Monday, November 22, 2010

माझं आवडतं पेंटिंग- एक


कला रसास्वाद म्हणजे नक्की काय? चित्र कसं बघावं, आपल्याला जे कळलय ते बरोबर आहे की नाही हे भल्या भल्यांनाही उलगडत नाही आणि मग चित्रकलेबद्दल जवळीक वाटूनही दुरावा रहातो. चित्रकार अथवा चित्रकला समीक्षक नसलेल्यांच्या बाबतीत तर कला रसास्वाद हा उगीचच फार गहन प्रश्न बनून रहातो. तसं होऊ नये म्हणून 'चिन्ह' तर्फे आम्ही काही चित्रकारांना, चित्रकलेच्या जाणकारांना त्यांच्या आवडत्या पेंटिंगबद्दल, त्यांच्यावर प्रभाव टाकणार्‍या त्यातल्या घटकांबद्दल आणि त्या चित्रकाराच्या वैशिष्ट्यांबद्दल.. एकंदरीतच आपल्या आवडत्या पेंटिंगबद्दल मनात उमटणार्‍या सर्व विचारांना 'चिन्ह' ब्लॉगसाठी शब्दबद्ध करायला सुचवलं. त्यांनी ते आनंदानी मान्य केलं. 


चित्रकार प्रभकार कोलतेंच्या आवडलेल्या पेंटिंगविषयी चित्रकार जयंत जोशींनी चित्राइतक्याच तरलतेने मांडलेले आपले विचार-


कोलते,untitled -




"निसर्गात,साहित्य-सृष्टीत प्रत्येक कल्पनेची जुळी किंवा समांतर उदाहरणे सापडतात.
या कल्पना,त्यांच्या चेतनांचे जनुकीय स्त्रोत आणि त्यांचे वर्गीकरण हे दृश्यमाध्यमातून जितके प्रभावीरित्या व्यक्त होईल तेवढे कशातूनही होणार नाही. शोधणार्‍यालाच नवी रूपे,नवे ध्वनी,चवी सापडत जातात.
हे सर्व अधिक त्यांचे रूप-मेळ,आपसातले संकर अलग अलग प्रमाणात, वेग वेगळ्या लयीत आस्वादले तर त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व निश्चित करण्यासाठी नव्या संज्ञा शोधाव्या लागतात.
चित्रकार प्रभाकर कोलते यांची चित्रे म्हणजे त्यांनी शोधलेल्या आणि त्यांनी अनुभवलेल्या या नव्या भाव-प्रदेशाच्या संज्ञा आहेत.
या संज्ञांचे वर्णन फक्त कोलत्यांच्या प्रत्यक्ष चित्र-दर्शनानेच होऊ शकेल.
असे वाटते की परिपक्वता,एकाग्रता आणि बुद्धी-प्रामाण्याच्या अनेक कसोट्या आणि प्रयोग त्यांनी कॅनव्हासवर केले असतील आणि त्यातल्या "भावना" नावाच्या द्रव्याची वाफ झाल्यावर, निव्वळ चेतनेने उरलेल्या प्रगट अवशेष-चिन्हांची अनियमितता नियंत्रित केली असेल...
खरे म्हणजे या सेरीज मधली सर्वच चित्रे एका वेळी बघायला हवीत.
गाण्यासारखी चित्रकला अंशतः जरी तुमच्या जीवनात झिरपली असेल तर काही वेळाने हे चित्र तुमच्याशी बोलू लागेल.
नाहीतर नाही.
केवळ drawing रूम किंवा ऑफिसची शोभा बनून फर्निचरचा भाग
होऊन राहणार्‍या चित्रांच्या जातीतले हे painting नाही.
या पेंटिंगची जादू सहवासाने तुमच्याशी नक्की संवाद साधते.
कधी आपण कुणा मोठ्या व्यक्तीच्या  सान्निध्यात असल्यावर एका अदृश्य तेजोवलयाचा भास होत राहतो,तसेच या चित्राच्या बरोबर असताना वाटते.
एखाद्या उत्कृष्ट मैफलीचा impact तुमच्यावर काय होतो?तुम्ही निर्विचार आणि स्तब्ध होता.
हे पेंटिंग आणि त्या सेरीजमधली बाकीची चित्रे बघून माझे तसे झाले.
अजूनही होते."

-
Jayant B.Joshi.
'Kalashree'
36 Laxmi Park Colony
Pune 411 030.

