‘चिन्ह’चे अंक किंवा ‘निवडक’चे खंड पुस्तकांच्या दुकानात का नाही मिळत हो ? अशी विचारणा करणारे फोन आठवड्यातून तीन चार वेळा तरी येतातच येतात. त्या मागची आमची भूमिका फोनवर मी लगेचच स्पष्ट करून टाकतो. सगळ्यांनाच ती पटते असे नाही. विशेषतः अंक किंवा ग्रंथ विक्रेत्यांकडे पाहून किंवा चाळून खरेदी करण्याची संवय असलेले या उत्तरांवर त्रागाच करतात. पण त्याला नाईलाज असतो. या संदर्भात ‘चिन्ह’च्या अंकांमधून किंवा ‘निवडक’च्या प्रस्तावनेतून किंवा ‘फेसबुक’च्या पोस्टमधून मी वेळोवेळी लिहीतच असतो. या संदर्भात आतापर्यंत घडलेले विक्रेत्यांचे एकाहून एक अफलातून किस्से सांगायचे म्हटले तर २०-२५ पानांचा एक प्रदीर्घ लेखही लिहिता येईल. पण असं करणे योग्य नव्हे याची जाणीव असल्याने, कारण एकप्रकारे हे विक्रेते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रंथ प्रसाराचेच कार्य करीत असल्याने तो मोह मी सतत टाळत आलोय. पण परवा असाच एक फोन आला, मी माझी टेप सुरु केली. तर त्यावर तो हुज्जतच घालू लागला. त्याच्या म्हणण्याचा सारांश असा होता. ‘चिन्ह’ने ही पुस्तक किंवा अंक विक्रेत्यांकडे ठेवायलाच पाहिजेत. नाना तऱ्हेने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. जवळजवळ अर्धा तास फोन चालू होता. पण गडी काही ऐकायलाच तयार नव्हता. शेवटचा उपाय म्हणून त्याला नुकताच घडलेला एक किस्सा कथन केला. तुम्हालाही तो वाचायला नक्कीच आवडेल म्हणून पुढे देत आहे.
एके दिवशी दुपारी अचानक फोन वाजला, पुण्याच्या एका प्रख्यात ग्रंथविक्रेत्यांकडून तो फोन आला होता. या क्षेत्रात ते गेली अनेक दशके आहेत. स्वतःची मोठी वास्तू, प्रचंड मोठे दुकान, वर्षभर सतत चालणारी ग्रंथप्रदर्शनं आणि पश्चिम महाराष्ट्रात असलेला त्यांचा प्रचंड दबदबा. यामुळे त्यांच्याकडून फोन यावा याचे मला जरा आश्चर्यच वाटले. ‘काय हवे आहे आपल्याला ?’ असे विचारल्यावर त्यांनी धडाधड ‘चिन्ह’च्या अंकांची यादी वाचून दाखवली. वर म्हणाले लगेचच पाठवा लागलीच पेमेंट करतो. त्याक्षणीच मला आधी घडलेली घटना आठवली. म्हटलं, ‘तुम्हाला काहीही मिळणार नाही.’ तर समोरची व्यक्ती चक्रावली आणि म्हणाली, ‘का ?’ तर म्हटलं, ‘२००९ साली ‘निवडक चिन्ह’च्या पहिल्या खंडाचं बुकिंग घेतलं होतं, त्याचे पैसे अजून तुम्ही चुकते केलेले नाहीत. असं असतांना देखील तुमच्या पुन्हा आलेल्या मागणीवर ‘निवडक’च्या आणखीन काही प्रती तुम्हाला विक्रीसाठी दिल्या होत्या. त्याचेही पैसे तुम्ही चुकते केले नाहीत. नंतर एकदम देतो असे सांगून तुम्ही आणखीन काही प्रती मागवल्या त्याही आम्ही दिल्या त्याचेही पैसे अजून दिले नाहीत. अनेक वेळा स्मरण पत्रं पाठवली फोन केले आणि शेवटी तुमचा नाद सोडून दिला. हा काही आमचा व्यवसाय नाहीं आणि तुमच्या पाठीशी लागायला आमच्याकडे वेळही नाही.’ थाडथाड सडेतोडपणे हे सांगितल्यावर तो माणूस भिरभिरलाच.
