Monday, August 29, 2011


 कोण ही ‘मधुरा’?

‘मधुरा पेंडसे’ नावाच्या एका चित्रकर्त्रीनं ‘चिन्ह टीम’ला एक मेल पाठवला. दुर्दैवानं संपूर्ण ‘चिन्ह टीम’ तेव्हा अंकाच्या धबडग्यात अडकली होती. मग तिनं आणखी एक मेल पाठवला.
त्या निमित्तानं......

‘मधुरा पेंडसे’ नावाच्या चित्रकर्त्रीचा एक मेल ‘चिन्ह’ला जेव्हा आला तेव्हाच हे नाव प्रथम ठाऊक झालं. त्यामुळे तिच्याशी बोलण्याचा किंवा तिला पाहिलं असण्याचा प्रश्नच येत नाही. १० जुलै रोजी तिनं पहिला मेल ‘चिन्ह’ला पाठवला. वाचून पहायलाही वेळ नव्हता कारण ‘चिन्ह’च्या ‘नग्नता’ अंकाचं काम त्यावेळी अगदी ऐन भरात आलं होतं. त्यावेळी अक्षरश: १८-१८ तास काम चालू असायचं. त्यात तिचा मेलही भला थोरला, त्यामुळे त्याकडं खरं सांगायचं तर दुर्लक्षच झालं. पण जाता जाता त्या पत्रातला आशय मात्र लक्षात राहून गेला होता. तिला पडलेले प्रश्न, ते मांडण्याची तिची पद्धत, काहीशी तिरकस शैली- हे आपसूक सारंच लक्षात राहिलं, पण मनात असूनही तिच्या मेलला उत्तर देता आलं नाही. २१ जुलै रोजी ‘चिन्ह’चा अंक प्रसिद्ध झाला. वाटलं होतं आता तरी तिच्या आणि मेलबॉक्समधल्या अनेक उत्तरं न दिलेल्या मेल्सना उत्तरं देता येतील. पण अंक प्रसिद्ध झाला अन् कुरियरच्या त्या भयंकर अनुभवातून जावं लागलं. अद्यापही त्यातून आम्ही स्वत:ला सावरू शकलेलो नाहीय. नक्की किती नुकसान झालं आहे याचाही अंदाज आम्ही अद्याप बांधू शकलेलो नाही. पण ते असो. हे सारं लिहायचं कारण असं की अंक प्रसिद्ध होताच १०-१२ दिवसात मधुराचा आणखी एक मेल आला. त्या मेल मध्ये तिनं ‘चिन्ह’चा ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ विशेषांक ज्या कोरोगेटेड बॉक्समध्ये टाकून आम्ही वितरीत केला होता त्या बॉक्सच्या आतल्या भागात तिनं स्वत:चं चित्र, सेल्फ पोर्ट्रेट रेखाटलं होतं. ते सेल्फ पोर्ट्रेट विलक्षण सुरेख होतं. आता उत्सुकता चाळवली गेली. फेसबुकवर शोध घेतला तेव्हा ‘मधुरा पेंडसे’ अचानक सापडलीच. पण तिच्या प्रोफाईलमधली माहिती अपुरीच होती. त्यावरून ती कोण? काय करते? ती कुठली? कुठे शिकते? का शिक्षण पूर्ण झालंय याचा काहीच उलगडा झाला नाही. पण तिचं थोडसं काम आणि तिचे काही फोटोग्राफ्स मात्र पहायला मिळाले. त्या कामांमध्येही सेल्फ पोर्ट्रेट्स जरा अधिक पहायला मिळाली. त्यावरून असं लक्षात आलं की ती स्वत:ला अधिक प्रभावीपणे रेखाटण्याचा, रंगवण्याचा प्रयत्न ती करू पहातेय. अंकाच्या कोरोगेटेड बॉक्सच्या आतल्या भागात तिनं जे ‘सेल्फ’ रेखाटलंय त्यावरून हे अधिक लक्षात येतं. आणि तिला पडलेल्या प्रश्नाचं गांभिर्यही अधिक अधोरेखित होतं म्हणून तिनं पाठवलेला पहिला मेल आणि ‘सेल्फ पोर्ट्रेट’चा दुसरा मेल दोन्ही या मजकूरासोबत देत आहोत. यावर अर्थातच चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. ज्यांना ब्लॉगवर टाईप करणं कठीण वाटतं त्यांनी मेल पाठवायला हरकत नाही. किंवा चक्क लिहून स्कॅन करून पाठवलं तरी चालेल. आम्ही ते ब्लॉगवर टाकू. ‘मधुरा पेंडसे’ हे आजच्या तरुणाईचं प्रतिक आहे. म्हणून तिला पडलेले प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. इतकंच नाही तर ज्या पद्धतीनं तिनं ते मांडले आहेत तेही महत्त्वाचंच आहे. ‘चिन्ह’ला तरी यापेक्षा दुसरं काय अधिक हवंय!


Dear chinha team,
MF Hussein or not nudity is a big hush hush!
And I am glad you guys talked about it. I wish you all the best!!
long back a friend sent me a forward on m f husseins painting which was total bakwas ! I am sure you have received one of those..and as I see much more !
So I sent her this mail as reply... I was angry and disappointed at her for supporting such activity being an artist. I thought I shall share it with you guys.
Dear friend,
I was thinking of making a painting
made a few study drawings
but now no use. Must hide them all or just burn them!
In retrospection
the mail sent by you does have a justification
Now we know that our sentiments are offended by the artist.
now it occurs to me- I must be careful
I must have “The list”
The list of subjects, thoughts, beliefs, visions, ideas,
which will not offence hindus or muslims or any such religion
I also must know the list - which will please everybody’s hearts and souls
I surely need the courage to protect my self respect and clearly don’t want to be a coward hindu
Tell me what issues, subjects to paint about
tell me what will shock people and what will not.
Tell me if I draw a dancer will it hurt the one who is crippled
tell me how to reach every observers mind and make sure he/she is not hurt or offended
I shall certainly keep my beliefs aside for the very observer
I should certainly know each ones beliefs (people who may or may not see my works because one can never tell how and when I may or may not hurt somebody’s emotion)
I know you guys have achieved a greater understanding of art or at least its boundaries
The very important aspect of an art piece “the limitations”
forgive my innocence I was merely a fool to believe it had nun.
So I am no more feeling shy to ask your sincere help and all the others who have read and forwarded the mail is to please lets just not forward mails lets also find a solution on this very serious matter.
Please help
I don’t have a clue is to on what subject to make a painting
I will immediately forward the answers to my entire fellow artists so they understand the fundamentals of arts and abide by the rules and boundaries by the answers provided by you and friends who have given me a chance to this awakening
Help me with “The list” please
Madhura Pendse (10th July)


Dear Chinha team,
I received the magazine 2 days back
Congratulations and all the very best!
I feel inspired! This is how I used your packaging! 
Madhura Pendse (15th 
Aug
)




ताजा कलम - चित्र काढायला ‘चिन्ह’चे कोरोगेटेड बॉक्स आवडले असतील तर ते तिला आणखी उपलब्ध करून द्यायची ‘चिन्ह’ची तयारी आहे. अट छोटीशी एकच. तिनं तिला हवी तीच चित्र त्यावर काढावीत. कसे?

‘चिन्ह’च्या ’नग्नता : चित्रातली आणि मनातली’ विशेषांकासाठी कृपया ९००४० ३४९०३ या मोबाईल नंबर्सवर '1 m copy'  एवढाच मेसेज स्वत:क्ष्या नाव-पत्त्यासह आणि (असल्यास इमेल आयडीसह) पाठवा. अंक आठवड्याभरात घरपोच होईल. 
सवलत देणगीमूल्य रु.५६० फक्त. (कुरियरखर्चासह).
अंकाच्या अधिक माहितीसाठी www.chinha.in वर प्रोमो पहा.

Tuesday, August 23, 2011

या अंकानं मनातलं नागडेपण दूर केलं...


‘जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट’चे माजी अधिष्ठता मंगेश गो. राजाध्यक्ष’ यांना ’चिन्ह’चा अंक पोहोचताच अक्षरश: आठवड्याभरात अंकाविषयीचा आपला अभिप्राय लिहूनच पाठवला. तोच येथे देत आहोत.
 ’चिन्ह’ ब्लॉगच्या वाचकांना जर अंकाविषयी आपलाही अभिप्राय लिहून पाठवावा असं वाटत असेल तर त्यांनी तो जरुर पाठवा. कुठलीही काटछाट न करता आम्ही तो येथे प्रकाशित करू. 
: संपादक ’चिन्ह’ ब्लॉग




मंगेश गो. राजाध्यक्ष
कुरियरवाल्यानं दरवाजाची बेल वाजवली. अन हातात जाडजूड पार्सल दिलं. आणि मी ओळखलं, ज्याची आतुरतेनं प्रतीक्षा करत होतो, तो ‘चिन्ह’चा ‘नग्नताःचित्रातली आणि मनातली’ हा अंक आला. आणि मी पार्सल उघडून चाळायला सुरूवात केली. आणि मन समाधानानं भारलं गेलं, कारण अंकाची सुरेख अशी संकल्प रचना. सतीश नाईक स्वतःच चित्रकार असल्यानं प्रत्येक गोष्ट सुंदर अन शिस्तबद्ध व्हावी या गोष्टींकडे त्यांचं विशेष लक्ष असतं, त्यामुळे हाही अंक त्याला अपवाद असणार नाही हे जाणून होतो. पण अंक पाहिल्यावर तो अपेक्षेपलिकडे सुंदर झाल्याचं जाणवलं. याबद्दल सतीश नाईकांचं प्रथम अभिनंदन!

