‘चिन्ह’विषयी......

१९८७ साली सतीश नाईकांनी पहिला 'चिन्ह' दिवाळी अंक काढायचे ठरवले तेव्हा दृश्यकलेचा सर्वोपांगी वेध घेऊन तिचे वेगवेगळे पैलू वाचकांसमोर आणण्याचा हेतू त्यांच्यासमोर स्वच्छ होता. चित्रकला विषय तोपर्यंत माध्यमांकडून संपूर्णतया दुर्लक्षिला गेलेला. कला आणि पत्रकारिता अशा दोन्ही क्षेत्रांत वावरणार्‍या सतीश नाईकांना हे दुर्लक्ष जास्तच जाणवत होतं. त्यासाठी कोणीतरी काहीतरी करायला पाहीजे तर ते आपणच कां नाही? या भावनेतून 'चिन्हची निर्मिती झाली.
नवे विषय, नव्या कल्पना, नवे प्रयोग, जुने-नवे कलावंत, त्यांचे कार्य,भास्कर कुलकर्णींसारख्या वारली चित्रकलेला जगासमोर आणण्याचे कार्य केलेल्या कलावंताच्या अद्भूत आयुष्याचा वेध' गायतोंडेंसारख्या जागतिक कीर्तिच्या कलावंताच्या आयुष्याचे आत्तापर्यंत कोणीही न उलगडू शकणारे पैलू, चित्रकलाशिक्षणविषयक, जेजेमधील आणि कलाक्षेत्रातील भ्रष्टाचार..अशा अनेक विषयांवर बहुमोल विशेषांक चिन्हने काढले.
चित्रकलेविषयीची उत्सुकता शमविण्याच्या मुळ कल्पनेच्या कितीतरी पलिकडे जात चिन्हने आता कलेविषयी विचार करायला वाचकांना भाग पाडलं हे फार मोठं यश.