‘चिन्ह’चा ट्रॅक ठेवून असतात. ‘चिन्ह’च्या अंकाची घोषणा होताच ते त्यांच्या प्रती तात्काळ बुक करतात. या सार्‍यांशीच वेळप्रसंगी गप्पा मारणं, चर्चा करणं हा सुखद अनुभव आसतो.

एकदा आठवतेय जब्बार पटेल जवळ जवळ अर्धा-पाऊण तास ‘चिन्ह’आणि चित्रकलेसंदर्भात बोलत होते. तो फोन टेप करायला हवा होता असं नंतर राहून राहून वाटत होतं. अंक वाचल्याबरोबर नेमाने येणारा माधव गडकरींचा फोन एक वेगळंच बळ देत असे किंवा चित्रकार माधव सातवळेकरांचा फोन सार्‍या कष्टाचं परिमार्जन करायला लावणारा असायचा. डॉ.अनिल अवचट, विश्वास पाटील, वसंत सरवटे, मधू गडकरी, अजय देशपांडे(युगवाणी), अनिल सोनार, अशोक राणे, अतुल देऊळगांवकर, डीसीपी चंद्रशेखर कानडे, डॉ.माधवी मेहेंदळे, कविता महाजन, डॉ.रविंद्र बापट, श्रीकांत लागू, अशोक जैन, दत्ता मोने, प्रवीण बर्दापूरकर, राजा ढाले, रजनी दांडेकर, श्रीराम जोग, श्रीराम रानडे, विश्वास कणेकर, वसुंधरा पेंडसे नाईक, संजीवनी खेर, अनंत सामंत, अनिल किणीकर, अपर्णा वेलणकर, अशोक कोठावळे, भारत सासणे, कमलाकर नाडकर्णी, कुमार केतकर, डॉ.प्रकाश कोठारी, अनंत भावे, राजन खान, राजू परूळेकर अशी नावे तरी किती सांगावी?

एक वेगळा अनुभव मात्र सांगावासा वाटतो. लेखक पत्रकार संपादक वसंत सोपारकर यांचा असाच एके दिवशी फोन आला. काय ओळखलं का? आता फोनवर आवाजावरून कसं ओळखायचं? तर म्हणाले एक क्ल्यु देतो. तुम्ही लोकप्रभात असताना आपण बाहेर बसून समस्त संपादक वर्गाची टिंगल टवाळी करीत असू...तर मी म्ह्टलं सोपारकर बोलतायत का? तर म्हणाले दे टाळी. खूप सुंदर अंक काढलाय. कुठे मिळेल. म्हटलं पाठवतो, पत्ता द्या. तर म्हणाले पाठवू नको मी तुझ्या घरीच येतो न्यायला आणि अर्थातच जेवायलाही. पण पंधरा-वीस दिवस ते काही आलेच नाही. मग आम्ही त्यांना फोन केला तर म्हणाले नाही, नाही मी येतोच, त्याच रस्त्यावरून मी पूर्वी माझ्या गावाला वाड्याला जात असे. मी येतोच अंक पाठवू नकोस! पण नंतरही ते काही आले नाहीत मग आम्हीच त्यांना फोन केला आणि पत्ता घेऊन अंक कुरियर केला. तेव्हा म्हणाले अंक जरा तब्येतीचं उचकलं म्हणून आलो नाही पण लवकरच येतो, अंक नको पाठवू पण आम्ही अंक पाठवलाच आणि नंतर काही दिवसात आली ती त्यांच्या अकस्मात निधनाची बातमीच.


Saturday, August 18, 2012


‘निवडक चिन्ह’ का आणि कशासाठी ?

‘चिन्ह’च्या गायतोंडे अंकाची एखादी प्रत आहे का हो ? एक तरी पहा ना ? तुटलेली, फाटलेलीही चालेल ! असे फोन ‘चिन्ह’ला वारंवार येत असतात. गायतोंडे अंकाबाबतच केवळ नव्हे तर अन्य अंकाबाबतही. मग त्यांची समजूत काढताना नाकीनऊ येतात. सदर अंक ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, तिथं वाचा. वगैरे सांगितलं तरी त्यांची समजूत पटत नाही. त्यांना त्या अंकाची एखादी तरी प्रत हवी असते.

२००१ साली ‘चिन्ह’चं प्रकाशन पुन्हा सुरु झाल्यानंतर वारंवार येणारा हा अनुभव. समोरच्या व्यक्तीला त्या अंकाची प्रत काही करून हवीच असते आणि आमच्यापाशी त्याची एकही प्रत नसते. आता काय करायचं ? यावर उपाय म्हणून ‘निवडक चिन्ह’ची निर्मिती केली गेली. पहिल्या पर्वातल्या १९८७, ८८, ८९ मधील तिन्ही अंकातील निवडक साहित्याचा पहिला खंड २००९ साली प्रसिद्ध झाला. तो हळूहळू विकला गेला, पण आता संपत आलाय. त्याची आवृत्ती पुढे काढायची किंवा नाही की वेबसाईट्वर टाकायची या विषयीचा निर्णय त्या सर्वच प्रती संपल्यावर घेतला जाईल.

