Thursday, October 11, 2012


चित्रकार-शिक्षक ‘चिन्ह’वाचतात?


चित्रकारांनी विशेषत: चित्रकार शिक्षकांनी ‘चिन्ह’वाचावा यासाठी ‘चिन्ह’नं सुरूवातीपासूनच खूप प्रयत्न केले. ‘आम्हाला यातून काय मिळणार?’ या आणि अशा प्रश्नांची उत्तरं द्यायची पाळीही आम्ही ओढवून घेतली. कला-साहित्य उद्योजकांकडून भेटवस्तू स्वीकारण्याची सवय असलेल्या काही शिक्षकांनी तर ‘आम्हाला अंकाची एक कॉपी भेट द्या म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना ते घ्यायला लावतो’ अशा ऑफर्सही ‘चिन्ह’ला दिल्या. ज्या ‘चिन्ह’नं साफ धुडकावून लावल्या. अर्थात यालाही अपवाद होतेच.कदाचित अशा अपवादांमुळेच ‘चिन्ह’ला आजची मजल मारता आली असावी.

चिपळूण, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर या सारख्या ठिकाणी तर अनेक कलाशिक्षक स्वत:च अंक मागवत आणि शेजार-पाजारच्या गावातल्या शिक्षकांना ते घ्यायला लावत किंवा विद्यार्थ्यांना वाचायला लावत. आज तिथल्या ‘चित्रसाक्षर’विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. मुंबैतल्या नामवंत कलामहाविद्यालयात वरच्या वर्गावर शिकणारे विद्यार्थी जेव्हा ‘चिन्ह’हे काय आहे असं जेव्हा विचारतात तेव्हा खरंच गलितगात्र झाल्यासारखं वाटतं. पण अशाच वेळी जेव्हा महाराष्ट्राच्या खेडेगावातून एखादा विद्यार्थी फोनवरून ‘चिन्ह’संबंधी चर्चा करतो तेव्हा आजवर केलेल्या कष्टाचं चीज केल्यासारखं वाटतं!

पण आजही परिस्थिती बदलते आहे. मोठ्या संख्येने चित्रकला शिक्षक वाचू लागलेत, चर्चा करू लागलेत, विद्यार्थ्यांना वाचायला प्रवृत्त करू लागलेत. त्याचे परिणाम आज ‘चिन्ह’चं काम करताना जाणवू लागलेत. पण अधेमधे उदासवाणे अनुभव येतात आणि असे अनुभव शेअर केल्याशिवाय रहावतही नाही. ‘चिन्ह’च्या अंक 14 चा प्रचार-प्रसार आणि बुकींग आम्ही सुरू केलंय. अशाच एका कलाशिक्षकाला ‘चिन्ह’नं फोन केला. ‘यंदाचा ‘चिन्ह’चा अंक बुक करायचाय का?’ तर ते शिक्षक म्हणाले नाही, पहातो, कळवतो.’ ‘अहो गेल्या वर्षी अंक घेतला होता ना म्हणून यंदा फोन केलाय. आताच नाव नोंदवल्यास सवलतीत मिळेल’ इती ‘चिन्ह’. तर ते शिक्षक म्हणाले नाही! त्याचं काय आहे गेल्या वर्षी वडिलांनी आणायला सांगितला होता म्हणून घेतला होता, यंदा नकोय!’ आणि वर ‘कुणाला हवा असेल तर कळवतो’ असंही सांगायला ते शिक्षक विसरले नाही. अक्षरश: थिजवून टाकणारा हा अनुभव. महाराष्ट्राच्या कलाशिक्षणची काय वाताहत झाली आहे हे या किश्शावरून स्पष्ट व्हायला काहीच हरकत नाही.

चित्रकार आणि चित्रकलाशिक्षकांचं ‘चिन्ह’वाचण्याचं प्रमाण आता आता वाढतंय असं जरी असलं तरी चित्रकलाक्षेत्राच्या बाहेरील क्षेत्रात ‘चिन्ह’वाचण्याचं प्रमाण सुरूवातीपासूनच खूप होतं आणि गेल्यावेळच्या ‘नग्नता’अंकानंतर तर ते खूपच मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. नाटक,चित्रपट,संगीत,साहित्य, पत्रकारिता या क्षेत्रातील नामवंतांचा तसेच उदयोन्मुखांचाही ‘चिन्ह’ला फार मोठा पाठींबा आहे. फेसबुकवरून किंवा ब्लॉगवरून ते ‘चिन्ह’चा ट्रॅक ठेवून असतात. ‘चिन्ह’च्या अंकाची घोषणा होताच ते त्यांच्या प्रती तात्काळ बुक करतात. या सार्‍यांशीच वेळप्रसंगी गप्पा मारणं, चर्चा करणं हा सुखद अनुभव आसतो.

एकदा आठवतेय जब्बार पटेल जवळ जवळ अर्धा-पाऊण तास ‘चिन्ह’आणि चित्रकलेसंदर्भात बोलत होते. तो फोन टेप करायला हवा होता असं नंतर राहून राहून वाटत होतं. अंक वाचल्याबरोबर नेमाने येणारा माधव गडकरींचा फोन एक वेगळंच बळ देत असे किंवा चित्रकार माधव सातवळेकरांचा फोन सार्‍या कष्टाचं परिमार्जन करायला लावणारा असायचा. डॉ.अनिल अवचट, विश्वास पाटील, वसंत सरवटे, मधू गडकरी, अजय देशपांडे(युगवाणी), अनिल सोनार, अशोक राणे, अतुल देऊळगांवकर, डीसीपी चंद्रशेखर कानडे, डॉ.माधवी मेहेंदळे, कविता महाजन, डॉ.रविंद्र बापट, श्रीकांत लागू, अशोक जैन, दत्ता मोने, प्रवीण बर्दापूरकर, राजा ढाले, रजनी दांडेकर, श्रीराम जोग, श्रीराम रानडे, विश्वास कणेकर, वसुंधरा पेंडसे नाईक, संजीवनी खेर, अनंत सामंत, अनिल किणीकर, अपर्णा वेलणकर, अशोक कोठावळे, भारत सासणे, कमलाकर नाडकर्णी, कुमार केतकर, डॉ.प्रकाश कोठारी, अनंत भावे, राजन खान, राजू परूळेकर अशी नावे तरी किती सांगावी?

एक वेगळा अनुभव मात्र सांगावासा वाटतो. लेखक पत्रकार संपादक वसंत सोपारकर यांचा असाच एके दिवशी फोन आला. काय ओळखलं का? आता फोनवर आवाजावरून कसं ओळखायचं? तर म्हणाले एक क्ल्यु देतो. तुम्ही लोकप्रभात असताना आपण बाहेर बसून समस्त संपादक वर्गाची टिंगल टवाळी करीत असू...तर मी म्ह्टलं सोपारकर बोलतायत का? तर म्हणाले दे टाळी. खूप सुंदर अंक काढलाय. कुठे मिळेल. म्हटलं पाठवतो, पत्ता द्या. तर म्हणाले पाठवू नको मी तुझ्या घरीच येतो न्यायला आणि अर्थातच जेवायलाही. पण पंधरा-वीस दिवस ते काही आलेच नाही. मग आम्ही त्यांना फोन केला तर म्हणाले नाही, नाही मी येतोच, त्याच रस्त्यावरून मी पूर्वी माझ्या गावाला वाड्याला जात असे. मी येतोच अंक पाठवू नकोस! पण नंतरही ते काही आले नाहीत मग आम्हीच त्यांना फोन केला आणि पत्ता घेऊन अंक कुरियर केला. तेव्हा म्हणाले अंक जरा तब्येतीचं उचकलं म्हणून आलो नाही पण लवकरच येतो, अंक नको पाठवू पण आम्ही अंक पाठवलाच आणि नंतर काही दिवसात आली ती त्यांच्या अकस्मात निधनाची बातमीच.


Saturday, August 18, 2012


‘निवडक चिन्ह’ का आणि कशासाठी ?

‘चिन्ह’च्या गायतोंडे अंकाची एखादी प्रत आहे का हो ? एक तरी पहा ना ? तुटलेली, फाटलेलीही चालेल ! असे फोन ‘चिन्ह’ला वारंवार येत असतात. गायतोंडे अंकाबाबतच केवळ नव्हे तर अन्य अंकाबाबतही. मग त्यांची समजूत काढताना नाकीनऊ येतात. सदर अंक ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, तिथं वाचा. वगैरे सांगितलं तरी त्यांची समजूत पटत नाही. त्यांना त्या अंकाची एखादी तरी प्रत हवी असते.

२००१ साली ‘चिन्ह’चं प्रकाशन पुन्हा सुरु झाल्यानंतर वारंवार येणारा हा अनुभव. समोरच्या व्यक्तीला त्या अंकाची प्रत काही करून हवीच असते आणि आमच्यापाशी त्याची एकही प्रत नसते. आता काय करायचं ? यावर उपाय म्हणून ‘निवडक चिन्ह’ची निर्मिती केली गेली. पहिल्या पर्वातल्या १९८७, ८८, ८९ मधील तिन्ही अंकातील निवडक साहित्याचा पहिला खंड २००९ साली प्रसिद्ध झाला. तो हळूहळू विकला गेला, पण आता संपत आलाय. त्याची आवृत्ती पुढे काढायची किंवा नाही की वेबसाईट्वर टाकायची या विषयीचा निर्णय त्या सर्वच प्रती संपल्यावर घेतला जाईल.

मधल्या काळात २००१ सालापासून प्रसिद्ध झालेल्या अंकातील काही अंकही संपून गेले. त्याही अंकाला सातत्यानं मागणी होऊ लागली. म्हणून मग दुसर्‍या पर्वातील ‘निवडक चिन्ह’चे तीन खंड प्रसिद्ध करावयाचा निर्णय घेतला. यंदाचं वर्ष हे ‘चिन्ह’चं रौप्यमहोत्सवी वर्ष. ‘निवडक चिन्ह’चं प्रकाशन करण्यासाठी हे निमित्त पुरेसं वाटलं. म्हणून ‘निवडक चिन्ह’च्या तीन खंडाची घोषणा आम्ही केली.

२००१ सालापासून २००७ सालापर्यंतच्या अंकातील निवडक साहित्य या खंडासाठी निवडलं आहे. खरंतर या अंकातील निवडक साहित्याचे ६ खंड प्रकाशित होऊ शकतात. पण तूर्त तरी तीनच खंड प्रसिद्ध करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही योजना यशाची ठरली तर पुढील वर्षी तीन खंड जरूर प्रसिद्ध करू. या योजनेला पहिल्या दिवसापासून जो प्रतिसाद लाभतो आहे तो पहाता ही तीन खंडाची योजना यशस्वी होईलच याविषयी आमच्या मनात तरी शंका उरलेली नाही. त्यामुळे भास्कर कुलकर्णींवरचा खंड आणि आत्मकथनं तसेच विविध लेखविषयक खंड असे तीन खंड बहुदा पुढील वर्षी प्रसिद्ध होतील.

वर म्हटल्याप्रमाणे २००१ ते २००७ सालातील अंकामधलं निवडक साहित्य या खंडासाठी निवडण्यात आलं आहे. २००८ सालचा अंक क(।)लाबाजारचा अंक असल्याने त्यातील फक्त ‘जेजे जगी...’ या लेखमालेतील लेखांचीच निवड निवडकसाठी करण्यात आली आहे. बाकी संपूर्ण अंक ‘अंगावर येतो’, ‘वाचवत नाही’, ‘हे सारं भयंकर आहे’, ‘नकारात्मक आहे’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्यामुळे ‘निवडक’मध्ये समाविष्ट करणं टाळलं आहे. त्या नंतरचे अंक हे जवळ जवळ ‘कलेक्टर्स एडीशन’चेच अंक असल्याने त्यांचाही समावेश ‘निवडक’मध्ये करण्यात येणार नाहीये.

जेव्हा हे अंक प्रसिद्ध झाले तेव्हा ते रंगीत स्वरुपात प्रसिद्ध करणे ‘चिन्ह’ला शक्य झाले नव्हते. ती कसर मात्र आता भरून काढणार आहोत. हे सर्वच्या सर्व खंड आर्टपेपरवर प्रसिद्ध केले जाणार आहेत आणि संपूर्णत: रंगीत स्वरुपात ते असणार आहेत. या लेखांसाठी चित्रं आणि प्रकाशचित्रांची निवड पुन्हा नव्याने करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची मांडणी, सजावट सारं सारंच अत्याधुनिक स्वरुपात असणार आहे. आणि मुख्य म्हणजे हे तिन्ही खंड हार्डबाऊंडमध्ये असणार आहेत. जेणेकरून ते पुढची निदान ५०-७५ वर्षे तरी वाचले जावेत. ‘चिन्ह’च्या अभिनव चळवळीचं चित्रकलावर्तुळाच्या दृष्टीनं, वाड़्मयीन किंवा सांस्कृतिक दृष्टीकोनातून महत्त्व विषद करणार्‍या नामवंताच्या प्रदीर्घ प्रस्तावना हे या खंडाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे.

आता या तिन्ही खंडाची प्राथमिक जुळवाजुळव पूर्ण झाली आहे. यातला सर्वात अवघड खंड होता तो ‘गायतोंडे’ यांच्यावरचा, त्यांची चित्रं, प्रकाशचित्रं मिळवताना खूप अडचणी आल्या त्यामुळे प्रकाशनाला थोडासा वेळ झाला. पण आता त्या अडचणी सुटत आल्या आहेत. लवकरच त्याचं प्रकाशन व्हावं अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर वर्ष अखेरपर्यंत अन्य दोन्ही खंड प्रसिद्ध होतील.

‘चिन्ह’च्या प्रकाशनाना नेहमीच थोडासा किंवा अनेकदा जास्तही उशिर होत असतो याचं कारण ते प्रकाशन जास्तीतजास्त परिपूर्ण कसं होईल हे आम्ही काटेकोरपणे पहात असतो. तिथं कुठलीही तडजोड आम्ही करत नाही. असं करताना अनेकदा पृष्ठ संख्या वाढते. मूळ बजेट वाढतं पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो त्यामागचा हेतू हाच असतो की ‘चिन्ह’चं प्रकाश्न जबरदस्त व्हावं. आणि ते होत जातंही. ‘चिन्ह’नं देशाच्या कानाकोपर्‍यातच नव्हे तर परदेशातही जोडलेले हजारो वाचक ही त्याचीच तर खूण आहे.

Monday, August 13, 2012




पुन्हा ‘कलाकीर्द’......



१९८१ साली मी चित्रकलेच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्याआधीच मी पत्रकारितेच्या क्षेत्रात जाऊन पोहोचलो होतो. चित्रं काढून तेव्हा पोट भरलं नसतं त्यामुळे नोकरी करणं भाग होतं. त्यामुळे आवडत्या क्षेत्रातली नोकरी चालून आल्यावर मी ती स्वीकारलीच. दिवसभर पत्रकारिता आणि उरलेल्या वेळात चित्रकारीता अशी मुशाफिरी सुरू झाली. जे जे करीत होतो त्यात यश मिळू लागलं होतं. साहजिकच महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या. मोठमोठाली स्वप्न पडत गेली. त्यातलं एक मोठं स्वप्न होतं आर्ट अ‍ॅन्ड आर्टिस्ट डिरेक्टरीचं. माहितीचं युग वगैरे अवतरायचं होतं. संगणकाने नुकताच भारतात प्रवेश केला होता. परिस्थिती खूप वेगळी होती, आता सांगितलं तर ऐकणार्‍याला भयंकर आश्चर्य वगैरे वाटेल पण कुणाला फोन करायचा म्हटलं तरी किमान एकदीड किलोमिटर अंतर चालून जावं लागायचं आणि मग एखाद्या वाण्याकडून किंवा दुकानातून फोन करायचा. एसटीडी वगैरे असेल तर भलतीच बोंब व्हायची. पण जेजे मधे शिकत असतानाच माहिती जमवण्याचा नाद मला लागला होता. त्यामुळे चित्र अणि चित्रकलेविषयीची सारीच माहिती मी त्या काळात जमवून ठेवली होती. जी मी या डिरेक्टरीमध्ये वापरली. एखादं पुस्तक तयार करणं वगैरे म्हणजे भयंकर दिव्य केल्यासारखं वाटायचं त्या काळात. कारण सारं काही आतासारखं संगणकावर करता येत नव्हतं. हातानेच करावं लागायचं. अगदी स्पेलिंग मिस्टेक वगैरेसुद्धा ब्लेडने कापाकापी करून कराव्या लागायच्या. हॉरिबल होता तो अनुभव.