हा अंक व विषय सतीश नाईकांनी जेव्हां जाहीर केला, तेव्हा काही धर्ममुखंडांचं ‘अब्रम्हण्यंम’ सुरू झालं. वृत्तपत्रातून बातम्या येऊ लागल्या. नाईकांना धमक्यांचे, शिव्यांचे फोन व पत्रं (पोस्टकार्ड) यायला सुरूवात झाली. ती पत्रं त्यांनी ‘चिन्ह’च्या ब्लॉगवर टाकली. कोणत्याही सुसंस्कृत माणसानं वापरले नसतील असे भयानक शब्द या हिंदू संस्कृती रक्षकांनी वापरले होते. बाकी या लोकांना नग्नता, नागवेपण याचं सोयरसुतक नव्हतं. पण या अंकातला एक लेख चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांच्यावर होता व आधीच हुसेन हे हिंदू देवदेवतांची नग्न चित्रं रेखाटून वादाच्या भोवर्‍यात अडकले होते आणि लोकांचा रोष ओढवून घेवून ते भारतातून परागंदा झाले होते. आणि या अंकामध्ये याच हुसेन यांचं उदात्तीकरण त्यांच्या नग्न चित्रांसहीत करणार असल्याची भावना विरोधकांची होती. हा अंक प्रसिद्ध व्हायला देणार नाही, हा जणू चंगच त्यांनी बांधला होता. अन मनांत जरा चर्र झालं. वाटलं कसं काय एकाकी लढत देणार सतीश या सर्वांना! याला कारणही तसंच होतं. अवधूत गुप्तेचा ‘झेंडा’ न फडकण्याच्या मार्गावर होता. शेवटी त्यानी आवश्यक ते बदल करून आपला ‘झेंडा’ फडकवला. महेश मांजरेकरांच्या ‘शिक्षणाच्या आयचा घो’ या त्यांच्या नावाला मराठा महासंघानं आक्षेप घेतला पण मांजरेकर ठाम राहिले. वेळ आली तर महाराष्ट्र सोडूनही जाईन ही घोषणाही त्यांनी केली. पण शेवटी विरोधकांना चित्रपट आधी दाखवून चित्रपटाच्या आरंभी टायटल टाकून त्यांनी आपला मार्ग मोकळा केला. आता प्रकाश झा हे देखील आपल्या ‘आरक्षण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी या प्रकारच्या दिव्यातून जात आहेत. या अशा घटना घडलेल्या असताना सतीश नाईक या झुंडशाहीला कसं काय तोंड देणार हा विचार क्षणभरच माझ्या मनात आला. पण दुसर्‍याच क्षणी मला आठवलं ते सतीश नाईक ज्यांना मी कित्येक वर्षांच्या सहवासानं आरपार ओळखतो, असे कैक प्रसंग त्यांनी एकट्यानं निभावले होते. आणि या वेळीही तसंच घडलं. एक नितांत सुंदर अशी कलाकृती त्यांनी ‘चिन्ह’च्या रूपानं सादर केली. आणि लोकांच्या मनातील नागडेपण दूर केलं.
न्यूड ड्रॉइंग्ज अथवा पेंटिंग्ज हा चित्रकाराच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. शरीर सौष्ठव रचना हा मूलभूत पाया मानला जावा. मग तो चित्रकार असो वा शिल्पकार. आणि या नग्नतेमध्ये चित्रकार पहातो ते केवळ निखळ सौंदर्य, मनाला निर्भेळ आनंद देणारे. यामुळेच मायकेल अँजेलोचा डेव्हीड पहाताना आपण त्यात केवळ सौंदर्यच पहातो. हीच गोष्ट जाणवते ती पॅरिसचा जगप्रसिद्ध ’कॅबरे’ पाहताना. स्टेजवर आलेल्या तरुणी नृत्य करत असतानाच आपले वरचे वस्त्र काढून टाकून स्वत:चे स्तन उघडे करतात. नृत्य चालूच असतं. पण त्यात कामुकता नसते. असते ते केवळ अवखळ, निष्पाप सौंदर्य. जणू काही गोड बाहुल्याच अनावृत्त होवून नाचताहेत. व या सौंदर्याचा आस्वाद सर्व स्त्री-पुरूष घेत असतात. आता ज्या लोकांनी हा कॅबरे पाहिलेला नसतो, ते केवळ ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून या नृत्यप्रकाराला नाकं मुरडतात. आणि नेमकं हेच ‘चिन्ह’च्या या खास अंकानं दाखवून दिलं आहे.

अंकातील सर्वच लेख वाचनीय अन बोधप्रद आहेत. विशेषत: चित्रकारांबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून या विषयावरची त्यांची मतं घेवून संपादकांनी कल्पकता दाखवून दिली आहे, याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच! अर्थात या अंकातील चित्रकार हुसेन यांच्या ‘उदात्तीकरणा’चं (?) निमित्त करून जो गदारोळ माजवला होता त्यांची तोंडं अचानक बंद झाली.

हुसेन  यांचं रंगचित्र Self Portrait With Horse
मलाही हुसेनवरील कोलतेंचा लेख आधी वाचायचा होता. अत्यंत परखडपणे कोलतेंनी नीरक्षीर न्यायानं हुसेन यांच्या चित्रांचा तसेच व्यक्ति विशेषाचा वेध घेतला आहेच. शिवाय जे आपल्याला पटणारं नाही, त्याला विरोध करणं हा कोलत्यांचा स्थायिभाव आहे. मग तेथे आप-परभाव नसतो. मात्र त्यांनी हुसेन यांच्या दुबईतील मुलाखतीत हुसेन-माधुरी वेडाबद्दलचा प्रश्न जेव्हा विचारला, त्यावरील हुसेन यांचं ‘मा-अधुरी’ हे स्पष्टीकरण मात्र आपमतलबी वाटतं. हुसेन यांना जर आपल्या आईचाच शोध घ्यायचा होता, तर त्यांना खुद्द पंढरपूर व इतरत्र अनेक माता-भगिनी आढळल्या असत्या, ज्या मध्ये त्यांना स्वत:ची माता शोधून तिला पूजता आलं असतं. त्यासाठी सुस्वरुप, सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित कशाला? तसंच त्यांचं भारत सोडून परदेशी जाणं, कतारचं नागरिकत्व घेणं, या बाबीही संशय घेण्यास जागा ठेवतात. कारण भारतामध्ये हुसेन यांना जे राजकीय स्थान मिळालं होतं, त्यावरून भारत सरकारला त्यांचं संरक्षण करणं भागच होतं. आता त्यांची हिंदू देवतांची नग्न चित्रं. हुसेन यांची ही चित्रं म्हणजे काही राजा रवि वर्मा, एस. एम. पंडित वा रघुवीर मुळगांवकर यांनी चित्रित केलेली वास्तववादी चित्रं नव्हेत, की जो कोणी फ्रेम करून पूजेला लावील. हुसेन हे थोर चित्रकार होते यात शंकाच नाही. पण त्यांची ही देवतांची चित्रं फारतर प्रतिकात्मक म्हणता येतील. शिवाय प्रत्येक चित्राला त्यांनी देव-देवतांची नावं दिली होती. जी या देशातील सुमारे सत्तर टक्के लोकांची श्रद्धास्थानं आहेत, ती नावं नसती तर कदाचित लोकांना ती सरस्वती, पार्वती, सीता वाटल्याच नसत्या. त्यामुळे जसा एखादा इसम दुसर्‍याला एखादी आईवरून शिवी हासडतो, तसा वास या नावं लिहिण्याला येतो. जसं लेखकाला, चित्रकाराला स्वत:चं मत मांडायचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे हा विचार त्यांनी करायला हवा. त्यामुळे हुसेन यांना प्रसिद्धी मिळवण्याचं कदाचित ते साधन वाटत असावं. हे थोडं विषयांतर झालं. कोलतेंनी हुसेन यांच्या हयातीत व हयातीनंतर त्यावर लिहून हुसेन यांच्या जीवनावर सुरेख प्रकाश पाडला आहे. मात्र कोलतेंनी या दोन्ही लेखांमध्ये हुसेन यांचा केलेला एकेरी उल्लेख मनाला जरा खटकून गेला.

