Wednesday, January 1, 2014

दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतीक - ‘चिन्ह’

दरवर्षी नव्या ‘चिन्ह’ ची खूप उत्सुकता असतेच. या वर्षीचा नवा ‘चिन्ह’ आहे. उद्दाम, बेबंद, उसळत्या लाटांचा वसा घेऊन आलेला, समुद्राचे स्वैर उधाण क्षण पकडणारा,नि उत्साहाच्या उर्जेची असंख्य शिडे फडफडणारा - नाशिवंत ‘सामुद्री’ कलेचा - वाळू,शिंपले नि रेतीचा - भरती ओहोटीचा आयुष्याच्या - होड्या नि जहाजांच्या तरल प्रवासाचा - नि कशा कशाचा - मिरीचा नि ओंडक्याचा, पुरातत्वीय,राजकारणीय,भौगोलिक पर्यावरणीय,समाजकारणीय,कलेला परिमिती देणाऱ्या सौंदर्याचा - नव्या संशोधनात व कलाचिंतनात नि हृदगतात मग्न असलेल्या उत्साही उमद्या डॉक्टर कलावंत डॉ. सुबोध केरकारांचा - आणि त्यांच्या संघर्षमय जीवनाचा नि कलेचा प्रदीर्घ आलेख - कलेचा ध्यास प्रगट करणारा. 

हा अंक आहे - चिंतनमग्न,विदेही अवस्थेत रसिकांना ‘अवस्था लावोनी’, जाणारा संयत,शांत,धीरोदात झेन मुद्रेचा - कलेच्या तंद्रीत बुडलेल्या प्रसिद्ध चित्रकार वासुदेव गायतोंडेंचा - आपल्या अथांग प्रतिभेची पुसटशीसुद्धा जगाला चाहूल न देणारा, आपल्या कलेशी तादात्म्य पावलेला,स्वतःच जणु एक साक्षात कला - तत्वच बनलेला - सहज निर्माण प्रक्रियेतून आणि गंभीर एकटेपणातून चित्रातून घेतलेल्या स्वतःच्याच एका शोधाचा आणि या कलावंतांच्या कुंडलीची झलक दाखवणारा(नि ‘गायतोंडेच्या शोधात’ या आगामी पुस्तकाविषयी कुतूहल निर्माण करणारा )आणि त्यांच्या बद्दलच्या अमाप जिव्हाळ्याने भारावलेल्या चित्रकार प्रभाकर कोलत्यांचा.


गायतोंडेंच्या दिल्लीच्या घरातल्या सगळ्या वस्तुंवरील साचलेली धूळ स्वच्छ करण्यासाठी (गायतोंडेवरची डॉक्युमेंटरी फिल्म शूट करण्यासाठी ) डस्टरने ती धूळ झाडायला गेलेल्या कोलते सरांना गायतोंडेनी सांगितलं होतं - “कोलते ते तसंच राहू द्या. पुसायचं नाही. मला तसचं आवडतं.” - असं म्हणणारे खरेखुरे गायतोंडे. ग़्रेटच. आणि ती ‘कॉमेंट’ प्रामाणिकपणे सादर करणारे कोलतेही ग्रेटच.


हा अंक आहे - गोव्याचे प्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सुझा यांच्या रेषा - बोलीचा - पुरुष व स्त्री यांच्या आदिम तत्वातल्या रती नि कामभावाचे पातळतळ धुंडणारा - बेलगाम,हिंस्त्र,काहीशा रांगड्या श्वापदी वृत्तीने चित्रावर अक्षरश: तुटून पडणारे,आक्रमक वृत्तीने जीवनाबरोबरच कलेचा उपभोग घेणारे,पण तरीही त्यात उद्ध्वस्ततेला थारा न देणारे भारतातले एक प्रमाथी कलावंत - फ्रान्सिस न्यूटन सूझा - त्यांचा साक्षेपी अभ्यास करून त्यांच्या चित्रांतल्या पाश्चात्य व पौंर्वात्य काम - प्रेरणांचा वेध घेणारा नितीन दादरावाला यांचा समर्पक अभ्यासलेख.


