Friday, December 31, 2010



लालमहालातला दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवल्यानंतरची प्रतिक्रिया देताना  शिल्पकार
उत्तम पाचारणे म्हणतात
हे तर पाशवी कृत्यच!
 
हा पुतळा हटवणं हे निषेधार्हच आहे. सर्वप्रथम मी असं म्हणेन की ज्ञानेश्वरांची समाधी उखडून ज्ञानेश्वरांनी तिथंच समाधी घेतली का? हे पाहण्यासारखा हा सर्व प्रकार आहे. मराठी मनाला वेदना करणारी ही गोष्ट आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण या विषयाच्या कितीही खोलात गेलो तरी अंधारच आहे आणि कितीही वर अनंत अवकाशात गेलो तरी काळी पोकळीच आहे. सद्‍सद विवेक बुद्धी जागृत ठेवून जवाबदार व्यक्तिंनी हे विषय हाताळायचे असतात. यशवंतराव चव्हाणांपासून सर्वानींच ज्यांनी इतिहास संपादनाचं काम केलं त्यांनी; सदर विषयाची पूर्णत: पुष्टी होत नाही म्हणून मराठी विश्वकोषाचं काम थांबवलं होतं, अशी नोंद आढळते. याचाच अर्थ असा की त्यांनी या विषयाकडे फार गांभीर्यानं पाहिलं असावं आणि सद्‍-विवेकानं निर्णय घेतला असावा असं वाटतं.

पण आज परिस्थिती अशी आहे, हाती आलेला पुरावा सत्य मानून दादोजींचा पुतळा हटवला जातो, उद्या दुसरे पुरावे हाती आले तर पुन्हा पुतळा उभारतील, पुन्हा काढूनही टाकतील. जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून पुतळा  पुतळा खेळण्यात जर राजकारण्यांना रस वाटत असेल तर त्यांनी आपली पदं सोडून खुशाल खेळावं.
कलाकार हा तत्कालीन समाजमन, त्यांच्या जाणीवा, उपलब्ध पुरावे यांच्या साहाय्यनं कलाकृती निर्माण करत असतो. त्यासाठी त्याची कित्येक महिन्यांची मेहनत तो पणाला लावत असतो. तेव्हा कुठे अशी कलाकृती मूर्त रूप घेते. चित्रकार एम.आर आचरेकर आणि दीनानाथ दलाल यांच्या चित्रांचा आधार घेऊन, त्यामध्ये ज्याप्रकारे कल्पना चितारली आहे त्या कल्पनेचा हे शिल्प एक उत्तम आविष्कार होतं आणि आहे. पण स्वत:चं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी या शिल्पाचा असा विध्वंस करणार्‍यांची वृत्ती मुळातच पाशवी असते. संवेनशीलतेचा एक सहस्रांश देखील त्यांच्या ठायी नसतो याचं या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रत्यंतर आलं.

सर्व कलावंत नेहमी समाजमनाची सेवाच करत असतात. पण अशा तर्‍हेचं दुष्कृत्य करून हे राजकारणी समाजमनाला विनाकरण वेठीस धरत आहेत आणि अशाप्रकारे समाजमनाला वेठीस धरणारं कृत्य निषेधार्हच असेल. एक कलाकार म्हणून खूप वाईट वाटतं. पण मनातल्या भावना व्यक्तही कराव्याशा वाटतात म्हणूनच ही धडपड...

शब्दांकन : अमेय बाळ

उद्या वाचा विख्यात शिल्पकार सदाशिव साठे यांची प्रतिक्रिया

Thursday, December 30, 2010

आधी आणि आता


प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे म्हणतात

हे शिवरायांचा पुतळाही हटवतील.



दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवल्या संबंधिच्या गेल्या दोन दिवसातल्य बातम्या जर चाळल्या तरी लक्षात येतं की समाजत हिंसकता किती वाढली आहे. तोडफोड, जाळपोळ, हाणामारी यांसारख्या घटनांनीच मथळेच्या मथळे भरले आहेत. मला वाटतं पुतळ्यावरून राजकारण करणार्‍यांना हेच हवं आहे. ज्याप्रमाणे जंगलामधली जनावरं कपळातलं स्वत:च अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या हिंस्र रूपातून आपली ताकद दाखवत असतात, त्याच प्रमाणे मानवी समाजातले(जो यांना आपला कळप वाटतो) ते हे नरपशू आपल्या शक्तीप्रदर्शनातून मीच कसा श्रेष्ठ हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्वांची वृत्ती लांडग्यांची आहे. त्यांना स्वत:शिवाय कुणाचंच भलं दिसत नाही.

