Tuesday, November 16, 2010

याला म्हणतात स्वतःवरच लादलेली सेन्सॉरशिप.

आधी



नंतर

यावर्षीच्या दिवाळी अंकांमधे चित्रकलेवर कायकाय येतय याची माहिती 'चिन्ह' ब्लॉगसाठी मिळवताना 'मुक्त शब्द' दिवाळी अंकाचे संपादक श्री. येशू पाटील यांनी यावर्षी कव्हरवर चित्रकार आरा यांनी पन्नासच्या दशकात काढलेले आणि त्यातल्या अभिजाततेमुळे गाजलेले एक फिमेल न्यूड आम्ही छापत आहोत आणि अंकाच्या आतमधे चित्रकार प्रभाकर कोलते यांचा चित्राचे रसग्रहण करणारा लेखही आहे असे सांगितले होते. चित्रकार कृष्णाजी आरा हे भारतातील आधुनिक चित्रकार ज्यांनी फिमेल न्यूड हा विषय घेऊन त्यावर पद्धतशीरपणे,बारकाईने आणि नॅचरलिझमच्या मर्यादेत राहून चित्रमालिका केली.
आनंद आणि उत्सुकता दोन्ही मनात घेऊन 'मुक्त शब्द' २०१० चा दिवाळी अंक उचलला.
अंक उचलला आणि धक्काच बसला.
अंकाच्या मूळ आरांचे चित्र असलेल्या कव्हरवर आता 'मुक्तशब्द'च्या आधीच्या अंकांच्या मुखपृष्ठांची चित्रं छापून 'आजच सभासद व्हा!' असं लिहिलेला एक फ्लॅप बेंगरुळपणानं चिकटवलेला. असं का? ही सेन्सॉरशिप कोणी आणि का लादली?
संपादक येशू पाटील यांना विचारलं तेव्हा असं कळलं की  आरांचं चित्र असलेल्या दिवाळी अंकाच्या प्रती आल्या तेव्हा येशू पाटील सपत्नीक औरंगाबादमधे होते. तिथे विक्रीसाठी अंक ठेवल्यावर त्यांच्या पत्नीच्या असं लक्षात आलं की लोक विशेषतः बायका अंक उचलल्यावर कव्हर बघून लगेच बाजूला टाकून देत आहेत. २-३ वेळा असं झालं. ओळखीच्या एक बाई तर म्हणाल्याही की- 'हे काय.. आधी कशी छान छान चित्रं असायची कव्हरवर!'  दरम्यान संपादकांनाही काही दुकानदार, अंक विक्रेत्यांचे कव्हरबद्दल नाराजी व्यक्त करणारे फोन आले होते. ग्राहकांना सांभाळून घ्यायला हवं, घरी बायका-मुले असल्याने असं चित्र असलेला दिवाळी अंक घरी न्यायची त्यांची पंचाईत होईल या 'सद्हेतूनं ' मग येशू पाटलांनी त्या चित्राला झाकून टाकण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले- 'चित्र आत कुठंही असलं तर हरकत नाही (तशी आम्ही आमच्या आधीच्या अंकात छापलीही आहेत) पण कव्हरवर असं चित्र छापून चूकच झाली आमची ती सुधारायला हवी असं वाटलं.'
- मग आरांच्या त्या समुद्र किनारी चिंतनमग्न स्वरुपात पाठमोर्‍या बसलेल्या स्त्री च्या नग्न चित्रावर पडदा पडला.
समाजातल्या नैतिक दडपणांना बळी पडून चित्रातली नग्नता नंतर झाकून टाकण्याची झालेली अशी धडपड अर्थातच काही नवी नाही. सोळाव्या शतकात कर्मठ रोमन धर्मगुरुंनी मायकेल अ‍ॅन्जेलोच्या 'द लास्ट जजमेन्ट' मधल्या नग्नतेला अंजिराच्या पानांच्या डहाळ्यांनी झाकून टाकून चर्चचे पवित्र वातावरण अबाधित राखण्याची धडपड केली. पुढची अनेक शतकं ही मोहीम चालूच राहिली. 'द फिग लिफ' या नावाने कलेच्या क्षेत्रात बदनाम होत राहिली. आज एकविसाव्या शतकातही अशी अंजिराची पानं चित्रांमधल्या नग्नतेला झाकून टाकण्यासाठी धडपडतच आहेत.

