Monday, December 5, 2011

‘मराठी पाऊल पडते पुढे’

कोल्हापूरहून चित्रकार श्यामकान्त जाधव यांनी ‘चिन्ह’च्या ‘नग्नता’ अंकावर प्रतिक्रिया देणारं एक पत्र पाठवलं आहे. चित्रकले इतकंच लेखनावरही प्रभूत्व असलेल्या जाधव यांचं ‘रंग चित्रकारांचे’ हे पुस्तक विशेष लोकप्रिय आहे. सोबत ‘रंग चित्रकारांचे’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि श्यामकान्त जाधव यांचं प्रख्यात चित्रकार रविंद्र मेस्त्री यांनी चितारलेलं व्यक्तीचित्र.


सप्रेम आशीर्वाद!
श्यामकान्त जाधव

‘चिन्ह’ हा यावर्षीचा मानबिंदू ठरलेला खास अंक आवर्जून पाठवलात याबद्द्ल आभार!
‘चिन्ह’ आंतरबाह्य सुंदर आहे. त्याबद्दलची तुमची मेहनत प्रत्येक पृष्ठावर प्रत्ययाला येते. ती निर्मितीमूल्यं बहाल करणारे सर्वजण अभिनंदनास पात्र आहात. मी सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो!

मुख्यपृष्ठ ते अखेरच्या पृष्ठापर्यंतचं त्याचं सौंदर्य भूरळ घालणारं वाटलं. ‘हुसेन आणि मी’ हा प्रभाकर कोलते यांचा लेख मला विचारप्रवर्तक आणि सत्यान्वेषाचं दर्शन घडविणारा वाटला. श्री. कोलते हे आजचे चित्रकलेतील सखोल वेध घेणारे एक आघाडीचे विचारवंत चित्रकार आहेत. त्यांची शब्दकळा त्यांच्यातील विचारांना अग्रक्रमाचं स्थान देते, तेही योग्य न्यायानं. ती जडवादी आणि क्लिष्टही नाही.

कोलतेंच्या ‘हुसेन’ यांच्याविषयीच्या दोन्ही लेखात हुसेन यांच्या जीवन आणि कलाजीवनाविषयी बरीच हकीगत प्रथमच वाचावयास मिळाली. हेही खरं की, तो वैश्विक रंगभाष्यकार होता. त्यानं अनेक युक्त्या प्रयुक्त्या केल्या. पण यातून खर्‍या अर्थानं तो स्वत:ला सिद्ध करीत राहिला. हजारो कॅनव्हास त्यानं आपल्या कुंचल्यानं सिद्ध केले. हा त्याचा पराक्रम अद्वितीयच आहे. त्याचं कलाकर्तृत्व उदंड आहे. म्हणून त्याला सलाम केला पाहिजे.

‘मोन्ताज आणि मोनालॉग’ मोनाली मेहेर या एका मराठी मुलीनं हिंदू कॉलनी ते हॉलंड, अ‍ॅमस्टरडॅम, मग थायलंड इथं सादर केलेले इंन्स्टॉलेशन, लाईव्ह आर्ट, आर्ट परफॉर्मन्स या सारख्या कला सादर करून जे अतुलनीय धैर्य दाखविल्याची कथा तिच्या मुलाखतीतून मांडली आहे. ती अप्रतिम आहे. पण ती खूप दीर्घ झाली, त्यामुळे त्याच्यातील वाचनीयता कमी होत जाते. पण तिच्या प्रयोगांना मिळणारा प्रतिसाद लक्षणीय वाटावा असा वाटतो. या कलांचा कालावधी अल्प असल्यानं त्याचं मागं उरणं अल्पकालीनच म्हणायचं, पण तिचं सादरीकरण अप्रतिमचं!

‘नग्नता चित्रातली आणि मनातली’ या विषयावर तुम्ही हा परिसंवादच घडवून आणलात आणि अनेकांचं त्या संबंधीचं अंत:करण उघड झालं ही आनंदाची गोष्ट आहे. ‘नग्नता आतली बाहेरची’ या दोन्ही गोष्टी सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह नाहीत. मात्र या संबंधी प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये प्रचंड कुतूहल असतं. आजवरच्या हजारो वर्षाच्या संस्कृतीमधून ते व्यक्त होत राहिलं. पण कुतूहलच घुसमटलं तर त्यातून विकृत भावनाच जन्म घेतात. आणि मग हा विषय अनादारास पात्र होतो. माणसाची भावनिक दृष्टी विशाल असेल तर नग्नतेलाही सुंदरता प्राप्त होते. पण जगात असं फारसं घडत नाही हे खरं. असा हा अवघड विषय ‘दृश्यकला आणि मन’ या माध्यमातून ‘चिन्ह’नं तो जगापुढे आणला हे धैर्यही मोठं मानावं लागेल. नग्नतेबद्द्ल काळा-काळात उद्रेक होत असतात. विचारमंथन होत असतं, ही गोष्ट खरं तर सनातन आहे. पण यासंबंधी सतत प्रबोधन होणं आवश्यक.

‘भारतीय तत्वज्ञानानं रस सिद्धांताची भलामण फार चांगल्या तर्‍हेने केली आहे. त्यामध्ये शृंगाररस फार चांगल्या रीतीनं मांडला गेला. हा सकारात्मक विचार होय. यामध्ये दृश्यकलेनं मोलाची कामगिरी केली आहे. यामधूनच दृश्यकलेची भाषा अवतरली. त्यांत नवनिर्मिती असा हा क्रम कलाकृतीतून सिद्ध होतो. त्यासाठी माणसात कलावंत मन असणं अगत्याचं. निदान तशी रसिकता महत्त्वाची’.

अकबर पदमसी, भालचंद्र नेमाडे, मेघना पेठे, प्रतिभा रानडे, डॉ. सुधीर पटवर्धन, डॉ. आनंद नाडकर्णी, पार्वती दत्ता या सर्व लेखकांचे लेख मला विचारदर्शक वाटले. शेवटी व्यक्त होणार्‍याला मर्यादा येतातच, पण या अंकातून काही पावलं पुढं गेल्याचं भासलं.

सुहास बहुळकरची बरीच कोठून कुठेपर्यंत लांबलेली ‘न्यूडल्स’ शोधणारी भटकंती इतिहासाची नोंद घेणारी आहे. या अंकाची चित्रमयता लक्षणीय आहे. न्यूड स्टडी या सदरातील देवदत्त पाडेकर या मनस्वी तरूण चित्रकाराची वेगवान आणि प्रकाशप्रवाही चित्रं हे या अंकाचं प्रभाव क्षेत्र आहे.

मांडणी उत्कृष्ट. नव्या छपाई तंत्रामुळे तर मुद्रण सौंदर्य खुलून गेलं आहे. आता हा अंक संदर्भ ग्रंथच झाला आहे. आता तर ‘चिन्ह’ इंग्रजी भाषेमध्ये सिद्ध होतोय असं समजतं. हे एक ‘मराठी पाऊल पडते पुढे’ अभिनंदन.

श्यामकान्त जाधव.

Monday, November 28, 2011


‘अ‍ॅडल्ट नसून कलात्मक फिल्म’

‘चिन्ह’च्या नग्नता विशेषांकावर वाचकांकडून सातत्यानं प्रतिक्रिया येत असतात. कलावंताकडूनच नाही तर सर्वसामान्य वाचकांकडून या अंकाला जसा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. त्या सर्वांच्याच प्रतिक्रिया आम्ही या ब्लॉगवरून सादर करीत आहोत. अशीच एक प्रतिक्रिया जळगाव मधील चित्रकार शिल्पकार अतुल मालखेडे यांची.


मा. श्री. सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह’
सप्रेम नमस्कार.



खूप दिवसांपासून आवडत्या ‘चिन्ह’ अंकाची वाट बघत होतो. खरे तर ‘चिन्ह’च्या बाबतीत नेहमीच उत्सुकता लागलेली असते. नेहमी एक नविन विषय घेऊन त्याचं संशोधन आपल्या ‘चिन्ह’च्या माध्यमातून घडत असतं. ‘नग्नताः चित्रातली आणि मनातली’ हा अनोखा पण सर्वच कलारसिकांच्या मनाची घंटी वाजवणारा विषय या माध्यमातून कलारसिकांच्या समोर आला. नग्नतेतील सौंदर्य सामान्य रसिकांना पटवून देताना प्रत्येक कलावंताची खूप दमछाक होत असते. पण आता ती ‘चिन्ह’च्या माध्यमातून पूर्ण झाली असेल यात शंका नसावी. त्यास्तव आपलं खूप खूप अभिनंदन.

श्री. रणजित देसाई यांच्या ‘राजा रविवर्मा’ या कादंबरीत एक नग्नतेविषयी वाक्य आहे. ‘न’ म्हणजे नाही आणि ‘ग्न’ म्हणजे चिकटलेला (अर्थात वासनेला) मग ती वासना कोणत्याही प्रकारची असो. ‘चिन्ह’ या अंकात नग्नतेसंदर्भात केलं गेलेलं समीक्षणात्मक विचार मंथन खूप प्रभावी ठरलं. सदर अंक वाचनीय आहे पण त्याचबरोबर विचारांनाही विचार करायला लावणारा आहे.

नग्नतेसंदर्भात आपण संपादक या नात्यानं प्रत्येक अंगास स्पर्श केलात. आपली भूमिका अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहे. संपादक म्हणून आपला विश्लेषणात्मक शोध खूप भावला. अंकात सर्वच मान्यवरांचे लेख आकलनीय व बोधप्रदान आहेत. चित्रकार हुसेन यांचे वरील कोलते सरांचे लिखाण नेहमीप्रमाणे अप्रतिम आहे. त्याचप्रमाणे हुसेनसारखा कलावंताला देश गमावतो तेव्हा देशाचं, समाजाचं आणि चित्रकारांचंही कसं नुकसान होतं याचं स्पष्टीकरण अगदी परखडपणे मांडून कलावंताला गमावताना सर्वांनाच विचार करायला भाग पाडलं आहे. आणि कलावंत हा नेहमीच जात, धर्म आणि राजकारण यांच्या पल्याड असतो हे दाखवून दिलं आहे.

सुहास बहुळकर सरांचं अध्यापन करित असतानाचे अनुभव, प्रसंग, त्यांनी मांडलेले विचार या अंकात समाविष्ट नसते तर मला वाटते हा अंक अपूर्ण राहिला असता.

अंकात चित्ररुपानं सजवणारी देवदत्त पाडेकर यांची न्यूड अंकाला पूर्णत्वास नेतात. त्याचबरोबर ज्येष्ठ चित्रकारांची दुर्मिळ न्यूड पेंन्टिग एकत्र करून केलेला एकसुत्रीतली सांगड ही तर आपल्या कल्पकतेची दादच म्हणावी.

अंकाच्या दोन मुखपृष्ठाचा इतिहास खूप भावला. मुखपृष्ठाला संपादक म्हणून योग्य बिंदूत साधलं आहे.



नग्नतेच्या संदर्भात माझा अनुभव सांगावासा वाटतो. मी स्टुडिओत एक न्यूड शिल्प साकारलं होतं. अशाच एका कलानिरक्षर गृहस्थानं मला प्रश्न केला तुम्ही सर्व कलावंत अशी नग्न कलाकृती का करता? मी आपलं, ‘हा तर आमच्या फिगर स्टडीचा अविभाज्य घटक’ असं प्राथमिक उत्तर दिले. त्यांना ते पटलं नाही. ते म्हणाले, ‘पण त्यानं बघणारांच्या भावना जागृत होतात’. मी आतून चिडलोच आणि त्यांना माझ्या शैलीत सांगितलं, ‘तुम्हाला त्यात वासना दिसते आम्हा कलावंताना नाही. खरं तर वासना ही बघणा‍र्‍यांच्या मनात आणि दृष्टीत असते. आम्हाला त्यात निखळ सौंदर्य दिसतं. माझं उत्तर ऐकून त्यांनी मला प्रणाम केला आणि लाजिरवाणे होवून निघून गेले.

एकंदरीत समाजातील बुरसटलेली वासना आपण अचुकपणे समोर आणून कलारसिकांच्या मनातील वासना दूर केली आहे यात शंकाच नाही.

आपला अंक ‘अ‍ॅडल्ट फिल्म नसून कलात्मक फिल्म’ आहे.
आपल्याला खुप खुप शुभेच्छा.....
       
शिल्पकार, चित्रकार
प्रा. अतुल मंगेश मालखेडे                                            
सप्तपुट ललितकला भवन, खिरोदा,              
ता. रावेर, जि. जळगाव.        
                     

Thursday, November 24, 2011




‘ललित‘चा दिवाळी अंक चाळता चाळता अचानक नजर अभावितपणे एका पानावर थबकली. पाहतो तर काय, तेथे ‘चिन्ह’चा उल्लेख. सुहास भास्कर जोशी यांच्या अमृता शेरगिल वरील लेखात त्यांनी म्हटलं होतं, ‘अमृता शेरगिलची चित्रं मी पहिल्यांदा पाहिली, ती १९८८ च्या ‘चिन्ह’च्या दिवाळी अंकात. या अंकात ललिता ताम्हाणे यांनी शब्दांकन केलेला दीप्ती नवल या अभिनेत्रीचा अमृता शेरगिल आणि तिच्या आयुष्यावरील संभाव्य चित्रपट या विषयावरचा लेख होता. या लेखात अमृताची चित्रं कृष्ण-धवल स्वरूपात छापलेली होती. अर्थातच, रंगाचा अंदाज येत नव्हता. पण तरीही ‘हिल मेन’, ‘हिल विमेन’, ‘ब्रम्हचारी’, ‘प्रोफेशनल मॉडेल’ (न्यूड), ताहितीयन शैलीतलं अमृताचं अर्धअनावृत्त सेल्फ-पोर्ट्रेट, ही चित्रं पाहून मी थरारून गेलो होतो. या लेखात कार्ल खंडालवालांच्या अमृतावरच्या पुस्तकाचा उल्लेख होता. हे पुस्तक मिळवायचंच, असा मी मनाशी निश्चय केला’. वगैरे वगैरे.
हे सारं वाचलं आणि २३ वर्षापूर्वीचे ते भयंकर दिवस क्षणार्धात नजरेसमोरून तरळून गेले. केवढ्या उमेदीनं आणि मेहनतीनं तो अंक आम्ही तयार केला होता. त्याच्याआधीचं सांगायचं झालं तर आदल्याच वर्षी म्हणजे १९८७ साली ‘चिन्ह’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला होता. त्या अंकाला त्या वर्षीची झाडून सारी बक्षिसं मिळाली होती. पु. ल., जयवंत दळवींपासून सर्वांचीच वाहवा त्या अंकानं मिळवली होती. पण अंक उशिरा प्रसिद्ध झाल्यानं सगळंच गणित फिस्कटलं होतं आणि सपाटून मार पडला होता. (ज्यांना याविषयी अधिक जाणून घ्यावयाचे असेल त्यांनी ‘निवडक चिन्ह‘चं प्रास्ताविक वाचावं. त्यासाठी ते पुस्तक खरेदी करण्याचीही गरज नाही. http://www.chinha.in/ या संकेतस्थळावरही ते वाचता येईल. असो.) त्यामुळे दुसरा अंक काढण्याची कल्पनाच रद्द करून टाकली होती. पण ठाण्याच्या अरविंद आणि अरुण दातार या बंधूंनी ती हाणून पाडली आणि त्याला भरीस पडून दुसरा अंक मी पुन्हा काढला. पुन्हा तेच आदल्या वर्षीचे कष्ट, तीच मेहनत, तेवढाच किंबहूना त्याच्यापेक्षा जास्त आटापिटा करून अंक तयार केला. पण छपाईसाठी वापरल्या गेलेल्या भयंकर कागदानं या सार्‍यांवर बोळा फिरवला. इतका की छापून आलेली प्रत उघडून पहावयाचीसुद्धा इच्छा झाली नाही. वर्षा-दोन वर्षापूर्वी म्हणजे तब्बल वीसएक वर्षांनी ‘निवडक चिन्ह’च्या निमित्तानं मी त्या अंकाची प्रत पहिल्यांदा उघडून पाहिली.