यशवंत चौधरींसारख्या ज्येष्ठांनी सबूरीचा सल्ला दिला होता. घाई नको करू म्हणाले होते पण आम्ही आपले घोड्यावर होतो. त्यात तरुण, त्यात भयंकर महत्त्वाकांक्षी वगैरे. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून दीड-दोन वर्ष अथक प्रयत्न करून अखेर ती डिरेक्टरी एकदाची प्रसिद्ध केलीही. आधीचा प्रकाशनाचा, मार्केटिंग वगैरेचा अनुभव नव्हता साहजिकच प्रॉडक्ट चांगलं असूनही १९८५ साली भयंकर मार खावा लागला. त्या काळात जवळ जवळ अडीज-तीन लाखांचा चुराडा झाला. काम खूप चांगलं आहे. पायोनियरींग एफर्ट वगैरे पण लोकांना हे असं काही घेऊन वाचायची संवयच मुळी नव्हती. (विशेषत: चित्रकला क्षेत्राला) साहजिकच भयंकर आर्थिक फटका बसला.

त्यातून बाहेर पडायला तारुण्य आणि जबर आर्थिक किंमत मोजावी लागली. नंतरची १०-१५ वर्ष अक्षरश: कर्ज फेडण्यातच गेली. नंतर तर अक्षरश: त्यांची कव्हर काढून ती पुस्तकं रद्दीवाल्याला विकावी लागली. भयंकर प्रसंग होते ते. पण मस्ती अद्याप जिरली नव्हती. मग ‘चिन्ह’चे अंक सुरू झाले. पहिल्याच प्रयत्नात ‘चिन्ह’ला पुलंपासून ते थेट एखाद्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यानं नावाजलं. पण पुन्हा वेळेचं गणित आडवं आलं. मार्केटींग जमलं नाही. सबब ‘चिन्ह’चं प्रकाशनही बंद करावं लागलं. तब्बल १२ वर्ष सारं काही बंद होतं.

पत्रकारितेतली नोकरी सोडली आणि पुन्हा संपादनासाठी हात हुळहुळायला लागले. विषय डोक्यात गरगरा फिरायला लागले. पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि २००१ साली ‘चिन्ह’ची मुद्रा झळाळून उठली. त्यानंतरचा इतिहास तर सार्‍यांनाच ठाऊक आहे. प्रत्येक अंकानंतर ‘चिन्ह’चा प्रभाव ठसठशीत होत गेला.

आता २५ वर्षापेक्षा जास्त काळ झाला या सार्‍याला. पण ‘कलाकीर्द’चं अपयश मात्र ठुसठुसतच होतं. इथून आता पायउतार व्हायचं असेल तर जिथे आपण आयुष्यातलं पहिलं अपयश भोगलं तेच पुन्हा यशस्वी करून दाखवायचं आणि मगच पुन्हा आपल्या मूळगावी, पेंटिंगकडे वळायचं असं काहीसं मनाशी निश्चित झालं. आता परिस्थितीही बदलली होती. फोनची जागा मोबाईलनं घेतली होती. हातात एक नाही दोन नाही तब्बल तीन मोबाईल होते. डेस्कटॉप, लॅपटॉप सारं काही दिमतीला होतं. इंटरनेटवरून लाखो वेबसाईट्स हात जोडून दिमतीला उभ्या होत्या. मग पुन्हा हे कलाकीर्दचं लोढणं गळ्यात का लावून घेताय राव ? माझं मीच एकदा मला विचारलं. उत्तर मिळालं. १९८५ साली ‘कलाकीर्द’ प्रसिद्ध केल्यानंतर आजतागायत त्याची कॉपी कुणाला करता आली नाही. संस्था, संघटना, प्रकाशन संस्था, सरकारी विभाग कुणालाच ते धाडस करता आलं नाही. याचाच दुसरा अर्थ असा की हे कार्य आता आपल्याच हातून पूर्ण व्हावे अशी बहुदा नियतीची इच्छा असावी. ‘कलाकीर्दचा’ प्रोमो दाखवायला सुरुवात केली आणि जवळजवळ १५ दिवसातच जगभरातल्या दीड लाख कलारसिकांनी तो पाहिला असं जेव्हा लक्षात आलं तेव्हाच या अभिनव डिरेक्टरीची उपयुक्तता (एवढ्या वेबसाईट्स असतानासुद्धा) सिद्ध झाली.

आता वाचकांना / प्रेक्षकांना नुसती कलावंताची माहिती मिळणार नाहीये तर त्यांची चित्रंही पहाता येणार आहेत, त्यांचा स्टुडियो पहाता येणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला कलावंताशी थेट संवाद साधता येणार आहे. हवं असलं तर त्यांना त्या कलावंताकडून थेट चित्र-शिल्प विकत घेता येणार आहे. (मध्ये कुणीही मध्यस्थ असणार नाहीये) याशिवाय चित्रकलेविषयीची जी जी माहिती त्याला हवी असेल तीती त्याला केवळ बटण दाबताच उपलब्ध होणार आहे. भारतातली सारीच्या सारी प्रदर्शनं त्याला काही काळातच इथं पहायला मिळणार आहेत. कलादालनं, कलावस्तूसंग्रहालयं, कलामहाविद्यालयं एक ना दोन कलाविषयक सारीच्या सारी माहितीच त्याला इथं उपलब्ध होणार आहे.

‘चिन्ह’ची इंग्रजी आवृत्ती लवकरच इ-मॅगेझिनच्या स्वरुपात प्रसिद्ध होणार आहे. तिही त्याला इथंच वाचता येणार आहे. आणि सर्वात सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक कलाविषयक वृत्तपत्र लवकरच इथंच प्रसिद्ध होणार आहे. ‘चिन्ह’च्या या इ-पेपरमध्ये भारतातली प्रत्येक कलाविषयक माहिती दिली जाणार आहे. आता चित्रकलेच्या माहितीसाठी, बातम्यांसाठी इतर वृत्तपत्रं, मासिक वाचायला नकोच. रोज www.chinha.in ला भेट द्या. कलाविषयक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं मिळेल याची खात्री बाळगा.


‘कलाकीर्द’च्या अधिक माहितीसाठी आमच्या ‘कलाकीर्द’ या पानाला भेट द्या.
http://www.facebook.com/pages/KalaKird-art-artists-Directory-of-India/238741786200542

Monday, May 14, 2012


नग्नतेच्या नावाssssनं...!


सतीश नाईक


‘प्लॅटिनम’ या राजू परूळेकर संपादित इंग्रजी नावाच्या मराठी मासिकाच्या मे महिन्याच्या अंकात ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी ‘नग्नता: चित्रातली आणि मनातली’ अंकासंद‍‍र्भात एक विशेष लेख लिहिला आहे. तोच हा लेख ‘चिन्ह ब्लॉग’च्या वाचकांसाठी


