Tuesday, March 1, 2011

‘चिन्ह’ लवकरच दररोज प्रसिद्ध होणार!वेबमिडियात उतरायचा निर्णय जेव्हा ‘चिन्ह’नं घेतला तेव्हाच फेसबुक आणि ऑर्कुटवरही आपली निशाणी उमटवायचं ‘चिन्ह’नं निश्चित केलं होतं. पण ऑर्कुटला लागलेली उतरती कळा पाहून फेसबुकवरच सर्व लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज फेसबुकवर ‘चिन्ह’चा १६००पेक्षा जास्त मित्रपरिवार आहे. त्यात केवळ महाराष्ट्रातील चित्रकारांचाच समावेश नसून महाराष्ट्राबाहेरील तसंच जगभरातील चित्रकारांचाही समवेश आहे. इतकंच नाही तर जगभरातील तसंच भारतातील महत्त्वाच्या कलासंस्था, कलादालनं यांचाही समावेश आहे. ‘चिन्ह’च्या कट्टर वाचकांचा समावेश त्यात आहेच पण ‘चिन्ह’चं संकेतस्थळ पाहून अन्य भाषिक वाचकही ‘चिन्ह’च्या मित्र परिवारात मोठ्या संख्येनं सामील होत आहेत. सार्‍यांची मागणी एकच आहे ‘चिन्ह’ आता इंग्रजीत हवं. त्या मागणीचा मान राखून ‘चिन्ह’ लवकरच Chinha : The Visual Idiom’’ या नावानं ‘चिन्ह’ची आंतरराष्ट्रीय आवृत्ती प्रसिद्ध करणार आहे. या आवृत्तीत सर्वप्रथम ‘चिन्ह’च्या मराठी आवृत्तीत गाजलेल्या लेखांचं, ज्यात चित्रकार गायतोंडे, भास्कर कुलकर्णी, प्रभाकर बरवे, विश्वनाथ नागेशकर, विनायक मसोजी, रवी वर्मा इत्यादींवरच्या लेखाचा समावेश असणार आहे. येत्या दिवाळीपूर्वी ही आवृत्ती प्रसिद्ध व्हावी असा प्रयत्न राहाणार आहे. या इंग्रजी प्रकाशनामुळे महाराष्ट्रातील चित्रकारांचं कर्तृत्व जगभरातल्या कलारसिकांसमोर मोठ्या प्रमाणावर साकारलं जाणार आहे. आज ‘चिन्ह’च्या संकेतस्थळावर वरील कलावंतांविषयीचं जे साहित्य मराठीत प्रसिद्ध केलं असतानाही जगभरातून कलारसिकांचा, वाचकांचा, अभ्यासकांचा जो प्रतिसाद मिळतोय तो पाहता इंग्रजी आवृत्तीचं  स्वागत मोठ्या प्रमाणावर केलं जाईल याविषयी ‘चिन्ह’च्या मनात तीळमात्रही शंकेला जागा राहिलेली नाही.

‘चिन्ह’च्या संकेतस्थळावरील उपलब्ध असलेले मराठी लेख मोठ्या प्रमाणावर वाचले जात आहेत. त्याची सर्व आकडेवारी ‘चिन्ह’पाशी उपलब्ध आहे. या लेखांमध्ये चित्रकार गायतोंडे, चित्रकार नागेशकर, राजा रवी वर्मा, सुनील गावडे यांच्यावरच्या लेखांचा समावेश आहे. कित्येक हजारो वाचकांची आकडेवारी या आणि अन्य लेखांना लाभली आहे. ते सर्वच वाचक मराठी असतील असा समज करून घेणं चुकीचंच ठरेल. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी, नेदरलॅंड, सिंगापूर,इंडोनेशिया, इतकंच काय रशियातूनही ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाला मिळालेला वाचकवर्ग मराठी असेल असं म्हणणं योग्य नव्हे. अमेरिकेसारख्या देशातून संकेतस्थळ सुरू झाल्यापासून तब्बल १३ ते १५% हिट्स ज्या अत्यंत नियमितपणे मिळत आहेत त्या केवळ मराठी मानणं योग्य ठरणार नाही. यु.एस एज्युकेशनकडून नियमितपणानं मिळणार्‍या २%  याही मराठी मानता येणार नाहीत. इतकंच काय पण हॉवर्ड विद्यापीठाकडून सातत्यानं येत असलेल्या हिट्सही मराठी निश्चित म्हणता येणार नाहीत.
‘चिन्ह’च्या संदर्भात घडत असलेल्या या सर्वच घडमोडी निश्चितपणानं उत्साह आणि ऊर्जा वाढविणार्‍या तसंच नवीन उमेद देणार्‍या आहेत यात शंका नाही.

