Saturday, August 9, 2014

‘गायतोंडे’ ग्रंथ सवलतीत मिळवण्याची शेवटचीच संधी…


१३ वर्षापूर्वी १० ऑगस्ट २००१ रोजी गायतोंडे यांचं निधन झालं. आज ते हयात असते तर ९० वर्षांचे झाले असते. चित्रकार रझा जेजेतले त्यांचे वर्गबंधू. त्याचं वय आता ९३ वर्षांचं आहे. पेरीसहून भारतात परत येऊन ते आता दिल्लीत स्थायिक झाले आहेत. गायतोंडे ग्रंथाच्या प्रकाशनासाठी त्यांचं नावं सुयोग्य होतं. पण दुर्देवानं प्रकृती स्वास्थ्यामुळे, मुंबई दिल्ली प्रवास झेपण्यासारखा नसल्यानं त्यांनी असमर्थता दर्शवली आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी गायतोंडे यांच्या भावविश्वात ज्यांना मोठं स्थान होतं असं एक नावं आता आम्ही निश्चित केलं आहे. पण त्याविषयीची घोषणा सारं निश्चित होताच केली जाईल. 

दरम्यानगायतोंडेग्रंथाविषयी मेल अथवा फोनवरून सातत्याने विचारणा होत असते. त्याविषयी थोडसं सांगावसं वाटतं आहे. ‘गायतोंडेग्रंथाची पहिली आवृत्ती तर या पूर्वीच बुक झाल्याचं आम्ही या पूर्वीच जाहीर केलं होतं. या सततच्या चौकश्यांमुळे अखेरीस आम्ही पहिल्या आवृत्तीच्या प्रतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही कालपर्यंत मागणी नोंदवून घेतली. प्रकाशनाचा कालावधी आता निश्चित झाला आहे. ज्यांच्या हस्ते आता प्रकाशन होणार आहे ते नाव हे निश्चित झाले म्हणजे १२ ते १६ सप्टेंबर या कालावधीतील कोणत्याही एका तारखेची घोषणा आम्ही करू. 

दिनांक २० ऑगस्ट रोजी या ग्रंथाची छपाई सुरु होईल. ‘चिन्हच्याच नव्हे तर एकूण मराठी ग्रंथांच्या इतिहासातला हा सर्वात खर्चिक ग्रंथ ठरणार आहे. त्यामुळे नोंदवल्या जाणाऱ्या मागणी एवढ्याच प्रती आम्ही प्रकाशित करणार आहोत. ज्यांना हा ग्रंथ आपल्या संग्रहात हवा आहे, त्यांना रु. ३००० चा हा ग्रंथ रु. २००० इतक्या सवलतीतच बुक करण्याची अखेरचीच संधी आम्ही देत आहोत. उशिरात उशिरा १८ ऑगस्टपर्यंतचचिन्हच्या ९००४० ३४९०३ या नंबरवर नाव, पत्ता आणि -मेल आय डी, एसेमेस करून तुम्ही मागणी नोंदवू शकता आणि दिनांक २० ऑगस्ट पूर्वी स्टेट बँकेच्या कुठल्याही शाखेत रु. २००० हे सवलत शुल्क भरू शकता. 

ग्रंथ जास्तीत जास्त संग्राहय व्हावा आणि संपूर्णतः निर्दोष व्हावा या प्रक्रियेत प्रकाशनाला उशीर होत गेला. पण आता ती प्रक्रिया संपली आहे आणि मराठी ग्रंथांच्या इतिहासात निश्चितपणाने अजोड ठरावी अशी ग्रंथ निर्मिती करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. हा ग्रंथ जेव्हा आपण पहाल तेव्हा आपणास आमचं वरील विधान अतिशयोक्तीचं वाटणारं नाही याची आम्हाला खात्री आहे. 


वितरणाचा नवा फंडा 

चिन्हचं एका परिपूर्ण आर्ट मेगझीन मध्ये रुपांतर झाल्यापासून म्हणजे २००९ सालापासून अंक वितरणाचा आम्ही एक अनोखा फंडा अमलात आणला. ‘चिन्हच्या कट्टर वाचकांचा आणि महाराष्ट्रातील चित्रकारांचा संपूर्ण डेटाचिन्हपाशी असल्यानं चिन्हनं मेल एसेमेस आणि फेसबुक च्या माध्यमातून संबंधितांशी संपर्क साधला. हा प्रयोग भलताच यशस्वी ठरला आणिचिन्हचे अंक शिल्लक राहणं दुरापास्त ठरू लागले. यातचिन्हचाही अंकाचा निर्मिती खर्च उभा करण्याच्या दृष्टीनं मोठा फायदा झाला. जाहीरातदारांवर अवलंबून राहावे लागेना. ‘चिन्हच्या वाचकांचाही ग्रंथ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते यांच्यावर अवलंबून राहील्याने आणि घरबसल्या तब्बल ३० ते ४० टक्के सवलतीत अंक घरपोच होऊ लागल्याने मोठाच फायदा झाला. हाच फंडाचिन्हनं नंतर कायम केला. आणिनिवडक चिन्हच्या महत्वाकांक्षी योजनेत याचा यशस्वीपणे वापर केला. 

