Friday, December 31, 2010



लालमहालातला दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवल्यानंतरची प्रतिक्रिया देताना  शिल्पकार
उत्तम पाचारणे म्हणतात
हे तर पाशवी कृत्यच!
 
हा पुतळा हटवणं हे निषेधार्हच आहे. सर्वप्रथम मी असं म्हणेन की ज्ञानेश्वरांची समाधी उखडून ज्ञानेश्वरांनी तिथंच समाधी घेतली का? हे पाहण्यासारखा हा सर्व प्रकार आहे. मराठी मनाला वेदना करणारी ही गोष्ट आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण या विषयाच्या कितीही खोलात गेलो तरी अंधारच आहे आणि कितीही वर अनंत अवकाशात गेलो तरी काळी पोकळीच आहे. सद्‍सद विवेक बुद्धी जागृत ठेवून जवाबदार व्यक्तिंनी हे विषय हाताळायचे असतात. यशवंतराव चव्हाणांपासून सर्वानींच ज्यांनी इतिहास संपादनाचं काम केलं त्यांनी; सदर विषयाची पूर्णत: पुष्टी होत नाही म्हणून मराठी विश्वकोषाचं काम थांबवलं होतं, अशी नोंद आढळते. याचाच अर्थ असा की त्यांनी या विषयाकडे फार गांभीर्यानं पाहिलं असावं आणि सद्‍-विवेकानं निर्णय घेतला असावा असं वाटतं.

पण आज परिस्थिती अशी आहे, हाती आलेला पुरावा सत्य मानून दादोजींचा पुतळा हटवला जातो, उद्या दुसरे पुरावे हाती आले तर पुन्हा पुतळा उभारतील, पुन्हा काढूनही टाकतील. जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून पुतळा  पुतळा खेळण्यात जर राजकारण्यांना रस वाटत असेल तर त्यांनी आपली पदं सोडून खुशाल खेळावं.
कलाकार हा तत्कालीन समाजमन, त्यांच्या जाणीवा, उपलब्ध पुरावे यांच्या साहाय्यनं कलाकृती निर्माण करत असतो. त्यासाठी त्याची कित्येक महिन्यांची मेहनत तो पणाला लावत असतो. तेव्हा कुठे अशी कलाकृती मूर्त रूप घेते. चित्रकार एम.आर आचरेकर आणि दीनानाथ दलाल यांच्या चित्रांचा आधार घेऊन, त्यामध्ये ज्याप्रकारे कल्पना चितारली आहे त्या कल्पनेचा हे शिल्प एक उत्तम आविष्कार होतं आणि आहे. पण स्वत:चं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी या शिल्पाचा असा विध्वंस करणार्‍यांची वृत्ती मुळातच पाशवी असते. संवेनशीलतेचा एक सहस्रांश देखील त्यांच्या ठायी नसतो याचं या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रत्यंतर आलं.

सर्व कलावंत नेहमी समाजमनाची सेवाच करत असतात. पण अशा तर्‍हेचं दुष्कृत्य करून हे राजकारणी समाजमनाला विनाकरण वेठीस धरत आहेत आणि अशाप्रकारे समाजमनाला वेठीस धरणारं कृत्य निषेधार्हच असेल. एक कलाकार म्हणून खूप वाईट वाटतं. पण मनातल्या भावना व्यक्तही कराव्याशा वाटतात म्हणूनच ही धडपड...

शब्दांकन : अमेय बाळ

उद्या वाचा विख्यात शिल्पकार सदाशिव साठे यांची प्रतिक्रिया

Thursday, December 30, 2010

आधी आणि आता


प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे म्हणतात

हे शिवरायांचा पुतळाही हटवतील.



दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवल्या संबंधिच्या गेल्या दोन दिवसातल्य बातम्या जर चाळल्या तरी लक्षात येतं की समाजत हिंसकता किती वाढली आहे. तोडफोड, जाळपोळ, हाणामारी यांसारख्या घटनांनीच मथळेच्या मथळे भरले आहेत. मला वाटतं पुतळ्यावरून राजकारण करणार्‍यांना हेच हवं आहे. ज्याप्रमाणे जंगलामधली जनावरं कपळातलं स्वत:च अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या हिंस्र रूपातून आपली ताकद दाखवत असतात, त्याच प्रमाणे मानवी समाजातले(जो यांना आपला कळप वाटतो) ते हे नरपशू आपल्या शक्तीप्रदर्शनातून मीच कसा श्रेष्ठ हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्वांची वृत्ती लांडग्यांची आहे. त्यांना स्वत:शिवाय कुणाचंच भलं दिसत नाही.

आपल्या एखाद्या कृतीमुळे समाजात त्याचे काय पडसद उमटणार आहेत याची पूर्व कल्पना असतानाही, अशी कृती करणं हा निव्वळ राजकीय खेळीचाच एक भाग आहे. मग त्यात कोण कोण आणि कितीजण भरडले जातात याची त्यांच्यापैकी कुणालाच पर्वा नाही. एखादी कलाकृती निर्माण करताना तिचा निर्माता कलाकार किती कष्ट उपसतो, त्यामागे त्याची कित्येक महिन्यांची तपश्चर्या असते, साधना असते; त्यातून मग ती कलाकृती कशा प्रकारे निर्माण होते याच्याशी या सगळ्यांना काहीही देणं-घेणं नाही. ना कोणाला दादोजींविषयी काही वाटतं ना शिवाजींविषयी. उद्या उठून स्वत:ची ताकद सिद्ध करण्यासाठी शिवरायांचा पुतळा हटवायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत अशी यांची वृत्ती आहे. तेव्हा या लांडग्यासारख्या वृत्तीला मी दोष देतोय. एखदा प्रश्न सोडविण्याच्या यांचा संकल्पना जरा विचित्रच आहेत. म्हणजे एखाद्या प्रश्नावर यांचं उत्तर काय दुसरा प्रश्न निर्माण करा पहिल्याचं आपोआप निराकरण होईल.

वाईट याचंच वाटतं की हे सगळं माहिती असूनही आपण बातम्या वाचणं, प्रतिक्रिया व्यक्त करणं यापलिकडे काहीच करू शकत नाही. सगळ्या प्रकाराची खूप चीड येते पण दुसर्‍या क्षणी मनात विचार येतो की दगडावर डोकं आपटून काही फायदा नाही आपलंच डोकं फुटेल दगड मात्र तसाच राहील निर्विकार... नेमस्त...

शब्दांकन :  अमेय बाळ

उद्या वाचा प्रख्यात शिल्पकार उत्तम पाचारणे यांची जळजळीत प्रतिक्रिया.

Wednesday, December 29, 2010

आधी आणि आता


प्रख्यात शिल्पकार  प्रमोद कांबळे म्हणतात
हे तर तालिबानी कृत्यच!

जी काही घटना घडली ती अत्यंत वाईट घडली. याबद्दल काही बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. ते असते तरी त्यांना तोंडातून बाहेर पडताना लाज वाटली असती इतकं भयंकर कृत्य घडवून आणलं आहे. मला असं वाटत की काही वर्षांपूर्वी तालिबान्यांनी जसा स्फोटकांचा वापर करून बुद्धाचा पुतळा उद्‍ध्वस्त केला होता तसंच हे कृत्य आहे. तालिबानी आणि या लोकांमध्ये काहीच फरक नाही. मुघलांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रातल्या शिल्पांचा, मंदिरांचा विध्वंस केला; दादोजींचा पुतळा तडकाफडकी हटवणं हा देखील त्यातलाच प्रकार आहे. आपल्या संस्कृतीत असं सांगितलंय की एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली तर तिच्या शेजारी दुसरी चांगली गोष्ट उभी करा, ती उद्‍ध्वस्त करण्यात काहीच हशील नाही. पण हे म्हणजे असं झालं; एकीकडे ऐक्याची भाषा करायची आणि दुसरीकडे असं समाजात दुफळी निर्माण करणारं कृत्य करायचं. एखादी रेघ जर आपल्याला लहान वाटत असेल तर तिच्या शेजारी दुसरी मोठी रेघ ओढावी, लहान रेघ का पुसावी. तसं केल्यानं हात तर बरबटतातच पण ती पूर्णपणे मिटवताही येत नाही आणि त्या जखमेचा ओरखडा मग व्रण म्हणून समाजमनावर कायम राहतो.

महागाई, भारनियमन, रोज उठून उघडकीस येणारे अब्जावधी रूपयांचे घोटाळे हे सगळे प्रश्न बाजूला सारून एका टुकार विषयावर राजकारण करण्याचा शहाणपणा करणारे अधिक शहाणे नेते हे आपले प्रतिनिधी आहेत याची लाज नाही वाटत कीव करावीशी वाटते. मला तर वाटतं की महागाई, भारनियमन, घोटाळे याप्रश्नांपासून जनतेची दिशाभूल करण्यासाठी केलेला हा कट आहे.

आणखी एक बाब अशी की हा पुतळा ज्यांनी प्रत्यक्ष हटवला त्यांनी रात्री उशीराचीच वेळ का निवडली? कारण ती वेळ फाशीची असते. आणखी कहर म्हणजे हा पुतळा कचर्‍याच्या डब्यातून नेण्यात आला. याहून वाईट वाटतं ते याचं की या गोष्टीचा आनंदोत्सव साजरा केला जातो. कलाकृती, कलाकार, त्यांची संवेदनशीलता यांच्याशी; हा प्रकार घडवून आणणारे आणि त्यावर अंमल करणारे यांचा सात काय सत्तर पिढ्यांचाही संबंध नाही, हेच यावरून स्पष्ट होतं. एखाद्या कलाकृतीचा अशाप्रकारे विध्वंस होतो तेव्हा त्याचं दु:ख काय असतं हे फक्त एक सच्चा कलाकारच जाणतो.

शेवटी एवढंच वाटतं की हा सर्व प्रकार घृणास्पद आहे. कलाकार म्हणूनच नव्हे तर जनसामान्यातला एक म्हणूनही मला याचा खेद वाटतो. पण मनावर दगड ठेवून आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करण्याशिवय माझ्या हातात काहीच नाही.