नागडं सगळ्यांना आवडतं.कुणाला कसं तर कुणाला कसं. पण हे कुणी मान्य करणार नाही. जाहीरपणे तर नाहीच नाही. या ‘नग्नता’च्या प्रिंटींगच्या वेळचा एक किस्सा सांगतो. अंकाची छ्पाई सुरू झाली. रात्री उशिराची वेळ.पहिला फ़ॉर्म प्रिंट होऊन आला. एक जण एक प्रिंट घेऊन अलगद साईडला गेला. माझं लक्ष होतं,पण मी काहीच बोललो नाही.थोडया वेळानं दुसरा मग तिसरा-चौथा एकदम, करत करत सगळेच पहायला लागले. एका दोघांनी थोडं वाचलंही. त्यातला एकजण पुढे आला, हात मिळवून म्हणाला,"सॉलिड आहे". बस्स! इथंच कळलं मला. धरतंय.तुम्हाला सांगतो, ‘चिन्ह’च्या बहुतेक अंकांच्या बाबतीत असंच घडलंय, थोड्याफार फरकानं. प्रेसमधले लोक अंक तयार होतानाच वाचून घेतात आणि रिअ‍ॅक्टही करतात. अर्थात ते पहायला तुम्ही  असायला हवं तिथं. चिन्ह’च्या वेळी मी असतोच.बाय डिफॉल्ट.
नग्नता विषयावर अंक काढायचा पक्कं केलं तेव्हाच ठरवलं होतं की हा अंक वाचणार्‍याला सहजपणे वाचता आला पाहिजे. कधीही. कुठेही. खाकी किंवा तसलंच कसलं तरी कव्हरबिव्हर घालून किंवा चोरून वाचायचा नाही हा अंक. सहज आठवलं म्हणून सांगतो, हा नग्नताचा अंक मिळाल्यावर कादंबरीकार राजन खानांचा फोन आला होता."उत्तम आहे अंक.मी माझ्या धाकट्या मुलीला देणार आहे हा ".असं सांगितलं त्यांनी. मस्त वाटलं.कितीतरी लोकांकडे घरी टीपॉयवर दिसतो हा नग्नता अंक.
नग्नता विषयावर अंक काढायचं फार पूर्वीपासून मनात होतं.अगदी पहिल्या अंकापासूनच. पण धीर होत नव्हता.एक तर योग्य निमित्त सापडत नव्हतं, दुसरं म्हणजे तो नेमका कसा असावा हे ठरत नव्हतं.इतक्या वर्षात हळुहळू ते क्लियर होत गेलं,दरम्यान चित्रकार हुसेन यांनी भारताचं नागरिकत्व सोडून कतारचं नागरिकत्व घेतलं, चित्रातली नग्नताच तर मुळी त्या वादाचं मूळ होती. आणि अचानक मनानं घेतलं,यंदाच्या ‘चिन्ह’चा विषय नग्नता. ठरलं.
मग विचार सुरू झाला,नेमका विषय कसा असावा.नग्नता विशेषांक म्हणूया सरळ? का न्यूड विशेषांक,की नग्न-चित्र विशेषांक.हरकत नव्हती.कुठलंही चाललं असतं.पण मग हे सगळं बोल्ड वाटेल का असं वाटायला लागलं आणि अचानक हे सध्याचं "नग्नता:चित्रातली आणि मनातली" हे असंच्या असं मनात आलं.मग माझ्या शिरस्त्याप्रमाणे मी ज्यांना मानतो अशा काहींच्या कानावर घातलं,त्यांचं म्हणणं ऐकलं आणि  केलं हे नाव फायनल.काहीसं विचारप्रवर्तक वाटणारं हे नाव, या अंकात ’नग्नता’या शब्दाच्या चित्रकलेतल्या व्याप्ती संदर्भात सांगोपांग चर्चा व्हावी, या माझ्या मूळ हेतूशी परफेक्टली मॅच होत होतं.एकदा विषय ठरला आणि बोळा निघाल्यासारखं सगळं धडाधडा समोर उभं राहायला लागलं.लेख,लेखक,चित्र,निमित्त सगळंच.
तसं पाह्यला गेलं तर गेल्या 100 वर्षातले काही मोजके अपवाद वगळता हा न्यूड चित्रण विषय आलाच नाही साहित्यात.किमान मराठीत तरी काहीच सापडत नाही या विषयावर.म्हणजे त्या अर्थानं हा विषय एकदम अस्पर्शित,प्युअर व्हर्जिनच!त्यामुळे अक्षरशः चालाल तितकी जमीन अशी परिस्थिती.सांगण्यासारखं,मांडण्यासारखं,लिहीण्यासारखं सगळंच.ठरवलं असतं तर साताठशे पानांचा सहज झाला असता अंक.पण मग शेवटी अ‍ॅकॅडमिक न्यूड स्टडी एव्ह्ढ्यापुरतंच बंधन घालून घ्यावं लागलं स्वतःवर.बघू.बाकीचंही करू पुढे-मागे.एकदा अंकाचं ठरल्यावर त्याची घोषणा कुठे केली असेल ’चिन्ह’नं? थेट साहित्य संमेलनात.आणि तीही पुण्यात.येस्स.पुण्याच्या सर्वार्थानं ’गाजलेल्या’ संमेलनात झाली या अंकाची घोषणा.मात्र श्लील मार्तंड कॄष्णराव मराठे यांच्या पुण्यानं ’चिन्ह’च्या या घोषणेला खास पुणेरी प्रतिसाद दिला. दुर्लक्ष केलं सरळ.
अंकाच्या विषयाची घोषणा झाली,लेखकांशी फोनाफोनी सुरू झाली.चित्र मिळवण्याचं काम मार्गी लागलं आणि मग सुरू झाली चर्चा.स्वतःची स्वतःशीच.काय होईल,कसं होईल,झेपेल ना सगळं?त्यात पद्माकर कुलकर्णींसारखे आमचे मित्र.अफाट वाचन,एक्स्पेशनल मेमरी असं सध्याच्या गुगलच्या काळातलं रेअर कोंबिनेशन.त्यांनी या संदर्भातले जुने खटले,त्यांचे निक्काल असं सगळं आणून द्यायला सुरूवात केली.चंद्रकांत काकोडकरांवरचा ’शमा’ कादंबरीसंबंधीचा खटला.त्यात ते सुटले निर्दोष शेवटी.पण पुढे बरीच वर्ष त्यांना मनस्ताप सहन करावा लागलाच की.वसंत गुर्जर या ज्येष्ठ कवीची लढाईही अशीच.अजून लढतातयतच ते.अशा एक एक गोष्टी पुढे ठेवत सुरूच झाले की ते. करताय तर करा,हरकत नाही पण हे ही पाहून ठेवा नीट.लक्षात घ्या. काळजी घ्या.त्यामुळे या अंकाच्या काळात ते येऊन गेले की मला फ्रस्ट्रेशनच यायचं.कन्फ्युजन कमी व्हायच्या ऐवजी वाढायचंच.श्लील मार्तंड कॄष्णराव मराठे हातात सोटा घेऊन मला सडकण्यासाठी माझ्या मागे लागलेत असली स्वप्नंबिप्न पडायचीच बाकी होती.
या सगळ्याचा परिणाम असा झाला की मी प्रत्येक गोष्ट,बारिकसारिक तपशील पुन्हा पुन्हा पारखून, तपासून घ्यायला लागलो. एव्हाना अंकाचं डिझाईनिंग सुरू झालेलं.तुम्ही मुद्दाम बघा.या अंकात जी भाषा वापरलीये. ज्या प्रकारे चित्र वापरलीयेत ते सगळंच.भरपूर व्हाईट स्पेस वापरून न्यूडसचं प्लेसमेंट पुन्हा पुन्हा बदलून त्यातनं अंगावर येणारी नग्नता मी जाणीवपूर्वक कमी केलीय,टोन डाऊन केलीय आणि पेंटिंगला इंपॉर्टन्स मिळेल असं पाहिलंय. या अंकात एक लेख आहे, न्यूडल्स नावाचा. सुहास बहुळकरांनी लिहीलाय, तर त्या लेखात कोल्हापूरच्या श्याम पुरेकरांनी कोल्हापूरात भरवलेल्या नग्न चित्रांच्या प्रदर्शनाचा सगळा किस्सा आहे.धमाल आहे. तर त्यावेळी त्या प्रदर्शनाला आलेल्या प्रेक्षकांनी प्रथेप्रमाणे आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या होत्या.त्यात एक बिंधास्त प्रतिक्रिया होती. सांगू? बरं सांगतो. "प्रदर्शनातली सगळी चित्रं सेक्सी आहेत,बघून बंड्या उठलाच." आहे की नाही? लक्षात घ्या.कोल्हापुरात.पण नाही घेऊ शकलो मी अंकात ही प्रतिक्रिया. जी चौकट आखून घेतली होती त्यात नव्हतं बसत असलं काही. त्यामुळे कितीही योग्य वाटली तरी नाही घेता आली.
आणि याच काळात एक दिवस मला एक फोन आला.बाई बोलत होत्या. मुलाला काहीतरी जेजेत अ‍ॅडमिशन वगैरे हवीय,भेटायचं आहे.मार्गदर्शन हवंय वगैरे.मी गडबडीतच होतो अंकाच्या.म्हटलं,कधी येताय,मग पत्ता वगैरेही दिला घरचा.तो पत्ता मी समजावून सांगायला लागलो त्यावर बाई पट्कन म्हणाल्या,"ते म्हैतीये सर्व".मला जरा आश्चर्यच वाटलं.काय असतं,असंच कुठूनतरी नाव कळतं,कुणीतरी पत्ता सांगतं, लोक धडपडत असतात,प्रयत्न करत असतात.’त्यामुळे मी पत्ता समजावून सांगत होतो.तर या एकदम तयार.म्हटलं,बरं आहे की.
चिन्ह’मुळे अनेक वेळा असं मार्गदर्शन करायची वेळ येते. करतो मीही.काय परिस्थिती आहे ना,भीषण! एखाद्यानं चित्रकलेत करियर करायचं ठरवलं तर मोडता घालायला सगळे असतात, पण माहिती द्यायला मात्र कुणीच नसतं अशी परिस्थिती आहे.असो.नंतर मी विसरून गेलो कामात. आणि मग एका सुटीच्या दिवशी सक्काळी मी स्टुडिओत काहीतरी काम करत होतो आणि बायको सांगत आली,कुणीतरी बाई आल्यात.काहीतरी मार्गदर्शन वगैरे घ्यायचंय म्हणतायत. ती पुढं म्हणाली,फोनवर बोलणं झालंय म्हणे.आधीच.मी काम करत होतो,म्हटलं दे पाठवून इकडेच.त्यावर बायको म्हणाली,इथे?तिच्याबरोबर आणखी दोघं-चौघं आहेत.मी उडालोच. मार्गदर्शन घ्यायला एवढे लोक? कमालच झाली.हातातलं काम तसंच सोडून उठलो,बाहेर गेलो.आयला खरंच!एक बाई आणि तिच्याबरोबर एका साच्यातनं काढलेले वाटावेत असे चौघं.सगळे टिळाधारी.मी काही बोलायच्या आधी त्या बाईनंच विचारलं,लिलावात चित्रांना भाव मिळावा म्हणून काय करायला लागतं हो?माझ्या डोक्यातच गेलं.सट्कन.म्हटलं,मरावं लागतं त्यासाठी.आणि त्या आधी जीवंत असताना भरपूर काम करावं लागतं.तेही उत्तम. ती सटपटलीच एकदम.मग थोडा वेळ सगळं चिडीचूप.आवाज नाही. कुणाचाच.
त्यानंतर म्हणजे "अ‍ॅडमिशनविषयी बोलणं" झाल्यावर चहा घेता घेता त्या टळटळीत टिळेवाल्यांपैकी एका टिळूनं तोंड उघडलं."तुम्ही काय हुसेनवर अंक काढताय? म्हटलं", नाही.हुसेनवर नाही.या अंकात हुसेनवर लेख आहेत.दोन." मग आणखी कुणाला कंठ फुटला. तो दरडावूनच बोलला,हुसेनवर काही छापायचं नाही.त्यानं आमच्या देवदेवतांची नग्न चित्र काढली.त्याचा उदोउदो नाही पाहिजे.मग आणखी कुणीतरी म्हणालं,त्यांनाही पटत नसणार.काढतील ते हुसेनवरचे लेख अंकातून. मी म्हटलं,हुसेनवरचा लेख तुम्ही म्हणता तसा उदोउदो करणारा वगैरे आजिबात नाहीय्ये.तो एक परखड भूमिकेतून लिहीलेला लेख आहे. त्यावर बहुतेक पहिला म्हणाला,पाहू ते लेख.आणा.दाखवा.मी चक्क नाही म्हटलं कारण एक तर ते लेख त्यावेळी घरी नव्हतेच आणि अगदी असतेच तरीही मी दाखवले नसते. मी तसं म्हटलंही सरळ.ते त्यांना नाही आवडलं. कसं आवडणार ना? त्यानंतर त्यांनी तास दीड तास खूप वाद घातला. मीही हटलो नाही.मग ते मला माझी पत्रकारितेची जबाबदारी वगैरे सांगायला लागले. मग माझीही सटकली.म्हटलं, घरी आलायत,चहा दिलाय तो घेतलात ना.आभार.पत्रकारिता वगैरे नको. मी स्वतः अनेक वर्ष पत्रकारिता करतोय. ती मला नव्यानं शिकायची आणि तीही तुमच्याकडून,आजिबात गरज वाटत नाही. वैतागले ते.साहजिकच होतं.नंतर ते म्हणाले,कुठल्यातरी अमुक ढमुक लंगोटीपत्राची वर्गणी भरा.कसलेतरी जाज्वल्य वगैरे विचार असतात म्हणे त्यात. म्हटलं,कशाला?मला जे लागतात ते पेपर मी विकत घेउन वाचतो.बाकीचे फुकट मिळाले तरी ढुंकूनही बघत नाही.म्हटलं,आणि आता बस्स झालं मलाही कामं आहेत. लेख अंकात असणार.अंक आल्यावर करा जे करायचं ते अंक पाहून.बडबड करतच गेले ते.
दुसर्‍या दिवशी सकाळी सातलाच फोन वाजला.मी घेतला.एक इसम.नाव सांगायला तयार नाही. पुन्हा पुन्हा विचारलं तरीही.तो म्हणाला"काल आमची मिटींग झाली.ठाण्यात.कळलं तुमचं सगळं आता.आज पेपरात पण छापलंय आमच्या. आता बघच.आम्ही काय करतो ते.आणि त्यानंतर सुरूच झाले फोन.बहुतेक सगळे बायकांचे.एकूण एक बिन नावांचे.वाचक नाहीतर मग साधक-फादक असलंच काहीतरी सांगायचे.शिव्या,गलिच्छ भाषेत गरळ आणि धमक्या.त्यात एका बाईंचा फोन.रायगडहून बोलतेय. आमचं महिला मंडळ आहे,अंक पाहिजेत सगळ्यांना.म्हटलं,उत्तम किती हवेत? ती म्हणाली 1000, म्हटलं तीन लाख भरा खात्यावर,ट्रकच पाठवतो भरून.ती ओरडलीच,काssssssय? लाख? तिचा विश्वासच बसेना.तिनं ठेवलाच फोन.नंतर असंच एक पोरगं होतं. म्हणजे आवाजावरून तरी तसंच वाटत होतं.तो म्हणे की हुसेनवर काय नाय पाहिजे,शिवाजी महाराजांवर लिहा. नंतर काही वेळानं पुन्हा त्याचा फ़ोन आला"शिवाजी महाराज नाही विवेकानंद.विवेकानंदांवर लिहा."एक फोन रात्री आला दहा वगैरे वाजता. गोव्याहून बोलतोय. मग म्हणाला,तुमची कॉलर ट्य़ून आवडली,अशी कॉलर ट्य़ून असणारा माणूस गैर वागूच शकणार नाही.मग म्हणाला,तुम्ही फोन घेऊ नका.मी आणखी 2-3 दा करतो फोन. कॉलर ट्य़ून ऐकतो परत. आला होता त्याचा फ़ोन पुन्हा.
काल हे लोक येउन गेले अणि लगेच दुसर्‍या दिवशी सकाळपासून फोन यायला लागले.एस एम एस ही आले चिक्कार.अभ्यासू हे सगळं आमच्या साईट्वर किंवा फ़ेसबुक अकौंट वर जाउन खात्री करून घेऊ शकतात. त्याच दिवशी दुपारी आणखी एक फोन आलेला.होत्या बाईच.पोलिस स्टेशनमधून बोलतेय. डोंबवली.ताबडतोब या इकडे.तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे आमच्याकडे.म्हटलं,काय केलं मी, तर म्हणे इकडे येऊन बघा.म्हटलं,गेल्या कित्येक वर्षात मी डोंबिवलीत गेलोही नाहीय्ये.तिथे कशी असू शकते माझ्याविरुद्ध कंप्लेंट? मग त्या म्हणाल्या,तुम्ही कुठे राहता,मी सांगितलं पत्ता वगैरे. त्याच्यानंतर रात्री साधारण 9 च्या सुमारास पुन्हा पोलिस स्टेशन मधूनच फोन.यावेळी पुरूष होता.पोलिस स्टेशनही वेगळं.तुमच्या विरुद्ध तक्रार आहे. हा फोन येईपर्यंत साधारण 70 वगैरे फोनवर मी ते किळसवाणं बोलणं ऐकलं होतं.माझं डोकं भणाणून गेलं होतं. मी म्हटलं, "आता काय केलं मी ? खून की बलात्कार?"चांगला होता तो पोलिस.हसला तो.म्हणाला,धमकी दिलीय.महिलेला. "हो? कुठं?" तर म्हणे घरी तुमच्याच.मग त्यांनीच सांगितलं, हसतच.फालतुपणा आहे हो. कळतं ना आम्हाला पण. पण काय करणार? प्रोसिजर असते ना.ठीक आहे.ठीक आहे.आणि ठेवला त्यांनी फोन.ग्रेट.
घरी मी,बायको आणि मुलगा.तो आणि मी आम्ही दोघं कामानिमित्त दिवसभर बाहेर.आमचं घर तसं गावाबाहेर म्हणावं असंच.उगाच लफडं नको म्हणून इच्छा नसताना गेलो पोलिस स्टेशनला.कारण समजल्यावर इन्सपेक्टरनी आधी खुर्ची दिली बसायला.म्हणाले,बसा हो साहेब.तुमच्यासारखी माणसं आमच्याकडे एरवी कशाला येतायत, बसा बसा. बसलो.सगळं सांगितलं.म्हणाले,काही काळजी करू नका.आम्हाला कल्पना आहे कोण असेल ह्याच्या मागं.करतो बरोबर.मग चहा आला.मी चहा घेऊन बाहेर पडलो.घरी आलो.तर घराजवळ मोटरसायकल उभी. दोघे पोलिस घरीच भेटले. म्हणाले,हे मोबाईल नंबर घ्या. काही वाटलंच तर जस्ट फोन मारा.आम्ही इकडेच असतो.फोन नंबर घेतले आणि असं काही झालं की आपल्यासारख्या मध्यमवर्गीय घरात जे होतं तसं वातावरण. त्यामुळे तसा ताणच.तिकडे फोनमधून सुरू होताच "स्वतःला संस्कॄतिरक्षक म्हणवून घेणार्‍या हुसेनद्वेष्ट्यांचा,गलिच्छ शिव्यांचा धबधबा."बघून घेऊ" च्या टिपीकल धमक्या.दिवसभरात काहीशे तरी फोन नक्कीच आले असतील.नावं कुणीही सांगितली नाहीत,विशेष म्हणजे सर्वात जास्ती फ़ोन होते बायकांचे, त्याखालोखाल मुलांचे.पुरूषांचे फोन जवळ जवळ नव्हतेच आले,चार-दोन सोडले तर. बायका-पोरांच्या मागे लपून विरोध करणारे बहुसंख्य.त्यांच किती घ्यायचं मनावर ?असे हे फोन आठवडा दहा दिवस येतच होते.जोडीला एस एम एस ही होतेच प्रचंड.थांबलं मग ते सगळंच. हळुहळू.अ‍ॅक्शन को रिअ‍ॅक्शन देत बसण्यापेक्षा मला माझा अंक,माझं काम केव्हाही मोठं होतं.मी तेच करत राह्यलो.त्यांची काही पत्रंही आली.किळसवाणी.मरो.
हा सगळा थरार जर मुळातून वाचायचा असेल,अनुभवायचा असेल तर आमच्या ब्लॉगवर या ना.(www.chinhatheartblog.blogspot.in) मस्त टाईमपास होईल तुमचा.या नग्नता अंकाच्या निर्मितीच्या काळात मला असं प्रकर्षानं जाणवायला लागलं की आता आपल्या पिढीपेक्षा येणार्‍या पिढयांकडे जास्त लक्ष द्यायला हवं.त्यांच्यापर्यंत पोचायलाच हवं.यातूनच मग 14 नोव्हेंबर 2010ला ’चिन्ह’ची वेबसाईट सुरू झाली.(www.chinha.in) एकदा नेटवर आलं की फेसबुकला नो पर्याय.मग फेसबुक अकॉंट उघडलं.मान्यच करतो अजूनही मला त्यातलं काहीही ऑपरेट करता येत नाही,कळतही नाही फारसं.पण त्याच्या ताकदीचा अंदाज मात्र नक्कीच यायला लागलाय.पोस्तं माहिती असतं आपल्याला,फेसबुकवर आल्यावर ’पोस्ट’ही
कळायला लागतं.कोंप्युटर,नेट म्हणजे इंग्लिश असं अनेकांसारखंच मलाही वाटायचं.पण असं काही नसतं.आमची साईट दिसायला इंग्लिश असली तरी असायला चक्क मराठी आहे.ती सुरू झाली आणि एकदम इतके व्हिझीटर्स आले साईटवर की बंदच पडली ती.पुन्हा चालू केली,पुन्हा बंद हे असं 2-4 दा झालं लागोपाठ.म्हटलं हे काही खरं नाही.मग शेवटी जागा की काहीतरी वाढवली म्हणे.म्हणजे नेमकं काय केलं हे मला अजून नीटसं कळलेलं नाहीच आहे.मात्र माझे काही हजार रू.गेले ते लगेचच लक्षात आलं माझ्या.आणि हो,वेबसाईट पण अजून बंद नाही पडली.म्हणजे जमलेलं दिसतंय.आमच्या या साईटला दिवसाला 15-15 हजार हिट्स होत्या त्या काळात.आजही त्या हजार दोन हजाराच्या जवळ सहज असतात. आणि त्याही कुठून कुठून. मुंबई,महाराष्ट्र किंवा देशभरातूनच नव्हे तर अमेरिका,रशिया,इंग्लंड,फ्रान्स,रुमानिया,रोम,नॉर्वे,जपान वगैरे पासून अगदी लॅटविया (कुठे आहे कुठे हा देश म्हणे),युक्रेन,सेशल्स (ही नावं तरी गेलीयेत कानावरून) अगदी पाकिस्तानातून सुद्धा हिट्स मिळाल्यात.त्या एका महिन्यात तब्बल दीड लाख हिट्स मिळवल्या ’चिन्ह’च्या साईटनं.संपूर्ण भारतातून दीड दोनशे इ मेल्स यायचे रोज.शिवाय फ़ेसबुकवरच्या पोस्टना लाईक्स आणि शेअर,कितीतरी कॉमेंटस रोज मिळत असतातच.ब्लॉगवर तर दंगाच असतो.मतं.मतांतरं चालूच असतात.अव्याहत.कुणी सांगतं,एव्ह्ढ्या हिट्स आहेत तर अ‍ॅड. घ्या ना.जाम कमवाल.तसं असेल ही तुम्ही म्हणताय म्हणजे.पण त्यासाठी मी नक्की काय करायचं?ते करायचं की माझं ’चिन्ह’चं बघू? काहीच कळेनासं झालेलं.
 दरम्यान मी माझ्या पद्धतीनं या सगळ्या प्रकारांचा अभ्यास सुरू केला.त्यात माझ्या लक्षात आलं की फ़ेसबुकवर पोस्टला महत्त्व आहे.आणि मुख्य म्हणजे ते मला जमू शकणार आहे.मग मी माझं भाषा कौशल्य,चित्र आणि फोटो याची समज असं सगळं वापरलं.लोकांच्या लाईक आणि शेअरवरून एक गणित केलं आणि घुसलोच.लागलंय जमायला हळुहळू.नग्नता अंकाची जाहिरातही मी अशी फ़ेसबुकच्या माध्यमातून करायचं ठरवलं.एक जाहिरात मी अशी केली की "जर तुम्ही टीव्हीवरची/चित्रपटातली/सिरीयल्स मधली नग्नता,किंवा मिड्-डे सारख्या नियतकालिकातून प्रसिद्ध होणारी छायाचित्र हट्टानं पाहात नसाल (नाहीतर ती दिसतातच) तर मग नग्नताचा अंक तुमच्यासाठी नाही.माझ्या मनात असं होतं की आपली इच्छा असो वा नसो वेगवेगळ्या बाजूनं नग्नता आपल्यालावर आदळतच असते.त्याचं आपण काय करतो वगैरे. ही पोस्ट लिहीत असताना शर्मिला आली होती.शर्मिला फडके.’चिन्ह’ची कार्यकारी संपादक.माझी कामाची पद्धत अशी आहे की काही नवीन करत असताना मी ते संबंधितांना दाखवत असतो,त्यांचं मत घेत असतो,त्याप्रमाणे लागले तर बदलही करत असतो.शर्मिला आलीच होती,मी उत्साहानं तिला ती जाहिरातवजा पोस्ट दाखवली.झालं.ती एकदम कंडेमच करायला लागली.हे खूप निगेटिव्ह होतंय.नग्नतेला महत्त्व मिळतंय अवास्तव.चित्रांपेक्षा. याला काहीच अर्थ नाही.वगैरे,वगैरे.हे कमी की काय म्हणून तिथं मोनाली मेहेरही होती आलेली.तीच.ती परदेशात आर्ट परफॉर्मन्सेस देणारी. तीची मुलाखत आहे या अंकात.ती पण बोलायला लागली. नग्नता नावच काढा. माझ्या परफॉर्मन्सचे फोटो नाही छापायचे.मॅटर लिहा तुम्ही.वगैरे वगैरे.हे काय, मी काय करायचं संपादक म्हणून ते मला कुणी डिक्टेक्ट कसं करू शकतं?त्यात ती नंतर परदेशीच गेली.तिचे कुठून हॉलंडहून फ़ोन यायला लागले,त्यात ती इमोशनल व्हायची.सगळीच गोची.त्यात हुसेन गेल्यामुळे कव्हरला हुसेन घ्यायचंच ठरवलं होतं.पण तो फोटो आला नाही आणि ती मुलाखतच राहिली शेवटी अंकात.नुसता मनस्ताप झाला.
त्यात आणिक एक कटकट म्हणजे मी या अंकापासून बाजूला व्हायचं ठरवलं होतं.शर्मिला या अंकापासून संपादक असणार होती.तसं मी अनेकांना पत्र लिहून रीतसर कळवलंही होतं.पण मघाशी सांगितलं तसं घरी टिळू आले आणि मी ठरवलं की नको दुसरं कुणीही.मीच संपादक राहीन.निदान या अंकाचा तरी. उगाच कोर्ट-कचेर्‍या,अटका होणार असतील तर ते आपण पाहून घेऊ.पण शर्मिला संपादक असणार होती म्हणून या नग्नता अंका बाबतची ’चिन्ह’ची भूमिका तिनं मांडावी असा माझा आग्रह होता. आत्ता अंकात तिनं लिहीलेलीच भूमिका आहे.खूप छान लिहीलंय तिनं.असं सगळं.
आधीच दुनियाभराची टेन्शन्स;त्यात या अशा हादरवून टाकणार्‍या कटकटीतूनच होता होता झाला तयार अंक.किती वेळ लागला असेल या सगळ्याला? काही अंदाज?तब्बल 11 महिने.हो.अक्षरशः अकरा महिने काम केलं या अंकासाठी. लेट म्हणजे काय,वाईट उशीर झाला सगळ्याला.त्यात या काळातच हुसेन गेला अचानक.त्यामुळे अंकाचं सगळं प्लॅनिंगच मुळापासून ढवळून निघालं.प्रभाकर कोलत्यांचे 2 लेख आहेत या अंकात. दोन्ही हुसेनवरच.आधी आणि नंतर अशी शीर्षकं देऊन छापलेत ते या अंकात.मोनाली बरोबरच्या वादानंतर कव्हरचाही प्रश्न निर्माण झाला. मग 2 कव्हरांची आयडिया केली.आयला,गंमत आहे ना,नग्नतेवरचा अंक आणि त्याला 2-2 कव्हरं! त्यात कव्हरवर जे न्यूड छापलंय तेही मूळ बदललंय. मूळ फ्रंटल होतं,म्हणजे पुढून.ते बदललं.त्यानं आणखी कुणाचा पापड मोडायला नको उगीच.आणि जे नवं घेतलं ते इतकं फिट्टं बसलं,कलर स्किम वगैरे की तेच मूळ वाटावं.
या सगळ्या एक प्रकारच्या तडजोडीच,त्या अर्थानं. त्या केल्या कारण आपण जिंकणं किंवा कुणाला तरी हरवणं यापेक्षाही महत्वाचं होतं हा विषय लोकांपर्यंत जाणं.याचं भान सतत होतं.
साईट,ब्लॉग आणि फ़ेसबुकमुळे अंकाची हवा तर उत्तम झाली होती. हो,हो हाईप.हाईप झाली होती.जार्गन,जार्गन टाका नाईक.दॅट मॅटर्स.आणखी एक.मला वाटलं होतं की फ़ेसबुकवर तरुणांचा सहभाग मोठा असेल,तो होताच पण त्याच्या बरोबरच किंवा त्याच्याहून जास्ती बायकांचा सहभाग प्रचंड होता.मी एक्सपेक्टच केलं नव्हतं हे आधी.अंक प्रकाशित झाल्यावर आभिनंदनाचे,कौतुकाचे जे फोन आले त्यातही बायकाचं प्रमाण खूप मोठं होतं.मला आजही हे खूप महत्वाचं वाटतं.मोनाली मेहेरच्या आईंनी आवर्जून फोन करून अंकाचं कौतुक केलं,अभिनंदन केलं माझं,अंक उत्तम आहे,सगळं छान जमून आलंय असं म्हणत होत्या.तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या कन्या अरुंधती खंडकर यांनी आवर्जून फोन करून अंक मागवून घेतला.डॉ.प्रकाश कोठारींनी खूप कौतुक केलं.नेमाड्यांचा फोन नाही आला मात्र त्यांच्या पट्टशिष्यांचे फोन आले.’सरांनी सांगितलय,हा अंक वाचाच.’मेघना पेठेंनी सांगितलं फोन करून,तू अंक काढायला इतका वेळ लावलास आता मी पण वेळ घेऊन वाचीन आणि मग कळवीन.अजून कळवतेय ती.कविता महाजनांनी फ़ार उत्तम लिहीलंय ब्लॉगवर,अंकाबद्दल.या थोरामोठ्यांबरोबरच खरंतर या सगळ्याहून कांकणभर जास्तच गाजला सावित्री जगदाळे या पश्चिम महाराष्ट्रातल्या एका लेखिकेचा अभिप्राय.ब्लॉगवर मोठं पत्रच लिहीलं त्यांनी.ते मूळ पत्र वाचायलाच पाहिजे तुम्ही.मस्ट आहे ते.(www.chinhatheartblog.blogspot.in) किमान तीन साडेतीन हजारापेक्षा जास्त लोकांनी  वाचला तो अभिप्राय.खूप जणांनी चर्चाही केली मनापासून.त्यावर आपली मतं मांडली.अंक प्रकाशित झाल्यावर काही महिने उठता-बसता फोन होते.इथे एका फोनचा आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे मला.मालेगावहून आला होता फोन. नाव  होतं. अंक विकत घेतला होता त्यांनी.मी हिंदीत सुरूवात केली.ते अस्खलित मराठीत बोलत होते. म्हणाले,"धीर करूनच घेतला अंक;आमच्या मुसलमान धर्मात नग्नतेचा कायमच कडाडून विरोध होत राहिलाय,आणि आजही कुणी सापडलाच तर त्याची खैर नाही.पण तरीही मागवला मी अंक. खरंच,मनापासून सांगतो,आता काहीही शंका ऊरलीच नाही मनात.सगळे संशय फिटले.पूर्ण. शुक्रिया साहब! नग्नता अंकानं कमावलेलं हे सर्टिफिकेट मला कायम बळ देत राहील. हे असे सगळेच्या सगळे कौतुकाचे फोन.मुद्दाम सांगायचं म्हणजे प्रतिकूल प्रतिक्रियेचा एकही फोन नाही आला.अजूनही नाही.आय स्वेअर.आधी ज्यांनी गलिच्छ भाषेत फोन करून धमक्या दिल्या होत्या त्यांच्यापैकीतर  कुणाचाच नाही.बहुतेक त्यांच्या "त्या" पेपराला याची खबरच लागली नसावी अजून,आणि त्यामुळे हिज मास्टर्स व्हॉईस सारखे ते ही आदेशाच्या प्रतिक्षेत असावेत.
आता ह्या नग्नता अंकाच्या यशानंतर माझा उत्साह तर प्रचंड वाढलाय.’चिन्ह’च्या आगामी अंकातही एक मोठा सेक्शन आहे या नग्नता विषयावर आणि आताच सांगतो पुढच्या अंकातही असणार आहेच.ट्रायोलॉजीच करणार मी या नग्नतेवर.बघालच तुम्ही.