आपल्या एखाद्या कृतीमुळे समाजात त्याचे काय पडसद उमटणार आहेत याची पूर्व कल्पना असतानाही, अशी कृती करणं हा निव्वळ राजकीय खेळीचाच एक भाग आहे. मग त्यात कोण कोण आणि कितीजण भरडले जातात याची त्यांच्यापैकी कुणालाच पर्वा नाही. एखादी कलाकृती निर्माण करताना तिचा निर्माता कलाकार किती कष्ट उपसतो, त्यामागे त्याची कित्येक महिन्यांची तपश्चर्या असते, साधना असते; त्यातून मग ती कलाकृती कशा प्रकारे निर्माण होते याच्याशी या सगळ्यांना काहीही देणं-घेणं नाही. ना कोणाला दादोजींविषयी काही वाटतं ना शिवाजींविषयी. उद्या उठून स्वत:ची ताकद सिद्ध करण्यासाठी शिवरायांचा पुतळा हटवायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत अशी यांची वृत्ती आहे. तेव्हा या लांडग्यासारख्या वृत्तीला मी दोष देतोय. एखदा प्रश्न सोडविण्याच्या यांचा संकल्पना जरा विचित्रच आहेत. म्हणजे एखाद्या प्रश्नावर यांचं उत्तर काय दुसरा प्रश्न निर्माण करा पहिल्याचं आपोआप निराकरण होईल.

वाईट याचंच वाटतं की हे सगळं माहिती असूनही आपण बातम्या वाचणं, प्रतिक्रिया व्यक्त करणं यापलिकडे काहीच करू शकत नाही. सगळ्या प्रकाराची खूप चीड येते पण दुसर्‍या क्षणी मनात विचार येतो की दगडावर डोकं आपटून काही फायदा नाही आपलंच डोकं फुटेल दगड मात्र तसाच राहील निर्विकार... नेमस्त...

शब्दांकन :  अमेय बाळ

उद्या वाचा प्रख्यात शिल्पकार उत्तम पाचारणे यांची जळजळीत प्रतिक्रिया.

Wednesday, December 29, 2010

आधी आणि आता


प्रख्यात शिल्पकार  प्रमोद कांबळे म्हणतात
हे तर तालिबानी कृत्यच!

जी काही घटना घडली ती अत्यंत वाईट घडली. याबद्दल काही बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. ते असते तरी त्यांना तोंडातून बाहेर पडताना लाज वाटली असती इतकं भयंकर कृत्य घडवून आणलं आहे. मला असं वाटत की काही वर्षांपूर्वी तालिबान्यांनी जसा स्फोटकांचा वापर करून बुद्धाचा पुतळा उद्‍ध्वस्त केला होता तसंच हे कृत्य आहे. तालिबानी आणि या लोकांमध्ये काहीच फरक नाही. मुघलांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रातल्या शिल्पांचा, मंदिरांचा विध्वंस केला; दादोजींचा पुतळा तडकाफडकी हटवणं हा देखील त्यातलाच प्रकार आहे. आपल्या संस्कृतीत असं सांगितलंय की एखादी गोष्ट आपल्याला नाही पटली तर तिच्या शेजारी दुसरी चांगली गोष्ट उभी करा, ती उद्‍ध्वस्त करण्यात काहीच हशील नाही. पण हे म्हणजे असं झालं; एकीकडे ऐक्याची भाषा करायची आणि दुसरीकडे असं समाजात दुफळी निर्माण करणारं कृत्य करायचं. एखादी रेघ जर आपल्याला लहान वाटत असेल तर तिच्या शेजारी दुसरी मोठी रेघ ओढावी, लहान रेघ का पुसावी. तसं केल्यानं हात तर बरबटतातच पण ती पूर्णपणे मिटवताही येत नाही आणि त्या जखमेचा ओरखडा मग व्रण म्हणून समाजमनावर कायम राहतो.