शब्दांकन : अमेय बाळ

उद्या वाचा प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांची तीव्र प्रतिक्रिया
आधी आणि नंतर...


तालिबान्यांनी बुद्धाच्या मूर्ती उद्‍ध्वस्त केल्याची बातमी कानी आली तेव्हा खूप अस्वस्थता आली. काही क्षण भिरभिरल्यागत झालं. हे सारं चालंलय तरी काय, कुणीच कसं हे थांबवू शकत नाही या भावनेनं एक विचित्र अगतिकतेची भावना मनाला स्पर्श करून गेली. बाबरी मशीद उद्‍ध्वस्त झाल्याची बातमी ऐकली तेव्हाही असंच काहीसं वाटलं होतं. नंतर वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या गगनचुंबी इमारतींवर विमानं धडकवली गेली तेव्हाही तसंच काहीसं झालं होतं आणि काल परवा पुण्यात दादोजी कोंडदेवांचा पुतळा कापून काढल्याची बातमी ऐकावयास मिळाली तेव्हा झालेली मानसिक अवस्था यापेक्षा काही फारशी वेगळी नव्हतीच! या सगळ्या घटनाक्रमात ज्या कलावंतानं ते शिल्प उभं केलं होतं त्या कलावंताला हे सारं पाहून काय वाटलं असेल? याची दखल एकाही वृत्तपत्राला अथवा वृत्तवाहिनीला घ्यावीशी वाटली नाही यावरून महाराष्ट्रात कलेला आणि कलावंतांला काय स्थान आहे याची कल्पना येते. ‘चिन्ह’ हे कलावंतांचंच व्यासपीठ आहे म्हणूनच आजपासून पुढले काही दिवस या घटनेसंदर्भातल्या महाराष्ट्रातल्या कलावंतांच्या प्रतिक्रिया आम्ही प्रकाशित करणार आहोत. दादोजी कोंडदेवांचं शिल्प ज्यांनी साकारलं ते कोल्हापूरचे नामवंत शिल्पकार संजय तडसरकर  म्हणतात,


आपण अगतिक आहोत...

“कलाकारचं असं असतं की कुठलीही कलाकृती असू द्या; नाट्यकृती असो, साहित्यातली असो, चित्र असो वा शिल्प असू द्या. ती कलाकृती निर्माण करताना कलाकार त्याविषयाशी पूर्णपणे एकरूप झालेला असतो,कलानिर्मिती झाल्यानंतरही ही एकरूपता असते पण काही काळापुरती. नंतर त्यापासून कलाकार अलिप्त होतो. परंतु ती कलाकृती कुठल्या उद्देशानं निर्माण झाली आहे, त्याचा समाजावर काय परिणाम होणार आहे याचा विचार त्याच्या मनात सतत घोळत असतो. लालमहालातला दादोजी कोंडदेवांचा पुतळा कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तडकाफडकी काढणं, याला नक्कीच राजकीय खेळीचं वळण मिळालेलं आहे. हे शिल्प माझ्याकडून निर्माण झाल्यानंतर काही काळानं मी त्यापासून अलिप्त झालो. पण दोन दिवसांपूर्वी जी घटना घडली त्यानं मन खिन्न झालं. हा मुद्दा चर्चेतून सोडवता आला असता. पण हल्ली कोणाही राष्ट्रपुरूषाचा पुतळा टार्गेट करणं फार सोप्पं झालंय आणि त्यामुळे स्वत:ची राजकीय पोळी भाजणार्‍यांचं असं फावतय.

आमच्यातले सर्व ज्येष्ठ शिल्पकार असं म्हणतात की समाजमन घडवण्यात कलाकार मोठी भूमिका बजावतो. मला असं वाटतं की त्यांनी स्वत:हून या घटनेवर भाष्य करावं. एखादा पुतळा साकारताना त्यातल्या सौंदर्याचा भाग हा फार महत्त्वाचा असतो. त्यासाठी कलाकार जीव ओतून काम करत असतो; पण ह्या पुतळ्याला ज्याप्रकारे कटरने कापून हटवलं गेलं त्यावरून एकच लक्षात येतं की हा प्रकार करणार्‍यांचा आमच्यासारख्या कलावंतांच्या किंवा तो पहाणार्‍या जनसामान्यांच्या संवेदनशीलतेशी काडीमात्रही संबंध नाही.

ही घटना घडून गेली म्हणजे भविष्यात असं काही होणारच नाही असं नाही. त्यामुळे शासनानं तज्ज्ञांशी चर्चा करून कुठलीही कलाकृती निर्माण करताना कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं न आणता कलाकृती निर्माण करण्यासंबंधीचे काही नियम आखून द्यावेत. ज्यामुळे भविष्यात अशा घटना टाळता येतील. झाल्या प्रकाराचं वाईट तर वाटतंच पण हा सर्वच प्रकार कलेच्याच नव्हे तर सबंध समाजासाठी देखील घातक असताना आपण काही करू शकत नाही याचं दु:ख सलत राहतं.”

शब्दांकन
अमेय बाळ

Thursday, December 2, 2010

मराठी चित्रकार

चित्रकला हे शब्दातीत माध्यम आहे, मराठी चित्रकार हा काही इतर चित्रकारांपेक्षा वेगळा असतो कां? आधीच्या पिढीतल्या चित्रकारांमधे स्वत:चे असे एक स्थान निर्माण केलेल्या चित्रकारांमधे काही मराठी चित्रकार होते. उदा. वासुदेव गायतोंडे,सदानंद बाक्रे, प्रभाकर बरवे, प्रभाकर कोलते, सुधीर पटवर्धन. आज अशी किती नाव घेता येतील?  श्री.शशिकांत सावंत यांनी 'आपलं महानगर'च्या दिवाळी अंकात आजच्या मराठी चित्रकारांवर आणि जागतिक पातळीवरील त्यांच्या आजच्या कामगिरीबद्दल, स्थानाबद्दल एक लेख लिहिला आहे. लेख अनेक अर्थांनी इंटरेस्टींग आणि वाचनीय आहे. मूळ लेख खूप मोठा आहे. त्यातला काही अंश इथे देत आहे.

" बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर सर्वच देश डाव्या-उजव्या डिस्कोर्समधे विभागला गेला. मराठी चित्रकारांची  बाबरी मशिदीवर काही भूमिका होती. पण किती जणांनी ती जाहीरपणे व्यक्त केली? नंतरच्या काळात 'इन्स्टॉलेशन' हा जो कलाप्रकार सजला त्यासाठी राजकीय विचारासारख्या मूलभूत गोष्टी आवश्यक होत्या. त्यात मराठी चित्रकार मागे होते. ८७ ते ९२ या काळात जे बदल झाले त्यात संकल्पनात्मक चित्रकलेला मोठ्या प्रमाणावर स्थान मिळू लागले. उदा. सुधीर पटवर्धनांची कला. वर वर ही चित्रं साधी-सरळ वाटतात. ती कुणालाही 'समजावीत' अशी चित्रं आहेत. पण पिचलेल्या, वर्षानुवर्ष केवळ राबणंच नशिबी आलेल्या सामान्य माणसांचं त्या चित्रण करतात. स्नायूंचं पिळवटणं, देहबोली, चेहर्‍यावरचे भाव यांतून ते अभिव्यक्ती करतात. त्यात घटना असतात. घटनेचं वर्णन असतं. पण याही पलीकडे जाऊन त्यांची चित्र दीर्घकालीन, शाश्वत असं काही देतात.
परंपरेचा इतिहास, पटवर्धन यांनी केलेले डाव्या चळवळीतलं काम, त्यातून त्यांच्यावर झालेले संस्कार, वॅलेजोसारख्या मेक्सिकन भित्ती-चित्रकारांची चित्रं, अशा विविध गोष्टी या चित्रांमागे आहेत. शिवाय त्यात सातत्य, ध्यास आणि इंटिग्रिटी आहे. या सार्‍यातून त्यांची कला साकार होते. वर्षानुवर्षं केलेल्या तपस्येतून त्याला विशिष्ट शैलीची जोड मिळते. त्यातून त्यांचं यश दृग्गोचर होतं.
दुसरं उदाहरण प्रभाकर बरवे आणि कोलतेंचं. या दोघांनी सुरुवातीला पॉल क्ली सदृश चित्रं निर्माण केली. अनेक वर्षं स्वतःच्या चित्रावकाशचा शोध घेतला. त्यासाठी अक्षरशः गुदमरवून टाकणार्‍या सरकारी नोकर्‍या केल्या. छोट्याशा कुठल्या तरी चाळीत वसलेल्या स्टुडिओतून काम केलं. पण त्याचबरोबर साहित्य, कला, नाटक -सर्व क्षेत्रांतल्या मंडळींशी संवाद चालू ठेवला. दोघंही कविता करत, गद्य लेखन करत, ज्यातून त्यांनी चित्राविषयीचा स्वतःचा विचार टोकदार करत नेला. या चित्रकारांच्या यशाचा इतर मराठी चित्रकारांनी कधी विचार केला का?
मराठी चित्रकार जे.जे. किंवा तत्सम महाविद्यालयातून बाहेर येतात तेव्हा त्यांचा पहिला विचार असतो तो सर्व्हायवलचा. त्यामुळे पहिलं काम तो करतो ते पूर्णपणे व्यावसायिक. शिल्पकार असेल तर चित्रपटांच्या सेट्सच्या रचनेत सहभागी होतो. चित्रकारांनी पोर्ट्रेट, इंटेरियर, क्वचित जाहिरात संस्थांत रेखाटनकार म्हणून काम करणं हे प्राधान्य असतं. अर्थात यात चुकीचं काही नाही. पण तो त्याच्यातली चित्रकलेची आस टिकवून ठेवतो का, असा प्रश्न आहे. तो गॅलरी बुक करुन टाकतो. आणि मग प्रदर्शनाची तारीख मिळाली की आपलं वाटणारं चित्र तयार करु लागतो. २-३ महिन्यांत, कधी एका महिन्यात.
उलट काही जण चित्रं करत राहतात. नोकरीधंदा काही करत नाहीत. थोडीफार चित्रं विकली जातात. एखाद्या चित्राचं कौतुक होतं. तो त्याच प्रकारची चित्रं करु लागतो. सकृतदर्शनी असं दिसतं की तो चित्र सातत्याने काढतोय. पण तो केवळ कलाबाजारासाठी निर्मिती करत असतो. तिसरा वर्ग सातत्याने पूर्णवेळ चित्रकार राहून स्वतःचा मार्ग शोधणारा. ललित कला विजेते संजय सावंत, वैशाली नारकर, ते आजच्या श्रेयस कर्वे, हेमाली भूता, पराग तांडेल, शिल्पकार आरती तेरदाळकर... अनेक उदाहरणं यात देता येतील. चित्रकार शार्दुल कदम आणि देवदत्त पाडेकर हे याच पिढीचे, पण यथार्थ कलेची परंपरा चालवणारे. त्यांचं चित्रकौशल्य डोळे दिपवतं. पण ती चित्रं बायेनालेसारख्या प्रतिष्ठित प्रदर्शनात कधी लागणार नाहीत हेही खरं.
चित्रकारांची नवी पिढी आश्वासक आहे. सुनील गावडे, सुनील पडवळ, अनंत जोशी यांच्या मधल्या पिढीपासून ते आताच्या मराठी चित्रकारांपर्यंत. मग त्यात सातत्याने चित्रविचारावर भर देणारे प्रसन्न घैसास, हंसोज्ञय तांबे यांसारखे चित्रकारही आले किंवा शिक्षणक्षेत्रात पूर्णपणे वेगळा विचार करणारा नितीन कुलकर्णीसारखा चित्रकार कवी असेल, चित्रकलेतील भविष्याच्या चित्रात मराठी चित्रकारांचा मोठा प्रभाव असेल असं दिसतं. आज मात्र तो ढासळल्यासारखा दिसतोय.
बडोदा महिला कलेच्या इतिहासाचं पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीने सांगितलं की इथल्या चित्रकारांना रेखाटनही येत नाही. उलट जे.जे.च्या विद्यार्थ्यांचा स्केचिंगपासून पोर्ट्रेटपर्यंत हात तयार असतो. जे.जे. मधून अदवी घेऊन पदव्युत्तर शिक्षण बडोद्यात घेतलं तर बर्‍याच गोष्टी नीट होतात. वर दिलेल्या यादीत तीनचार जण या पद्धतीनं करियर केलेले आहेत. थोडक्यात परंपरा आणि अहंकार विसरुन जे.जे.त, पर्यायाने त्यातून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी थोडं बडोद्याकडे पाहिलं पाहिजे, त्याहीपेक्षा जगाकडे पहायला हवं.
आजच्या काळात साधं जाहिरात एजन्सीत काम करायचं तरी तुम्हाला बिथोवन, मोझार्टच्या सिंफनीज, माजिद माजदीचा सिनेमा, इंडी फिल्म, व्यवस्थापन (स्टीवन कोवींचा बालबोध), व्यंगचित्रकला, विनोद, वाचन्-अनेक गोष्टी लागतात. बाऊहाऊसपासून उत्तर आधुनिक चित्रकार, विचारवंत यांनी चित्रकलेच्या चिंतनाचं प्रचंड साहित्य निर्माण केलेलं आहे. पण दुर्दैवाने मराठी चित्रकारांनी 'माइंड्स आय' सारखं पॉल क्लीचं पुस्तकही पाहिलेलं नसतं. वाचन दूरच. सत्यजित रेचाही सिनेमा पाहिलेला नसतो. मुंबईसारख्या ठिकाणी राहूनही ते (अनेकदा मोफत असलेल्या) वेस्टर्न क्लासिकलच्या मैफिलींनाही दिसत नाहीत किंवा एनसीपीएतल्या मोफत रिडिंग रुमध्येही. अशा स्थितीत त्यांच्याकडून निर्माण होणार्‍या कलेत जागतिक किंवा सार्वत्रिक आशय कसा येऊ शकेल? म्हणूनच स्वतःला समृद्ध करणं आणि ज्येष्ठ तसंच जागतिक चित्रकारांचं काम डोळसपणे पाहणं ही एक किल्ली असू शकेल. "

तुम्ही मराठी चित्रकार असाल, किंवा नसालही.. पण तुमची यावरची मतं जाणून घ्यायला नक्की आवडेल.


शर्मिला फडके

Monday, November 22, 2010

माझं आवडतं पेंटिंग- एक


कला रसास्वाद म्हणजे नक्की काय? चित्र कसं बघावं, आपल्याला जे कळलय ते बरोबर आहे की नाही हे भल्या भल्यांनाही उलगडत नाही आणि मग चित्रकलेबद्दल जवळीक वाटूनही दुरावा रहातो. चित्रकार अथवा चित्रकला समीक्षक नसलेल्यांच्या बाबतीत तर कला रसास्वाद हा उगीचच फार गहन प्रश्न बनून रहातो. तसं होऊ नये म्हणून 'चिन्ह' तर्फे आम्ही काही चित्रकारांना, चित्रकलेच्या जाणकारांना त्यांच्या आवडत्या पेंटिंगबद्दल, त्यांच्यावर प्रभाव टाकणार्‍या त्यातल्या घटकांबद्दल आणि त्या चित्रकाराच्या वैशिष्ट्यांबद्दल.. एकंदरीतच आपल्या आवडत्या पेंटिंगबद्दल मनात उमटणार्‍या सर्व विचारांना 'चिन्ह' ब्लॉगसाठी शब्दबद्ध करायला सुचवलं. त्यांनी ते आनंदानी मान्य केलं. 


चित्रकार प्रभकार कोलतेंच्या आवडलेल्या पेंटिंगविषयी चित्रकार जयंत जोशींनी चित्राइतक्याच तरलतेने मांडलेले आपले विचार-


कोलते,untitled -




"निसर्गात,साहित्य-सृष्टीत प्रत्येक कल्पनेची जुळी किंवा समांतर उदाहरणे सापडतात.
या कल्पना,त्यांच्या चेतनांचे जनुकीय स्त्रोत आणि त्यांचे वर्गीकरण हे दृश्यमाध्यमातून जितके प्रभावीरित्या व्यक्त होईल तेवढे कशातूनही होणार नाही. शोधणार्‍यालाच नवी रूपे,नवे ध्वनी,चवी सापडत जातात.
हे सर्व अधिक त्यांचे रूप-मेळ,आपसातले संकर अलग अलग प्रमाणात, वेग वेगळ्या लयीत आस्वादले तर त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व निश्चित करण्यासाठी नव्या संज्ञा शोधाव्या लागतात.
चित्रकार प्रभाकर कोलते यांची चित्रे म्हणजे त्यांनी शोधलेल्या आणि त्यांनी अनुभवलेल्या या नव्या भाव-प्रदेशाच्या संज्ञा आहेत.
या संज्ञांचे वर्णन फक्त कोलत्यांच्या प्रत्यक्ष चित्र-दर्शनानेच होऊ शकेल.
असे वाटते की परिपक्वता,एकाग्रता आणि बुद्धी-प्रामाण्याच्या अनेक कसोट्या आणि प्रयोग त्यांनी कॅनव्हासवर केले असतील आणि त्यातल्या "भावना" नावाच्या द्रव्याची वाफ झाल्यावर, निव्वळ चेतनेने उरलेल्या प्रगट अवशेष-चिन्हांची अनियमितता नियंत्रित केली असेल...
खरे म्हणजे या सेरीज मधली सर्वच चित्रे एका वेळी बघायला हवीत.
गाण्यासारखी चित्रकला अंशतः जरी तुमच्या जीवनात झिरपली असेल तर काही वेळाने हे चित्र तुमच्याशी बोलू लागेल.
नाहीतर नाही.
केवळ drawing रूम किंवा ऑफिसची शोभा बनून फर्निचरचा भाग
होऊन राहणार्‍या चित्रांच्या जातीतले हे painting नाही.
या पेंटिंगची जादू सहवासाने तुमच्याशी नक्की संवाद साधते.
कधी आपण कुणा मोठ्या व्यक्तीच्या  सान्निध्यात असल्यावर एका अदृश्य तेजोवलयाचा भास होत राहतो,तसेच या चित्राच्या बरोबर असताना वाटते.
एखाद्या उत्कृष्ट मैफलीचा impact तुमच्यावर काय होतो?तुम्ही निर्विचार आणि स्तब्ध होता.
हे पेंटिंग आणि त्या सेरीजमधली बाकीची चित्रे बघून माझे तसे झाले.
अजूनही होते."

-
Jayant B.Joshi.
'Kalashree'
36 Laxmi Park Colony
Pune 411 030.

'माझं आवडतं पेंटिंग' मधे सर्वात पहिल्यांदा लिहिणारे ज्येष्ठ चित्रकार श्री.जयंत जोशी  गेली जवळपास ३५ वर्षे चित्रकलेच्या किंवा एकंदरच कलेच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत.  मुख्यत्वे ऑइल, अ‍ॅक्रिलिक, पेस्टल्स अशा माध्यमांतून संवेदनशील पेंटिंग करणार्‍या जयंत जोशींची इथे औपचारिक ओळख करुन देताना जेव्हा त्यांच्या कलाकारकिर्दीवर नजर टाकली तेव्हा ते एक यशस्वी चित्रकार आहेत आणि त्यांच्या चित्रांची अनेक स्वतंत्र प्रदर्शने पुणे, मुंबई आणि इतर शहरांमधे सातत्याने भरत असतात, ती गाजतात, चित्रविक्री यशस्वीपणे होते या गोष्टी नजरेत भरल्याही आणि त्या महत्वाच्याही आहेत अर्थातच पण त्याबद्दल सविस्तरपणे इथे सांगण्यापेक्षा मला महत्वाची वाटत आहे त्यांची अगदी सुरुवातीपासून ते आजतागायत सुरु असलेली कलेच्या सर्व प्रांतामधली मुक्त मुशाफिरी. पं. भीमसेन जोशींचे चिरंजीव या नात्याने संगीत तर त्यांच्या जीवनालाच व्यापून आहे पण त्यासोबत साहित्य, नाट्य, सिनेमा (उंबरठा-सुबहचे कलादिग्दर्शन), जाहीरात (घाशीराम कोतवालची जाहिरात संकल्पना आणि प्रसिद्धी), स्टील आणि डिजिटल फोटोग्राफी, कॉम्प्यूटर ग्राफिक्स अशा कलांमधे जयंत जोशी एकीकडे पेंटिंग सुरु असतानाच रमत राहिले, कलेबद्दल सातत्याने विचार करत राहीले, शोध घेत पुढच्या टप्प्यांवर जात राहीले. कलाप्रांतामधे वावरत असतानाच सामाजिक-वैचारिक संघर्षातून कलेच्या जीवनातील स्थानासंदर्भात काही उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करत राहीले. आणि या सार्‍याचे प्रतिबिंब तितक्याच संवेदनशीलतेने त्यांच्या चित्रांमधून उमटत राहीले ही गोष्ट जास्त महत्वाची. त्यांचे 'फेअरी ऑन द व्हीलचेअर' हे एकच चित्र जरी पाहीले तरी ही गोष्ट पुरेशी स्पष्ट होईल. 