शब्दांकन - नितीन ठाकूर
       









Friday, March 9, 2012

प्रवाहापलीकडे..


अमूर्त चित्र हे अमूर्तच असते. त्याला इतर वेगळी ओळख नाही. थेट तुमच्या समोर येऊन तुम्हाला ते भिडते. एका समीक्षकाने माझ्या चित्राबद्दल लिहिले की याला काही सुरुवात, शेवट दिसतच नाही.
जरी त्याला ते अभिप्रेत नसले तरी मला हा मोठाच प्रशंसोद्गार वाटला. ~जॅक्सन पोलॉक

(स्टुडिओ- प्रकाश वाघमारे)


शांत, रम्य नदीकाठी, हिरव्या, दाट वनराईच्या पार्श्वभूमीवर एखाद्या चित्रकाराचा स्वत:चा स्टुडिओ असणं हे अकल्पित नक्कीच नाही.
पण जर तो चित्रकार आणि त्याचा असा स्टुडिओ भर मुंबई शहरात आहेत असं कोणी मला आधी सांगीतलं असतं तर मी त्याला वेडा ठरवलं असतं. 

पण एका मंगळवारी सकाळी ११ वाजता मी चित्रकार प्रकाश वाघमारेच्या स्टुडिओत उभी होते आणि समोरच्या प्रशस्त खिडकीच्या चौकटीतून मला मोकळं आकाश, दाट जंगलात वळण घेत नाहीशी झालेली पायवाट, गर्द वृक्षराजीला लागून नदीचं खळाळतं पात्र असं सगळं दिसत होतं
प्रकाश ऍबस्ट्रॅक्ट पेंटर आहे हे माहीत होतं म्हणजे हा त्याने रंगवलेला कॅनव्हास निश्चित नाही, कोल्हापूर स्कूलच्या एखाद्या कसबी चित्रकाराने काढलेलं हे एक नयनरम्य, रिऍलिस्टीक शैलीतलं निसर्गदृश्य समोरच्या चौकटीत बंदिस्त असणार, कारण बोरीवलीच्या एका इमारतीतल्या पाचव्या मजल्यावरुन प्रत्यक्षात असं काही मला दिसणं शक्य नाही असं मनाशी म्हणत मी चौकटीच्या आणखी जवळ जाते.



निसर्गचित्र भलतंच जिवंत असतंखालून वहाणार्‍या नदीच्या काठावर धोबी एका लयीत हातातले कपडे आपटत असतातकाळ्या कातळावर वाळत घातलेल्या कपड्यांचे काही शुभ्रकाही रंगीत चौकोनीआयताकृती पॅटर्न्स.. खिडकीच्या चौकटीला लागूनच जरा खाली पिंपळाच्या पानांचा सळसळता पसारा आणि त्यावर खालच्या नदीच्या पात्राकडे मान तिरकी करत डोकावून बघणारा चक्क एक रंगीत खंड्याहीनदीच्या पलीकडच्या काठावर गुलाबी टबुबिया मनसोक्त फुललेलाचिंचेची काळसर हिरवी दाटी आणि बाजूलाच एक उंच निष्पर्ण झाडहीपर्स्पेक्टीव्ह पूर्ण.
निसर्गचित्रातल्या शिशिराच्या खूणा अजून ठळक होत्याताज्या हिरव्या रंगाऐवजी पिवळ्यातपकिरीयलो ऑकरच्या छटा जास्त दिसत होत्या.



प्रकाश वाघमारे, ज्याला भेटायला मी या स्टुडिओत आले असते, त्याचा आवाज आता मला ऐकायला येतो. तो सांगत असतो- "मी पहिल्यांदा ही जागा पाहिली तेव्हा एप्रिल-मेचे दिवस होते. गुलमोहोर, पळस, अमलताश फ़ुलण्याचा ऋतू.. हा सगळा पट्टा लालभडक, केशरी आणि पिवळा दिसत होता. ते दृश्य बघीतलं आणि ठरवलं की स्टुडिओ असावा तर इथेच." 
नक्कीच. मी मान डोलावते.
आणि मग खिडकीच्या कट्ट्यावरच बैठक जमवून आमच्यातला संवाद सुरु होतो.
प्रकाश गेली जवळपास दोन दशके चित्र काढतो आहे. त्याची चित्र अमूर्त असतात आणि त्यामुळे नाही म्हटलं तरी माझ्या मनावर एक दडपण असतं. याच्या चित्रांची भाषा आपल्याला समजेल का, समजलेली बरोबर असेल का, आणि तीच त्यालाही अभिप्रेत असेल का, मला माहीत नव्हतं.
 आम्ही  बोलत होतो तिथेच बाजूला एक मोठा निळाशार कॅनव्हास होता. डोहात वारंवार डोकावून बघायचा मनाला मोह व्हावा, त्यातल्या प्रकाशाच्या तिरिपींकडे, कवडशांकडे पुन्हा पुन्हा निरखून पहाण्याचा मोह व्हावा आणि तसं बघत असतानाच निळ्या डोहातली निरव शांतता मनापर्यंत पोचावी, तसं काहीसं प्रकाशशी बोलत असताना त्या कॅनव्हासकडे नजर वळली की होत होतं.

दरम्यान प्रकाश त्याच्या स्टुडिओबद्दल, चित्रांबद्दल, चित्रकलेबद्दल बोलत असतो आणि मी ऐकत असते.
- "एकांत अवकाश ही स्टुडिओची माझ्या मनातली संकल्पना. स्टुडिओ म्हणजे तुम्हाला विचार करण्यासाठी मिळणारा वेळ. जो तुम्हाला राहत्या घरात मिळू शकत नाही. जिथे फक्त तुम्ही, तुमची चित्रे, मनातले विचार असतात. काहीही व्यत्यय मधे न येता, एकसंध विचारांच्या प्रोसेसमधे हातून जे काम घडतं ते महत्वाचं असतं असं मला वाटतं. अशा एकांतात, एकसंध विचारांच्या प्रोसेसमधून तुम्ही मेडीटेशनमधे जाता. चित्र काढण्याकरता ही विशिष्ट मानसिक अवस्था मला गरजेची वाटते. 
दोन वर्षांपूर्वी मी या जागेत आलो.
त्याआधी विरारला होतो. विरारच्या घरात चित्र काढायला माझी वेगळी खोली होती पण एकांत नव्हता. सतत डिस्टर्बन्समधे जायचो मी. आणि एकदा डिस्टर्बन्समधे चित्र गेलं की ते अर्धवटच रहायचं. पूर्ण करायचा नंतर कितीही, अगदी जबरदस्तीने प्रयत्न केला तर ते खराब व्हायचं.
त्यावेळी मला जाणवलं की आपल्याला चित्र काढण्याकरता स्वतंत्र जागेची गरज आहे. मग विरारला वेगळी जागा घेतली चित्र काढायला. आणि तशी वेगळी जागा झाल्यावर मनात इतका फोर्स आला ना, मला स्वत:लाच आश्चर्य वाटेल एव्हढी मी कामं केली त्या काळात, कारण कोणीच नाही तिथे डिस्टर्ब करायला. फक्त मी आणि माझी चित्रं. ही २००५ ची गोष्ट.
शिक्षण संपल्यावर मधे बराच काळ गेल्यानंतर ही माझी अशी वेगळी, स्वतंत्र जागा मला मिळाली होती. मधल्या काळात मी घरी, किंवा इतर ठिकाणीही, बाहेर जिथे जागा मिळेल तिकडे काम करत होतो. आम्ही एक लॅन्ड घेतली होती त्यावर एक अगदी ओपन अशी स्पेस.. लाद्या वगैरे नव्हत्या, वरुन मोकळी, तिथे जाऊन काम करायचो. नितीनच्या दादरा नगरहवेलीला जाऊन काम केलं, सफ़ाळ्याला केलं, जिथे मोकळी जागा असेल तिथे काम करायचो. ज्यावेळी थोडे पैसे हातात आले, त्यावेळी स्वतंत्र स्टुडिओ घेतला.
एकांतासाठी मी सतत धडपडत असायचो. तुमचं आणि चित्राचं नातं ख-या अर्थाने अशा एकांतातच निर्माण होतं. घरात असताना हे होत नाही. नंतर पुन्हा दुसरा स्टुडिओ घेतला मी. तोही विरारलाच. त्याचाही चांगला अनुभव आला.
त्यानंतर मग आत्ता आहे त्या जागी आलो.
एक आर्टकॅम्प झाला होता नॅशनल पार्कमधे. त्यावेळीच मला हा परिसर बघताक्षणीच खूप आवडला होता. ठरवलं इथेच स्टुडिओ थाटायचा. खरं तर यापेक्षाही एक मोठी जागा मला बोरीवली वेस्टला मिळत होती, पण त्या गर्दीत मला जायचं नव्हतं, निसर्गाच्या जवळ जागा हवी होती. लहान तर लहान. २००७ ला ही जागा मी बुक केली. २००६ ला माझा स्वतंत्र शो झाला होता. त्या शोमुळे खूप फ़ायनान्शियल सपोर्ट मिळाला. त्यामुळे ही जागा घेता आली. इथे शिफ़्ट झालो २००८-९ ला."

ही जागा लहान आहे असं प्रकाश म्हणाला तेव्हा मला खरं तर आश्चर्य वाटलं. कारण दरवाज्यातून आत शिरल्यावर या जागेचं पहिलं इम्प्रेशन मनात उमटतं, किती प्रशस्त, मोकळी जागा आहे. एक सलग मोकळा हॉल, टोकाला ओपन किचन, डाव्या बाजूला पार्टिशनच्या मागे टॉयलेट युनिट आणि मग बेडरुम. काहीही क्लटर नसलेला स्वच्छ, मोकळा अंतर्भाग, भरपूर प्रकाश आणि वावरायला मोकळी जागा. ही सगळी स्पेस कुठून आली?
प्रकाश उठून हाताने दाखवतो त्याने काय काय, कसे बदल केले आहेत ते.

