Saturday, October 30, 2010

चित्रकारांची 'लोकप्रियता'

जाहिरातींमधून आपण झाकिर हुसेनला, शेफ संजीव कपूरला, सानिया मिर्झाला, विश्वनाथ आनंदला, अगदी हर्षा भोगले, जावेद अख्तरलाही अमुकच एक गोष्ट विकत घ्या नाहीतर वापरुन बघा असा सल्ला देताना, प्रेमळ आग्रह करताना य वेळेला ऐकलय.
एखाद्या चित्रकाराला कधी जाहिरातींमधे पाहिलंय? एखादा चित्रकार ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून झालेला कधी पाहिलाय?
नाही नां?
 जाहिरातदार कधी चित्रकार या जमातीकडे फिरकलेच नाहीत, फिरकणारही नाहीत.. कां असं? तरुण व्हिज्युअल फाईन आर्टिस्ट हेमंत सोनावणे त्याच्या ब्लॉगवर ही जी खंत व्यक्त करतोय नव्हे तक्रारच करतोय ती मुळातूनच वाचण्यासारखी आहे. 

चित्रकलेकडे एक कला म्हणून समाजातले तुम्ही आम्ही (जे चित्रकार नाहीत आणि चित्रकलासमीक्षकही नाहीत) कसे बघत असतो, तिच्याबद्दल नक्की किती आस्था बाळगतो?  म्हणजे काय तर चित्रकलेला एकदा अभिजात कलेचा दर्जा देऊन झाला की मग चित्रकला आणि चित्रकार यांच्याविषयी काही बोलणं, वाचणं, विचार करणं, चर्चा करणं हे काम समाजातल्या काही मुठभरांचे किंवा समीक्षकांचे किंवा खुद्द चित्रकलेचे शिक्षण घेतलेल्यांचेच. असा एक ठाम विचार आपल्या आजूबाजूच्या आपण धरुन दहा पैकी आठ जणांचा असतोच असतो. बाकी आम्ही काळा घोडाला जातो (तिथे विकायला असलेल्या आर्टी वस्तू मस्त दिसतात शोकेसमधे), चित्रही बघतो ( दिवाळी अंकांमधली), शिवाय हुसेनही माहीत आहे. चित्रकलेबद्दल बाकी पेपरमधे काहीबाही ( एका कोपर्‍यात ) लिहून येतं ते वाचतो, जहांगीरलाही जातो कधी एखादं प्रदर्शन गाजलं तर. पण तिथे लावलेल्या चित्रांमधलं नक्की काय बघायचं  ते नाही बुवा नीट कळत (आणि त्या प्रदर्शनांबद्दल पेपरांमधे 'समीक्षा' छापून येते ती तर अजिबातच नाही कळत). बाकी एकंदर कलेबिलेत रस असतोच. झाकिरचा तबला ऐकतो (वाह ताज.. मधे), बिस्मिल्लांची शहनाई कितीतरीवेळा ( दूरदर्शनवर दाखवतात तेव्हां) ऐकलेली आहे. खतम.
पण सुट्टीच्या दिवशी मल्टिप्लेक्सला हजारभर रुपये खर्चून सलमानचा दबांग पहायला किंवा मॉलमधे असंच भटकून फूडकोर्टात इटालियन्-मेक्सिकन खाऊन मुलांबरोबर सुट्टी एन्जॉय करणार्‍या आपल्यापैकी किती जणांच्या मनात येतं की चला आज मुलांना आर्ट गॅलरीत नेऊन आणूया. किंवा या वर्षी दिवाळीला सिल्कसाडी, हिर्‍यांच्या कुड्या न घेता एखादं तैलचित्र विकत घेऊया. चित्र विकत घेणारा ग्राहकच सर्वसामान्य मध्यमवर्गीयांमधे नाहीये.  मध्यमवर्गीयांमधे काय लोकप्रिय आहे, कोण लोकप्रिय आहे याचं परीक्षण फार काळजीपूर्वक करणार्‍या जाहिरातदारांना त्यामुळेच मग कधी 'चित्रकार' या जमातीला आपल्या जाहिरातीमधून वस्तू खपविण्यासाठी आणावसं वाटत नाही. पुढे वाटू शकेल कां हे अवलंबून आहे तुम्हा आम्हावर.
तुम्ही आम्ही जाणीवपूर्वक कलेची जाण किती वाढवू शकतोय त्यावर.
ती वाढायला हवीय याची गरज तुम्हा आम्हाला वाटतेय कां यावरही.


शर्मिला फडके

3 comments:

  1. शर्मिला सान, चित्रांची किंमत हाहि १ क्रायटेरिआ असु शकेल ना चित्र विकत न घेण्यामागे. हि सर्व प्रदर्शनं एकतर इतक्या लांब भरतात कि तिथवर सर्व सामान्य पब्लिक पोहोचु शकत नाही. तिथे येणारा क्राउडही एकंदरीत बुजवणाराच असतो. मी जरी तिथे कधी गेले नसले तरि माझ्या जवळचे काही जाऊन आले आहेत. त्यांच तरी हेच मत आहे. सामान्य ग्राहकाच्या आवाक्यात असणारी प्रदर्शनं भरत असतील तर मला निश्चित आवडेल जायला!!
    -भारती.

    ReplyDelete
  2. Dear Sharmila Tai & Satishji,

    Heyyyy.... this is a surprise....thanks!!!! :-D
    Thanks a lottt....

    On this occasion, I feel like sharing one more episode with you. This May, when Hemant had his sculpture exbn at Jehangir... we were newly married. Art exhibitions were new to me. I saw common people staring at works for long and then moving on to the next artwork. After a while, I got anxious. I began going to them and asking, "Would you like me to explain the works to you?"