ग्रंथ विक्रेते ही संकल्पनाचं बाजूला टाकल्यामुळे महाराष्ट्रातले बहुसंख्य ग्रंथ विक्रेते दुखावले. पण त्याला आमचा आता नाईलाज आहे. आपल्याचं पैशांसाठी का म्हणून त्यांच्याकडे वर्षानुवर्ष तोंड वेंगाडत राहायचं ? ‘चिन्हला आता अशा व्यवस्थेची गरजच उरलेली नाही. म्हणूनचं आता गायतोंडे ग्रंथाला किंवा नंतरच्या दोन्ही खंडांना कितीही मागणी आली तरी ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही ग्रंथ विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार नाही हे निश्चित. याला काहीजणंमाजअसा शब्दप्रयोग करणार असतील तर त्याला आमची काहीच हरकत नाही. कारणंचिन्हनं हे जे काही मिळवलं आहे त्यामागेचिन्हची काहीतरी सांगण्याची तळमळ आणि घेतलेल्या कष्टांचा खूप मोठा वाटा आहे. तेव्हा ज्याला कोणाला सवलतीतगायतोंडेग्रंथ हवा असेल किंवा अन्य दोन्ही खंड हवे असतील त्यांनीचिन्हला फक्त एक एसेमेस पाठवून माहिती मागवावी हे बरे. २० ऑगस्ट नंतरगायतोंडेग्रंथ ३००० रुपयांनाच घ्यावा लागेल. 

अशा योजना राबवतांना अनेकदा तोटा होण्याची शक्यताही असते. पण एकदा शब्द दिल्यानंतर मात्रचिन्हनं तो कधीच फिरवला नाही. यागायतोंडेग्रंथाचंच उदाहरणं घ्या. या ग्रंथाचे सवलत शुल्क आधी रु. १२०० निश्चित केले होते, नंतर ते १४५० केलं गेलं. पुन्हा एकदा वाढून १६५० करावं लागलं आणि आता शेवटच्या टप्प्यात ते २००० केलं गेलं आहे. पृष्ठ संख्येत वाढ झाली. संपूर्ण रंगीत छपाई असल्यानं छपाई खर्चात वाढ झाली. आधी ठरवला होता त्यापेक्षा उच्च दर्जाचा कागद वापरला गेला. बाईंडिंग, आसपासचा कागद, जेकेट आणि कोरोगेटेड बॉक्स या साऱ्यातचं नव्या नव्या व्हेल्यू एडिशन्स केल्यानं ग्रंथाच्या गुणवत्तेत आणि निर्मिती खर्चात प्रचंड वाढ झाली पण ज्यांनी रुपये १२०० किंवा १४५० भरले त्यांना आम्ही तो त्याच किंमतीत उपलब्ध करून दिला आहे. 