'मुक्त शब्द'च्या आतल्या पानावर आरांच्या या चित्राचे अत्यंत सुंदर रसग्रहण चित्रकार प्रभाकर कोलते यांनी 'स्त्रीच्या पाठीलाही डोळे असतात' या लेखात केलं आहे. चित्राकडे विशेषत: 'न्यूड' कडे कलात्मक दृष्टीनं बघणं म्हणजे नेमकं काय? चित्रकार जेव्हा 'न्यूड' करतो तेव्हा नग्न देह चित्रातून दाखवण्यामागे त्याला कोणत्या भावभावनांचे प्रकटीकरण अभिप्रेत असते हे इतक्या सोप्या शब्दांत या आधी कधीच कोणी उलगडवून दाखवलं नव्हतं . ज्या चित्राबद्दल आपण इतकं भरभरुन लिहितो आहोत त्याला असं 'लपवून' टाकल्यावर कोलतेंना काय वाटलं? एक चित्रकार म्हणूनही त्यांची याबद्दल प्रतिक्रिया काय हे जाणून घेणे महत्वाचे वाटले.
कोलतेंना फोन केला तेव्हा अत्यंत कडक शब्दांमधे त्यांनी याचा निषेध केला. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर- " आरांच्या चित्रावर असा फ्लॅप लावला हे मला नंतर समजलं आणि धक्काच बसला. आरांच्या अभिजात चित्राचा यात अपमान झाला आहे.  लोकांची अभिरुची घडवण्याचे काम संपादक-प्रकाशकांचे आणि तेच चुकीच्या पद्धतीने चित्राकडे बघतात याला काय म्हणायचं? नग्न चित्र म्हणजे त्याकडे केवळ लैंगिकतेच्याच दृष्टीकोनातूनच बघितलं जातं हा समज अजूनही असावा हे दुर्दैव आहेच पण जे निषेध करतील, नाकं मुरडतील त्यांना चित्रांमधल्या नग्नतेकडे कसं बघायला हवं हे पुन्हा एकदा शिकवण्याची ही संधी घ्यायच्या ऐवजी संपादकांनी अशी कच खाल्ली हे जास्त दुर्दैवाचं. बॉलिवुड आणि इतर माध्यमांतून बिभत्सतेचा चाललेला नंगा नाच जो समाज खपवून घेतो त्या समाजाला आरांसारख्या चित्रकाराने काढलेलं न्यूड दिवाळी अंकाच्या कव्हरवर चालत नाही, त्यामुळे अंकाचा दर्जा आणि खप कमी होतो हा त्या समाजाचा ढोंगीपणा आहे.  'मुक्त शब्दचा' हा कसला 'मुक्त'पणा?"
-------------------

प्रभाकर कोलतेंनी लिहिलेल्या आरांच्या या न्यूड चित्राच्या रसग्रहणातील हा एक छोटासा पॅरा- " तिच्या बसण्यातील सहजता आणि थाट आवाहकतेची मर्यादा जपणारा तसेच विवस्त्रतेतही सौंदर्याचा एकही बुरुज ढासळू न देण्याचा तिचा मानस व्यक्त करणारा. अवघ्या जगाकडे तिने केलेली पाठ त्या मानसाचेच बाह्यांग असावे बहुतेक. अशी पाठ फिरवून बसताना तिने साधलेला विशिष्ट 'कोन' म्हणजे पाठीचे सुरक्षित पदरात रुपांतर करण्याचा मंत्रच. असा पदर झालेली पाठ वार्‍यामुळे नव्हे तर आतल्या चैतन्याने थरथरणारी.
स्वतःच्या देहसंपदेवर स्वतःखेरीज इतर कुणाचीही नजर पडणार नाही याची खबरदारी घेत मुक्तीचे दुर्मीळ क्षण एकांतात अनुभवणार्‍या ह्या स्त्रीला चाहूल लागू न देता, चित्रकाराने तिला आणि त्यालाही न अवघडवणारा 'कोन' चित्र रंगवताना साधला असण्याची शक्यता अधिक आहे. ह्या अशा कोनामुळेच जिवंत भिंतीपलीकडचे चढ-उतार, भाव-विभाव, भावविवश-कटाक्ष इत्यादी रती-ऐश्वर्याचे मौल्यवान घटक तिच्या पाठीवरच्या ओलेपणात आपल्याला शोधावे लागणार आहेत. आपला हा शोध यशस्वी व्हावा म्हणून चित्रकाराने कलात्मक काळजी घेत घेत ते देहवैभव आपल्या कल्पनाविश्वात भासमान करण्याचा अनवट प्रयत्न केला आहे; परंतु तो करताना त्याने तिची जांभुळसर पाठ हुबेहूब नव्हे तर हळव्या कंपनप्रक्रियेने रंगवून आपल्या वासनेला नव्हे तर सौंदर्यजाणिवेला चाळवले आहे; त्यामुळे ही पाठच त्याने रंगविलेल्या चित्राचा चेहरा झाली आहे. अशा त्या चित्र-चेहर्‍याच्या शोध प्रवासात आपल्याला सहाय्यभूत ठरले आहेत ते; रंग, आकार, पोत, छायाप्रकाश इत्यादी चित्रघटक आणि ते हाताळण्याचे चित्रकाराचे लक्षणीय कसब."
-------------------
१९७२ साली रॉय किणीकरांनी 'आरती' नावाच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर 'न्यूड' फोटोग्राफ छापला होता. स्त्री-देहाचं अर्धवट सौंदर्य छापून वाचकांच्या भावना चाळवण्यापेक्षा स्त्री-देहाच्या पूर्ण सौंदर्याची अभिजात ओळख असा त्यामागे त्यांचा हेतू होता. किणीकरांनी केलेल्या या धाडसावर सत्तरीच्या दशकात सडकून टीका झाली आणि अंकाच्या विक्रीची बोंब झाली असे अनिल किणीकरांनी गेल्या वर्षीच्या 'चिन्ह'मधे लिहिलं होतं. आज तब्बल चाळीस वर्षांनंतर 'शब्द मुक्त' च्या संपादकांना असेच धाडस करायची इच्छा व्हावी पण ऐन वेळी मात्र समाजाची टीका आणि विक्रीचा तोटा याला घाबरुन त्यांना कच खावी लागावी, त्यांनी स्वतःहून स्वतःवर सेन्सॉरशिप लादून घ्यावी?
यात नक्की काय आणि कुठे चुकते आहे?
कलेबद्दल आस्था असणार्‍या प्रत्येकाकडून यावर प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