मधल्या काळात २००१ सालापासून प्रसिद्ध झालेल्या अंकातील काही अंकही संपून गेले. त्याही अंकाला सातत्यानं मागणी होऊ लागली. म्हणून मग दुसर्‍या पर्वातील ‘निवडक चिन्ह’चे तीन खंड प्रसिद्ध करावयाचा निर्णय घेतला. यंदाचं वर्ष हे ‘चिन्ह’चं रौप्यमहोत्सवी वर्ष. ‘निवडक चिन्ह’चं प्रकाशन करण्यासाठी हे निमित्त पुरेसं वाटलं. म्हणून ‘निवडक चिन्ह’च्या तीन खंडाची घोषणा आम्ही केली.

२००१ सालापासून २००७ सालापर्यंतच्या अंकातील निवडक साहित्य या खंडासाठी निवडलं आहे. खरंतर या अंकातील निवडक साहित्याचे ६ खंड प्रकाशित होऊ शकतात. पण तूर्त तरी तीनच खंड प्रसिद्ध करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही योजना यशाची ठरली तर पुढील वर्षी तीन खंड जरूर प्रसिद्ध करू. या योजनेला पहिल्या दिवसापासून जो प्रतिसाद लाभतो आहे तो पहाता ही तीन खंडाची योजना यशस्वी होईलच याविषयी आमच्या मनात तरी शंका उरलेली नाही. त्यामुळे भास्कर कुलकर्णींवरचा खंड आणि आत्मकथनं तसेच विविध लेखविषयक खंड असे तीन खंड बहुदा पुढील वर्षी प्रसिद्ध होतील.

वर म्हटल्याप्रमाणे २००१ ते २००७ सालातील अंकामधलं निवडक साहित्य या खंडासाठी निवडण्यात आलं आहे. २००८ सालचा अंक क(।)लाबाजारचा अंक असल्याने त्यातील फक्त ‘जेजे जगी...’ या लेखमालेतील लेखांचीच निवड निवडकसाठी करण्यात आली आहे. बाकी संपूर्ण अंक ‘अंगावर येतो’, ‘वाचवत नाही’, ‘हे सारं भयंकर आहे’, ‘नकारात्मक आहे’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्यामुळे ‘निवडक’मध्ये समाविष्ट करणं टाळलं आहे. त्या नंतरचे अंक हे जवळ जवळ ‘कलेक्टर्स एडीशन’चेच अंक असल्याने त्यांचाही समावेश ‘निवडक’मध्ये करण्यात येणार नाहीये.

जेव्हा हे अंक प्रसिद्ध झाले तेव्हा ते रंगीत स्वरुपात प्रसिद्ध करणे ‘चिन्ह’ला शक्य झाले नव्हते. ती कसर मात्र आता भरून काढणार आहोत. हे सर्वच्या सर्व खंड आर्टपेपरवर प्रसिद्ध केले जाणार आहेत आणि संपूर्णत: रंगीत स्वरुपात ते असणार आहेत. या लेखांसाठी चित्रं आणि प्रकाशचित्रांची निवड पुन्हा नव्याने करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची मांडणी, सजावट सारं सारंच अत्याधुनिक स्वरुपात असणार आहे. आणि मुख्य म्हणजे हे तिन्ही खंड हार्डबाऊंडमध्ये असणार आहेत. जेणेकरून ते पुढची निदान ५०-७५ वर्षे तरी वाचले जावेत. ‘चिन्ह’च्या अभिनव चळवळीचं चित्रकलावर्तुळाच्या दृष्टीनं, वाड़्मयीन किंवा सांस्कृतिक दृष्टीकोनातून महत्त्व विषद करणार्‍या नामवंताच्या प्रदीर्घ प्रस्तावना हे या खंडाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे.

आता या तिन्ही खंडाची प्राथमिक जुळवाजुळव पूर्ण झाली आहे. यातला सर्वात अवघड खंड होता तो ‘गायतोंडे’ यांच्यावरचा, त्यांची चित्रं, प्रकाशचित्रं मिळवताना खूप अडचणी आल्या त्यामुळे प्रकाशनाला थोडासा वेळ झाला. पण आता त्या अडचणी सुटत आल्या आहेत. लवकरच त्याचं प्रकाशन व्हावं अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर वर्ष अखेरपर्यंत अन्य दोन्ही खंड प्रसिद्ध होतील.