निवडकयोजनेतील सहभागींची झलक तर पहा 

चिन्हच्या या अनोख्या प्रयत्नांमुळेच या साऱ्यालाच वाचक चळवळीचं एक अनोखं स्वरूप आलं आहे. ज्यात विजय दर्डा यांच्यासारखे राजकारणी देखील सहभागी झाले. यात चित्रकारांचा सहभाग जरा कमीचं असला तरी नाटकं, चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य, वैद्यक, विज्ञानं या सारख्या अनेक क्षेत्रातील कितीतरी रथी-महारथी या योजनेत सहभागी झाले आहेत. वसंत आबाजी डहाके, डॉ. रवी बापट, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, जया दडकर, डॉ. सुधीर पटवर्धन,भारत सासणे, शमा भाटे, रजनी दांडेकर, प्रा. सुनीती देव, वृंदावन दंडवते, प्रवीण बर्दापूरकर, सुजीत पटवर्धन, गिरीश कुलकर्णी, अभिलाष खांडेकर, विनय धुमाळे, प्रा. अनिल सोनार, अशोक राणे, अतुल देऊळगावकर, माधवी मेहेंदळे, मुकुंद भागवत, रत्नाकर सोहोनी, दीपक देशपांडे, प्रकाश बाळ जोशी, डॉ. शशिकांत लोखंडे, रमेश वेळूसकर, सुहास शिळकर,माधव बोरकर, डॉ. प्रिया जामकर, यशवंत शिरवाडकर, सुनील गावडे, भास्कर हांडे, सतीश भावसार, शुभा गोखले, गिरीश प्रभुणे, प्रतिमा वैद्य, वैजनाथ दुलंगे, डॉ. घनश्याम बोरकर, गणेश मतकरी, राजू सुतार,नीरजा पटवर्धन, प्रा. नितीन आरेकर, प्रमोद कांबळे, फिलिप डिमेलो, शामसुंदर जोशी, स्वागत थोरात, वीणा जामकर, विद्यागौरी टिळक, भूषण कोरगावकर, किशोर कदम, गीतांजली कुलकर्णी, डॉ. प्रकाश जोशी, राम कोल्हटकर, एस. बी. रेगे, यशवंत देशमुख, दिनकर मनवर, चंद्रकांत जोशी, प्रकाश राजेशिर्के, सुनील तांबे अशी आणखी नावं घ्यायची झाली तर एक वेगळी पोस्ट लिहावी लागेल. तेव्हा ज्यांना हागायतोंडेग्रंथ किंवा निवडकचे तिन्ही खंड त्यांनी ते त्वरित बुक करावे हे बरे. पुन्हा एकदा निक्षून सांगतो हागायतोंडेग्रंथ किंवा निवडकचे दोन्ही ग्रंथ महाराष्ट्रातील कुठल्या ग्रंथ विक्रेत्यांकडे विक्रीस उपलब्ध असणारं नाही ही काळ्या दगडावरची रेघच समजा. तेव्हा आता वेळ दवडू नका. उचला मोबाईल फिरवा नंबर ९००४० ३४९०३.



Wednesday, February 5, 2014

" गायतोंडे " पाने वाढली पण किंमत नाही … 



 फायनली " गायतोंडे " ग्रंथ आता तयार झाला आहे .
छपाईच्या प्राथमिक बाबी पूर्ण होताच त्याची छपाई सुरु होईल .
हा ग्रंथ २०० पानांचाच असेल असे आम्ही आधी जाहीर केलं होतं .
पण आता पानं वाढली आहेत .
या ग्रंथाचं काम पूर्णत्वाला जात असताना असं लक्षात आलं की
यात कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी याचं लिखाण नाही ,
आणि ही काही बरी गोष्ट नव्हे ,
गायतोंडे आणि नाडकर्णी यांच्यात मैत्री तर होतीच ,
पण गायतोंडे यांच्यावरचा एकमेव मोनोग्राम नाडकर्णी यांनीच
लिहिला आहे . इतकंच नाही तर गायतोंडे यांच्यावर सर्वात
जास्त लिखाण नाडकर्णी यांनीच केलं आहे .


पण आता नाडकर्णी तर नाहीत ,
अनेकवार प्रयत्न करूनही त्यांच्या पत्नी शालिनी नाडकर्णी यांच्याशी
संपर्क साधता आला  नाही .
मग आम्ही निर्णय घेतला की आपल्याच संग्रहातला एखादा लेख
पुनर्मुद्रित करावयाचा .
पण त्याचं   त्यातलं बहुसंख्य लेखन हे वृत्तपत्रात प्रसंगपरत्वे प्रसिद्ध
झालं असल्यानं त्याला टिकावूपणा नव्हता , मग आम्ही निर्णय
घेतला की त्यांच्या 'अश्वथाची सळसळ ' या पुस्तकातला लेखच
पुनर्मुद्रित करावयाचा .


प्रकाशक रामदास भटकळ यांना मेल केली , त्यांनी ही लागलीच
परवानगी दिली आणि नाडकर्णी यांचा लेख " गायतोंडे "ग्रंथात समाविष्ट झाला .
नाडकर्णी यांच्याशी असलेल्या प्रदीर्घ स्नेहामुळे हे घडले असे नाही तर
ती त्या ग्रंथाची गरज होती म्हणून ते घडले .
 फिरोज रानडे यांचा लेखही असाच ग्रंथाची गरज म्हणून  समाविष्ट झाला .


साहजिकच पानात वाढ झालीच ,  त्यातच ग्रंथाची मांडणी किवा रचना
करताना निवडकच प्रकाशचित्र प्रकाशित करावयाची असे बंधन घालून
घेतल्याने ,( नाहीतर ग्रंथाला मासिकाचे स्वरूप आले असते , किवा कदाचित
स्मरणिकेचे सुद्धा ,) मोठ्या प्रमाणावर प्रकाशचित्रे उरली ,
मोठ्या कष्टाने जमवलेली अतिशय दुर्मिळ अशी ही प्रकाशचित्रे अशी
निकालात काढायची कल्पना मनाला बरी वाटेना ,