'माझं आवडतं पेंटिंग' मधे कदाचित तुम्हालाही तुमच्या आवडत्या चित्राबद्दल आणि चित्रकारांबद्दलही लिहावेसे वाटेल किंवा तुमच्या स्वतःच्या पेंटिंगबद्दल तुम्हाला लिहावेसे वाटेल तर त्याचे मनःपूर्वक स्वागत आहे. आपल्या आवडत्या पेंटिंगविषयीचे तुमचे विचार त्या पेंटिंगच्या इमेजसहीत आम्हाला मेल करा.
शर्मिला फडके

Tuesday, November 16, 2010

याला म्हणतात स्वतःवरच लादलेली सेन्सॉरशिप.

आधी



नंतर

यावर्षीच्या दिवाळी अंकांमधे चित्रकलेवर कायकाय येतय याची माहिती 'चिन्ह' ब्लॉगसाठी मिळवताना 'मुक्त शब्द' दिवाळी अंकाचे संपादक श्री. येशू पाटील यांनी यावर्षी कव्हरवर चित्रकार आरा यांनी पन्नासच्या दशकात काढलेले आणि त्यातल्या अभिजाततेमुळे गाजलेले एक फिमेल न्यूड आम्ही छापत आहोत आणि अंकाच्या आतमधे चित्रकार प्रभाकर कोलते यांचा चित्राचे रसग्रहण करणारा लेखही आहे असे सांगितले होते. चित्रकार कृष्णाजी आरा हे भारतातील आधुनिक चित्रकार ज्यांनी फिमेल न्यूड हा विषय घेऊन त्यावर पद्धतशीरपणे,बारकाईने आणि नॅचरलिझमच्या मर्यादेत राहून चित्रमालिका केली.
आनंद आणि उत्सुकता दोन्ही मनात घेऊन 'मुक्त शब्द' २०१० चा दिवाळी अंक उचलला.
अंक उचलला आणि धक्काच बसला.
अंकाच्या मूळ आरांचे चित्र असलेल्या कव्हरवर आता 'मुक्तशब्द'च्या आधीच्या अंकांच्या मुखपृष्ठांची चित्रं छापून 'आजच सभासद व्हा!' असं लिहिलेला एक फ्लॅप बेंगरुळपणानं चिकटवलेला. असं का? ही सेन्सॉरशिप कोणी आणि का लादली?
संपादक येशू पाटील यांना विचारलं तेव्हा असं कळलं की  आरांचं चित्र असलेल्या दिवाळी अंकाच्या प्रती आल्या तेव्हा येशू पाटील सपत्नीक औरंगाबादमधे होते. तिथे विक्रीसाठी अंक ठेवल्यावर त्यांच्या पत्नीच्या असं लक्षात आलं की लोक विशेषतः बायका अंक उचलल्यावर कव्हर बघून लगेच बाजूला टाकून देत आहेत. २-३ वेळा असं झालं. ओळखीच्या एक बाई तर म्हणाल्याही की- 'हे काय.. आधी कशी छान छान चित्रं असायची कव्हरवर!'  दरम्यान संपादकांनाही काही दुकानदार, अंक विक्रेत्यांचे कव्हरबद्दल नाराजी व्यक्त करणारे फोन आले होते. ग्राहकांना सांभाळून घ्यायला हवं, घरी बायका-मुले असल्याने असं चित्र असलेला दिवाळी अंक घरी न्यायची त्यांची पंचाईत होईल या 'सद्हेतूनं ' मग येशू पाटलांनी त्या चित्राला झाकून टाकण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले- 'चित्र आत कुठंही असलं तर हरकत नाही (तशी आम्ही आमच्या आधीच्या अंकात छापलीही आहेत) पण कव्हरवर असं चित्र छापून चूकच झाली आमची ती सुधारायला हवी असं वाटलं.'
- मग आरांच्या त्या समुद्र किनारी चिंतनमग्न स्वरुपात पाठमोर्‍या बसलेल्या स्त्री च्या नग्न चित्रावर पडदा पडला.
समाजातल्या नैतिक दडपणांना बळी पडून चित्रातली नग्नता नंतर झाकून टाकण्याची झालेली अशी धडपड अर्थातच काही नवी नाही. सोळाव्या शतकात कर्मठ रोमन धर्मगुरुंनी मायकेल अ‍ॅन्जेलोच्या 'द लास्ट जजमेन्ट' मधल्या नग्नतेला अंजिराच्या पानांच्या डहाळ्यांनी झाकून टाकून चर्चचे पवित्र वातावरण अबाधित राखण्याची धडपड केली. पुढची अनेक शतकं ही मोहीम चालूच राहिली. 'द फिग लिफ' या नावाने कलेच्या क्षेत्रात बदनाम होत राहिली. आज एकविसाव्या शतकातही अशी अंजिराची पानं चित्रांमधल्या नग्नतेला झाकून टाकण्यासाठी धडपडतच आहेत.

'मुक्त शब्द'च्या आतल्या पानावर आरांच्या या चित्राचे अत्यंत सुंदर रसग्रहण चित्रकार प्रभाकर कोलते यांनी 'स्त्रीच्या पाठीलाही डोळे असतात' या लेखात केलं आहे. चित्राकडे विशेषत: 'न्यूड' कडे कलात्मक दृष्टीनं बघणं म्हणजे नेमकं काय? चित्रकार जेव्हा 'न्यूड' करतो तेव्हा नग्न देह चित्रातून दाखवण्यामागे त्याला कोणत्या भावभावनांचे प्रकटीकरण अभिप्रेत असते हे इतक्या सोप्या शब्दांत या आधी कधीच कोणी उलगडवून दाखवलं नव्हतं . ज्या चित्राबद्दल आपण इतकं भरभरुन लिहितो आहोत त्याला असं 'लपवून' टाकल्यावर कोलतेंना काय वाटलं? एक चित्रकार म्हणूनही त्यांची याबद्दल प्रतिक्रिया काय हे जाणून घेणे महत्वाचे वाटले.
कोलतेंना फोन केला तेव्हा अत्यंत कडक शब्दांमधे त्यांनी याचा निषेध केला. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर- " आरांच्या चित्रावर असा फ्लॅप लावला हे मला नंतर समजलं आणि धक्काच बसला. आरांच्या अभिजात चित्राचा यात अपमान झाला आहे.  लोकांची अभिरुची घडवण्याचे काम संपादक-प्रकाशकांचे आणि तेच चुकीच्या पद्धतीने चित्राकडे बघतात याला काय म्हणायचं? नग्न चित्र म्हणजे त्याकडे केवळ लैंगिकतेच्याच दृष्टीकोनातूनच बघितलं जातं हा समज अजूनही असावा हे दुर्दैव आहेच पण जे निषेध करतील, नाकं मुरडतील त्यांना चित्रांमधल्या नग्नतेकडे कसं बघायला हवं हे पुन्हा एकदा शिकवण्याची ही संधी घ्यायच्या ऐवजी संपादकांनी अशी कच खाल्ली हे जास्त दुर्दैवाचं. बॉलिवुड आणि इतर माध्यमांतून बिभत्सतेचा चाललेला नंगा नाच जो समाज खपवून घेतो त्या समाजाला आरांसारख्या चित्रकाराने काढलेलं न्यूड दिवाळी अंकाच्या कव्हरवर चालत नाही, त्यामुळे अंकाचा दर्जा आणि खप कमी होतो हा त्या समाजाचा ढोंगीपणा आहे.  'मुक्त शब्दचा' हा कसला 'मुक्त'पणा?"
-------------------

