Thursday, February 24, 2011

‘चिन्ह’ आणि ‘कलाकीर्द’


 

चिन्हची स्थापना१९८५ साली झाली. १९८६ साली पहिलं प्रकाशन होतं कलाकीर्द : आर्ट अ‍ॅंड आर्टिस्ट डिरेक्टरी’! तोपर्यंत भारतात अशा स्वरूपाची डिरेक्टरी प्रकाशित झाली नव्हती. दिल्लीच्या ललित कला अ‍ॅकॅडमीने आर्टिस्ट डिरेक्टरी प्रसिद्ध केली होती पण त्यात चित्रकारांची फक्त वैयक्तिक माहिती आणि चित्रंच प्रसिद्ध करण्यात आली होती. कलाकीर्दमध्ये मात्र चित्रकारांच्या वैयक्तिक माहितीखेरीज कलादालनं, कलामहाविद्यालयं, कलासंस्था, कलासाहित्य इत्यादी माहितीचा समावेश करण्यात आला होता. संगणकाचा त्यावेळी नुकताच उदय झाला होता. त्या पार्श्वभूमीवर कलाकीर्दमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीचं मोल मोठं होतं. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणाकाची एक कळ दाबली की, हवी असलेली सर्वच माहिती क्षणार्धात संगणकाच्या पडद्यावर अवतरते. पण चिन्हनं कलेच्या क्षेत्रात २५ वर्षांपूर्वीच हे सारं प्रत्यक्षात आणून दाखवलं होतं. दुर्दैवानं त्याचं मोल कलाक्षेत्राला उमगलं नाही म्हणा किंवा चिन्हमार्केटिंगमध्ये कमी पडलं म्हणून म्हणा; ‘चिन्हला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. 

चिन्हनं जे काम २५ वर्षांपूर्वी केलं ते काम आज इतक्या वर्षांनंतरही भारतातल्या कुणाही कलासंस्थेला अथवा प्रकाशनसंस्थेला शक्य झालेलं नाही, या वस्तूस्थितीकडेही डोळेझाक करता येणार नाही. म्हणूनच चिन्हनं १९८५ सालचं ते आव्हान पुन्हा स्वीकारायचं ठरवलंय. फरक फक्त माध्यमाचा असणार आहे. तेव्हा ते मुद्रित स्वरूपात होतं, आता ते माऊसच्या एका क्लिकवर संपूर्ण जगातल्या कलारसिकांसाठी उपलब्ध होणार आहे. प्राथमिक जुळवा जुळवीस सुरूवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच नव्या स्वरूपातली कलाकीर्द चिन्हच्याच संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. पहिला टप्पा अर्थातच महाराष्ट्राचा असणार आहे तर नंतरच्या टप्प्यात दिल्ली, बंगाल, कर्नाटक इत्यादी भारतातील सर्वच राज्यांच्या चित्रकारांची तसंच कलाविषयक अन्य माहितीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. चिन्हचं हे संकेतस्थळ संपूर्ण भारतातल्या चित्रकलेचं पोर्टलच व्हावं हे चिन्हचं स्वप्न आहे आणि १५ नोव्हेंबर २०१० रोजी चिन्हचं संकेतस्थळ सुरू झाल्यापासून भारतासह अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, इटली, हॉलंड इत्यादी देशांमधूनही ज्या लक्षावधी हिट्स मिळाल्या आहेत (या हिट्स फक्त मराठी माणसाच्या निश्चितपणे नसणार) त्या पाहता हे स्वप्न खूपच लवकर प्रत्यक्षात येईल, याची चिन्हला खात्री आहे.   

महाराष्ट्रातील चित्रकार, शिल्पकार, तसंच चित्रकलेशी संबंधित सर्वांनाच चिन्हच्या या महत्वाकांक्षी उपक्रमात (अगदी नि:शुल्क) सहभागी होण्यासाठी हेच जाहीर आवाहन!

No comments:

Post a Comment