पहिल्या अंकाप्रमाणे हाही अंक उशीराच प्रसिद्ध झाला होता. आणि हाही अंक सपाटून आपटला होता. विकल्या गेलेल्या किंवा रद्दीत गेलेल्या प्रतींपैकी एक प्रत डॉ. सुहास भास्कर जोशी यांच्या हाती आली असावी आणि त्या अंकातल्या अमृता शेरगिलवरच्या लेखानं ते प्रभावित झाले असावेत. आणि जवळ जवळ २२-२३ वर्षानंतर त्यांनी आठवणीनं त्यांनी ‘चिन्ह’चा उल्लेख करून अमृता शेरगिलवरच्या विवान सुंदरम यांच्या द्विखंडात्मक पुस्तकांवर अतिशय सुरेख असा लेख लिहावा, हे सारंच विस्मयचकीत करणारं तर आहेच पण सुखावणारंही. मनापासून आणि अतिशय प्रामाणिकपणानं केलेली कुठलीच गोष्ट वाया जात नाही, त्याची बीजं कुठं कुठं रुजली जात असतात. या उक्तीचा प्रत्यय देणारी.

‘निवडक चिन्ह’चा पहिला खंड प्रसिद्ध झाल्यापासून हे असेच क्षण वारंवार अनुभवावयास मिळताहेत. पण १९८७-८८ साली हे अंक प्रसिद्ध करताना ज्या दिव्यातून मला आणि माझ्याशी संबंधित सार्‍यांनाच जावं लागलं. त्या कटू आठवणी आजही नकोशा वाटतात. ‘चिन्ह’च्या बाबतीत आज जे काही घडले आहे किंवा घडते आहे ते सारंच स्वप्नवत आहे. हे असं काही घडेल याची पुसटशीही कल्पना तेव्हा आली नव्हती, अगदी स्वप्नातसुद्धा, हे मात्र इथं कबूल करावसं वाटतं. आता सतत मागणी होते ती ‘निवडक चिन्ह‘च्या दुसर्‍या पर्वातल्या खंडांची. त्याचीच तर जुळवा जुळव आता होऊ घातली आहे.

सतीश नाईक

जाता जाता... डॉ. सुहास भास्कर जोशी यांचा अमृता शेरगिलवरचा लेख चित्रकलेविषयी आस्था असणारे वाचतीलंच पण चित्रकलेशी संबंधितांनीही तो आवर्जून वाचायलाच हवा.

Monday, November 14, 2011


हसता हसता मुरकुंडी वळली...
नग्नता अंकावर एक वेगळीच प्रतिक्रिया

‘चिन्ह’चा अंक प्रसिद्ध झाल्यावर धडाधड खूप फोन आले आणि एसएमएसही. त्यांत अर्थातच अंक प्रथमदर्शनी आवडल्याच्या प्रतिक्रिया होत्या. आता हळू हळू अंकाविषयीच्या लिखित प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आणि त्या खरोखरच भन्नाट आहेत. त्यामुळे त्या जशाच्या तशा द्यायचा निर्णय घेतला. त्यातली ही एक अफलातून प्रतिक्रिया जुन्नरच्या सावित्री जगदाळे यांची. सावित्री जगदाळे या स्वत: एक लेखिका आहेत. जुन्नरसारख्या आडगावी त्यांचं वास्तव्य आहे. पण महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा ट्रॅक त्या ठेऊन आहेत. म्हणूनच त्यांचं हे पत्र ‘चिन्ह’ला विशेष महत्त्वाचं  वाटलं. सोबत त्यांच्या ब्लॉगची लिंक म्हणूनच जोडली आहे. - संपादक 


स. न. वि. वि.
‘चिन्ह’चा अंक मिळाला. विषय माहित असल्यामुळे माझा नवरा घरात नसताना अंक मिळावा अशी मनोमन प्रार्थना करत होते. पण ते घरात असतानाच पोस्टमन आला. एरवी त्यांनी फार उत्सुकता दाखवली नसती पण ह्या अंकाचे पैसे बँकेत भरले असल्यामुळे अंक उघडून बघितला. मी म्हटलं तरी, ‘नका बघू चांगला नाही’. मग तर घाईनंच उघडला. माझा नवरा सनातनी विचारांचा. त्यात पोलिस उपअधिक्षक. वर्तमानपत्र आणि क्राईम रिपोर्ट याशिवाय वाचन नाही. मग काय... असला फालतू अंक दिलाय? वगैरे, वगैरे...

एवढं सोवळं वातावरण घरातलं, विषय माहित असून, किंमत जास्त (इतर अंकापेक्षा) असून, मी हा अंक का मागविला असेल हा प्रश्न कुणालाही पडेल. मला या विषयावरचे विचार जाणून घ्यायचे होते. मला स्वतःला या विषयाचा तिटकारा आहे. सभ्यता म्हणजे जास्तीत जास्त अंग झाकणे, वगैरे विचारांचे संस्कार. वागणंही तसंच. तेच चांगलं वाटतं. पण मग मला नग्नतेची स्वप्न का पडतात. म्हणजे मी नागडीच आहे आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांशी सहज वागणं, बोलणं, काम करणं. असं स्वप्नात दिसायचं, दिसतं. दुसरे लोक नेहमीच्या सहजतेने कपड्यात मीच तेवढी नागडी. या माझ्या नागडेपणाचं कुणाला काय वाटत नसे. स्वप्नातून जागी झाल्यावर मात्र शरमल्यासारखं वाटतं. का पडत असतील अशी स्वप्न? मला फार आकर्षण आहे अशातला भाग नाही. लहान मुलं सोडली तर नागडेपणाची किळसच येते. मला स्वत:लाही कधी पूर्ण बघावसं वाटत नाही. मग अशी स्वप्न का पडत असतील. कुठेतरी वाचलं नग्नतेची स्वप्न पडणं म्हणजे मुक्ततेची ओढ असणं असतं. तेव्हा बरं वाटलं. पण आणखी एके ठिकाणी वाचलं एका पुरुषाला अशी स्वप्न पडत होती. नंतर कळलं की त्याचं बाहेर अफेअर आहे. माझं तर तसं काही नाही. सांसारिक सुख चांगलं आहे. मग का अशी स्वप्न पडत असतील?

मी साधी, सामान्य गृहिणी आहे. आठवीपर्यंत शिक्षण झाल्यामुळे लिहिता वाचता येतं. मला ‘चिन्ह’ या अंकातल्या चित्र आणि लेखाविषयी फार काय कळलं असं नाही. सर्वसामान्य डोळ्यांना जे दिसलं, वाचल्यावर थोडाफार विचार केला एवढंच. मी पुण्यात फार कमी काळ होते. पण तरीही चित्र प्रदर्शन बघायला जाणं जमत नसे. तशी फार आवडही नाही. माझ्या मुलीच्या कॉलेजच्या प्रदर्शनाला दोनदा गेलेले. ती पुण्याच्या अभिनव कॉलेजमधून (पाषाण) कमर्शियल आर्ट झाली आहे. ‘न्यूडस’बद्दल ती कधी काय बोलली नाही. माझं लहानपण खेड्यात गेलं. तिथे नग्नता फार दुर्मिळ नसते. उघड्यावर आंघोळ करणं, संडासला बसणं, दहा-अकरा वर्षाची मुलं उघडी नागडी फिरणं, काम करताना बायकांनी मांड्या दिसतील एवढा कासोटा घालणं. मुलांना कुठेही अंगावर पाजणं. वगैरे गोष्टी सहज असतात. उघडेपणाचा फार बाऊ नसतो. शिव्या तर जाता येता सहज कानावर पडतात. त्यामुळे ‘ओलेती’सारखं चित्र अश्लिल वगैरे अजिबात वाटलं नाही. उलट खूप आवडलं. असं चित्र काढायला किती अवघड असेल. लग्न झाल्यावर शहरात राहू लागले. थोडं वाचू लागले. तेव्हा कपड्याच्या बाबतीत जागृत झाले. जास्तीतजास्त अंग झाकतील असे कपडे घालणं म्हणजे घरंदाज, सभ्यपणाचं असतं असं माझं मत झालं. (आणि त्यामुळे त्वचारोग होऊ शकतात हेही कळालं.) खेड्यात गुरं वगैरे पाळीव प्राण्यांबद्दल सगळीच बाया, बापे सहज बोलतात. खेड्यात कलेशी संबंध तसा फारसा येत नाही. जात्यावरच्या ओव्या तर संपल्याच आहेत. पण वीणकाम, भरतकाम, गोधडी शिवणं, हेही फारच कमी झालंय. ‘भर पोटा जा दिसा’ असंच चाललेलं असतं.
नग्नता ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्यात अश्लिलता, पाप वगैरे काही नाही. पण मला अशी स्वप्न का पडत असतील या प्रश्नाचं फार समाधान झालंय असं नाही. अजून याबद्दल खूप वाचावसं, बोलावसं वाटतं. बोलणं तर शक्य नाही. पण मिळेल तसं वाचायची इच्छा आहे.

न्यूड्स कधीतरी एखाद्या दिवाळी अंकात बघितलेलं. पहिल्यांदाच ‘चिन्ह’मध्ये एकत्रित एवढी न्यूड्स बघितली. न्यूड्स बाईचीच जास्त का? मलाही पुरुषांपेक्षा बाईची काही न्यूड्स आवडली. पाठमोरी वेगवेगळ्या पोजमधली. चेहर्‍यावर निरागसता, आत्मनग्नता, कोवळीकता असे भाव असलेली न्यूड्स चांगली वाटली. जुन्या भारतीयांनी काढलेली न्यूड्स निबर, बटबटीत वाटली.

सुहास बहुळकर यांचा प्रदीर्घ, प्रगल्भ लेख खुपच आवडला. अवघड विषयावर फारच सोपेपणाने, मोकळेपणानं त्यांनी अभ्यासपूर्ण गप्पा मारल्यात. पुण्यावर लिहिलेलं वाचताना हसता हसता मुरकुंडी वळली. माझी लेक न्यूड्स बद्दल कधीच का बोलली नाही, ते कळाल. सांगली, कोल्हापूर या ग्रामीण शहरात मात्र न्यूड्सवर काम होतं, याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. ज्योत्स्ना, संभाजी कदम यांच्याबद्दल वाचल्यावर मन हेलावून गेलं. कलावंत माणसं एवढी प्रामाणिक आणि पवित्र (माझ्या कल्पनेप्रमाणे) राहू शकतात? मी ज्योत्स्ना कदम यांचं ‘सर आणि मी’ हे पुस्तक वाचल्यावर अशीच भारावून गेले होते. त्या पुस्तकातील न्यूड स्केचेस खूपच छान वाटली होती. त्यामुळेही नग्नतेबद्दलचा तिटकारा कमी झाला होत. म्हणूनच ‘चिन्ह’चा अंक मागवताना खंबीरपणा दाखवता आला.

लिहिताना मीही या अशा गोष्टीशी अडखळते, थबकते, तसे शब्द शक्यतो टाळते. काही कविता तर मी समाधानकारक झालेल्या असूनही फाडून टाकल्या आहेत. वाटायचं चुकून कोणाच्या हाताशी आलं तर? माझ्याबद्दल माझे लोक काय विचार करतील? पण ‘सर आणि मी’ वाचल्यावर बरंच धारिष्ट्य आलं. नवर्‍यालाही गोड बोलून थोडा थोडा भाग वाचून दाखवला. कदमांनी या विषयावर पुस्तक का नाही लिहिलं? असो. सु्हास बहुळ्करांच्या लेखाने पोट भरलं. प्रकाश कोठारी यांनी मात्र मोठं काम करून लेख फारच छोटा लिहिला. त्याचं मराठीत पुस्तक आहे का? त्यांनी आणखी लिहावं. लैंगिक शिक्षण मुलांना द्यावं का देऊ नये, दिलं तर कसं द्यावं या गोष्टीबद्दल अजून गोंधळलेली स्थिती आहे. या विषयावर ‘चिन्ह’नं विशेषांक काढावा. नग्नतेबद्दलचे गैरसमज, लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे सध्या तरी किती नुकसान होतंय समाजाचं, कळतंय का कुणाला? आपला समाज फालतू बंधनात किती जखडलाय. मन फार उद्विग्न होतं. अशी एवढी बंधन का आली असतील? ‘पहिली जाग’ ही सुनील गंगोपाध्याय यांची कादंबरी वाचली. त्यात इंग्रजांच्या काळात ब्लाऊज घालायची पद्धत सुरु झाली, असा उल्लेख आहे. तिकडे मोगलाईच्या झळा नसल्यामुळे असेल का? माझ्या नात्यातल्या एका बाईला झोपताना चोळी काढून झोपायची सवय होती. लैंगिकता, नग्नता या गोष्टी पुस्तकात किंवा चित्रात मात्र जास्त प्रभावी वाटतात. म्हणूनच पुस्तकांशी संबंधित लोक याचा जास्त बाऊ करत असतील?

मोनोलॉग वाचला. खूप भारावून गेले... स्वतःला मुक्त करण्याची निकड असल्यावर आपल्यात तेवढी ऊर्जा निर्माण होत असावी. अनुभवांकडे कसं बघतो यावर जगणं अवलंबून असतं. मी बाईची जात, असं कसं करू वगैरे रडगाणं गात बसलं की काहीच होत नाही. किंवा आपल्या माणसांना आवडत नाही तर कशाला करावं वगैरे... विचारवंत कुटुंबासाठीचा त्याग समजून स्वत:लाच दाबून, दडपून टाकणे, कोंडून ठेवणे चाललेलं असतं. या सगळ्याची मानसिक, शारीरिक, धार्मिक छळ करत असते. बाई जरा मोकळेपणाने वागली, बोलली की ती छिनालच आहे असा शेरा मारून मोकळे होतात सनातनी विचारांचे पुरुष. बरं छिनाल म्हणजे काय? पुरुष तसे वागले तर त्यासाठी कुठला शब्द आहे? कोर्‍या पाटीवरचे संस्कार खूप खोलवर गेलेले असतात. माझ्याकडे लोकांनी चांगल्याच दृष्टीकोणातून बघावं ही अपेक्षा स्वत:कडूनच केली जाते. त्यासाठी सभ्यता, सोज्वळता या गुणांची पांघरुण घेणं चाललेलं असतं. मोनाली मेहेर या मानसिकतेतून मुक्त झालेल्या आहेत. असा मुक्त कलाकार विश्वव्यापी असतो. हेच त्यांनी सिद्ध केलंय. आमच्यासारख्यांसाठी त्यांच्या काही परफॉर्मन्सेसचे फोटो दिलेत त्यांचे अर्थ सांगायला हवं होतं. ज्या परफॉर्मन्सचे अर्थ सांगितले आहेत तेवढेच कळाले, आणि खूप चांगलं वाटलं. बाकी लेख चांगलेच आहेत. स्वत:ला काय वाटते यापेक्षा समाजाला काय वाटेल याचाच जास्त विचार काहींनी केलेला दिसतो. चित्रकार हुसेन यांच्या ज्या चित्रांवरून त्यांना देश सोडावा लागला, त्यापैकी एखादं चित्र अंकात आलं असतं तर बरं झालं असतं. बाकी अंक चांगला होता असं म्हणावं वाटतं... पण अजून तरी पचनी पडला नाही. विशेषत: त्यातील चित्रं. यापेक्षा जास्त काय लिहिणार?
कळावे
धन्यवाद.
सावित्री जगदाळे
http://savitrijagdale.blogspot.com/


ज्यांना ‘चिन्ह’ला प्रतिक्रिया कळवाव्याशा वाटतात त्यांनी त्या जरूर कळवाव्या. ‘चिन्ह’च्या ब्लॉगवर त्या प्रसिद्ध करूच पण बहुदा याच अंकाच्या पुढल्या आवृत्तीतही त्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया बिनधास्त कळवा. अंक आवडला नसेल, खटकला असेल, तर तेही तसंच कळवा.

या अंकाच्या प्रतीसाठी ‘चिन्ह’च्या 90040 34903 या मोबाईल नंबरवर ‘1 m copy’ एवढाच एस.एम.एस. टाईप करून हा अंक स्पीडपोस्टनं मागवता येतो. तिसरी आवृत्ती देणगीमूल्य रु. ६००/-.



अंकाचा प्रोमो पाहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा:
http://chinha.in/marathi/index.html


Wednesday, November 9, 2011

‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ 
एक प्रांजळ अभिप्राय!