'माझं आवडतं पेंटिंग' मधे सर्वात पहिल्यांदा लिहिणारे ज्येष्ठ चित्रकार श्री.जयंत जोशी  गेली जवळपास ३५ वर्षे चित्रकलेच्या किंवा एकंदरच कलेच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत.  मुख्यत्वे ऑइल, अ‍ॅक्रिलिक, पेस्टल्स अशा माध्यमांतून संवेदनशील पेंटिंग करणार्‍या जयंत जोशींची इथे औपचारिक ओळख करुन देताना जेव्हा त्यांच्या कलाकारकिर्दीवर नजर टाकली तेव्हा ते एक यशस्वी चित्रकार आहेत आणि त्यांच्या चित्रांची अनेक स्वतंत्र प्रदर्शने पुणे, मुंबई आणि इतर शहरांमधे सातत्याने भरत असतात, ती गाजतात, चित्रविक्री यशस्वीपणे होते या गोष्टी नजरेत भरल्याही आणि त्या महत्वाच्याही आहेत अर्थातच पण त्याबद्दल सविस्तरपणे इथे सांगण्यापेक्षा मला महत्वाची वाटत आहे त्यांची अगदी सुरुवातीपासून ते आजतागायत सुरु असलेली कलेच्या सर्व प्रांतामधली मुक्त मुशाफिरी. पं. भीमसेन जोशींचे चिरंजीव या नात्याने संगीत तर त्यांच्या जीवनालाच व्यापून आहे पण त्यासोबत साहित्य, नाट्य, सिनेमा (उंबरठा-सुबहचे कलादिग्दर्शन), जाहीरात (घाशीराम कोतवालची जाहिरात संकल्पना आणि प्रसिद्धी), स्टील आणि डिजिटल फोटोग्राफी, कॉम्प्यूटर ग्राफिक्स अशा कलांमधे जयंत जोशी एकीकडे पेंटिंग सुरु असतानाच रमत राहिले, कलेबद्दल सातत्याने विचार करत राहीले, शोध घेत पुढच्या टप्प्यांवर जात राहीले. कलाप्रांतामधे वावरत असतानाच सामाजिक-वैचारिक संघर्षातून कलेच्या जीवनातील स्थानासंदर्भात काही उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करत राहीले. आणि या सार्‍याचे प्रतिबिंब तितक्याच संवेदनशीलतेने त्यांच्या चित्रांमधून उमटत राहीले ही गोष्ट जास्त महत्वाची. त्यांचे 'फेअरी ऑन द व्हीलचेअर' हे एकच चित्र जरी पाहीले तरी ही गोष्ट पुरेशी स्पष्ट होईल. 


'माझं आवडतं पेंटिंग' मधे कदाचित तुम्हालाही तुमच्या आवडत्या चित्राबद्दल आणि चित्रकारांबद्दलही लिहावेसे वाटेल किंवा तुमच्या स्वतःच्या पेंटिंगबद्दल तुम्हाला लिहावेसे वाटेल तर त्याचे मनःपूर्वक स्वागत आहे. आपल्या आवडत्या पेंटिंगविषयीचे तुमचे विचार त्या पेंटिंगच्या इमेजसहीत आम्हाला मेल करा.
शर्मिला फडके

Tuesday, November 16, 2010

याला म्हणतात स्वतःवरच लादलेली सेन्सॉरशिप.