संभाजी कदम यांचं पेन्सिल ड्रॉइंग
बहुळकरांच्या लेखातील आणखी एक ‘न्यूड‘
दुसरा लेख चित्रकार सुहास बहुळकरांचा. बहुळकर यांनी जे जे स्कूल आर्टमध्ये बरीच वर्षे काढली आहेत. शिवाय त्यांचा वैयक्तिक लोकसंग्रह. त्यातही बहुळकर हे वास्तववादी चित्रण करणारे. त्यामुळे अगदी पुराण काळापासून उदाहरणं देत त्यांनी घेतलेला नग्नतेचा आढावा उल्लेखनीय वाटतो. कलाशिक्षक या नात्यानं त्यांचे जोडले गेलेले संबंध, अनेक शिक्षकांशी आलेले जवळून संबंध, न्यूड मॉडेल बसवण्यापासून त्यांचं चित्रांकन होईपर्यंत अनेक पूर्वीच्या शिक्षकांपासूनचे दाखले अन त्यांचे सल्ले, हा जणू स्कूल ऑफ आर्टचा इतिहास डोळ्यासमोर उभा करतो. मात्र या दीर्घ लेखामध्ये बहुळकरांनी काही तपशील घातले आहेत, ते थोडे अनावश्यक व विषयांतर करणारं वाटलं. विशेषत: कदम सरांविषयी काही तपशील त्यांनी टाळले असते तर ते उचित ठरलं असतं.

देवदत्त पाडेकर याचं ‘न्यूड’
देवदत्त पाडेकर हा तरुण चित्रकार निसर्गदत्त कलेची देणगी घेवून जन्माला आला आहे. त्याच्या चित्रकलेविषयी काय बोलावं? पाश्चात्यांच्या तोडीचं चित्रण करणार्‍या या मनस्वी सर्जनशील कलावंतांची न्यूड चित्रं ही अंकाची शोभा शतपटीनं वाढवितात. अंकाची दोन मुखपृष्ठं हा तर संपादकांच्या कल्पकतेचा परमोच्च बिंदू आहे. एकूण काय, तर ’नग्नता, चित्रातली आणि मनातली’ या विषयावरचा ’चिन्ह’चा खासे अंक बुरसटलेल्या मनांवरची जळमटं दूर करून कला रसिकांना ‘कला साक्षर’ बनविणार यात शंकाच नको!

मं. गो. राजाध्यक्ष
rajapost@gmail.com






अंकासंबंधी काही चर्चा करायची असेल, बोलावयाचे असेल तर ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांच्याशी 9833111518 या मोबाईलवर थेट संपर्क साधता येईल. (हा नंबर रविवारीसुद्धा स्वीच ऑफ नसतो.)

अंकाची मागणी नोंदवावयाची असल्यास कृपया 90040 34903 या मोबाईल क्रमांकावर ‘1 m copy’ एवढाच मेसेज स्वत:चा नाव, पत्ता आणि असल्यास इ-मेल आयडीसह पाठवावा. आठवड्याभरात अंक कुरियरनं घरपोच होईल.

वि. सू. अंक कोणत्याही स्टॉलवर अथवा पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध नाही याची कृपया नोंद घ्यावी.



Thursday, August 18, 2011

‘न्यूड’ आणि ‘नग्नता’  


श्री. सतीश नाईक
 सप्रेम नमस्ते

 आपण ’न्यूड’ कथा उत्खनन करून काढलीत. १९७५ सालची ही कथा... लेखकवर्गातून चित्रकलेची फारशी माहिती नसावी म्हणून अभिप्राय मिळाला नाही. चित्रकारांचं वाचन (तुम्ही अपवाद सोडून) किती ती कल्पना नाही, त्यामुळे या कथेचा ३६ वर्षानंतर उल्लेख हा माझ्या लेखी चमत्कारच आहे. ह्यापेक्षा गायन अधिक बरे कारण तत्काल अभिप्राय मिळू शकतो. हे आपलं गमतीत!
 पण आपले आभार खरं तर इतका उत्कृष्ट अंक काढल्याबद्दल, आर्टपेपर, उत्कृष्ट छपाई...पेक्षा उत्कृष्ट चित्रं...पुढच्या वर्षीचा अंक निघेस्तोवर हा अंक पहायला वर्ष पुरणार नाही. मी पूर्वीचे अंक (मीरा दातारकडून) पाह्यले होते... पण हा फारच अप्रतिम आहे.
 माझी आई चित्रकार. मामा पण निसर्ग चित्रं उत्तम काढत. मामाचे मामा पण म्हणे चित्रकार... आईकडून उल्लेख ऐकला होता की त्यावेळेस शरीर चित्रण करायला...त्यांना स्मशानात जावे लागे! कारण इतर कुठे मॉडेल मिळण्याची शक्यता नव्हती.
 पुढच्या अंकाबद्दल व यशस्वी वाटचालीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद...

 उर्मिला सिरुर

 ज्यांच्या ‘न्यूड’ या लघुकथेचा उल्लेख अंकाच्या संपादकीयात विशेषत्वानं झाला आहे. त्या कथालेखिका ‘उर्मिला सिरुर’ याचं हे पत्र. ते माझ्यापाशी आलं ते जे जे स्कूल ऑफ आर्ट मधली माझी वर्गमैत्रिण मीरा दातार हिच्या मार्फत. मीराचं ’मीरा दातार’ हे नाव आत्ताचं म्हणजे खरं तर नंतरचं किंवा लग्नानंतरचं. आधीची ती उर्मिला, उर्मिला सहस्त्रबुद्धे. मराठी प्रकाशन व्यवसायात ज्याचं नावं अत्यंत आदरानं घेतलं जातं त्या चित्रकार पद्मजा सहस्त्रबुद्धे यांची ती कन्या. अलिकडच्या पिढीला त्यांचं कर्तृत्व ठाऊक असण्याची शक्यता तशी कमीच, (ज्यांना ते ठाऊक करून घ्यायची इच्छा असेल त्यांनी मौजेची (ही एक प्रकाशनसंस्था आहे आणि ती मराठीतील महत्त्वाची मानली जाणारी पुस्तकं प्रसिद्ध करते. असो.) ग्रंथ-पुस्तकं चाळावीत. प्रकाशनाच्या क्षेत्रातला चित्रकारही अभिजातपणाचा ठसा आपल्या कामावर कसा उमटवू शकतो ते त्यांना तेथे नक्कीच पहावयास मिळेल.) पुन्हा एकदा असो!

 दरम्यान घडलं ते असं.

 मीराच्या हातात ‘चिन्ह’चा ताजा अंक पडला आणि त्यातला उर्मिला सिरुरांच्या कथेचा संपादकीयातला उल्लेख वाचून तिनं थेट उर्मिला सिरुरांनाचा फोन लावला. मीराची आई आणि उर्मिला सिरुर या आर्ट स्कूल मधल्या दिवसापासून ते आजतागायतच्या जिवाभावाच्या मैतरणी. साहजिकच मीरानं त्यांना ‘चिन्ह’मधला त्यांच्या विषयीचा सारा मजकूर हक्कानं वाचून दाखवला. आपल्या एका कथेविषयी इतक्या वर्षांनी, इतक्या म्हणजे कितक्या तर तब्बल ३६ वर्षानं असं काही लिहून आलं आहे म्हटल्यावर त्या बिचार्‍या (बहुदा) भारावूनच गेल्या असाव्यात. (इती मीरा उर्फ उर्मिला) मग मीरानं त्यांना माझ्याविषयी, ‘चिन्ह’विषयी सांगितलं वगैरे मग हेच सारं तिनं मला उलट्या क्रमानं फोनवरून त्यांच्याविषयी सांगितलं. ज्यांच्याविषयी लिहिलं आहे त्यांची प्रत्यक्ष प्रतिक्रिया सांगितल्यावर कुठल्या लेखक, संपादकाला आनंद होणार नाही? मलाही तो झाला. ‘चिन्ह’चा हा अंक विक्रीसाठी कुठेच उपलब्ध नसल्यानं त्यांना तो मिळवण्यास अडचण येणार हे लक्षात घेऊन मी त्यांना मीराकरवी अंकाची एक भेट प्रत पाठवली.

 दरम्यानच्या काळात अंक प्रसिद्ध झाल्याबरोबर कुठून कुठून प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यातले अट्टल वाचक त्या कथेविषयी आवर्जून विचारू लागले. सत्यकथेचा तो अंक मिळवणं कठीण आहे पण ती कथा आता कुठे वाचायला मिळेल? कथासंग्रहात घेतली आहे का? तो कुणी काढलाय वगैरे. काही उत्साही वाचकांनी तर तो कथासंग्रह मिळवून ती कथा वाचूनही कळवलं. तर अनेक वाचकांचं म्हणणं असं होतं की ती कथा या अंकात पुन्हा प्रसिद्ध करायला हवी वगैरे. कविता महाजनानी पाठवलेल्या पत्रातही त्याचा उल्लेख केला होता. साहजिकच मलाही ती कथा इतक्या दिवसांनी पुन्हा वाचाविशी वाटू लागली. पण आता ती मिळवायची कशी असा यक्षप्रश्न मलाही पडला. कारण अगदी दोनेएक वर्षापर्यंत सत्यकथेचा तो अंक माझ्या संग्रहात होता. पण घर बदलताना तो सारा संग्रह मी मुं. म. ग्रं. स. संदर्भ विभागाला देऊन टाकला. चारसहा महिन्यापूर्वी मुं. म. ग्रं. स.च्या संदर्भ विभागाकडून संदर्भाबाबत आलेला अनुभव भयंकर असल्यानं तिथं पुन्हा जायचंच काय, पण विचारायचंसुद्धा धाडस झालं नाही. म्हणून मग मी मीरालाच विचारलं. तर मीरा म्हणाली ‘कवडसा’ या कथासंग्रहात ती कथा आहे. पण माझी प्रत मला मिळत नाहीय. म्हणून तिनं थेट उर्मिला सिरुरांनाच विचारलं. तर त्या म्हणाल्या की ‘मी पण माझी प्रत शोधतेय. मलाही इतक्या वर्षानं ती कथा वाचाविशी वाटतेय.’ हो नाही हो नाही करता करता त्यांना त्यांच्याकडे ‘कवडसा’च्या दोन प्रती मिळाल्या. त्यातली एक त्यांनी मीराकरवी मला पाठवली. आणि सोबत लेखाच्या प्रारंभी प्रसिद्ध केलेलं पत्र....