----------------------------------------------------------------------------------------------
शर्मिला फडके

15 comments:

  1. मुळात येशू पाटलांचे काही चुकले आहे असे मला वाटत नाही. हा व्यवसाय आहे. दुसरे असे की ह्या बेंगरूळ चित्रापेक्षा कोरे पृष्ठ देखील सुरेख दिसले असते. प्रत्येकाने कोलतेंच्या अथवा इथे लिहिणार्याच्या चष्म्यातून पाहिले पाहिजे असे काही नाही. आणि यावरून आम्हाला कलेबद्दल आस्था नाही असा निष्कर्ष काढण्याचेही कारण नाही....

    ReplyDelete
  2. चांगला प्रतिसाद आहे. धन्यवाद! पण असं स्पष्ट मत नावानिशी कां मांडले गेले नाही ते कळलं नाही. असो.

    ReplyDelete
  3. पाटलांचा निर्णय व्यावसायिक गणितातून आलेला दिसतो आहे. 'मुक्तशब्द' हा कलेला वाहिलेला अंक आहे का? मला माहीत नाही. तसं असेल तर हे घूमजाव अक्षम्य आहे, अन्यथा व्यावसायिक गणित मांडणं हा काही गुन्हा नव्हे. (नग्नता मांडणं हा गुन्हा नव्हे तसाच!)

    अंक अधिक खपला तर अधिक लोकांपर्यंत हे चित्र आणि त्यावरचा रसग्रहणात्मक लेख पोचेल अशी आशा करू.

    इतर माध्यमांतील बीभत्सता खपवून घेणार्‍या समाजाला हे मुखपृष्ठ का चालत नाही हा प्रश्न आहे खरा. पण जनसामान्यांची कलात्मकतेची व्याख्या निराळीच असते एकंदरीत. गुलगुलीत/गुळगुळीत तेच कलात्मक - हे समीकरण 'रती-ऐश्वर्याचे मौल्यवान घटक तिच्या पाठीवरच्या ओलेपणात शोधण्या'च्या खटाटोपापेक्षा सोपं नाही का? (वरच्या अभिप्रायातही प्रस्तुत चित्राला 'बेंगरूळ' म्हटलेलं दिसतं आहेच.) झिरझिरीत वस्त्रांतल्या स्त्रिया मिरवल्याच की इतकी वर्षं दिवाळी अंकांवर!

    हे मुखपृष्ठ 'दिवाळी' अंकाचं नसतं तर हा घटनाक्रम काही निराळा असता का असाही प्रश्न पडला. म्हणजे सणावारी आम्हांला मंगल तेच (म्हणजे आम्हांला जे मंगल वाटतं किंवा थोडा विचार केला तर वाटू शकेल ते नव्हे, तर जे मंगल समजायचं आम्हांला पिढ्यान्‌पिढ्या वळण पडलं आहे ते) बघावंसं वाटतं - असं काही असेल का?

    तिसरा प्रश्न निवडीचा. कलात्मकता कुठे संपते आणि बीभत्सता कुठे सुरू होते याला काही सर्वमान्य निकष आहेत का? जाणकारांत तरी?

    मी 'मत' मांडलेलं नाही, नुसतेच प्रश्न मांडले आहेत याची मला कल्पना आहे. पण निदान हे प्रश्न या लेखामुळे पडले. त्याबद्दल तुमचे आभार.

    ब्लॉग अत्यंत देखणा आणि वाचनीय आहे. त्याबद्दलही अभिनंदन.