आधी



नंतर

यावर्षीच्या दिवाळी अंकांमधे चित्रकलेवर कायकाय येतय याची माहिती 'चिन्ह' ब्लॉगसाठी मिळवताना 'मुक्त शब्द' दिवाळी अंकाचे संपादक श्री. येशू पाटील यांनी यावर्षी कव्हरवर चित्रकार आरा यांनी पन्नासच्या दशकात काढलेले आणि त्यातल्या अभिजाततेमुळे गाजलेले एक फिमेल न्यूड आम्ही छापत आहोत आणि अंकाच्या आतमधे चित्रकार प्रभाकर कोलते यांचा चित्राचे रसग्रहण करणारा लेखही आहे असे सांगितले होते. चित्रकार कृष्णाजी आरा हे भारतातील आधुनिक चित्रकार ज्यांनी फिमेल न्यूड हा विषय घेऊन त्यावर पद्धतशीरपणे,बारकाईने आणि नॅचरलिझमच्या मर्यादेत राहून चित्रमालिका केली.
आनंद आणि उत्सुकता दोन्ही मनात घेऊन 'मुक्त शब्द' २०१० चा दिवाळी अंक उचलला.
अंक उचलला आणि धक्काच बसला.
अंकाच्या मूळ आरांचे चित्र असलेल्या कव्हरवर आता 'मुक्तशब्द'च्या आधीच्या अंकांच्या मुखपृष्ठांची चित्रं छापून 'आजच सभासद व्हा!' असं लिहिलेला एक फ्लॅप बेंगरुळपणानं चिकटवलेला. असं का? ही सेन्सॉरशिप कोणी आणि का लादली?
संपादक येशू पाटील यांना विचारलं तेव्हा असं कळलं की  आरांचं चित्र असलेल्या दिवाळी अंकाच्या प्रती आल्या तेव्हा येशू पाटील सपत्नीक औरंगाबादमधे होते. तिथे विक्रीसाठी अंक ठेवल्यावर त्यांच्या पत्नीच्या असं लक्षात आलं की लोक विशेषतः बायका अंक उचलल्यावर कव्हर बघून लगेच बाजूला टाकून देत आहेत. २-३ वेळा असं झालं. ओळखीच्या एक बाई तर म्हणाल्याही की- 'हे काय.. आधी कशी छान छान चित्रं असायची कव्हरवर!'  दरम्यान संपादकांनाही काही दुकानदार, अंक विक्रेत्यांचे कव्हरबद्दल नाराजी व्यक्त करणारे फोन आले होते. ग्राहकांना सांभाळून घ्यायला हवं, घरी बायका-मुले असल्याने असं चित्र असलेला दिवाळी अंक घरी न्यायची त्यांची पंचाईत होईल या 'सद्हेतूनं ' मग येशू पाटलांनी त्या चित्राला झाकून टाकण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले- 'चित्र आत कुठंही असलं तर हरकत नाही (तशी आम्ही आमच्या आधीच्या अंकात छापलीही आहेत) पण कव्हरवर असं चित्र छापून चूकच झाली आमची ती सुधारायला हवी असं वाटलं.'
- मग आरांच्या त्या समुद्र किनारी चिंतनमग्न स्वरुपात पाठमोर्‍या बसलेल्या स्त्री च्या नग्न चित्रावर पडदा पडला.
समाजातल्या नैतिक दडपणांना बळी पडून चित्रातली नग्नता नंतर झाकून टाकण्याची झालेली अशी धडपड अर्थातच काही नवी नाही. सोळाव्या शतकात कर्मठ रोमन धर्मगुरुंनी मायकेल अ‍ॅन्जेलोच्या 'द लास्ट जजमेन्ट' मधल्या नग्नतेला अंजिराच्या पानांच्या डहाळ्यांनी झाकून टाकून चर्चचे पवित्र वातावरण अबाधित राखण्याची धडपड केली. पुढची अनेक शतकं ही मोहीम चालूच राहिली. 'द फिग लिफ' या नावाने कलेच्या क्षेत्रात बदनाम होत राहिली. आज एकविसाव्या शतकातही अशी अंजिराची पानं चित्रांमधल्या नग्नतेला झाकून टाकण्यासाठी धडपडतच आहेत.