प्रभाकर कोलतेंनी लिहिलेल्या आरांच्या या न्यूड चित्राच्या रसग्रहणातील हा एक छोटासा पॅरा- " तिच्या बसण्यातील सहजता आणि थाट आवाहकतेची मर्यादा जपणारा तसेच विवस्त्रतेतही सौंदर्याचा एकही बुरुज ढासळू न देण्याचा तिचा मानस व्यक्त करणारा. अवघ्या जगाकडे तिने केलेली पाठ त्या मानसाचेच बाह्यांग असावे बहुतेक. अशी पाठ फिरवून बसताना तिने साधलेला विशिष्ट 'कोन' म्हणजे पाठीचे सुरक्षित पदरात रुपांतर करण्याचा मंत्रच. असा पदर झालेली पाठ वार्‍यामुळे नव्हे तर आतल्या चैतन्याने थरथरणारी.
स्वतःच्या देहसंपदेवर स्वतःखेरीज इतर कुणाचीही नजर पडणार नाही याची खबरदारी घेत मुक्तीचे दुर्मीळ क्षण एकांतात अनुभवणार्‍या ह्या स्त्रीला चाहूल लागू न देता, चित्रकाराने तिला आणि त्यालाही न अवघडवणारा 'कोन' चित्र रंगवताना साधला असण्याची शक्यता अधिक आहे. ह्या अशा कोनामुळेच जिवंत भिंतीपलीकडचे चढ-उतार, भाव-विभाव, भावविवश-कटाक्ष इत्यादी रती-ऐश्वर्याचे मौल्यवान घटक तिच्या पाठीवरच्या ओलेपणात आपल्याला शोधावे लागणार आहेत. आपला हा शोध यशस्वी व्हावा म्हणून चित्रकाराने कलात्मक काळजी घेत घेत ते देहवैभव आपल्या कल्पनाविश्वात भासमान करण्याचा अनवट प्रयत्न केला आहे; परंतु तो करताना त्याने तिची जांभुळसर पाठ हुबेहूब नव्हे तर हळव्या कंपनप्रक्रियेने रंगवून आपल्या वासनेला नव्हे तर सौंदर्यजाणिवेला चाळवले आहे; त्यामुळे ही पाठच त्याने रंगविलेल्या चित्राचा चेहरा झाली आहे. अशा त्या चित्र-चेहर्‍याच्या शोध प्रवासात आपल्याला सहाय्यभूत ठरले आहेत ते; रंग, आकार, पोत, छायाप्रकाश इत्यादी चित्रघटक आणि ते हाताळण्याचे चित्रकाराचे लक्षणीय कसब."
-------------------
१९७२ साली रॉय किणीकरांनी 'आरती' नावाच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर 'न्यूड' फोटोग्राफ छापला होता. स्त्री-देहाचं अर्धवट सौंदर्य छापून वाचकांच्या भावना चाळवण्यापेक्षा स्त्री-देहाच्या पूर्ण सौंदर्याची अभिजात ओळख असा त्यामागे त्यांचा हेतू होता. किणीकरांनी केलेल्या या धाडसावर सत्तरीच्या दशकात सडकून टीका झाली आणि अंकाच्या विक्रीची बोंब झाली असे अनिल किणीकरांनी गेल्या वर्षीच्या 'चिन्ह'मधे लिहिलं होतं. आज तब्बल चाळीस वर्षांनंतर 'शब्द मुक्त' च्या संपादकांना असेच धाडस करायची इच्छा व्हावी पण ऐन वेळी मात्र समाजाची टीका आणि विक्रीचा तोटा याला घाबरुन त्यांना कच खावी लागावी, त्यांनी स्वतःहून स्वतःवर सेन्सॉरशिप लादून घ्यावी?
यात नक्की काय आणि कुठे चुकते आहे?
कलेबद्दल आस्था असणार्‍या प्रत्येकाकडून यावर प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

----------------------------------------------------------------------------------------------
शर्मिला फडके

Wednesday, November 10, 2010

सिस्फा आणि चित्रकलेचे चांदणे

चित्रकाराने चित्र काढणे आणि तो ते काढत असताना इतरांनी बघणे हा एक आनंदसोहळाच असतो. चित्रकारांना एकत्रित करुन असे सोहळे सतत साजरे करण्याची आवड असणार्‍यांपैकी एक आहेत नागपूरच्या सेन्ट्रल ईंडिया स्कूल ऑफ फाईन आर्ट्स म्हणजेच 'सिस्फा' (CISFA) चे अधिष्ठाता श्री. चंद्रकांत चन्ने. विदर्भातल्या लहानमोठ्या चित्रकारांना एकत्र आणून त्यांची निवासी शिबिरे, कार्यशाळा आणि इतर काही ना काही स्वरुपाचे कार्यक्रम ते उत्साहात भरवत असतात आणि तेही अभिनव पद्धतीने.
गेल्या महिन्यातच कोजागिरीच्या निमित्ताने सिस्फातर्फे विदर्भातल्या चित्रकारांचे एक वर्कशॉप झाले. चित्रकारांना कॅनव्हास, रंग वगैरे साहित्य दिले गेले. चित्रकारांनी संध्याकाळी ७ पासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोजागिरीच्या चांदण्यात फक्त चित्रं काढायची... कोजागिरी चित्रकला शिबिराची ही कल्पनाच किती रोमॅन्टिक! 
या कोजागिरी शिबिरामधे १२० चित्रकार सहभागी झाले आणि त्यांचा वयोगट होता २० ते १०० वर्षे.  नानासाहेब गोखले नावाचे ९९ वर्षांचे चित्रकार कोजागिरीच्या या चित्रकलाउत्सवात सहभागी होण्याकरता नागपूरपासून १०० किमी.वर असलेल्या दरियापूराहून आले हे तर ग्रेटच!


या शतायुषी ज्येष्ठ चित्रकाराने कोजागिरी शिबिरात काढलेली ही चित्रे-






या शिबिराची अनेक छायाचित्रे चन्ने सरांनी खास चिन्ह ब्लॉगकरता पाठवली आहेत.

अशी शिबिरे भरवण्यातून निष्पन्न काय झाले असं काही जण विचारतील तर ते अर्थातच महत्वाचे नाही. २० वर्षांपासून १०० वर्षांपर्यंतच्या लहानथोर चित्रकारांनी रात्रभर एकत्रितपणे कोजागिरीच्या चांदण्यात चित्रं काढण्याचा आनंद लुटला हे महत्वाचे.

सिस्फातर्फे अजून एक विदर्भस्तरीय बालकला निवासी शिबीर (९ नोव्हें. ते १४ नोव्हें.) बसोली ग्रूप आणि मुंडले पब्लिक स्कूल, नागपूर येथे भरवले जाणार आहे. त्याची आमंत्रण पत्रिकाही अभिनव आहे.


चित्रकला हा एक संस्कार आहे आणि त्याची रुजवण इतर चांगल्या संस्कारांप्रमाणेच जितक्या लहान वयात होईल तितके चांगले हे चन्ने सरांनी नुसते ओळखले नाही तर ते तशी रुजवण करण्याकरता अशा तर्‍हेने सतत सक्रीय आहेत हेही फार महत्वाचे.






शर्मिला फडके

Saturday, October 30, 2010

चित्रकारांची 'लोकप्रियता'

जाहिरातींमधून आपण झाकिर हुसेनला, शेफ संजीव कपूरला, सानिया मिर्झाला, विश्वनाथ आनंदला, अगदी हर्षा भोगले, जावेद अख्तरलाही अमुकच एक गोष्ट विकत घ्या नाहीतर वापरुन बघा असा सल्ला देताना, प्रेमळ आग्रह करताना य वेळेला ऐकलय.
एखाद्या चित्रकाराला कधी जाहिरातींमधे पाहिलंय? एखादा चित्रकार ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून झालेला कधी पाहिलाय?
नाही नां?
 जाहिरातदार कधी चित्रकार या जमातीकडे फिरकलेच नाहीत, फिरकणारही नाहीत.. कां असं? तरुण व्हिज्युअल फाईन आर्टिस्ट हेमंत सोनावणे त्याच्या ब्लॉगवर ही जी खंत व्यक्त करतोय नव्हे तक्रारच करतोय ती मुळातूनच वाचण्यासारखी आहे. 

चित्रकलेकडे एक कला म्हणून समाजातले तुम्ही आम्ही (जे चित्रकार नाहीत आणि चित्रकलासमीक्षकही नाहीत) कसे बघत असतो, तिच्याबद्दल नक्की किती आस्था बाळगतो?  म्हणजे काय तर चित्रकलेला एकदा अभिजात कलेचा दर्जा देऊन झाला की मग चित्रकला आणि चित्रकार यांच्याविषयी काही बोलणं, वाचणं, विचार करणं, चर्चा करणं हे काम समाजातल्या काही मुठभरांचे किंवा समीक्षकांचे किंवा खुद्द चित्रकलेचे शिक्षण घेतलेल्यांचेच. असा एक ठाम विचार आपल्या आजूबाजूच्या आपण धरुन दहा पैकी आठ जणांचा असतोच असतो. बाकी आम्ही काळा घोडाला जातो (तिथे विकायला असलेल्या आर्टी वस्तू मस्त दिसतात शोकेसमधे), चित्रही बघतो ( दिवाळी अंकांमधली), शिवाय हुसेनही माहीत आहे. चित्रकलेबद्दल बाकी पेपरमधे काहीबाही ( एका कोपर्‍यात ) लिहून येतं ते वाचतो, जहांगीरलाही जातो कधी एखादं प्रदर्शन गाजलं तर. पण तिथे लावलेल्या चित्रांमधलं नक्की काय बघायचं  ते नाही बुवा नीट कळत (आणि त्या प्रदर्शनांबद्दल पेपरांमधे 'समीक्षा' छापून येते ती तर अजिबातच नाही कळत). बाकी एकंदर कलेबिलेत रस असतोच. झाकिरचा तबला ऐकतो (वाह ताज.. मधे), बिस्मिल्लांची शहनाई कितीतरीवेळा ( दूरदर्शनवर दाखवतात तेव्हां) ऐकलेली आहे. खतम.
पण सुट्टीच्या दिवशी मल्टिप्लेक्सला हजारभर रुपये खर्चून सलमानचा दबांग पहायला किंवा मॉलमधे असंच भटकून फूडकोर्टात इटालियन्-मेक्सिकन खाऊन मुलांबरोबर सुट्टी एन्जॉय करणार्‍या आपल्यापैकी किती जणांच्या मनात येतं की चला आज मुलांना आर्ट गॅलरीत नेऊन आणूया. किंवा या वर्षी दिवाळीला सिल्कसाडी, हिर्‍यांच्या कुड्या न घेता एखादं तैलचित्र विकत घेऊया. चित्र विकत घेणारा ग्राहकच सर्वसामान्य मध्यमवर्गीयांमधे नाहीये.  मध्यमवर्गीयांमधे काय लोकप्रिय आहे, कोण लोकप्रिय आहे याचं परीक्षण फार काळजीपूर्वक करणार्‍या जाहिरातदारांना त्यामुळेच मग कधी 'चित्रकार' या जमातीला आपल्या जाहिरातीमधून वस्तू खपविण्यासाठी आणावसं वाटत नाही. पुढे वाटू शकेल कां हे अवलंबून आहे तुम्हा आम्हावर.
तुम्ही आम्ही जाणीवपूर्वक कलेची जाण किती वाढवू शकतोय त्यावर.
ती वाढायला हवीय याची गरज तुम्हा आम्हाला वाटतेय कां यावरही.


