Wednesday, October 27, 2010

कल्पनेहून अधिक अद्भूत असते वास्तव!... 'कुहू'

चित्रकला आवडते, गाणी ऐकायला आवडतात, अ‍ॅनिमेशन्स बघायला आवडतात, कॅलिग्राफी मोहात पाडते आणि शब्दांवर तर प्रेमच आहे.. आणि हे सगळं एकत्रित अनुभवायचय.. रंग, सूर, शब्द, चित्र या सार्‍या संवेदनांना एकाचवेळी सुखावायचय..
पुस्तक वाचायचय आणि बघत ऐकायचय सुद्धा..
खरंच?
हे शक्य आहे.
कल्पनेहून अधिक अद्भूत असते वास्तव!
परवा रविंद्र नाट्य मंदिरात जेव्हा कविता महाजनांच्या 'कुहू' या पहिल्या भारतीय मल्टिमिडिया कादंबरीचा प्रोमो पाहिला.. किंवा असं म्हणूयात 'अनुभवला' तेव्हा विश्वास बसला.

दाट, गर्द जंगलांतील हिरव्यागार वृक्षांमधून खोल, खोल आत आपल्याला घेऊन जाणारा कॅमेरा, पार्श्वभूमीवर शास्त्रोक्त रागदारीवरील सुरेल स्वर, मग फांद्यांच्या दुबेळक्यात आपले कृष्णनिळे पंख घेउन विसावलेल्या एका सुंदर पक्षाचे तैलचित्र.. त्याच्या तोंडून बाहेर पडणार्‍या लकेरी घेताहेत लयबद्ध शब्दरुप.. खालच्या गवतावर नृत्यमग्न सारस युगुलाची जोडी स्वतःतच मग्न आहे..
काय आहे हे?
हा कोणता डिस्नेचा अडिचशे-तिनशे कोटी बजेटचा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट नाही तर कविता महाजनांची आगामी कादंबरी आहे.
पहिली भारतीय मल्टिमीडिया कादंबरी 'कुहू'

कादंबरीचा जेमतेम ५० सेकंदांचा हा प्रोमो पाहून झाल्यावर त्यातले पेंटिंग आठवत रहाते, गाणं मनात रुंजी घालतं, कुहूच सुरेल शीळ मनात घुमते, नृत्यमग्न सारस पक्षांचा व्हिडिओ नजरेसमोरुन हटत नाही.. मल्टिमीडिया तंत्रज्ञान आपला प्रभाव दाखवत रहाते.
कुहूमधे कविताने स्वतः काढलेली ४०-४५ ऑईल पेंटिंग्ज आहेत, आरती अंकलीकरांनी स्वरबद्ध केलेली शास्त्रोक्त रागदारीवर आधारीत सुरेल गाणी आहेत, पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज आहेत, नृत्यमग्न सारस पक्षांचा दुर्मिळ, विलोभनीय व्हिडिओ आहे.. अशा दृश्यांचे इतरही व्हिडिओज आहेत, दत्तराज दुसानेंची अर्थाला लपेटून असलेली लयबद्ध कॅलिग्राफी आहे, समीर सहस्त्रबुद्धेंची अ‍ॅनिमेशन्स आहेत.. या इतक्या सार्‍या दृश्यकला असणार्‍या प्रोजेक्टला 'पुस्तक' कां म्हणायचे?
कविताचे उत्तर सहज साधे आणि पटणारे आहे. पुस्तक म्हणायचे कारण यात 'शब्द' सर्वाधिक महत्वाचे, पायाभूत आहेत. शब्दांना जास्त तीव्र बनवण्याचं काम इथे इतर कला करतात. शब्द येताना आपले रुप, रंग, नाद, लयाची अंगभुत संवेदना सोबत घेऊनच या कथानकात येतात.
म्हणूनच कुहूच्या संचात डिव्हिडी सोबत पुस्तकही आहेच. अर्थात हे पुस्तक असेल संपूर्ण रंगीत, आर्ट पेपरवर छापलेले आणि ३-डी मुखपृष्ठ असलेले.