'मुक्त शब्द'च्या आतल्या पानावर आरांच्या या चित्राचे अत्यंत सुंदर रसग्रहण चित्रकार प्रभाकर कोलते यांनी 'स्त्रीच्या पाठीलाही डोळे असतात' या लेखात केलं आहे. चित्राकडे विशेषत: 'न्यूड' कडे कलात्मक दृष्टीनं बघणं म्हणजे नेमकं काय? चित्रकार जेव्हा 'न्यूड' करतो तेव्हा नग्न देह चित्रातून दाखवण्यामागे त्याला कोणत्या भावभावनांचे प्रकटीकरण अभिप्रेत असते हे इतक्या सोप्या शब्दांत या आधी कधीच कोणी उलगडवून दाखवलं नव्हतं . ज्या चित्राबद्दल आपण इतकं भरभरुन लिहितो आहोत त्याला असं 'लपवून' टाकल्यावर कोलतेंना काय वाटलं? एक चित्रकार म्हणूनही त्यांची याबद्दल प्रतिक्रिया काय हे जाणून घेणे महत्वाचे वाटले.
कोलतेंना फोन केला तेव्हा अत्यंत कडक शब्दांमधे त्यांनी याचा निषेध केला. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर- " आरांच्या चित्रावर असा फ्लॅप लावला हे मला नंतर समजलं आणि धक्काच बसला. आरांच्या अभिजात चित्राचा यात अपमान झाला आहे.  लोकांची अभिरुची घडवण्याचे काम संपादक-प्रकाशकांचे आणि तेच चुकीच्या पद्धतीने चित्राकडे बघतात याला काय म्हणायचं? नग्न चित्र म्हणजे त्याकडे केवळ लैंगिकतेच्याच दृष्टीकोनातूनच बघितलं जातं हा समज अजूनही असावा हे दुर्दैव आहेच पण जे निषेध करतील, नाकं मुरडतील त्यांना चित्रांमधल्या नग्नतेकडे कसं बघायला हवं हे पुन्हा एकदा शिकवण्याची ही संधी घ्यायच्या ऐवजी संपादकांनी अशी कच खाल्ली हे जास्त दुर्दैवाचं. बॉलिवुड आणि इतर माध्यमांतून बिभत्सतेचा चाललेला नंगा नाच जो समाज खपवून घेतो त्या समाजाला आरांसारख्या चित्रकाराने काढलेलं न्यूड दिवाळी अंकाच्या कव्हरवर चालत नाही, त्यामुळे अंकाचा दर्जा आणि खप कमी होतो हा त्या समाजाचा ढोंगीपणा आहे.  'मुक्त शब्दचा' हा कसला 'मुक्त'पणा?"
-------------------

प्रभाकर कोलतेंनी लिहिलेल्या आरांच्या या न्यूड चित्राच्या रसग्रहणातील हा एक छोटासा पॅरा- " तिच्या बसण्यातील सहजता आणि थाट आवाहकतेची मर्यादा जपणारा तसेच विवस्त्रतेतही सौंदर्याचा एकही बुरुज ढासळू न देण्याचा तिचा मानस व्यक्त करणारा. अवघ्या जगाकडे तिने केलेली पाठ त्या मानसाचेच बाह्यांग असावे बहुतेक. अशी पाठ फिरवून बसताना तिने साधलेला विशिष्ट 'कोन' म्हणजे पाठीचे सुरक्षित पदरात रुपांतर करण्याचा मंत्रच. असा पदर झालेली पाठ वार्‍यामुळे नव्हे तर आतल्या चैतन्याने थरथरणारी.
स्वतःच्या देहसंपदेवर स्वतःखेरीज इतर कुणाचीही नजर पडणार नाही याची खबरदारी घेत मुक्तीचे दुर्मीळ क्षण एकांतात अनुभवणार्‍या ह्या स्त्रीला चाहूल लागू न देता, चित्रकाराने तिला आणि त्यालाही न अवघडवणारा 'कोन' चित्र रंगवताना साधला असण्याची शक्यता अधिक आहे. ह्या अशा कोनामुळेच जिवंत भिंतीपलीकडचे चढ-उतार, भाव-विभाव, भावविवश-कटाक्ष इत्यादी रती-ऐश्वर्याचे मौल्यवान घटक तिच्या पाठीवरच्या ओलेपणात आपल्याला शोधावे लागणार आहेत. आपला हा शोध यशस्वी व्हावा म्हणून चित्रकाराने कलात्मक काळजी घेत घेत ते देहवैभव आपल्या कल्पनाविश्वात भासमान करण्याचा अनवट प्रयत्न केला आहे; परंतु तो करताना त्याने तिची जांभुळसर पाठ हुबेहूब नव्हे तर हळव्या कंपनप्रक्रियेने रंगवून आपल्या वासनेला नव्हे तर सौंदर्यजाणिवेला चाळवले आहे; त्यामुळे ही पाठच त्याने रंगविलेल्या चित्राचा चेहरा झाली आहे. अशा त्या चित्र-चेहर्‍याच्या शोध प्रवासात आपल्याला सहाय्यभूत ठरले आहेत ते; रंग, आकार, पोत, छायाप्रकाश इत्यादी चित्रघटक आणि ते हाताळण्याचे चित्रकाराचे लक्षणीय कसब."
-------------------
१९७२ साली रॉय किणीकरांनी 'आरती' नावाच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर 'न्यूड' फोटोग्राफ छापला होता. स्त्री-देहाचं अर्धवट सौंदर्य छापून वाचकांच्या भावना चाळवण्यापेक्षा स्त्री-देहाच्या पूर्ण सौंदर्याची अभिजात ओळख असा त्यामागे त्यांचा हेतू होता. किणीकरांनी केलेल्या या धाडसावर सत्तरीच्या दशकात सडकून टीका झाली आणि अंकाच्या विक्रीची बोंब झाली असे अनिल किणीकरांनी गेल्या वर्षीच्या 'चिन्ह'मधे लिहिलं होतं. आज तब्बल चाळीस वर्षांनंतर 'शब्द मुक्त' च्या संपादकांना असेच धाडस करायची इच्छा व्हावी पण ऐन वेळी मात्र समाजाची टीका आणि विक्रीचा तोटा याला घाबरुन त्यांना कच खावी लागावी, त्यांनी स्वतःहून स्वतःवर सेन्सॉरशिप लादून घ्यावी?
यात नक्की काय आणि कुठे चुकते आहे?
कलेबद्दल आस्था असणार्‍या प्रत्येकाकडून यावर प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