 कुणाही लेखक-संपादकाला आपल्या प्रकाशनासंदर्भात वारंवार घडावेसे वाटणारे पण क्वचितच घडणारे हे दुर्मिळ क्षण, पुढल्या वळणावरच्या, नव्या प्रवासाला निश्चितपणानं दिशा देतात.

 ‘कवडसा’ची ती दुर्मिळ प्रत पाहताना पुन्हा एकदा स्मरणरंजनाचा अनुभव घेता आला. जेजेतले ते सारे रम्य दिवस पुन्हा एकदा आठवले. वर्गातल्या मित्र-मैत्रिणीचा-शिक्षकांचा सारा पट पुन्हा एकदा नजरेसमोरून भर्रकन फिरून गेला. चाळीस एक जण होते वर्गात पण त्यातले पाचसुद्धा नंतर भेटले नाहीत. कलेशी-कलाक्षेत्राशी संपर्क ठेवून असलेले तेवढे भेटतात. बाकीचे सारे कुठे गेले कुणास ठाऊक? मीरा ही त्यातली एक. शिक्षणक्षेत्रात असल्यानं ती मात्र सारा ट्रॅक ठेवून असते. जेजेमध्ये असल्यापासूनच तिचं माझं छान जमत असे. साहित्य क्षेत्रातल्या सार्‍या आतल्या खबरी तिच्याच मुळे मला मिळत असत. ‘कुणाला सांगू नकोस हं’ असं म्हणून ती जे सांगायची ते खरंच मी कुणाला कधी सांगितलं नाही. अगदी परवा वरील प्रसंग घडला तेव्हासुद्धा ‘हे तू कुणाला सांगू नकोस.’ असं म्हणून ती जे मला म्हणाली ते तरी मी कुठं तुम्हाला सांगीतलंय?

सतीश नाईक

या अंकाविषयीच्या माहितीपत्रकांसाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://chinha.in/promo/Chinha%202011.pdf

आणि अंकाची प्रत मागवण्यासाठी
‘चिन्ह’च्या 9967784422 / 90040 34903  या मोबाईलवर '1 m copy'  एवढाच मेसेज स्वतःच्या नाव पत्त्यासह पाठवा. अंक पाच दिवसात घरपोच होईल.

Tuesday, August 16, 2011



रु. 350 चे 560 का झाले?


ठाण्याच्या साहित्य संमेलनात ‘चिन्ह’नं ‘नग्नताः चित्रातली आणि मनातली’ अंकाची माहितीपत्रकं वितरीत केली तेव्हा जवळ जवळ तीनशे-चारशे जणांनी मोठ्या उत्साहानं अंकासाठी नावं नोंदवली. तेव्हा अंकाचं देणगीमूल्य होतं रु. 250 आणि सवलतीत तो अंक दिला जाणार होता अवघ्या 200 रुपयांना. पण मोठ्या संख्येनं नाव नोंदणी करणार्‍यांचा उत्साह त्यानंतरच्या चारच महिन्यात मोठ्या प्रमाणावर कमी झाला. अवघ्या काही जणांनीच दिलेल्या मुदतीत ते सवलत शुल्क भरण्याची तत्परता दाखवली.

अंकाचं काम मार्गी लागल्यावर असं लक्षात आलं की हा अंक मोठा मोठा होत चाललाय. याचं देणगीमूल्य वाढवावं लागणार! आणि मग रंगीत माहितीपत्रक प्रसिद्ध झालं तेव्हा अंकाचं देणगीमूल्य रु. 300 करण्यात आलं. रंगीत माहितीपत्रक, फेसबुक, संकेतस्थळ या सार्‍यांमुळे अंकाची मागणी भराभर वाढू लागली. इकडे अंक मोठा मोठा होतच चालला होत. पण यानंतर देणगीशुल्क वाढवायचे नाही असा निर्णय आम्ही ठामपणानं घेतला होता. अगदी प्रकाशनाच्या 20-25 दिवस आधी सुद्धा आम्ही मागणी नोंदवून घेत होतो.

त्यामुळे झालं काय की या अंकाची पहिली आवृत्ती मोबाईल आणि नेटवरूनच बुक झाली. ‘चिन्ह’च्या आजवरच्या इतिहासातला हा सर्वात मोठा, सर्वात जास्त खर्चाचा आणि सर्वात अधिक स्फोटक विषयावरचा अंक असल्यानं आम्हीही थोडसं सबूरीनं घ्यायचं ठरवलं आणि जी मागणी नोंदवली गेली होती त्यावर आधारित प्रिन्ट ऑर्डर निश्चित करून अंकाची छपाई सुरू केली. कारण अंकाच्या निर्मितीच्या काळात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे या अंकाचं स्वागत कसं होईल? समाजात नेमकी काय प्रतिक्रिया उमटेल? या विषयी मनात अनेक शंका कुशंका नाचत होत्या. त्यातूनच हा अंक मर्यादित किंवा मागणीनुसार प्रिन्ट ऑर्डर देण्याचा निर्णय घेतला गेला.

याला दुसरं कारण काहीसं आर्थिकही होतं. जे 250 रु. किंवा 300 रु. सवलत देणगीमूल्य आम्ही आकारलं होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च अंकाच्या एका प्रतीला आम्हाला येत होता. पण महाराष्ट्रातील चित्रकार-शिल्पकारांनी दिलेल्या जाहिरात प्रायोजकत्वामुळे तो खर्च आम्ही सहन करू शकत होतो. आणि तो आम्ही केलाही. कुठल्याच आर्थिक फायद्यातोट्याकडे न पाहता आम्ही दिलेला शब्द पाळणं महत्त्वाचं मानलं. ज्या अंकाच्या एका प्रतीला 300 रुपयांपेक्षाही अधिक खर्च आला, ती प्रत ज्या वाचक सभासदानं सवलत देणगीशुल्क रु. 200 (अगदी सुरूवातीला) आणि रु. 250 (नंतर) ज्यांनी ज्यांनी भरली त्या सार्‍यांनाच त्याच सवलतशुल्कात ‘चिन्ह’नं अंक उपलब्ध करून दिला. पुन्हा एकदा थॅंक्स टू महाराष्ट्रातील सर्वच चित्र आणि शिल्पकार.)

आता सारं काही इथंच थांबायला हवं होतं किंवा संपायला हवं होतं पण तसं झालं नाही कारण अचानक वृत्तपत्रात येणार्‍या बातम्यांमुळे म्हणा, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सतीश नाईक यांच्या लेखामुळे म्हणा किंवा ‘लोकमत’मधल्या शर्मिला फडके यांच्या लेखाच्या पूर्वप्रसिद्धीमुळे म्हणा, ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाला मोठ्या प्रमाणावर हिट्स मिळू लागल्या आणि अंकाविषयी विचारणा होऊ लागली. तोपर्यंत अंकाची छपाई सुरूही झाली होती. त्यामुळे प्रिन्ट ऑर्डर वाढवता येणं अशक्य होतं, त्यातूनच मग दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्याची कल्पना पुढे आली. (‘चिन्ह’च्या आजवरच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं.) महाराष्ट्रातील चित्रकार-शिल्पकारांनी उचललेल्या जाहिरात प्रायोजकत्व योजनेतील बराचसा भाग पहिल्या आवृत्तीवर खर्च झाल्यानंच दुसर्‍या आवृत्तीचं देणगीमूल्य वाढवणं क्रमप्राप्त होतं. देणगीमूल्य रु. 350 रुपयांवरून 560 रुपयांवर जे गेलं ते कसं गेलं ते यावरून लक्षात यावयास हरकत नाही.

दुसर्‍या कुण्या व्यावसायिक प्रकाशकानं ही अशी निर्मिती केली असती तर त्यानं एका प्रतीची किंमत रु.1000 इतकी निश्चितपणानं आकारली असती. पण ‘चिन्ह’चं उद्दिष्टच वेगळं असल्यानं ‘चिन्ह’नं तो मार्ग चोखाळला नाही. मोबाईल वा नेटवरून थेट बुकींग करण्याच्या या नव्या फंड्यामुळे एक झालं. पुस्तक विक्रेते किंवा मासिकं विक्रेते जे 30 ते 40% कमीशन आकारतात त्यामधून वाचकांची आणि अर्थातच ‘चिन्ह’चीही सुटका झाली. अंकाचं देणगीमूल्य फक्त रु. 750 इतकं ठेवता आलं आणि सवलतीत तो 560 रुपयांना उपलब्ध करून देता आला. प्रायोजकत्व योजनेतून मिळालेला सर्वच निधी आम्ही या अंकाच्या पहिल्या अंकाला संपूर्ण तर दुसर्‍या आवृत्तीला काही प्रमाणात वापरला असल्यानं आता या अंकाची तिसरी किंवा चौथी आवृत्ती प्रसिद्ध करायची वेळ आलीच (आणि ती येणारही आहे) तर तेव्हा अंकाचं देणगीमूल्य रु. 750 असेल हे निश्चित.