शर्मिला फडके

Wednesday, October 27, 2010

कल्पनेहून अधिक अद्भूत असते वास्तव!... 'कुहू'

चित्रकला आवडते, गाणी ऐकायला आवडतात, अ‍ॅनिमेशन्स बघायला आवडतात, कॅलिग्राफी मोहात पाडते आणि शब्दांवर तर प्रेमच आहे.. आणि हे सगळं एकत्रित अनुभवायचय.. रंग, सूर, शब्द, चित्र या सार्‍या संवेदनांना एकाचवेळी सुखावायचय..
पुस्तक वाचायचय आणि बघत ऐकायचय सुद्धा..
खरंच?
हे शक्य आहे.
कल्पनेहून अधिक अद्भूत असते वास्तव!
परवा रविंद्र नाट्य मंदिरात जेव्हा कविता महाजनांच्या 'कुहू' या पहिल्या भारतीय मल्टिमिडिया कादंबरीचा प्रोमो पाहिला.. किंवा असं म्हणूयात 'अनुभवला' तेव्हा विश्वास बसला.

दाट, गर्द जंगलांतील हिरव्यागार वृक्षांमधून खोल, खोल आत आपल्याला घेऊन जाणारा कॅमेरा, पार्श्वभूमीवर शास्त्रोक्त रागदारीवरील सुरेल स्वर, मग फांद्यांच्या दुबेळक्यात आपले कृष्णनिळे पंख घेउन विसावलेल्या एका सुंदर पक्षाचे तैलचित्र.. त्याच्या तोंडून बाहेर पडणार्‍या लकेरी घेताहेत लयबद्ध शब्दरुप.. खालच्या गवतावर नृत्यमग्न सारस युगुलाची जोडी स्वतःतच मग्न आहे..
काय आहे हे?
हा कोणता डिस्नेचा अडिचशे-तिनशे कोटी बजेटचा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट नाही तर कविता महाजनांची आगामी कादंबरी आहे.
पहिली भारतीय मल्टिमीडिया कादंबरी 'कुहू'

कादंबरीचा जेमतेम ५० सेकंदांचा हा प्रोमो पाहून झाल्यावर त्यातले पेंटिंग आठवत रहाते, गाणं मनात रुंजी घालतं, कुहूच सुरेल शीळ मनात घुमते, नृत्यमग्न सारस पक्षांचा व्हिडिओ नजरेसमोरुन हटत नाही.. मल्टिमीडिया तंत्रज्ञान आपला प्रभाव दाखवत रहाते.
कुहूमधे कविताने स्वतः काढलेली ४०-४५ ऑईल पेंटिंग्ज आहेत, आरती अंकलीकरांनी स्वरबद्ध केलेली शास्त्रोक्त रागदारीवर आधारीत सुरेल गाणी आहेत, पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज आहेत, नृत्यमग्न सारस पक्षांचा दुर्मिळ, विलोभनीय व्हिडिओ आहे.. अशा दृश्यांचे इतरही व्हिडिओज आहेत, दत्तराज दुसानेंची अर्थाला लपेटून असलेली लयबद्ध कॅलिग्राफी आहे, समीर सहस्त्रबुद्धेंची अ‍ॅनिमेशन्स आहेत.. या इतक्या सार्‍या दृश्यकला असणार्‍या प्रोजेक्टला 'पुस्तक' कां म्हणायचे?
कविताचे उत्तर सहज साधे आणि पटणारे आहे. पुस्तक म्हणायचे कारण यात 'शब्द' सर्वाधिक महत्वाचे, पायाभूत आहेत. शब्दांना जास्त तीव्र बनवण्याचं काम इथे इतर कला करतात. शब्द येताना आपले रुप, रंग, नाद, लयाची अंगभुत संवेदना सोबत घेऊनच या कथानकात येतात.
म्हणूनच कुहूच्या संचात डिव्हिडी सोबत पुस्तकही आहेच. अर्थात हे पुस्तक असेल संपूर्ण रंगीत, आर्ट पेपरवर छापलेले आणि ३-डी मुखपृष्ठ असलेले.

कुहू कादंबरीमधे शब्दांव्यतिरिक्त ही इतकी सगळी माध्यमे कविताला नक्की कां वापराविशी वाटली? कवितामधला चित्रकार कादंबरीलेखनामधे तैलचित्रांचा वापर करु इच्छिते हे समजण्यासारखं आहेही.. पण हे अ‍ॅनिमेशन, संगीत, व्हिडिओज, कॅलिग्राफी..? शब्दमाध्यमांना या बाकी दृश्यमाध्यमांची इतकी जोड? शब्दांची ताकद कमी पडते?
कथानक जन्माला आलं तेच या सार्‍या माध्यमांना आपल्यात सामावून घेत. कविता सांगते-
कुहूची गोष्ट सुरु झाली ती एक रुपक कथा मनात आल्यामुळे. कुहू हा गाणारा पक्षी. जंगलात रहाणारा. आपल्या गाण्याने त्याला सारं जग सुंदर करुन टाकायचं आहे. एकदा त्या जंगलात मानवाच्या वसाहतीतून काहीजण येतात. जंगलातील पर्यावरणाचा अभ्यास करायला आलेली काही मुलं आणि मुली. कुहू त्यातल्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. आणि मग प्रेमात पडल्यावर जे काही करावसं वाटतं ते सारं तो करायला जातो.. माणसाची भाषा त्याला शिकायची आहे, माणसांचा स्वभाव जाणून घ्यायचाय.. या सगळ्यात निसर्गाच्या आणि माणसांच्या जगात खळबळ माजते.. गोष्ट पुढे सरकत रहाते.. विविध दृश्य माध्यमं आपोआप एकमेकांमधे गुंतत रहातात.. त्यांचं एकत्रित एक माध्यम बनतं. हे कुहूचं जग आहे. ते अनुभवयालच हवं.

कुहूच्या निमित्ताने मराठीमधे अजूनपर्यंत कधीही कोणी न केलेले प्रयत्न राबविले जात तर आहेतच, पण भारतीय साहित्यात एक नवी, आधुनिक वाट निर्माण होते आहे. कुहूची बाल-आवृत्तीही प्रकाशित होणार आहे. मल्टिमिडियाला सरावलेल्या नव्या पिढीला मराठी ऐकताना समजते, बोलताही येते पण देवनागरी लिपीतली मराठी वाचायचा त्यांना कंटाळा असतो, जमत नाही आणि त्यामुळे मराठी साहित्यापासून ही पिढी दुरावते आहे. कुहू सारख्या ऐकता ऐकता बघायचा 'पुस्तका'मुळे हा दुरावा निश्चितच कमी होईल याची कविताला खात्री वाटते.

ऑडिओ बुक्स किंवा इ-बुक्स मधे मोनोटोनी हा एक मोठा दोष असल्याने साहित्यप्रेमी वाचकांनी त्यांना फारसे स्वीकारले नाही. कुहू मात्र मल्टिमिडिया कादंबरी आहे. तास न तास कम्प्युटरच्या स्क्रीनसमोर खिळवून ठेवण्याची ताकद मल्टिमिडिया तंत्रज्ञानामधे असते याचा अनुभव आपण रोजच्या रोज घेत असतो.
कविता महाजनांची ब्र, भिन्न, ग्राफिटी वॉलसारखी वेगळ्या धाटणीची आणि सशक्त कथानकांची पुस्तके ज्यांनी वाचलेली आहेत त्यांना कुहूच्या साहित्यिक मूल्यांबद्दल खात्री बाळगायला काहीच हरकत नाही.

कुहूचा हा सारा नियोजित प्रकल्प प्रत्यक्षात आणणे हे खर्चिक काम यात काहीच शंका नाही. सारस्वत बँकेने या प्रकल्पासाठी कविताला शून्य व्याजदराने कर्ज दिले. आणि त्यासाठी तारण आहे 'बौद्धिक मालमत्ता'. मल्टिमीडिया कादंबरीची ही अद्भूत 'कल्पना' वास्तवात आणण्यासाठी लेखकाची बौद्धिक मालमत्ता गहाण ठेऊन घेऊन कर्ज मंजूर करण्याचा सारस्वत बँकेचा हा प्रयोगही पहिलाच.
यातून कलावंत, क्रिएटिव्ह लोकांसाठी भविष्यात किती असंख्य दरवाजे उघडू शकतात! कुहूचे महत्व यासाठीही.

कुहू इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधे येत्या डिसेंबरला बाजारात येईल.
कुहूच्या संचात एक पुस्तक आणि एक डिव्हिडी असेल. त्याची किंमत आहे रु.१५००/-
कुहूच्या बाल-आवृत्तीची किंमत आहे रु.१०००/-
कुहूच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंगची सोय आहे. तिथे आवृत्ती आगामी नोंदवल्यास सवलतीच्या दरात २५ % कमी किंमतीत हे कुहूचे संच मिळतील.


शर्मिला फडके

Friday, October 22, 2010

चित्रकलेची 'दिवाळी'- दोन

कालनिर्णय-सांस्कृतिक २०१० मधे साधना बहुळकरांनी १८व्या शतकातल्या पॅरिसमधल्या चार स्त्री इम्प्रेशनिस्ट चित्रकारांवर लेख लिहिला आहे. युरोपमधली पुरुषप्रधान संस्कृती ऐन भरामधे असतानाच्या या काळात या चित्रकार स्त्रियांच्या शैलीवर, रचनेवर त्याचे कोणते परिणाम झाले आणि याला सुसंगत अमृता शेरगिलच्या चित्रकला शैलीचा आढावा या लेखामधे घेतलेला असेल.
श्री दीपलक्ष्मी मधे रविप्रकाश कुलकर्णी लिहित आहेत 'तीन दिग्गज' नावाचा लेख. ५० वर्षांपूर्वी ललित पुस्तकांची मुखपृष्ठेच नव्हे तर आतील पानांवरही हास्यचित्रांची पेरणी करुन पान न पान वाचनीय करणारे हे दिग्गज आहेत वसंत सरवटे, शि.द.फडणीस आणि बाळ ठाकरे.
हंसमधे 'स्टुडिओ नसलेला चित्रकार' हा चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्यावर लिहिलेला लेख असेल.