महागाई, भारनियमन, रोज उठून उघडकीस येणारे अब्जावधी रूपयांचे घोटाळे हे सगळे प्रश्न बाजूला सारून एका टुकार विषयावर राजकारण करण्याचा शहाणपणा करणारे अधिक शहाणे नेते हे आपले प्रतिनिधी आहेत याची लाज नाही वाटत कीव करावीशी वाटते. मला तर वाटतं की महागाई, भारनियमन, घोटाळे याप्रश्नांपासून जनतेची दिशाभूल करण्यासाठी केलेला हा कट आहे.

आणखी एक बाब अशी की हा पुतळा ज्यांनी प्रत्यक्ष हटवला त्यांनी रात्री उशीराचीच वेळ का निवडली? कारण ती वेळ फाशीची असते. आणखी कहर म्हणजे हा पुतळा कचर्‍याच्या डब्यातून नेण्यात आला. याहून वाईट वाटतं ते याचं की या गोष्टीचा आनंदोत्सव साजरा केला जातो. कलाकृती, कलाकार, त्यांची संवेदनशीलता यांच्याशी; हा प्रकार घडवून आणणारे आणि त्यावर अंमल करणारे यांचा सात काय सत्तर पिढ्यांचाही संबंध नाही, हेच यावरून स्पष्ट होतं. एखाद्या कलाकृतीचा अशाप्रकारे विध्वंस होतो तेव्हा त्याचं दु:ख काय असतं हे फक्त एक सच्चा कलाकारच जाणतो.

शेवटी एवढंच वाटतं की हा सर्व प्रकार घृणास्पद आहे. कलाकार म्हणूनच नव्हे तर जनसामान्यातला एक म्हणूनही मला याचा खेद वाटतो. पण मनावर दगड ठेवून आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करण्याशिवय माझ्या हातात काहीच नाही.

शब्दांकन : अमेय बाळ

उद्या वाचा प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांची तीव्र प्रतिक्रिया
आधी आणि नंतर...


तालिबान्यांनी बुद्धाच्या मूर्ती उद्‍ध्वस्त केल्याची बातमी कानी आली तेव्हा खूप अस्वस्थता आली. काही क्षण भिरभिरल्यागत झालं. हे सारं चालंलय तरी काय, कुणीच कसं हे थांबवू शकत नाही या भावनेनं एक विचित्र अगतिकतेची भावना मनाला स्पर्श करून गेली. बाबरी मशीद उद्‍ध्वस्त झाल्याची बातमी ऐकली तेव्हाही असंच काहीसं वाटलं होतं. नंतर वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या गगनचुंबी इमारतींवर विमानं धडकवली गेली तेव्हाही तसंच काहीसं झालं होतं आणि काल परवा पुण्यात दादोजी कोंडदेवांचा पुतळा कापून काढल्याची बातमी ऐकावयास मिळाली तेव्हा झालेली मानसिक अवस्था यापेक्षा काही फारशी वेगळी नव्हतीच! या सगळ्या घटनाक्रमात ज्या कलावंतानं ते शिल्प उभं केलं होतं त्या कलावंताला हे सारं पाहून काय वाटलं असेल? याची दखल एकाही वृत्तपत्राला अथवा वृत्तवाहिनीला घ्यावीशी वाटली नाही यावरून महाराष्ट्रात कलेला आणि कलावंतांला काय स्थान आहे याची कल्पना येते. ‘चिन्ह’ हे कलावंतांचंच व्यासपीठ आहे म्हणूनच आजपासून पुढले काही दिवस या घटनेसंदर्भातल्या महाराष्ट्रातल्या कलावंतांच्या प्रतिक्रिया आम्ही प्रकाशित करणार आहोत. दादोजी कोंडदेवांचं शिल्प ज्यांनी साकारलं ते कोल्हापूरचे नामवंत शिल्पकार संजय तडसरकर  म्हणतात,


आपण अगतिक आहोत...

