Thursday, January 16, 2014

पत्रावळी आणि ' पत्र्या 'वळी …." गायतोंडे " हा ग्रंथ काही रुढार्थाने गायतोंडे यांचे चरित्र म्हणता येणार नाही .
पण गायतोंडे यांच्या चरित्राची सारीच्या सारी साधने मात्र या ग्रंथात एकवटली आहेत
असे मात्र निश्चितपणे म्हणता येईल .
गायतोंडे यांनी कधीच कुणाला आपल्या जवळ फिरकू दिले नाही .
लेखक , पत्रकार ,संपादकांशी तर ते फटकून वागत . साहजिकच हुसेन , सूझा , रझा , आरा यांना जशी प्रसिद्धी मिळाली तशी प्रसिद्धी
गायतोंडे यांना कधीच मिळाली नाही .

आणि गायतोंडे यांनीही त्याची कधी फिकीर केली नाही .
' चिन्ह 'ने म्हणूनच गायतोंडे यांच्या वर काम करताना
त्यांच्या सहवासात आलेल्या जास्तीतजास्त लोकांशीच संवाद साधण्यावर भर दिला , त्यातून साकार झाले ते अतिशय गाजलेले ते तीन अंक.
२००१, २००६ आणि २००७ साली ते प्रसिद्ध झाले .
आज कार्यालयीन प्रती खेरीज त्यांची एकही प्रत आमच्याकडे उरलेली नाही
यावरून ते सारेच अंक किती गाजले याची सहज कल्पना येवू शकेल .
दर चार दोन दिवसाआड ' त्या अंकाची एक तरी प्रत आहे का ' अशी
विचारणा होतेच होते .
गंमत म्हणजे यातले बहुसंख्य लोक हे सदर अंक प्रसिद्ध होण्याआधी
अंकाची मागणी नोंदवावी म्हणून आम्ही मेल किवा एसेमेस द्वारे ज्यांच्या हात
धुवून मागे लागलेले असतो तेच असतात .
पण हेच सारे नंतर 'एक तरी प्रत द्या ना , फाटकी तुटकी सुद्धा चालेल म्हणून
आमच्या मागे लागतात .आधी प्रकाशन पूर्व सवलतीत अंक घ्यायला काचकूच करणारे हेच सारे
नंतर मात्र या अंकांसाठी दाम दुपटीने पैसे मोजायला तयार असतात .
१०० -१०० रुपयांच्या अंकांसाठी अनेक महाभाग तर केवळ झेरॉक्स साठी
२००- ३०० रुपये मोजताना पहावयास मिळाले आहेत .
" चिन्ह 'चे अंक रंगीत निघू लागल्या पासून तर त्याच्या रंगीत झेरोक्स साठी
२०००-३००० रुपये मोजणारे हि काही कमी नाहीयेत .
७५० रुपयांचे अंक आम्ही ३०० ते ५०० रु इतक्या सवलतीत दिले , ते सुद्धा टपाल खर्चासह , एक किलो वजनाचा अंक कोरोगेटेड बॉक्स सह
पोस्टाने पाठवावयास प्रचंड खर्च येतो , तो आम्ही सोसतो .
पण तरी सुद्धा संबंधित मंडळी हे अंक सवलतीत का घेत नाहीत याची
कारण मीमांसा काही आम्हाला अद्यापि करता आलेली नाही .
' चिन्ह 'च्या सवलत योजनेत भाग घ्यायचा नाही आणि नंतर
झेरॉक्सवाल्याला मात्र अवाच्या सव्वा दाम मोजायचे
या मागचे रहस्य जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल .


मध्यंतरी एका कला महाविद्यालयाच्या ग्रंथपालांचा फोन आला होता ,
म्हणाले 'लई भारी अंक काढता राव , पण त्येव्हडं बाईन्डीग सुद्धा चांगलं करा की ,
पत्रावळ्या होतात बगा लागलीच ,
मी त्यांना विचारलं , सर . महाविद्यालयात शिक्षक किती ?
तर म्हणाले , असतील की ५०-६०
त्यातले " चिन्ह " वाचतात किती ? तर म्हणाले ,असतील की पाच सहा .
म्हटलं , बाकीच्यांचं काय ? त्ये नुसतं इथल्या इथं बगत्यात . म्हटलं वाचणाऱ्या शिक्षकांचं काय लायब्रीत वाचतात की घरी नेतात ?
तर म्हणले घरी नेतात …
किती दिवसांनी परत देतात ? १०- १५ दिवसांनी , अंक मागून घ्यावा लागतो .
म्हटलं मुलांचं काय ? किती मुलं आहेत महाविद्यालयात ? तर म्हणाले ५०० .
त्यातली किती वाचतात ? तर म्हणाले , जास्तीत जास्त शंभर, उरलेल्या मुलांचे काय ? तर म्हणले , उरलेली तीनशे चारशे मुलं अंक नुसता बघत्यात .
कुठे बघतात ? हिथच लायब्रीतच बघतात , वाचणारी मुलं कुठं वाचतात , इथं की घरी ? असं कुठं होतं का ?त्यानला अंक घरी न्यायाची परमिशन नाही .
मग ती मुलं काय करतात ? काही नाही , त्यानला आम्ही झेरॉक्स मारून घ्यायची परमिशन मात्र दिली आहे .
मग म्हटलं आता मला सांगा आर्ट पेपरवर छापलेला , परफेक्ट बाईडिग केलेला अंक
जर वारंवार झेरोक्स मशीन मध्ये जात राहिला तर तो एखाद्या पत्र्यावर जरी
छापला गेला असता तरी त्याच्या पत्रावळ्याच झाल्या असत्या असं तुम्हाला नाही का वाटत ?फार फार तर त्याला "पत्र्या "वळ्या म्हणता आले असते .
ह्ये आमच्या लक्षातच आले नाही , स्वारी …असं म्हणून चटकन त्यांनी फोन ठेवला देखील ….


कुणाला दुखावण्याच्या हेतूने हे लिहिलेले नाहीय ,
या मजकुरामुळे कुणी जर नकळत दुखावले गेले असेल तर मी मुळीच त्यांची माफी बीफी मागणार नाही ,
कारण हि वस्तुस्थिती आहे , खरी गोष्ट याही पेक्षा भयंकर आहे , कारण गेल्या तीन अंकापासून "चिन्ह "च्या
प्रती आम्ही विक्रीसाठी कुणालाही देत नसल्याने आमच्या संगणकात नावनिशीवार सारी आकडेवारी आहे .
त्यातून प्रगट होणारे सत्य चित्रकला आणि चित्रकलेशी संबंधिताना नक्कीच आवडणारे नाही याची खात्री आहे . पण हेही कुणीतरी लिहायला हवेच , नाही का ?

सतीश नाईक
संपादक ' चिन्ह '
" चिन्ह " प्रकाशित करताना आलेले हे असे अनेक धमाल अनुभव
"निवडक चिन्ह "चे तिन्ही खंड प्रसिद्ध होई पर्यंत इथून पुढे
आठवड्यातून तीन वेळा तरी लिहावे असा विचार आहे , पाहूया जमते का ते …
सतीश नाईक
संपादक 'चिन्ह '

No comments:

Post a Comment