‘चिन्ह’च्या जाहिरात प्रायोजकत्व योजनेत सहभागी झालेल्या चित्रकार घनःश्याम घाटे (वय वर्षे ८०) यांनी ‘चिन्ह’चा अंक अत्यंत काळजीपूर्वक वाचून पत्रानं एक प्रदीर्घ अभिप्राय पाठवला. त्यांच्या अभिप्रायामागची त्यांची मनःपूर्वकता अतिशय आवडली म्हणून त्यांचा अभिप्राय जसाच्या तसा प्रसिद्ध करीत आहोत.

 मित्रवर्य श्री. सतीश नाईक,
 स. न. वि. वि.

‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ ह्या आपण पाठविलेल्या या विशेषांकाचे दोनांक मिळाले. दोन प्रतींच्या मेव्याचं प्रयोजन समजलं नाही. असो, दुहेरी आभार. टेलिफोन संपर्काचं वैफल्य आणि वेळीच लेखी पोच देण्याच्या विरक्तीबद्दल क्षमस्व.


 खरं म्हणजे अंक म्हणण्याऐवजी ग्रंथ म्हणणंच उचित असं पहिल्या नजरेतच वाटलं आणि शेवटपर्यंत टिकलं. इतकं भारदस्त आणि विलोभनीय स्वरुप पाहून किंचितसा आवाक्पण झालो. मराठी मायबोलीला आणि मराठमोळ्या चित्रकलेला ललामभूत वाटावं असं सर्वांगसुंदर. सुडौल सादरीकरण, चातुर्यपूर्ण संकलन, अर्थपूर्ण साहित्य इत्यादी आवश्यक गुणास न्याय देणारी आकर्षक रंगीत छपाई. सारंच संतुलित. संपादकीयमध्ये उद्धृत केलेल्या कष्टांचं चीज करणारा ठरावा असा ह ग्रंथ म्हणा वा विशेषांक.

एकदम आपले १९९० च्या दरम्यानचे उमेदवारीचे दिवस आठवले आणि आपण कुठल्याकुठे पोहोचल्याचं पाहून धन्यता वाटली. हार्दिक अभिनंदन.

मराठी दिवाळी अंकाच्या शंभरएक वर्षांच्या प्रवासातील, सरासरी दहा वर्षांच्या अंतरात दहा कर्तबगार संपादकांच्या यादीनंतर, सतीश नाईक हे अकरावं नाव गोवण्याचा श्री. सुनील कर्णिक ह्यांच्या निर्णयाबद्दल, हा विशेषांक पाहिल्यावर, दुमत होण्याचं कारणच उरत नाही.

“मुद्रा भद्राय राजते’’च्या तोडीचा ‘चिन्ह’ हा ठसा आणि सतीश नाईक ह्या नावाची सही, दोन्ही बांधेसूद, कलात्मक आणि चित्तवेधक, सत्व दर्शवणारी-राखणारी.

परिसंवादातील लेखकांच्या छायाचित्राप्रमाणं इतर काही लेखांच्या खाली असलेल्या दत्ता पाडेकर, शर्मिला फडके आदि नावांच्या खाली वा शेजारी त्यांची छायाचित्रं दिसली तर प्रत्यक्ष भेटीच्या खालोखाल आनंद होईल. ‘माणिक’मोती आहे, सजातीय हिरेमाणकं पण असावीत.

वळणदार, लयबद्ध वेलांट्यातून चितारलेलं विविध शीर्षकांचं अक्षरांकन मोहांत पाडणारं. ‘चित्रसूत्र’च्या मुखपृष्ठावरील गोंडस आकारांची आणि वेधक रंगांची किमया औरच. सूज्ञ आणि चपखल गुंफण-प्रक्रिया, त्यातील ‘अक्षर’ खुलवणारी आणि विशेष म्हणजे, अवती-भोवती जाणीवपूर्वक खुली सोडलेली जागा, शीर्षकांच्या आशयाकडे सहजरीत्या पोचवणारी.

मुखपृष्ठावरील चित्राच्या निवडीचा निर्णय यथायोग्य आणि समर्पक. त्यातील नग्न मॉडेलचा कमरेच्या खालचा भाग थोडासा अधिक उंच असता तर चित्र अधिक प्रमाणबद्ध आणि सुडौल भासलं असतं. देवदत्त पाडेकरची सर्वच न्यूडस् कौतुकास्पद आहेत. विद्यार्थी दशेतल्या त्याला दत्ता पाडेकरसोबत जे.जे.मध्ये डिप्लोमाच्या वर्गात अभ्यास करताना पाहिलं होतं. त्यामुळं त्याच्या प्रगतीचा पल्ला-घौडदौड पाहून अचंबित होणं साहजिक आहे. दत्ता आणि देवदत्ता. बाप तसा बेटा.

बहुरंगी-बहुढंगी दत्ता पाडेकरांच्या व्यापकतेचा आवाक्याचा कौतुकास्पद आदर करावासा वाटतो. त्यांना मिळणार्‍या आणि सत्तरी ओलांडून शंभरीकडे वाटचाल करणार्‍या बक्षिसांच्या मागावर, गेल्या दहा-बारा वर्षापूर्वी कित्येक दिवस मी मागावर होतो.

बॉम्बे आर्ट सोसायटीच्या शंभर वर्षांच्या इतिहासातील १८८७ पासून दिल्या गेलेल्या सुवर्ण-पदक विजेत्या चित्रांचा अंतर्भाव असलेल्या ग्रंथाच्या पाठीमागील पानावर त्रिंदादनी चितारलेले ‘हिंदू-गर्ल’ हे रमणीय व्यक्तीचित्र आहे. त्याचप्रमाणे, मोनाली मेहेर ह्या विशेषांकाच्या कोर्‍या ठेवले गेलेल्या मागील पानावर सामावल्या गेल्या असत्या तर व्यक्ती महात्म्यांत वा त्याच्या सादरीकरणात फारसा फरक पडू शकला नसता असे वाटते. घडीचं सव्यापसव्यही टळलं असतं. खडतर तपश्चर्येतून इहलोकातला मोक्ष, अंतिम ध्येय साध्य करणारा, अशक्य, अगम्य, अतर्कशा कोटीतला तिचा जीवनपट अमर झालाय ’चिन्ह’च्या साक्षीनं. अलौकिक धडाडी, ध्येयासक्ती, विजिगिषु वृत्ती इथे सोदाहरण ‘चिन्हांकित’ झाली आहे असंही म्हणता येईल. आणखी बरंचसं काही. आणि हे सारं शर्मिला फडके यांच्या लाघवी कथा-कथनातून. मराठी मायबोलीतून.

सारख्या (सम) जाडीच्या अक्षरांच्या (टाइप-सेटिंगच्या) निवडीसह, प्रत्येक पानावरील दोन कॉलम्समध्ये मजकूर काठोकाठ गच्च न भरता, प्रत्येक ओळीत, शब्द पूर्ण झाल्यावर उजवीकडे मोकळ्या सोडलेल्या जागेमुळे, कुणीतरी काहीतरी लिखाणात सांगत असल्याचा जिवंतपणा, वाचताना जाणवत राहतो, हे एक नकळत स्पर्शून जाणारं सत्य. दाद देण्यासारखं.

चित्रांच्या शेजारी वा शेजारच्या पानावर दिलेली माहिती व पृष्ठ क्रमांक, दुर्बिण न घेता, वयस्कर व्यक्तीला वाचता येण्याइतपत ठळक आणि ठसठशीत राखणं शक्य आहे का?

सुहास बहुळकर ही व्यक्ती आणि त्यांचे ‘न्यूडल्स’ दोन्ही एकदम भारदस्त. पाच-पन्नास अभ्यासू, हरहुन्नरी पानं. पन्नासएक वर्षापूर्वीच्या जेजेत मला नकळत घेऊन गेलेली. जुन्या झोपी गेलेल्या सुखद चित्तवृत्ती उल्हासित करणारी. रात-वैभवाच्या मंद-मधुर स्मृतींना जागवणारी उजाळा देणारी, अंती गंभीर विषयाचं तोल संभाळून विवेचन करणारी.

शोध नग्नतेचा, सु-दर्शन, ओलेती ते सरस्वती, असे शब्दप्रयोग आणि चित्रांभोवतीची प्रसिद्ध विद्वानांच्या मार्मिक बोधवाक्यांची पखरण, संपादकाच्या व्यापकतेचा आणि व्यासंगाचा दाखला देते.
‘ओलेती ते सरस्वती’, ‘त्यानं किंमत मोजावी’, ‘कलाकारानं विरोधाचं भानही ठेवायला हवं’, ‘समाजविरोधाची तयारी हवीच’, ‘त्यानं फुलझाड लावू नये’, ‘कलाकृती वैश्विक सौंदर्याच्या जवळ जाते’, ‘कलावंतानी जागरुक रहावं’, ‘त्याचे परिणाम कलावंतांना भोगावेच लागणार’ अशी परिसंवादातील शीर्षकंच बरंचसं काही सांगून जाताहेत.

गेली पंधरावीस वर्ष विविध माध्यमातून गर्जत राहणारं, एम. एफ. हुसेन हे काय गौडबंगाल आहे, ह्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर श्री. प्रभाकर कोलते यांनी सतरा-अठरा पानांत, नेमक्या आणि मोजक्या शब्दांत दिलं आहे. उलट-सुलट मतांचा-मतांतरांचा धांडोळा सहज सुलभरीत्या मांडला गेला आहे. हुसेन ह्या व्यक्तीमत्वाविषयीच्या इतर प्रशस्त आणि प्रचंड लिखाणातून ह्या व्यतिरिक्त अधिक काही मिळू शकेलसं वाटत नाही, असं म्हणणं उचित ठरावं. अधिक सांगणे न लगे.

सर्वसाधारणपणे मुक्त पण मधुर, उजळ पण स्वत्व राखून मिसळलेल्या अशा आकर्षक रंगछटा हे चित्र वा चित्रकलेचं एक प्रमुख वैशिष्ट्य. आणि ते छपाईच्या माध्यमातून दाखवायचं कसब हा पण सदर अंकाच्या प्रस्तुतीचा ठेवा. अभिनंदन.

प्रत्येक पान आणि पानावरील प्रत्येक चित्र अशा रंगीन कौतुकाला पात्र आहे. कदाचित फक्त माझं चित्र सोडून. रंगाचा गुणधर्म माहिती नसलेल्या व्यक्तीनं रेखाटल्यासारखं. जरुरीपेक्षा अधिकच गडद. काळपटपणाकडे झुकणारं. त्या चित्रातील रंग-महर्षी बेन्द्रे आणि अमृता-शेर-गिलच्या सखीच्या साडीचा रंग, हा शुद्ध व्हर्मिलियन रेड राखला गेला असता तर एकूण रंगसंगतीला न्याय मिळाला असतासं वाटतं. (समाधानकारकरीत्या परिपूर्ण नसली तरी मूळ चित्रात्र्या जवळपास असणार्‍या प्रकाशचित्राची प्रत, पडताळणीदाखल सोबत जोडली आहे.)

त्यामुळं दिग्गज अशा चित्रकारांच्या चित्राचं विडंबन (वा विद्रुपीकरण) केल्याच्या आरोपाची भिती, हात दाखवून अवलक्षण करून घेतल्याचं उदाहरण, आणि अंकाच्या एकूण सुबकतेला गालबोट (वा तीट) , असा काहीसा प्रकार झालाय. असो. हेही एक औदासिन्याचं कारण असू शकेल, म्हणून कटू सत्यं नच ब्रूयात ह्या वचनाची आठवण असूनही सांगितलं इतकंच. राग मानू नये. तसं म्हटलं तर चित्रकला विश्वाच्या अशा बहारदार अंकातून छापिल-रंगीत स्वरुपांत अजरामर होणं, हीच खरी समाधानाची बाब.

अंकातील अशा पद्धतीच्या मांडणीची कल्पना असती तर आणखी एखादं, उभ्या घाटाचं चित्रं उजवीकडं सामावू शकलं असतं. सुधारणास वाव व मान्यता असल्यास, आणखी एका चित्राच्या फोटोची प्रत, सोबत जोडली आहे.
चित्राचा फोटो, त्याची सी. डी., फोटोग्राफर, कुरियरवाल्यांची टंगळ-मंगळ आणि नकारघंटा, पत्रव्यवहार गहाळ होणं, इत्यादीमुळं, ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नं’ अशी उक्ती मी श्री. प्रसाद चिटणीसजवळ व्यक्त केली होती. त्यामुळं शेवटच्या क्षणी स्वत:चा रंगीत फोटो पाठविण्याचं अवधानही राखता आलं नाही. ते आता पूर्ण करीत आहे, सोबत रंगीत छायाचित्र जोडून. असो. पण शेवटी गंगेत घोडं न्हालं खरं. तसं म्हटलं तर, काळ्या-पांढर्‍यातील दोघे-तिघे, सोबतीस आहेतच की. (सोबतच्या फोटोंच्या प्रती मोजक्याच असल्यानं, शक्य असल्यास परत मिळाव्यात अशी विनंती.)

जाहिरातीच्या अर्ध्या पानातील जागेच्या टंचाईला अनुलक्षून “किशोरावस्थेतील माध्यमिक शालेय रजांच्या काळांत वेदपठण, चित्रकला, राजकीय नेत्यांची तैलचित्रं, साइन-बोर्ड पेंटिंग इत्यादी छंद आणि व्यवसाय, तसंच हुतुतू आणि खो-खो ह्या खेळांत श्री. अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं, आठ-दहा वर्ष, मिरज-सांगली-सातारा-कराड-इचलकरंजी येथे भरलेल्या सामन्यातून कुशल खेळाडू वा सामनावीर म्हणून नैपुण्य पदकं’’ इत्यादींचा उल्लेख टाळला होता. पण १९५५ ते ६० दरम्यान जेजेमधील उल्लेखनीय अभ्यासक्रमांतर्गत, शिष्यवृत्त्या, पारितोषिके आणि आंतरमहाविद्यालयीन आणि वार्षिकोत्सवात मराठी नाटके, खेळ-क्रीडा स्पर्धेत नैपुण्यपदकं, तसेच बक्षिसपात्र चित्रांचा जेजे वार्षिक ‘रुप-भेद’ मासिकात व ‘धर्मयुग’ नियतकालिकात अंतर्भाव, इत्यादी सांगण्यासारखी माहिती दिली होती. तद्नंतरची दोन-एक वर्ष ‘म्युरल-पेंटर’च्या भूमिकेतील नोकरीचा काळ सोडून, १९६२ ते ९० अशा अठ्ठाविस वर्षांत, भारत सरकारच्या, नव्याने स्थापन होऊ घातलेल्या मरीन सर्व्हे विभागात, सर्वस्वी निराळ्या आणि अनभिज्ञ ड्रॉइंगच्या कार्यक्षेत्रांत हेड ड्राफ्टसमनच्या पदावरून इमानेइतबारे पण प्रशंसात्मक नोकरी केली. ह्या एकूण काळात “भाऊबंदकीत अनपेक्षितरीत्या राहत्या घराचा ताबा सोडावा लागणं, स्थलांतराची शिक्षा, लग्न व नव-परिणीत संसार-स्थापना, जोगेश्वरीतील गुफांच्या भोवतीच्या झोपडपट्टीतील चाळ ते बॅलार्ड-पियर येथील ऑफिस, हा रोजी उलट सुलट चार एक तासांचा प्रवास, आर्थिक चणचण, जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड प्रकल्पानिमित्त पाडू घातलेल्या चाळीतील चाळीस-पन्नास भाडेकरू रहिवासी शेजार्‍यांच्या वतीनं चार-पाच वर्ष कोर्ट-कचेर्‍या, हायड्रोसीलच्या शस्त्रक्रियेंतर्गत दिल्या गेलेल्या पेनिसिलीन इंजेक्शनच्या प्राणघाती री-अ‍ॅक्शनमधून वाचल्यानंतरही दोन अडीच वर्ष भोगाव्या लागलेल्या यातना, राजकीय आणीबाणी, पहिल्या-वहिल्या नवजात अपत्यासह तीन-चार जवळच्या नातलगांचा स्वर्गवास, अशा अंगभूत कलाकाराला दूर ठेवायला भाग पाडणार्‍या, हातात हात घालून आलेल्या सांसारिक आपत्ती आणि हालअपेष्टांच्या रडकथा सांगण्यासारख्या नसल्यानं त्या टाळल्या होत्या. विशेषत: जिद्द आणि तळमळ असेल तर अडीअडचणीतूनही आपलं इप्सित साध्य करता येणं शक्य असतं. हे सुचवण्याच्या उद्देशांत ‘अज्ञातवास’ अशा शब्दप्रयोगावर भागवलं होतं. पण टीचभर टाचणांत, अनाहुतपणं वा अनवधानानं नेमकं त्या मायनस-पाईंटवर बोट ठेवलं गेलंय. असो. झालं गेलं गंगेला मिळालं.