त्यातून त्यांचा एक आल्बम सर्वात शेवटी द्यावयाची कल्पना सुचली ,
पुन्हा पाने वाढली , मग म्हटलं आता एवीतेवी पाने वाढतातच आहेत
तर गायतोंडे यांच्या या ग्रंथासाठी जमवलेल्या सर्वच्या सर्व पेंटिग्जच्या
थंबनेल्स का वापरू नयेत ?त्या अभ्यासकांना . कलारसिकांना नक्कीच उपयोगी
ठरतील . झालं . असं करता करता २४ पानं कशी वाढली ते कळलंच नाही .
अर्थातच ग्रंथाचा निर्मिती खर्चही वाढलाच , पण त्याची पर्वा कोण करतो ?
' (चिन्ह 'ची प्रकाशनं का वाट पहावयास लावतात हे या 
उदाहरणावरून स्पष्ट व्हावयास हरकत नाही . )


तर सरते शेवटी आता हा ग्रंथ तब्बल २२४ पानांचा झालाय .
त्यातली निम्मी पाने आम्ही चित्र आणि प्रकाशचित्रांना दिली आहेत .
त्यात  आम्ही गायतोंडे यांची तब्बल ६५  पेंटिग्ज  प्रसिद्ध केली आहेत ,
तर गायतोंडे यांचे अत्यंत  दुर्मिळ असे ४८  फोटो  ४८ पानांमध्ये प्रसिद्ध केले आहेत .
याशिवाय आल्बम मध्ये प्रसिद्ध होणारी पेंटिग्ज आणि फोटो वेगळेच .
आता सांगा अशा प्रकारचं पुस्तक किवा ग्रंथ मराठीत या पूर्वी प्रकाशित
झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का ?
एवढं करून आम्ही आधी जाहीर केलेल्या किमतीतच हे सारे देतो आहोत
असं तुम्ही कधी पाहिलं आहे का ?
पण हो १५ फेब्रुवरी नंतर मात्र आम्ही या ग्रंथाची किमत वाढवतो आहे हे निश्चित , १५ फेब नंतर या ग्रंथाची किमत किमान रु २५०० इतकी नक्कीच होईल .
तेव्हा आता अधिक वाट पाहू नका , वेळ दवडू नका .
उचला फोन , पाठवा संदेश   NKG किंवा  NK3 चिन्हच्या ९००४०३४९०३या नंबरावर ….


सतीश नाईक
संपादक चिन्ह

Wednesday, January 22, 2014

      'गायतोंडेमध्ये काय नाही'

  
परवा लिहायचं होतं ते गायतोंडे यांच्यावर
पण गाडी कुठेतरी भरकटत गेली खरी 
' गायतोंडे'चा विषय नुसता निघाला तरी
काय बोलू आणि किती सांगू असं होतं खरं ,
आता उदाहरणार्थ हेच पहाना ,
टाईम्स मधून ' गायतोंडे ' स्टोरी साठी मिथिला फडकेचा फोन आला 
तेव्हा मी शेगडीवरून  चहा उतरवला होता आणि दूध तापत ठेवलं होतं ,
पाउण एक तास मी तिच्याशी बोलत होतो ,
दुसऱ्या मजल्यावरून माझी असिस्टंट कसला जळका वास येतो ते पाहायला 
खाली आली तेव्हा कुठे मला कळलं कि दूध जळलं .
पण ते एक असो .

संपादनाच्या कामा निमित्तानं 'गायतोंडे ' या पुस्तकाचं किती वेळा
वाचन केलं त्याची गणतीच नाही ,
पण प्रत्येक वेळी त्या पुस्तकातून काही ना काही नवे मिळाले नाही
असे कधी झालेच नाही,
मला वाटतं म्हणूनच बहुदा 'चिन्ह' चे  ते तिन्ही अंक प्रचंड वाचले
गेले असावेत . गाजलेही गेले असावेत.
या साऱ्याचं श्रेय ' चिन्ह ' ला दिलं जातं ,पण ते काही खरे नव्हे .
ते सारं श्रेय 'गायतोंडे '  यांनाच आहे.
ते  अफाट आयुष्य जगले , अफाट काम करून गेले ,
म्हणूनच तर' चिन्ह ' ला ते मांडता आले,
' चिन्ह' चं यातलं जर काही श्रेय असलंच तर ते इतकंच आणि एव्हडंच .
आता याला जर कुणी आमचा  विनय बिनय वगॆरे म्हणणार असेल
तर त्याने ते म्हणावे बापडे,
पण आमची म्हणाल तर अशी धारणा आहे की  तीन अंकांच्या रूपाने
आम्हाला ते सारे मांडावयाची संधी मिळाली हेच
 मुळी आम्ही आमचं भाग्य समजतो . 