    You should have seen their faces light up! They wished to be a part of the visual treat but hesitated...felt scared to engage in a discussion... "What if the artist makes fun of us? What if we look like fools asking for explanations? What if the artwork is not what I understood from it? What ifff....."


    Being from engineering (a pure technical field) myself, I could relate to their apprehensions. So I started our discussion with the line... "What YOU have experienced looking at this art, is the real Truth. The explanation I'm giving you now is only what the artist felt while creating this work. I'm only telling you the artist's vision". With this, people got eased out to talk more.


    Since then, for the next 6 days.... we made it a point to open up to every observer who halted at an artwork for more than a minute. At the end of the exhibit, even with our hoarse voices, we were rich with experience. Common people have more depth than we could ever imagine.... they can not only relate to the art, but they also made us more humble and grateful because of the intellectual & emotional exchange.

    Hahaha... some interpretations from his fans were more beautiful than Hemant's own take on his pieces! Hemant and I ended up being richer persons than before...


    Love,
    ~ Aamrapali Hemant Sonawane

    ReplyDelete
  3. Dear Sharmila Tai & Satishji,

    Heyyyy.... this is a surprise....thanks!!!! :-D
    Thanks a lottt....
    या घटकेला मला तुमच्याशी आणखीन एक अनुभव शैर करावासा वाटतोय....


    यंदा मे महिन्यात हेमंत यांच्या शिल्पांचे प्रदर्शन जहांगीर मध्ये भरलेले. तेव्हा आमचं नुकतच लग्न झालेलं आणि 'फाईन आर्ट' हा अनुभव माझ्यासाठी एकंदरीत नवीन होता. मी बघितलं, की जहांगीरला आलेले दर्शक एखाद्या कलाकृती कडे टक लावून पहात असायचे....आणि कलाकारांपैकी कोणी त्यांच्या जवळपास जाताच ते लगेच पुढच्या कलाकृती कडे सरकायचे. हा प्रकार थोडा वेळ चालला. मी बेचैन होऊ लागले. मी खुद्द शिल्पकार नाहीय हे सर्वसिद्ध असल्याने बिनधास्तपाने मी त्या दर्शकांना जाऊन विचारलं..."तुम्हाला या कलाकृती विषयी मी काही सांगू का?"

    अचानक ते चेहरे चमकले! कदाचित त्यांना सुद्धा आपले विचार, आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्याशा वाटत होत्या... पण काहीतरी मागे धरून ठेवत होतं.... "आपण लहान तोंडी मोठा घास तर नाही न घेणार? कलाकाराला आपले विचार उथळ वाटले तर? चर्चेसाठी पुढे येऊन आपण स्वतःचं हसं तर नाही न करून घाणार! जर इथे उपस्थित बाकी सर्व कलेतले विद्वान असले, तर ते आपल्यावर हसतील... जर कलाकृती पाहून आपल्याला जे समझले ते बरोबर नसले तर? जर.....तर....". सर्व-सामान्यांच्या मनात असल्या भितींची गर्दी खूप असते.... 'मिडल-क्लास' माणूस आपल्या स्वाभिमानाला खूप जपतो. इथेही तीच परिस्थिती होती.

    मी स्वतः अभियांत्रिकी क्षेत्रातली असल्यामुळे मला कलेविषयीच्या या भीतीचा पुरेपूर अंदाज आहे. मी अलगद आमच्या चर्चेला सुरुवात केली - "तुमच्याशी या शिप्कृती जे बोलल्या, तेच खरं सत्य आहे... मी केवळ तुम्हाला कलाकाराचे विचार सांगायला आले आहे. हेमंत सोनवणेंना हे शिल्प बनवताना काय वाटलं होतं, ते मी तुम्हाला सांगते... बाय द वे, मी त्यांची पत्नी....".

    आपला अनुवाद हाच खरा अनुवाद, या विचाराने त्या दर्शकांना थोडा दिलासा लाभला. ते लगेच रुळले, आपल्या भावना मांडू लागले.


    या प्रत्यायानंतर पुढचे सहा दिवस आम्ही स्वतःहून मोकळेपणाने दर्शकांसमोर जायचो, त्यांच्याशी गप्पा करायचो. कोणीही दर्शक एखाद्या शिल्पाकृतीच्या समोर एका मिनिटापेक्षा जास्त उभा राहिला, तर आम्ही लगेच गप्पांमध्ये रुळवून त्याची भिडा दूर करायचो. बोलता-बोलताच प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आला. आम्हा दोघांचे घसे बोलून-बोलून कोरडे झालेले, तरी एव्हाना अनुभवाने आम्ही श्रीमंत झालो होतो. सामान्य माणसाला कलेचा इतिहास जरी पाठ नसला, तरी त्याची आयुष्याविषयीची समझ खूप गहिरी असते.... आणि कला कुठल्या-न-कुठल्या प्रकारे अखेर आयुष्याचंच प्रतिनिधित्व करत असल्यामुळे, सामान्य माणसाला कलेचीही ही आंतरिक समझ असतेच. हाहाहाहा.... हेमंतच्या fans नी त्याचा शिल्पांविषयी केलेले काही अनुवाद, हेमंतच्या स्वतःच्या आवृत्तींपेक्षा सुंदर होते!


    त्या विचारधारांच्या अद्लाबाद्लीत आम्ही सर्वच श्रीमंत झालो...!


    Love,
    आम्रपाली हेमंत सोनवणे

    ReplyDelete