‘चिन्ह’च्या www.chinha.in या संकेतस्थळावरून आपण या अंकाची मागणी नोंदवू शकता किंवा 99677 84422 / 90040 34903 / 98331 11518 या ‘चिन्ह’च्या मोबाईल नंबर्सवर ‘1 m copy’  एवढाच मेसेज स्वतःच्या नावपत्त्यासह पाठवून आपली मागणी नोंदवू शकता.

देणगीमूल्याचे रु. 560 आपण मुंबईतले असाल किंवा आपलं खातं राष्ट्रीयकृत बॅंकेत असेल तर आपण कुरियरनं धनादेशही पाठवू शकता किंवा ‘चिन्ह’च्या स्टेट बॅंकेच्या खात्यावर आपण आपला धनादेश जमा करू शकता अथवा स्टेट बॅंकेच्याच खात्यावर रोख रक्कमही भरू शकता.

ज्या पद्धतीनं आपण देणगीशुल्क द्याल त्याविषयी ‘चिन्ह’ला एस. एम. एसद्वारे किंव फोन करून कळवणं मात्र अत्यावश्यक आहे. अन्यथा आपले पैसे नावाविना खात्यात पडून रहाणं शक्य आहे.

आजच निर्णय घ्या. दुसर्‍या आवृत्तीच्याही आता थोड्याच प्रती उपलब्ध आहेत.

या अंकाविषयीच्या माहितीपत्रकांसाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://chinha.in/promo/Chinha%202011.pdf

आणि अंकाची प्रत मागवण्यासाठी
‘चिन्ह’च्या 9967784422 / 90040 34903  या मोबाईलवर '1 m copy'  एवढाच मेसेज स्वतःच्या नाव पत्त्यासह पाठवा. अंक पाच दिवसात घरपोच होईल.

Friday, August 12, 2011



आणि  कविता







नामवंत कादंबरीकार कविता महाजन या ‘चिन्ह’च्या प्रारंभापासूनच्याच चाहत्या. यंदाच्या अंकातील परिसंवादात तर त्या सहभागीही झालेल्या. त्यांना आम्ही अंक कसा वाटला ते कळवा अशी विनंती केली होती तर लगेचच त्यांनी पत्रानं अभिप्रायही कळवला. तोच येथे देत आहोत.

प्रिय श्री. सतीश नाईक,
स.न.वि.वि.

उत्सुकतेने वाट पहावी अशा खूपच कमी गोष्टी आज घडताहेत. पुस्तक, चित्रपट, नाटक इत्यादी सर्वच बाबतीत. मासिकं आणि दिवाळी अंक तर वाचले नाही तरी चालतील असं वाटावं इतका त्यांचा दर्जा सुमार होत चाललेला आहे. त्यामुळे आपोआपच त्यांबाबत एक तर्‍हेचं औदासिन्य मनात निर्माण होतं. या सार्‍या उदास वातावरणात ‘चिन्ह’नं मात्र आपलं स्थान गेली अनेक वर्षं अबाधित ठेवलं आहे. ‘चिन्ह’चा अंक कोणत्याही विषयावर असो, त्याची उत्सुकता मनात कायम असते. अंक हाती येताच मनाला तरतरी येते. गेल्या खेपेस ‘निवडक चिन्ह’ हातात आला, तेव्हा तर एका वेगळ्या जगात प्रवेश करत असल्याचा अनुभव पुन: प्रत्ययास आला. ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ या विषयावरील नव्या अंकानं तर वेबसाईट, ब्लॉग, फेसबुक इत्यादी जनसंपर्काच्या तंत्रज्ञानावर आधारित नव्या वाटा चोखाळून वेगळी उत्सुकता तयार केली होती.

आर्टपेपरवरील पूर्ण रंगीत छपाई असल्याने चित्रांना पूर्ण न्याय दिला जातो. आर्टपेपरवरील छपाई ‘चिन्ह’नं गेल्या अंकापासून सुरू केली आहे. त्यामुळे खर्चाचा ( आणि अर्थातच कर्जाचाही! ) बोजा काढणे अपरिहार्य ठरते. वाचकांची जबाबदारी, मला वाटतं, इथूनच सुरू होते. संपादक, प्रकाशक, लेखक, चित्रकार यांनी आपल्या जबाबदार्‍या उत्तम तर्‍हेनं पार पडल्यावर वाचकांनी अंकाचा प्रसार-प्रचार-विक्री करण्यास स्वत:हून पुढे आलं पाहिजे, याची जाणीव हा अंक पाहता-वाचताना होते. कारण त्याआधारेच ‘चिन्ह’चा पुढील अंक आपल्या हाती येऊ शकेल.

या अंकाचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं ते असं की संपादकीय व इतर लेख / परिसंवाद यांच्या आधी ज्या ‘भूमिका’ लिहिल्या आहेत, ते सारे लेखन अत्यंत स्पष्ट, स्वच्छ, मुद्देसूद आणि नेमकं आहे. विशेषत: परिसंवादात जी मतं-मतांतरं वैविध्य, प्रसंगी विसंवाद घेऊन येतात, त्यांना एकत्र गुंफण्याचं कौशल्य या निवेदनांमधून दिसतं. हेतू प्रामाणिक आणि पारदर्शक आहेत, हे कळून चुकलं की वाचक मोकळ्या मनानं पुढचं लेखन वाचण्यास सुरूवात करतो. परिसंवादात वेगवेगळ्या क्षेत्रांमधील लोकांचा समावेश केल्याने विविध अंगांनी केले गेलेले विचार समोर येतात व वैचारिक नाविन्याचा आनंद लाभतो. परिसंवादातील मेघना पेठेंचा लेख तर भाषाशैलीचं अत्यंत मोहक उदाहरण आहे. डॉ. सुधीर पटवर्धनांचा लेखही मला आवडला. त्यांची चित्रशैली आणि भाषा यांची कुणीतरी तुलना करून पाहिली तर अनेक साम्यस्थळं आढळतील असा गमतीशीर विचारही त्यातून मनात आला. पार्वत्ती दत्ता यांचा लेखही अत्यंत रोचक आहे. त्यासोबतची छायाचित्रं दृश्यमाध्यमाचा वेगळा प्रभाव नोंदवणारी आहेत. तुलनेत मी मात्र विषयाला पुरेसा न्याय देऊ शकले नाही. निव्वळ त्रोटक मुद्दे मांडले. प्रकृतिअस्वास्थ्य हे कारण होतं, पण नंतर कधीतरी या विषयावर अनुभवांसह सविस्तर लिहीन, हे नक्की.

शर्मिला फडकेची मुखपृष्ठकथा ‘मोनो’लॉग - अप्रतिम आहे. खरंतर हा सारा एका अख्ख्या कादंबरीचा ऐवज आहे. गेल्या अंकातील चिमुलकरांवरील लेख वाचूनही असं वाटलं होतं. आपल्याकडे चित्रं / शिल्पकारांवरील चरित्रात्मक कादंबर्‍यांचा अभाव आहे. शर्मिलानं याचा विचार नक्की करावा. तिच्याकडे विलक्षण समज आहे, वैचारिकता आणि सहृदयता यांचा मिलाफ आहे आणि भाषेची देणगीही आहे.
सुहास बहुळकरांचा प्रदीर्घ लेख म्हणजे जणू एक लहान पुस्तिकाच आहे. त्यात महाराष्ट्रातले अनुभव त्यांनी सांगितलेत, तसेच देशभरातील अनुभव नोंदवले तर खरंच एक स्वतंत्र पुस्तक तयार होईल. देवदत्त पाडेकरांच्या लेखासारखं, त्या सोबत अजून दोन-तीन लेख असते, तर त्या विभागाला अधिक मिती मिळाल्या असत्या. उर्मिला सिरूर यांची कथा या अंकात पुन्हा छापायला हवी होती. ती खरंच एक वेगळा अनुभव मांडणारी कथा आहे.

हुसेन आणि कोलते सर
राहता राहिला मुद्दा हुसेनविषयक लेखांचा. कोलते सरांचे दोन्ही लेख जवळपास सर्व मुद्दे नोंदवणारे असले, तरी इतर लेखांमधील हुसेनविषयक नोंदींवर, हुसेनचा मृत्यू दरम्यानच्या काळात झाला, या कारणास्तव संपादकीय कात्री चालवणं खरोखर गरजेचं होतं का? तुम्ही निवडलेल्या लेखकांपैकी एकहीजण ‘अविचारी’ वा ‘कुविचारी’ आहे असे म्हणता येणार नाही. सगळी स्वत:ची जबाबदारी ओळखून असलेली विचारी माणसे आहेत. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं छापलं जाणंच योग्य होतं. तुम्हांला आलेल्या धमक्यांची कथा माहीत असूनही मी हे म्हणते आहे... आणि प्रत्येक भल्याबुर्‍या प्रसंगी तुमच्या सोबत असण्याचं आश्वासनही या निमित्तानं देते आहे.
सर्वांगसुंदर अंकाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!