तर सांगत काय होतो ?
हं, संपादन करताना जेव्हा जेव्हा हे संकलन वाचत गेलो
तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळा त्यातून नवे नवे काहीतरी मिळत हे जातेच
आता उदाहरणार्थ परवाचेच पहाना.
एकोणीसाव्या किवा विसाव्या वेळी "गायतोंडे ' वाचताना असं लक्षात आलं की
अरे , यात आयुष्याचे सारेच्या सारे रंग यात मिसळले आहेत की ,
म्हणजे यात  पिता पुत्र संघर्ष आहे , आईचं प्रेम आहे ,बहिणीची माया आहे .
इथं प्रेमभंगचं दु :ख आहे , साऱ्या पाशांचा त्याग आहे , गुरूचा शोध आहे ,
गुरुवरची निष्टा आहे ,नाविन्याचा शोध आहे ,आधुनिक विचार आहेत ,
वाचन ,मनन ,चिंतन,  एकाग्रता , निष्टा , ध्यास  आणि त्यातून तयार झालेली
ठाम मते हे सारे काही  पानोपानी  वाचकाला चकरावून टाकत जाते , लिलावात त्याचं एक चित्र
आज २३ करोड आणि ७० लाखाला  विकलं गेलं आहे हे कळल्यावर तर गायतोंडे
यांच्या कडे पाहावयाचा दृष्टीकोनच बदलला जातो .
' सेक्स ' हा विषय सोडला तर ( त्याचेही खूप सुंदर सूचन त्यात आहेच .)
आयुष्याशी संबंधित सारे  सारे काही या पुस्तकात ठासून भरले आहे ,
जे फक्त चित्रकारालाच नाही तर कुठल्याही क्षेत्रातल्या कुणालाही आयुष्यात उपयोगी पडू शकते ,
इतकेच नाही तर आयुष्याला एक वेगळी दिशा देवू शकते .
 थोरा मोठ्यांची चरित्रे आपल्याला खूप काही सांगून जातात , शिकवून जातात ,
आयुष्याला अनेकदा एक छानशी दिशा देवून जातात .
"गायतोंडे ' यांच्यावरचे हे चरित्र नव्हे पण पण चरित्राची सर्वच्या सर्व साधनं असलेलं
हे अनोखं पुस्तक  या सर्वात वरचं स्थान पटकावणार आहे या विषयी आमच्या मनात
तरी अजिबात शंका नाहीय . 
कारण त्याचं २३  शे किंवा २३ हजाराला विकलं गेलेलं त्याचं एक चित्र आता
ख्रिस्तीजच्या आंतरराष्ट्रीय लिलावात २३करोड आणि ७० लाखाला विकलं गेलंय .

इतकं सारं वाचून तुम्हाला हे पुस्तक आपल्या संग्रहात हवेच असे जर तुम्हाला वाटत असेल  तर
 
'NKG' हा लघुसंदेश 'चिन्ह'च्या ९००४० ३४९०३ या नंबरावर नाव, पत्ता आणि मेलसह पाठवावा , किवा मेल करावा

सतीश नाईक 
संपादक 'चिन्ह '

Thursday, January 16, 2014

पत्रावळी आणि ' पत्र्या 'वळी ….



" गायतोंडे " हा ग्रंथ काही रुढार्थाने गायतोंडे यांचे चरित्र म्हणता येणार नाही .
पण गायतोंडे यांच्या चरित्राची सारीच्या सारी साधने मात्र या ग्रंथात एकवटली आहेत
असे मात्र निश्चितपणे म्हणता येईल .
गायतोंडे यांनी कधीच कुणाला आपल्या जवळ फिरकू दिले नाही .
लेखक , पत्रकार ,संपादकांशी तर ते फटकून वागत . साहजिकच हुसेन , सूझा , रझा , आरा यांना जशी प्रसिद्धी मिळाली तशी प्रसिद्धी
गायतोंडे यांना कधीच मिळाली नाही .

आणि गायतोंडे यांनीही त्याची कधी फिकीर केली नाही .
' चिन्ह 'ने म्हणूनच गायतोंडे यांच्या वर काम करताना
त्यांच्या सहवासात आलेल्या जास्तीतजास्त लोकांशीच संवाद साधण्यावर भर दिला , त्यातून साकार झाले ते अतिशय गाजलेले ते तीन अंक.
२००१, २००६ आणि २००७ साली ते प्रसिद्ध झाले .
आज कार्यालयीन प्रती खेरीज त्यांची एकही प्रत आमच्याकडे उरलेली नाही
यावरून ते सारेच अंक किती गाजले याची सहज कल्पना येवू शकेल .
दर चार दोन दिवसाआड ' त्या अंकाची एक तरी प्रत आहे का ' अशी
विचारणा होतेच होते .
गंमत म्हणजे यातले बहुसंख्य लोक हे सदर अंक प्रसिद्ध होण्याआधी
अंकाची मागणी नोंदवावी म्हणून आम्ही मेल किवा एसेमेस द्वारे ज्यांच्या हात
धुवून मागे लागलेले असतो तेच असतात .
पण हेच सारे नंतर 'एक तरी प्रत द्या ना , फाटकी तुटकी सुद्धा चालेल म्हणून
आमच्या मागे लागतात .