-"या जागेचा आत्ता आहे तो सगळा अंतर्भाग मी मला हवा तसा डिझाईन केला. डोक्यात होतंच मला काय हवय ते. आतल्या सिव्हिल स्ट्रक्चरमधे शक्य होते तेव्हढे सगळे बदल केले. किचन आणि लिव्हिंगरुममधल्या जागेवर बाथरुम युनिट होतं ते काढून टाकून एक सलग मोकळी जागा तयार केली. चित्र काढायला, ती ठेवायला मोकळी स्पेस मिळाली पाहीजे हा मुख्य उद्देश होता.
चित्र काढताना मला स्पेसअंतर महत्वाचं वाटतंते पुरेसं मिळायला हवं
चित्र कधी पूर्ण होईल नाही सांगत येतएक महीना लागतोजास्तहीकधी कधी या बीनबॅगवर बसून तासन तास मी नुसताच चित्राकडे बघत बसतो, तंद्री लागते, कधी कधी त्यावरच झोपही लागते बघताना.
अर्थात चित्र संपूर्ण होत असतानाची ही प्रोसेस आहे, मधली प्रोसेस काय ते मला सांगता येणार नाही. ब्लॅन्कनेस, पोकळी मनात असते. ती मी तशीच राहू देतो.
विचार करुन हेच करायचय असं कधीच होत नाही. त्याशिवाय पुढच्या टप्प्यापर्यंत आपण पोचत नाही असं मला वाटतं.
ही मागची दोन चित्र आहेत, त्यांच्यावर चुकीचे रंग लागले. फ़ेबिओ आणि कॅम्लिन, रंगाच्या कंपन्या वेगळ्या, रंगांची नाव सारखी असूनही आतले रंग वेगळे. कॅम्लिनचा रंग वापरला आणि काही कळेनाच चित्र. एकदम फ़्लॅट. मग दुसरे रंग त्यात मिसळून पुन्हा प्रयत्न केला तर जे फ़ॉर्म्स होते तेही गायब. चित्र असं डिस्टर्ब झालं की मग बाजूला ठेवण्यावाचून पर्याय नसतो. आता मी त्यावर ऑइल करायचा प्रयत्न केलाय, बघूया.
अर्थात हे सिरियस काम नाही. हे खेळणं आहे रंगांशी. पण काही तरी त्यातून मिळतं, आणि मग तिथून सुरुवात होते नव्या कामाची. आता कदाचित यातून पुढची प्रोसेस मला मिळेल. पुढे सरकण्याची गरज आहे हे मनाला जाणवतय.
गेल्यावर्षी तर फक्त पेपरवर्क केलं मी. ते अचानक होत गेलं. म्हणजे मी पेपर्स घेतले आणि आता करु काय, म्हणून ब्लॅक इन्कने सुरुवात केली, मग विचार केला आता रोलर वापरुया, काय होतय बघूया म्हणत लाइन करायला गेलो, आणि नंतर एव्ह्ढे बदल होत गेले अचानक. मजा येत गेली आणि त्यातून २५-३० पेंटींग झाली, पेपरवर. पण नंतर मी सुरुवात केली करायला परत तर जाणवलं, झालं आता यात काम करुन. पुन्हा नाही झालं.
प्रोसेस पुढे सरकायची थांबते ती अशी. मग कॅनव्हासवर आलं ते. कॅनव्हासवर करायला पाहीजे मला असं वाटलं. आता ही सुद्धा प्रोसेस पुढे सरकत नाहीय, हा शेवटचा कॅनव्हास असणार या सिरिजमधला.
(प्रकाश जो ब्ल्यू कॅनव्हास समोर होता त्याकडे हात दाखवून सांगतो).
आता पुढचं काही खुणावतय. चित्र संवाद साधेल याची वाट पहातोय. चित्राला त्याचवेळी सुरुवात होऊ शकते.

चौकटीबाहेर दुपार लखलखती. पण आतला उजेड तीव्र नाही. हिरव्या झाडांमधून गाळून आत येण्यामुळे तो मऊ, कोमल झालेला आहे. 
खिडकीच्या समोरच्या भिंतीला लागून मोठे कॅनव्हास उलटे करुन ठेवलेले असतात. ते आता प्रकाश एक एक करुन सुलट करतो आणि मला त्याची चित्र दाखवतो. 
आर्ट गॅल-यांमधे जाऊन एखाद्या चित्रकाराची चित्रं बघणं आणि त्याच्या प्रत्यक्ष स्टुडिओत ती बघणं यामधे सिनेमात काश्मिर बघणे आणि प्रत्यक्षात बघणे इतकं अंतर. स्टुडिओतल्या चित्रात तुम्ही प्रवेश करु शकता. आर्ट गॅलरीतलं चित्र तुमच्यात आणि त्याच्यात नको इतकं अंतर राखतं.
प्रकाशच्या ऍबस्ट्रॅक्ट पेंटींग्जच्या बाबतीत तर ती त्याच्या स्टुडिओत जाऊन बघायला मिळण्याचा अनुभव माझ्या दृष्टीने फार महत्वाचा होता
चित्रांचे कॅनव्हास काही जमिनीवर आडवे, काही भिंतीला लागून, काही एकमेकांसमोर, एकावर एक. तैलरंगाचा पोत, कधी खडबडीत, कठीण, कधी हळूवार मऊ, ब्रशचे फ़टकारे कधी हलके, कधी जोरकस, आणि निळे, हिरवे, लाल, तपकिरी, अर्दन, अवकाशमय, नैसर्गिक रंगांचे टोन्स. त्यातले उजेडाचे चौकोन, फ़टी.. काही चिन्हं, काही अनाहत आकार, ओळखीचे, अनोळखी वाटणारे.. उर्जेचे, लयीचे आणि उत्पत्तीचे, विलयाचेही. खोल, उसळी मारुन बाहेर येतो आहे तोही शांततेचाच प्रवाह.. निरव, आध्यात्मिक. 


प्रकाशचं बोलणं माझी उमज सोपी करत जातं अजूनच. मी चित्र पहाते, त्याचं बोलणं ऐकते, आणि पुन्हा चित्र पहाते. 
- "चित्राची भाषा कळायला कठीण नाही, तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलात ना तर ते खूप सोपं आहे. त्याकरता सारखी चित्रं बघायला हवीत, चित्रकारांशी बोलायला पाहीजे. चित्रातली प्रतिकात्मकता वगैरेही जाणून घ्यायची फ़ार गरज नसते, मुळात प्रतिकात्मकता म्हणजे नक्की काय? सबजेक्टला एका छोट्या चिन्हात अडकवून ठेवलेली गोष्ट आहे ती.

ऍब्स्ट्रॅक्शनकडे नेणारा हा जो प्रवास असतो- प्रकाश सुरुवातीपासून त्याच मार्गावर होता का?

(प्रश्नाचं उत्तर सविस्तर असणार माहीत होतं. त्यामुळे आता चहा घेणार का? या त्याच्या उत्तरावर मी आवर्जुन हो सांगते. प्रकाश चहा-शौकिन आहे असं त्याच्याच बोलण्यावरुन समजतं. देशी-विदेशी अनेक प्रकारचे चहा त्याच्या संग्रहात असतात. मला हे आवडतं. पण सध्या मी देशी, लाल, दुधाच्या चहावरच समाधान मानायचं ठरवते. कारण प्रकाशच्या उत्तरातून जे सापडणार होतं त्याचा आस्वाद माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचा, गरजेचा असतो. )

-"८४-९० हा काळ मी जेजेमधे होतो. जेजे मधे मला ऍडमिशन मिळाली नव्हती आधी त्यामुळे एक वर्ष मी ग्रान्टरोडच्या चित्रकलामंदिरमधे होतो. घरुन प्रेशर होतं, तु आय़टीआय कर आणि नोकरीला लाग. हे काय करतोस. धंदे चित्र काढण्याचे. मध्यमवर्गीय कुटुंबातला जो नेहमीचा प्रॉब्लेम तोच. या भांडणामधे एक वर्ष तसंच गेलं. मला जेजेलाच प्रवेश हवा होता. ते वातावरण बघीतलेलं होतं चित्रकलेचं. रहेजामधे ते नव्हतं. झगडून काय काय केलं पण घेतली ऍडमिशन जेजेला. घरुन अजिबात सपोर्ट नव्हता. झोपायला जागा होती, दोन वेळा जेवायला मिळत होतं म्हणून ते घर. बाकी कमवायचं तु, तुझं शिक्षण तु घे, त्याकरता काय ते प्रयत्न तु कर.

कॉलेजात सुरुवातीला पोर्ट्रेट्स आणि लॅन्डस्केप्स खूप करायचो आम्ही. कॉलेज सुटल्यावरही आम्ही हॉबी क्लासमधे बसू द्या अशी अनिल नाईक सरांना विनंती करायचो. कॉलेज साडेतीनला सुटल्यानंतर हे क्लास सुरु व्हायचे. मग आम्ही स्केचिंग, लॅन्ड्स्केप्स असं करत तिथेच बसायचो. घरी जाऊन तरी करणार काय? 
ही चित्र करताना माझ्या मनात विचार यायचा की हे आपण का करतोय? मी सरफ़ेसचा खूप विचार करायचो. झाडाच्या खोडाचे सरफ़ेस, हे किती वेगवेगळे आहेत, हे कसे उतरवणार, असे प्रश्न पडायचे त्यावेळेला, पण विचार नव्हता तेव्हढा.
मग माझ्याकडे कॅमेरा आला. फोटोग्राफी खूप करायला लागलो. नैसर्गिक गोष्टींची, ज्या आपल्या नजरेला वेगळ्या वाटतात त्या मी शूट करत गेलो, त्याच बरोबर मी चित्रकारांच्या पेंटींग्जचे फोटोग्राफ़्सही खूप घेत असे.
कॉलेजमधे हरिहरेश्वरचा कॅम्प होता, त्यावेळी सगळे पेंटींग करत असताना मी शूट करत होतो, दगडांचे खूप फोटो काढले मी तेव्हा. दगडावरचं टेक्स्चर वगैरे त्यात जे आलं ते बघून आर्टिस्ट सेन्टरमधे प्रफ़ुल्ला डहाणूकर उडाल्या, अरे मला कसं दिसलं नव्हतं हे? म्हणाल्या.
म्हणजे एक वेगळी दृष्टी येतच होती तेव्हापासून. पण वाटायचं कॅमेरा काही सेकंदात जे टिपतो, त्याकरता आपण इतके दिवस कशाकरता घालवतो पेंटींगमधे. याच्यावर काहीतरी विचार करायला पाहीजे हे जाणवायला लागलं.
सुरुवात इथे झाली होती. आणि माझ्या चित्रात त्याच सुमारास त्रिकोण यायला लागले होते.
प्रोफ़ेसर बघायचे आणि म्हणायचे वा, सुंदर झालय.
पण सुंदर झालय म्हणजे काय?
आम्हाला अजून पेंटींगच कळायचं नाही. करतोय, हातून होतय, पण त्याचा अर्थ कळत नाही. हे असं का, कळत नव्हतं.
त्यानंतर आम्हाला कोलतेसर आले शिकवायला जे जे मधे. ते औरंगाबादल काही महिने होते, तिथून पुन्हा इथे आले पेंटींग शिकवायला.
एक दिवस अचानक ते मी चित्र काढत असताना आले आणि म्हणाले, "अरे, तु काय करतो आहेस माहीत आहे का? तु गायतोंडे रंगवतो आहेस."
मला गायतोंडे कोण तेही माहीत नव्हतं तेव्हा. पॉल क्ली सुद्धा माहीत नव्हते.
"तो त्रिकोण म्हणजे काय माहित आहे का तुला?" कोलतेंनी विचारलं.
म्हटलं,"नाही सर. जॉमेट्रिकल फ़ॉर्म आहे हा, इतकंच माहीत आहे."
हे उत्तर माझ्याकडून गेल्यावर सर म्हणाले, "शोध आणि पंधरा दिवसांनी येऊन भेट मला उत्तर घेऊन. पेंटींगची आवड आहे ना? मग हा शोध घ्यायलाच हवास तु."
हे चॅलेंज मी स्वीकारलं. भारावल्यासारखा, अक्षरश: वेड्यासारखा मी लायब्ररीमधे जाऊन बसायला लागलो. कधी काही न वाचणारा मी पुस्तकं वाचायला लागलो, मित्रांबरोबरही त्याचीच चर्चा.
पुस्तक चाळत असताना मी तंत्राची वगैरे पुस्तकंही बघीतली. पण यापेक्षाही एक महत्वाची गोष्ट घडून आली.
श्रावण महिना चालू होता, म्हणून मी माझ्या गावी गेलो होतो. घरी ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होतं.
माझे आजोबा अर्थ सांगत होते- "रजोगुण,तमोगुण, सद्गुण म्हणजे काय? त्रिकोण आहे बर का."
काय योगायोग होता तो. मी असा पायरीवर पाय ठेवतोय, आणि हे शब्द ऐकतोय.
त्या रात्री मी आजोबांना झोपू दिलं नाही. त्यानंतर मग विचारांची आवर्तनंच सुरु झाली.
मग गावाला जत्रेत किंवा संकष्टी चतुर्थीला घरात रांगोळी किंवा चुन्याने जो आकार काढतात, कना असं म्हणतात कोकणात, तो जो एक विशिष्ट आकार आहे, त्याबद्दलही विचारायला लागलो सगळ्यांना. चौकोनामधे त्रिकोण असतात, त्यांना सजवतात. त्याचा अर्थ विचारुन सगळ्यांना भंडावून सोडलं. गावची जत्रा असताना सगळ्यांच्याच अंगणात ती सारखीच आकृती असते. त्यात काहीतरी वेगळी एनर्जी दिसायला लागली मला. देवीची पालखी निघून गेली की ती एनर्जी निघून गेल्यासारखी वाटायची.
गावातल्यांकरता त्या आकृत्या रुटिन होत्या, एक प्रथा म्हणून अर्थ न कळताच त्या ते चितारत होते. मला मात्र विचार थांबवता येत नव्हते. वाटलं की हा फ़ॉर्म त्रिमितीत घेतला तर काय होईल, तर त्याचा पिरॅमिड झाला.
मग मात्र मी जास्त खोलात जाऊन अभ्यास करायला लागलो. काय आहे हा पिरॅमिड नक्की? इजिप्तचे पिरॅमिड.. त्यात किती एनर्जी असते, पॉझिटीव्हिटी किती असते, हा सगळा विचार मग चित्रांतून जास्त सखोलतेनं, जाणीवपूर्वक यायला लागला.
पंधरा दिवसांनी सरांना भेटलो.
त्यानंतरच्या त्यांच्यासोबतच्या चर्चेत मग ज्या गोष्टी मिळाल्या त्या अजूनपर्यंत पुरताहेत मला.
त्यातूनच मी पुढे डेव्हलप होत गेलो. पण मुळ ऍब्स्ट्रॅक्शनला सुरुवात इथून झाली. त्रिकोण- त्याचा अर्थ काय, कसा असतो, का असतो.. या विचारातून. बिंदू, वर्तुळ हे नंतरचे.
खरं तर कुठलेही चित्रकलेचे सर तुम्हाला भौमितिक आकार रंगवायला देतात, वर्तुळ, त्रिकोण, अर्धवर्तुळ किंवा चौकोन रंगवा, आणि हे कॉम्पोझिशन तयार करा. पण कधी सरांना कोणी विचारत नाही, की हे आकारच का देता आम्हाला रंगवायला.
गती, स्थिती आणि लय हे मुळ फ़ॉर्म आहेत. गती म्हणजे वर्तुळ, स्थिती म्हणजे चौकोन आणि लय म्हणजे त्रिकोण. हा बेस आहे. इथून सुरुवात आहे. हा बेस समजवून दिला कोलतेसरांनी. माझे ते गुरु आहेत."

ऍबस्ट्रॅक्शनची इतकी सोपी आणि सुंदर मुलभूत रचना.. मला अचानक जगातल्या सगळ्या चित्रांचा मुळ गाभा एकदाचा समजलाय असं काहीतरी अचानक वाटायला लागलंय.
माझ्या मनात मगशी गायतोंडेंचं वाक्य घोळत होतं. त्याला तेही विचारुन टाकलं.

गायतोंडे म्हणायचे मी ऍब्स्ट्रॅक्ट पेंटर नाही, मी फक्त पेंटर आहे. ते का नक्की?

प्रकाश समजुतदारज्ञानी हसतो. आणि मला समजेल अशा सोप्या भाषेत सांगतो-

"पेंटींग मधे रिऍलिस्टीक, ऍब्स्ट्रॅक्ट असं काही नसतंच खरं. तुम्ही पेंट काय करता याला महत्व आहे. पण म्हणून नुसतं रंग लावणं म्हणजेही पेंटींग नाही ना. नाहीतर रंगारी सुद्धा स्वत:ला चित्रकारच समजतील. पेंटींगमधे भेद नसावाच. माणसासारखं दिसतय म्हणून हे रिऍलिस्टीक पेंटींग, माणसासारखं दिसत नाही हा आकार म्हणून हे ऍबस्ट्रॅक्ट असं काही नाही. आपण पेंटींग बघताना हे अमूर्त बघतोय की मूर्त यात बघणा-याने अडकून पडता कामा नये.
या सगळ्या गोष्टी निसर्गात आहेत, पण आपली दृष्टी कमी पडते, सौंदर्य बघण्याची आपली दृष्टी कमी पडते.
आपण लिमिटेड सौंदर्यात अडकलेलो आहोत. बारकाईने बघायची गरज असते. तरच या गोष्टी दिसतील. दगडांचे आकार बघा. त्यांचं अंतरंग बघा. मुळात ती चित्रेच असतात. निसर्गाने सगळंच दिलेलं असतं. पोत असतो, रंग असतात, आकार असतात. चित्रकार हा निमित्त असतो ते लोकांपर्यंत पोचवायला. पण त्याआधी त्याला निसर्गातले मूलाकार समजावून घ्यायला हवेत ना. दृष्टी तुम्हाला व्हायब्रेट करत असते तिथे पोचण्याकरता. जाणीव करुन देत असते की हे बघ आणि हे लोकांपर्यंत पोचव.
सुरुवातीच्या काळात केलेल्या फोटोग्राफ़ीचा मला याकरता खूपच फ़ायदा झाला. ही दृष्टी डेव्हलप करण्याकरता. लेन्स तुम्हाला खूप जवळपर्यंत पोचवत असते. बारकाईने वस्तूकडे बघायला तुम्हाला प्रवृत्त करते."