बहुधा अशा उत्तराची त्याला संवय नसावी. ‘असे आमच्याकडून होणे शक्यच नाही,’ वगैरे वगैरे सांगू लागला. ‘तारखा आणि चलन क्रमांक सांगू का ?’ असे विचारल्यावर मात्र म्हणाला, ५ मिनिटात तुम्हाला फोन करतो. तो माणूस पुन्हा फोन करील यावर माझा काही विश्वास नव्हता. पण ५ मिनिटांनी चक्क फोन आला. म्हणाला ‘तुमचं बरोबर आहे. तुमचे पैसे अनावधानानं द्यायचे राहिले आहेत.’ म्हटले ‘हे तुम्ही कुठे पाहिलंत’, तर म्हणाले ‘कॉम्प्युटरवर.’ म्हटलं, ‘एवढ्या साऱ्या नोंदी असतांनाही आमचे पैसे का दिले नाहीत ? २००९ सालची ही घटना आज ६ वर्ष झाली. हा काही आमचा व्यवसाय नव्हे. चळवळ म्हणून आम्ही हे प्रचंड खर्चिक आणि उफराटी प्रकाशनं प्रसिध्द करतो. पण तुमच्यासारख्या प्रस्थापित मंडळीनीच जर तोंडाला अशी पानं पुसली तर आम्ही काय करायचं ? मराठी पुस्तकं विकली जात नाहीत असं म्हणता आणि १५-२० दिवसातच विकल्या गेलेल्या प्रतींचे पैसेच तुम्ही ५-६ वर्ष देत नाही. उलट सारा व्यवहार थांबवून टाकता. याने आमचे नुकसान तर होतेच पण गावोगावच्या वाचकांचे याहूनही अधिक नुकसान होते याचे काय ?’
माझा पारा चांगलाच चढला होता आणि समोरून हुं की चुं देखील होत नव्हते. आता सारे बोलूनच टाकायचे मी ठरवले होते. तुमच्यासारख्या ग्रंथ विक्रेत्यांच्या अशा भिकारड्या व्यवहार कंटाळूनच आम्ही विक्रेत्यांना पुस्तकं व ग्रंथ विक्रीसाठी देणे बंद करून टाकले. ‘चिन्ह’चा वाचक कमिटेड आहे. त्याला अंक हवा असतो म्हणजे हवा असतोच. त्यासाठी त्याची कितीही वेळ वाट पहायची तयारी असते किंवा तो मिळवण्यासाठी कितीही वेळा दुकानदाराकडे खेटे घालण्याची त्यांची तयारी असते म्हणूनच तुमच्याशी व्यवहार बंद करणे आम्हाला शक्य झाले. आज आम्ही एक मोबाईल आणि एक वेबसाईटच्या सहाय्याने पुस्तक विक्रेत्यांना पर्यायी अशी समांतर वितरण व्यवस्था उभी करू शकलो. आणि मोठ्या अभिमानानं जाहिरातही करू शकलो की ‘‘चिन्ह’चे अंक किंवा ग्रंथ कुठल्याही विक्रेत्यांकडे उपलब्ध नसतात. पण अन्य मराठी ग्रंथ प्रकाशकांचे काय ? ते बिचारे वर्षानुवर्ष मुग गिळून हे असले व्यवहार करत राहतात.’ संधी मिळाली होती ऐकवण्याची आणि मी ती सोडली नाही. आणि तो समोरचा माणूस मुकाटपणे सारे ऐकून घेत होता.