‘चिन्ह’च्या प्रकाशनाना नेहमीच थोडासा किंवा अनेकदा जास्तही उशिर होत असतो याचं कारण ते प्रकाशन जास्तीतजास्त परिपूर्ण कसं होईल हे आम्ही काटेकोरपणे पहात असतो. तिथं कुठलीही तडजोड आम्ही करत नाही. असं करताना अनेकदा पृष्ठ संख्या वाढते. मूळ बजेट वाढतं पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो त्यामागचा हेतू हाच असतो की ‘चिन्ह’चं प्रकाश्न जबरदस्त व्हावं. आणि ते होत जातंही. ‘चिन्ह’नं देशाच्या कानाकोपर्‍यातच नव्हे तर परदेशातही जोडलेले हजारो वाचक ही त्याचीच तर खूण आहे.

Monday, August 13, 2012




पुन्हा ‘कलाकीर्द’......



१९८१ साली मी चित्रकलेच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्याआधीच मी पत्रकारितेच्या क्षेत्रात जाऊन पोहोचलो होतो. चित्रं काढून तेव्हा पोट भरलं नसतं त्यामुळे नोकरी करणं भाग होतं. त्यामुळे आवडत्या क्षेत्रातली नोकरी चालून आल्यावर मी ती स्वीकारलीच. दिवसभर पत्रकारिता आणि उरलेल्या वेळात चित्रकारीता अशी मुशाफिरी सुरू झाली. जे जे करीत होतो त्यात यश मिळू लागलं होतं. साहजिकच महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या. मोठमोठाली स्वप्न पडत गेली. त्यातलं एक मोठं स्वप्न होतं आर्ट अ‍ॅन्ड आर्टिस्ट डिरेक्टरीचं. माहितीचं युग वगैरे अवतरायचं होतं. संगणकाने नुकताच भारतात प्रवेश केला होता. परिस्थिती खूप वेगळी होती, आता सांगितलं तर ऐकणार्‍याला भयंकर आश्चर्य वगैरे वाटेल पण कुणाला फोन करायचा म्हटलं तरी किमान एकदीड किलोमिटर अंतर चालून जावं लागायचं आणि मग एखाद्या वाण्याकडून किंवा दुकानातून फोन करायचा. एसटीडी वगैरे असेल तर भलतीच बोंब व्हायची. पण जेजे मधे शिकत असतानाच माहिती जमवण्याचा नाद मला लागला होता. त्यामुळे चित्र अणि चित्रकलेविषयीची सारीच माहिती मी त्या काळात जमवून ठेवली होती. जी मी या डिरेक्टरीमध्ये वापरली. एखादं पुस्तक तयार करणं वगैरे म्हणजे भयंकर दिव्य केल्यासारखं वाटायचं त्या काळात. कारण सारं काही आतासारखं संगणकावर करता येत नव्हतं. हातानेच करावं लागायचं. अगदी स्पेलिंग मिस्टेक वगैरेसुद्धा ब्लेडने कापाकापी करून कराव्या लागायच्या. हॉरिबल होता तो अनुभव.

यशवंत चौधरींसारख्या ज्येष्ठांनी सबूरीचा सल्ला दिला होता. घाई नको करू म्हणाले होते पण आम्ही आपले घोड्यावर होतो. त्यात तरुण, त्यात भयंकर महत्त्वाकांक्षी वगैरे. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून दीड-दोन वर्ष अथक प्रयत्न करून अखेर ती डिरेक्टरी एकदाची प्रसिद्ध केलीही. आधीचा प्रकाशनाचा, मार्केटिंग वगैरेचा अनुभव नव्हता साहजिकच प्रॉडक्ट चांगलं असूनही १९८५ साली भयंकर मार खावा लागला. त्या काळात जवळ जवळ अडीज-तीन लाखांचा चुराडा झाला. काम खूप चांगलं आहे. पायोनियरींग एफर्ट वगैरे पण लोकांना हे असं काही घेऊन वाचायची संवयच मुळी नव्हती. (विशेषत: चित्रकला क्षेत्राला) साहजिकच भयंकर आर्थिक फटका बसला.

त्यातून बाहेर पडायला तारुण्य आणि जबर आर्थिक किंमत मोजावी लागली. नंतरची १०-१५ वर्ष अक्षरश: कर्ज फेडण्यातच गेली. नंतर तर अक्षरश: त्यांची कव्हर काढून ती पुस्तकं रद्दीवाल्याला विकावी लागली. भयंकर प्रसंग होते ते. पण मस्ती अद्याप जिरली नव्हती. मग ‘चिन्ह’चे अंक सुरू झाले. पहिल्याच प्रयत्नात ‘चिन्ह’ला पुलंपासून ते थेट एखाद्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यानं नावाजलं. पण पुन्हा वेळेचं गणित आडवं आलं. मार्केटींग जमलं नाही. सबब ‘चिन्ह’चं प्रकाशनही बंद करावं लागलं. तब्बल १२ वर्ष सारं काही बंद होतं.