लेन्स जे काही सेकंदात टिपते त्याकरता आपल्याला पेंटींग करायची काय गरज, याकरता जो विचार केला, त्यातून काय गवसल?

- "निसर्गातले जे आकार आहेत त्यांच्यापलीकडे काय आहे, हे जाणून घ्यायला त्या आकारांशी संवाद साधण्याची गरज असते. तो संवाद सहज होत नाही. त्या आकारांची तुम्ही फक्त कॉपी करता तेव्हा चित्रकार नसता.
तुमची स्वत:ची स्वतंत्र शैली, ओळख केव्हा निर्माण होते? जेव्हा तुम्ही विचार करता, तुमचा विचार कॅनव्हासवर उतरवता.
नाही तर नुसते आकार रंगवणे याला काय अर्थ?
फ़िगरेटीव्ह रंगवणं ही नुसती क्राफ़्ट्समनशीप झाली. ते काही मोठं काम नाही. भले ते न्यूड असो, नाहीतर निसर्गचित्र. ती क्राफ़्ट्समनशीप झाली. कोणालाही सरावाने ते जमू शकते.
पण विचारांचं काय? निसर्गाच्या आकारा आणि रंगामधला जो संवाद तुम्ही कागदावर उमटवायला हवाय तो कुठून येणार त्यात?
त्याकरता सराव उपयोगाचा नाही नुसता.
ती एक वेदना असते जी तुम्ही चित्रात मांडत असता. नाहीतर कोणी विकत घेत नाही, अशी चित्र का पेंट करायची? हाही एक प्रश्न असतो. निसर्गात आपण काय बघतो, त्याचा अनुभव कसा घेतो, कसा इंटरप्रिट करतो ते महत्वाचे.
शेवटी तुम्हाला वाट दाखवणारा निसर्गच आहे. तुम्ही निसर्गाचा भाग आहात, आणि तुम्हीही निर्माते आहात. कारण तुम्ही सजीव आहात.
तुम्ही जे बीज लावता, तुम्हाला माहीत नसतं की त्यतून कोणता आकार, कसा जन्म घेणार. रोज आकार बदलत असतो.
पाच मिनिटं बघितलेलं झाड तुम्ही रंगवायचा विचार करता. अरे, पण त्याचं आयुष्य बघ ना. ते कसं विकसित होत गेलय? ते रंगवलं तर ते अमूर्त नाही का?
मगाशी आपण त्रिकोणांबद्दल बोलत होतो... अनंत आहे सगळं, तुम्ही कुठला आकार निर्माण करणार, तुमचं काहीच नसतं त्यात, आकारांकडे बघतानाही त्याला सबजेक्टीव्हिटी आली की प्रॉब्लेम होतो, मग लोकं म्हणतात आम्हाला समजलं हा. खरं तर पोर्ट्रेट काय किंवा लॅन्डस्केपही काय, कोणालाही काही समजत नाही.
गर्भ असतो त्याच्यापर्यंत कोण जातय? झाडाचं पान आहे ते दिसतय, पण त्या पानाला सजीवपणा येण्यासाठी आतमधे काय आहे, तो रंग, तो हिरवेपणा, पिवळा रंग येण्याकरता आतमधे काय आहे, त्याचं उमजणं महत्वाचं.
भाव जो असतो त्यातला, ती जी संवेदना असते चित्रकाराच्या आणि त्याच्यात निर्माण झालेली, जे भाष्य असतं त्या दोघांमधलं तो टिपणाचा प्रयत्न करतो आर्टिस्ट."


चित्र सुरु होतं ते यातून पण ते थांबतं कधी?

-"खरं तर ते नाही थांबत. पण तुम्हाला ती दृष्टी एक आलेली असते. ती दृष्टी त्या पेंटींगमधून तुम्हाला सांगते की आता थांब. खूप झालं.
काही वेळा पुढचं पेंटींग त्यातूनच कंटीन्यू होत असतं. पण एकदा एका प्रकारे केलेलं काम पुन्हा करायला गेलो तर ते होणार नाही. कारण तुमचा त्याकरता जो विचार असतो, तो पुढे ढकलला गेला असतो. म्हणजे तुमचा विचार कंटीन्यू राहील्याचं हे द्योतक आहे.
पेंटींग करताना मी थांबतो तेव्हा विचाराची ती प्रोसेस संपलेली असते. पेंटींग संपत नाही कधी.
माझ्या बाबतीत वीसेक पेंटींग एका प्रोसेसमधे निर्माण होतात आणि मग ती प्रोसेस निघून जाते. पुन्हा त्याकडे वळता येत नाही. तसा प्रयत्न केला तर त्रासदायक होतं ते. जीवापाड धडपड केली तरी होत नाही. कॅनव्हास खराबच होतो.
जिथे भावच नसतो, तिथे चित्र उमटत नाही, संवेदना काय निर्माण होणार भावच नसेल तर?".

चित्रांना शीर्षके कशी सुचतात हा प्रश्न प्रकाशच्या बाबतीत अप्रस्तुत होता. अमूर्त चित्रांना बहुतेक कधीच ती का नसतात हा प्रश्न मी तरीही प्रकाशला विचारते.

-चित्राला टायटल्स देऊ नयेत कारण मग चित्राच्या अनुभूतीला मर्यादा येतात. मर्यादेच्या कुंपणाबाहेर जाऊन शोध घेता यायला हवा. चिरफ़ाड करता यायला हवी विषयाची.
साधी गोष्ट आहे. डॉट किंवा बिंदू,  हा काही अंतिम नाही. कितीही अणूरेणूएवढा असेल पण तो अंतिम नाही. तो धन तरी असेल नाहीतर ऋण तरी असेल. धन असेल तर तो फोडला की त्यातून अनेक बिंदू आणखीन जन्म घेतील, ऋण असेल तर तो स्वत:तून अनेक अवकाश निर्माण करु शकतो.
म्हणजे कुठलीच गोष्ट अंतिम नाहीये.
चित्राचंही असंच आहे, त्याला कुठली सुरुवात नाही, आणि शेवट नाही. पण मधली जी प्रोसेस आहे ती महत्वाची आहे.
ती प्रोसेस काय, तर तुम्ही रंग आणि आकारांमधे कसं इन्व्हॉल्व होताय? स्वत: इन्व्हॉल्व्ह होणं महत्वाचं आहे.

स्टुडिओ लोकेशनचा कितपत परिणाम?

-" खूपच. वातावरण तुम्हाला खूप काही शिकवून जात असतं. शेवटी आपण त्याच्याशीच कनेक्टेड आहोत. बहुतेकवेळ मी इथेच रहातो. कधी तरी मधेच जाऊन येतो घरी. जिथे काम करतो तिथेच राहीलं की खूप फरक पडतो. विशेषत: पेंटींगचं. बरेचदा तर काम करत असताना कित्येक दिवस मी कुठेच जात नाही. घराच्या बाहेरही पडत नाही. सकाळी चालून आलो की इथेच स्टुडिओत असतो पूर्ण वेळ.
आजूबाजूच्या वातावरणाचा मगाशी म्हटलं तसं खूप प्रभाव असतोच. इथे खाली पिंपळाचं झाड आहे त्याच्या खाली नुसतं उभं राहीलं तरी एक वेगळीच एनर्जी मिळते. आणि हे खरंच आहे, शास्त्रीय आधारही असेल काही, पण माझा विश्वास आहे. वडाच्या झाडाखाली उभं राहील्यावरही मनातल्या नकारात्मक विचारांचा निचरा होतो.
शिवाय इथे पक्षीही खूप येतात.
(ते खरंच. आम्ही बोलत असताना पिंपळाच्या शेंड्यावर येऊन बसलेला खंड्या नंतर कितीतरी वेळ तिथेच होता. अगदी दुपारचं कडक उन्ह चढेपर्यंत वेगवेगळ्या पक्षांची ये जा त्याच्या अवतीभवतीनं चालूच होती).
"पक्ष्यांचं निरिक्षण करण्यात कितीही वेळ घालवू शकतो मी. सनबर्ड्स, बार्बेट्स तर सारखेच दिसतात. काहींची अजून ओळख पटलेली नाही.
एक हिरव्या रंगाचा पक्षी, त्याच्या डोक्यावर गुलाबी, लालसर पॅच आहे, तो असतो. आता दुपार कलली की पक्षी यायला लागतील पुन्हा.
नदीच्या पलीकडच्या काठावरच्या जंगलाचा हा पट्टा तर दर आठ दिवसांनी आपलं सगळं रंगरुपच पालटतो. आत्ता आठ दिवसांपूर्वी आली असतील तर हा पट्टा गर्द हिरवा दिसला असता, शिवाय त्या हिरव्यातही अनेक छटा. दाट हिरवा, पिवळसर हिरवा, काळपट हिरवा. पॅलेटमधे ग्रीनच्या सगळ्या शेड्स एकमेकांमधे मिसळून गेल्यासारखं दृश्य दिसत होतं. झाडांची पालवी किती वेगवेगळी रुपं धारण करते ते इथे दिसतं.
पहिल्यांदा जागा बघायला आलो तेव्हा एप्रिल महिना होता आणि समोर दिसणारं दृश्य केवळ अनोखं होतं. सगळा ऑरेंजचा पट्टा असा समोर, वरपर्यंत. म्हटलं अरे हे काही वेगळंच आहे. गुलमोहोर, पलाश, पांगारा सगळी झाडं एकदम फ़ुललेली. प्रत्येकाची केशरी छटा वेगवेगळी. आणि नदीकिनारी झुकलेली आहेत ती चिंचेची झाडं आहेत, त्याच्यावर सकाळी आणि संध्याकाळी पोपटांचे थवेच्या थवे येतात. माझ्याकडे छोटी दुर्बिण आहे, त्यातून बघतो. या सगळ्या निसर्गाचा, वातावरणाचा परिणाम तुम्ही कायम ताजेतवाने रहाण्यावर नक्कीच होतो, आणि मग पर्यायाने तुमच्या कामावर."

रोजचा एक दिवस?

-" मी सकाळी लवकर म्हणजे साडेपाच-सहाला उठतो. चालून आल्यावर माझी योगासनं चालू होतात. माझी सगळी कामं मी स्वत:च करतो. स्टुडिओची लादी झाडण्यापासून, पुसण्यापर्यंत सगळं मीच करतो. मला ते आवडतंही आणि माझ्याकरता तो एकप्रकारचा व्यायामही आहे.
मित्र कधी विचारतात की तु काय झाडू मारतोस, तेव्हा मी त्यांना सांगतो, झाडू नाही, हे माझं ब्रश फ़िरवणं आहे. त्याकरता एक्सरसाईझ आहे हा. आणि खरंच आहे हे. मी जेव्हा मोठे कॅनव्हास करायचो तेव्हा अक्षरश: हात दुखायला लागायचे. पूर्वी मी कधी कधी स्पन्ज वापरायचो. तेव्हाही तसंच व्हायचं. मग ठरवलं की कामवाली वगैरे काही नाही, आपण स्वत:च सगळं करायचं. आता मोठा धुण्याचा ब्रश लादीवर फ़िरवतो तेव्हा ही भविष्यातल्या मोठ्या कामाची प्रॅक्टिस आहे असं समजतो. कपडे पण मी स्वत: धुतो, मशिनवर नाही. ही शारिरीक मेहनत झालीच पाहीजे असं मी समजतो.
त्यानंतर मग दिवसभराच्या कामाला सुरुवात. एकीकडे म्युझिक चालू असते, क्लासिकल. ते मला आवडतं, समजत नाही फारसं पण आवडतं. माझ्याकडे झायलिन आहे ते वाजवतो मधून मधून, व्हायोलिनही आहे, फ़ारस वाजवता येत नाही, पण आहे. लहानपणापासूनची आवड होती, पूर्ण होऊ शकली नव्हती. तबला शिकायचा होता तेव्हा वडील म्हणाले कशाला? तुला काय तमाशात काम करायचं आहे का, आता तबला कुठे, तमाशा कुठे, पण एकंदरीत संगीताकडे, वाद्यांकडे बघण्याची दृष्टीच तशी. घरी कलेचं वातावरण अजिबातच नव्हतं.
चहा, नाश्ताही माझा मीच करतो. जेवण करायलाही आवडतं, वेगवेगळ्या डिशेस करुन मित्रमंडळींना खायला घालायला आवडतं.
अर्थात हे सगळं इतर वेळी. एकदा चित्रावर काम चालू झालं की रोजचं जेवणही विसरायला होतं.
चित्र काढायची काही स्पेसिफ़िक वेळ नाही. एकदा मनात आलं की कॅनव्हासवर बसेपर्यंत जीवाला स्वस्थता नसते. समोर बसलात, सुरवात झाली, आजूबाजूला रंग पडले की स्थिरावल्यासारखं वाटतं मग.
मला शिस्त आवडते. सगळा पसारा इकडे तिकडे पडलाय, त्यात मी रंगवतोय असं मला आवडत नाही.
माझं चित्र पण तसंच आहे, तसंच झालं पाहीजे. स्वच्छता म्हणजे परमेश्वर उगीच म्हणत नाही."

प्रकाशच्या स्टुडिओत खरंच स्पॉटलेस क्लीन असतं. धूळीचा कण नाही की अस्ताव्यस्त पसारा नाही. चित्रकाराच्या स्टुडिओचं अस्त्तित्व अबाधित ठेवूनही इतका व्यवस्थितपणा, स्वच्छता कशी राखू शकला हा? हे असं नेहमीच मेन्टेन करणं जमतं?

माझ्या मनातले विचार जणू ओळखल्यासारखा तो म्हणतो- "आता तुला कदाचित वाटेल आज आपण स्टुडिओ बघायला येणार म्हणून याने हे सगळं असं नीट आवरुन ठेवलय, पण हे नेहमीच तसं असतं. तु कधीही न सांगता आलीस तरीही तुला असंच दिसणार आहे.


प्रकाश त्याच्या विचारांच्या प्रोसेसमधे असा गुंतून जाऊन बोलत असताना प्रश्नांचे पुन्हा पुन्हा विरामी ठिपके देणं नकोसं वाटत असतं. त्याचं सलग बोलणं मग मी नंतर फारसं डिस्टर्ब करतच नाही.

चित्र डोक्यात कायम असतंच मात्र. तुम्ही कॅनव्हासवर असा किंवा नसा.
कधी कधी हातून काम होत नाही. त्यावेळी वाचन चालू होतं. बाहेर सुद्धा खूप फ़िरतो. कधी कधी लॅपटॉपवर गेम खेळत असतो, एरवी फ़क्त इमेल चेक करण्यापुरता कॉम्पुटर वापरतो.
संगीत मात्र चोवीस तास चालू असतं. काम करताना संगीत मला डिस्टर्ब करेल अशी शक्यताच उद्भवू शकत नाही. उलट संगीत व्हायब्रेशन्स निर्माण करतात, आणि नाद तर चित्रात असतोच. लय, सूर, तालावर माझा ब्रश चालतो अनेकदा. चित्रात प्रकाश असतो तसा संगीतात नाद असतो. खूप एन्जॉय करतो मी संगीत. वर्ल्डस्पेस चॅनेल होता तेव्हा तो चोवीस तास चालू असायचा. झोपताना फक्त बंद. आता वर्ल्डस्पेस बंद झाला तेव्हा माझं खूप नुकसान झाल्यासारखं वाटलं. संगीताच्या वेगवेगळ्या प्रवाहांची इतकी माहिती मिळायची. टीव्हीवर स्पोर्ट्स बघतो, कधी बातम्या, नॅशनल जिओग्राफ़ी, चांगल्या फ़िल्म्स बघतो. आवश्यकता काही नाही. पण टाळतही नाही. 

मी सगळ्या प्रकारचे पेंट्स वापरलेत, पेस्टल, वॉटरकलरपासून, ऍक्रिलिक, ऑइल. मी ऍक्रिलिक हल्ली दोन वर्षं चालू केलीत.
ऍक्रिलिकमधे फ़ेबिओचे कलर मला जास्त आवडतात. बाकीचे फारसे आवडत नाहीत, कारण ते ग्लॉस होतात, फ़ेबिओचे कलर्स हे मॅट कलर्स आहेत, त्यामुळे पेंटींगमधे आणि बघणा-यालाही वेगळी मजा येते. त्या कलरची ही वेगळी क्वालिटी आहे.
पूर्वी ऑईलमधेच जास्त काम करायचो. ऑईलमधे विन्सरन्यूटनचे कलर चांगले आहेत, पूर्वी कॅम्लिनही वापरलेत, पण कळतं की वाईट कलर्स वापरल्याने पेंटींगवर किती परिणाम होतो ते.

