पुन्हा ‘कलाकीर्द’......
१९८१ साली मी चित्रकलेच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्याआधीच मी पत्रकारितेच्या क्षेत्रात जाऊन पोहोचलो होतो. चित्रं काढून तेव्हा पोट भरलं नसतं त्यामुळे नोकरी करणं भाग होतं. त्यामुळे आवडत्या क्षेत्रातली नोकरी चालून आल्यावर मी ती स्वीकारलीच. दिवसभर पत्रकारिता आणि उरलेल्या वेळात चित्रकारीता अशी मुशाफिरी सुरू झाली. जे जे करीत होतो त्यात यश मिळू लागलं होतं. साहजिकच महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या. मोठमोठाली स्वप्न पडत गेली. त्यातलं एक मोठं स्वप्न होतं आर्ट अॅन्ड आर्टिस्ट डिरेक्टरीचं. माहितीचं युग वगैरे अवतरायचं होतं. संगणकाने नुकताच भारतात प्रवेश केला होता. परिस्थिती खूप वेगळी होती, आता सांगितलं तर ऐकणार्याला भयंकर आश्चर्य वगैरे वाटेल पण कुणाला फोन करायचा म्हटलं तरी किमान एकदीड किलोमिटर अंतर चालून जावं लागायचं आणि मग एखाद्या वाण्याकडून किंवा दुकानातून फोन करायचा. एसटीडी वगैरे असेल तर भलतीच बोंब व्हायची. पण जेजे मधे शिकत असतानाच माहिती जमवण्याचा नाद मला लागला होता. त्यामुळे चित्र अणि चित्रकलेविषयीची सारीच माहिती मी त्या काळात जमवून ठेवली होती. जी मी या डिरेक्टरीमध्ये वापरली. एखादं पुस्तक तयार करणं वगैरे म्हणजे भयंकर दिव्य केल्यासारखं वाटायचं त्या काळात. कारण सारं काही आतासारखं संगणकावर करता येत नव्हतं. हातानेच करावं लागायचं. अगदी स्पेलिंग मिस्टेक वगैरेसुद्धा ब्लेडने कापाकापी करून कराव्या लागायच्या. हॉरिबल होता तो अनुभव.
यशवंत चौधरींसारख्या ज्येष्ठांनी सबूरीचा सल्ला दिला होता. घाई नको करू म्हणाले होते पण आम्ही आपले घोड्यावर होतो. त्यात तरुण, त्यात भयंकर महत्त्वाकांक्षी वगैरे. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून दीड-दोन वर्ष अथक प्रयत्न करून अखेर ती डिरेक्टरी एकदाची प्रसिद्ध केलीही. आधीचा प्रकाशनाचा, मार्केटिंग वगैरेचा अनुभव नव्हता साहजिकच प्रॉडक्ट चांगलं असूनही १९८५ साली भयंकर मार खावा लागला. त्या काळात जवळ जवळ अडीज-तीन लाखांचा चुराडा झाला. काम खूप चांगलं आहे. पायोनियरींग एफर्ट वगैरे पण लोकांना हे असं काही घेऊन वाचायची संवयच मुळी नव्हती. (विशेषत: चित्रकला क्षेत्राला) साहजिकच भयंकर आर्थिक फटका बसला.
त्यातून बाहेर पडायला तारुण्य आणि जबर आर्थिक किंमत मोजावी लागली. नंतरची १०-१५ वर्ष अक्षरश: कर्ज फेडण्यातच गेली. नंतर तर अक्षरश: त्यांची कव्हर काढून ती पुस्तकं रद्दीवाल्याला विकावी लागली. भयंकर प्रसंग होते ते. पण मस्ती अद्याप जिरली नव्हती. मग ‘चिन्ह’चे अंक सुरू झाले. पहिल्याच प्रयत्नात ‘चिन्ह’ला पुलंपासून ते थेट एखाद्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यानं नावाजलं. पण पुन्हा वेळेचं गणित आडवं आलं. मार्केटींग जमलं नाही. सबब ‘चिन्ह’चं प्रकाशनही बंद करावं लागलं. तब्बल १२ वर्ष सारं काही बंद होतं.
आता २५ वर्षापेक्षा जास्त काळ झाला या सार्याला. पण ‘कलाकीर्द’चं अपयश मात्र ठुसठुसतच होतं. इथून आता पायउतार व्हायचं असेल तर जिथे आपण आयुष्यातलं पहिलं अपयश भोगलं तेच पुन्हा यशस्वी करून दाखवायचं आणि मगच पुन्हा आपल्या मूळगावी, पेंटिंगकडे वळायचं असं काहीसं मनाशी निश्चित झालं. आता परिस्थितीही बदलली होती. फोनची जागा मोबाईलनं घेतली होती. हातात एक नाही दोन नाही तब्बल तीन मोबाईल होते. डेस्कटॉप, लॅपटॉप सारं काही दिमतीला होतं. इंटरनेटवरून लाखो वेबसाईट्स हात जोडून दिमतीला उभ्या होत्या. मग पुन्हा हे कलाकीर्दचं लोढणं गळ्यात का लावून घेताय राव ? माझं मीच एकदा मला विचारलं. उत्तर मिळालं. १९८५ साली ‘कलाकीर्द’ प्रसिद्ध केल्यानंतर आजतागायत त्याची कॉपी कुणाला करता आली नाही. संस्था, संघटना, प्रकाशन संस्था, सरकारी विभाग कुणालाच ते धाडस करता आलं नाही. याचाच दुसरा अर्थ असा की हे कार्य आता आपल्याच हातून पूर्ण व्हावे अशी बहुदा नियतीची इच्छा असावी. ‘कलाकीर्दचा’ प्रोमो दाखवायला सुरुवात केली आणि जवळजवळ १५ दिवसातच जगभरातल्या दीड लाख कलारसिकांनी तो पाहिला असं जेव्हा लक्षात आलं तेव्हाच या अभिनव डिरेक्टरीची उपयुक्तता (एवढ्या वेबसाईट्स असतानासुद्धा) सिद्ध झाली.

‘चिन्ह’ची इंग्रजी आवृत्ती लवकरच इ-मॅगेझिनच्या स्वरुपात प्रसिद्ध होणार आहे. तिही त्याला इथंच वाचता येणार आहे. आणि सर्वात सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक कलाविषयक वृत्तपत्र लवकरच इथंच प्रसिद्ध होणार आहे. ‘चिन्ह’च्या या इ-पेपरमध्ये भारतातली प्रत्येक कलाविषयक माहिती दिली जाणार आहे. आता चित्रकलेच्या माहितीसाठी, बातम्यांसाठी इतर वृत्तपत्रं, मासिक वाचायला नकोच. रोज www.chinha.in ला भेट द्या. कलाविषयक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं मिळेल याची खात्री बाळगा.
‘कलाकीर्द’च्या अधिक माहितीसाठी आमच्या ‘कलाकीर्द’ या पानाला भेट द्या.
http://www.facebook.com/pages/KalaKird-art-artists-Directory-of-India/238741786200542
No comments:
Post a Comment