Friday, November 10, 2017

' साम मराठी 'वर ' चिन्ह ' आणि ' गायतोंडे '…


शनिवारी रात्री ९.०० वाजता सलील साखळकरांचा बँगलोरहून फोन . 
नेहमीप्रमाणे भयंकर घाईतच ते बोलत होते . " अहो सतीश , असा काय तो कार्यक्रम ? तो नेमका कशावर होता ? आणि मग कोलते सर का नाही फारसं बोलले त्यात ? इत्यादी इत्यादी . मी क्षणभर गोंधळूनच गेलो , कारण ते काय बोलत होते त्याचा पुढचा मागचा संदर्भच मला कळत नव्हता . आणि त्यांचा आपला प्रश्नांचा मारा चालूच . अखेर मी त्यांना महतप्रयासाने थांबवलं . अहो , म्हटलं " तुम्ही आधी कशाबद्दल बोलताय ते मला नीट सांगा . कसला कार्यक्रम ? कुठे होता ? कुठल्या वाहिनीवर होता का ? " या प्रश्नानं तेच बिचारे गोंधळून गेले . " अहो , सतीश , तुम्हाला खरंच माहित नाही का ? ' चिन्ह 'चं एवढं नाव घेतलं . ' गायतोंडे ' ग्रंथाचा एवढा उल्लेख झाला . तुम्हाला ठाऊक नव्हतं ? कमलेश देवरुखकरांच्या हातात तर ' गायतोंडे ' ग्रंथ देखील दिसत होता , हे तुम्हाला ठाऊक नव्हतं ? " मी म्हटलं " नाही , कसं असणार . मी काही कुठं वाचलं नाही किंवा मला कुणी काही कळवलं नाही ."
ते ऐकून सलील आणखीनच थक्क झाले " म्हणजे ? तुम्हाला कुणाचा एसेमेस देखील आला नाही ? मला इथं बँगलोरमध्ये आला आणि तुम्हाला का नाही आला ? " म्हटलं " मला ठाऊक नाही का नाही आला ते . आणि ते जाणून घेण्याची उत्सुकता देखील नाही . आता मला सांगा नक्की काय प्रकार झाला ? " तेव्हा ते सांगू लागले " ' साम मराठी ' वाहिनीवर चित्रकलेच्या संदर्भात नुकताच एक कार्यक्रम झाला . त्यात कुणी हिमांशू कदम , कमलेश देवरुखकर , शर्मिला फडके आणि कोलते सर सहभागी होते . त्यात ' चिन्ह 'च्या आजवरच्या कामाचा खूप चांगला उल्लेख झाला , पण ते सारं अर्धवट वाटलं . एडिटींग करताना काही गोंधळ झाला का ?" त्यावर मी त्यांना म्हटलं " याविषयी मला खरोखरच काही ठाऊक नव्हतं आणि नाही . विचारून हवं तर सांगतो ." नंतर नेहमीप्रमाणे भरपूर गप्पा झाल्यावर आम्ही फोन ठेवला .
शनिवारी रात्री नऊनंतर कुणाला फोन करणं योग्य वाटलं नाही . आणि दुसऱ्या दिवशी तर रविवारच होता . साहजिकच तो विषय विसरून देखील गेलो . पण आज फेसबुक वर स्क्रोलींग करत असताना चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्या संदर्भात पोस्ट पाहिली आणि मग सारा उलगडा झाला . ' आवाज महाराष्ट्राचा ' या ' साम मराठी 'वरच्या चर्चात्मक कार्यक्रमात सलील साखळकर म्हणत होते तो ' चिन्ह ' विषय चर्चीला गेला होता . माझा साहाय्यक नयन तरे यानं मग You Tube वरून तो सगळा कार्यक्रम मग शोधून काढला आणि तो आता इथं अपलोड केला आहे . ज्यांना तो संपूर्ण कार्यक्रम पाहायचाय त्यांनी पुढील लिंकवर क्लिक करून पाहावा .

 https://www.youtube.com/watch?v=Z8wO7GIhEyA

No comments:

Post a Comment