चित्रकला हे शब्दातीत माध्यम आहे, मराठी चित्रकार हा काही इतर चित्रकारांपेक्षा वेगळा असतो कां? आधीच्या पिढीतल्या चित्रकारांमधे स्वत:चे असे एक स्थान निर्माण केलेल्या चित्रकारांमधे काही मराठी चित्रकार होते. उदा. वासुदेव गायतोंडे,सदानंद बाक्रे, प्रभाकर बरवे, प्रभाकर कोलते, सुधीर पटवर्धन. आज अशी किती नाव घेता येतील? श्री.शशिकांत सावंत यांनी 'आपलं महानगर'च्या दिवाळी अंकात आजच्या मराठी चित्रकारांवर आणि जागतिक पातळीवरील त्यांच्या आजच्या कामगिरीबद्दल, स्थानाबद्दल एक लेख लिहिला आहे. लेख अनेक अर्थांनी इंटरेस्टींग आणि वाचनीय आहे. मूळ लेख खूप मोठा आहे. त्यातला काही अंश इथे देत आहे.
" बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर सर्वच देश डाव्या-उजव्या डिस्कोर्समधे विभागला गेला. मराठी चित्रकारांची बाबरी मशिदीवर काही भूमिका होती. पण किती जणांनी ती जाहीरपणे व्यक्त केली? नंतरच्या काळात 'इन्स्टॉलेशन' हा जो कलाप्रकार सजला त्यासाठी राजकीय विचारासारख्या मूलभूत गोष्टी आवश्यक होत्या. त्यात मराठी चित्रकार मागे होते. ८७ ते ९२ या काळात जे बदल झाले त्यात संकल्पनात्मक चित्रकलेला मोठ्या प्रमाणावर स्थान मिळू लागले. उदा. सुधीर पटवर्धनांची कला. वर वर ही चित्रं साधी-सरळ वाटतात. ती कुणालाही 'समजावीत' अशी चित्रं आहेत. पण पिचलेल्या, वर्षानुवर्ष केवळ राबणंच नशिबी आलेल्या सामान्य माणसांचं त्या चित्रण करतात. स्नायूंचं पिळवटणं, देहबोली, चेहर्यावरचे भाव यांतून ते अभिव्यक्ती करतात. त्यात घटना असतात. घटनेचं वर्णन असतं. पण याही पलीकडे जाऊन त्यांची चित्र दीर्घकालीन, शाश्वत असं काही देतात.
परंपरेचा इतिहास, पटवर्धन यांनी केलेले डाव्या चळवळीतलं काम, त्यातून त्यांच्यावर झालेले संस्कार, वॅलेजोसारख्या मेक्सिकन भित्ती-चित्रकारांची चित्रं, अशा विविध गोष्टी या चित्रांमागे आहेत. शिवाय त्यात सातत्य, ध्यास आणि इंटिग्रिटी आहे. या सार्यातून त्यांची कला साकार होते. वर्षानुवर्षं केलेल्या तपस्येतून त्याला विशिष्ट शैलीची जोड मिळते. त्यातून त्यांचं यश दृग्गोचर होतं.
दुसरं उदाहरण प्रभाकर बरवे आणि कोलतेंचं. या दोघांनी सुरुवातीला पॉल क्ली सदृश चित्रं निर्माण केली. अनेक वर्षं स्वतःच्या चित्रावकाशचा शोध घेतला. त्यासाठी अक्षरशः गुदमरवून टाकणार्या सरकारी नोकर्या केल्या. छोट्याशा कुठल्या तरी चाळीत वसलेल्या स्टुडिओतून काम केलं. पण त्याचबरोबर साहित्य, कला, नाटक -सर्व क्षेत्रांतल्या मंडळींशी संवाद चालू ठेवला. दोघंही कविता करत, गद्य लेखन करत, ज्यातून त्यांनी चित्राविषयीचा स्वतःचा विचार टोकदार करत नेला. या चित्रकारांच्या यशाचा इतर मराठी चित्रकारांनी कधी विचार केला का?
मराठी चित्रकार जे.जे. किंवा तत्सम महाविद्यालयातून बाहेर येतात तेव्हा त्यांचा पहिला विचार असतो तो सर्व्हायवलचा. त्यामुळे पहिलं काम तो करतो ते पूर्णपणे व्यावसायिक. शिल्पकार असेल तर चित्रपटांच्या सेट्सच्या रचनेत सहभागी होतो. चित्रकारांनी पोर्ट्रेट, इंटेरियर, क्वचित जाहिरात संस्थांत रेखाटनकार म्हणून काम करणं हे प्राधान्य असतं. अर्थात यात चुकीचं काही नाही. पण तो त्याच्यातली चित्रकलेची आस टिकवून ठेवतो का, असा प्रश्न आहे. तो गॅलरी बुक करुन टाकतो. आणि मग प्रदर्शनाची तारीख मिळाली की आपलं वाटणारं चित्र तयार करु लागतो. २-३ महिन्यांत, कधी एका महिन्यात.