‘चिन्ह’चा अंक वर्षातून एकदाच प्रसिद्ध होतो. आधीच्या संपूर्ण वर्षांत घडलेल्या घटनांचं प्रतिबिंब त्या अंकातत पडावं असा प्रयत्न असतो. पण दोन अडीचशे पानांमध्ये काय काय बसवणार? त्यावर उपाय म्हणूनच ‘चिन्ह’च्या ब्लॉगची निर्मिती झाली. महाराष्ट्रातल्या कलशिक्षण व्यवस्थेतल्या भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणता यावी म्हणूनच ‘क(।)लाबाजार’ अंकाची निर्मिती झाली. तो प्रयत्न अपुरा ठरू नये या हेतूनच ‘प्रश्न चिन्ह’ ब्लॉग सुरू झाला. आता हे दोन्ही ब्लॉग चांगलेच स्थिरावले आहेत. त्यांना फॉलोअरही खूप मिळाले आहेत आणि वाचकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. ‘प्रश्न चिन्ह’ ब्लॉगवर महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं अनावृत्त पत्र ३००० पेक्षा जास्त लोकांनी वाचलं. ‘चिन्ह’ आणि ‘प्रश्न चिन्ह’ या दोन्ही ब्लॉग्जना आजपर्यंत प्रत्येकी १०,००० वाचक लाभले आहेत आणि त्या वाचकांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढच होताना दिसत आहे. लवकरच ‘चिन्ह’चा तिसरा ब्लॉग ‘इंग्रजी ब्लॉग’ प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे ‘चिन्ह’च्या इंग्रजी आवृत्तीची सर्वच माहिती जगभरातल्या सर्वच वाचकांना उपलब्ध होणार आहे. इंग्रजी आवृत्तीच्या फेसबुक अकाऊंटमुळे इंग्रजी आवृत्तीचीही इत्यंभूत माहिती जगभरातल्या इंग्रजी वाचकांना उपलब्ध होणार आहे.

‘चिन्ह’च्या ब्लॉग्जना मिळालेलं हे यश पाहून ‘चिन्ह’नं ‘चिन्ह’ ब्लॉगचं रूपांतर लवकरच ‘इंटरनेट वृत्तपत्रात’ (ई पेपर) करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘चिन्ह’चा आगामी अंक प्रसिद्ध होताच हे वृत्तपत्र वाचकांना दररोज उपलब्ध होईल. ज्यात ‘चिन्ह’च्या विशेष स्टोरीज बरोबर मुंबईच्या कलादालनात भरणारी प्रदर्शनं, चित्रकारांच्या मुलाखती, स्टुडिओंना भेटी, कलाविषयक पुस्तकांची परीक्षणं आणि कलाविषयक बातम्या यांचा समावेश असेल. त्याचबरोबर ‘कलाकीर्द’ ही ऑनलाईन आर्टिस्ट डिरेक्टरी ‘चिन्ह’ यावर्षाअखेर सुरू करणार आहे. या डिरेक्टरीमध्ये सुरूवातीला महाराष्ट्रातील आणि नंतर भारतातील चित्रकारांचा समावेश केला जाणार आहे. या डिरेक्टरीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या डिरेक्टरीद्वारे जगभरातल्या कुठल्याही कलारसिकाला, कलासंग्राहकाला ‘कलाकीर्द’मध्ये समाविष्ट झालेल्या चित्रकाराचं चित्र किंवा शिल्पकाराचं शिल्प कुठल्याही मध्यस्थाविना (त्यात ‘चिन्ह’सुद्धा आलं) थेट त्या कलावंताकडूनच खरेदी करता येणार आहे. आज भारतात सुमारे चारशे साडे चारशे व्यावसायिक कलादालनं आहेत. पण त्या सर्वांशी संबंधित असलेल्या कलावंतांच्या एकत्रित यादीवर नजर टाकली तर असं दिसतं की ती यादी तीनशे कलावंतांच्या पुढे जात नाही. एकट्या महाराष्ट्रातच १२००पेक्षा जास्त कलावंत आहेत. संपूर्ण भारतात ही संख्या दहा ते बारा हजार इतकी सहज भरावी. मग या कलावंतांनी करायचं काय? त्यांनी आपल्या कलाकृती विकायच्या तरी कशा? ‘कलाकीर्द’ ही ऑनलाईन डिरेक्टरी विशेषत: त्यासाठीच कार्य करणार आहे.

