Wednesday, December 29, 2010

आधी आणि आता


प्रख्यात शिल्पकार  प्रमोद कांबळे म्हणतात
हे तर तालिबानी कृत्यच!

जी काही घटना घडली ती अत्यंत वाईट घडली. याबद्दल काही बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. ते असते तरी त्यांना तोंडातून बाहेर पडताना लाज वाटली असती इतकं भयंकर कृत्य घडवून आणलं आहे. मला असं वाटत की काही वर्षांपूर्वी तालिबान्यांनी जसा स्फोटकांचा वापर करून बुद्धाचा पुतळा उद्‍ध्वस्त केला होता तसंच हे कृत्य आहे. तालिबानी आणि या लोकांमध्ये काहीच फरक नाही. मुघलांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रातल्या शिल्पांचा, मंदिरांचा विध्वंस केला; दादोजींचा पुतळा तडकाफडकी हटवणं हा देखील त्यातलाच प्रकार आहे. आपल्या संस्कृतीत असं सांगितलंय की एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली तर तिच्या शेजारी दुसरी चांगली गोष्ट उभी करा, ती उद्‍ध्वस्त करण्यात काहीच हशील नाही. पण हे म्हणजे असं झालं; एकीकडे ऐक्याची भाषा करायची आणि दुसरीकडे असं समाजात दुफळी निर्माण करणारं कृत्य करायचं. एखादी रेघ जर आपल्याला लहान वाटत असेल तर तिच्या शेजारी दुसरी मोठी रेघ ओढावी, लहान रेघ का पुसावी. तसं केल्यानं हात तर बरबटतातच पण ती पूर्णपणे मिटवताही येत नाही आणि त्या जखमेचा ओरखडा मग व्रण म्हणून समाजमनावर कायम राहतो.

महागाई, भारनियमन, रोज उठून उघडकीस येणारे अब्जावधी रूपयांचे घोटाळे हे सगळे प्रश्न बाजूला सारून एका टुकार विषयावर राजकारण करण्याचा शहाणपणा करणारे अधिक शहाणे नेते हे आपले प्रतिनिधी आहेत याची लाज नाही वाटत कीव करावीशी वाटते. मला तर वाटतं की महागाई, भारनियमन, घोटाळे याप्रश्नांपासून जनतेची दिशाभूल करण्यासाठी केलेला हा कट आहे.

आणखी एक बाब अशी की हा पुतळा ज्यांनी प्रत्यक्ष हटवला त्यांनी रात्री उशीराचीच वेळ का निवडली? कारण ती वेळ फाशीची असते. आणखी कहर म्हणजे हा पुतळा कचर्‍याच्या डब्यातून नेण्यात आला. याहून वाईट वाटतं ते याचं की या गोष्टीचा आनंदोत्सव साजरा केला जातो. कलाकृती, कलाकार, त्यांची संवेदनशीलता यांच्याशी; हा प्रकार घडवून आणणारे आणि त्यावर अंमल करणारे यांचा सात काय सत्तर पिढ्यांचाही संबंध नाही, हेच यावरून स्पष्ट होतं. एखाद्या कलाकृतीचा अशाप्रकारे विध्वंस होतो तेव्हा त्याचं दु:ख काय असतं हे फक्त एक सच्चा कलाकारच जाणतो.

शेवटी एवढंच वाटतं की हा सर्व प्रकार घृणास्पद आहे. कलाकार म्हणूनच नव्हे तर जनसामान्यातला एक म्हणूनही मला याचा खेद वाटतो. पण मनावर दगड ठेवून आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करण्याशिवय माझ्या हातात काहीच नाही.

शब्दांकन : अमेय बाळ

उद्या वाचा प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांची तीव्र प्रतिक्रिया

2 comments:

  1. खरे आहे एकदम... ह्याची कीव करावी तितकी कमी आहे...
    आजच मी ह्यावर एक पोस्ट लिहिली आहे...
    सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा... http://itihasachyasakshine.blogspot.com/

    ReplyDelete
  2. प्रमोद कांबळेंना या देशाचा सामाजिक इतिहास माहित नाही. बहुजनांमधून कोणतीही व्यक्ती पुरोहित वर्गाच्या मदतीशिवाय मोठी झाली की तिच्या आजूबाजूला असॆ नकली, खोटॆ गुरू उभॆ कॆलॆ जातात. महागाई, आतंकवाद, जैतापूर प्रकल्प ही प्रकरणे महत्त्वाची जरूर आहेत पण कोणत्याही २ प्रकरणांची कधीही तुलना करू नये. त्यांचे आपापले विशिष्ट महत्त्व असते. राहिली गोष्ट कोंडदेवच्या पुतळ्याची. पुतळा हलवलाय, तोडला नाही. मग पुतळा हलविण्यास भाग पाडणारे तालिबानी कसे? इतिहासाच्या पुनर्लेखनाला, पुनर्विश्लेषणाला एवढा विरोध का?

    ReplyDelete