श्वास घेण्यासाठी मी जरासा थांबलो तर तीच संधी पकडून म्हणाला, प्लीज, तुम्ही तुमचा बँक अकाऊंट नंबर एसेमेस करा. मी उद्याच्या उद्या पैसे भरतो. ५ मिनिटात बँक डीटेल्सचा एसेमेस केला. दुसऱ्या दिवशी फोन केला तर म्हणाले, आज जमलं नाही उद्या नक्की करतो. उद्या म्हणाले आज बँक लवकर बंद झाली सोमवारी नक्की करतो. आता १६ सोमवारचं व्रत पूर्ण झालंय. अजूनही त्या पैशांचा पत्ता नाहीच सुरुवातीला दोन तीन वेळा वेळेवर फोन घेतले, पण आतातर फोन देखील घेत नाहीत. येत्या जानेवारीमध्ये ७ वर्ष पूर्ण होतील पुस्तके विकली जाऊन पैसे न मिळण्याला. आणि आता तर ते पैसे मिळतील असेही काही वाटत नाही. तुम्हीच सांगा ‘का या विक्रेत्यांना विक्रीसाठी पुस्तकं द्यायची ?’ वर्ष-वर्ष दोन-दोन राबून मोठ्या परिश्रमपूर्व पैसे गोळा करून हे असले ग्रंथ किंवा अंक प्रसिध्द करायचे आणि ते विकले गेले तरी विक्रीचे पैसे वर्षानुवर्ष दाबून ठेवायचे. ही कुठली या ग्रंथ विक्रेत्यांची रीत ?
एखाद दुसरा अपवाद सोडला तर सारेच अनुभव हे असे भयाण आहेत. यावर उपाय म्हणूनच मग आम्ही आमच्या वेबसाईटवरून फेसबुककरवी जाहिरात करून एसेमेस आणि ई-मेल्सद्वारे ग्रंथाविक्रीचा नवा फंडा तयार केला. आणि तो ‘नग्नता’ अंकाच्या वेळी यशस्वीपणे वापरला. त्यानंतर मात्र ग्रंथ विक्रेत्यांना पुस्तकं किंवा अंक न देण्याच्या निर्णयाचा कधीच फेरविचार करावा लागला नाही. कदाचित सर्वांनाच या माध्यमातून ग्रंथ वा अंक बुक करणं शक्य होत नसेल पण त्याला आता काय इलाज आहे ? भाविष्यात कधी न कधी त्यांना याच मार्गाने जावे लागणार आहे हे निश्चित. त्याची सुरवात आम्ही केली याचा आनंद नक्कीच आहे. गायतोंडे ग्रंथाच्या निमित्ताने आणखीन एक मोठ प्रयोग आम्ही करून पाहणार आहोत. या ग्रंथाच्या प्रती वेब साईटवरून किंवा मोबाईलवरुन बुक करता येतीलच पण क्रेडीट कार्डद्वारे देखील किंमत चुकती करून पुढल्या २४ तासात ग्रंथ किंवा अंक घरपोच मिळवता येईल. बहुधा १ जानेवारीपासून ही व्यवस्था सुरु होईल. या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळणार आहे ते पाहायला आम्ही नक्कीच उत्सुक आहोत.
सतीश नाईक
This comment has been removed by the author.
ReplyDelete
ReplyDeleteइतका मनस्ताप करून घेतलात तरी पैसे दिले नाहीत त्या दुकानदाराने तरी टाकायचं , आम्ही मनस्ताप त्याला दिला असता
कुणाल, प्रतिक्रियेबद्दल आभार !
Deleteपण प्रश्न असा आहे नावं कुणाकुणाची टाकायची ? बहुसंख्य असेच. अपवादात्मक अनुभव एखादाच, पण म्हणून त्यांची नावं टाकणं सभ्यतेच्या संकेताला धरून नाही. ते ही काम करतायत ते ग्रंथ प्रसाराला पूरक असंच आहे. ११ कोटी मराठी भाषिक लोकसंख्येत एका पुस्तकाची अथवा एका ग्रंथाची १००० किंवा ११०० प्रतींची पहिली आवृत्ती संपावयास जिथं वर्षानुवर्ष लागतात तिथं कसली आणि काय अपेक्षा करावी आपण ? त्यापेक्षा स्वतःच्याच पायावर उभ राहीलं तर ? आणि एखादी समांतर व्यवस्था उभी केली तर ? 'चिन्ह'नं तोच मार्ग निवडला. त्यातही प्रचंड गंमती-जंमती आहेत. कधी तरी त्यावरही लिहायचा विचार आहे. पाहूया.