Friday, March 25, 2011

अकादमींच्या ललित कला

दै. प्रहारच्या  'बुकमार्क' या पानावर दिल्लीच्या ललित कला अकादमीनं प्रसिद्ध केलेल्या 'कलाभारती'या चित्रकलाविषयक अनुवादीत मजकुराच्या दोन खंडाविषयी 'राजा पिंपरखेडकर' यांनी विचारानं लिहिलं आहे. त्यातला वासुदेव  गायतोंडे यांच्या विषयीचा 'तब्बल १६६ पानं गायतोंडे यांच्यावर खर्च केली आहेत' असा उल्लेख सोडला तर संपूर्ण लेखात खटकण्यासारखं काहीच नाहीये. किंबहुना त्याच्या अनेक प्रतिकूल मतांशी आपण सहमत होत होत तो लेख वाचतो. असो या पुस्तका संदर्भात 'चिन्ह'ला काही वेगळंच सांगायचं आहे.
कलाभारतीच्या या ५६७ आणि ५८० पानांच्या या दोन खंडात विविध भारतीय भाषेतल्या चित्रकलाविषयक लेखांचे हिंदी अनुवाद प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पहिल्या खंडातल्या एकूण ६५ लेखांपैकी १९ लेख चिन्हच्या गेल्या दहा अंकामधून घेण्यात आले आहे. ५६७ पानांच्या या जाडजूड खंडामधली तब्बल १७० पानं ही चिन्हच्या लेखांनी व्यापली आहेत. 'खर्च केली आहेत' असा जो गायतोंडेंविषयीचा उल्लेख राजा पिंपरखेडकरांनी केला आहे, ते सर्व लेख चिन्हमधलेच आहेत. बाय द वे गायतोंडे यांच्या वरच्या लेखाच्या पानांची संख्या होते ११५,१६६ नव्हे, असो. चूकभूल द्यावी घ्यावी.
  तर सांगायचा मुद्दा असा की, चिन्हची १७० पानं ज्यांनी 'कलाभारती' मध्ये अनुवाद करून घेऊन प्रसिद्ध केली त्या ललित कला अकादमीवाल्यांनी या ग्रंथाच्या खंडासाठी चिन्हला ७-८ वेळा दिल्लीत फोन करावयास लावला आणि हो ना हो ना करता ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल ७-८ महिन्यानं अखेर चिन्हला हे दोन्ही खंड एकदाचे मिळाले.
 ग्रंथ सोबत पाठवत आहोत म्हणून दोन ओळीच पत्रं नाही  उशीर झाला म्हणून दिलगिरी नाही, आभाराची तर बातच सोडा, त्या ग्रंथावर नाव घालून तरी ते पाठवावं इतकंही सौजन्य ललित कला अकादमीवाल्यांकडे नाही. मग मानधन वगैरेंची बातच सोडा.
 सुमारे वर्ष-दीड वर्षापूर्वी असाच एके दिवशी पीयूष दईया नावाच्या माणसाचा फोन दिल्लीहून आला. चिन्हची खूप स्तुती वगैरे, तुम्ही कसं अद्भुत काम केलंय वगैरे आणि आम्ही असा असा एक ग्रंथ प्रसिद्ध करतो असून त्यात 'चिन्ह'मधल्या लेखांची निवड केली आहे. म्हटलं हरकत नाही. पण लेखी काय ते पाठवा. काय करणार ते कळवा, त्याप्रमाणे त्यांनी मेल पाठवली. त्यात 'चिन्ह'मधल्या बर्‍याच लेखांची नावं होती. त्याप्रमाणे 'चिन्ह'चे सर्व अंक ललित कला अकादमीला पाठवण्यात आले.
तोंडी परवानगी देताना त्यांना अट घातली की, या संदर्भात लेखी परवानगी घेणं आवश्यक आहे. ती तुम्ही घ्यावी. ज्या लेखांची निवड कराल, त्या लेखकांना आणि त्यांच्या शब्दांकनकर्त्यांना अथवा लेखकांना त्याचं मानधन आणि ग्रंथाची एक प्रतही पाठवावी. त्यांनी होकार दिला.
  पण नंतर ना परवानगी मागणारं पत्रं आलं ना अन्य काही. मधेच एकदा 'चिन्ह'नं वापरलेल्या प्रकाशचित्रांची मागणी आली. तीही पूर्ण केली. त्यानंतर सहा-आठ महिन्यांत किंवा वर्षभरात काही घडलंच नाही, मग अचानक प्रफुल्ल डहाणूकर, मनोहर म्हात्रे वगैरेंकडून फोन येऊ लागले की आपल्याला ग्रंथाची प्रत आलीय. तुम्हांला आलीय का? गणेश विसपुतेंनी फेसबुकवरही लिहिलं. असे सर्वांचेच फोन येऊ लागले. सर्वांना ग्रंथ पोहोचले होते. पण ज्या अंकातून हे १९ लेख निवडले गेले त्या 'चिन्ह'ला मात्र ग्रंथाची प्रत सोडा, साधं पत्र पाठवण्याचं सौजन्यसुद्धा ललित कला अकादमीनं दाखवलं नाही.
न राहून अखेर एकदा श्री. दईया यांना फोन केला तर ते म्हणाले की, ते काम मी सोडलं. कधीच सोडलं. तुम्हांला ग्रंथ आले कसे नाहीत, आश्चर्य आहे, मी व्यवस्था करतो वगैरे. पण त्यानंतरसुद्धा काही घडलं नाही. एके दिवशी चित्रकार मनोहर म्हात्रे यांनी त्या ग्रंथाचं दर्शन घडवलं त्यातलं प्रकाशन संयोजक म्हणून डॉ. ज्योतिष जोशींचं नाव होतं. त्यांना फोन लावला तर टिपिकल सरकारी उत्तर दिलं आणि ग्रंथ पाठवतो म्हणून सांगितलं. त्यानंतर महिन्याभरानं 'चिन्ह'ला ते ग्रंथ आले. प्रकाशकांची परवानगी त्यांनी अद्यापही मागितलेली नाही. त्यामुळे लेखकांना मानधन वगैरे पाठवलं असणं अशक्यच आहे. आता यावर काय कारवाई करायची त्याचा विचार चालू आहे. लेखक, चित्रकार मंडळी म्हणतात ललित कलावाल्यांना नोटीस पाठवा, कोर्टात खेचा पण आपले सारे कामधंदे सोडून हे उपद्व्याप करत बसायचं का?
  कोट्यवधी रुपयांचं ज्याचं बजेट आहे, त्या ललित कला अकादमीचा सारा कारभार हा असा आहे. आता ललित कला अकादमीचं कलासंचालनालय झालंच असं म्हणायचं का कला संचालनालयाची ललित कला अकादमी झाली असं म्हणायचं?
- सतीश नाईक

No comments:

Post a Comment