कदंबमधे दीपक घारेंनी संगणकपूर्व काळात हाताने चित्र काढणारे चित्रकार आणि संगणकमय अशा आताच्या कालातले चित्रकार यांच्यावर चित्रकलेच्या कौशल्याच्या दृष्टीने तुलनात्मक लेख लिहिला आहे. डिजिटल चित्रकारीतेच्या या युगात चित्रकला कौशल्यापेक्षा चित्रांमधील आयोजन आणि मांडणशिल्पांना येत गेलेले महत्व यावर दीपक घारेंचे विवेचन नक्कीच वाचनीय असणार.

इंटरनेटवर गेली दहा वर्षे नियमित प्रसिद्ध होत असलेल्या मायबोली या संकेतस्थळाच्या ऑनलाइन हितगुज दिवाळी अंकाने तर यावर्षी 'कला आणि जाणीवा' अशा संकल्पनेवर आधारीत एक स्वतंत्र विभागच आपल्या अंकामधे समाविष्ट केला आहे. मायबोलीच्या जगभरातील लाखो मराठी वाचकांच्या कलाजाणीवांच्या अभिरुचीमधे संपन्न भर घालणारा हा विभाग असेल यात शंकाच नाही.

आता सर्वात महत्वाचं: आपलं महानगर मधला शशिकांत सावंत यांचा 'असे कसे हे मराठी चित्रकार?'  या लेखात सावंत म्हणतात मराठी चित्रकार पाश्चात्य चित्रकारांच्या तुलनेत मागे पडतात कारण इंग्रजी भाषेला आणि इंग्रजी वातावरणाला ते अजूनही बुजतात आणि त्यांच्या चित्रकलेत सैद्धांतिकाचा अभाव आहे. आंतरराष्ट्रीय कलाप्रवाहांना सुसंगत कला विकसित करण्याचा प्रयत्न केलेले मराठी चित्रकार हातांच्या बोटांवर मोजता येण्यासारखे आणि सध्याच्या काळात तर नाहीतच. उत्तर आधुनिक कला साधण्यासाठी ही कला समजून घेतली पाहीजे. त्यावरची पुस्तकं वाचली पाहीजेत. अतुल दोडिया, जितिश कल्लाटसारखे चित्रकार हे प्रयत्न करतात.

मराठी चित्रकारांनी यावर आपली मते मांडायला हवीत तरच खरे चित्र उलगडेल.

मॅजेस्टिक तर्फे दिवाळी अंकांचे संच वाचकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देणार्‍या वेगवेगळ्या योजना या सुमारास जाहीर होतात. त्यापैकी " ८०० रुपयांचा संच फक्त ५८० रुपयांत मौज,दीपावली,अक्षर्,कालनिर्णय-सांस्कृतिक,महाराष्ट्र टाइम्स, अनुभव" ही चित्ररसिकांच्या दृष्टीने चांगली योजना वाटली. या सोबत चार पुस्तकांपैकी एक पुस्तक मोफत मिळण्याची सवलत आहे. या चार पुस्तकांमधे एक "माझी स्मरणचित्रे" लेखिका अंबिका महादेव धुरंधर आहे. औंध संस्थानात गेलेल्या आपल्या बालपणाविषयीच्या अंबिका धुरंधरांच्या आठवणी वाचायला मिळणे म्हणजे या दिवाळीतली चित्रकलेची खरीच पर्वणी. 'चिन्ह' वाचकांच्या सोयीसाठी-
 मॅजेस्टिकच्या या संचाची नोंदणी कुठे करता येऊ शकेल याचे तपशील असे-
मॅजेस्टिकः गिरगाव- ३३८८२२४४, ठाणे- २५३७६८६५
मॅजेस्टिक ग्रंथदालन- शिवाजी मंदिर- ९८९२२ २०२३९
आयडियल पुस्तक त्रिवेणी: दादर- २४३०४२५४
श्रीराम बुक डेपो: ठाणे (प.)- २५४२१७४५/ ९८६९८१६०५०
जवाहर बुक डेपो: पार्ले- २६१४३९०२
शब्द द बुक गॅलरी- बोरिवली- ९८२०१ ४७२८४
प्रेरणा पुस्तकालयः मंत्रालय- ९९८७४ ५१९७४
बुक कॉर्नरः डोंबिवली- २४३३४५२
उत्कर्ष बुक सर्व्हिसः पुणे- २५५३२४७९
मॅजेस्टिक बुक स्टॉलः पुणे- ९९२२३ ४४०८१

मायबोली वर सुद्धा दिवाळी अंक खरेदीची सुंदर योजना आहे. जगभरात कुठेही फ्री शिपिंगची योजना निश्चितच आकर्षक.

अंक कुठूनही घ्या. चित्रकलेची 'दिवाळी' साजरी होणे महत्वाचे!



शर्मिला फडके

Wednesday, October 20, 2010

चित्रकलेची 'दिवाळी'! - एक

दिवाळी अंक आणि चित्रकला यांचं नातं मोठं मजेशीर.
म्हणजे असं की दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठापासून आतल्या पानापानांवर 'चित्रकला' दिसत तर असते पण 'चित्रकलेवर' काय आहे हे शोधायचं झालं तर अंकांची पानच्या पानं उलटावी लागतात. तेव्हा कुठे एखाद दोन मोजके दिवाळी अंक हाताशी लागतात ज्यात चित्रकलेवर, चित्रकारांवर कोणी काही गंभीरपणे लिहिलेलं वाचायला सापडतं. एका अर्थाने चित्रकलेची ही दिवाळखोरीच होत असते दरवर्षी.
यावर्षीच्या म्हणजे २०१०सालातल्या दिवाळीत कोणकोणत्या दिवाळी अंकांमधे चित्रकलेवर काय काय लिहून येतय याचा शोध घेताना जबरदस्त इंटरेस्टींग गोष्टी हाताशी लागल्या. त्या तातडीने इथे द्यायचं ठरवलं कारण मग एकदा का सगळे दिवाळी अंक बाजारात येऊन ठेपले की त्या भाऊगर्दीत चित्रकलेवर खरंच खूप छान असं ज्यांनी आवर्जून लिहिलेलं आहे त्यांच्या कडे दुर्लक्षच व्हायची शक्यता जास्त. तसं होऊ नये म्हणून ही आधीपासूनच घेतलेली नोंद-

दिवाळी अंकांच्या चवडीतून मी सर्वात आधी अंक उचलून घेते तो म्हणजे 'मौज' तेव्हा सुरुवात त्याच्यापासूनच.
मौजेच्या मुखपृष्ठावर आहे अमूर्त चित्रकलेचा जनक म्हणून ज्याला ओळखले जाते त्या वासिली कॅन्डिन्स्कीचे एक पेंटींग.
     
 आतमधे असेल चित्रकार प्रभाकर कोलतेंचा 'वासिली कॅन्डिन्स्की- अमूर्तानुभवाचा आद्यकार' हा कॅन्डिन्स्कीच्या अद्भूत आयुष्याची ओळख करुन देणारा आणि त्याच्या चित्रांचे रसग्रहण करणारा लेख.
कॅन्डिन्स्की म्हणजे स्वतःच्या उत्स्फुर्ततेत बेलाशक वाहत जाणारा कलावंत. कायदा आणि अर्थशास्त्राचा तरुण पदवीधर असणार्‍या कॅन्डिन्स्कीचा चित्रकलेशी काहीही संबंध आलेला नव्हता पण तो इम्प्रेशनीस्ट मोनेचे 'गवताची गंजी' चित्र पहातो काय आणि तडकाफडकी चित्रकार व्हायचा निर्णय घेतो काय इतकेच नव्हे तर कालांतराने जगविख्यात होत जागतिक कलाक्षेत्रातला ऐतिहासिक 'मानदंड' ठरतो काय.. सारेच अद्भूत. कोलतेंच्या सहजसाध्या शैलीत कॅन्डिन्स्कीबद्दल वाचणे हा चित्रकला रसिकांसाठी निश्चितच छान अनुभव ठरणार.
'मौज' मधे चित्रकलेवर फक्त इतकंच नाही तर व्हॅन गॉगच्या शेवटच्या दिवसांवर आधारीत जयंत गुणे यांचा 'ओव्हेरचे दिवस' हा सुद्धा दीर्घ लेख आहे.

चित्रकलेवर सातत्याने एक तरी दर्जेदार लेख अंकात असणारच ही खात्री देणारा दुसरा अंक म्हणजे 'दीपावली'. कोणे एके काळी दीनानाथ दलालांच्या अभिजात सौंदर्यपूर्ण चित्रांनी सजणारा हा अंक अजूनही आशय आणि रुपडे या दोन्ही संदर्भातून नि:संशयपणे देखणाच असतो. दीपावली च्या यावर्षीच्या अंकातही सुहास बहुळकरांचा दीर्घ आणि रंजक लेख आहे- 'कथा शिवचरित्रांच्या, व्यथा शिवस्मारकाच्या' शिवाजी महाराजांना सूरतेच्या लुटीच्या वेळी प्रत्यक्ष पाहून त्यांचे पहिले चित्र काढणार्‍या डच चित्रकारापासून ते शिवाजी महाराजांनी मला स्वप्नात येऊन चित्र काढण्याची आज्ञा दिली ही 'कथा' सांगणार्‍या जी.कांबळे या कोल्हापूरच्या चित्रकाराच्या नंतरच्या काळात 'शासकीय शिवाजी' चा मान मिळवणार्‍या चित्रापर्यंतचा इतिहास, त्यात राजा रवि वर्माने काढलेल्या घोड्यावरच्या शिवाजीपासून ते औंधच्या महाराजांनी एका हंगेरियन चित्रकाराकडून युरोपियन स्टेन्ड ग्लास शैलीत संपूर्ण शिवचरित्र चितारुन घेण्याच्या घेतलेल्या ध्यासाची कहाणी आणि त्या हंगेरियन चित्रकाराने शिवचरित्रासाठी विकत घेतलेल्या काचा आणि रेखाचित्रे यांचा सांभाळ त्यानंतर पस्तीस वर्षे करणार्‍या त्या चित्रकाराच्या नातवाची या कहाणीतली गोष्ट केवळ अद्भूत अशीच आहे.

