Friday, February 25, 2011

‘चिन्ह’ची साद..... चित्रकारांचा प्रतिसाद..!

 



चिन्हचा १९८७ सालचा पहिला अंक गेली तब्बल २४ वर्षं सातत्यानं वाचला जात आहे, तो आणि अर्थातच पुढले अंकही आणखी किती वर्षं वाचले जाणार आहेत, याविषयी कोणतंही अनुमान करता येत नाही. पण चिन्हच्या संकेतस्थळाला अवघ्या १०० दिवसांत जगाच्या कानाकोपर्‍यात विखुरलेल्या लक्षावधी विविधभाषी कलारसिकांच्या हिट्समुळे ते, पुढली आणखी किमान २५ ५० वर्षं निश्चितपणानं वाचले जातील याविषयी शंकेला कोणतीही जागा उरलेली नाही.

चिन्ह सातत्यानं नवनवीन प्रयोग करीत आलं आहे. गतवर्षी चिन्हनं केलेला चित्रकार, शिल्पकारांच्या प्रायोजकत्व जाहिरातींचा प्रयोग हा असाच एक नवा प्रयोग होता. महाराष्ट्रातील समकालीन कलावंत आणि त्यांची कला ही जागतिकीकरणामुळे अचानकपणे गवसलेल्या ग्लोबलकलारसिकांपर्यंत कशी पोहोचवता येईल या विस्तृत भूमिकेतूनच चिन्हच्या जाहिरात प्रायोजकत्त्व पुरवणीची संकल्पना गतवर्षी प्रत्यक्षात आली आणि यंदाच्या वर्षी ती पूर्ण रूपानं साकार होताना पहावयास मिळते आहे.

चिन्ह गतवर्षी पहिल्यांदाच रंगीत आणि तोही आर्ट पेपरवर प्रसिद्ध होणार होता. अर्थकारण खूप अवघड होतं, यश कितपत मिळेल याविषयी काहीशी साशंकताही होती. म्हणूनच महाराष्ट्रातल्या कलावंतांनाच चिन्हनं साद घातली आणि महाराष्ट्रातले अनेक नामवंत तसंच तरूण कलावंतही चिन्हच्या रंगीत पानांचं प्रायोजकत्त्व घेण्यासाठी पुढे सरसावले. कलावंतांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच २० २२ वर्षांत चिन्हला पहिल्यांदाच एका परिपूर्ण कलावार्षिकाचं स्वरूप देता आलं.

चिन्हच्या वाचकांना चिन्हनं हाताळलेल्या लोकविलक्षण विषयांसोबत समकालीन कला आणि  कलावंतांचा परिचय व्हावा, त्यांना जर त्या कलाकृती विकत घ्यावयाच्या असतील तर त्या संदर्भातली  सर्वच माहिती एकत्रितपणे मिळावी या हेतूनंच सहभागी झालेल्या कलावंतांच्या; कलाकृतींसोबत तांत्रिक माहिती आणि संपर्कासाठी स्टुडिओ इ. पत्ते, दूरध्वनी क्रमांक, वेबसाईट वगैरेची माहितीही दिली गेली. जिचं वाचक आणि कलारसिकांकडून अतिशय उत्साहानं स्वागत केलं गेलं. या प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात कलाकृती विकत घेण्यासाठी जरी खूप मोठा प्रतिसाद लाभला नसला तरी भविष्यात यामधून खूप मोठ्या प्रमाणावर उलाढाल होऊ शकेल याचे उत्साहवर्धक संकेत मात्र या प्रयोगानं चिन्हला दिले. जगभरातल्या इंग्रजी वाचकांसाठी चिन्हतर्फे यावर्षात प्रकाशित होणार्‍या ‘Chinha : the visual idiom’ या इंग्रजी आवृत्तीतही प्रायोजकत्त्व योजनेतील पानं पुनर्मुद्रित केली जाणार असल्यानं महाराष्ट्रातल्या कलावंतांना आता स्वत:चं आणि हक्काचं असं एक ग्लोबलव्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ‘Chinha : the visual idiom’ ची फक्त प्रिंट एडिशनच प्रसिद्ध होणार नाहीये तर ई मॅगझिन आवृत्ती आणि  संकेतस्थळाव्दारे महाराष्ट्रातला कलावंत आणि त्याची कला जगाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या कलारसिकांपर्यंत पोहचू शकणार आहे. जगभरातील कलारसिक आणि महाराष्ट्रातील कलावंत यांच्यातला दुवा जोडण्याचं काम फक्त चिन्ह करणार आहे. चिन्हच्या संकेतस्थळाला  गेल्या अवघ्या १०० दिवसांत जगाच्या अक्षरश: कानाकोपर्‍यातून ज्या तब्बल दोन लाख हिट्स पडल्या आहेत, त्या पाहता चिन्हच्या या प्रयत्नांना संपूर्ण यश लाभेल याची केवळ चिन्हलाच नव्हे तर गेली तब्बल २४ वर्षं चिन्हचं कार्य जवळून पाहाणार्‍या महाराष्ट्रातील कलावंतांचीही बहुधा खात्री पटली असावी. त्यामुळेच चिन्हच्या आगामी नग्नता : चित्रातली आणि मनातलीअंकाच्या पृष्ठ प्रायोजकत्त्वासाठी चिन्हनं केलेल्या आवाहनाला महाराष्ट्रातील कलावंतांनी अक्षरश: भरभरून प्रतिसाद देऊन सहकार्याचा हात दिला आहे.

चिन्हच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमास सहकार्य करणार्‍या :
प्रफुल्ला डहाणूकर, सुधीर पटवर्धन, शिवाजी तुपे,
दीपक शिंदे, शुभा गोखले, रवी मंडलिक, दिनेश कुरेकर, अरूण कालवणकर, प्रमोद कांबळे, यशवंत शिरवडकर, भगवान रामपुरे, प्रकाश घाडगे, रत्नदीप आडिवरेकर, दत्ता बनसोडे, संजय म्हात्रे, गोपाळ नेने
वासुदेव कामत, उत्तम पाचारणे, चंद्रजित यादव, प्रकाश बाळ जोशी, प्रकाश राजेशिर्के, रावसाहेब गुरव, तानाजी अवघडे, सुभाष गोंधळे,
सुहास निंबाळकर, फिलीप डिमेलो, शशी बने, प्रकाश भिसे, शिरीष मिठबावकर, रामकृष्ण कांबळे,  
रमेश थोरात आणि जयंत जोशी
या सर्वांचेच आम्ही आभारी आहोत.

चिन्हनं महाराष्ट्रातल्या सर्वच कलावंतांना वैयक्तिक आवाहन करणारी पत्र पाठवली आहेत. चिन्हदूरध्वनीव्दारे संपर्कही साधत आहे. पत्ता बदलल्यामुळे किंवा दूरध्वनी क्रमांक बदलल्यामुळे संपर्कात विलंब होत असल्यास संबंधितांनी चिन्हशी जरूर संपर्क साधावा. 

No comments:

Post a Comment