Monday, November 22, 2010

माझं आवडतं पेंटिंग- एक


कला रसास्वाद म्हणजे नक्की काय? चित्र कसं बघावं, आपल्याला जे कळलय ते बरोबर आहे की नाही हे भल्या भल्यांनाही उलगडत नाही आणि मग चित्रकलेबद्दल जवळीक वाटूनही दुरावा रहातो. चित्रकार अथवा चित्रकला समीक्षक नसलेल्यांच्या बाबतीत तर कला रसास्वाद हा उगीचच फार गहन प्रश्न बनून रहातो. तसं होऊ नये म्हणून 'चिन्ह' तर्फे आम्ही काही चित्रकारांना, चित्रकलेच्या जाणकारांना त्यांच्या आवडत्या पेंटिंगबद्दल, त्यांच्यावर प्रभाव टाकणार्‍या त्यातल्या घटकांबद्दल आणि त्या चित्रकाराच्या वैशिष्ट्यांबद्दल.. एकंदरीतच आपल्या आवडत्या पेंटिंगबद्दल मनात उमटणार्‍या सर्व विचारांना 'चिन्ह' ब्लॉगसाठी शब्दबद्ध करायला सुचवलं. त्यांनी ते आनंदानी मान्य केलं. 


चित्रकार प्रभकार कोलतेंच्या आवडलेल्या पेंटिंगविषयी चित्रकार जयंत जोशींनी चित्राइतक्याच तरलतेने मांडलेले आपले विचार-


कोलते,untitled -




"निसर्गात,साहित्य-सृष्टीत प्रत्येक कल्पनेची जुळी किंवा समांतर उदाहरणे सापडतात.
या कल्पना,त्यांच्या चेतनांचे जनुकीय स्त्रोत आणि त्यांचे वर्गीकरण हे दृश्यमाध्यमातून जितके प्रभावीरित्या व्यक्त होईल तेवढे कशातूनही होणार नाही. शोधणार्‍यालाच नवी रूपे,नवे ध्वनी,चवी सापडत जातात.
हे सर्व अधिक त्यांचे रूप-मेळ,आपसातले संकर अलग अलग प्रमाणात, वेग वेगळ्या लयीत आस्वादले तर त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व निश्चित करण्यासाठी नव्या संज्ञा शोधाव्या लागतात.
चित्रकार प्रभाकर कोलते यांची चित्रे म्हणजे त्यांनी शोधलेल्या आणि त्यांनी अनुभवलेल्या या नव्या भाव-प्रदेशाच्या संज्ञा आहेत.
या संज्ञांचे वर्णन फक्त कोलत्यांच्या प्रत्यक्ष चित्र-दर्शनानेच होऊ शकेल.
असे वाटते की परिपक्वता,एकाग्रता आणि बुद्धी-प्रामाण्याच्या अनेक कसोट्या आणि प्रयोग त्यांनी कॅनव्हासवर केले असतील आणि त्यातल्या "भावना" नावाच्या द्रव्याची वाफ झाल्यावर, निव्वळ चेतनेने उरलेल्या प्रगट अवशेष-चिन्हांची अनियमितता नियंत्रित केली असेल...
खरे म्हणजे या सेरीज मधली सर्वच चित्रे एका वेळी बघायला हवीत.
गाण्यासारखी चित्रकला अंशतः जरी तुमच्या जीवनात झिरपली असेल तर काही वेळाने हे चित्र तुमच्याशी बोलू लागेल.
नाहीतर नाही.
केवळ drawing रूम किंवा ऑफिसची शोभा बनून फर्निचरचा भाग
होऊन राहणार्‍या चित्रांच्या जातीतले हे painting नाही.
या पेंटिंगची जादू सहवासाने तुमच्याशी नक्की संवाद साधते.
कधी आपण कुणा मोठ्या व्यक्तीच्या  सान्निध्यात असल्यावर एका अदृश्य तेजोवलयाचा भास होत राहतो,तसेच या चित्राच्या बरोबर असताना वाटते.
एखाद्या उत्कृष्ट मैफलीचा impact तुमच्यावर काय होतो?तुम्ही निर्विचार आणि स्तब्ध होता.
हे पेंटिंग आणि त्या सेरीजमधली बाकीची चित्रे बघून माझे तसे झाले.
अजूनही होते."

-
Jayant B.Joshi.
'Kalashree'
36 Laxmi Park Colony
Pune 411 030.