आधी प्रकाशन पूर्व सवलतीत अंक घ्यायला काचकूच करणारे हेच सारे
नंतर मात्र या अंकांसाठी दाम दुपटीने पैसे मोजायला तयार असतात .
१०० -१०० रुपयांच्या अंकांसाठी अनेक महाभाग तर केवळ झेरॉक्स साठी
२००- ३०० रुपये मोजताना पहावयास मिळाले आहेत .
" चिन्ह 'चे अंक रंगीत निघू लागल्या पासून तर त्याच्या रंगीत झेरोक्स साठी
२०००-३००० रुपये मोजणारे हि काही कमी नाहीयेत .
७५० रुपयांचे अंक आम्ही ३०० ते ५०० रु इतक्या सवलतीत दिले , ते सुद्धा टपाल खर्चासह , एक किलो वजनाचा अंक कोरोगेटेड बॉक्स सह
पोस्टाने पाठवावयास प्रचंड खर्च येतो , तो आम्ही सोसतो .
पण तरी सुद्धा संबंधित मंडळी हे अंक सवलतीत का घेत नाहीत याची
कारण मीमांसा काही आम्हाला अद्यापि करता आलेली नाही .
' चिन्ह 'च्या सवलत योजनेत भाग घ्यायचा नाही आणि नंतर
झेरॉक्सवाल्याला मात्र अवाच्या सव्वा दाम मोजायचे
या मागचे रहस्य जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल .


मध्यंतरी एका कला महाविद्यालयाच्या ग्रंथपालांचा फोन आला होता ,
म्हणाले 'लई भारी अंक काढता राव , पण त्येव्हडं बाईन्डीग सुद्धा चांगलं करा की ,
पत्रावळ्या होतात बगा लागलीच ,
मी त्यांना विचारलं , सर . महाविद्यालयात शिक्षक किती ?
तर म्हणाले , असतील की ५०-६०
त्यातले " चिन्ह " वाचतात किती ? तर म्हणाले ,असतील की पाच सहा .
म्हटलं , बाकीच्यांचं काय ? त्ये नुसतं इथल्या इथं बगत्यात . म्हटलं वाचणाऱ्या शिक्षकांचं काय लायब्रीत वाचतात की घरी नेतात ?
तर म्हणले घरी नेतात …
किती दिवसांनी परत देतात ? १०- १५ दिवसांनी , अंक मागून घ्यावा लागतो .
म्हटलं मुलांचं काय ? किती मुलं आहेत महाविद्यालयात ? तर म्हणाले ५०० .
त्यातली किती वाचतात ? तर म्हणाले , जास्तीत जास्त शंभर, उरलेल्या मुलांचे काय ? तर म्हणले , उरलेली तीनशे चारशे मुलं अंक नुसता बघत्यात .
कुठे बघतात ? हिथच लायब्रीतच बघतात , वाचणारी मुलं कुठं वाचतात , इथं की घरी ? असं कुठं होतं का ?त्यानला अंक घरी न्यायाची परमिशन नाही .
मग ती मुलं काय करतात ? काही नाही , त्यानला आम्ही झेरॉक्स मारून घ्यायची परमिशन मात्र दिली आहे .
मग म्हटलं आता मला सांगा आर्ट पेपरवर छापलेला , परफेक्ट बाईडिग केलेला अंक
जर वारंवार झेरोक्स मशीन मध्ये जात राहिला तर तो एखाद्या पत्र्यावर जरी
छापला गेला असता तरी त्याच्या पत्रावळ्याच झाल्या असत्या असं तुम्हाला नाही का वाटत ?फार फार तर त्याला "पत्र्या "वळ्या म्हणता आले असते .
ह्ये आमच्या लक्षातच आले नाही , स्वारी …असं म्हणून चटकन त्यांनी फोन ठेवला देखील ….


कुणाला दुखावण्याच्या हेतूने हे लिहिलेले नाहीय ,
या मजकुरामुळे कुणी जर नकळत दुखावले गेले असेल तर मी मुळीच त्यांची माफी बीफी मागणार नाही ,
कारण हि वस्तुस्थिती आहे , खरी गोष्ट याही पेक्षा भयंकर आहे , कारण गेल्या तीन अंकापासून "चिन्ह "च्या
प्रती आम्ही विक्रीसाठी कुणालाही देत नसल्याने आमच्या संगणकात नावनिशीवार सारी आकडेवारी आहे .
त्यातून प्रगट होणारे सत्य चित्रकला आणि चित्रकलेशी संबंधिताना नक्कीच आवडणारे नाही याची खात्री आहे . पण हेही कुणीतरी लिहायला हवेच , नाही का ?