आता मात्र माझी म्हणून दाखवता येण्याजोगी शंभर सव्वाशे, लहानमोठ्या आकारातील आणि मूर्त-अमूर्त स्वरुपातल्या चित्रांची चळत, एकल प्रदर्शनाच्या तयारीत आहे. मदतगार अशा स्पॉन्सरशिपच्या टेकूची साथ मिळण्यावर अवलंबून आहे. गुणवत्तेखातर यश मिळण्याची खात्री आहे. नोव्हेंबर २००७ दरम्यान “चित्रं आणि चित्रकथन’’ ह्या नावाचा, माझ्या चित्रांचा, तेरा-चौदा पानी पुस्तकवजा कॅटलॉग मी आपणाकडे पाठवला होता, त्याचे स्मरण असेलच. (सीडीत असल्याने जरुर पडल्यास ई-मेल करेन.)

१९९१ मधील सरकारी सेवा निवृत्तीनंतरच्या गेल्या वीसएक वर्षात, चित्र-निर्मितीसह, बॉम्बे आर्ट सोसायटी ह्या संस्थेच्या विविध कार्यक्रमांतर्गत, वार्षिक प्रदर्शनं आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगीचे सूत्रसंचालन असे यशस्वी प्रयोग. ह्याच काळात स्वत:च्या शंभर सव्वाशे हस्तलिखित पुस्तकवजा कवितांचा संग्रह गठित. त्यातल्या काहींचं ४०/४५ मिनिटांचं स्वस्वरात ध्वनीमुद्रण, ’अक्षर-धन’च्या संमेलनातून काव्य गायन, पिताश्री गणेश रामचंद्र घाटे (प्रसिद्ध हस्तसामुद्रिक) आगळंवेगळं, बाळबोध पण अलौकिक व्यक्तीमत्व असलेल्या मातोश्रींचं “प्रसाद’’ नियतकालिकातून प्रसिद्ध झालेलं चरित्रलेखन, भावनोत्कट तालबद्ध मांडणीतून चितारलेलं योगीराज वडील बंधूंचं आणि बहिणीचं चरित्रलेखन, आणि ह्या सर्वांचं पुस्तकवजा संकलन आणि अलग अलग ध्वनीमुद्रण, घाटे घराण्याच्या मागील पंधराएक पिढ्यांचं (अडीच फूट लांबीचं) वंशावळ आराखडा संकलन व पन्नासएक पानी अभ्यासू कुल-वृत्तांत संकलन, असेही वेगवेगळे, कंबर कसून करावे लागणारे विविधांगी उद्योग समाविष्ट. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ ह्या उक्तीला काहीसा छेद देणारे. असो.

वय वर्ष ऐंशी पण डिप्रेशन-ऍसिडीटी अशा किरकोळ व्याधी सोडल्यास, शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आणि कार्यरत. घर ते कार्यशाळा असा रोजी २०/२५ किलोमीटरचा मोटार-सायकलवरून जॉय-रायडिंगचा सराव, रविवार धरून रोजी ४/५ तास रंगांत बुडून जाणारी अशी एकूण दिनचर्या.

मला वर्तमानपत्रातील चित्रकलासंदर्भाची कात्रणं जमवण्याचा नाद आहे. एम. एफ. हुसेन साहेबांविषयीची १५/१६ वर्षापासूनची ५०/६० कात्रणं जमली आहेत. त्यात सरस्वतीच्या ४/५ इंची रेखाचित्रांचा समावेश आहे. बॉम्बे टाइम्स (अनिल धारकर) ११.१०.१९९६, सण्डे-रिव्ह्यू (रणजित होसकोटे), २०.१०.१९९६; महाराष्ट्र टाइम्स (प्रकाश बुरटे), २७.१०.१९९६; आणि सरस्वती व दुर्गा-इंडिया-टुडे ३१.१०.१९९६ पण तुम्हाला ते मिळू शकलं नाही, हे एका अर्थी अंकाच्या दृष्टीनं बरंच झालं. जहांगीर आर्ट गॅलरीतील संजीव खांडेकर आणि बडोदा विद्यापीठातील चित्रकला विद्यार्थी ह्यांची उदाहरणं नजरेसमोर येतात. ‘शब्द’ २००७च्या दिवाळी अंकाकरता निवडलेले जोगेन्दांचे चित्र अंकाच्या दृष्टीने  मुखपृष्ठावर न छापण्याचा  संपादकांचा निर्णय हाही एक दाखला. (खरं तर, त्या चित्रातील नग्नतेपेक्षा विद्रुपशा चेहर्‍यावरील भेसूर भावच अधिक भयानक वा भितीदायक असल्यासारखे वाटतात, अशी मतं ऐकण्यात येतात. तसं म्हटलं तर, एक्झॉरशनिस्ट सारखे भयानक चित्रपट पाहताना झालेल्या अपघातांची तमा न बाळगता, अशा विषयानांही लोकप्रियता मिळते ही वस्तूस्थिती नजरेआड करता येत नाही. काणा-डोळा होऊ शकत नाही.) एके काळी झाकण्यासारखे असलेले वर्तुळाकार अवयव आता लो-वेस्ट तंग पँटस् व स्लीव्हलेस बनियनद्वारा दाखविण्याची प्रथा रुढ होत असली तरी, वा घटस्फोट, विवाहबाह्य संबंध, लिव्ह-इन-रिलेशनशिप, समलिंगी विवाह, बिकिनी पोषाख, इत्यादींचं वारं नुकतं वाहू लागलं असलं तरी, गणेशोत्सव, पंढरी वा शिर्डीच्या नियमित यात्रा, कुंभमेळे, यज्ञ-हवनं, सणवार, उपास-तापास, व्रतं-वैकल्यं असे धार्मिक उत्सव अद्यापही हिरिरीनं साजरे करणार्‍या समाजाच्या गळी पडण्यासाठी, विशेषत: देव-देवतांच्या ऐच्छीक सादरीकरणाचं स्वातंत्र्य देण्याकरता बहुजन समाजाच्या मनाची बैठक बदलण्यास, कित्येक दशकांचा अवधी जाऊ द्यावा लागणार आहे. किमान भविष्यांत तसे घडण्याची आशा बाळगण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणूनही-

म्हणूनही, सदर अंक कुणाच्या, कुणा-कुणाच्या हाती न पडण्याची दक्षता घेण्याच्या शेवटच्या पानावरील सूचनेचं, सूचनेतील दूरदर्शीपणाचं आणि सावधानतेच्या मांडणीचं कौतुक करावंसं वाटतं. किमान वयपरत्वे मिळालेल कौतुक वा उपदेश करण्याचा अधिकार गाजवण्याचा मोह अटळ असतो असं म्हणतात. आणि त्यात वावगंही काही नसावं. असो.

श्‍लील आणि अश्लिल इत्यादींच्या वादांत पडण्याची माझी कुवत नसली तरी काही मूलभूत, तात्विक, परिणामस्वरुप विचार मनात डोकावतात. तसं म्हटलं तर, व्यक्ती-स्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, मत-स्वातंत्र्य अशा शब्द प्रयोगातील स्वातंत्र्य हा शब्दच स्वतंत्र नसतो. तो जसा व्यक्ती, अभिव्यक्ती किंवा मत ह्या शब्दांशी जोडलेला असतो, तद्वत ’’मर्यादा’’ ह्या शब्दाशी पण आपसुकरित्या बांधलेला असतो. जणू जोडगोळी. व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून कुणीही, कुठेही, काहीही करायला मोकळा नसतो. कवींचे काव्यसंग्रह, लेखकांच्या कथा-कादंबर्‍या-नाट्यप्रयोग-चित्रकारांची चित्रनिर्मिती वा प्रदर्शनं ही फक्त स्वत:ची अभिव्यक्ती जोपासण्यापुरत्या नसून, समाजातील सर्वांनी त्याची अनुभूती घेण्याकरता, हे उघड आहे. म्हणून साहजिकच काही नैतिक-समाजशास्त्रीय मर्यादा अविभाज्य. समोर दुसरा असल्याशिवाय माझ्यातल्या मी-पणाला अर्थच उरत नाही, हे एक शाश्वत सत्य. लोकाभिमुखता, सौजन्य, संयम, सहिष्णुता, सामंजस्य, शालीनता, सु-संस्कृतता, शिष्टाचार, लोकादर वा लोकापवाद, असे मायबोलीतील शब्दप्रयोग केवळ भाषासौष्ठवापुरतेच मर्यादित असतात का?

तसंच तन आणि मन. जणू काही जुळी भावंडं. एकमेकास पूरक. एकमेकावर अवलंबून असणारी. शरिराचे विकार मनावर आणि मनातले विचार शरिरावर परिणाम करतात. त्यातून बरे-वाईट प्रसंग उद्भवतात. त्यामुळं काही प्रस्थापित नियमानुसार ह्या दोन्हीवर मर्यादा पडतात. शिवाय भौगोलिक वा नैसर्गिक वातावरणसुद्धा त्याचा एक भाग होऊ शकतो. शीत कटिबंधातील स्वातंत्र्य व त्याच्या मर्यादा ह्या उष्ण कटिबंधातल्या स्वातंत्र्यापेक्षा अधिक शिथिल असू शकतात. कारण वातावरणांचे शरीरावर व मनावर होणारे परिणाम व त्यातून निर्माण होणारे प्रसंग हे तुलनात्मकरीत्या भिन्न असतात. नियम आणि अपवाद हे सुद्धा सांगोपांग ह्या शब्दानं जोडले जातात. म्हणून तर, ’अंग आणि उपांग’ ह्या जुळ्यांच्या बेमालुम मिश्रणांचं वा परस्परावलंबित्वाचं अस्तित्व आबाधित मानावं लागेल, हे एक चिरंतन सत्य. असो.

किती लिहावं तितकं थोडंच. कुठं थांबावं हे ज्याला समजतं तो कलाकार यशस्वी असं म्हणतात. अतएव आवरतं घेतो. त्यामुळं अशीही एक यशाची संधी, समाधान मानून घेण्याकरता अनायासे जाता-जाता उपलब्ध झालेली. असो.

अधिक उण्याबद्दल क्षमस्व. आपल्या हातून उत्तरोत्तर असेच चमकदार साक्षात्कार घडोत, ही प्रार्थना.

कळावे, लो. अ. ही. विनंती. पोच मिळावी.

आपला कृपाभिलाषी
घन:श्याम घाटे


ता.क. माझे बंधू डॉ. शरद घाटे ह्यांनी लिहिलेली, “सुंदरा मनामध्ये भरली’’ हे लावणी वाड्मयातील शृंगांर व ’’शृंगार-रस-आनंद-यात्रा’’ हे संस्कृत वाङ्मयातील शृंगार, अशी सदर विशेषांकामधील लिखाणाशी काहीशी निगडित, बहुचर्चित दोन पुस्तकं आपल्या वाचनांत आली असतीलच.

Monday, November 7, 2011


त्याने फूलझाड लावू नये...
अर्थात आठवले, माड्गुळकर आणि संत तुकाराम...


 एकदा आर्टिस्ट सेंटरमध्ये चित्रकार रझा यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सर्व चित्रकार मंडळी रझांशी गप्पा मारत बसलो होतो. गप्पा मारता मारता अचानक काहीतरी विषय निघाला आणि चित्रकार रझा थेट गाऊ लागले. आऽऽधी बीज ऐकले... आणि मग तुकारामांविषयी बोलू लागले. तुकाराम म्हणजे संत तुकाराम. उपस्थित चित्रकार मंडळी हैराण. आणि तरुण चित्रकार मंडळी तर आवाक्. रझा आणि तुकारामावर बोलताहेत वगैरे वगैरे. मला मात्र राहवेना. मी मध्ये तोंड घातलंच आणि म्हणालो, ’माफ करा रझा साहेब, हा अभंग तुकारामांचा नाही’. हे ’संत तुकाराम’ या चित्रपटातलं शांताराम आठवले यांनी रचलेले गीत आहे. हा तुकारामांचा अभंग नव्हे. हे मी म्हटलं आणि तेथे सन्नाटाच पसरला. कारण कुणालाच काही ठाऊक नव्हतं. त्यानंतर ते सारं समजावून देणं, शांताराम आठवले म्हणजे कोण? कसा गैरसमज पसरला आणि कसा तो दूर झाला. हे सारं समजावून सांगणं अर्थातच मलाच करावं लागलं.

 तसंच काहीसं आताही घडलंय. तिथंही योगायोगानं पुन्हा तुकारामच आहेत. ’चिन्ह’चा ’नग्नता : चित्रातली आणि मनातली’ विशेषांक प्रसिद्ध झाला आणि एके दिवशी दुपारी कोल्हापूरहून राम देशपांडे यांचा फोन आला. ’अंक अप्रतिम आहे, सुंदर आहे पण अंकात एक मोठी चूक आहे.’ हे त्यांचं वाक्य ऐकलं आणि माझ्या छातीत धस्स झालं. आता काय पुढं ऐकावं लागणार याचा काही अंदाज येईना पण त्यांनी फारसं ताणून धरलं नाही आणि म्हणाले ’मेघना पेठेंचा लेख अप्रतिम आहे पण लेखात एक मोठी चूक झाली आहे, ती म्हणजे लेखाच्या शेवटी त्यांनी ’’अंगी नाही बळं, दारी नाही आड, त्याने फुलझाड लावू नये.’’ ही ओवी तुकारामांच्या नावे घातली आहे ती चूक आहे. ती ओवी तुकारामांची नव्हे. ती आपल्या गदिमांची करामत आहे. गदिमा म्हणजे (ग. दि. माडगूळकर). गदिमांच्या ’आकाशाची फळे’ या कादंबरीचा शेवट त्यांनी याच ओळींनी केला आहे. याच कादंबरीवरून पुढं ’प्रपंच’ हा बहुचर्चित चित्रपट तयार झाला’. देशपांडे बोलतंच होते. शेवटी मीच त्यांना थांबवलं म्हटले ’हे सारं लिहूनच पाठवा’. पुढल्या अंकात (म्हणजे पुढल्या वर्षी) छापूच पण त्याआधी ब्लॉगवर प्रसिद्धी देऊ म्हणजे त्यातून आणखीन गैरसमज उद्भवणार नाहीत. देशपांडेही कबूल झाले.

 त्यांनी लगेचच एक पत्र पाठवलं. ते पत्र मग मेघनाला मेल केलं. देशपांड्यांच्या पत्राआधी मेघनाशी विस्तृत बोलणं झालंच होतं. तीही अतिशय अस्वस्थ झाली होती. कधी नव्हे तो तिचा फोन ठेवल्यावर पुन्हा फोन आला होता वगैरे. ’माझा काही संत साहित्याचा अभ्यास नाही’. लहानपणापासून वडिलधार्‍यांकडून जे कानी पडत गेलं त्यामुळं कदाचित ती चूक माझ्याकडून झाली असावी वगैरे.

 राम देशपांड्यांचं ते पत्र मग मेघनाला पाठवलं. मेघनानंही खुलासा केला. ते दोन्हीही सोबत प्रसिद्ध करत आहोत. पण हे करताना दिवाळीच्या गडबडीमुळे म्हणा किंवा ‘नग्नता’ अंकाच्या विशेष आवृत्तीच्या तयारीत असल्यामुळे म्हणा हे सारं ब्लॉगवर टाकण्यास बराच उशीर झाला. आणि त्यामुळे होऊ नये ते घडलेच. ‘दै. लोकसत्ताच्या दि. २ नोव्हेंबरच्या अंकातील चंद्रशेखर ठाकूर यांच्या लेखाचं शीर्षक हेच आहे.... त्याने फुलझाड लावू नये. लेखाच्या शेवटी ती ओवीही दिली आहे, मात्र तिचा तेथे ‘अभंग’ झाला आहे. हे वाचलं मात्र आणि वरिल खुलासा आम्ही लगेच छापण्याचा निर्णय घेतला. तोच हा ब्लॉग.