कुहू कादंबरीमधे शब्दांव्यतिरिक्त ही इतकी सगळी माध्यमे कविताला नक्की कां वापराविशी वाटली? कवितामधला चित्रकार कादंबरीलेखनामधे तैलचित्रांचा वापर करु इच्छिते हे समजण्यासारखं आहेही.. पण हे अ‍ॅनिमेशन, संगीत, व्हिडिओज, कॅलिग्राफी..? शब्दमाध्यमांना या बाकी दृश्यमाध्यमांची इतकी जोड? शब्दांची ताकद कमी पडते?
कथानक जन्माला आलं तेच या सार्‍या माध्यमांना आपल्यात सामावून घेत. कविता सांगते-
कुहूची गोष्ट सुरु झाली ती एक रुपक कथा मनात आल्यामुळे. कुहू हा गाणारा पक्षी. जंगलात रहाणारा. आपल्या गाण्याने त्याला सारं जग सुंदर करुन टाकायचं आहे. एकदा त्या जंगलात मानवाच्या वसाहतीतून काहीजण येतात. जंगलातील पर्यावरणाचा अभ्यास करायला आलेली काही मुलं आणि मुली. कुहू त्यातल्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. आणि मग प्रेमात पडल्यावर जे काही करावसं वाटतं ते सारं तो करायला जातो.. माणसाची भाषा त्याला शिकायची आहे, माणसांचा स्वभाव जाणून घ्यायचाय.. या सगळ्यात निसर्गाच्या आणि माणसांच्या जगात खळबळ माजते.. गोष्ट पुढे सरकत रहाते.. विविध दृश्य माध्यमं आपोआप एकमेकांमधे गुंतत रहातात.. त्यांचं एकत्रित एक माध्यम बनतं. हे कुहूचं जग आहे. ते अनुभवयालच हवं.

कुहूच्या निमित्ताने मराठीमधे अजूनपर्यंत कधीही कोणी न केलेले प्रयत्न राबविले जात तर आहेतच, पण भारतीय साहित्यात एक नवी, आधुनिक वाट निर्माण होते आहे. कुहूची बाल-आवृत्तीही प्रकाशित होणार आहे. मल्टिमिडियाला सरावलेल्या नव्या पिढीला मराठी ऐकताना समजते, बोलताही येते पण देवनागरी लिपीतली मराठी वाचायचा त्यांना कंटाळा असतो, जमत नाही आणि त्यामुळे मराठी साहित्यापासून ही पिढी दुरावते आहे. कुहू सारख्या ऐकता ऐकता बघायचा 'पुस्तका'मुळे हा दुरावा निश्चितच कमी होईल याची कविताला खात्री वाटते.

ऑडिओ बुक्स किंवा इ-बुक्स मधे मोनोटोनी हा एक मोठा दोष असल्याने साहित्यप्रेमी वाचकांनी त्यांना फारसे स्वीकारले नाही. कुहू मात्र मल्टिमिडिया कादंबरी आहे. तास न तास कम्प्युटरच्या स्क्रीनसमोर खिळवून ठेवण्याची ताकद मल्टिमिडिया तंत्रज्ञानामधे असते याचा अनुभव आपण रोजच्या रोज घेत असतो.
कविता महाजनांची ब्र, भिन्न, ग्राफिटी वॉलसारखी वेगळ्या धाटणीची आणि सशक्त कथानकांची पुस्तके ज्यांनी वाचलेली आहेत त्यांना कुहूच्या साहित्यिक मूल्यांबद्दल खात्री बाळगायला काहीच हरकत नाही.

कुहूचा हा सारा नियोजित प्रकल्प प्रत्यक्षात आणणे हे खर्चिक काम यात काहीच शंका नाही. सारस्वत बँकेने या प्रकल्पासाठी कविताला शून्य व्याजदराने कर्ज दिले. आणि त्यासाठी तारण आहे 'बौद्धिक मालमत्ता'. मल्टिमीडिया कादंबरीची ही अद्भूत 'कल्पना' वास्तवात आणण्यासाठी लेखकाची बौद्धिक मालमत्ता गहाण ठेऊन घेऊन कर्ज मंजूर करण्याचा सारस्वत बँकेचा हा प्रयोगही पहिलाच.
यातून कलावंत, क्रिएटिव्ह लोकांसाठी भविष्यात किती असंख्य दरवाजे उघडू शकतात! कुहूचे महत्व यासाठीही.

कुहू इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधे येत्या डिसेंबरला बाजारात येईल.
कुहूच्या संचात एक पुस्तक आणि एक डिव्हिडी असेल. त्याची किंमत आहे रु.१५००/-
कुहूच्या बाल-आवृत्तीची किंमत आहे रु.१०००/-
कुहूच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंगची सोय आहे. तिथे आवृत्ती आगामी नोंदवल्यास सवलतीच्या दरात २५ % कमी किंमतीत हे कुहूचे संच मिळतील.


शर्मिला फडके

No comments:

Post a Comment