पत्रकारितेतली नोकरी सोडली आणि पुन्हा संपादनासाठी हात हुळहुळायला लागले. विषय डोक्यात गरगरा फिरायला लागले. पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि २००१ साली ‘चिन्ह’ची मुद्रा झळाळून उठली. त्यानंतरचा इतिहास तर सार्‍यांनाच ठाऊक आहे. प्रत्येक अंकानंतर ‘चिन्ह’चा प्रभाव ठसठशीत होत गेला.

आता २५ वर्षापेक्षा जास्त काळ झाला या सार्‍याला. पण ‘कलाकीर्द’चं अपयश मात्र ठुसठुसतच होतं. इथून आता पायउतार व्हायचं असेल तर जिथे आपण आयुष्यातलं पहिलं अपयश भोगलं तेच पुन्हा यशस्वी करून दाखवायचं आणि मगच पुन्हा आपल्या मूळगावी, पेंटिंगकडे वळायचं असं काहीसं मनाशी निश्चित झालं. आता परिस्थितीही बदलली होती. फोनची जागा मोबाईलनं घेतली होती. हातात एक नाही दोन नाही तब्बल तीन मोबाईल होते. डेस्कटॉप, लॅपटॉप सारं काही दिमतीला होतं. इंटरनेटवरून लाखो वेबसाईट्स हात जोडून दिमतीला उभ्या होत्या. मग पुन्हा हे कलाकीर्दचं लोढणं गळ्यात का लावून घेताय राव ? माझं मीच एकदा मला विचारलं. उत्तर मिळालं. १९८५ साली ‘कलाकीर्द’ प्रसिद्ध केल्यानंतर आजतागायत त्याची कॉपी कुणाला करता आली नाही. संस्था, संघटना, प्रकाशन संस्था, सरकारी विभाग कुणालाच ते धाडस करता आलं नाही. याचाच दुसरा अर्थ असा की हे कार्य आता आपल्याच हातून पूर्ण व्हावे अशी बहुदा नियतीची इच्छा असावी. ‘कलाकीर्दचा’ प्रोमो दाखवायला सुरुवात केली आणि जवळजवळ १५ दिवसातच जगभरातल्या दीड लाख कलारसिकांनी तो पाहिला असं जेव्हा लक्षात आलं तेव्हाच या अभिनव डिरेक्टरीची उपयुक्तता (एवढ्या वेबसाईट्स असतानासुद्धा) सिद्ध झाली.

आता वाचकांना / प्रेक्षकांना नुसती कलावंताची माहिती मिळणार नाहीये तर त्यांची चित्रंही पहाता येणार आहेत, त्यांचा स्टुडियो पहाता येणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला कलावंताशी थेट संवाद साधता येणार आहे. हवं असलं तर त्यांना त्या कलावंताकडून थेट चित्र-शिल्प विकत घेता येणार आहे. (मध्ये कुणीही मध्यस्थ असणार नाहीये) याशिवाय चित्रकलेविषयीची जी जी माहिती त्याला हवी असेल तीती त्याला केवळ बटण दाबताच उपलब्ध होणार आहे. भारतातली सारीच्या सारी प्रदर्शनं त्याला काही काळातच इथं पहायला मिळणार आहेत. कलादालनं, कलावस्तूसंग्रहालयं, कलामहाविद्यालयं एक ना दोन कलाविषयक सारीच्या सारी माहितीच त्याला इथं उपलब्ध होणार आहे.

‘चिन्ह’ची इंग्रजी आवृत्ती लवकरच इ-मॅगेझिनच्या स्वरुपात प्रसिद्ध होणार आहे. तिही त्याला इथंच वाचता येणार आहे. आणि सर्वात सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक कलाविषयक वृत्तपत्र लवकरच इथंच प्रसिद्ध होणार आहे. ‘चिन्ह’च्या या इ-पेपरमध्ये भारतातली प्रत्येक कलाविषयक माहिती दिली जाणार आहे. आता चित्रकलेच्या माहितीसाठी, बातम्यांसाठी इतर वृत्तपत्रं, मासिक वाचायला नकोच. रोज www.chinha.in ला भेट द्या. कलाविषयक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं मिळेल याची खात्री बाळगा.


‘कलाकीर्द’च्या अधिक माहितीसाठी आमच्या ‘कलाकीर्द’ या पानाला भेट द्या.
http://www.facebook.com/pages/KalaKird-art-artists-Directory-of-India/238741786200542