Monday, December 5, 2011

‘मराठी पाऊल पडते पुढे’

कोल्हापूरहून चित्रकार श्यामकान्त जाधव यांनी ‘चिन्ह’च्या ‘नग्नता’ अंकावर प्रतिक्रिया देणारं एक पत्र पाठवलं आहे. चित्रकले इतकंच लेखनावरही प्रभूत्व असलेल्या जाधव यांचं ‘रंग चित्रकारांचे’ हे पुस्तक विशेष लोकप्रिय आहे. सोबत ‘रंग चित्रकारांचे’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि श्यामकान्त जाधव यांचं प्रख्यात चित्रकार रविंद्र मेस्त्री यांनी चितारलेलं व्यक्तीचित्र.


सप्रेम आशीर्वाद!
श्यामकान्त जाधव

‘चिन्ह’ हा यावर्षीचा मानबिंदू ठरलेला खास अंक आवर्जून पाठवलात याबद्द्ल आभार!
‘चिन्ह’ आंतरबाह्य सुंदर आहे. त्याबद्दलची तुमची मेहनत प्रत्येक पृष्ठावर प्रत्ययाला येते. ती निर्मितीमूल्यं बहाल करणारे सर्वजण अभिनंदनास पात्र आहात. मी सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो!

मुख्यपृष्ठ ते अखेरच्या पृष्ठापर्यंतचं त्याचं सौंदर्य भूरळ घालणारं वाटलं. ‘हुसेन आणि मी’ हा प्रभाकर कोलते यांचा लेख मला विचारप्रवर्तक आणि सत्यान्वेषाचं दर्शन घडविणारा वाटला. श्री. कोलते हे आजचे चित्रकलेतील सखोल वेध घेणारे एक आघाडीचे विचारवंत चित्रकार आहेत. त्यांची शब्दकळा त्यांच्यातील विचारांना अग्रक्रमाचं स्थान देते, तेही योग्य न्यायानं. ती जडवादी आणि क्लिष्टही नाही.

कोलतेंच्या ‘हुसेन’ यांच्याविषयीच्या दोन्ही लेखात हुसेन यांच्या जीवन आणि कलाजीवनाविषयी बरीच हकीगत प्रथमच वाचावयास मिळाली. हेही खरं की, तो वैश्विक रंगभाष्यकार होता. त्यानं अनेक युक्त्या प्रयुक्त्या केल्या. पण यातून खर्‍या अर्थानं तो स्वत:ला सिद्ध करीत राहिला. हजारो कॅनव्हास त्यानं आपल्या कुंचल्यानं सिद्ध केले. हा त्याचा पराक्रम अद्वितीयच आहे. त्याचं कलाकर्तृत्व उदंड आहे. म्हणून त्याला सलाम केला पाहिजे.

‘मोन्ताज आणि मोनालॉग’ मोनाली मेहेर या एका मराठी मुलीनं हिंदू कॉलनी ते हॉलंड, अ‍ॅमस्टरडॅम, मग थायलंड इथं सादर केलेले इंन्स्टॉलेशन, लाईव्ह आर्ट, आर्ट परफॉर्मन्स या सारख्या कला सादर करून जे अतुलनीय धैर्य दाखविल्याची कथा तिच्या मुलाखतीतून मांडली आहे. ती अप्रतिम आहे. पण ती खूप दीर्घ झाली, त्यामुळे त्याच्यातील वाचनीयता कमी होत जाते. पण तिच्या प्रयोगांना मिळणारा प्रतिसाद लक्षणीय वाटावा असा वाटतो. या कलांचा कालावधी अल्प असल्यानं त्याचं मागं उरणं अल्पकालीनच म्हणायचं, पण तिचं सादरीकरण अप्रतिमचं!

‘नग्नता चित्रातली आणि मनातली’ या विषयावर तुम्ही हा परिसंवादच घडवून आणलात आणि अनेकांचं त्या संबंधीचं अंत:करण उघड झालं ही आनंदाची गोष्ट आहे. ‘नग्नता आतली बाहेरची’ या दोन्ही गोष्टी सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह नाहीत. मात्र या संबंधी प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये प्रचंड कुतूहल असतं. आजवरच्या हजारो वर्षाच्या संस्कृतीमधून ते व्यक्त होत राहिलं. पण कुतूहलच घुसमटलं तर त्यातून विकृत भावनाच जन्म घेतात. आणि मग हा विषय अनादारास पात्र होतो. माणसाची भावनिक दृष्टी विशाल असेल तर नग्नतेलाही सुंदरता प्राप्त होते. पण जगात असं फारसं घडत नाही हे खरं. असा हा अवघड विषय ‘दृश्यकला आणि मन’ या माध्यमातून ‘चिन्ह’नं तो जगापुढे आणला हे धैर्यही मोठं मानावं लागेल. नग्नतेबद्द्ल काळा-काळात उद्रेक होत असतात. विचारमंथन होत असतं, ही गोष्ट खरं तर सनातन आहे. पण यासंबंधी सतत प्रबोधन होणं आवश्यक.

‘भारतीय तत्वज्ञानानं रस सिद्धांताची भलामण फार चांगल्या तर्‍हेने केली आहे. त्यामध्ये शृंगाररस फार चांगल्या रीतीनं मांडला गेला. हा सकारात्मक विचार होय. यामध्ये दृश्यकलेनं मोलाची कामगिरी केली आहे. यामधूनच दृश्यकलेची भाषा अवतरली. त्यांत नवनिर्मिती असा हा क्रम कलाकृतीतून सिद्ध होतो. त्यासाठी माणसात कलावंत मन असणं अगत्याचं. निदान तशी रसिकता महत्त्वाची’.

अकबर पदमसी, भालचंद्र नेमाडे, मेघना पेठे, प्रतिभा रानडे, डॉ. सुधीर पटवर्धन, डॉ. आनंद नाडकर्णी, पार्वती दत्ता या सर्व लेखकांचे लेख मला विचारदर्शक वाटले. शेवटी व्यक्त होणार्‍याला मर्यादा येतातच, पण या अंकातून काही पावलं पुढं गेल्याचं भासलं.

सुहास बहुळकरची बरीच कोठून कुठेपर्यंत लांबलेली ‘न्यूडल्स’ शोधणारी भटकंती इतिहासाची नोंद घेणारी आहे. या अंकाची चित्रमयता लक्षणीय आहे. न्यूड स्टडी या सदरातील देवदत्त पाडेकर या मनस्वी तरूण चित्रकाराची वेगवान आणि प्रकाशप्रवाही चित्रं हे या अंकाचं प्रभाव क्षेत्र आहे.

मांडणी उत्कृष्ट. नव्या छपाई तंत्रामुळे तर मुद्रण सौंदर्य खुलून गेलं आहे. आता हा अंक संदर्भ ग्रंथच झाला आहे. आता तर ‘चिन्ह’ इंग्रजी भाषेमध्ये सिद्ध होतोय असं समजतं. हे एक ‘मराठी पाऊल पडते पुढे’ अभिनंदन.

श्यामकान्त जाधव.