प्रिय सतीश,

राम देशपांड्यांचं यांच पत्र वाचलं.

‘चिन्ह’मधल्या लेखात मी शेवटी वापरलेली ओवी तुकारामाची आहे किंवा काय याबद्दल मी कुठलीही शहानिशा केलेली नव्हती. तशी ती न करता त्या ओवीला अनवधानानं तुकारामाची म्हणून वापरणं धांदात चूक आहे. त्याबद्दलची सर्व जबाबदारी घेऊन मी बिनशर्त माफी मागते.

‘आकाशाची फळं’ ही गदिमांची कादंबरी मी वाचलेली नाही. तरीही राम देशपांड्यांनी पत्र लिहून ही ओवी त्यातली (आणि म्हणून गदिमांची) आहे आणि तुकारामाची नाही हे कळवलं आहे, तर त्यांनी अर्थातंच ती शहानिशा केलेली असणार असंही मी मानते.

माझी चूक दुहेरी आहे. ती ओवी तुकारामाची नसताना तुकारामाच्या नावाचा वापर होण्याची चूक आणि ज्या कवीची ती ओवी आहे त्या गदिमांच्या नावाचा उल्लेख न झाल्यामुळे त्यांचं श्रेय त्यांना न मिळण्याबद्दल झालेली चूक. या दोन्हींबद्दल मी दिलगीर आहे. अनवधान आणि आळस या दोन गोष्टींमुळे माझ्याकडून झालेल्या या मूर्ख चुकीचं कुठल्याही तर्‍हेने समर्थन होऊ शकत नाही आणि ते करावं असं मला वाटलेलंही नाही. मात्र कवी बदलला म्हणून त्या ओवीचा जो अर्थ मला अभिप्रेत होता तो बदललेला नाही हे ही मी स्पष्ट करते आहे.

ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल श्री. राम देशपांडे यांची मी ‌‌‌‌ॠणी आहे. त्यांना माझे धन्यवाद कळवावेस.
या अंकाची पुढील आवृत्ती जेव्हा/जर काढशील, तर त्यात या चुकीची दुरूस्ती अपेक्षित आहे.
सर्व शुभेच्छा.

- मेघना


ता. क. या निमित्तानं आणखीन ज्या दोन चुका आम्ही केल्या आहेत त्यांचीही कबूली देऊन टाकतो.
 १. चित्रकार गोगॅ हा सोळाव्या शतकातला नव्हे, एकोणीसाव्या.
 २. मोनालिसा ही व्हिन्सीची. मायकेल ऍन्जेलोची नव्हे.
 या दोन्ही चुका अक्षम्य आहेत त्यामुळे माफी वगैरे मागण्याच्या भानगडीत आम्ही पडत नाहीयोत.

सतीश नाईक

Thursday, November 3, 2011


ज्ञानेश्वर आणि रामदास


  नामवंत मराठी लेखक आणि कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्यावरचा एक सुरेख लेख ‘दीपावली’च्या यंदाच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. तो लिहिलाय नाडकर्णींचे मित्र आणि नामवंत प्रकाशक रामदास भटकळ यांनी. ज्ञानेश्वर नाडकर्णी हे एक अस्सल कॅरेक्टर होतं, त्यामुळे त्यांच्या गंमती-जमती लेखात उतरल्या नसत्या तर ते नवल ठरलं असतं. वानगीदाखल एकच उदाहरण देतो. रामदास भटकळ लिहितात-
‘‘लैलानं गोड मात्र घरून पाठवलं होतं. जेवणानंतर डबा उघडला. प्रकृतीच्या कारणांसाठी ज्ञानेश्वरवर गोडाची बंदी होती. शालिनीचं लक्ष आहे पाहून त्याला मोह आवरावा लागला. जेवणानंतर ती सर्व जायला निघाली तेव्हा ज्ञानेश्वर अमूल्य - शालिनीला म्हणाला, ‘तुम्ही पुढे व्हा, मी कामाचं काही बोलतो आणि एका मिनिटात येतो’. त्यांची पाठ वळते न वळते तो ज्ञानेश्वर म्हणाला, ’अरे काम कसलं, तो डबा उघड’. मला खात्री आहे की आमच्या ऑफिसच्या पायर्‍या उतरेपर्यंत त्यानं हा आपला पराक्रम शालिनीला सांगितला असणार.”
नाडकर्णींचे असले अक्षरश: शेकडो किस्से ठाऊक असल्यानं, त्यातले काही तर माझ्यासमोर प्रत्यक्ष घडले असले तरी हा किस्सा वाचल्यावरही मी मनमुराद हसलो...
खरं तर ’चिन्ह’च्या यंदाच्या अंकात नाडकर्णींवर मीच लिहायचं ठरवलं होतं. तसं प्लॅनिंगही झालं होतं. मी लिखाणाला सुरुवातही केली होती. किंबहुना नाडकर्णी हयात असतानाच तीनचार वर्षापूर्वी त्या लेखाचा पूर्वार्ध वगैरे मी लिहून ठेवला होता. पण तेव्हा तो लेख प्रसिद्ध करायचं धाडस काही माझ्याच्यानं झालं नाही हे नक्की. नाडकर्णीही सांगायचे ’मी मेल्यावर जे काही लिहायचं असेल ते लिहा’. पण यंदा ’नग्नता’ या विषयाचा पसारा एवढा वाढत गेला की नाडकर्णींवरचा लेख प्लॅनिंगमध्ये असतानाच गळून पडला. तर अन्य तीन-चार प्रदीर्घ लेख तयार झाल्यावरही बाजूला ठेवून द्यावे लागले. त्यामुळे ’चिन्ह’च्या येत्या १४व्या अंकात तो प्रसिद्ध होईल हे निश्चित. आणि नाडकर्णींच्याच स्टाईलने सांगायचं तर, ’’आणि तो लेख विलक्षण गाजेल हेही निश्चित समजा.’’
वैषम्य याचं वाटलं की ज्यांनी ज्यांनी नाडकर्णींकडून आपापल्या अंकासाठी कारणपरत्वे वरचेवर हक्कानं लिहून घेतलं, ते सारेच्या सारे नाडकर्णींना कसे विसरले? अपवाद हा दीपावलीतला लेख, म्हणूनच आवर्जून तो वाचायला हवा. आम्ही आर्टिस्ट्स मंडळी तर त्यांना त्यांनी चित्रकलेवरचं लेखन करायचं सोडलं तेव्हाच त्यांना विसरलो होतो, पण मराठीतल्या अन्य लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचकांचं काय? हा एवढा एक लेखच? असो. जन पळभर म्हणती हायहाय... हेच खरं.

नाडकर्णी ’समोवार’ मधल्या सॅन्डवीचचा मोठा घास घेऊन, ’नाईक, तुम्हाला सांगतो माझं स्थान नरकातच आहे. मी मेल्यावर नरकातच जाणार आहे असं म्हणायचे. त्यावर मी विचारे, का का असं का म्हणता? तर ते म्हणायचे, ’अहो या सार्‍या भिक्कारxx आर्टिस्ट्स लोकांकडून मी पैसे घेऊन लिहिलंय. त्यामुळे माझं स्थान अन्य कुठे नाही नरकातच आहे’. असं म्हणून कॉफीचा एक मोठा घोट घेऊन ते एकेका आर्टिस्ट्सचा एकेक धमाल किस्सा, साभिनय करून दाखवत.
या विषयी मी आता इथं अधिक लिहिणार नाही. त्यांच्यावरच्या लेखात हे सारं मी लिहिणारंच आहे. पण पुढील मजकूर मात्र लिहायचा मोह मला आता आवरत नाहीये. ’याच आर्टिस्ट्स लोकांनी आणि त्यांनी वेळोवेळी दिलेल्या पैशांनी नाडकर्णींचा घात केला. आर्टिस्ट्सकडून पैसे घेण्याची आर्टिस्ट्स लोकांनी आणि स्वत: नाडकर्णी यांनीच पुरेशी बोंबाबोंब केल्यावर एका बड्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारा त्यांचा कॉलम अचानक बंद झाला. नाडकर्णींना त्याचा खूप मोठा धक्का बसला. त्यांचं सारं आर्थिक गणितच विस्कटलं. पण गंमत म्हणजे पुढे ज्यांनी नाडकर्णींना काढण्याचा निर्णय घेतला ते सारेच पत्रकार, संपादक, लेखक, समीक्षक इतकंच काय तर ते वृत्तपत्रसुद्धा पैसे घेऊन प्रदर्शनाच्या आमंत्रण पत्रिकेवर किंवा कॅटलॉगसाठी लिहू लागले. इतकंच नाही तर पैसे घेऊन बातम्यासुद्धा छापू लागलं. नाडकर्णी मात्र त्या काळात उगाचच बदनाम झाले. कॉलम जाण्याच्या त्या धक्क्यानं नाडकर्णी तेव्हा कोलमडले होते. ते आता चांगलंच आठवतंय.

ते गेले त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी न रहावून मी जहांगीर आर्ट गॅलरीत गेलो. ‘समोवार’मधल्या ज्या ठिकाणी ते आणि मी रोज सकाळी तासन् तास बसून गप्पा मारत असू त्याच जागेवर बसलो दोन चहा मागवले. एक माझ्यासाठी आणि एक नाडकर्णींसाठी. त्या दिवशी मात्र माझं बिल मलाच द्यावं लागलं. अनेकांकडून चहा, कॉफी, पार्ट्या उकळणार्‍या नाडकर्णींनी ‘समोवार’मधल्या आमच्या बैठकांचं बिल मात्र मला कधीच भरू दिलं नव्हतं.
  हे असं आणखीन मला खूप खूप काही लिहायचंय. पाहूया!

सतीश नाईक



ता. क.- आत्तासुद्धा नाडकर्णी वरून म्हणजे नरकातल्या एखाद्या कॉफीहाऊसमध्ये बसून सकाळचा इडली-वडा ढोसून कॉफी घेऊन हे सारं पहात असतील तर म्हणत असणार. ’रामदासनं हे आधी का नाही लिहिलं?’ 


 अर्कचित्रः वसंत सरवटे यांच्या सौजन्याने

Wednesday, October 26, 2011


दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा


'चिन्ह'च्या 'नग्नता : चित्रातली आणि मनातली' अंकाची तिसरी आवृत्ती ऐन दिवाळीत प्रसिद्ध झाली आहे. हे सारं चित्रकार, कलारसिक, आणि वाचकांच्या सहकार्यामुळे शक्य झालं. या सर्वांचे 'चिन्ह'कडून  मनापासून आभार आणि दिवाळी तसेच नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.



सतीश नाईक
संपादक 'चिन्ह'





Monday, October 24, 2011


‘महाराष्ट्र टाइम्स’नं  रविवार दि.२३ ऑक्टोबर २०११ च्या ‘संवाद पुरवणीत’ ‘नग्नता:चित्रातली आणि मनातली’ अंकावर खास लेख प्रसिद्ध केला आहे. एखाद्या वार्षिक अंकावर अशा स्वरूपाचा विस्तृत अभिप्राय देण्याची ही पहिलीच खेप असावी. हा अभिप्राय जरूर वाचा.

Thursday, October 13, 2011

‘दै. महानगर’मध्ये ९ ऑक्टोबर २०११ रोजी ‘नग्नता:चित्रातली आणि मनातली’ अंकावर संजीवनी खेर यांनी एक छान अभिप्राय लिहिला आहे...तो जरुर वाचा...!!

Sunday, October 2, 2011



हा अभिप्राय वाचण्यासाठी या लोकसत्ताच्या लिंक वर क्लिक करा...http://epaper.loksatta.com/13292/indian-express/02-10-2011#p=page:n=32:z=3


‘चिन्ह’च्या ’नग्नता : चित्रातली आणि मनातली’ विशेषांकासाठी कृपया ९००४० ३४९०३ या मोबाईल नंबर्सवर '1 m copy'  एवढाच मेसेज स्वत:च्या नाव-पत्त्यासह आणि (असल्यास इमेल आयडीसह) पाठवा. अंक आठवड्याभरात घरपोच होईल. 
सवलत देणगीमूल्य रु.५६० फक्त. (कुरियरखर्चासह).
अंकाच्या अधिक माहितीसाठी www.chinha.in वर प्रोमो पहा.




Saturday, October 1, 2011

Tuesday, September 27, 2011

Monday, September 26, 2011

Monday, September 12, 2011


डॉक्टर रवि बापट लिहितात.
विख्यात डॉक्टर रवि बापट यांनी ‘चिन्ह’चा अंक पोहोचताच ‘चिन्ह’च्या संपादकांना पाठवलेले पत्र.
प्रिय सतीश ,

तू प्रेमानं पाठवलेला चिन्ह चा "नग्नता" अंक मी अथपासून इतिपर्यंत एका दमात वाचून काढला. मी तर झपाटून गेलो. विशेषतः मोनाली मेहेर वरचा लेख आणि सुहास बहुळकरांचा प्रदीर्घ अभ्यासपूर्ण आणि व्यक्तिरेखांच्या आधारे लिहिलेला लेख भावला [excellent academic article]. माझ्या दोन विद्यार्थ्यांची (प्रकाश कोठारी आणि आनंद नाडकर्णी) मतं पण वाचली. तू म्हणालास डॉक्टर तुम्ही कांही तरी लिहून पाठवा. मनात या विषयासंबंधी गेले पन्नास वर्ष द्वंद्व चाललं होतं.

डॉक्टर दाम्पत्याच्या पोटी मी जन्म घेतला व या गोष्टींवर मोकळी चर्चा लहानपणा पासून ऐकत आलो. समाजाची या विषयाकडे बघायची दृष्टी रुढी आणि परंपरांमुळे कशी कोती होत गेली आहे हे मनावर बिंबवलं गेलं. वैद्यकीय महाविद्यालयात मी प्रवेश घेतला व तिथे सुद्धा हा विषय मोकळेपणाने बोलायची सोय नव्हती. नग्नता हा विषय मनावर झालेल्या संस्कारांमुळे गूढ असल्यासारखा हळू आवाजात बोलायचा असतो असंच आढळलं. मानवाच्या गुह्य भागांबद्दल निदान वैद्यकीय विद्यार्थ्यांनी स्पष्ट व उघड मतं मांडायला हवीत. पण नग्नता हा विषयच वर्ज्य मग त्यावर कसं बोलणार !! शरीर रचनाशास्त्रात शिकणं वेगळं पण व्यवहारात ते बोलणं बरोबर नाहीं अशी समजूत व भूमिका. लैंगिक शिक्षण अजूनही वादाचा विषय आहे.

मला आठवतं, ज्या वेळी प्रकाश कोठारींनी sexology ह्या विषयात मी तज्ञ होणार असं जाहीर केलं त्यावेळी (१९७० चा काळ) तो माझ्याकडे आला. मी त्याला म्हणालो बाबा तू जगाच्या खूप पुढं आहेस जरूर जा अमेरिकेला आणि करून ये Johnson n Masters चा कोर्स. बाकी मुलं त्याला वेड्यात काढत होती. त्यानं परवा Erotica म्हणून छान पुस्तक प्रकाशित केले तेंव्हा त्याला मी Robert Frost च्या कवितेतलं एक कडवं पाठवलं. ते तुलाही लागू पडतं तू पण वेगळी वाट घेतलीस. ते कडवं खालील प्रमाणे.

I Shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence :
Two roads diverged in a wood ,and i ,
I took the one less traveled by ,
And that has made all the difference .          
                                           Robert Frost

या विषयासंबंधी सर्व जण थोडीशी diplomatic भूमिका घेतात हेच दिसून येतं. हा खासगीत बोलण्याचा विषय आहे व जाहीरपणे बोललं तर आपल्या [म्हणजे पूर्वजांच्या ] संस्कृतीमधे बसत नाहीं म्हणून आपण हे मान्य केलं पाहिजे. खरं तर हे दांभिकपणाचं लक्षण आहे. ह्या गोष्टी एकांतात आणि अंधारातच बोलायच्या करायच्या असतात पण उघडपणे बोललं तर ते शिष्टाचार संमत नाहीं हेच सत्य आहे. व्यासपीठावरून बोलणं तर अब्रह्मण्यम !! आनंद नाडकर्णी लैंगिक शिक्षणाचे अभ्यासवर्ग महापालिकेच्या व इतर विद्यालयातल्या विद्यार्थिनीकरिता घेत असे त्याला मी उपस्थित राहिलो होतो. तिथं त्या धीटपणे प्रश्न विचारत असत. हा प्रश्न समाजाच्या वैचारिक प्रगल्भतेचा आहे. आपल्या देशात पूर्वी अधिक वैचारिक मुक्तता होती असं आढळून येतं. आता तर संस्कृतीच्या नावावर हा राजकीय प्रश्न होतो. असो आणखी काय लिहू. पुढच्या अंकाच्या वेळेस माझी काही मदत झाली तर मला आनंद होईल. भेटायची इच्छा आहे .

शुभाशीर्वाद,
रवि बापट

‘चिन्ह’च्या ’नग्नता : चित्रातली आणि मनातली’ विशेषांकासाठी कृपया ९००४० ३४९०३ या मोबाईल नंबर्सवर '1 m copy'  एवढाच मेसेज स्वत:च्या नाव-पत्त्यासह आणि (असल्यास इमेल आयडीसह) पाठवा. अंक आठवड्याभरात घरपोच होईल. 
सवलत देणगीमूल्य रु.५६० फक्त. (कुरियरखर्चासह).
अंकाच्या अधिक माहितीसाठी www.chinha.in वर प्रोमो पहा.

Monday, August 29, 2011


 कोण ही ‘मधुरा’?

‘मधुरा पेंडसे’ नावाच्या एका चित्रकर्त्रीनं ‘चिन्ह टीम’ला एक मेल पाठवला. दुर्दैवानं संपूर्ण ‘चिन्ह टीम’ तेव्हा अंकाच्या धबडग्यात अडकली होती. मग तिनं आणखी एक मेल पाठवला.
त्या निमित्तानं......

‘मधुरा पेंडसे’ नावाच्या चित्रकर्त्रीचा एक मेल ‘चिन्ह’ला जेव्हा आला तेव्हाच हे नाव प्रथम ठाऊक झालं. त्यामुळे तिच्याशी बोलण्याचा किंवा तिला पाहिलं असण्याचा प्रश्नच येत नाही. १० जुलै रोजी तिनं पहिला मेल ‘चिन्ह’ला पाठवला. वाचून पहायलाही वेळ नव्हता कारण ‘चिन्ह’च्या ‘नग्नता’ अंकाचं काम त्यावेळी अगदी ऐन भरात आलं होतं. त्यावेळी अक्षरश: १८-१८ तास काम चालू असायचं. त्यात तिचा मेलही भला थोरला, त्यामुळे त्याकडं खरं सांगायचं तर दुर्लक्षच झालं. पण जाता जाता त्या पत्रातला आशय मात्र लक्षात राहून गेला होता. तिला पडलेले प्रश्न, ते मांडण्याची तिची पद्धत, काहीशी तिरकस शैली- हे आपसूक सारंच लक्षात राहिलं, पण मनात असूनही तिच्या मेलला उत्तर देता आलं नाही. २१ जुलै रोजी ‘चिन्ह’चा अंक प्रसिद्ध झाला. वाटलं होतं आता तरी तिच्या आणि मेलबॉक्समधल्या अनेक उत्तरं न दिलेल्या मेल्सना उत्तरं देता येतील. पण अंक प्रसिद्ध झाला अन् कुरियरच्या त्या भयंकर अनुभवातून जावं लागलं. अद्यापही त्यातून आम्ही स्वत:ला सावरू शकलेलो नाहीय. नक्की किती नुकसान झालं आहे याचाही अंदाज आम्ही अद्याप बांधू शकलेलो नाही. पण ते असो. हे सारं लिहायचं कारण असं की अंक प्रसिद्ध होताच १०-१२ दिवसात मधुराचा आणखी एक मेल आला. त्या मेल मध्ये तिनं ‘चिन्ह’चा ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ विशेषांक ज्या कोरोगेटेड बॉक्समध्ये टाकून आम्ही वितरीत केला होता त्या बॉक्सच्या आतल्या भागात तिनं स्वत:चं चित्र, सेल्फ पोर्ट्रेट रेखाटलं होतं. ते सेल्फ पोर्ट्रेट विलक्षण सुरेख होतं. आता उत्सुकता चाळवली गेली. फेसबुकवर शोध घेतला तेव्हा ‘मधुरा पेंडसे’ अचानक सापडलीच. पण तिच्या प्रोफाईलमधली माहिती अपुरीच होती. त्यावरून ती कोण? काय करते? ती कुठली? कुठे शिकते? का शिक्षण पूर्ण झालंय याचा काहीच उलगडा झाला नाही. पण तिचं थोडसं काम आणि तिचे काही फोटोग्राफ्स मात्र पहायला मिळाले. त्या कामांमध्येही सेल्फ पोर्ट्रेट्स जरा अधिक पहायला मिळाली. त्यावरून असं लक्षात आलं की ती स्वत:ला अधिक प्रभावीपणे रेखाटण्याचा, रंगवण्याचा प्रयत्न ती करू पहातेय. अंकाच्या कोरोगेटेड बॉक्सच्या आतल्या भागात तिनं जे ‘सेल्फ’ रेखाटलंय त्यावरून हे अधिक लक्षात येतं. आणि तिला पडलेल्या प्रश्नाचं गांभिर्यही अधिक अधोरेखित होतं म्हणून तिनं पाठवलेला पहिला मेल आणि ‘सेल्फ पोर्ट्रेट’चा दुसरा मेल दोन्ही या मजकूरासोबत देत आहोत. यावर अर्थातच चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. ज्यांना ब्लॉगवर टाईप करणं कठीण वाटतं त्यांनी मेल पाठवायला हरकत नाही. किंवा चक्क लिहून स्कॅन करून पाठवलं तरी चालेल. आम्ही ते ब्लॉगवर टाकू. ‘मधुरा पेंडसे’ हे आजच्या तरुणाईचं प्रतिक आहे. म्हणून तिला पडलेले प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. इतकंच नाही तर ज्या पद्धतीनं तिनं ते मांडले आहेत तेही महत्त्वाचंच आहे. ‘चिन्ह’ला तरी यापेक्षा दुसरं काय अधिक हवंय!


Dear chinha team,
MF Hussein or not nudity is a big hush hush!
And I am glad you guys talked about it. I wish you all the best!!
long back a friend sent me a forward on m f husseins painting which was total bakwas ! I am sure you have received one of those..and as I see much more !
So I sent her this mail as reply... I was angry and disappointed at her for supporting such activity being an artist. I thought I shall share it with you guys.
Dear friend,
I was thinking of making a painting
made a few study drawings
but now no use. Must hide them all or just burn them!
In retrospection
the mail sent by you does have a justification
Now we know that our sentiments are offended by the artist.
now it occurs to me- I must be careful
I must have “The list”
The list of subjects, thoughts, beliefs, visions, ideas,
which will not offence hindus or muslims or any such religion
I also must know the list - which will please everybody’s hearts and souls
I surely need the courage to protect my self respect and clearly don’t want to be a coward hindu
Tell me what issues, subjects to paint about
tell me what will shock people and what will not.
Tell me if I draw a dancer will it hurt the one who is crippled
tell me how to reach every observers mind and make sure he/she is not hurt or offended
I shall certainly keep my beliefs aside for the very observer
I should certainly know each ones beliefs (people who may or may not see my works because one can never tell how and when I may or may not hurt somebody’s emotion)
I know you guys have achieved a greater understanding of art or at least its boundaries
The very important aspect of an art piece “the limitations”
forgive my innocence I was merely a fool to believe it had nun.
So I am no more feeling shy to ask your sincere help and all the others who have read and forwarded the mail is to please lets just not forward mails lets also find a solution on this very serious matter.
Please help
I don’t have a clue is to on what subject to make a painting
I will immediately forward the answers to my entire fellow artists so they understand the fundamentals of arts and abide by the rules and boundaries by the answers provided by you and friends who have given me a chance to this awakening
Help me with “The list” please
Madhura Pendse (10th July)


Dear Chinha team,
I received the magazine 2 days back
Congratulations and all the very best!
I feel inspired! This is how I used your packaging! 
Madhura Pendse (15th 
Aug
)




ताजा कलम - चित्र काढायला ‘चिन्ह’चे कोरोगेटेड बॉक्स आवडले असतील तर ते तिला आणखी उपलब्ध करून द्यायची ‘चिन्ह’ची तयारी आहे. अट छोटीशी एकच. तिनं तिला हवी तीच चित्र त्यावर काढावीत. कसे?

‘चिन्ह’च्या ’नग्नता : चित्रातली आणि मनातली’ विशेषांकासाठी कृपया ९००४० ३४९०३ या मोबाईल नंबर्सवर '1 m copy'  एवढाच मेसेज स्वत:क्ष्या नाव-पत्त्यासह आणि (असल्यास इमेल आयडीसह) पाठवा. अंक आठवड्याभरात घरपोच होईल. 
सवलत देणगीमूल्य रु.५६० फक्त. (कुरियरखर्चासह).
अंकाच्या अधिक माहितीसाठी www.chinha.in वर प्रोमो पहा.

Tuesday, August 23, 2011

या अंकानं मनातलं नागडेपण दूर केलं...


‘जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट’चे माजी अधिष्ठता मंगेश गो. राजाध्यक्ष’ यांना ’चिन्ह’चा अंक पोहोचताच अक्षरश: आठवड्याभरात अंकाविषयीचा आपला अभिप्राय लिहूनच पाठवला. तोच येथे देत आहोत.
 ’चिन्ह’ ब्लॉगच्या वाचकांना जर अंकाविषयी आपलाही अभिप्राय लिहून पाठवावा असं वाटत असेल तर त्यांनी तो जरुर पाठवा. कुठलीही काटछाट न करता आम्ही तो येथे प्रकाशित करू. 
: संपादक ’चिन्ह’ ब्लॉग




मंगेश गो. राजाध्यक्ष
कुरियरवाल्यानं दरवाजाची बेल वाजवली. अन हातात जाडजूड पार्सल दिलं. आणि मी ओळखलं, ज्याची आतुरतेनं प्रतीक्षा करत होतो, तो ‘चिन्ह’चा ‘नग्नताःचित्रातली आणि मनातली’ हा अंक आला. आणि मी पार्सल उघडून चाळायला सुरूवात केली. आणि मन समाधानानं भारलं गेलं, कारण अंकाची सुरेख अशी संकल्प रचना. सतीश नाईक स्वतःच चित्रकार असल्यानं प्रत्येक गोष्ट सुंदर अन शिस्तबद्ध व्हावी या गोष्टींकडे त्यांचं विशेष लक्ष असतं, त्यामुळे हाही अंक त्याला अपवाद असणार नाही हे जाणून होतो. पण अंक पाहिल्यावर तो अपेक्षेपलिकडे सुंदर झाल्याचं जाणवलं. याबद्दल सतीश नाईकांचं प्रथम अभिनंदन!

हा अंक व विषय सतीश नाईकांनी जेव्हां जाहीर केला, तेव्हा काही धर्ममुखंडांचं ‘अब्रम्हण्यंम’ सुरू झालं. वृत्तपत्रातून बातम्या येऊ लागल्या. नाईकांना धमक्यांचे, शिव्यांचे फोन व पत्रं (पोस्टकार्ड) यायला सुरूवात झाली. ती पत्रं त्यांनी ‘चिन्ह’च्या ब्लॉगवर टाकली. कोणत्याही सुसंस्कृत माणसानं वापरले नसतील असे भयानक शब्द या हिंदू संस्कृती रक्षकांनी वापरले होते. बाकी या लोकांना नग्नता, नागवेपण याचं सोयरसुतक नव्हतं. पण या अंकातला एक लेख चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांच्यावर होता व आधीच हुसेन हे हिंदू देवदेवतांची नग्न चित्रं रेखाटून वादाच्या भोवर्‍यात अडकले होते आणि लोकांचा रोष ओढवून घेवून ते भारतातून परागंदा झाले होते. आणि या अंकामध्ये याच हुसेन यांचं उदात्तीकरण त्यांच्या नग्न चित्रांसहीत करणार असल्याची भावना विरोधकांची होती. हा अंक प्रसिद्ध व्हायला देणार नाही, हा जणू चंगच त्यांनी बांधला होता. अन मनांत जरा चर्र झालं. वाटलं कसं काय एकाकी लढत देणार सतीश या सर्वांना! याला कारणही तसंच होतं. अवधूत गुप्तेचा ‘झेंडा’ न फडकण्याच्या मार्गावर होता. शेवटी त्यानी आवश्यक ते बदल करून आपला ‘झेंडा’ फडकवला. महेश मांजरेकरांच्या ‘शिक्षणाच्या आयचा घो’ या त्यांच्या नावाला मराठा महासंघानं आक्षेप घेतला पण मांजरेकर ठाम राहिले. वेळ आली तर महाराष्ट्र सोडूनही जाईन ही घोषणाही त्यांनी केली. पण शेवटी विरोधकांना चित्रपट आधी दाखवून चित्रपटाच्या आरंभी टायटल टाकून त्यांनी आपला मार्ग मोकळा केला. आता प्रकाश झा हे देखील आपल्या ‘आरक्षण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी या प्रकारच्या दिव्यातून जात आहेत. या अशा घटना घडलेल्या असताना सतीश नाईक या झुंडशाहीला कसं काय तोंड देणार हा विचार क्षणभरच माझ्या मनात आला. पण दुसर्‍याच क्षणी मला आठवलं ते सतीश नाईक ज्यांना मी कित्येक वर्षांच्या सहवासानं आरपार ओळखतो, असे कैक प्रसंग त्यांनी एकट्यानं निभावले होते. आणि या वेळीही तसंच घडलं. एक नितांत सुंदर अशी कलाकृती त्यांनी ‘चिन्ह’च्या रूपानं सादर केली. आणि लोकांच्या मनातील नागडेपण दूर केलं.
न्यूड ड्रॉइंग्ज अथवा पेंटिंग्ज हा चित्रकाराच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. शरीर सौष्ठव रचना हा मूलभूत पाया मानला जावा. मग तो चित्रकार असो वा शिल्पकार. आणि या नग्नतेमध्ये चित्रकार पहातो ते केवळ निखळ सौंदर्य, मनाला निर्भेळ आनंद देणारे. यामुळेच मायकेल अँजेलोचा डेव्हीड पहाताना आपण त्यात केवळ सौंदर्यच पहातो. हीच गोष्ट जाणवते ती पॅरिसचा जगप्रसिद्ध ’कॅबरे’ पाहताना. स्टेजवर आलेल्या तरुणी नृत्य करत असतानाच आपले वरचे वस्त्र काढून टाकून स्वत:चे स्तन उघडे करतात. नृत्य चालूच असतं. पण त्यात कामुकता नसते. असते ते केवळ अवखळ, निष्पाप सौंदर्य. जणू काही गोड बाहुल्याच अनावृत्त होवून नाचताहेत. व या सौंदर्याचा आस्वाद सर्व स्त्री-पुरूष घेत असतात. आता ज्या लोकांनी हा कॅबरे पाहिलेला नसतो, ते केवळ ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून या नृत्यप्रकाराला नाकं मुरडतात. आणि नेमकं हेच ‘चिन्ह’च्या या खास अंकानं दाखवून दिलं आहे.

अंकातील सर्वच लेख वाचनीय अन बोधप्रद आहेत. विशेषत: चित्रकारांबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून या विषयावरची त्यांची मतं घेवून संपादकांनी कल्पकता दाखवून दिली आहे, याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच! अर्थात या अंकातील चित्रकार हुसेन यांच्या ‘उदात्तीकरणा’चं (?) निमित्त करून जो गदारोळ माजवला होता त्यांची तोंडं अचानक बंद झाली.