आपली
कविता महाजन

प्रिय कविता
काहीतरी गैरसमज होतोय. हुसेन यांच्या लेखातील एकही शब्द बदलेला नाहीये. कात्री चालवणं वगैरे दूरचच. फक्त विष्णू खरे यांचा लेख अंकातून काढून ‘चिन्ह’च्या संकेतस्थळावर टाकलाय इतकच याचं कारण आहे. मूळ लेख हिंदी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. त्यातले सारे मुद्दे हुसेन हयात असेपर्यंत लागू होते. हुसेन यांचं निधन झाल्याबरोबर त्या विषयाचं परिमाणच बदललं आणि तो काहीसा कालबाह्य झाला म्हणून तो अंकातून काढावा लागला.
संकेतस्थळावर मात्र तो अर्थातच उपलब्ध आहे. त्याची लिंक पुढीलप्रमाणे.
http://chinha.in/promo/Vishnu%20Khare.pdf

अभिप्रायाबद्दल अगदी मनापासून आभार !
सतीश नाईक


आणि अंकाची प्रत मागवण्यासाठी
‘चिन्ह’च्या 90040 34903 या मोबाईलवर '1 m copy'  एवढाच मेसेज स्वतःच्या नाव पत्त्यासह पाठवा. अंक पाच दिवसात घरपोच होईल.





Thursday, August 11, 2011





पाच प्रतिक्रिया 

१. विषय स्फोटक अंक शालीन
नुकताच अंक हाती आला. त्याचे बाह्य स्वरुपच इतके गोड आहे, पण हाती आला म्हणून आता पूर्वीसारखे एका बैठकीत वाचून काढणे शक्य होत नाही, तरीही संपादकीय व हुसेन यांच्यावरील लेख वाचून झाले. संपादकीय उत्तम झाले आहे, मुख्यत: हाच विषय़ का व कसा घेतला गेला हे खूप चांगल्या रितीने पटवले गेले आहे. हुसेन ह्यांना ओळखायला श्री. कोलते ह्यांचे दोन्ही लेख अपूर्ण वाटतात, त्यामुळे हुसेन यांच्या बाबतचे पूर्वग्रह जराही निवळत नाहीत. त्याबाबत अधिक मी पुन्हा कधी तरी सांगेन.
जस जसे वाचीन मी माझी मते इथे जरूर सांगीन. एकच सांगतो की विषय स्फोटक असला तरी अंक एकदम शालीन आहे.


सुरेश पेठे,
पुणे

२. रंग आणि गंध 
एक शिक्षिका भेटल्या. ठाण्यातल्या एका मोठ्या शाळेत त्या चित्रकला हा विषय शिकवतात. या वर्षाअखेर त्या सेवानिवृत्त होतील. म्हणाल्या 
‘अंक अप्रतिम आहे. अद्याप वाचलेला नाही पण जे पाहिले आणि चाळले ते मस्तच आहे. ते मेले कोणी आले होते ना हिंदूत्ववादी का कोणी, त्यांना म्हणावं, आता प्रत्यक्ष अंक पहा आणि मग तोंड उचका. आहे का पहा यात अश्लिल काही आणि हुसेनचा उदो उदो इत्यादी. त्यांना म्हणावं आमच्या शाळेत गेल्यावर्षी आम्ही एक मोठं महाराष्ट्रातल्या चित्रकारांचं प्रदर्शन भरवलं होतं. त्यात खूपशी ‘न्यूड्स’ही होती. अख्खी शाळा लोटली ते प्रदर्शन पाह्यला. त्यांचे पालक सुध्दा आले होते अन त्यांचे शेजारी पाजारी सुध्दा. पण कुणी एक चकार शब्दही नाही उच्चारला. त्या न्यूड चित्रांकडे त्यांनी एक आर्ट फॉर्म म्हणूनच पाहिलं. आणि हे मेले कपाळावरच्या गंधाखेरिज रंगाचा कधी संबंध न आलेले काय आम्हाला चित्रकलेविषयी सांगणार. यांना कला कशाशी खातात याची तरी अक्कल आहे का?’ पुढं त्या जे काही बोलंत गेल्या ते इथं न दिलेलंच बरं. 


३. सॅल्यूट
Dear Chinha Team
Yesterday Evening I've received most avaited Chinha magazine.
My son and daughter who is 21 and 17 , gone through Chinha separately
No comments from them . 
My wife dont allow to open this book infront of children.
I have gone through the book till midnight !
Realy it is a great effort !
Salute to the whole Chinha Team !


Mukund Borkar
Anushaktinagar, Mumbai


४. भलतीच अडचण
आर्थिक घडामोडींपायी आठवड्यातून एकदा तरी जेथे जावे लागते अशा ठिकाणी त्यांच्याशी ओळख झाली. एकदा त्यांनी सही पाहिली आणि विचारलं ‘तुम्ही चित्रकार आहात का?’ वगैरे. मग त्यांना ‘चिन्ह’चा एक अंक भेट दिला. अंक आवडल्याचं त्यांनी आवर्जून फोन करून कळवलं. नंतरच्या भेटीत हातातलं काम बाजूला टाकून ते फक्त अंकाविषयी बोलत राहिले. नुकताच प्रसिध्द झालेला ‘नग्नताः चित्रातली आणि मनातली’ विशेषांकही त्यांना भेट दिला. पण यावेळी त्यांचा काही फोन आला नाही. १०-१२ दिवसांनी जेव्हा पुन्हा तिथं जाणं झालं तेव्हा सहज म्हणून त्यांच्या केबिनमध्ये डोकावलो. ‘काय, अंक वाचलात की नाही आमचा? असं विचारताच म्हणाले, ‘इथं खूप कामात असतो. लोकंही सतत भेटायला येतात. त्यांच्यासमोर अंक उघडणं बरं दिसत नाही ना? आणि घरी न्यावं म्हटलं तर मुलीही भोचक आहेत. त्यामुळे घरीही नेता येत नाही. मी माझा पडलेला चेहरा सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करत म्हणालो, ‘असं काही नाहीय हो आमच्या अंकात.’ आणि थेट त्यांच्या केबिन बाहेर पळालो.


५. नो कमेंट्स
पहिली आवृत्ती संपली. दुसरी लगेचच प्रसिद्धही झाली.

अंकातील लेखांची आरंभीची पानं पाहण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

http://chinha.in/promo/Chinha%202011.pdf

आणि अंकाची प्रत मागवण्यासाठी
‘चिन्ह’च्या  9967784422 / 90040 34903 या मोबाईलवर '1 m copy'  एवढाच मेसेज स्वतःच्या नाव पत्त्यासह पाठवा. अंक पाच दिवसात घरपोच होईल.


Tuesday, August 9, 2011


नग्नतेची ‘न्यूड’ल्स होताना

‘‘अखेर आज लेखासंदर्भातील सर्व काम संपवून फायनल लेख पाठवत आहे. आपण दोघांनीही ठेवलेल्या पेशन्सबद्दल आपण खरोखरच एकमेकांचं अभिनंदन करू या. आणि अशा अनेकांना सांभाळण्याबद्दल तुझं व शर्मिलाचं अभिनंदन! हा लेख लिहिताना मी आयुष्यात कधी नव्हे एवढा थकलो. एका क्षणी तर ब्लॅंक झालो आणि तो काळ फार मोठा होता.’’ १० मे रोजी चित्रकार सुहास बहुळकर यांनी ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांना लेखाचा शेवटचा भाग पाठवताना लिहिलेल्या पत्रातला हा काही भाग. ‘चिन्ह’च्या ‘‘नग्नताःचित्रातली आणि मनातली’’ विशेषांकातल्या बहुळकरांच्या लेखाविषयी कळत नकळत हा मजकूर खूप काही सांगून जातो. बहुळकरांनाच ‘चिन्ह ब्लॉग’नं ‘न्यूड’ल्स लेखाच्या एकूण लेखनप्रक्रियेसंबंधी लिहिण्याची विनंती केली होती. त्यांनी ही ती मान्य केली आणि पटकन‌ जो लेख लिहून दिला तोच हा लेख. 