उलट काही जण चित्रं करत राहतात. नोकरीधंदा काही करत नाहीत. थोडीफार चित्रं विकली जातात. एखाद्या चित्राचं कौतुक होतं. तो त्याच प्रकारची चित्रं करु लागतो. सकृतदर्शनी असं दिसतं की तो चित्र सातत्याने काढतोय. पण तो केवळ कलाबाजारासाठी निर्मिती करत असतो. तिसरा वर्ग सातत्याने पूर्णवेळ चित्रकार राहून स्वतःचा मार्ग शोधणारा. ललित कला विजेते संजय सावंत, वैशाली नारकर, ते आजच्या श्रेयस कर्वे, हेमाली भूता, पराग तांडेल, शिल्पकार आरती तेरदाळकर... अनेक उदाहरणं यात देता येतील. चित्रकार शार्दुल कदम आणि देवदत्त पाडेकर हे याच पिढीचे, पण यथार्थ कलेची परंपरा चालवणारे. त्यांचं चित्रकौशल्य डोळे दिपवतं. पण ती चित्रं बायेनालेसारख्या प्रतिष्ठित प्रदर्शनात कधी लागणार नाहीत हेही खरं.
चित्रकारांची नवी पिढी आश्वासक आहे. सुनील गावडे, सुनील पडवळ, अनंत जोशी यांच्या मधल्या पिढीपासून ते आताच्या मराठी चित्रकारांपर्यंत. मग त्यात सातत्याने चित्रविचारावर भर देणारे प्रसन्न घैसास, हंसोज्ञय तांबे यांसारखे चित्रकारही आले किंवा शिक्षणक्षेत्रात पूर्णपणे वेगळा विचार करणारा नितीन कुलकर्णीसारखा चित्रकार कवी असेल, चित्रकलेतील भविष्याच्या चित्रात मराठी चित्रकारांचा मोठा प्रभाव असेल असं दिसतं. आज मात्र तो ढासळल्यासारखा दिसतोय.
बडोदा महिला कलेच्या इतिहासाचं पदव्युत्तर शिक्षण घेणार्या एका विद्यार्थिनीने सांगितलं की इथल्या चित्रकारांना रेखाटनही येत नाही. उलट जे.जे.च्या विद्यार्थ्यांचा स्केचिंगपासून पोर्ट्रेटपर्यंत हात तयार असतो. जे.जे. मधून अदवी घेऊन पदव्युत्तर शिक्षण बडोद्यात घेतलं तर बर्याच गोष्टी नीट होतात. वर दिलेल्या यादीत तीनचार जण या पद्धतीनं करियर केलेले आहेत. थोडक्यात परंपरा आणि अहंकार विसरुन जे.जे.त, पर्यायाने त्यातून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी थोडं बडोद्याकडे पाहिलं पाहिजे, त्याहीपेक्षा जगाकडे पहायला हवं.
आजच्या काळात साधं जाहिरात एजन्सीत काम करायचं तरी तुम्हाला बिथोवन, मोझार्टच्या सिंफनीज, माजिद माजदीचा सिनेमा, इंडी फिल्म, व्यवस्थापन (स्टीवन कोवींचा बालबोध), व्यंगचित्रकला, विनोद, वाचन्-अनेक गोष्टी लागतात. बाऊहाऊसपासून उत्तर आधुनिक चित्रकार, विचारवंत यांनी चित्रकलेच्या चिंतनाचं प्रचंड साहित्य निर्माण केलेलं आहे. पण दुर्दैवाने मराठी चित्रकारांनी 'माइंड्स आय' सारखं पॉल क्लीचं पुस्तकही पाहिलेलं नसतं. वाचन दूरच. सत्यजित रेचाही सिनेमा पाहिलेला नसतो. मुंबईसारख्या ठिकाणी राहूनही ते (अनेकदा मोफत असलेल्या) वेस्टर्न क्लासिकलच्या मैफिलींनाही दिसत नाहीत किंवा एनसीपीएतल्या मोफत रिडिंग रुमध्येही. अशा स्थितीत त्यांच्याकडून निर्माण होणार्या कलेत जागतिक किंवा सार्वत्रिक आशय कसा येऊ शकेल? म्हणूनच स्वतःला समृद्ध करणं आणि ज्येष्ठ तसंच जागतिक चित्रकारांचं काम डोळसपणे पाहणं ही एक किल्ली असू शकेल. "
तुम्ही मराठी चित्रकार असाल, किंवा नसालही.. पण तुमची यावरची मतं जाणून घ्यायला नक्की आवडेल.
शर्मिला फडके