“कलाकारचं असं असतं की कुठलीही कलाकृती असू द्या; नाट्यकृती असो, साहित्यातली असो, चित्र असो वा शिल्प असू द्या. ती कलाकृती निर्माण करताना कलाकार त्याविषयाशी पूर्णपणे एकरूप झालेला असतो,कलानिर्मिती झाल्यानंतरही ही एकरूपता असते पण काही काळापुरती. नंतर त्यापासून कलाकार अलिप्त होतो. परंतु ती कलाकृती कुठल्या उद्देशानं निर्माण झाली आहे, त्याचा समाजावर काय परिणाम होणार आहे याचा विचार त्याच्या मनात सतत घोळत असतो. लालमहालातला दादोजी कोंडदेवांचा पुतळा कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तडकाफडकी काढणं, याला नक्कीच राजकीय खेळीचं वळण मिळालेलं आहे. हे शिल्प माझ्याकडून निर्माण झाल्यानंतर काही काळानं मी त्यापासून अलिप्त झालो. पण दोन दिवसांपूर्वी जी घटना घडली त्यानं मन खिन्न झालं. हा मुद्दा चर्चेतून सोडवता आला असता. पण हल्ली कोणाही राष्ट्रपुरूषाचा पुतळा टार्गेट करणं फार सोप्पं झालंय आणि त्यामुळे स्वत:ची राजकीय पोळी भाजणार्‍यांचं असं फावतय.

आमच्यातले सर्व ज्येष्ठ शिल्पकार असं म्हणतात की समाजमन घडवण्यात कलाकार मोठी भूमिका बजावतो. मला असं वाटतं की त्यांनी स्वत:हून या घटनेवर भाष्य करावं. एखादा पुतळा साकारताना त्यातल्या सौंदर्याचा भाग हा फार महत्त्वाचा असतो. त्यासाठी कलाकार जीव ओतून काम करत असतो; पण ह्या पुतळ्याला ज्याप्रकारे कटरने कापून हटवलं गेलं त्यावरून एकच लक्षात येतं की हा प्रकार करणार्‍यांचा आमच्यासारख्या कलावंतांच्या किंवा तो पहाणार्‍या जनसामान्यांच्या संवेदनशीलतेशी काडीमात्रही संबंध नाही.

ही घटना घडून गेली म्हणजे भविष्यात असं काही होणारच नाही असं नाही. त्यामुळे शासनानं तज्ज्ञांशी चर्चा करून कुठलीही कलाकृती निर्माण करताना कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं न आणता कलाकृती निर्माण करण्यासंबंधीचे काही नियम आखून द्यावेत. ज्यामुळे भविष्यात अशा घटना टाळता येतील. झाल्या प्रकाराचं वाईट तर वाटतंच पण हा सर्वच प्रकार कलेच्याच नव्हे तर सबंध समाजासाठी देखील घातक असताना आपण काही करू शकत नाही याचं दु:ख सलत राहतं.”

शब्दांकन
अमेय बाळ

Thursday, December 2, 2010

मराठी चित्रकार

चित्रकला हे शब्दातीत माध्यम आहे, मराठी चित्रकार हा काही इतर चित्रकारांपेक्षा वेगळा असतो कां? आधीच्या पिढीतल्या चित्रकारांमधे स्वत:चे असे एक स्थान निर्माण केलेल्या चित्रकारांमधे काही मराठी चित्रकार होते. उदा. वासुदेव गायतोंडे,सदानंद बाक्रे, प्रभाकर बरवे, प्रभाकर कोलते, सुधीर पटवर्धन. आज अशी किती नाव घेता येतील?  श्री.शशिकांत सावंत यांनी 'आपलं महानगर'च्या दिवाळी अंकात आजच्या मराठी चित्रकारांवर आणि जागतिक पातळीवरील त्यांच्या आजच्या कामगिरीबद्दल, स्थानाबद्दल एक लेख लिहिला आहे. लेख अनेक अर्थांनी इंटरेस्टींग आणि वाचनीय आहे. मूळ लेख खूप मोठा आहे. त्यातला काही अंश इथे देत आहे.

" बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर सर्वच देश डाव्या-उजव्या डिस्कोर्समधे विभागला गेला. मराठी चित्रकारांची  बाबरी मशिदीवर काही भूमिका होती. पण किती जणांनी ती जाहीरपणे व्यक्त केली? नंतरच्या काळात 'इन्स्टॉलेशन' हा जो कलाप्रकार सजला त्यासाठी राजकीय विचारासारख्या मूलभूत गोष्टी आवश्यक होत्या. त्यात मराठी चित्रकार मागे होते. ८७ ते ९२ या काळात जे बदल झाले त्यात संकल्पनात्मक चित्रकलेला मोठ्या प्रमाणावर स्थान मिळू लागले. उदा. सुधीर पटवर्धनांची कला. वर वर ही चित्रं साधी-सरळ वाटतात. ती कुणालाही 'समजावीत' अशी चित्रं आहेत. पण पिचलेल्या, वर्षानुवर्ष केवळ राबणंच नशिबी आलेल्या सामान्य माणसांचं त्या चित्रण करतात. स्नायूंचं पिळवटणं, देहबोली, चेहर्‍यावरचे भाव यांतून ते अभिव्यक्ती करतात. त्यात घटना असतात. घटनेचं वर्णन असतं. पण याही पलीकडे जाऊन त्यांची चित्र दीर्घकालीन, शाश्वत असं काही देतात.
परंपरेचा इतिहास, पटवर्धन यांनी केलेले डाव्या चळवळीतलं काम, त्यातून त्यांच्यावर झालेले संस्कार, वॅलेजोसारख्या मेक्सिकन भित्ती-चित्रकारांची चित्रं, अशा विविध गोष्टी या चित्रांमागे आहेत. शिवाय त्यात सातत्य, ध्यास आणि इंटिग्रिटी आहे. या सार्‍यातून त्यांची कला साकार होते. वर्षानुवर्षं केलेल्या तपस्येतून त्याला विशिष्ट शैलीची जोड मिळते. त्यातून त्यांचं यश दृग्गोचर होतं.
दुसरं उदाहरण प्रभाकर बरवे आणि कोलतेंचं. या दोघांनी सुरुवातीला पॉल क्ली सदृश चित्रं निर्माण केली. अनेक वर्षं स्वतःच्या चित्रावकाशचा शोध घेतला. त्यासाठी अक्षरशः गुदमरवून टाकणार्‍या सरकारी नोकर्‍या केल्या. छोट्याशा कुठल्या तरी चाळीत वसलेल्या स्टुडिओतून काम केलं. पण त्याचबरोबर साहित्य, कला, नाटक -सर्व क्षेत्रांतल्या मंडळींशी संवाद चालू ठेवला. दोघंही कविता करत, गद्य लेखन करत, ज्यातून त्यांनी चित्राविषयीचा स्वतःचा विचार टोकदार करत नेला. या चित्रकारांच्या यशाचा इतर मराठी चित्रकारांनी कधी विचार केला का?
मराठी चित्रकार जे.जे. किंवा तत्सम महाविद्यालयातून बाहेर येतात तेव्हा त्यांचा पहिला विचार असतो तो सर्व्हायवलचा. त्यामुळे पहिलं काम तो करतो ते पूर्णपणे व्यावसायिक. शिल्पकार असेल तर चित्रपटांच्या सेट्सच्या रचनेत सहभागी होतो. चित्रकारांनी पोर्ट्रेट, इंटेरियर, क्वचित जाहिरात संस्थांत रेखाटनकार म्हणून काम करणं हे प्राधान्य असतं. अर्थात यात चुकीचं काही नाही. पण तो त्याच्यातली चित्रकलेची आस टिकवून ठेवतो का, असा प्रश्न आहे. तो गॅलरी बुक करुन टाकतो. आणि मग प्रदर्शनाची तारीख मिळाली की आपलं वाटणारं चित्र तयार करु लागतो. २-३ महिन्यांत, कधी एका महिन्यात.