----------------------------------------------------------------------------------------------
शर्मिला फडके

Wednesday, November 10, 2010

सिस्फा आणि चित्रकलेचे चांदणे

चित्रकाराने चित्र काढणे आणि तो ते काढत असताना इतरांनी बघणे हा एक आनंदसोहळाच असतो. चित्रकारांना एकत्रित करुन असे सोहळे सतत साजरे करण्याची आवड असणार्‍यांपैकी एक आहेत नागपूरच्या सेन्ट्रल ईंडिया स्कूल ऑफ फाईन आर्ट्स म्हणजेच 'सिस्फा' (CISFA) चे अधिष्ठाता श्री. चंद्रकांत चन्ने. विदर्भातल्या लहानमोठ्या चित्रकारांना एकत्र आणून त्यांची निवासी शिबिरे, कार्यशाळा आणि इतर काही ना काही स्वरुपाचे कार्यक्रम ते उत्साहात भरवत असतात आणि तेही अभिनव पद्धतीने.
गेल्या महिन्यातच कोजागिरीच्या निमित्ताने सिस्फातर्फे विदर्भातल्या चित्रकारांचे एक वर्कशॉप झाले. चित्रकारांना कॅनव्हास, रंग वगैरे साहित्य दिले गेले. चित्रकारांनी संध्याकाळी ७ पासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोजागिरीच्या चांदण्यात फक्त चित्रं काढायची... कोजागिरी चित्रकला शिबिराची ही कल्पनाच किती रोमॅन्टिक! 
या कोजागिरी शिबिरामधे १२० चित्रकार सहभागी झाले आणि त्यांचा वयोगट होता २० ते १०० वर्षे.  नानासाहेब गोखले नावाचे ९९ वर्षांचे चित्रकार कोजागिरीच्या या चित्रकलाउत्सवात सहभागी होण्याकरता नागपूरपासून १०० किमी.वर असलेल्या दरियापूराहून आले हे तर ग्रेटच!


या शतायुषी ज्येष्ठ चित्रकाराने कोजागिरी शिबिरात काढलेली ही चित्रे-






या शिबिराची अनेक छायाचित्रे चन्ने सरांनी खास चिन्ह ब्लॉगकरता पाठवली आहेत.

अशी शिबिरे भरवण्यातून निष्पन्न काय झाले असं काही जण विचारतील तर ते अर्थातच महत्वाचे नाही. २० वर्षांपासून १०० वर्षांपर्यंतच्या लहानथोर चित्रकारांनी रात्रभर एकत्रितपणे कोजागिरीच्या चांदण्यात चित्रं काढण्याचा आनंद लुटला हे महत्वाचे.

सिस्फातर्फे अजून एक विदर्भस्तरीय बालकला निवासी शिबीर (९ नोव्हें. ते १४ नोव्हें.) बसोली ग्रूप आणि मुंडले पब्लिक स्कूल, नागपूर येथे भरवले जाणार आहे. त्याची आमंत्रण पत्रिकाही अभिनव आहे.


चित्रकला हा एक संस्कार आहे आणि त्याची रुजवण इतर चांगल्या संस्कारांप्रमाणेच जितक्या लहान वयात होईल तितके चांगले हे चन्ने सरांनी नुसते ओळखले नाही तर ते तशी रुजवण करण्याकरता अशा तर्‍हेने सतत सक्रीय आहेत हेही फार महत्वाचे.






शर्मिला फडके