Friday, December 31, 2010



लालमहालातला दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवल्यानंतरची प्रतिक्रिया देताना  शिल्पकार
उत्तम पाचारणे म्हणतात
हे तर पाशवी कृत्यच!
 
हा पुतळा हटवणं हे निषेधार्हच आहे. सर्वप्रथम मी असं म्हणेन की ज्ञानेश्वरांची समाधी उखडून ज्ञानेश्वरांनी तिथंच समाधी घेतली का? हे पाहण्यासारखा हा सर्व प्रकार आहे. मराठी मनाला वेदना करणारी ही गोष्ट आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण या विषयाच्या कितीही खोलात गेलो तरी अंधारच आहे आणि कितीही वर अनंत अवकाशात गेलो तरी काळी पोकळीच आहे. सद्‍सद विवेक बुद्धी जागृत ठेवून जवाबदार व्यक्तिंनी हे विषय हाताळायचे असतात. यशवंतराव चव्हाणांपासून सर्वानींच ज्यांनी इतिहास संपादनाचं काम केलं त्यांनी; सदर विषयाची पूर्णत: पुष्टी होत नाही म्हणून मराठी विश्वकोषाचं काम थांबवलं होतं, अशी नोंद आढळते. याचाच अर्थ असा की त्यांनी या विषयाकडे फार गांभीर्यानं पाहिलं असावं आणि सद्‍-विवेकानं निर्णय घेतला असावा असं वाटतं.

पण आज परिस्थिती अशी आहे, हाती आलेला पुरावा सत्य मानून दादोजींचा पुतळा हटवला जातो, उद्या दुसरे पुरावे हाती आले तर पुन्हा पुतळा उभारतील, पुन्हा काढूनही टाकतील. जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून पुतळा  पुतळा खेळण्यात जर राजकारण्यांना रस वाटत असेल तर त्यांनी आपली पदं सोडून खुशाल खेळावं.
कलाकार हा तत्कालीन समाजमन, त्यांच्या जाणीवा, उपलब्ध पुरावे यांच्या साहाय्यनं कलाकृती निर्माण करत असतो. त्यासाठी त्याची कित्येक महिन्यांची मेहनत तो पणाला लावत असतो. तेव्हा कुठे अशी कलाकृती मूर्त रूप घेते. चित्रकार एम.आर आचरेकर आणि दीनानाथ दलाल यांच्या चित्रांचा आधार घेऊन, त्यामध्ये ज्याप्रकारे कल्पना चितारली आहे त्या कल्पनेचा हे शिल्प एक उत्तम आविष्कार होतं आणि आहे. पण स्वत:चं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी या शिल्पाचा असा विध्वंस करणार्‍यांची वृत्ती मुळातच पाशवी असते. संवेनशीलतेचा एक सहस्रांश देखील त्यांच्या ठायी नसतो याचं या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रत्यंतर आलं.

सर्व कलावंत नेहमी समाजमनाची सेवाच करत असतात. पण अशा तर्‍हेचं दुष्कृत्य करून हे राजकारणी समाजमनाला विनाकरण वेठीस धरत आहेत आणि अशाप्रकारे समाजमनाला वेठीस धरणारं कृत्य निषेधार्हच असेल. एक कलाकार म्हणून खूप वाईट वाटतं. पण मनातल्या भावना व्यक्तही कराव्याशा वाटतात म्हणूनच ही धडपड...

शब्दांकन : अमेय बाळ

उद्या वाचा विख्यात शिल्पकार सदाशिव साठे यांची प्रतिक्रिया

2 comments:

  1. काही राजकारण्यानी आपल्या वैयक्तिक गरजेसाठी हा वाद निर्माण केला आहे. ती गरज संपल्यावर यावर फेरविचार होईलच.

    ReplyDelete
  2. उगाच नाही जुने राजे म्हणायचे- जाळा ते कवी आणि त्यांची कवनं, तोडा त्या मुर्त्या आणि उधळुन टाका ग्रंथालयं...यानं कुणाचं भलं झालय? राज्य चालवायचं तर एकछत्री, यात एकच विचार करणार आणि अंमलात आणणार. बाकीच्या गाय बकऱ्यांनी गुमान मान खाली घालून चरायचं...
    झालं ते छान झालं. आपण बावळटांना स्वातंत्र्य इ इ आहे असं वाटत असतं.

    ReplyDelete