    ReplyDelete
  4. माझ्याकडे पहिल्या लॉटमधलाच अंक आहे, मला माहीतच नव्हतं हे असं घूमजाव केलेलं.
    मी अंक वाचायला हातात घेऊन नेहमीसारखी लोकल, बसमधून फिरले. असं काहीतरी होईल हे माझ्या लक्षातही नाही आलं. उलट एका बाईनं मुद्दामून अंक घेऊन उघडून पाहिला. भिवया उंचावल्या, पण 'हे काय वाईट-साईट' अशी प्रतिक्रिया नाही दिली. ती तशी 'एलिट' दिसणारी बाईही नव्हती हे विशेष.
    हा चित्राच्या देखणेपणाचा आणि नग्नतेतही चित्र बीभत्स होणार नाही अशा बेतानं साधलेल्या तोलाचाच परिणाम ना?
    सर्वसामान्य वाचकाला जे कळतं, ते संपादकांना कळू नये? की ही निव्वळ डोळेझाक आणि सारवासारव? तीही शब्दच्या संपादकांकडून?!

    ReplyDelete
  5. The good opportunity to see the cover and read Kolte Sir's article based on it, was quite useful for art students and the common people as well. Now on we will miss this,....Unfortunatelly !!!

    ReplyDelete
  6. हे प्रकार काही नवीन नाहीत, त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, पण त्याची दखल घेऊन निषेध व्यक्त करत राहणं हेदेखील तितकंच महत्त्वाचं नि आवश्यक असतं, त्यासाठी आभार.

    अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आधुनिक मूल्यं विरुद्ध व्यावसायिक नफा-तोटा हा मुद्दाही काही नवीन नाही. पण त्यातल्या व्यवसायिकतेला उणं लेखताना आपण वाढीव दराने अंक खरेदी केला असता का हाही विचार करून पाहायला हवा. मी स्वत: हा अंक खरेदीही केला नसल्याने खरं तर मला त्याविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. पण हा प्रश्न पडला म्हणून इथे लिहित आहे.

    अधिक व्यापक दृष्टिकोणातून पाहता मला स्वातीने उपस्थित केलेला मुद्दाही महत्त्वाचा वाटतो. इथे प्रश्न केवळ सेन्सॉरशिपचा नाही, तर त्याला असलेलं ‘एरवी ठीक आहे, पण दिवाळी अंकात नको’ हे तथाकथित मांगल्याच्या नाठाळ कल्पनांचं परिमाणही तपासून पाहिलं पाहिजे, असं वाटतं. ह्याचाही ऊहापोह व्हायला हवा, असं वाटतं.

    एका बाजूला खप, टीआरपी वाढविण्यासाठी नग्नतेचा सढळ होणारा वाढता वापर नि दुसर्‍या बाजूला अशा चित्रांमुळे अंकाच्या खपावर होणारा परिणाम अशा काहीशा विचित्र स्थितीत लोक जगताहेत. म्हणजे नग्नता सरधोपट वासनापूर्ण, आंबट अशी आली तर आम्हांला चालेल, पण कलात्मकता वगैरे असेल, तर आम्हांला नको. असं काही झालंय का?

    (प्रभाकर कोलते ह्यांचा संपूर्ण लेख त्यांच्या व संपादकांच्या संमतीने येथे पुनर्प्रकाशित करता येईल का? ही विनंती निराधार आहे, हे मान्य आहे. पण छापील अंकाला अ‍ॅक्सेस नसलेल्यांपर्यंतही तो लेख पोहोचेल, असं वाटतं. धन्यवाद.)

    ReplyDelete
  7. This automatic assumption of nudity in art as sexual in nature or for titillation has to stop.
    And when editors of reputed magazines themselves act in such a spineless fashion, how can any form of art ever get a chance to reach the people?
    It is ironical that the magazine carried an article about the same painting, supposedly to make the people aware about it and then resorted to this frantic cover-up...

    ReplyDelete
  8. शर्मिला -

    मी हा ब्लॉग आधीही वाचलाय, पण चित्रकलेचा गंध नसल्याने गाण्या-बिण्याच्या ब्लॉगवर कशी ’च्यायला हे असेल भारी, पण मला माहित नाही तर चांगली अगर वाईट प्रतिक्रिया का आणि कशी द्या’ असा प्रकार होतो तसा झाला. आता तु विचारलंसच आहेस तर ही प्रतिक्रिया.

    आरा, पाटील, कोलते, मुक्त शब्द - हे मला माहित नाहीत. त्यामुळे अ ने काढलेल्या चित्रावर ब ने लेख लिहिला तो क ने ख मध्ये छापायचं ठरवलं, पण पहिल्या पानावर टाकलेलं चित्र आतल्या पानावर टाकलं - असं म्हटलं तरी माझ्यासाठी एकुण एक. वेल, तर असं झालं तर? वेल, big fuck! क हा ख चालवतो - त्यात त्याने कुठेही काहिही टाकावं. ब चं डील असेल कव्हर बद्दल तर ब चा राग मी समजु शकतो, पण तसं नसेल तर he has no argument. शिवाय ब चा लेख तर बदलला गेला नाही ना? I would consider that as travesty. If thats not the case, again 'big fuck'!

    अ हा कोण मला माहित नव्हता (अजुनही नाही). त्या कव्हरवरचं ते चित्र पाहुन ’यात विशेष किंवा objectionable काय आहे?’ हेच मला कळलं नाही. अर्थात हा माझा नाण्याच्या दोन्ही बाजुंच्या अज्ञानाचा भाग.
    पण च्यायला एका obscure and unknown (for a commoner like me) but apparently important (for people who have कलेबद्दल आस्था) चित्रकाराबद्दल क ख मध्ये लिहायचं ठरवतो, ब ला मोबदला देतो आणि ख च्या विक्रीची जबाबदारी घेतो याबद्दल आनंद व्यक्त करायचा का ’हा कमकुवतपणा आहे’ अशी बोंब मारायची? (म्हणजे हा ज्याचा त्याचा प्रश्न असं मला म्हणायचंय).

    उगीच असल्या (आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबद्दल) वैतागणं म्हणजे चुत्येगिरी आहे. (असं माझं वैयक्तिक मत).

    माझा एक मित्र आहे. भन्नाट चित्रं काढतो. चित्र काढण्याशिवाय बाकी काही येतच नाही. म्हणजे याला ’कला’ म्हणतात आणि याबद्दल ’आस्था’ वगैरे वाटायला पाहिजे असंही त्याला कधी वाटलं असेल कि नाहे शंका आहे. अभिनव मध्ये वगैरे शिकला. बालगंधर्व मध्ये वगैरे त्याची प्रदर्शनं झाली (असं ऐकुन आहे). तिथे critics ने विचारलेल्या प्रश्नांना yeah, yeah हे उत्तर द्यायचा कारण त्याला इंग्लीश येत नाही. एनीवे, तर असं. हे का सांगितलं माहित नाही. कदाचित असं म्हणायचं होतं कि बाकीच्या प्रदर्शनीय चित्रकारांनी आपापल्या भोवती जी भिकारचोट exclusivity चिकटवुन घेतलेली असते, ती त्याने घेतलेली नाही. हे लिहिताना अजुन २ मैत्रिणी आठवल्या. चित्रकार. भन्नाट वगैरे. त्यांच्याकडे exclusivity आहे. (आणि त्यांना इंग्लिश येतं) (कंस उगीच punchline म्हणुन टाकला).

    आणि हे चित्रांबद्दलच होतं असं कुठं आहे? सामंतांनी ’k-5' एका दिवाळी अंकात छापली होती. त्यावर ’गोष्ट लय भारी आहे, पण दिवाळी अंकात नको होती. वाचल्यावर दिवाळीभर अशुभ वाटत राहिलं’ अशा अर्थाची पत्रं आली होती. (हे मला माहित कारण त्यांनी तसं त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलंय). मी दिवाळी अंक दिवाळीत कधीच वाचत नाही.(कारण एका महिन्याने ते रद्दीच्या दुकानात रु. ५ ला मिळतात) - त्यामुळे मला तो प्रश्न पडला नाही.

    च्यायला मी आता लिहुम लिहुन absolutely वैतागलोय.
    माझी प्रतिक्रिया (या लेखावर) अशी - I dont give a fuck.

    ReplyDelete
  9. स्त्रीसौंदर्य हा नेहमीच कलेच्या आविष्काराचं प्रतिक ठरले आहे.मग ते १५वे शतक असो वा २१ वे.कादंबरीकार डि.एच.लॉरेन्स यांनी’sons n lovers' हि कथा लिहिली होती,तेव्हा लोकांनी त्या साहित्यावर बहिष्कार टाकला होता.पण मजेदार गोष्ट अशी की,ती कादंबरी best seller ठरली.आपल्या भारतीय साहित्यात देखील अशी अनेक कवी,लेखक ज्यांनी ’स्त्री’ या विषयावर कविता,कादंब-या लिहिल्या आहेत.पण त्या एका विशिष्ट brand खाली खपतात.आणि लोकहि चवीने वाचतात.भारतीय शिल्पकलेतही असे अनेक नमुने आहेत.त्याला विरोध होत नाही.मग पाटलांनी असं काही केलं कि हा विरोध का? आज घराघरात'big boss & rakhi ka insaaf' असे programme सर्रास दाखविले जातात.या अश्लील कार्यक्रमांवर बंदी का लावत नाही.मला वाटते दिवाळी अंकावर अशा प्रकारचे चित्र देणे गैर नाही,कारण याच्याहून भयंकर चित्रण आपण समाजात पाहत असतो.

    ReplyDelete
  10. स्वाती प्रतिक्रिया आवडली. नजरेला जे सुंदर दिसते तिथपर्यंतच थांबायचे की त्यापलीकडच्या जाणीवेपर्यंत पोचून चित्रांमधले रुढ रेषाबद्ध नसलेले सौंदर्य आणि कलात्मकता शोधायचा प्रयत्न करायचा हा खरा प्रश्न आणि तोच सामान्यांच्या निदान मनात तरी यावा यासाठीच कोलतेंसारखे चित्रकार जाणीवपूर्वक असे लेख लिहून रेषा-लयींमधले सौंदर्य पोचवायचा मनापासून प्रयत्न करत असतात. आणि तथाकथित सौंदर्याचा किंवा मांगल्याचा यानिमित्ताने डोकं काढणारा प्रश्न हा खरं तर शहामृगी वृत्तीचा निदर्शक. सर्व बोचणार्‍या, टोचणार्‍या, खटकणार्‍या वास्तवाकडे वाळूत डोके खुपसून आम्हाला ते दिसायलाच नको असा अट्टहास भल्या भल्यांचा असतो. त्याकडे डोळे उघडे ठेवून बघायला कधीच नको असतं. सत्य सुंदर असते मात्र जे सुंदर आहे तेच फक्त सत्य नसते याकडे केलेली ही डोळेझाक असते.
    मेघना तुला आलेला अनुभव महत्वाचा वाटतो. मुक्त शब्दच्या संपादकांनी समाजातून अ‍ॅडव्हर्स प्रतिक्रियाच येतील हे मुळात गृहित कां धरावे आणि त्या आल्याच तर त्यांना द्यायला त्यांच्याकडे योग्य संयुक्तिक उत्तर नव्हते कां याचं आश्चर्य वाटतं.
    संतोष- अंकामधे कोलतेसरांचा लेख अजूनही आहे आणि फ्लॅपमागे चित्रही आहे.
    अ सेन मॅन- अगदी बरोबर. असे प्रकार नविन नाहीत आणि पुढेही होत रहातील पण ते जेव्हा घडतात तेव्हा निषेध आणि तो करताना त्यामागची नक्की कारणे काय याचा शोध घेतला जायला हवा. कोलतेसरांचा संपूर्ण लेख द्यायला नक्कीच आवडेल. परवानगीसाठी नक्की प्रयत्न करु.
    मिथिला- This automatic assumption of nudity in art as sexual in nature or for titillation has to stop. >>> अगदी बरोबर. दुर्दैवाने तेच तर केले जात नाही. चिन्हच्या येत्या अंकात याच विषयावरचा विशेष विभाग आहे.
    अभिजित बाठे- प्रतिक्रिया खेदजनक आहे (खेद भाषेच्या वापराबद्दल नाही. ती कुठे, कशी वापरावी हा वैयक्तिक प्रश्न). खेद अशासाठी की पोस्ट लिहिण्यामागचा मुख्य मुद्दाच तुमच्या ध्यानात आलेला दिसत नाही. आरा, पाटील, कोलते, मुक्त शब्द वगैरे शब्द माहीत असण्याचा किंवा नसण्याचा आणि या पोस्टमधला मुद्दा समजण्याचा मुळात काही संबंधच नाहीये. ते असो. पण चित्रकला म्हणजे काहीतरी वेगळं आणि ते मला समजून घ्यायची गरजच काय हा अ‍ॅटीट्यूड त्यातून दिसतोय तो खेदजनक.
    अनघा- प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  11. फार दिवसांनी एक चांगली चर्चा सुरु आहे बघून बरं वाटलं. जीवंतपणाची एक खुण दिसली हा एक दिलासा.
    वर वर बघितलं तर पाटलांच्या आळु पाना सारखा अंगाला पाणी लागु न देण्याचं समर्थन सहजच पटतं (व्यावसाईक गणित असं गोंडस नाव ते) पण ते तसं नाहीच.
    कला, विशेषतः चित्र, कविता, गाणं जेव्हा अंतर्मुख टप्प्यात आले, तेव्हा कलाकार सादरीकरणापेक्षा एक विचार मांडण्यावर भर देऊ लागले. विचार ही शक्यतो एकट्याने करण्याची कृती. विचारांना नेमका आकार असतोच असे नाही किंबहुना तो नसतोच. विचारांना दिशा असते. थोडक्यात एक व्हेगनेस, संदिग्धता असते. हीच संदिग्धता जेव्हा ती कलाकृती जन्म घेते तेव्हा कमी अधिक प्रमाणात मांडली जाते. कलावंताने स्वतः पुरता केलेला विचार जो त्याने कलेतून मांड्ला आहे तो मग लोकांपर्यंत पोचावा कसा? अश्या विचार प्रक्रियेतून उमटलेली कलाकृती मुळी सर्वसामान्य लोकांकरता नसतेच मुळी (घ्या!). जर ती तशी करण्याचा प्रयत्न केला तर हीन पातळीवरचा बाजारु पणा म्हणा त्याला. ज्यांना आपल्या विचारांची, कलात्मक जाणीवांची वारंवारीता त्या कलाकृतीशी जुळवता येते आणि रेझोनन्स निर्माण करता येतो, त्यांनाच, त्या सुदैवी जीवांनाच, ती कलाकृती नीटस पणे उपभोगता येते.
    हे दैव जन्मजात असेलच असे नाही. रसिकाची संवेदनशीलता, मानसिक जडणघडण, कलाकृतीशी वैचारीक आणि एनव्हीरॉलमेन्टल जवळीक इ इ यातून ही समज उमज वाढते.
    पण मग उरलेल्या ९९.९९%चं काय करायचं? त्यांना हे समजलं नाही तरी चालेलं ही तुच्छ पळवाट (तुच्छ शब्द लिहीला की मला कायम नेमाडे झाल्यासारख वाटतं-पाप...). ९९.९९%ची कलात्मक जाणीवा वाढवण्याची मोठी जबाबदारी (ठेका नाही) संपादक, टीकाकार इ मंडळींवर येऊन पडते. जर सत्यकथा नसती तर? असा एक सोपा गेम टाकून बघितला तर मी काय म्हणतोय हे ध्यानात येईल. साक्षेपी संपादक पार आरती प्रभु ते ग्रेस आपल्या दाराशी आणून पोचवतात. जर हे मला काय कळत नाय बा असा सोपा स्टॅन्ड त्यांनी घेतला असता तर? शक्यता अनेक आहेत! लोकांना आवडते ते पुरवायला मासिक म्हणजे काय किराणा मालाचं दुकान नाही. ९९.९९%च्यां जाणीवांना आकार देणं, आपापल्या मगदुरानुसार, हे जर जमत नसेल तर आव कशाला आणायचा? लोक वाचतात की जत्रा, आवाज (त्यात काहीच चुक नाही) आणि मजा येते की त्यातली खिडकी चित्र (झरझरीत, पदर ढळलेली वगैरे वगैरे)बघताना.
    मुळात हे मासिक आणि चित्र दोन्ही न बघितलेलं असल्यानं उंटावरुन शेळ्या हाकत त्यावर काही भाष्य (!) नाही करत.
    पण हे थोडं शेपूट घालण्यासारखं वाटलं..नाही पटलं ब्वॉ!

    ReplyDelete
  12. अभ्यासकांनी र.धो.कर्वे यांच्या सामाजस्वास्थ्याचे १०० वर्षापूर्वीचे अंक पाहावेत.

    ReplyDelete
  13. nayan b. nagarkar.

    yah aranchya chitrat saundarya ahe, stritva che saundarya je universal ahe , te koni kitihi jhakla tari te disnarach.
    tyach bhavnene chitrakar ara yanni hai chitra . tyanchya manatil stree saundarya, ani teche swata madhe asnari stree bhavna. spashtapane darshavli ahe.yat ghanerda asa khahich nahi.ashe barech fimi magzine astat tya madhe stree nagna jari nasli tari tiche bhav hai sex chi bhavna uttejit karnare astat, ase asunahi .lokanni expression samjun ghyava,aranchya chitra madhe stree saundaryacha shodh ghyava.

    ReplyDelete
  14. Vaibhav Raut

    Shri yeshu Patil Yachi kruti manala patnari nasali tari ti chukichi mhanta yenar nahi...ase mala vatate.
    mulat aapan asa ka vichar karto ki sarv swarupatil kala sarvana aavdaylach havi? abhijat kala hi purvipasunach tya kalechya chahtya ani abhyas kartya vishishth vyaktinpurta maryadit rahili aahe. aapan samajatil sarvana saktine shastriya sangit aikayla basvu ka? sarvach manase shastriya nrutyat parangat aahet ka? mag chitrakalebabat samajatil pratyek manus eksaman vichar kasa karel?
    jar lok sandshir margane apali napasanti dakhvat asatil tar tyat chuk kay? hinsak margane ekhadya chitrakaracha virodh kartana ashya margane virodh darshvnaryanha aapan aadar karayla hava.
    ekhada divali anka jevha purn maharashtrabhar vitarit hoto tevha fakt shahari bhagatil vachkancha vichar karun chalnar nahi.

    mala ithe ek gosht mahatvachi vatate.... ya ankacha nishedh mhanun kuni tyachi holi keli nahi ani sampadakanehi kunachi mafi magitli nahi.

    ReplyDelete
  15. ज्याच्या नावातच "मुक्त शब्द" आहे (हा मुक्तपणा म्हणजे स्वैरता नव्हे, हे अंगी बाणलेले असूनही), आणि ज्यांनी काहीतरी अभिजात देण्याचे ठरवलेले आहे (असे मी समजतो) त्याच्याच संपादकांनी तथाकथित नैतिकतावाद्यांसमोर हार पत्करावी, हे जेवढे क्लेशकारक आहे, तेवढेच नको तिथे तथाकथित नैतिकतेच्या अकलेचे तारे तोडणा-या समाजाच्या घसरत्या अभिरुचीचे हे दर्शन संतापजनक आहे.

    १) मुळात हे असे प्रकार आपल्याला काही नवीन नाहीत. असे सांस्कृतिक झटके आपल्याकडे अधूनमधून येतच असतात. अजूनही आपली सांस्कृतिक (आणि वैचारिक) प्रगती न झाल्याचे हे लक्षण आहे. ह्यांना राखी सावंत चालते, मल्लिका शेरावत चालते, बिग बॉस चालतो, chanels वर, चित्रपटांमध्ये दिवस-रात्र चाललेला नंगा नाच चालतो, पण कला म्हणून काही वेगळे दाखवण्याचा, करण्याचा प्रयत्न झाला की ह्यांना सांस्कृतिक खाज सुटते, हा खरोखरच करंटेपणा आहे ! मुळात या माणसांचा 'कला' या गोष्टींशीच संबंध नसतो. त्यांची कलेची व्याख्याच वेगळी असते. त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षाच करणे चुकीचे. पण दुर्दैवाने वेगळे काही करणा-यांवर ह्या अश्या लोकांचीच बिनडोक सत्ता चालू पाहते आणि -हास होऊ लागतो तो इथूनच... कारणे काहीही असतील, पण अश्या लोकांची सत्ता मान्य करण्याशिवाय काही वेळा काही जणांसमोर पर्याय नसतो, जसा तो येसू पाटील यांच्यासमोर नव्हता. संपादकीय जबाबदारी आणि व्यावसायिक भान या दोन्ही जबाबदा-या सांभाळताना पाटील यांची कदाचित कसरत झालेली असणार आणि दुर्दैवाने, त्यांच्यातल्या संपादकावर त्यांच्यातल्या व्यावसायिकाने मात केली असणार. अंक सलामत राहीला तर कलेचे भान भविष्यात कधीतरी अधिक जोमाने राखता येईल, हा (तात्कालिक) बचावात्मक (पण दूरदर्शी) विचार त्यांनी केला असावा. त्यामुळे सर्वथैव त्यांना दोष देण्यात काहीच हरकत नाही. दोष द्यायचाच असेल, तर तो ह्या तथाकथित संस्कृती रक्षकांना (अभिजित बाठेंच्या शब्दात सांगायचे झाले तर, भिकारचोट किंवा चुत्या लोकांना) द्यायला हवा, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. अन्यथा ही अशी माणसे जोपर्यंत आहेत, तोपर्यंत हे असेच चालणार.

    २) अभिजाततेचा भाग हा सापेक्ष असू शकतो. आपल्याला आवडलेली एखादी गोष्ट दुस-याला आवडायलाच हवी, असे नाही. मतभेद असू शकता, पण ते वैचारिक असावेत (अर्थात वैचारीकता हा भागदेखील ज्याच्या-त्याच्या विचारांप्रमाणे सापेक्ष असून शकतो म्हणा, हे न संपणारे चक्र आहे). पण अश्या प्रकारे धर्म आणि संस्कृतीचा ठेका घेऊन मिरवणा-या अश्या 'खाज'कुंड्या माणसांचे काय करायचे हा प्रश्न आहेच (वैचारिकतेचा निकष मी यांच्या बाबतीत कधीच लावत नाही). शिवाय यातली कितीतरी मंडळी एक तर करून सवरुन नामा-निराळी राहणारी किंवा संधी मिळाली नाही म्हणून नाम-निराळी राहिलेली किंवा इतर काहीच जमत नाही म्हणून संस्कृती रक्षणाचा ठेका घेऊन फिरणारी असतात. (दारू बंदी सप्ताहाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्याच रात्री अधिकारी-कार्यकर्त्यांचा "श्रम परिहार" होतो, हे काहीसे तसेच आहे. उदाहरण कदाचित अस्थानी वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण त्यामागचा भाव लक्षात यावा.) बायका-मुलांच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा वर्ग अजून ही मोठ्या प्रमाणावर या वरच्या माणसांच्या आणि धर्म-संस्कृतीच्या चक्रात अडकलेल्या आहेत. त्यांना स्वतःचे मत नाही, विचार नाही.

    ३) अभिजित बाठेंच्या बाबतीत - "चित्रकला म्हणजे काहीतरी वेगळं आणि ते मला समजून घ्यायची गरजच काय हा अ‍ॅटीट्यूड त्यातून दिसतोय तो खेदजनक." ही 'चिन्ह'ची प्रतिक्रिया अगदी योग्य ! अश्या भूमिकांमुळेच कदाचित जाणीवपूर्वक काही समजून घेण्याची वृत्ती नष्ट होत असावी. हा प्रघात होता कामा नये.

    शेवटी - जो पर्यंत आपण झापडे काढून जगायला, अलीकडे-पलीकडे बघायला शिकत नाही, तसा विचार करत नाही, तोपर्यंत हे असेच चालणार... हे बदलायला हवे आणि अर्थातच त्यासाठी ह्या 'खाज'कुंड्यांच्या निर्बुद्ध सेन्सॉरशिपला आळा घालायला हवा... आणि अर्थातच आपली अभिरुची, प्रगल्भता वाढवायला हवी......

    ReplyDelete