  ‘चिन्ह’ या चित्रकला विषयक अंक प्रकाशित करणार्‍या सतीश नाईक यांचा व माझा संबंध फार जुना आहे. जेजेत असताना मी त्याला फेलो म्हणून शिकवीत होतो. त्यानंतर त्यानं कलाविषयक अनेक उपक्रम केले. पण त्यात त्याच्यातील पत्रकार कायमच जागरूक होता. तो नेहमीच जाणवत राहिला. गेल्या अनेक वर्षातील ‘चिन्ह’ची वाटचाल मी स्वत: अनुभवली असून, त्यात बर्‍याचदा सहभागीही झालो आहे. सुमारे एक वर्षापूर्वी सतीशचा फोन आला व त्यानं ’नग्नता : चित्रातली आणि मनातली’ अंकात मला लिहिण्याचा आग्रह केला. सतीशचे शब्द होते, ’’बहुळकर, तुम्ही जेजेत अनेक वर्षे न्यूड क्लासला शिकवत होता, फिगर ड्रॉईंग व पोर्ट्रेट ही तुमची खासियत. शिवाय मॉडेलनाही वर्षानुवर्षे तुम्ही काम देत होतात. हा विषय तुमचाच आहे या विषयावर तुम्ही लिहिलेच पाहिजे.’ त्यानंतर लगेचच ‘चिन्ह’ची कार्यकारी संपादिका व मुक्त पत्रकार शर्मिला फडकेही मला येऊन भेटली. विषय ऐकून मी चक्रावलोच होतो. पण अखेरीस या आगळ्या-वेगळ्या विषयावर लिहूयाच असा निर्णय घेतला आणि मी ’नग्नता’ या आपण एरवी टाळणार्‍या विषयात अक्षरश: अडकलो. आणि नंतर त्या विषयानं माझी अक्षरश: झोपच उडवली.
पु.ल.देशपांडे यांचे मामा एम.व्ही.दुभाषी यांनी
जेजेमध्ये शिकत असताना १९२४ साली तैलरंगात
अत्यंत प्रभावीपणे साकारलेले न्यूड 
कारण हा विषय जेवढा नाजूक तेवढाच अवघडही होता. माझे सदाशिवपेठी बालपण, मध्यमवर्गीय जगातील नैतिकता, सभ्यता! यासंदर्भात माझे अनुभवविश्व आणि त्यातून निर्माण झालेले विचार या सर्वांसकट माझ्या मन:पटलावर नग्नतेसंदर्भातील काही प्रतिमा आकार घेऊ लागल्या. परिणामी या प्रक्रियेत मी केव्हा गुंतलो आणि झपाटलो गेलो हे माझे मला देखील कळले नाही. माझ्या बालपणापासून ते आजतागायत गेल्या ५५ वर्षांत मी अनुभवलेली प्रत्यक्ष आणि प्रतिमेतील नग्नता मला व्यापू लागली. माणसामाणसातील, समाजमनातील, धर्म-संस्कृती आणि कलेतील नग्नता अक्षरश: फेर धरून माझ्याभोवती नाचू लागली. काय घ्यावे आणि काय घेऊ नये, कसे निवडावे आणि कसे मांडावे अशा प्रश्नचिन्ह आणि उत्तरांच्या भोवर्‍यात गरगरत असतानाच ’नाचू किती-नाचू किती, कंबर लचकली’ या लावणीच्या चालीवर, ’घेऊ किती-टाकू किती, लेखणी उचलली’

अशी माझी अवस्था झाली. त्यातूनच तब्बल वर्षाभरापेक्षा जास्त काळानंतर निर्माण झाला तो माझा ५३ पानांचा प्रदीर्घ लेख ’न्यूड’ल्स.
 या लेखात लिंगपुराणापासून ते ख्रिस्ती धर्मातील नग्न बाप्तीस्म्यापर्यंत व मुंबईत १९१९ मधे सुरू झालेल्या जेजेतील पहिल्या न्यूड क्लासपासून ते गावोगावी नग्न चित्रांच्या अभ्यासासाठी केलेल्या धडपडीची चक्षुर्वे:सत्यम् हकीकतही आहे. या शिवाय नग्न चित्रांवरून परदेशातच नव्हे तर, भारतातही झालेले वाद-विवाद आणि नैतिकता व अश्लीलतेवरून झालेले खटलेही आहेत. नग्न चित्रं काढण्याच्या निमित्तानं चित्र-शिल्पकारच नव्हे तर समोर नग्न उभी राहणारी मॉडेल्सही आपला प्रवास मांडत आहेत. साहजिकच यात अत्यंत हृद्य व हृदयात कालवाकालव करणार्‍या प्रसंगापासून ते अत्यंत विनोदी असे किस्सेही आहेत. यात मानवी गुंतागुतीसोबतच मानवी जीवनाच्या मर्यादांचे आणि त्यातील व्यामिश्रतेचं दर्शनही आहे.
 हे लेखन करीत असताना मी वाचलेले व जगलेले आठवत होतोच, पण याच काळात अनेक मित्र-मैत्रिणी, विद्यार्थी-विद्यार्थिनी अशा अनेकांकडून समृद्ध होत गेलो. म्हणूनच ते दिवस आणि रात्री हा काळ अक्षरश: मंतरलेला होता. आदिमानवापासून ते आधुनिक काळापर्यंत गेली लाखो वर्षे मानवी जीवनाला व्यापून उरणारी नग्नता, नैतिकतेच्या कल्पना, धर्मसत्ता, राजसत्ता, न्याय, कला, संस्कृती अशा अनेक बंधनाचा भाग होती. त्याचाच भाग किंवा त्याला विरोध म्हणून व्यक्त होणारी नग्नता आणि तिचं वेगवेगळ्या रूपात अभिव्यक्त झालेलं स्वरूप अवाक् करणारं आहे.
हा लेख लिहिताना मी पूर्वीपासून बघीतलेली, वाचलेली पुस्तके व त्यातील अनेक संदर्भ मला अचानक आठवत. पण ते संदर्भ कोणत्या पुस्तकातील आहेत किंवा त्या पुस्तकाचं नावही आठवत नसे. परिणामी माझ्याच नव्हे तर मी जात असलेल्या इतर ग्रंथालयातील पुस्तकेही मी शोधू लागे. पण हवं ते पुस्तक तासनतास घालवूनही मिळत नसे. मग स्वत:वरच चिडणं, बायको किंवा मुलींवर खेकसणं, समोरची भिंत रिकामी असली तरी तिच्याकडे रागानं बघणं, असेही प्रकार होऊ लागले. फारच ताप होऊ लागला तर मेंदूला गुंगी आणण्यासाठी फसफसणार्‍या सोनेरी दुनियेत विहार करावा लागे. किंवा अमिताभच्या जाहिरातीपूर्वीपासून मी वापरत असलेलं लाल रंगाचं हिमताज तेल टाकून, डोकं थंड करून शांत झोपी जाण्याचा प्रयत्नही करू लागे. कधी यश तर कधी पूर्णत: पराजय! पण पहाटे तीन वाजता अचानक डोळे टक्क उघडत व त्या पुस्तकाचं नाव आठवत नसलं तरी मुखपृष्ठावरील चित्र अचानक डोळ्यासमोर उभं राही. मग पुन्हा कपाटांची शोधाशोध... पुस्तक सापडे आणि संदर्भाचे कच्चे दुवे पळून जात. शब्द कागदावर सरसर उमटू लागत. काही वेळा संदर्भ सापडण्यासाठी दिवसचे दिवस घालवावे लागत, तर काही वेळा अनपेक्षीतपणे लगेचच सापडत. पण यामुळे नियमाला अपवाद व त्यासाठी नियम हे तत्व मला चांगलंच कळले. अर्थात याचं साधर्म्य श्लील-अश्लील, नैतिक-अनैतिक अशा नग्नतेसारख्या कल्पनांशी आहे हे देखील जाणवलं. सहज म्हणून हात घातला तर खजिनाच हाताशी लागे तर काही वेळा खूप काळ खोदूनही, कोळसे भरलेल्या धनाचा हंडाच हाती येई. काही वेळा दोन ओळींमधे असणारा मजकूर कल्पून वाटचाल करावी लागे. न्यूड क्लासवर मी शिकवत असताना काही अनुभव डोक्यातल्या डायरीत तर काही प्रत्यक्ष डायरीत नोंदवून ठेवले होते. या दोनही डायर्‍या (डोक्यातली व प्रत्यक्ष) अचानक आपली पाने फडफडवू लागत आणि त्यातून किस्से, कथा, अनुभव यांचा खजिनाच डोळ्यासमोर उभा राही. काय घ्यावं आणि काय घेऊ नये या धडपडीत असतानाच कोणाचा तरी फोन येई आणि डोक्यात घोळत असलेला विषय सांगताच तो किंवा ती देखील आपला अनुभव सांगून जाई. अशाच प्रवासात कोल्हापूरातील एक चित्रकार ज्यांनी तरुणपणापासून वृद्धावस्थेपर्यंत नग्न स्त्री शरीरावरून चित्र काढण्याचे वेड घेतले ते कै. चांगदेव शिगावकर त्यांच्या मॉडेलसह असलेल्या फोटोसकट त्यांच्या चिरंजीवांनीच माझ्यापर्यंत पोचवले. त्यांचेच शिष्य असलेल्या श्याम पुरेकरांची कहाणी तर त्याहून विलक्षण. त्यांनी आपल्या घरातच नग्न मॉडेल उभी करून चित्रं काढली व त्यांची पत्नी विमल पुरेकरांनी त्यांना कशी साथ दिली ही सत्यकथा फोटोंसकट मिळाली. माझ्या जेजेतल्या काळातील एका जुन्या डायरीत जेजेतील न्यूड बसणार्‍या मॉडेलबद्दलच्या काही नोंदी २०/२२ वर्षांनंतर योग्यवेळी हाती आल्या. पण सगळंच सांगत बसलो तर माझ्या या ‘न्यूड’ल्स मधे काय मसाला भरलाय तो उघड होईल.
 पण एक गोष्ट मात्र सांगितलीच पाहिजे. १ जानेवारी २०११ या दिवशी माझ्या मुलीचं लग्न होतं. डिसेंबर उजाडला तरी मी आपला माझ्या कामात व या लेखात गुंतलेलो! हे बघून माझी पत्नी व मुलीदेखील चांगल्याच हैराण झाल्या होत्या. परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे बघून मी ’न्यूड’ल्स बनविण्याच्या प्रक्रियेतून बाहेर आलो आणि प्रयत्नपूर्वक वरपित्याच्या सर्व जबाबदार्‍या पार पाडू लागलो. पण मनातल्या मनात ’न्यूड’ल्स शिजतच होती. त्यातले मसाले तयार होत होते... त्यात नवनवीन भर पडत होती. वस्तुत: लेखनाचा पहिला खर्डा दिवाळीपूर्वीच- ऑक्टोबर २०१० अखेरीस दिला होता. १ जानेवारी २०११ला लग्न पार पडलं आणि मी पुन्हा ‘न्यूड’ल्स मधून विहार करू लागलो. नवनवीन भर पडत होती. पूर्वी लिहिलेलं काही रहित करत होतो. लिहिलेलं पाठवून देत होतो. डी.टी.पी.चं काम जोरात सुरू होतं. सतीश नाईक व शर्मिला फडके यांनी खरोखरीच खूपच पेशन्स ठेवला. असं करता करता तब्बल ६ महिने उलटले. मला प्रचंड थकवा वाटू लागला- नको तो विषय नको ते ’न्यूड’ल्स असं वाटून ’नग्नता’ हा शब्दही नकोसा वाटू लागला. एकदाचा लेख संपवला आणि ’चिन्ह’कडे पाठवून श्रमपरिहारासाठी अरुणाचलला गेलो. पण प्रवासात असतानाच सतीशचा फोन आला, बहुळकर लेख अफलातून. पण काहीतरी कमी वाटतंय, जोडून घ्यायला हवा.’’ वैतागलो व तूच हवं ते कर, असे सांगून फोन ठेवला. मे अखेरीस परतलो तर संपादकांना वाटलेले बदल करून लेख परत हजर. परिश्रमपूर्वक सतीशनं ते ३/४ वेळा लेख वाचून त्याला वाटलेले बदल सुचविले होते. आता मी हिमालय बघून ताजातवाना होऊन आलो होतो. पुन्हा बैठक मारली. काही गाळलं, काही बदललं आणि काही नव्यानं घालून लेख पूर्ण केला. एव्हाना जून २०११चा पहिला आठवडा संपला होता. आता मात्र ठरवलं हा विषयच न संपणारा आहे. कुठं तरी थांबलंच पाहिजे. नव्यानी मांडणी केलेला लेख संपादकांनाही आवडला होता.
 आज ’चिन्ह’मधला माझा ’न्यूड’ल्स हा लेख पाहण्यास माझा मीच उत्सुक आहे. माझ्या लेखात काय आहे हे मी जाणतो पण ’चिन्ह’च्या अंकात इतर कोणते लेख आहेत त्यांचीदेखील मी उत्सुकतेनी वाट पाहतो आहे. कारण ’चिन्ह’च्या नग्नता विषयावरील या अंकामुळे व त्यातील हुसेन यांच्यावरील लेखनामुळे सतीशला धमक्यांचे प्रचंड फोन आणि पत्रेही आला होती हे मला ठाऊक आहे.
 ‘चिन्ह’च्या या अंकात काय आहे हे मला ठाऊक नाही, पण एक मात्र निश्चित की, भारतीय समाजमनाचा विचार करता कलेतील नग्नता ही अश्लीलता व बीभत्सतेच्या पातळीवर पोहचू नये व त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावू नयेत असंच माझं मत आहे. माझं हे मत ‘चिन्ह’चे संपादक, लेखक व कलावंतांनाही निश्चितच मान्य असेल असं वाटतं. समाजमनातही नग्नता या विषयाबद्दल निश्चितच कुतूहल असतं आणि भविष्यातही ते असणारच. त्यामुळेच कला व संस्कृती याबद्दल प्रेम असणार्‍या प्रत्येक व्यक्तीने ’नग्नता’ हा आगळाच विषय घेऊन चित्र-शिल्पकलेबाबत ’चिन्ह’ मधे काय लिहिले आहे ते समजावून घेणं मात्र आवश्यक आहे.