नवा ‘चिन्ह’ म्हणजे सुनीता लक्ष्मण श्रेष्ठ यांचा चित्रकार पती-पत्नीच्या आयुष्यभरातल्या सहवासाच्या काही स्मृती (त्यात पुन्हा गायातोंडेंचे शिष्य लक्ष्मण श्रेष्ठ यांचे रेखाटलेले दुर्मिळ व्यक्तिचित्र )


सव्वीस कलाविषयक संशोधनावर पुस्तके लिहिणारे बाळकृष्ण दाभाडे या दुर्लक्षित कलाप्रेमीचा परिचय - नेपथ्यकार श्याम भुतकरांचा एके काळचा ‘झपाटलेल्या’ आयुष्याचा गूढ थरारक अनुभव.


फाळके पुरस्कारविजेत्या नि कलावंत गुरुदत्त यांच्या आयुष्याशी धागे जुळलेल्या सिनेमाऑटोग्राफर व्ही. के . मूर्तीच्या छायाचित्रणातले मोहक सौंदर्य टिपणारा अशोक राणेंचा लेख. यशवंत देशमुखांच्या निखळ अमूर्त कलेचं रहस्य - शुभा गोखलेंचं ‘न्यूडस’ बद्दलचं आणि अनामिकेचं स्वतःच्या ‘न्यूड’ फोटोग्राफीचे ‘धीट’ अनुभव - त्याबरोबरच विक्रम बाबांच्या अपारंपारिक छाया - चित्रणातला व ‘नग्न निषेध’ या लेखातला - या दोघांनी धसास लावलेला कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न नि त्यातला परखडपणा.


चित्रकार संजय निकम यांची २६ जुलैच्या काळरात्री जीवघेण्या प्रलयातून दोनशे बुडणाऱ्या माणसांना अक्षरश: पाण्यातून खेचून त्यांना ‘जीवनदान’ देणाऱ्या - कलावंताच्या जिद्दीची,अंगावर काटा आणणारी कहाणी-आणि अर्थातच प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बर्व्याचं ‘अधुरं स्वप्न’.


‘चिन्ह’ च्या यां अंकालाच व्यापून राहिलेली अथांग दर्याची नि सुशेगाद गोव्याची पार्श्वभूमी त्यात गोव्याचे दोन पिढ्यांचे तीन महत्वाचे कलावंत - गायतोंडे, सूझा नि केरकर. कला,जीवन आणि निसर्गाचं एकजीव आत्मतत्वच या अंकात जणू प्रगटलंय. जीवनातल्या सौंदर्याचा नि संघर्षाचा यात मिलाफ झालाय.


मात्र या सगळ्या यत्न-प्रयत्नांमागची अविश्रांत मेहनत आहे सतीश नाईकची - एका अगम्य उत्साहाने त्याला कलेविषयी जे जे नि जेवढं जेवढं करावसं वाटतं,ते ते आणि तेवढं तेवढं अत्यंत निष्ठापूर्वक करीत राहतोय. मग काहीही होवो. ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ वरचा अंक सर्वांचा विरोध पत्करून तळमळीने काढणार म्हणजे काढणारच. भास्कर कुळकर्णीवरचा असो वा गायतोंडेवरचा असो. विशेषांक हवा म्हणजेच हवाच. तसचं सारा विरोध डावलून ‘नग्नता विशेषांक’ प्रसिद्ध केला म्हणजे केलाच - तिथे तडजोड नाही.त्या अंकाला उत्तम प्रतिसाद मिळालाच. ‘चिन्ह'ला पर्याय नाही हेच खरं. एक प्रभाकर बरव्यांवरचा विशेषांक त्याला अजूनपर्यंत काढता आलेला नाहीय,पण मला खात्री आहे आज न उद्या तो हा अंक निश्चितपणे काढणारचं. कारण यामागे आहे त्याची कलेवरची आस्था,कामाची प्रचंड जिद्द नि ठाम आत्मविश्वास. या त्याच्या निरंतर ध्यासाला व धडपडीला सलाम!


कलातत्वाची पारख करणारा - ‘चिन्ह’ !


कलावंताच्या पाठीशी उभा राहणारा - ‘चिन्ह’ !


नि कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सतत झगडणाराही - ‘चिन्ह’ च !


अथक अविरत प्रयत्न,संकटांवर मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द यांच्या बळावर सतीशला यश मिळाले नाही; तरच नवल. यशाचे नवनवे मानदंड उभे करणाऱ्या ‘चिन्ह’ ला रौप्यमहोत्सवानिमित्त मनापासून शुभेच्छा !प्रदीप संतोष नेरुरकर, डोंबिवली               

No comments:

Post a Comment