हुसेन  यांचं रंगचित्र Self Portrait With Horse
मलाही हुसेनवरील कोलतेंचा लेख आधी वाचायचा होता. अत्यंत परखडपणे कोलतेंनी नीरक्षीर न्यायानं हुसेन यांच्या चित्रांचा तसेच व्यक्ति विशेषाचा वेध घेतला आहेच. शिवाय जे आपल्याला पटणारं नाही, त्याला विरोध करणं हा कोलत्यांचा स्थायिभाव आहे. मग तेथे आप-परभाव नसतो. मात्र त्यांनी हुसेन यांच्या दुबईतील मुलाखतीत हुसेन-माधुरी वेडाबद्दलचा प्रश्न जेव्हा विचारला, त्यावरील हुसेन यांचं ‘मा-अधुरी’ हे स्पष्टीकरण मात्र आपमतलबी वाटतं. हुसेन यांना जर आपल्या आईचाच शोध घ्यायचा होता, तर त्यांना खुद्द पंढरपूर व इतरत्र अनेक माता-भगिनी आढळल्या असत्या, ज्या मध्ये त्यांना स्वत:ची माता शोधून तिला पूजता आलं असतं. त्यासाठी सुस्वरुप, सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित कशाला? तसंच त्यांचं भारत सोडून परदेशी जाणं, कतारचं नागरिकत्व घेणं, या बाबीही संशय घेण्यास जागा ठेवतात. कारण भारतामध्ये हुसेन यांना जे राजकीय स्थान मिळालं होतं, त्यावरून भारत सरकारला त्यांचं संरक्षण करणं भागच होतं. आता त्यांची हिंदू देवतांची नग्न चित्रं. हुसेन यांची ही चित्रं म्हणजे काही राजा रवि वर्मा, एस. एम. पंडित वा रघुवीर मुळगांवकर यांनी चित्रित केलेली वास्तववादी चित्रं नव्हेत, की जो कोणी फ्रेम करून पूजेला लावील. हुसेन हे थोर चित्रकार होते यात शंकाच नाही. पण त्यांची ही देवतांची चित्रं फारतर प्रतिकात्मक म्हणता येतील. शिवाय प्रत्येक चित्राला त्यांनी देव-देवतांची नावं दिली होती. जी या देशातील सुमारे सत्तर टक्के लोकांची श्रद्धास्थानं आहेत, ती नावं नसती तर कदाचित लोकांना ती सरस्वती, पार्वती, सीता वाटल्याच नसत्या. त्यामुळे जसा एखादा इसम दुसर्‍याला एखादी आईवरून शिवी हासडतो, तसा वास या नावं लिहिण्याला येतो. जसं लेखकाला, चित्रकाराला स्वत:चं मत मांडायचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे हा विचार त्यांनी करायला हवा. त्यामुळे हुसेन यांना प्रसिद्धी मिळवण्याचं कदाचित ते साधन वाटत असावं. हे थोडं विषयांतर झालं. कोलतेंनी हुसेन यांच्या हयातीत व हयातीनंतर त्यावर लिहून हुसेन यांच्या जीवनावर सुरेख प्रकाश पाडला आहे. मात्र कोलतेंनी या दोन्ही लेखांमध्ये हुसेन यांचा केलेला एकेरी उल्लेख मनाला जरा खटकून गेला.

संभाजी कदम यांचं पेन्सिल ड्रॉइंग
बहुळकरांच्या लेखातील आणखी एक ‘न्यूड‘
दुसरा लेख चित्रकार सुहास बहुळकरांचा. बहुळकर यांनी जे जे स्कूल आर्टमध्ये बरीच वर्षे काढली आहेत. शिवाय त्यांचा वैयक्तिक लोकसंग्रह. त्यातही बहुळकर हे वास्तववादी चित्रण करणारे. त्यामुळे अगदी पुराण काळापासून उदाहरणं देत त्यांनी घेतलेला नग्नतेचा आढावा उल्लेखनीय वाटतो. कलाशिक्षक या नात्यानं त्यांचे जोडले गेलेले संबंध, अनेक शिक्षकांशी आलेले जवळून संबंध, न्यूड मॉडेल बसवण्यापासून त्यांचं चित्रांकन होईपर्यंत अनेक पूर्वीच्या शिक्षकांपासूनचे दाखले अन त्यांचे सल्ले, हा जणू स्कूल ऑफ आर्टचा इतिहास डोळ्यासमोर उभा करतो. मात्र या दीर्घ लेखामध्ये बहुळकरांनी काही तपशील घातले आहेत, ते थोडे अनावश्यक व विषयांतर करणारं वाटलं. विशेषत: कदम सरांविषयी काही तपशील त्यांनी टाळले असते तर ते उचित ठरलं असतं.

देवदत्त पाडेकर याचं ‘न्यूड’
देवदत्त पाडेकर हा तरुण चित्रकार निसर्गदत्त कलेची देणगी घेवून जन्माला आला आहे. त्याच्या चित्रकलेविषयी काय बोलावं? पाश्चात्यांच्या तोडीचं चित्रण करणार्‍या या मनस्वी सर्जनशील कलावंतांची न्यूड चित्रं ही अंकाची शोभा शतपटीनं वाढवितात. अंकाची दोन मुखपृष्ठं हा तर संपादकांच्या कल्पकतेचा परमोच्च बिंदू आहे. एकूण काय, तर ’नग्नता, चित्रातली आणि मनातली’ या विषयावरचा ’चिन्ह’चा खासे अंक बुरसटलेल्या मनांवरची जळमटं दूर करून कला रसिकांना ‘कला साक्षर’ बनविणार यात शंकाच नको!

मं. गो. राजाध्यक्ष
rajapost@gmail.com






अंकासंबंधी काही चर्चा करायची असेल, बोलावयाचे असेल तर ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांच्याशी 9833111518 या मोबाईलवर थेट संपर्क साधता येईल. (हा नंबर रविवारीसुद्धा स्वीच ऑफ नसतो.)

अंकाची मागणी नोंदवावयाची असल्यास कृपया 90040 34903 या मोबाईल क्रमांकावर ‘1 m copy’ एवढाच मेसेज स्वत:चा नाव, पत्ता आणि असल्यास इ-मेल आयडीसह पाठवावा. आठवड्याभरात अंक कुरियरनं घरपोच होईल.

वि. सू. अंक कोणत्याही स्टॉलवर अथवा पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध नाही याची कृपया नोंद घ्यावी.



Thursday, August 18, 2011

‘न्यूड’ आणि ‘नग्नता’  


श्री. सतीश नाईक
 सप्रेम नमस्ते

 आपण ’न्यूड’ कथा उत्खनन करून काढलीत. १९७५ सालची ही कथा... लेखकवर्गातून चित्रकलेची फारशी माहिती नसावी म्हणून अभिप्राय मिळाला नाही. चित्रकारांचं वाचन (तुम्ही अपवाद सोडून) किती ती कल्पना नाही, त्यामुळे या कथेचा ३६ वर्षानंतर उल्लेख हा माझ्या लेखी चमत्कारच आहे. ह्यापेक्षा गायन अधिक बरे कारण तत्काल अभिप्राय मिळू शकतो. हे आपलं गमतीत!
 पण आपले आभार खरं तर इतका उत्कृष्ट अंक काढल्याबद्दल, आर्टपेपर, उत्कृष्ट छपाई...पेक्षा उत्कृष्ट चित्रं...पुढच्या वर्षीचा अंक निघेस्तोवर हा अंक पहायला वर्ष पुरणार नाही. मी पूर्वीचे अंक (मीरा दातारकडून) पाह्यले होते... पण हा फारच अप्रतिम आहे.
 माझी आई चित्रकार. मामा पण निसर्ग चित्रं उत्तम काढत. मामाचे मामा पण म्हणे चित्रकार... आईकडून उल्लेख ऐकला होता की त्यावेळेस शरीर चित्रण करायला...त्यांना स्मशानात जावे लागे! कारण इतर कुठे मॉडेल मिळण्याची शक्यता नव्हती.
 पुढच्या अंकाबद्दल व यशस्वी वाटचालीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद...

 उर्मिला सिरुर

 ज्यांच्या ‘न्यूड’ या लघुकथेचा उल्लेख अंकाच्या संपादकीयात विशेषत्वानं झाला आहे. त्या कथालेखिका ‘उर्मिला सिरुर’ याचं हे पत्र. ते माझ्यापाशी आलं ते जे जे स्कूल ऑफ आर्ट मधली माझी वर्गमैत्रिण मीरा दातार हिच्या मार्फत. मीराचं ’मीरा दातार’ हे नाव आत्ताचं म्हणजे खरं तर नंतरचं किंवा लग्नानंतरचं. आधीची ती उर्मिला, उर्मिला सहस्त्रबुद्धे. मराठी प्रकाशन व्यवसायात ज्याचं नावं अत्यंत आदरानं घेतलं जातं त्या चित्रकार पद्मजा सहस्त्रबुद्धे यांची ती कन्या. अलिकडच्या पिढीला त्यांचं कर्तृत्व ठाऊक असण्याची शक्यता तशी कमीच, (ज्यांना ते ठाऊक करून घ्यायची इच्छा असेल त्यांनी मौजेची (ही एक प्रकाशनसंस्था आहे आणि ती मराठीतील महत्त्वाची मानली जाणारी पुस्तकं प्रसिद्ध करते. असो.) ग्रंथ-पुस्तकं चाळावीत. प्रकाशनाच्या क्षेत्रातला चित्रकारही अभिजातपणाचा ठसा आपल्या कामावर कसा उमटवू शकतो ते त्यांना तेथे नक्कीच पहावयास मिळेल.) पुन्हा एकदा असो!

 दरम्यान घडलं ते असं.

 मीराच्या हातात ‘चिन्ह’चा ताजा अंक पडला आणि त्यातला उर्मिला सिरुरांच्या कथेचा संपादकीयातला उल्लेख वाचून तिनं थेट उर्मिला सिरुरांनाचा फोन लावला. मीराची आई आणि उर्मिला सिरुर या आर्ट स्कूल मधल्या दिवसापासून ते आजतागायतच्या जिवाभावाच्या मैतरणी. साहजिकच मीरानं त्यांना ‘चिन्ह’मधला त्यांच्या विषयीचा सारा मजकूर हक्कानं वाचून दाखवला. आपल्या एका कथेविषयी इतक्या वर्षांनी, इतक्या म्हणजे कितक्या तर तब्बल ३६ वर्षानं असं काही लिहून आलं आहे म्हटल्यावर त्या बिचार्‍या (बहुदा) भारावूनच गेल्या असाव्यात. (इती मीरा उर्फ उर्मिला) मग मीरानं त्यांना माझ्याविषयी, ‘चिन्ह’विषयी सांगितलं वगैरे मग हेच सारं तिनं मला उलट्या क्रमानं फोनवरून त्यांच्याविषयी सांगितलं. ज्यांच्याविषयी लिहिलं आहे त्यांची प्रत्यक्ष प्रतिक्रिया सांगितल्यावर कुठल्या लेखक, संपादकाला आनंद होणार नाही? मलाही तो झाला. ‘चिन्ह’चा हा अंक विक्रीसाठी कुठेच उपलब्ध नसल्यानं त्यांना तो मिळवण्यास अडचण येणार हे लक्षात घेऊन मी त्यांना मीराकरवी अंकाची एक भेट प्रत पाठवली.

 दरम्यानच्या काळात अंक प्रसिद्ध झाल्याबरोबर कुठून कुठून प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यातले अट्टल वाचक त्या कथेविषयी आवर्जून विचारू लागले. सत्यकथेचा तो अंक मिळवणं कठीण आहे पण ती कथा आता कुठे वाचायला मिळेल? कथासंग्रहात घेतली आहे का? तो कुणी काढलाय वगैरे. काही उत्साही वाचकांनी तर तो कथासंग्रह मिळवून ती कथा वाचूनही कळवलं. तर अनेक वाचकांचं म्हणणं असं होतं की ती कथा या अंकात पुन्हा प्रसिद्ध करायला हवी वगैरे. कविता महाजनानी पाठवलेल्या पत्रातही त्याचा उल्लेख केला होता. साहजिकच मलाही ती कथा इतक्या दिवसांनी पुन्हा वाचाविशी वाटू लागली. पण आता ती मिळवायची कशी असा यक्षप्रश्न मलाही पडला. कारण अगदी दोनेएक वर्षापर्यंत सत्यकथेचा तो अंक माझ्या संग्रहात होता. पण घर बदलताना तो सारा संग्रह मी मुं. म. ग्रं. स. संदर्भ विभागाला देऊन टाकला. चारसहा महिन्यापूर्वी मुं. म. ग्रं. स.च्या संदर्भ विभागाकडून संदर्भाबाबत आलेला अनुभव भयंकर असल्यानं तिथं पुन्हा जायचंच काय, पण विचारायचंसुद्धा धाडस झालं नाही. म्हणून मग मी मीरालाच विचारलं. तर मीरा म्हणाली ‘कवडसा’ या कथासंग्रहात ती कथा आहे. पण माझी प्रत मला मिळत नाहीय. म्हणून तिनं थेट उर्मिला सिरुरांनाच विचारलं. तर त्या म्हणाल्या की ‘मी पण माझी प्रत शोधतेय. मलाही इतक्या वर्षानं ती कथा वाचाविशी वाटतेय.’ हो नाही हो नाही करता करता त्यांना त्यांच्याकडे ‘कवडसा’च्या दोन प्रती मिळाल्या. त्यातली एक त्यांनी मीराकरवी मला पाठवली. आणि सोबत लेखाच्या प्रारंभी प्रसिद्ध केलेलं पत्र....

 कुणाही लेखक-संपादकाला आपल्या प्रकाशनासंदर्भात वारंवार घडावेसे वाटणारे पण क्वचितच घडणारे हे दुर्मिळ क्षण, पुढल्या वळणावरच्या, नव्या प्रवासाला निश्चितपणानं दिशा देतात.

 ‘कवडसा’ची ती दुर्मिळ प्रत पाहताना पुन्हा एकदा स्मरणरंजनाचा अनुभव घेता आला. जेजेतले ते सारे रम्य दिवस पुन्हा एकदा आठवले. वर्गातल्या मित्र-मैत्रिणीचा-शिक्षकांचा सारा पट पुन्हा एकदा नजरेसमोरून भर्रकन फिरून गेला. चाळीस एक जण होते वर्गात पण त्यातले पाचसुद्धा नंतर भेटले नाहीत. कलेशी-कलाक्षेत्राशी संपर्क ठेवून असलेले तेवढे भेटतात. बाकीचे सारे कुठे गेले कुणास ठाऊक? मीरा ही त्यातली एक. शिक्षणक्षेत्रात असल्यानं ती मात्र सारा ट्रॅक ठेवून असते. जेजेमध्ये असल्यापासूनच तिचं माझं छान जमत असे. साहित्य क्षेत्रातल्या सार्‍या आतल्या खबरी तिच्याच मुळे मला मिळत असत. ‘कुणाला सांगू नकोस हं’ असं म्हणून ती जे सांगायची ते खरंच मी कुणाला कधी सांगितलं नाही. अगदी परवा वरील प्रसंग घडला तेव्हासुद्धा ‘हे तू कुणाला सांगू नकोस.’ असं म्हणून ती जे मला म्हणाली ते तरी मी कुठं तुम्हाला सांगीतलंय?

सतीश नाईक

या अंकाविषयीच्या माहितीपत्रकांसाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://chinha.in/promo/Chinha%202011.pdf

आणि अंकाची प्रत मागवण्यासाठी
‘चिन्ह’च्या 9967784422 / 90040 34903  या मोबाईलवर '1 m copy'  एवढाच मेसेज स्वतःच्या नाव पत्त्यासह पाठवा. अंक पाच दिवसात घरपोच होईल.

Tuesday, August 16, 2011



रु. 350 चे 560 का झाले?


ठाण्याच्या साहित्य संमेलनात ‘चिन्ह’नं ‘नग्नताः चित्रातली आणि मनातली’ अंकाची माहितीपत्रकं वितरीत केली तेव्हा जवळ जवळ तीनशे-चारशे जणांनी मोठ्या उत्साहानं अंकासाठी नावं नोंदवली. तेव्हा अंकाचं देणगीमूल्य होतं रु. 250 आणि सवलतीत तो अंक दिला जाणार होता अवघ्या 200 रुपयांना. पण मोठ्या संख्येनं नाव नोंदणी करणार्‍यांचा उत्साह त्यानंतरच्या चारच महिन्यात मोठ्या प्रमाणावर कमी झाला. अवघ्या काही जणांनीच दिलेल्या मुदतीत ते सवलत शुल्क भरण्याची तत्परता दाखवली.

