Monday, January 14, 2013




कुठे होता इतके दिवस?
















परवा कुणीतरी ब्लॉगविषयी विचारलं आणि लक्षात आलं की
गेल्या चार-पाच महिन्यात आपण ब्लॉगजवळ फिरकलोही नाही.
अगदी उघडूनसुद्धा पाहिला नाही तो.
बापरे...

‘चिन्ह’च्या प्रत्येक नव्या अंकाचं काम हे सारं काही विसरून टाकायला लावणारं असतं
असं आम्ही जे नेहमी म्हणतो त्याचं हे एक उत्तम उदाहरण.
गेल्या चार-सहा महिन्यात नव्या अंकाच्या कामात ‘चिन्ह’ची सारी टीम इतकी गुंतली होती की
ब्लॉग उघडून पहायलादेखील वेळ मिळाला नाही. एरवी रोज सकाळी ब्लॉग ओपन करून पहाणं
आणि त्याला मिळणार्‍या हिट्स मोजणं आणि एखादी कमेंट आली का पहाणं हे मोठं उत्सुकता वाढवणारं
काम असतं. पण नव्या अंकाच्या निर्मितीत सारंच विसरायला झालं.
इतकं की या ब्लॉगद्वारे नव्या अंकाची माहिती वाचकांपर्यंत छानपणे पोहोचवता येते
हेसुद्धा आम्ही विसरलो. त्यामुळेच एकही नवा ब्लॉग अपलोड होऊ शकला नाही.

नेहमी प्रमाणे नव्या वर्षी करतात तो संकल्प याही वर्षी केलाय की
‘चिन्ह’चा हा ब्लॉग आता नेमानं चालवायचा-नियमितपणानं चालवायचा.
आठवड्यातून निदान एकदा तरी स्टोरी अपलोड होईल ना याकडे अधिक लक्ष द्यायचं वगैरे...
यंदा हे सारं खूप खूप मनावर घेतलंय. गेल्या वर्षीही घेतलं होतं पण वर्षाच्या सुरूवातीलाच
वडिलांचं अकस्मात निधन झालं आणि नंतर सारच प्लॅनिंग विस्कळीत झालं.
सारं वर्षच विलक्षण अस्ताव्यस्त आणि विखुरल्यासारखं गेलं.
त्यामुळे गेल्या वर्षीचा साराच कार्यक्रम यावर्षाच्या वाट्याला आला.

आता येत्या 10 - 15 दिवसात ‘चिन्ह’चा चौदावा अंक येईल.
मग महिन्याभरातच ‘चित्रसूत्र’च्या इंग्रजी-मराठी आवृत्त्या येतील.
मग लागोलाग ‘गायतोंडे’त्यानंतर ‘जे जे जगी...’आणि पाठोपाठ
व्यक्तीचित्रं;शब्दातली हे ‘निवडक’चे तीन खंड येतील.
एप्रिल किंवा मे महिन्याच्या आत ही सारी प्रकाशनं बाहेर येतील
आणि मग सुरू होईल तयारी ती आगामी 15 व्या अंकाची.
यंदा मात्र तो अगदी दिवाळीपूर्वीच प्रसिद्ध करायचा असं ठरवलंय.
त्यादृष्टीनं प्राथमिक कामही सुरू केलंय.
हे सारं टाईमटेबल पाळता यावं म्हणून आपल्या शुभेच्छा मात्र हव्यात.
तरच ते सारं शक्य आहे.

आणि हो, आणखी एक सांगायचं राहिलंय
ठाण्याच्या ‘ठाणे कला भवन’मध्ये फेब्रुवारीपासून दर महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी ‘चिन्ह’
आणि कलाकीर्द’तर्फे एक कार्यक्रम होणार आहे.
यात उपक्रमांमार्फत नामवंत चित्रकारांच्या मुलाखती, व्याख्यानं, चर्चा-गप्पागोष्टी,
स्लाईड-शोज्‌, फिल्म शोज्‌ असे विविध प्रकारचे कार्यक्रम सादर होणार आहेत.
चित्रकार माधव इमारते या सार्‍या कार्यक्रमाचं संयोजन करणार आहेत.
9 फेब्रुवारीच्या पहिल्या कार्यक्रमात ‘चिन्ह’च्या यंदाच्या अंकात ज्यांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध केली आहे
ते गोव्याचे चित्रकार, शिल्पकार, इन्स्टॉलेशन आर्टिस्ट सुबोध केरकर आपल्या कलाकृतींसंदर्भात बोलणार आहेत.
दिनांक : शनिवार 9 फेब्रुवारी 2013 
वेळ   : सायंकाळी 4 वाजता (4  ते 7), 
स्थळ  : ठाणे कला भवन, कापूरबावडी जंक्शन, स्टार सिटी मॉलशेजारी, जुना मुंबई-आग्रा महामार्ग, ठाणे(पश्चिम) 
आणि त्यानंतर उपस्थितांना त्यांना प्रश्न विचारायची संधी दिली जाणार आहे.
तूर्त इतकंच...(उद्या-परवा आणखी भेटूच)

सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह’

2 comments:

  1. सुबोध केरकर?? म्हणजे तेच ते गणपतीची विचित्र चित्रं काढणारे का? मायकेल एंजेलोचा सहाय्यक,गणपती ऍज अ क्राइस्ट वॉकिंग ऑन वॉटर, सुमो रेसलर , आणि बऱ्याच प्रकारचे असे गणपती पेंट केलेले आहेत या केरकराने.,कोलांटी उडी मारणारा गणपती, आणि नग्न गणपती. ही त्याची चित्रं कलंगुट जवळच्या एका गॅलरी मध्ये लावली होती.

    ReplyDelete
  2. चिन्हची मासिक वर्गणी किती आणि ती पाठविण्याचा पत्ता rsatya@mtnl.net.in या ई मेलबर पाठवावा

    ReplyDelete