या सर्व उपक्रमांसाठीच ‘चिन्ह’ला कलावंतांच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. म्हणूनच ‘चिन्ह’ या ब्लॉगद्वारे महाराष्ट्रातील कलावंतांना जाहीर आवाहन करत आहे. ‘चिन्ह’च्या आगामी अंकाचं एक, अर्ध अथवा पाव पान प्रायोजित करा अथवा ‘चिन्ह’ला एक, अर्ध्या किंवा पाव पानाचं जाहिरात प्रायोजकत्त्व द्या.
१) ही जाहिरात आगामी नग्नता : चित्रातली आणि मनातली विशेषांकात प्रसिद्ध होईल.
२) ही जाहिरात त्याच शुल्कात आगामी ‘इंग्रजी’ आवृत्तीतही प्रसिद्ध होईल.
३) याच जाहिराती वरील दोन्ही अंकांच्या ‘ई मॅगझिन’ आवृत्तीतही त्यात शुल्कात प्रसिद्ध होतील.
४) याच जाहिराती ‘चिन्ह’च्या www.chinha.in या संकेतस्थळावरही वर्षभर प्रकाशित केल्या जातील.
५) जाहिरात प्रायोजकत्व स्वीकारणार्‍या कलावंतांच्या प्रत्येकी ६ कलाकृती ‘कलाकीर्द’ ऑनलाईन डिरेक्टरीत प्रदर्शित केल्या जातील.

‘चिन्ह’च्या अंकात दरवर्षी पंधरा वीसच स्टोरीज् प्रसिद्ध करता येतात. विषय खूप असतात पण पृष्ठ मर्यादेमुळे विषय खुणावत असूनही त्यांचा अंतर्भाव अंकात करता येत नाही. महाराष्ट्रातल्या कलावंतांची संख्याही खूप आहे. मग त्यांनाही ‘चिन्ह’शी कसं जोडता येईल? या विचारातून गतवर्षी प्राथमिक स्वरूपात ‘जाहिरात प्रायोजकत्व योजना’ सुरू झाली. यंदा त्या योजनेनं चांगलाच आकार घेतला आहे. या योजनेनुसार ‘चिन्ह’ची काही पानं या जाहिरात प्रायोजकत्व योजनेसाठी राखून ठेवण्यात येणार आहेत. कलावंतांना त्यात नाव, संपर्कासह आपल्या कलाकृती प्रसिद्ध करता येतील. या पानांचं स्वरूप एखाद्या प्रदर्शनाच्या कॅटलॉगसारखं असणार आहे. हा अंक किंवा ज्या अंकात ही पानं पुन्हा प्रसिद्ध केली जाणार आहेत तो इंग्रजी अंक ज्या कलारसिकाच्या, कलासंग्राहकाच्या हातात पडेल त्याला ज्या कलावंतांचं काम आवडलंय त्याच्याशी थेट संपर्क साधून त्याची कलाकृती मध्यस्थाविना विकत घेता येईल. जहांगीरसारख्या कलादालनाचं बुकिंग पाच पाच, सहा सहा वर्षं करता येत नाही. इतरत्रही प्रदर्शनासाठी कलावंतांना खेटे घालावे लागतात. या सार्‍याला ‘चिन्ह’नं हा एक अभिनव पर्याय उभा करून दिला आहे. आगामी अंकाची घोषणा होताच महाराष्ट्रातील चित्रकारांनी पहिल्या टप्प्यातच या पर्यायाला प्रतिसाद देवून जे भरघोस स्वागत केलं ते पाहता ‘चिन्ह’चा हा उपक्रमही मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरेल शी सु चिन्ह दिसत आहेत.

‘चिन्ह’ हे तद्दन व्यावसायिक नियतकालिक नव्हे. ‘चिन्ह’ही एका चित्रकारानं चित्रकार आणि चित्रकलेसाठी चालवलेली अभिनव चळवळ आहे. त्यामुळे ‘चिन्ह’ नुसत्या जाहिराती प्रसिद्ध करून थांबत नाही तर त्या कलावंतानं भरलेल्या शुल्कापोटी त्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सोयी - सुविधाही जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देऊ इच्छितं. म्हणूनच महाराष्ट्रातल्या चित्रकारांना ‘चिन्ह’च्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुन्हा एकदा जाहीर आवाहन!

अधिक माहितीसाठी मेल करा किंवा दूरध्वनीवरून थेट संपर्क साधा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment