‘निवडक चिन्ह’ का आणि कशासाठी ?
‘चिन्ह’च्या गायतोंडे अंकाची एखादी प्रत आहे का हो ? एक तरी पहा ना ? तुटलेली, फाटलेलीही चालेल ! असे फोन ‘चिन्ह’ला वारंवार येत असतात. गायतोंडे अंकाबाबतच केवळ नव्हे तर अन्य अंकाबाबतही. मग त्यांची समजूत काढताना नाकीनऊ येतात. सदर अंक ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, तिथं वाचा. वगैरे सांगितलं तरी त्यांची समजूत पटत नाही. त्यांना त्या अंकाची एखादी तरी प्रत हवी असते.

२००१ साली ‘चिन्ह’चं प्रकाशन पुन्हा सुरु झाल्यानंतर वारंवार येणारा हा अनुभव. समोरच्या व्यक्तीला त्या अंकाची प्रत काही करून हवीच असते आणि आमच्यापाशी त्याची एकही प्रत नसते. आता काय करायचं ? यावर उपाय म्हणून ‘निवडक चिन्ह’ची निर्मिती केली गेली. पहिल्या पर्वातल्या १९८७, ८८, ८९ मधील तिन्ही अंकातील निवडक साहित्याचा पहिला खंड २००९ साली प्रसिद्ध झाला. तो हळूहळू विकला गेला, पण आता संपत आलाय. त्याची आवृत्ती पुढे काढायची किंवा नाही की वेबसाईट्वर टाकायची या विषयीचा निर्णय त्या सर्वच प्रती संपल्यावर घेतला जाईल.
मधल्या काळात २००१ सालापासून प्रसिद्ध झालेल्या अंकातील काही अंकही संपून गेले. त्याही अंकाला सातत्यानं मागणी होऊ लागली. म्हणून मग दुसर्या पर्वातील ‘निवडक चिन्ह’चे तीन खंड प्रसिद्ध करावयाचा निर्णय घेतला. यंदाचं वर्ष हे ‘चिन्ह’चं रौप्यमहोत्सवी वर्ष. ‘निवडक चिन्ह’चं प्रकाशन करण्यासाठी हे निमित्त पुरेसं वाटलं. म्हणून ‘निवडक चिन्ह’च्या तीन खंडाची घोषणा आम्ही केली.

२००१ सालापासून २००७ सालापर्यंतच्या अंकातील निवडक साहित्य या खंडासाठी निवडलं आहे. खरंतर या अंकातील निवडक साहित्याचे ६ खंड प्रकाशित होऊ शकतात. पण तूर्त तरी तीनच खंड प्रसिद्ध करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही योजना यशाची ठरली तर पुढील वर्षी तीन खंड जरूर प्रसिद्ध करू. या योजनेला पहिल्या दिवसापासून जो प्रतिसाद लाभतो आहे तो पहाता ही तीन खंडाची योजना यशस्वी होईलच याविषयी आमच्या मनात तरी शंका उरलेली नाही. त्यामुळे भास्कर कुलकर्णींवरचा खंड आणि आत्मकथनं तसेच विविध लेखविषयक खंड असे तीन खंड बहुदा पुढील वर्षी प्रसिद्ध होतील.
वर म्हटल्याप्रमाणे २००१ ते २००७ सालातील अंकामधलं निवडक साहित्य या खंडासाठी निवडण्यात आलं आहे. २००८ सालचा अंक क(।)लाबाजारचा अंक असल्याने त्यातील फक्त ‘जेजे जगी...’ या लेखमालेतील लेखांचीच निवड निवडकसाठी करण्यात आली आहे. बाकी संपूर्ण अंक ‘अंगावर येतो’, ‘वाचवत नाही’, ‘हे सारं भयंकर आहे’, ‘नकारात्मक आहे’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्यामुळे ‘निवडक’मध्ये समाविष्ट करणं टाळलं आहे. त्या नंतरचे अंक हे जवळ जवळ ‘कलेक्टर्स एडीशन’चेच अंक असल्याने त्यांचाही समावेश ‘निवडक’मध्ये करण्यात येणार नाहीये.

जेव्हा हे अंक प्रसिद्ध झाले तेव्हा ते रंगीत स्वरुपात प्रसिद्ध करणे ‘चिन्ह’ला शक्य झाले नव्हते. ती कसर मात्र आता भरून काढणार आहोत. हे सर्वच्या सर्व खंड आर्टपेपरवर प्रसिद्ध केले जाणार आहेत आणि संपूर्णत: रंगीत स्वरुपात ते असणार आहेत. या लेखांसाठी चित्रं आणि प्रकाशचित्रांची निवड पुन्हा नव्याने करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची मांडणी, सजावट सारं सारंच अत्याधुनिक स्वरुपात असणार आहे. आणि मुख्य म्हणजे हे तिन्ही खंड हार्डबाऊंडमध्ये असणार आहेत. जेणेकरून ते पुढची निदान ५०-७५ वर्षे तरी वाचले जावेत. ‘चिन्ह’च्या अभिनव चळवळीचं चित्रकलावर्तुळाच्या दृष्टीनं, वाड़्मयीन किंवा सांस्कृतिक दृष्टीकोनातून महत्त्व विषद करणार्या नामवंताच्या प्रदीर्घ प्रस्तावना हे या खंडाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे.
आता या तिन्ही खंडाची प्राथमिक जुळवाजुळव पूर्ण झाली आहे. यातला सर्वात अवघड खंड होता तो ‘गायतोंडे’ यांच्यावरचा, त्यांची चित्रं, प्रकाशचित्रं मिळवताना खूप अडचणी आल्या त्यामुळे प्रकाशनाला थोडासा वेळ झाला. पण आता त्या अडचणी सुटत आल्या आहेत. लवकरच त्याचं प्रकाशन व्हावं अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर वर्ष अखेरपर्यंत अन्य दोन्ही खंड प्रसिद्ध होतील.

‘चिन्ह’च्या प्रकाशनाना नेहमीच थोडासा किंवा अनेकदा जास्तही उशिर होत असतो याचं कारण ते प्रकाशन जास्तीतजास्त परिपूर्ण कसं होईल हे आम्ही काटेकोरपणे पहात असतो. तिथं कुठलीही तडजोड आम्ही करत नाही. असं करताना अनेकदा पृष्ठ संख्या वाढते. मूळ बजेट वाढतं पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो त्यामागचा हेतू हाच असतो की ‘चिन्ह’चं प्रकाश्न जबरदस्त व्हावं. आणि ते होत जातंही. ‘चिन्ह’नं देशाच्या कानाकोपर्यातच नव्हे तर परदेशातही जोडलेले हजारो वाचक ही त्याचीच तर खूण आहे.