'माझं आवडतं पेंटिंग' मधे सर्वात पहिल्यांदा लिहिणारे ज्येष्ठ चित्रकार श्री.जयंत जोशी  गेली जवळपास ३५ वर्षे चित्रकलेच्या किंवा एकंदरच कलेच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत.  मुख्यत्वे ऑइल, अ‍ॅक्रिलिक, पेस्टल्स अशा माध्यमांतून संवेदनशील पेंटिंग करणार्‍या जयंत जोशींची इथे औपचारिक ओळख करुन देताना जेव्हा त्यांच्या कलाकारकिर्दीवर नजर टाकली तेव्हा ते एक यशस्वी चित्रकार आहेत आणि त्यांच्या चित्रांची अनेक स्वतंत्र प्रदर्शने पुणे, मुंबई आणि इतर शहरांमधे सातत्याने भरत असतात, ती गाजतात, चित्रविक्री यशस्वीपणे होते या गोष्टी नजरेत भरल्याही आणि त्या महत्वाच्याही आहेत अर्थातच पण त्याबद्दल सविस्तरपणे इथे सांगण्यापेक्षा मला महत्वाची वाटत आहे त्यांची अगदी सुरुवातीपासून ते आजतागायत सुरु असलेली कलेच्या सर्व प्रांतामधली मुक्त मुशाफिरी. पं. भीमसेन जोशींचे चिरंजीव या नात्याने संगीत तर त्यांच्या जीवनालाच व्यापून आहे पण त्यासोबत साहित्य, नाट्य, सिनेमा (उंबरठा-सुबहचे कलादिग्दर्शन), जाहीरात (घाशीराम कोतवालची जाहिरात संकल्पना आणि प्रसिद्धी), स्टील आणि डिजिटल फोटोग्राफी, कॉम्प्यूटर ग्राफिक्स अशा कलांमधे जयंत जोशी एकीकडे पेंटिंग सुरु असतानाच रमत राहिले, कलेबद्दल सातत्याने विचार करत राहीले, शोध घेत पुढच्या टप्प्यांवर जात राहीले. कलाप्रांतामधे वावरत असतानाच सामाजिक-वैचारिक संघर्षातून कलेच्या जीवनातील स्थानासंदर्भात काही उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करत राहीले. आणि या सार्‍याचे प्रतिबिंब तितक्याच संवेदनशीलतेने त्यांच्या चित्रांमधून उमटत राहीले ही गोष्ट जास्त महत्वाची. त्यांचे 'फेअरी ऑन द व्हीलचेअर' हे एकच चित्र जरी पाहीले तरी ही गोष्ट पुरेशी स्पष्ट होईल. 


'माझं आवडतं पेंटिंग' मधे कदाचित तुम्हालाही तुमच्या आवडत्या चित्राबद्दल आणि चित्रकारांबद्दलही लिहावेसे वाटेल किंवा तुमच्या स्वतःच्या पेंटिंगबद्दल तुम्हाला लिहावेसे वाटेल तर त्याचे मनःपूर्वक स्वागत आहे. आपल्या आवडत्या पेंटिंगविषयीचे तुमचे विचार त्या पेंटिंगच्या इमेजसहीत आम्हाला मेल करा.
शर्मिला फडके

5 comments:

  1. "भावना" नावाच्या द्रव्याची वाफ झाल्यावर, निव्वळ चेतनेने उरलेल्या प्रगट अवशेष-चिन्हांची अनियमितता नियंत्रित केली असेल...
    फार महत्त्वाचे विश्लेषण...
    जयंतराव छान. अजून वाचायला व पहायला आवडेल...
    शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. जयंतराव , खूप छान, मला पेंटिंग चे जास्त काही कळत नाही पण आपला अभिप्राय वाचला आणि खूप आवडला.

    ReplyDelete
  3. Jayantji ,
    Very nice comments on Kolte sir.I have also same thought about sir.Thanks for sharing it with all.

    ReplyDelete
  4. खूप छान लिहीलं आहेत जयंतजी तुम्ही. शाळेत असताना आमचे चित्रकलेचे शिक्षक काही पुस्तकांतील चित्रांसंदर्भात बोलायचे पण आम्हाला समजत काहीच नव्हतं. तसं अजूनही समजत नाहीच. चित्रं वाचणं ही सुद्धा एक भाषा आहे. ही भाषा येण्यासाठी आधी चित्रकलेत किंवा इतर कुठल्यातरी कलेत पारंगत असावं लागतं. तरच ती अशी छान चित्रकाराच्या र्‍हिदयाची भाषा वाचणार्‍याच्या र्‍हदयात घातली जाते. काहीच कळत नसलं तरी जे काही वाचलं ते वाचून छन वाटलं. :-)

    ReplyDelete