सतीश नाईक
संपादक ' चिन्ह '




" चिन्ह " प्रकाशित करताना आलेले हे असे अनेक धमाल अनुभव
"निवडक चिन्ह "चे तिन्ही खंड प्रसिद्ध होई पर्यंत इथून पुढे
आठवड्यातून तीन वेळा तरी लिहावे असा विचार आहे , पाहूया जमते का ते …
सतीश नाईक
संपादक 'चिन्ह '

Wednesday, January 1, 2014

दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतीक - ‘चिन्ह’

दरवर्षी नव्या ‘चिन्ह’ ची खूप उत्सुकता असतेच. या वर्षीचा नवा ‘चिन्ह’ आहे. उद्दाम, बेबंद, उसळत्या लाटांचा वसा घेऊन आलेला, समुद्राचे स्वैर उधाण क्षण पकडणारा,नि उत्साहाच्या उर्जेची असंख्य शिडे फडफडणारा - नाशिवंत ‘सामुद्री’ कलेचा - वाळू,शिंपले नि रेतीचा - भरती ओहोटीचा आयुष्याच्या - होड्या नि जहाजांच्या तरल प्रवासाचा - नि कशा कशाचा - मिरीचा नि ओंडक्याचा, पुरातत्वीय,राजकारणीय,भौगोलिक पर्यावरणीय,समाजकारणीय,कलेला परिमिती देणाऱ्या सौंदर्याचा - नव्या संशोधनात व कलाचिंतनात नि हृदगतात मग्न असलेल्या उत्साही उमद्या डॉक्टर कलावंत डॉ. सुबोध केरकारांचा - आणि त्यांच्या संघर्षमय जीवनाचा नि कलेचा प्रदीर्घ आलेख - कलेचा ध्यास प्रगट करणारा. 

हा अंक आहे - चिंतनमग्न,विदेही अवस्थेत रसिकांना ‘अवस्था लावोनी’, जाणारा संयत,शांत,धीरोदात झेन मुद्रेचा - कलेच्या तंद्रीत बुडलेल्या प्रसिद्ध चित्रकार वासुदेव गायतोंडेंचा - आपल्या अथांग प्रतिभेची पुसटशीसुद्धा जगाला चाहूल न देणारा, आपल्या कलेशी तादात्म्य पावलेला,स्वतःच जणु एक साक्षात कला - तत्वच बनलेला - सहज निर्माण प्रक्रियेतून आणि गंभीर एकटेपणातून चित्रातून घेतलेल्या स्वतःच्याच एका शोधाचा आणि या कलावंतांच्या कुंडलीची झलक दाखवणारा(नि ‘गायतोंडेच्या शोधात’ या आगामी पुस्तकाविषयी कुतूहल निर्माण करणारा )आणि त्यांच्या बद्दलच्या अमाप जिव्हाळ्याने भारावलेल्या चित्रकार प्रभाकर कोलत्यांचा.


गायतोंडेंच्या दिल्लीच्या घरातल्या सगळ्या वस्तुंवरील साचलेली धूळ स्वच्छ करण्यासाठी (गायतोंडेवरची डॉक्युमेंटरी फिल्म शूट करण्यासाठी ) डस्टरने ती धूळ झाडायला गेलेल्या कोलते सरांना गायतोंडेनी सांगितलं होतं - “कोलते ते तसंच राहू द्या. पुसायचं नाही. मला तसचं आवडतं.” - असं म्हणणारे खरेखुरे गायतोंडे. ग़्रेटच. आणि ती ‘कॉमेंट’ प्रामाणिकपणे सादर करणारे कोलतेही ग्रेटच.


हा अंक आहे - गोव्याचे प्रसिद्ध चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सुझा यांच्या रेषा - बोलीचा - पुरुष व स्त्री यांच्या आदिम तत्वातल्या रती नि कामभावाचे पातळतळ धुंडणारा - बेलगाम,हिंस्त्र,काहीशा रांगड्या श्वापदी वृत्तीने चित्रावर अक्षरश: तुटून पडणारे,आक्रमक वृत्तीने जीवनाबरोबरच कलेचा उपभोग घेणारे,पण तरीही त्यात उद्ध्वस्ततेला थारा न देणारे भारतातले एक प्रमाथी कलावंत - फ्रान्सिस न्यूटन सूझा - त्यांचा साक्षेपी अभ्यास करून त्यांच्या चित्रांतल्या पाश्चात्य व पौंर्वात्य काम - प्रेरणांचा वेध घेणारा नितीन दादरावाला यांचा समर्पक अभ्यासलेख.