उलट काही जण चित्रं करत राहतात. नोकरीधंदा काही करत नाहीत. थोडीफार चित्रं विकली जातात. एखाद्या चित्राचं कौतुक होतं. तो त्याच प्रकारची चित्रं करु लागतो. सकृतदर्शनी असं दिसतं की तो चित्र सातत्याने काढतोय. पण तो केवळ कलाबाजारासाठी निर्मिती करत असतो. तिसरा वर्ग सातत्याने पूर्णवेळ चित्रकार राहून स्वतःचा मार्ग शोधणारा. ललित कला विजेते संजय सावंत, वैशाली नारकर, ते आजच्या श्रेयस कर्वे, हेमाली भूता, पराग तांडेल, शिल्पकार आरती तेरदाळकर... अनेक उदाहरणं यात देता येतील. चित्रकार शार्दुल कदम आणि देवदत्त पाडेकर हे याच पिढीचे, पण यथार्थ कलेची परंपरा चालवणारे. त्यांचं चित्रकौशल्य डोळे दिपवतं. पण ती चित्रं बायेनालेसारख्या प्रतिष्ठित प्रदर्शनात कधी लागणार नाहीत हेही खरं.
चित्रकारांची नवी पिढी आश्वासक आहे. सुनील गावडे, सुनील पडवळ, अनंत जोशी यांच्या मधल्या पिढीपासून ते आताच्या मराठी चित्रकारांपर्यंत. मग त्यात सातत्याने चित्रविचारावर भर देणारे प्रसन्न घैसास, हंसोज्ञय तांबे यांसारखे चित्रकारही आले किंवा शिक्षणक्षेत्रात पूर्णपणे वेगळा विचार करणारा नितीन कुलकर्णीसारखा चित्रकार कवी असेल, चित्रकलेतील भविष्याच्या चित्रात मराठी चित्रकारांचा मोठा प्रभाव असेल असं दिसतं. आज मात्र तो ढासळल्यासारखा दिसतोय.
बडोदा महिला कलेच्या इतिहासाचं पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीने सांगितलं की इथल्या चित्रकारांना रेखाटनही येत नाही. उलट जे.जे.च्या विद्यार्थ्यांचा स्केचिंगपासून पोर्ट्रेटपर्यंत हात तयार असतो. जे.जे. मधून अदवी घेऊन पदव्युत्तर शिक्षण बडोद्यात घेतलं तर बर्‍याच गोष्टी नीट होतात. वर दिलेल्या यादीत तीनचार जण या पद्धतीनं करियर केलेले आहेत. थोडक्यात परंपरा आणि अहंकार विसरुन जे.जे.त, पर्यायाने त्यातून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी थोडं बडोद्याकडे पाहिलं पाहिजे, त्याहीपेक्षा जगाकडे पहायला हवं.
आजच्या काळात साधं जाहिरात एजन्सीत काम करायचं तरी तुम्हाला बिथोवन, मोझार्टच्या सिंफनीज, माजिद माजदीचा सिनेमा, इंडी फिल्म, व्यवस्थापन (स्टीवन कोवींचा बालबोध), व्यंगचित्रकला, विनोद, वाचन्-अनेक गोष्टी लागतात. बाऊहाऊसपासून उत्तर आधुनिक चित्रकार, विचारवंत यांनी चित्रकलेच्या चिंतनाचं प्रचंड साहित्य निर्माण केलेलं आहे. पण दुर्दैवाने मराठी चित्रकारांनी 'माइंड्स आय' सारखं पॉल क्लीचं पुस्तकही पाहिलेलं नसतं. वाचन दूरच. सत्यजित रेचाही सिनेमा पाहिलेला नसतो. मुंबईसारख्या ठिकाणी राहूनही ते (अनेकदा मोफत असलेल्या) वेस्टर्न क्लासिकलच्या मैफिलींनाही दिसत नाहीत किंवा एनसीपीएतल्या मोफत रिडिंग रुमध्येही. अशा स्थितीत त्यांच्याकडून निर्माण होणार्‍या कलेत जागतिक किंवा सार्वत्रिक आशय कसा येऊ शकेल? म्हणूनच स्वतःला समृद्ध करणं आणि ज्येष्ठ तसंच जागतिक चित्रकारांचं काम डोळसपणे पाहणं ही एक किल्ली असू शकेल. "

तुम्ही मराठी चित्रकार असाल, किंवा नसालही.. पण तुमची यावरची मतं जाणून घ्यायला नक्की आवडेल.


शर्मिला फडके