सुरुवातीची चित्र तर चोरबाजारातले रंग वापरुन केली आहेत. तेव्हा पैसे नसायचे, स्वस्तातले कलर्स म्हणजे चोरबाजार. पण तिथे काहीवेळा अशा शेड्स मिळायच्या की त्या नंतर कधी सापडल्याच नाहीत. कारण काही वेळा ते बाटल्यातले राहीलेले रंग एकत्र मिसळून टाकायचे, त्यातून एव्हढे वेगळे रंग मिळालेल की ते आता शोधूनही सापडायचे नाहीत. त्याची वेगळीच मजा यायची. नंतर कितीही बाजार शोधला तरी तो रंग सापडायचा नाही.
सगळ्या रंगातलं काम मला आवडतं. आणि सगळ्या माध्यमांमधलंही. पेपर कोलाज बनवलेत, मोठमोठी म्यूरल्स. मेटलमधे, क्लेमधे, वुडनमधे, सिरॅमिक्समधे, कोलाज तर भरपूर केलं आहे. काईटपेपरचे कोलाज भरपूर केलेत.
आता मात्र सगळं लक्ष पेंटींगवर केन्द्रित केलं. फोटोग्राफ़ीही बंद केली. पूर्वी अगदी प्रोफ़ेशनल फोटोग्राफ़ी करायचो, नीतिन दादरवालाबरोबरही करायचो. त्याच्यामुळे मला कोलटकरांचे फोटो काढायला मिळाले. कोलतेसरांचे पेंटींग्जचे खूप कॅटलॉग्ज, इतरही चित्रकारांचे शूट केलेत.
आता हे सगळं बंद केलं.
वेगवेगळ्या गोष्टींमधे गुंतण्यापेक्षा एकात गुंतणं गरजेचं आहे हे जाणवलं.
कोणत्या गोष्टीत कुठे थांबायला पाहीजे हे मी ठरवलं.
आता मला फक्त पेंटींग करायचय. ते मी करतोय.
उद्या चित्रं घेतली नाही कोणी तर काय करायचं मला माहीत नाही.
अगदी तशीच वेळ आली तर हा स्टुडिओ काढेन आणि दुसरीकडे स्वस्तात जागा घेऊन पेंटींग करेन. पण मला चित्रच काढायची आहेत. फक्त चित्रांसाठीच जगायचं आहे.
जोडीला संगीत आहे, अजून काय हवय.
स्पेसिफ़िक टूल्स वगैरे काही वापरत नाही. उलट मला असं वाटतं की टूल्स आपणच निर्माण करायची असतात. काही वेळा काही गोष्टी विकत घेतल्या पण वापराव्याशा वाटल्या नाहीत. उदा. बरेचसे माझे ब्रशही मी नंतर वापरले नाहीत. घेताना वाटलं होतं की काही काम करता येईल, पण नंतर विचार बदललेला असतो. ठरवून काही करता येत नाही. नितिनने पूर्वी मला फ़्रेन्च ब्रश दिले होते.
पेंटींग टेबल मी विरारला माझ्या स्टुडिओतच बनवून घेतलं होतं. मोठी कामं करत होतो त्यावेळेस, मला हाईटला उंच टेबल हवं होतं. खूप ड्रॉवर्स आहेत त्याला. एकात टूल्स आहेत, गन, प्लाय, ब्रश वगैरे, एकात ऑइल कलर्स, स्केचबुक्स वगैरे एकात. असं चित्राचं साहित्य सगळं एका टेबलात मावू शकतं.
उभं राहूनच काम करायला जास्त आवडतं. मात्र वॉटरकलर करतो तेव्हा बसून करतो.
कधी कधी तर कागदाला टाईल्सवरच टेप लावून त्यावर काम करतो.
मधल्या काळात ब्रशपेक्षा स्पन्जने जास्त काम करायला लागलो. ब्रशने जितका रंग लागतो, त्यापेक्षा अर्ध्या रंगात मला स्पन्जने तोच परिणाम मिळतोय असं लक्षात आलं. वेगवेगळं टेक्निकही त्यातनं मिळायला लागलं. हे टेक्निक कशाकरता, कोणतं ते आतूनच येतं. कुठल्यातरी गोष्टीचं निमित्त असतं. स्पन्जला कॉटनचा मऊ कपडा त्याला गुंडाळून मग तो रंगात बुडवून वापरला की केव्हढातरी वेगळा इफ़ेक्ट येतो. हे आपोआप होत जातं. जाणीवपूर्वक अमुकच टूल्स वापरायची असं होत नाही. कधी कधी ग्राफ़िकची टूल्स वॉटरकलरकरता वापरली जातात. आता ब्रश आणि रोलरनेच जास्त काम होतय. त्याला काही टूल्स म्हणता येणार नाही. चित्रांची मुलभूत गरज ओळखून काम करायला हवं.

एका वेळी अर्थातच एकाच पेंटींगवर काम करतो. एकाग्रतेनं एकाच पेंटींगशी माझा संवाद होत असतो. दुसरं पेंटींग कोणत्या रंगाचं होईल सांगू शकत नाही. पण हातातलं पेंटींग काही कारणाने डिस्टर्ब झालं तर ते बाजूला ठेवून दुस-यावर काम सुरु करतो. मग पुढचे कित्येक महिने त्या पेंटींगकडे बघत नाही. दुसरं पेंटींग मग आपल्याला जा, तिकडे जा असं सांगत नाही, तोपर्यंत तिकडे जायचं नाही. एकाच पेंटींगवर मन एकाग्र असलं तरी ड्रॉईंग, स्केचिंग वगैरे चालू असतं. तो अर्थात रोजचा एक्सरसाईझ आहे.

चित्राकरता असिस्टंट वगैरे मी कल्पनाही करत नाही, कारण मुळात मला मी आणि माझं चित्र यात कोणताही डिस्टर्बन्स नको असतो.
मी सुद्धा कधी कोणाकडे असं काम केलं नाही. कमिशन्ड वर्क केलं आहे.
म्यूरल्ससाठी मी कोलतेसरांसोबत काम केलेलं आहे. चित्रावर नाही. तो प्रकार मला आधीपासूनच कधी आवडला नाही, चित्रकाराबरोबर काम करण्याचा. एकदा सुदर्शन शेट्टीने मला दिल्लीमधे असताना हेल्प करशील का म्हणून विचारलं होतं. म्हटलं सॉरी. मी दुस-याच्या चित्राला कधीच हात लावत नाही, लावणार पण नाही. आपण का जगतोय कशासाठी जगतोय? जर आपण स्वत:चा रस्ता निर्माण केलेला आहे, तर त्या रस्त्याने आपल्याला स्वत:लाच जायचय, दुस-याकडे का पाय अडकवायचा? 
आता वीस वर्षं झाली की मलाही चित्र काढायला लागून, पण आपण प्रोफ़ेशनक आर्टिस्ट म्हणून काम करायचं हा विचार कधीच डोक्यात आलेला नाही
कॉलेज संपल्यापासून आपण फ़क्त चित्रच काढायची हे ठरवलं होतं. नोकरी कधीच करायची नाही हे ठरवलं होतं. तरी पण व्हिजिटींग लेक्चरर म्हणून तीन वर्षं काम केलं रचना संसदला. ते मला सोडायलाच तयार नव्हते.
तिथे मी आर्किटेक्चरच्या मुलांकरता ग्राफ़िक चालू केलं, मिसेस कोलतेही माझ्याबरोबर होत्या, ग्राफ़िक, सिरॅमिक्स करुन दाखवलं त्या मुलांना तर ती मुलं आर्किटेक्चर सोडून इकडेच लक्ष द्यायला लागली. त्यांना ते आवडलं खूप. टेक्निकली आपण काय करु शकतो आर्किटेक्चरमधे ते बघायला त्यांना खूप आवडत होतं.
पण या सगळ्यात माझ्या पेंटींगवर परिणाम व्हायला लागला. काम होईना. आठवड्यातून एका लेक्चरसाठीही आठवडाभर वेळ काढायला लागायचा. तयारी, विचार करायला लागायचा. मग ठरवलं की आपण काही टीचर होणारी माणसं नाही, आपला हा प्रांत नाही. मग तिथून बाजुला झालो.

सोपं तर काहीच नाही आत्तापर्यंतच्या आयुष्यातमी घरात का सगळ्यांपेक्षा वेगळा झालोमला वेगळी दृष्टी का मिळाली माहीत नाही. मी वेगळा मार्ग शोधायचा ठरवल्याने घरचे माझ्यावर कायम नाराज होतेच.
एकत्र कुटूंब आमचं. गणपतीला गावी होतो आम्ही सगळे तेव्हा अचानक आम्ही मस्जिदबंदरला ज्या इमारतीत रहायचो ती कोसळली. पेपरमधे वाचलं तेव्हा आम्हाला कळलं हे. सुदैवाने आम्ही वाचलो कारण गावाला होतो. रहायचं कुठे आता? मग घरातले सगळे या ना त्या नातेवाईकाकडे रहायला गेले, मला कोणाकडेच असं जाता येण्यासारखं नव्हतं कारण वेडा आहे हा म्हणून सगळ्यांनीच मला बाजूला टाकलं होतं.
सहा महिने मी एका प्रेसमधे रहात होतो. पुठ्ठ्यांवर झोपायचो. माझा मोठा भाऊ, काकांचा मुलगा, विरारला रहात होता, तो एक दिवस आला आणि त्याने हे बघीतलं, त्याच्या डोळ्यात अश्रू आले, आपण सगळे व्यवस्थित रहातो आणि हा असा रहातोय. त्याने सरळ मला उचललं आणि विरारला घेऊन गेला. मग तेव्हापासून विरारवासी झालो.
वाट्टेल ती काम केली. हातगाडीही ओढलेली आहे, माझा भाऊ फ़्रिजरिपेअर करायचा, तेव्हा त्याच्यासोबत गिरगावात डोक्यावर फ़्रीज वाहून नेला आहे. माझे वडील टेलीफोन्समधे होते. वडीलांनी कधीही मला सपोर्ट केला नाही. आर्थिक नाही, मानसिकही नाही. खूप नैराश्य यायचं त्यांच्यामुळे मला. काकांच्या मुलांमुळे मी आज इथे आहे, आता सगळं ठीक आहे, पण त्यावेळी जे नुकसान व्हायचं ते झालंच. मी मात्र सगळ्यांबरोबर व्यवस्थित वागतो, काही मनात न ठेवता. काही कटूता नाही, वाईट विचार नाही. ते जर ठेवले तर इतरांच्यात आणि माझ्यात काय फरक राहीला? मला दुस-यांकरता जगायला आवडतं. शक्य होईल ती मदत करत रहातो. अण्णा हजारेंचं आंदोलन असो, की प्रकाश आमटेंचं कार्य, माझ्या ताकदीनुसार मी मदत करतो. समाजाशी कलाकाराने जोडलेलं रहावं, या ना त्या मार्गने ऋण फ़ेडावं अशा मताचा मी आहे. मी भोगलय ते माझ्या घरातल्या नव्या पिढीला भोगायला लागू नये असं वाटतं मला. दुस-याकरता जगायला मला आवडतं. भावाच्या मुलाला त्याच्या आवडिचं शिकायला मी परदेशात पाठवलं ते ह्याच विचारातून.
  
अमूर्त चित्रकलेबद्दल सर्वसामान्यांच्या मनात खूप प्रश्न असतात, समज-गैरसमज असतात. प्रत्यक्ष त्या चित्रकाराने त्याच्या चित्रांविषयी बोलावं, त्याने ते समजावून सांगावं अशी एक अपेक्षाही मनात कुठेतरी असते, जी साहजिकच पूर्ण होत नाही. एकतर तो चित्रकार त्याचं चित्र पूर्ण झाल्यावर मनाने त्यापासून केव्हाच दूर गेलेला असतो, आणि दुसरं अमूर्ततेतला कोणत्या अर्थात, व्याख्येत बसवणं हा त्या चित्रसंकल्पनेलाच मूळ गाभ्यापासून दूर घेऊन जाणं ठरणार. प्रकाश त्याच्या चित्र काढण्यामागच्या, चित्र काढतानाच्या दृष्टीकोनाबद्दल, मनोधारणेबद्दल इतकं सविस्तर आणि सुंदर, गहन असूनही कळायला सोप्या भाषेत आत्तापर्यंत बोलत होता की मग मी न राहवून त्याला अमूर्त संकल्पनेबद्दलच्या सर्वसामान्यांच्या मनातल्या काहीशा नकारात्मक भूमिकेबद्दल विचारुन टाकायचं ठरवलंच. पण त्याआधी मला एक चित्रकार या नात्याने तो स्वत:च्या चित्रकलेबद्दल काय फिलॉसॉफ़ी मनात बाळगून आहे याबद्दलही उत्सुकता वाटत असते.
प्रकाश माझ्या अपेक्षेप्रमाणे, आणि त्याच्या स्वभावानुसारच उत्तर देतो. स्पष्ट आणि सडेतोड आणि मुलभूत-

-" मूर्ताकडून अमूर्त असा माझा प्रवास आहे, पण तो तसाच असायला हवा असं नाही. कधी उलटाही होऊ शकतो. काहीच सांगता येत नाही. शेवटी अणूरेणूंचा खेळ आहे हा. बिंदूमधून अवकाशात आणि अवकाशातून पुन्हा बिंदूकडे असू शकतोच ना प्रवास.
वास्तव हे आहे की आपण काय जगतो, कारण चित्रात तेच उमटत असतं.
फ़िलॉसॉफ़ी काही वेगळी नाही माझी. स्वतंत्र फ़िलॉसॉफ़ी असावी इतका काही मोठा नाही मी. चित्र ही त्याच्या स्वत:त एक फिलॉसॉफ़ी आहे. स्वत: निसर्ग आहे. हा निसर्ग घडत असताना आपण फक्त अनुभव घ्यायचा असतो, जिवंत अनुभव घडत असतो आपल्या समोर.
निसर्गाने जी ताकद, जो विचार दिला आहे, तिचा वापर करत जायचं, जी विचार प्रक्रिया त्यातून बनते त्यानुसार जगायचं, स्वत:ला वेगळ्या, अधिक उंचीच्या पातळीपर्यंत न्यायचा प्रयत्न करायचा. आणि त्याकरता हे चित्रांचं माध्यम हातात आहे त्याचा वापर करायचाबास. इतकंच.
ऍब्सट्रॅक्ट चित्रं कळण्याबद्दल? याचं उत्तर खरं तर सोपं आहे अगदी. माझ्या वरच्या साध्या फ़िलॉसॉफीला साजेसं सांगायचं तर-
प्रकाश, वारा, अग्नी, धरती, आकाश. ही पाच तत्त्व आहेत. त्यांच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. हवेला आकार नाही, ती तर आपण पाहूही शकत नाही, पाणी, अग्नीचा दाह याला कुठला आकार देऊ शकत नाही तुम्ही. तो दाह तुम्ही आकारात पकडू शकत नाही, त्याला चित्रात आणू शकतो मात्र आपण. नाद जो आहे, ध्वनी, तोही तुमच्या चित्राला कुठेतरी इन्स्पायर करत असतो, आणि तो येतो चित्रात तुमच्या, पण आता तो कसा बघायचा ते तुमच्या संवेदनशीलतेवर अवलंबून.
बघण्यालाही मर्यादा असतात. या मर्यादांना ओलांडून बघायचा जर लोकांनी प्रयत्न केला तर त्याचा अनुभवही घेता येतो.
पण आपल्याकडे दूरदृष्टीचा अभाव असा की, "अच्छा हे असं केलय? त्यात काय, मी पण करीन." इथून सुरुवात होते नकारात्मक भूमिकेला. आणि मग तिथपर्यंत पोचूच शकत नाहीत लोकं.
म्हणजे होतं काय की, सुरुवातीलाच तो माणूस निगेटीव्ह एनर्जी घेऊन आलेला असतो, त्याऐवजी हे काही तरी वेगळं आहे असा पॉझिटीव्ह ऍप्रोच ठेवला तर चित्र तुमच्याशी संवाद साधायला लागतं.
मी मगाशी म्हटलं तसं, की वेड लागलय का चित्रकाराला हे असलं काही तरी करत बसायला? त्याला का असं ऍबस्ट्रॅक्ट काढावसं वाटलय? त्याला काही तरी कारण असेल ना? ही चित्रं तर विकली पण जात नाहीयेत. मला माहीत नाही की याचं काय होणार आहे? तरी पण का असं करावसं वाटतय?
कारण यात तुमच्या कुठेतरी संवेदना आणि वेदना आहेत. त्या तुम्ही इथे प्रतिकात्मक रुपात मांडत असता.
आणि त्याच्यावर तुम्हाला ते जगणं कळतं यार.
मी जगतोय. मी चित्राशी जगतोय. चित्राबरोबर जगतोय मी. तो माझा भाव आहे, तो मी व्यक्त करत असतो त्या वेळेला.
ते कोणी बघावं, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करावी हा नंतरचा भाग झाला.
किंवा आज कळलं नाही तरी उद्या कळेल ते लोकांना.
त्यांना कदाचित ती दृष्टी आली तर कळेल, पण नाही कळलं तरी काही फरक पडत नाही.
आणि तुम्ही काय देता आणि काय घेता यापेक्षा चित्र तुम्हाला बरंच काही देत असतं.
चित्र लोकांपर्यंत पोचलय नाही पोचलय- यामुळे खरंच काही फरक पडत नाही."