नवा ‘चिन्ह’ म्हणजे सुनीता लक्ष्मण श्रेष्ठ यांचा चित्रकार पती-पत्नीच्या आयुष्यभरातल्या सहवासाच्या काही स्मृती (त्यात पुन्हा गायातोंडेंचे शिष्य लक्ष्मण श्रेष्ठ यांचे रेखाटलेले दुर्मिळ व्यक्तिचित्र )


सव्वीस कलाविषयक संशोधनावर पुस्तके लिहिणारे बाळकृष्ण दाभाडे या दुर्लक्षित कलाप्रेमीचा परिचय - नेपथ्यकार श्याम भुतकरांचा एके काळचा ‘झपाटलेल्या’ आयुष्याचा गूढ थरारक अनुभव.


फाळके पुरस्कारविजेत्या नि कलावंत गुरुदत्त यांच्या आयुष्याशी धागे जुळलेल्या सिनेमाऑटोग्राफर व्ही. के . मूर्तीच्या छायाचित्रणातले मोहक सौंदर्य टिपणारा अशोक राणेंचा लेख. 



यशवंत देशमुखांच्या निखळ अमूर्त कलेचं रहस्य - शुभा गोखलेंचं ‘न्यूडस’ बद्दलचं आणि अनामिकेचं स्वतःच्या ‘न्यूड’ फोटोग्राफीचे ‘धीट’ अनुभव - त्याबरोबरच विक्रम बाबांच्या अपारंपारिक छाया - चित्रणातला व ‘नग्न निषेध’ या लेखातला - या दोघांनी धसास लावलेला कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न नि त्यातला परखडपणा.


चित्रकार संजय निकम यांची २६ जुलैच्या काळरात्री जीवघेण्या प्रलयातून दोनशे बुडणाऱ्या माणसांना अक्षरश: पाण्यातून खेचून त्यांना ‘जीवनदान’ देणाऱ्या - कलावंताच्या जिद्दीची,अंगावर काटा आणणारी कहाणी-आणि अर्थातच प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बर्व्याचं ‘अधुरं स्वप्न’.


‘चिन्ह’ च्या यां अंकालाच व्यापून राहिलेली अथांग दर्याची नि सुशेगाद गोव्याची पार्श्वभूमी त्यात गोव्याचे दोन पिढ्यांचे तीन महत्वाचे कलावंत - गायतोंडे, सूझा नि केरकर. कला,जीवन आणि निसर्गाचं एकजीव आत्मतत्वच या अंकात जणू प्रगटलंय. जीवनातल्या सौंदर्याचा नि संघर्षाचा यात मिलाफ झालाय.


मात्र या सगळ्या यत्न-प्रयत्नांमागची अविश्रांत मेहनत आहे सतीश नाईकची - एका अगम्य उत्साहाने त्याला कलेविषयी जे जे नि जेवढं जेवढं करावसं वाटतं,ते ते आणि तेवढं तेवढं अत्यंत निष्ठापूर्वक करीत राहतोय. मग काहीही होवो. ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ वरचा अंक सर्वांचा विरोध पत्करून तळमळीने काढणार म्हणजे काढणारच. भास्कर कुळकर्णीवरचा असो वा गायतोंडेवरचा असो. विशेषांक हवा म्हणजेच हवाच. तसचं सारा विरोध डावलून ‘नग्नता विशेषांक’ प्रसिद्ध केला म्हणजे केलाच - तिथे तडजोड नाही.त्या अंकाला उत्तम प्रतिसाद मिळालाच. ‘चिन्ह'ला पर्याय नाही हेच खरं. एक प्रभाकर बरव्यांवरचा विशेषांक त्याला अजूनपर्यंत काढता आलेला नाहीय,पण मला खात्री आहे आज न उद्या तो हा अंक निश्चितपणे काढणारचं. कारण यामागे आहे त्याची कलेवरची आस्था,कामाची प्रचंड जिद्द नि ठाम आत्मविश्वास. या त्याच्या निरंतर ध्यासाला व धडपडीला सलाम!


कलातत्वाची पारख करणारा - ‘चिन्ह’ !


कलावंताच्या पाठीशी उभा राहणारा - ‘चिन्ह’ !


नि कलेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सतत झगडणाराही - ‘चिन्ह’ च !


अथक अविरत प्रयत्न,संकटांवर मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द यांच्या बळावर सतीशला यश मिळाले नाही; तरच नवल. यशाचे नवनवे मानदंड उभे करणाऱ्या ‘चिन्ह’ ला रौप्यमहोत्सवानिमित्त मनापासून शुभेच्छा !



प्रदीप संतोष नेरुरकर, डोंबिवली