राजेन्द्र कुलकर्णी संपादित धनंजय आणि चंद्रकांत या दोन दिवाळी अंकांपैकी धनंजय दिवाळी अंकाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. मुखपृष्ठावर अश्वमेधाचा, दिग्विजय करणारा दौडता घोडा चितारून धनंजयने आपली ५० वर्षांची यशस्वी घोडदौड सुचित केली आहे.


आतमधे चित्रकार के.बी.कुलकर्णींचे शिष्य किरण हणमशेठ यांनी काढलेली वन्यजीवन या संकल्पनेवरची चित्रं आणि इलस्ट्रेशन्स आहेत. हत्ती, सिंह-सिंहिणीची आनंदी जोडी, गवे, वाघ अशी चार देखणी तैलचित्रे आहेत. प्रा. मं.गो.राजाध्यक्षांचाही एक लेख धनंजय मधे आहे पण तो चित्रकलेवरचा नाही तर त्यांचे आवडते रहस्यकथा लेखक बाबुराव अर्नाळकरांवरचा आहे. चित्रकार व रहस्य यांची ही सांगड इंटरेस्टींग.
चंद्रकांत दिवाळी अंकावर कोल्हापूरचे चित्रकार संजय शेलार यांचे पेंटींग आहे ते लाईट अ‍ॅन्ड शॅडो खेळाचा उत्तम नमुनाच.  शेलारांचे हे तैलचित्र शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळेंनी आपल्या आईला भेट द्यायला विकत घेतले होते. तेव्हा मुखपृष्ठासाठी हे चित्र घेण्यासाठी त्यांची परवानगी मागायला राजेन्द्र कुलकर्णींना थेट शरद पवार मुक्कामी जावे लागले. परवानगी लगेचच मिळाली पण त्याची गोष्ट राजेन्द्र कुलकर्णी ज्याप्रकारे सांगतात ते फार मजेशीर वाटले. 

चंद्रकांतमधे संजय शेलारांचे कलादालनच उघडले आहे. अनुक्रमणिकेमधे निसर्गचित्रांची इलस्ट्रेशन्स आणि आतमधे ए-४ आकारातली ६/७ चित्रे. चित्रे बॅक एलेव्हेशनची कां यावर शेलारांचा दोन पानी लेखही आहे. चंद्रकांतमधे प्रभाकर पेंढारकरांची तपोवन कादंबरी आहे त्यासाठीही शेलाराची दहा पेन्सिल स्केचेस आहेत. प्रभाकर पेंढारकरांच्या 'एका स्टुडिओचे आत्मचरित्र'मधेही संजय शेलारांची ५०-६० इलस्ट्रेशन्स होती.

यावर्षीच्या दिवाळी अंकांमधे चित्रकलेवर यापेक्षाही अद्भूत आणि रंगीत असा बराच खजिना येणार आहे. उदा.
आपलं महानगर मधला शशिकांत सावंत यांचा 'असे कसे हे मराठी चित्रकार' हा अनेक अर्थांनी जबरदस्त लेख.. कालनिर्णय-सांस्कृतिक मधे साधना बहुळकरांचा पॅरिसमधल्या स्त्री-इम्प्रेशनीस्ट चित्रकार आणि अमृता शेरगिल असा लेखही नोंद घेण्यासारखाच आहे. तेव्हा त्यावर सविस्तर लिहायला हवय. कदंब, शब्द. हंस मधेही चित्रकलेवर काही ना काही आहेच.
या सार्‍या चित्रकलेच्या यंदाच्या 'दिवाळी'बद्दल एकाच पोस्टमधे लिहून संपवणे हे काही बरोबर नाही. कधी नव्हे ते चित्रकलेबद्दल दिवाळी अंकांनी इतकं सारं मेहनत घेऊन छापून आणलय तर त्यासाठी ब्लॉगची दोन पोस्ट्स खर्ची घालणं हे मस्ट.

तेव्हा वाचत रहा- यावर्षीची चित्रकलेची 'दिवाळी' खास आणि फक्त 'चिन्ह'ब्लॉगमधून.
तुमच्यासाठी..

शर्मिला फडके

Tuesday, October 19, 2010

यावर्षी चित्रकलेची 'दिवाळी'!

चित्रकलेसाठी चिन्ह काहीही करते. यंदा दिवाळी अंकांमधे चित्रकलेवर काय काय येत आहे ते शोधून तुमच्यापर्यंत आधीच पोचवण्याचं काम 'चिन्ह' ब्लॉगचं.  
'चिन्ह' हा अंक चित्रकलेलाच वाहिलेला. पण तो काही आता दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत येत नाही तर दिवाळी नंतर सावकाश 'चिन्ह'वार्षिक म्हणून प्रकाशित होतो. पण 'चिन्ह' नाही तर वाचकांना ऐन दिवाळीत चित्रकलेवर इतर अंकांमधून तरी काही सकस वाचायला मिळते आहे की नाही? हे पहाणे महत्वाचेच.

तेव्हां वाचत रहा-


शर्मिला फडके

Saturday, October 9, 2010

चित्रकला म्हणजे नक्की काय?

चिन्हच्या १२ अंकांचा पसारा मांडून बसले आहे.
चित्रकला आणि चित्रकार या अंकांच्या प्रत्येक पानावर आहेत.
प्रत्येकाची एक स्वतंत्र कहाणी.
वैयक्तिक आणि चित्रनिर्मितीमागच्या प्रेरणेची कहाणी.
दोन्हीही एकच कदाचित.
चित्रकला म्हणजे काय ते यातूनच कळेलही मला.
 कदाचित..
चित्रकला म्हणजे गायतोंडेंची कित्येक कोटींना विकली गेलेली पेंटिंग्ज?
की दिल्लीत निजामगंजच्या बरसातीत अखेरच्या एकाकी  दिवसांत त्यांनी चितारलेली सिलिंगफॅनची तीन पाती?
 हुसेनचे करोडोंचे घोडे? की त्याला परागंदा करणार्‍या नग्न देवतांचे कॅनव्हास?
रवि वर्माची धनिकांच्या खाजगी संग्रहात बंदिस्त झालेली दमयंती? की त्याच्या सरस्वतीच्या चित्रामागचा गूढ चेहरा?
भास्कर कुलकर्णींनी जगासमोर आणलेली वारली आर्ट आणि मधुबनी? की त्याच मधुबनी गावामधे त्यांचे उपेक्षेत मरुन जाणे?
चित्रकला म्हणजे चिमुलकरांच्या तरल स्व्प्नांतून उमटलेले गूढ आकार बहुतेक. किंवा त्या तरल आभासी आकारांनी वेडे झालेले चिमुलकर स्वतःसुद्धा.
चाळीस वर्षे न चुकता वेसाईड इनमधे हजेरी लावणारे अरुण कोलटकर आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचे मैत्र जागवत बसणारे त्यांचे मित्र हाही चित्रकलेचाच एक भाग.
मी चिन्हचा एक एक अंक उघडून पहाते.
जेजेच्या आवारातली दाट, गर्द झाडी. लयबद्ध शिल्पं, भव्य सिलिंगमधून सांडणारा प्रकाश, उंच खिडक्यांच्या कमानी, नक्षीदार खांब आणि त्यांच्या तितक्याच नक्षीदार सावल्या मिरवणारे लांबलचक पॅसेज.. जेजेचं १५० वर्षं पुराणं सौंदर्य आणि आता त्याला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी.
चिन्हमधून चित्रकलेची ही बाजू सुद्धा दिसते.
चित्रकला याही पेक्षा काही वेगळी असू शकते?
आणि मग अजिंठ्याच्या पद्मपाणीने सांगितलेली चित्रकलेची कहाणी? अल्टामिराच्या त्या तीन उन्मत्त बैलांनीही चित्रकलेचा अर्थ सांगितलेला असणारच.
भीमबेटकाच्या गुहेतल्या भिंतीवरच्या आदिम आकृत्यांमधली उर्जा.. आदिवासींचा जीवनमरणाचा संघर्ष उलगडवून दाखवणारी तीही चित्रकलाच.
चिन्हमधे चित्रकला आहे, चित्रकार आहेत, त्यांच्या जीवनकहाण्या आहेत, निर्मितीप्रेरणेचा वेध आहे, ध्यासामागची कथा आहे.
पण चित्रकला म्हणजे अजूनही बरंच काही..
रोजच्या, आजूबाजूच्या आयुष्यातलं.. जहांगीरच्या पायरीवरचं, एन्सिपिए, ताओ आर्ट गॅलरीच्या प्रदर्शनातलं..
चित्रकारांच्या स्टुडिओतूनही चित्रकलेबद्दल बरंच काही कळू शकतं.
चित्रकार रोज एक पेंटिंग करतच असतो कुठेना कुठेतरी.
चिन्हने आजपर्यंत शक्य तेव्हढं सगळं सांगितलं.
पण अजूनही बरंच काही सांगण्यासारखं शिल्लक आहे.
चित्रकलेचा पसारा तर आपलं अवघं जगणंच व्यापून बसलेला आहे. 
वर्षातून एकदाच येणार्‍या चिन्हमधून असं कितीसं सांगणार? संवाद सतत हवा..
आणि म्हणूनच मग आता चिन्हचा हा सुरु झालेला ब्लॉग..
थोड्याच दिवसांत इंग्रजीमधेही येईल.
शिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे चिन्हची वेबसाईट सुद्धा सुरु होतेच आहे अगदी काही दिवसामधेच..
माहिती देत राहूच तुम्हाला या ब्लॉगमधून.
चित्रकलेची आणि चित्रकारांची..

 शर्मिला फडके