लोकं आपल्या चित्राला कसं इंटरप्रिट करतात, बरोबर करतात की नाही, या अशा गोष्टींचा विचार?

-"अजिबातच नाही. मी का याचा विचार करावा? मी स्वतंत्र आहे आणि मी माझ्याकरता जगतो. मी दुस-यांसाठी तर जगत नाही.
मी करतो त्यातून कोणाला आनंद घेता येत असेल तर ती माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाची दृष्टी वेगळी, विचार वेगळा. दहा लोकांनी चित्र बघितली तर दहा लोकांना वेगळी वाटणार ती चित्रं. काही लोकांना चेहरा नसतानाही त्यात चेहरा दिसतो, तसं आहे हे.
दृष्टी प्रत्येकाकडे असतेच, पण तिचा वापर करायची गरजच लोकांना वाटत नाही. आपल्याकडे कमर्शियल ऍंगलचा इतका भयानक अतिरेक झाला आहे, लोक फक्त पैशासाठी जगतात. पोटासाठी फक्त जगायचं असं लोकांनी ठरवूनच टाकलेलं आहे, त्यामुळे ते तिथपर्यंत पोचूच शकत नाहीत. आज आपल्याकडे हा सगळा गचाळपणा माजला आहे ना, कलेची दूरदृष्टी नसल्यामुळे तो माजला आहे.

टेक्नॉलॉजी कितीही प्रगत असली तरी प्रत्यक्ष पेंटींग बघणं आणि इमेज बघणं यात प्रचंड फ़रक आहे, तुम्ही पेंटींग कसं बघता, कुठे आणि कोणत्या ऍंगलने बघता यावरही खूप काही अवलंबून असतं. योग्य प्रकाशात पेंटींग बघायला लागतं. माझा नेहमी आग्रह असतो की माझ्या स्टुडिओत या आणि पेंटींग बघा तो याकरताच. तुम्ही स्टुडिओत आल्याशिवाय कळणार नाही, आर्टिस्ट काय करतो, कसा काम करतो ते.
त्याची भाषा तिथे उलगडते. बाहेर जाऊन काहीतरी स्वत:च्या कलेबद्दल बडबडणे याला फारसा अर्थ नसतो.
पण फार कमी जण येतात, फारसा कोणाला आर्टिस्टला त्याच्या स्टुडिओत जाऊन भेटण्यात इंटरेस्ट नसतो. येतात ते चित्रकार मित्रच असतात.
कलेचे ग्राहक, रसिक यांना स्टुडिओची वाट सापडतच नाही बहुतेक.
क्वचित कधी तरी, कोणाला माहीत असतं प्रकाश वाघमारे काही वेगळी चित्रं काढतो, ती बघण्यात त्यांना रस असतो, असे लोक येतात, नाही असं नाही, येतात. हे लोक असतात त्यांना चित्रकाराची चित्र खरेदी करण्याची क्षमता नसते, पण चित्र समजण्याची क्षमता खूप असते त्यांची, त्यांना ती दृष्टी असते, जे समजणार नाही ते समजावून घ्यायची त्यांची तयारी असते, हे लोक धडपडत स्टुडिओला शोधत येतात, अशांचे मी अत्यंत प्रेमाने स्वागत करतो, त्यांना माझी चित्र दाखवतो.
गॅलरी सेव्हन बरोबर माझं चांगलं जमायचं. ओनर स्वत: आर्टिस्ट होती. खूप चांगल्या चर्चा व्हायच्या आमच्या. ऍब्स्ट्रॅक्ट करता ती खूप चांगली गॅलरी होती. पण आता बंद झाली ती.
अशाही गॅल-या होत्या, पण मधल्या काळात चित्रांना मार्केटमधे इतकं महत्व आलं, आलं ते चांगलंही झालं निश्चित पण कलेचा धंदा जास्त झाला. ह्यात कमर्शियल शिकलेली माणसं चित्र काढायला लागली, कारण इथे पैसा आहे.
पण ह्यात मुळ चित्रांशी एकरुप झालेला चित्रकार मागे पडला. चित्रांची कॉप्या करणं हा धंदा झाला. अनेक मोठमोठी नावं यात आहेत.
पण ही कला नाही. हा कलेचा बाजार. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय चित्रकारांची प्रतिमा यामुळे खराब होते. त्यांना ती कॉपी आहे हे लगेच कळते. ते म्हणतात तुमचे आर्टिस्ट आमची कॉपी करतात आणि मग आमच्याकडेच चित्रं विकायला घेऊन येतात. त्यांना मग सांगायला लागतं की नाही, असेही चित्रकार आमच्याकडे आहेत ज्यांच्याकरता चित्रकला धंदा नाही. ते चित्रकलेकरता जगतात. तुम्ही येऊन बघा. कोलतेंसारखी माणसं आहेत, जयराम पटेलांसारखी आहेत, गणेश सारखा कलकत्त्याला माणूस आहे, दिल्लीला रामकुमारांसारखी व्यक्ती आहे, ही स्वतंत्रपणे काम करणारी माणसे.
तरुण पिढीच्या बाबतीत बोलायचं तर ऍबस्ट्रॅक्ट मधे हेमंत धाणे, नमिता सावंत, प्रकाश मोरे, अमेय जगताप ही मुलं मस्त काम करताहेत. वसईवरुनही आलेली आहेत यातली अनेक. जेजेमधे शिकलेल्यांपेक्षा चांगलं काम आहे यांचं. नवं शिकतात, वाचतात, लेक्चर्स ऐकायला धडपडतात.

फ़िगरेटीव्ह आणि ऍबस्ट्रॅक्ट असला काही भेदभाव चित्रकलेत नाही, स्वत:ची ओळख महत्वाची. जशी के.जी. सुब्रमण्यन, मनजित बावांची आहे, हे फ़िगरेटीव्ह काम करतात, त्यांची आयडेंटीटी आहे. आज अनेक प्रसिद्ध, नावाजलेले चित्रकार आहेत त्यांना मात्र अनेक वर्षांनंतरही स्वत:ची ओळख चित्रांमधून उमटवता आलेली नाही, येणारही नाही कारण कमर्शियल दृष्टीकोन त्यांना कुठेतरी जास्त महत्वाचा वाटलेला आहे. हल्ली टेक्नॉलॉजीचा वापर करुन चित्रं काढायची पद्धत आहे.
तुम्ही प्रयोग जरुर करा पण त्या चित्रांमधे तुम्ही स्वत: कुठे दिसता? त्याचा विचार नको का करायला? ती कुठेच नसते. आर्टही नसते त्यात.

कॅमेरामधून फोटो काढत असताना माझ्या लक्षात आलं की मला इथे नाही थांबायचं, अजून पुढे जायचय, असं काहीतरी मिळवायचय जे ह्या कॅमे-यातल्या फोटोंमधे नाही, किंवा त्या फोटोंच्या पलीकडे आहे, त्यातून मी या ऍब्स्ट्रॅक्शनकडे वळलो, त्यावेळी विचार करत असताना आधी मला आकार दिसायचे, ग्राफ़िक्समधे मी उत्कृष्ट होतो, ९५ मार्क्स मला माझ्या एका असाईन्मेन्टला मिळाले होते कॉलेजात फ़ायनल एक्झामच्या. पण मला स्वत:ची आयडेंटीटी शोधायची होती. कॅमे-याच्या फोटोंमधूनही शाम मंचेकरसारखा कलाकार स्वत:ची आयडेंटीटी निर्माण करतो, अभिजात चित्रकलेतून मिळेल असा अनुभव देतो, उधळलेल्या भंडा-याच्या त्याच्या फोटोमधे कला असते.
एकदा पैसा मिळवायचं वेड लागलं की त्याचं व्यसन लागतं, दुसरं काही सुचू देत नाही हा पैसा. तो तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. ज्याला मागणी आहे तेच पुरवायला भाग पाडतो.
काम करायचं म्हणून करायचं किंवा यातून पैसे मिळतील म्हणून काम करायचं याला काही अर्थ नाही. ज्यांनी पैशाकरता काम केलेलं आहे, ते मोठे चित्रकार झाले असतील, पण चित्राची भाषा त्यांच्यापासून फार दूर आहे. आज ज्यांचं नाव आहे असे कोणतेही चित्रकार घ्या, चित्राची भाषा त्यांच्यापासून दूर गेली आहे.
गायतोंडे का कुठे गेले नाहीत? आयसोलेशनमधे राहीले कारण त्यांना चित्रांशी जोडलं रहाणं महत्वाचं वाटत होतं. याउलट बरवे. चित्राशी कनेक्टेड राहून ते शब्दांमधूनही व्यक्त होऊ पहात होते. कोलते तिन्ही गोष्टी करताहेत.
बरवेंची काही चित्रं जी सिम्बॉलिझम वर आधारीत होती, त्यामुळे त्याला काही मर्यादाही होत्या. त्यांची चित्रं बरंच काही सांगत होती पण त्या मर्यादेत सांगत होती. म्हणजे खरं सांगायचं तर बरवेंनाही ऍबस्ट्रॅक्शनकडे जायचं होतं. पण ते तेव्हढी डेअरिंग करत नव्हते. आणि हे त्यांच्या बोलण्यातही येत होतं. पण ते अडकूनच होते, ते ओपनच होत नव्हते. सुरुवातीचे बरवे तुम्ही पाहीलेत तर ते ओपन होते, पण परत ते एका कोषात अडकून पडले. बीजाच्या वरतीही एक अस्तित्त्व असतं, त्यात ते खुले झाले नाहीत, वरच्या अवकाशात ते फर्म नव्हते.
गायतोंडे याच्या पलीकडे होते, ते आकाश, अवकाश सगळं विभाजन करुन त्यात पहात होते.
इव्हन पळशीकरांची काही ऍब्स्ट्रॅक्ट मधली चित्र घ्या, ते या गोष्टी पहात होते, म्हणजे ते रिऍलिटीमधे काम करत असताना, ऍब्स्ट्रॅक्शनकडे का वळत होते, किंवा तंत्राचे फ़ॉर्म्स का येत होते? कारण ते व्हायब्रेशन्स पेंट करत होते. आपली चिन्हं ही व्हायब्रेशन्सचाच एक भाग असतात. नैसर्गिकरित्या आलेली.

दोन प्रकारचे आर्टिस्ट असतात. वैचारिक आणि इगोइस्टीक. इगोइस्टिक चित्रकार म्हणतो मला पोर्टेट येतं, लॅन्डस्केप येतं, माझ्यासारखा मीच.
हा इगो निर्माण झाला की चित्रकार विचार करायचा थांबतो. त्याला पुढचा रस्ता दिसत नाही. या चित्रकारांना विशेषत: लॅन्डस्केप्स, पोर्ट्रेट्स काढणा-यांना कॉलेजेसमधून डेमॉन्स्ट्रेशन्सना बोलावतात, ते त्यात खूश होतात, त्यांची एनर्जी अशा गोष्टींमधे खर्च होते. त्यांना हे कळत नाही की आपण काहीतरी महत्वाचं मिस करतो आहोत.
काही चित्रकारांना याची जेन्युईन खंत वाटते, ते त्यातून बाहेर पडायचा प्रामाणिक प्रयत्न करतात. दलालांना ही खंत होती, बेन्द्रेंना होती, ऍबस्ट्रॅक्ट हेच पेंटींग आहे असे बेन्द्रेंनी उद्गार काढले होते. जे सत्य आहे ते तुम्ही टाळू शकत नाही. तुमच्यासमोर ते येतच. कदाचित कोलते सरांमुळे आम्हाला ते आयुष्यात फार लवकर समजल असं मी आत्ता म्हणू शकतो.
काहीही केलं असतं तरी मी इथे वळलोच असतो. वेळ लागला असता मात्र. चुकीच्या माणसांबरोबर राहीलो असतो तर हा मार्ग हरवूनही बसलो असतो.
चित्रातली प्युरिटी भेटणं महत्वाचं. हात किती चांगला, तंत्र किती परफ़ेक्ट याला महत्व नाही. ती क्राफ़्ट्समनशीप झाली. मी फोटोग्राफ़रही आहे, मला नक्की कळतं की कॅमे-यातून काढू शकू अशी इमेज जर एखाद्याने कॅनव्हासवर काढली तर.
त्यात तो माणूस दिसायला पाहीजे हा माझा आग्रह. प्रोजेक्टर लावून कॅनव्हासवर इमेज टाकून पेंटींग करणारे चित्रकार आज मोठे आहेत.
देशाला चित्रकलेत मागे ओढतात हे लोक. पंचवीस वर्षांपूर्वीचं युरोपातील काम आज आपले अर्टिस्ट इथे इन्स्टॉलेशन वगैरे करतात त्यात करतात. त्यांना वाटतं आपण कटेम्पररी आर्टिस्ट. इन्स्टॉलेशन वगैरे केली की युरोपवारी घडते म्हणून आज प्रत्येक आर्टिस्ट हे करायला जातो.
अरे पण कलेला काही मिळतय का त्यातून?
चित्रकलेकरता जगणा-यांना यतून नैराश्य येईल अशी परिस्थिती सध्या आहे. एक वेळ अशी आली की मलाही असं नैराश्य आलं. का करतोय हे आपण असं वाटलं. काय आहे उद्या आपल्या हातात? मग मी स्वत:ला स्टुडिओत कोंडून घेतलं. आणि माझ्या चित्रांमुळेच मी त्यातून बाहेरही आलो.   
नव्या चित्रकारांना मी काय सांगू? इतकंच संगतो की चित्र तुमचा ध्यास असायला हवा. चित्रकार चित्राकरता जगला तर तो चांगलाच होणार. पैसा महत्वाचा आहे हे माहीतेय, पण त्याकरता स्वत:च्या चित्राशी तडजोड करु नका. विकलं जातय म्हणून चित्र काढू नका. चित्राशी प्रामाणिक रहा. बाकी इतर काम आहेत उपलब्ध आजकाल पैसे मिळवायला.
----
चित्रकार प्रकाश वाघमारे-  तो विचार करतो आणि तो चित्र काढतो. त्याला हवी तशी.
आपली चित्र लोकांना कळायला हवीच अशी त्याची अपेक्षा नाही, नाही कळली तरी खंतही नाही, कारण विचार करणा-यांना ती कळतील, कळतात याची त्याला खात्री आहे. अनुभव आहे.
लोकांना चित्रकला कळायला हवी ही आस्था मात्र त्याला आहे.
ती त्याच्या शब्दा शब्दांमधून जाणवते.
त्याकरता तो माझ्याशी दिवसभर बोललातळमळीने आणि मनापासूनसाधंसोपंस्पष्ट आणि सडेतोडखोल पोचणारंअर्थपूर्ण बोलला.काहीही तत्त्वज्ञानी आव न आणता चित्रांच्या मूलतत्वांबद्दल बोलला.

चौकटीबाहेरची उन्ह आता मंदावली होती, आम्ही बोलत असताना पिंपळाच्या फांद्यांवर अनेक पक्षी आले आणि गेलेही. नदीचं पात्र जास्तच शांत वाटत होतं कारण कपडे आपटणारे धोबीही आता घरी निघून गेले होते. मावळत्या प्रकाशात जंगलाच्या आत जाणारी पायवाट अस्पष्ट दिसेनाशी झाली. सकाळी इथे आले तेव्हा लख्ख उजेडात चौकटीबाहेर रिऍलिस्टिक शैलीतलं एक निसर्गचित्र दिसलं होतं.. आता ते नव्हतं. त्याची जागा अमूर्त संध्याप्रकाशाने घेतली होती.  
मात्र खालच्या काळ्या कातळांवरचे शुभ्र, रंगित कपड्यांचे चौकोन, नदीच्या पात्रापलीकडचा यलो ऑकर, तपकिरी, पिंपळाचा अस्पष्ट हिरवा वातावरणातल्या राखाडी शिशिरामधे मिसळून जाऊन जो एकसंध आकार निर्माण झाला होता तो मला जास्त स्पष्टतेनं दिसत होता, समजत होता.
आणि त्याच्या सत्यतेबद्दल कुठलाही संदेह, कोणताही आभास मनात नव्हता.
त्याकरता आणि एकुणच सगळ्याकरता मग मी प्रकाश वाघमारेचे मनापासून आभार मानते.

=========================================================


शर्मिला फडके