- सुहास बहुळकर


अंकाची प्रत मागवण्यासाठी
‘चिन्ह’च्या 90040 34903 या मोबाईलवर '1 m copy'  एवढाच मेसेज स्वतःच्या नाव पत्त्यासह पाठवा. अंक पाच दिवसात घरपोच होईल.

Thursday, August 4, 2011


अंक आणि ‘नवा अंक’!

‘चिन्ह’चा अंक २१ जुलै रोजी प्रसिध्द झाला.
२१, २२, आणि २३ जुलै रोजीच तो लेखक, चित्रकार, जाहिरातदार, हितचिंतक
आणि ज्या वाचकांनी तो प्रसिध्द होण्यापूर्वी बुक केला होता त्या
सार्‍यांनाच रवाना झाला. म्हणजे आमच्याकडून... गेला
पण अद्यापपर्यंत तो त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही.
आज ५ ऑगस्ट. तब्बल १४-१५ दिवस झाले पण
अंक संबंधितांपर्यंत पोहोचलेला नाही.
हा साराच प्रकार प्रचंड मनस्ताप देणारा ठरला आहे.
त्या विषयी आता लिहूही नये असं वाटावं, इतका.
एवढाच निर्णय मनाशी पक्का झाला की
आता पुन्हा अंक पाठवताना कुरियर कंपनीचा
संपूर्ण बॅक रेकॉर्ड पाहिल्याखेरिज त्यांच्या हाती
पत्र वा एकही प्रत सोपवायची नाही.
असो.

अंक पोहोचण्याच्या बाबतीत कधी नव्हे ते आता
आम्ही सारा हवाला आता नशीबावर ठेवला आहे.
हे सारं मानहारीकारक आहे पण त्या खेरिज
दुसरा तरणोपायच उरलेला नाही हे निश्चित.

ज्या संबंधितापर्यंत अंक पोहोचला आहे त्यांच्या
फेसबुक, मेल्स, एस. एम. एस. आणि मोबाईलमार्फत
ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या उमेद वाढवणार्‍या
नक्कीच आहेत यात शंकाच नाही. कुरियर कंपनीनं
घातलेल्या भयानक गोंधळाच्या काळ्याकुट्‌ट पार्श्वभूमीवर तेवढाच
आता मनाला आधार देणार्‍या ठरल्या आहेत.

२.
आता या नंतरच्या काळात ‘चिन्ह’च्या संदर्भात
जे जे काही घडेल ते सारं नियमितपणानं
येथे मांडावयाचा विचार आहे.
नियमितपणानं म्हणजे रोज नव्हे. जसं जसं
जमेल तसं, त्यात आपलाही सहभाग अभिप्रेत आहे.
तुम्हाला ‘चिन्ह’चा अंक पाहून जे वाटलं ते आम्हाला
जरूर कळवा. मेल, पत्र, एस. एम. एस कुठल्याही
माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा.
अगदी प्रतिकूलसुध्दा चालतील.
आम्ही त्या येथे प्रसिध्द करू. ‘चिन्ह’चा हा ब्लॉग आता
चित्रकलेचं व्यासपीठ बनावा अशी कल्पना आहे.
आणि आम्हाला खात्रीही आहे की आपणही
त्यात जरूर सहभागी व्हाल.

३.
आणखी एक.
‘चिन्ह’चा हा अंक संपादित करताना आलेले वेगवेगळे
चित्रविचित्र अनुभवही आम्ही निमित्ता निमित्तानं
आपल्याशी शेअर करणार आहोत.
तेव्हा वाचायला विसरू नका.
‘अंका’ बाहेरचा हा एक आणखी ’नवा अंक’.

४.
‘दिव्यभास्कर’ या गुजराती दैनिकाचे असिस्टंट एडीटर
धर्मेश भट्ट आपल्या एस. एम. एस. मध्ये म्हणतात....
Really beautiful and rich anka of ‘Chinha’. 
You deserve a lot more than just formal ‘Congratulation’. 
As a journalist, I was expecting, couple of other  aspects of nudity or nudism. 
As a journalist too I got good reading.
Thanks.

तर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ऑनलाईन आवृत्तीचे
नीलेश बने एस. एम. एस. मध्ये म्हणतात....
नमस्कार.
अंक मिळाला. खुप खुप धन्यवाद.
अंकाच्या पानापानावर अफाट मेहनत दिसते आहे.
त्याबद्दल अभिनंदन.
वाचून सविस्तर प्रतिक्रिया कळवतो.
पुन्हा एकदा धन्यवाद.

‘रहेजा स्कूल ऑफ आर्ट’चे माजी कलाशिक्षक
शिरिष मिठबावकर म्हणतात....
सतीश, एक अतिशय उच्च दर्जाचा
अंक दिलात त्याबद्दल
अभिनंदन आणि आभार.



Saamna Newspaper

Image view

Saamana Newspaper