अंकाचं काम मार्गी लागल्यावर असं लक्षात आलं की हा अंक मोठा मोठा होत चाललाय. याचं देणगीमूल्य वाढवावं लागणार! आणि मग रंगीत माहितीपत्रक प्रसिद्ध झालं तेव्हा अंकाचं देणगीमूल्य रु. 300 करण्यात आलं. रंगीत माहितीपत्रक, फेसबुक, संकेतस्थळ या सार्‍यांमुळे अंकाची मागणी भराभर वाढू लागली. इकडे अंक मोठा मोठा होतच चालला होत. पण यानंतर देणगीशुल्क वाढवायचे नाही असा निर्णय आम्ही ठामपणानं घेतला होता. अगदी प्रकाशनाच्या 20-25 दिवस आधी सुद्धा आम्ही मागणी नोंदवून घेत होतो.

त्यामुळे झालं काय की या अंकाची पहिली आवृत्ती मोबाईल आणि नेटवरूनच बुक झाली. ‘चिन्ह’च्या आजवरच्या इतिहासातला हा सर्वात मोठा, सर्वात जास्त खर्चाचा आणि सर्वात अधिक स्फोटक विषयावरचा अंक असल्यानं आम्हीही थोडसं सबूरीनं घ्यायचं ठरवलं आणि जी मागणी नोंदवली गेली होती त्यावर आधारित प्रिन्ट ऑर्डर निश्चित करून अंकाची छपाई सुरू केली. कारण अंकाच्या निर्मितीच्या काळात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे या अंकाचं स्वागत कसं होईल? समाजात नेमकी काय प्रतिक्रिया उमटेल? या विषयी मनात अनेक शंका कुशंका नाचत होत्या. त्यातूनच हा अंक मर्यादित किंवा मागणीनुसार प्रिन्ट ऑर्डर देण्याचा निर्णय घेतला गेला.

याला दुसरं कारण काहीसं आर्थिकही होतं. जे 250 रु. किंवा 300 रु. सवलत देणगीमूल्य आम्ही आकारलं होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च अंकाच्या एका प्रतीला आम्हाला येत होता. पण महाराष्ट्रातील चित्रकार-शिल्पकारांनी दिलेल्या जाहिरात प्रायोजकत्वामुळे तो खर्च आम्ही सहन करू शकत होतो. आणि तो आम्ही केलाही. कुठल्याच आर्थिक फायद्यातोट्याकडे न पाहता आम्ही दिलेला शब्द पाळणं महत्त्वाचं मानलं. ज्या अंकाच्या एका प्रतीला 300 रुपयांपेक्षाही अधिक खर्च आला, ती प्रत ज्या वाचक सभासदानं सवलत देणगीशुल्क रु. 200 (अगदी सुरूवातीला) आणि रु. 250 (नंतर) ज्यांनी ज्यांनी भरली त्या सार्‍यांनाच त्याच सवलतशुल्कात ‘चिन्ह’नं अंक उपलब्ध करून दिला. पुन्हा एकदा थॅंक्स टू महाराष्ट्रातील सर्वच चित्र आणि शिल्पकार.)

आता सारं काही इथंच थांबायला हवं होतं किंवा संपायला हवं होतं पण तसं झालं नाही कारण अचानक वृत्तपत्रात येणार्‍या बातम्यांमुळे म्हणा, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सतीश नाईक यांच्या लेखामुळे म्हणा किंवा ‘लोकमत’मधल्या शर्मिला फडके यांच्या लेखाच्या पूर्वप्रसिद्धीमुळे म्हणा, ‘चिन्ह’च्या संकेतस्थळाला मोठ्या प्रमाणावर हिट्स मिळू लागल्या आणि अंकाविषयी विचारणा होऊ लागली. तोपर्यंत अंकाची छपाई सुरूही झाली होती. त्यामुळे प्रिन्ट ऑर्डर वाढवता येणं अशक्य होतं, त्यातूनच मग दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्याची कल्पना पुढे आली. (‘चिन्ह’च्या आजवरच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं.) महाराष्ट्रातील चित्रकार-शिल्पकारांनी उचललेल्या जाहिरात प्रायोजकत्व योजनेतील बराचसा भाग पहिल्या आवृत्तीवर खर्च झाल्यानंच दुसर्‍या आवृत्तीचं देणगीमूल्य वाढवणं क्रमप्राप्त होतं. देणगीमूल्य रु. 350 रुपयांवरून 560 रुपयांवर जे गेलं ते कसं गेलं ते यावरून लक्षात यावयास हरकत नाही.

दुसर्‍या कुण्या व्यावसायिक प्रकाशकानं ही अशी निर्मिती केली असती तर त्यानं एका प्रतीची किंमत रु.1000 इतकी निश्चितपणानं आकारली असती. पण ‘चिन्ह’चं उद्दिष्टच वेगळं असल्यानं ‘चिन्ह’नं तो मार्ग चोखाळला नाही. मोबाईल वा नेटवरून थेट बुकींग करण्याच्या या नव्या फंड्यामुळे एक झालं. पुस्तक विक्रेते किंवा मासिकं विक्रेते जे 30 ते 40% कमीशन आकारतात त्यामधून वाचकांची आणि अर्थातच ‘चिन्ह’चीही सुटका झाली. अंकाचं देणगीमूल्य फक्त रु. 750 इतकं ठेवता आलं आणि सवलतीत तो 560 रुपयांना उपलब्ध करून देता आला. प्रायोजकत्व योजनेतून मिळालेला सर्वच निधी आम्ही या अंकाच्या पहिल्या अंकाला संपूर्ण तर दुसर्‍या आवृत्तीला काही प्रमाणात वापरला असल्यानं आता या अंकाची तिसरी किंवा चौथी आवृत्ती प्रसिद्ध करायची वेळ आलीच (आणि ती येणारही आहे) तर तेव्हा अंकाचं देणगीमूल्य रु. 750 असेल हे निश्चित.

‘चिन्ह’च्या www.chinha.in या संकेतस्थळावरून आपण या अंकाची मागणी नोंदवू शकता किंवा 99677 84422 / 90040 34903 / 98331 11518 या ‘चिन्ह’च्या मोबाईल नंबर्सवर ‘1 m copy’  एवढाच मेसेज स्वतःच्या नावपत्त्यासह पाठवून आपली मागणी नोंदवू शकता.

देणगीमूल्याचे रु. 560 आपण मुंबईतले असाल किंवा आपलं खातं राष्ट्रीयकृत बॅंकेत असेल तर आपण कुरियरनं धनादेशही पाठवू शकता किंवा ‘चिन्ह’च्या स्टेट बॅंकेच्या खात्यावर आपण आपला धनादेश जमा करू शकता अथवा स्टेट बॅंकेच्याच खात्यावर रोख रक्कमही भरू शकता.

ज्या पद्धतीनं आपण देणगीशुल्क द्याल त्याविषयी ‘चिन्ह’ला एस. एम. एसद्वारे किंव फोन करून कळवणं मात्र अत्यावश्यक आहे. अन्यथा आपले पैसे नावाविना खात्यात पडून रहाणं शक्य आहे.

आजच निर्णय घ्या. दुसर्‍या आवृत्तीच्याही आता थोड्याच प्रती उपलब्ध आहेत.

या अंकाविषयीच्या माहितीपत्रकांसाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://chinha.in/promo/Chinha%202011.pdf

आणि अंकाची प्रत मागवण्यासाठी
‘चिन्ह’च्या 9967784422 / 90040 34903  या मोबाईलवर '1 m copy'  एवढाच मेसेज स्वतःच्या नाव पत्त्यासह पाठवा. अंक पाच दिवसात घरपोच होईल.

Friday, August 12, 2011



आणि  कविता







नामवंत कादंबरीकार कविता महाजन या ‘चिन्ह’च्या प्रारंभापासूनच्याच चाहत्या. यंदाच्या अंकातील परिसंवादात तर त्या सहभागीही झालेल्या. त्यांना आम्ही अंक कसा वाटला ते कळवा अशी विनंती केली होती तर लगेचच त्यांनी पत्रानं अभिप्रायही कळवला. तोच येथे देत आहोत.

प्रिय श्री. सतीश नाईक,
स.न.वि.वि.

उत्सुकतेने वाट पहावी अशा खूपच कमी गोष्टी आज घडताहेत. पुस्तक, चित्रपट, नाटक इत्यादी सर्वच बाबतीत. मासिकं आणि दिवाळी अंक तर वाचले नाही तरी चालतील असं वाटावं इतका त्यांचा दर्जा सुमार होत चाललेला आहे. त्यामुळे आपोआपच त्यांबाबत एक तर्‍हेचं औदासिन्य मनात निर्माण होतं. या सार्‍या उदास वातावरणात ‘चिन्ह’नं मात्र आपलं स्थान गेली अनेक वर्षं अबाधित ठेवलं आहे. ‘चिन्ह’चा अंक कोणत्याही विषयावर असो, त्याची उत्सुकता मनात कायम असते. अंक हाती येताच मनाला तरतरी येते. गेल्या खेपेस ‘निवडक चिन्ह’ हातात आला, तेव्हा तर एका वेगळ्या जगात प्रवेश करत असल्याचा अनुभव पुन: प्रत्ययास आला. ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ या विषयावरील नव्या अंकानं तर वेबसाईट, ब्लॉग, फेसबुक इत्यादी जनसंपर्काच्या तंत्रज्ञानावर आधारित नव्या वाटा चोखाळून वेगळी उत्सुकता तयार केली होती.

आर्टपेपरवरील पूर्ण रंगीत छपाई असल्याने चित्रांना पूर्ण न्याय दिला जातो. आर्टपेपरवरील छपाई ‘चिन्ह’नं गेल्या अंकापासून सुरू केली आहे. त्यामुळे खर्चाचा ( आणि अर्थातच कर्जाचाही! ) बोजा काढणे अपरिहार्य ठरते. वाचकांची जबाबदारी, मला वाटतं, इथूनच सुरू होते. संपादक, प्रकाशक, लेखक, चित्रकार यांनी आपल्या जबाबदार्‍या उत्तम तर्‍हेनं पार पडल्यावर वाचकांनी अंकाचा प्रसार-प्रचार-विक्री करण्यास स्वत:हून पुढे आलं पाहिजे, याची जाणीव हा अंक पाहता-वाचताना होते. कारण त्याआधारेच ‘चिन्ह’चा पुढील अंक आपल्या हाती येऊ शकेल.

या अंकाचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं ते असं की संपादकीय व इतर लेख / परिसंवाद यांच्या आधी ज्या ‘भूमिका’ लिहिल्या आहेत, ते सारे लेखन अत्यंत स्पष्ट, स्वच्छ, मुद्देसूद आणि नेमकं आहे. विशेषत: परिसंवादात जी मतं-मतांतरं वैविध्य, प्रसंगी विसंवाद घेऊन येतात, त्यांना एकत्र गुंफण्याचं कौशल्य या निवेदनांमधून दिसतं. हेतू प्रामाणिक आणि पारदर्शक आहेत, हे कळून चुकलं की वाचक मोकळ्या मनानं पुढचं लेखन वाचण्यास सुरूवात करतो. परिसंवादात वेगवेगळ्या क्षेत्रांमधील लोकांचा समावेश केल्याने विविध अंगांनी केले गेलेले विचार समोर येतात व वैचारिक नाविन्याचा आनंद लाभतो. परिसंवादातील मेघना पेठेंचा लेख तर भाषाशैलीचं अत्यंत मोहक उदाहरण आहे. डॉ. सुधीर पटवर्धनांचा लेखही मला आवडला. त्यांची चित्रशैली आणि भाषा यांची कुणीतरी तुलना करून पाहिली तर अनेक साम्यस्थळं आढळतील असा गमतीशीर विचारही त्यातून मनात आला. पार्वत्ती दत्ता यांचा लेखही अत्यंत रोचक आहे. त्यासोबतची छायाचित्रं दृश्यमाध्यमाचा वेगळा प्रभाव नोंदवणारी आहेत. तुलनेत मी मात्र विषयाला पुरेसा न्याय देऊ शकले नाही. निव्वळ त्रोटक मुद्दे मांडले. प्रकृतिअस्वास्थ्य हे कारण होतं, पण नंतर कधीतरी या विषयावर अनुभवांसह सविस्तर लिहीन, हे नक्की.

शर्मिला फडकेची मुखपृष्ठकथा ‘मोनो’लॉग - अप्रतिम आहे. खरंतर हा सारा एका अख्ख्या कादंबरीचा ऐवज आहे. गेल्या अंकातील चिमुलकरांवरील लेख वाचूनही असं वाटलं होतं. आपल्याकडे चित्रं / शिल्पकारांवरील चरित्रात्मक कादंबर्‍यांचा अभाव आहे. शर्मिलानं याचा विचार नक्की करावा. तिच्याकडे विलक्षण समज आहे, वैचारिकता आणि सहृदयता यांचा मिलाफ आहे आणि भाषेची देणगीही आहे.
सुहास बहुळकरांचा प्रदीर्घ लेख म्हणजे जणू एक लहान पुस्तिकाच आहे. त्यात महाराष्ट्रातले अनुभव त्यांनी सांगितलेत, तसेच देशभरातील अनुभव नोंदवले तर खरंच एक स्वतंत्र पुस्तक तयार होईल. देवदत्त पाडेकरांच्या लेखासारखं, त्या सोबत अजून दोन-तीन लेख असते, तर त्या विभागाला अधिक मिती मिळाल्या असत्या. उर्मिला सिरूर यांची कथा या अंकात पुन्हा छापायला हवी होती. ती खरंच एक वेगळा अनुभव मांडणारी कथा आहे.

हुसेन आणि कोलते सर
राहता राहिला मुद्दा हुसेनविषयक लेखांचा. कोलते सरांचे दोन्ही लेख जवळपास सर्व मुद्दे नोंदवणारे असले, तरी इतर लेखांमधील हुसेनविषयक नोंदींवर, हुसेनचा मृत्यू दरम्यानच्या काळात झाला, या कारणास्तव संपादकीय कात्री चालवणं खरोखर गरजेचं होतं का? तुम्ही निवडलेल्या लेखकांपैकी एकहीजण ‘अविचारी’ वा ‘कुविचारी’ आहे असे म्हणता येणार नाही. सगळी स्वत:ची जबाबदारी ओळखून असलेली विचारी माणसे आहेत. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं छापलं जाणंच योग्य होतं. तुम्हांला आलेल्या धमक्यांची कथा माहीत असूनही मी हे म्हणते आहे... आणि प्रत्येक भल्याबुर्‍या प्रसंगी तुमच्या सोबत असण्याचं आश्वासनही या निमित्तानं देते आहे.
सर्वांगसुंदर अंकाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!

आपली
कविता महाजन

प्रिय कविता
काहीतरी गैरसमज होतोय. हुसेन यांच्या लेखातील एकही शब्द बदलेला नाहीये. कात्री चालवणं वगैरे दूरचच. फक्त विष्णू खरे यांचा लेख अंकातून काढून ‘चिन्ह’च्या संकेतस्थळावर टाकलाय इतकच याचं कारण आहे. मूळ लेख हिंदी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. त्यातले सारे मुद्दे हुसेन हयात असेपर्यंत लागू होते. हुसेन यांचं निधन झाल्याबरोबर त्या विषयाचं परिमाणच बदललं आणि तो काहीसा कालबाह्य झाला म्हणून तो अंकातून काढावा लागला.
संकेतस्थळावर मात्र तो अर्थातच उपलब्ध आहे. त्याची लिंक पुढीलप्रमाणे.
http://chinha.in/promo/Vishnu%20Khare.pdf

अभिप्रायाबद्दल अगदी मनापासून आभार !
सतीश नाईक


आणि अंकाची प्रत मागवण्यासाठी
‘चिन्ह’च्या 90040 34903 या मोबाईलवर '1 m copy'  एवढाच मेसेज स्वतःच्या नाव पत्त्यासह पाठवा. अंक पाच दिवसात घरपोच होईल.